ओपनहायमर आणि गीतेतील दोन श्लोक

ओपनहायमर आणि गीतेतील दोन श्लोक

बालमोहन लिमये

6 ऑगस्ट हा हिरोशिमा दिवस. सध्या ‘ओपनहायमर’ हा ख्रिस्तोफर नोलन यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट गाजत आहे. जे. रॉबर्ट ओपनहायमर या अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञाला अणुबॉम्बचा जनक मानले जाते. त्याचा जन्म न्यू यॉर्कमधील एका ज्यू कुटुंबात झाला. 1927मध्ये जर्मनीतील गोटिंगेन विश्वविद्यालयाकडून त्याने भौतिकीशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. युरोपमधील काही विद्यापीठांत आणि अमेरिकेतील हार्वर्ड व कॅल्टेक येथे काम केल्यावर तो बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात शिकवू लागला. त्याला बऱ्याच काळापासून भारतीय तत्त्वज्ञानाची ओढ होती. फक्त भाषांतरित ग्रंथ न वाचता ते मुळातून वाचता यावेत म्हणून त्याने बर्कले येथील आर्थर रायडर या संस्कृतच्या प्राध्यापकांकडे अभ्यास केला. विशेषत: त्याला भगवद्गीतेचे आकर्षण वाटे; गीता हे कुठल्याही भाषेत अस्तित्वात असलेले सर्वात सुंदर तात्त्विक गीत (the most beautiful philosophical song) आहे असे त्याचे मत होते. गीतेची एक प्रत त्याच्या कामाच्या टेबलाजवळ नेहमी असे. शिवाय आपल्या मित्रांना भेट म्हणून तो एकेक प्रतही देत असे.

दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केल्यानंतर अमेरिकेने अणुबॉम्ब बनवण्याचा मोठा प्रयत्न सुरू केला. या प्रकल्पाला 1942 साली मॅन्हॅटन प्रॉजेक्ट असे सांकेतिक नाव मिळाले, व जनरल लेस्ली ग्रोव्हज याची त्याच्या प्रमुखपदी नेमणूक झाली. टेनेसी प्रांतातील ओक रिज, वॉशिंग्टन प्रांतातील हॅनफोर्ड अशा अनेक ठिकाणी होणाऱ्या शास्त्रज्ञांच्या कामाखेरीज एक नवीन प्रयोगशाळा न्यू मेक्सिकोमधील लॉस आलामोस येथे 1943 सालच्या एप्रिल महिन्यामध्ये सुरू झाली, रॉबर्ट ओपनहायमरच्या निदेशनाखाली.


Oppenheimer, c. 1944
ओपनहायमर, 1944च्या सुमारास

त्याने लॉस आलामोसमध्येच राहून काम करण्यासाठी कित्येक नामवंत शास्त्रज्ञांना पाचारण केले. नवनवे शोध लावणे व त्यांचा उपयोग करून प्रत्यक्ष अणुबॉम्ब बनवण्याची अभियांत्रिकी रचना करणे हे मोठे आव्हान होते. शिवाय हे सगळे जर्मनीच्या आधी साध्य करणे जरूर होते. 1945 सालच्या उन्हाळ्यात दोन अणुबॉम्ब बनवून घेण्यात ओपनहायमरला यश आले, एकात युरेनियम 235 या मूलद्रव्याचे विखंडन (fission) करायचे होते व दुसऱ्यात प्लुटोनियम 239 याचा अंतःस्फोट (implosion) करायचा होता. एव्हाना जर्मनीने पराभव मान्य केला होता, पण जपानशी अमेरिकेचे युद्ध चालूच होते. वरील दोनपैकी पहिल्या तऱ्हेच्या बॉम्बची शाश्वती वाटत होती, पण दुसऱ्याची प्रक्रिया जास्त गुंतागुंतीची असल्याने त्याची चाचणी करणे आवश्यक ठरले. 16 जुलै 1945 रोजी पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी न्यू मेक्सिकोतील आलामोगोर्दो नावाच्या एका वाळवंटी भागात चाचणी झाली. तिला ओपनहायमरने ट्रिनिटी टेस्ट असे नाव दिले. त्या वेळी क्षणार्धात अतिशय उत्कट, गडद प्रकाश निर्माण झाला आणि प्रचंड उष्णता जाणवली.


Trinity Test, July 1945
ट्रिनिटी टेस्ट, 1945

तेव्हा ओपनहायमरला भगवद्गीतेतील पुढील श्लोक आठवला:

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता।
यदि भा: सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मन:॥

गीता, अध्याय 11, श्लोक 12

पदच्छेद :- दिवि सूर्यसहस्रस्य भवेत् युगपत् उत्थिता यदि भा: सदृशी सा स्यात् भास: तस्य महात्मन:
अन्वय :- सूर्यसहस्रस्य भा: यदि दिवि युगपत् उत्थिता भवेत्, सा तस्य महात्मन: भास: सदृशी स्यात्।
अर्थ :-

प्रभा सहस्र-सूर्यांची नभीं एकवटे जरी।
तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी न तुळे चि ती॥

(गीताई, विनोबा)

हजारो सूर्यांची झळाळी होईल जर प्रकट आकाशात एकाच वेळी,
तर ती असेल कदाचित तशी, जशी झळाळी त्या सर्वात्मकाची.

(गीतार्थदर्शन, कृष्ण श्री. अर्जुनवाडकर)

महाभारतातील कौरव-पांडवांचे युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन सैन्यांच्या दरम्यान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद झाला त्याला आपण गीता म्हणतो. विश्वरूपदर्शन नावाच्या अकराव्या अध्यायात अर्जुन श्रीकृष्णाला त्याचे ईश्वरी रूप दाखवण्याची विनंती करतो. अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन श्रीकृष्ण आपल्या तेजःपुंज पण भयावह रूपात त्याच्या पुढे उभा ठाकतो. याचे वर्णन संजय धृतराष्ट्राला करून सांगत असताना वरील श्लोक आला आहे. हे सगळे काल्पनिक मानले तरी आकाशात एकाच वेळी हजार सूर्य तळपणे हा उच्च कोटीचा कल्पनाविलास आहे, त्याने आपण थक्क होऊन जातो. अणुबॉम्बचा पहिलावहिला स्फोट बघून ओपनहायमरची तशीच अवस्था झाली असावी. कालांतराने 1958 साली रॉबर्ट जुंग्क या ऑस्ट्रियन लेखकाने ‘सहस्र सूर्यांपेक्षा तेजोमय’ (Brighter Than A Thousand Suns) या नावाचे पुस्तकही लिहिले, ओपनहायमरची मुलाखत घेऊन. त्यात आण्विक शास्त्रज्ञांचा वैयक्तिक इतिहास दिला आहे.

ट्रिनिटी टेस्ट यशस्वी झाल्यावर ओपनहायमरला आपल्या कामगिरीचा अभिमान तर वाटलाच, पण थोड्याच वेळात या कृत्याचे खोल परिणाम त्याच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाहीत. स्फोटाची गर्जना चाळीस सेकंदात शंभर मैल पसरली होती, तयार झालेला भूछत्राच्या आकाराचा ढग (mushroom cloud) साडेसात मैल उंचीवर पोचला होता. त्या वेळी निर्माण झालेली ऊर्जा सुमारे वीस हजार टन टी. एन. टी. (TNT, trinitrotoluene) या रासायनिक संयुगाचा विस्फोट केल्यावर मिळेल इतकी होती. जवळपासच्या सर्व गोष्टीचा नायनाट झाला. ज्या मनोऱ्यावर स्फोट केला होता, त्याच्या फक्त खालच्या थोड्या कडा उरल्या होत्या. त्याच्या जवळपासची वाळू वितळून तिचे फिकट हिरव्या रंगाच्या काचेत रूपांतर झाले; त्याला नंतर ट्रिनिटाइट (trinitite) असे नाव पडले. आता अशी अण्वस्त्रे पैदा होणार आणि नजीकच्या काळातच वापरली जाणार हे ओपनहायमरला स्पष्ट दिसत होते. त्यातून संपूर्ण जग नष्ट होण्याची दाट शक्यता नाकारता येत नव्हती. अशा परिस्थितीत ओपनहायमरला गीतेच्या अकराव्या अध्यायातीलच आणखी एका श्लोकाची पहिली ओळ आठवली. मी मृत्यू झालोय, सगळ्या जगांचा विनाश करणारा (I am become death, the destroyer of worlds), अशा अर्थाची. तो संपूर्ण श्लोक असा आहे :

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्त:।
ऋतेऽपि त्वा न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिता: प्रत्यनीकेषु योधा:॥

गीता, अध्याय 11, श्लोक 32

पदच्छेद :-
काल: अस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्ध: लोकान् समाहर्तुम् इह प्रवृत्त:    
ऋते अपि त्वा न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिता: प्रत्यनीकेषु योधा:

अन्वय :-
लोकक्षयकृत् प्रवृद्ध: काल: (अहम्) अस्मि। इह लोकान् समाहर्तुम् प्रवृत्त: (अस्मि)।
ये प्रत्यनीकेषु योधा: (ते) सर्वे त्वा ऋते अपि न भविष्यन्ति।

अर्थ :-

मी काळ लोकांतक वाढलेला
भक्षावया सिद्ध इथे जनांस।
हे नष्ट होतील तुझ्या विना ही
झाले उभे जे उभयत्र वीर॥

(गीताई, विनोबा)

कर्दनकाळ आहे मी, लोकांचा संहार करणारा, फोफावून आलेला,
आलो आहे इथे लोकांचा संहार करण्यासाठी,
तू नसलास तरी नाहीसे होणार आहेत सगळे योद्धे
जे उभे आहेत शत्रूच्या सैन्यात.

(गीतार्थदर्शन, कृष्ण श्री. अर्जुनवाडकर)

आपले ईश्वरी रूप अर्जुनाला दाखवताना भगवान श्रीकृष्णाने हा श्लोक उच्चारला आहे. आपल्याच नातेवाइकांशी युद्ध करण्यात अर्जुनाने डगमगून जाऊ नये आणि क्षत्रियाचा स्वधर्म पाळावा असा या श्लोकामागचा उद्देश आहे. अणुबॉम्बचे उग्र रूप पाहून जेव्हा ओपनहायमरच्या मनात हा श्लोक आला, तेव्हा त्याने स्वतःला कोणत्या स्वरूपात ओळखले असेल? श्रीकृष्णाच्या की अर्जुनाच्या? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे कारण ओपनहायमरने आपले विचार फारसे कुठे लिहून ठेवलेले नाहीत. पण एवढे निश्चित की तो स्वतःला भगवान श्रीकृष्णासारखा करता-करविता मानण्याइतका खुळा नव्हता. अर्जुनाने जसा युद्ध करण्याचा क्षत्रियांचा स्वधर्म पाळला तसा आपण शोध लावण्याचा शास्त्रज्ञांचा स्वधर्म पाळला आहे इतकेच त्याला वाटले असावे. अर्जुन आपल्या युद्धाच्या परिणामांची जबाबदारी श्रीकृष्णावर सोडून मोकळा झाला. ओपनहायमरला आपल्या शोधाच्या परिणामांची जबाबदारी अमेरिकेच्या सर्वोच्च राज्यकर्त्यावर - प्रेसिडेंट हॅरी ट्रुमनवर - सोडणे भाग होते. ट्रिनिटी टेस्टच्या दुसऱ्याच दिवशी लिओ सेलार्ड (Leo Szilard) या मॅन्हॅटन प्रोजेक्टवर काम करणाऱ्या वरिष्ठ शास्त्रज्ञाने प्रेसिडेंट ट्रुमनला एक विनंतीअर्ज लिहिला होता. त्यात जपानला शरणागतीच्या अटी कळवाव्यात व त्या जपानने धुडकावून लावल्या तरच अणुबॉम्ब टाकण्यासंबंधी निर्णय घ्यावा, व तोही नैतिक उत्तरदायित्वाचा पूर्ण विचार केल्यानंतर, असे म्हटले होते. या पत्रावर टेनेसीमधील ओक रिज येथील आणि शिकागो विद्यापीठातील धातुशास्त्रीय प्रयोगशाळेतील सत्तरपेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी सह्या केल्या होत्या. परंतु ते पत्र लॉस आलामोसच्या प्रयोगशाळेत सह्यांसाठी फिरवायला ओपनहायमरने परवानगी नाकारली; कारण असे दिले की राज्यकर्त्यांकडे अशी काही माहिती असू शकते जिचा आपल्याला पत्ताच नसतो. 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील हिरोशिमा शहरावर आणि लगेच 3 दिवसांत नागासाकी शहरावर अमेरिकेने अणुबाम्ब टाकले. ती शहरे बेचिराख झालेली पाहून ओपनहायमर व्याकूळ झाला. मग मात्र त्याचा दृष्टिकोन पार बदलला. 25 ऑक्टोबर 1945 रोजी प्रेसिडेंट ट्रुमनच्या कार्यालयात जाऊन आपले हात रक्ताने माखलेले असल्याचे ओपनहायमरने सांगितले, व याबद्दल त्याला रडूबाई (crybaby) असे ऐकून घ्यावे लागले!

देवदत्त पट्टनायक या भारतीय पुराणकथांचे विवेचन करणाऱ्या लेखकाने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की ओपनहायमरने केलेला ‘मी मृत्यू आहे’ असा काही उल्लेखच गीतेमध्ये सापडत नाही. गीतेमधील 11.32 या श्लोकातील ‘कालोऽस्मि’ याचा अर्थ ‘मी समय आहे’ असा होतो, आणि पाश्चात्य लोकांना भारतीय ग्रंथांचे आकलन होणे शक्य नाही, वगैरे. काल या शब्दाचे तीन तरी अर्थ मला माहीत आहेत : काळा रंग, समय आणि मृत्यू किंवा यम. यांपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते संदर्भाने ठरते. श्लोकात लगेच नंतर येणारे ‘लोकक्षयकृत्’ (म्हणजे लोकांचा संहार करणारा) हे विशेषण पाहिले तर येथे काल म्हणजे कर्दनकाळ किंवा यम असेच मानले पाहिजे. तोच अर्थ गीतेच्या टीकाकारांनी केला आहे. अगदी मृत्यू हाच शब्द हवा असला तर गीतेतील 10.34 या श्लोकाचा पहिला पाद बघा: ‘मृत्यु: सर्वहरश्चाहम्’ म्हणजे ‘सगळे लुटणारा मृत्यू मी आहे’ असे श्रीकृष्ण म्हणतो. यावरून कळून येते की पुरेसा अभ्यास न करता काही बाही सांगत जाणे योग्य नसते. यापेक्षा अधिक काय म्हणायचे?

आयुष्याच्या उत्तरार्धात ओपनहायमरला कुणी विचारले की कोणत्या दहा पुस्तकांचा त्याच्या विचारसरणीवर सखोल प्रभाव पडला आहे. शेक्सपियरचे हॅम्लेट आणि टी.एस. इलियटचे द वेस्ट लँड ह्या पुस्तकांबरोबर भगवद्गीता आणि भर्तृहरीचे शतकत्रय हे ग्रंथ त्याच्या यादीत होते. लॉस आलामोसच्या प्रयोगशाळेतील ब्रॅडबरी सायन्स म्युझियममध्ये यु. एस. नॅशनल सिक्युरिटी रिसर्च सेंटर आहे. त्यांच्या संग्रहात ओपनहायमरच्या दोनच वैयक्तिक वस्तू आहेत; एक आहे त्याची कार्यालयीन खुर्ची आणि दुसरी आहे त्याची भगवद्गीतेची प्रत; तिच्या सुरुवातीच्या पानावर वरच्या बाजूला उजवीकडे त्याच्या नावाची आद्याक्षरे आहेत.
---

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अणुस्फोट घडवून आणायला विरोध असूनही तो घडू दिला हे दुर्दैवी आहे. जे संहार झाल्यानंतर लक्षात आलं त्याची कल्पना आधी असणारच.

आम्हाला वरिष्ठांनी आज्ञा दिली आणि आम्ही फक्त तिचं पालन केलं; हा बचाव न्युरेन्‌बर्ग खटल्यात मान्य झाला नाही. अर्जुनाच्या कालखंडात देवावर भार टाकणं जमलं. अर्जुनही करता होता.

लेख आवडला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख फारच छान आहे. दोन दिवसांपूर्वीच चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटयूट मध्ये माझी एका मराठी मातृभाषिकाशी देवदत्त पट्टनायक यांच्या काळ शब्दाच्या अर्थाबद्दल चर्चा झाली होती. पट्टनायकांनी काळ शब्दाचा संकुचित/ मर्यादित अर्थ घेतला आहे असं आम्हाला दोघांनाही वाटलं. असो. आपल्या वर्तनाच मागाहून समर्थन करणे हा प्रकार पुष्कळ मोठ्या लोकांचा होतो. दुसऱ्या महायुद्धात सहभागी न होण्यासाठी आपल्या समर्थनासाठी आंद्रे वेल सारख्या मोठ्या गणितज्ञाने गीतेचाच आधार घेतला होता!

शरद साने

वाह!! लेख फार सुरेख झालेला आहे. स्पेशली -

अणुबॉम्बचे उग्र रूप पाहून जेव्हा ओपनहायमरच्या मनात हा श्लोक आला, तेव्हा त्याने स्वतःला कोणत्या स्वरूपात ओळखले असेल? श्रीकृष्णाच्या की अर्जुनाच्या? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे

हे वाचून मुद्दा खूप छान कळला. इथे काहीही ॲझ्युम न करता , ओपनहाईमरवर सोडलेले आहे.हा मुद्दा लक्षात आलेला नव्हता. मी नेहमी, ओपनहाईमरने स्वत:ला अर्जुनाच्या भूमिकेत पाहीले असेल असेच अध्याहृत धरले होते जे की सपशेल चूकीचे असूही शकते.

मी वाचल्यानुसार आइन्स्टाइन आणि झिलार्ड ह्यांनी १९३९ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट ह्यांना पत्र लिहून जर्मनीच्या आधी अमेरिकेने अणुशस्त्रे तयार करण्यावर जोर दिला होता आणि त्यातून राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट ह्यांनी मॅनहॅटन प्रोजेक्ट स्थापन केला होता, ज्यामध्ये 1945 सालच्या उन्हाळ्यात दोन अणुबॉम्ब बनवून घेण्यात ओपनहायमरला यश आले, एकात युरेनियम 235 या मूलतत्त्वाचे विखंडन (fission) करायचे होते व दुसऱ्यात प्लुटोनियम 239 याचा अंतःस्फोट (implosion) करायचा होता.

वरच्या गीतेमधील उताऱ्यांमध्ये ऋतेपि त्वा न भविष्यन्ति सर्वे येथे वाचतांना मी अंमळ अडखळलो कारण माझ्याआठवणीप्रमाणे ऋतेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे असा पाठ हवा. अर्थात त्यातून अर्थाची कोणतीच हानि होत नाही कारण त्वां आणि त्वा हे दोन्ही युष्मद् ह्य सर्वनामाच्या द्वितीय विभक्तीमध्ये मोडतात.

लेख उत्तम आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

मी वाचल्यानुसार आइन्स्टाइन आणि झिलार्ड ह्यांनी १९३९ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट ह्यांना पत्र लिहून जर्मनीच्या आधी अमेरिकेने अणुशस्त्रे तयार करण्यावर जोर दिला होता आणि त्यातून राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट ह्यांनी मॅनहॅटन प्रोजेक्ट स्थापन केला होता,

बरोबर. मी असेही वाचले आहे की ते पत्र मुळात सेलार्डने लिहिले होते आणि त्यावर आइन्स्टाइनची सही मिळवली होती.
त्वा किंवा त्वां असे पाठभेद आहेत. त्याचप्रमाणे प्रवृद्धः किंवा प्रवृद्धान् असेही पाठभेद आहेत. मी उद्धृत केलेले श्लोक डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्या 'श्रीमद्भगवद्घीतेचा अधिकृत पाठ (पादसूचीसह)' या 1941 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील आहेत.

आपण सर्व आंधळ्या लोकांसारखे,जे हत्तीचे वर्णन करत आहे. प्रत्येकाचे वर्णन त्याच्या दृष्टीने योग्यच आहे. काळाच्या जबड्यातून कोणी ही सुटू शकत नाही, हेच एक मात्र सत्य आहे. आपले ब्रह्मांड ही काळातच विलीन होणार आहे.

आपण सर्वांनी डोळसपणेच कशाचेही वर्णन करायचा प्रयत्न केला पाहिजे, आंधळेपणा सोडून. काळाला यम किंवा तत्सम कोणी मानल्याशिवाय त्याला जबडा कसा असू शकेल? आपले ब्रह्मांड काळात नाही, तर कालांतराने विलीन होणार आहे. इति शम्!

Szilard ह्या नावाचा उच्चार कसा करायचा हा प्रश्न गूगलला विचारल्यावर मिळणारे उत्तर येथे उपलब्ध आहे.

लेख अतिशय सुंदर झाला आहे. लेखणी तुम्हाला वश आहे. साधी, ओघवती, मराठीत लिहिलेली दुर्मिळ मराठी भाषा आवडली.
आजकाल ज्या विषयाला घेऊन खूप लोक हैराण राहिले आहेत त्याबद्दल तुम्ही केलेला हा खुलासा जो की थोडक्यात आहे त्याने लेखाला चार चांद लागले आहेत Smile

'अर्जुन आपल्या युद्धाच्या परिणामांची जबाबदारी श्रीकृष्णावर सोडून मोकळा झाला.'
असा अर्थ म्हणजे अनर्थ म्हणावा इतका चुकीचा आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी कृष्णाने कौरव पक्षाशी चर्चा करुन हे युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न केले. 'कृष्णशिष्टाई' या नावाने ते प्रकरण प्रसिद्ध आहे. दुर्योधनाने तर शेवटी सांगितले की, कृष्णा तुझं सगळं म्हणणं मला पटतंय पण माझं मन धर्माने वागायला - म्हणजे पांडवांना त्यांचा हक्क देण्यासाठी - तयार होत नाही. 'सुईच्या अग्रावर मावेल इतकी ही जमीन पांडवांना मी देणार नाही' ही दुर्योधनाची भूमिका होती. सर्व चर्चा, शांतिपूर्ण प्रस्ताव आणि कृष्णशिष्टाई अयशस्वी झाल्यावर युद्ध होणे अपरिहार्य होते.

धर्म्य युद्ध -
दुर्योधनाचं वागणं अधार्मिक होतं आणि ते त्याला माहीत होतं हे तो स्वतःच सांगतो. जर युद्ध केलं नसतं तर अधर्माचा बोलबाला झाला असता आणि अधिक हिंसा झाली असती. या हिंसेपेक्षा भारती युद्धातली होणारी हिंसा कमीच ठरली असती हा धर्म्ययुद्ध होण्यामागचं कारण आहे. धर्म या शब्दाची व्याख्या - अहिंसा परमो धर्म - कमीतकमी हिंसेचा मार्ग (path of least violence) असा आहे. हिसेचं उत्तर 'हिंसा नको' असा केला तर 'हिंसा नको' ही भूमिका घेणारे त्यात प्रथम नष्ट होतात, हिंसा वाढते आणि अधर्म बोकाळतो. म्हणून कृष्ण २.३१ मध्ये अर्जुनला सांगतो

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ २-३१ ॥
तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये. कारण क्षत्रियाला, धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. ॥ २-३१ ॥

युद्धाची ही पार्श्वभूमी न लक्षात घेता 'अर्जुन आपल्या युद्धाच्या परिणामांची जबाबदारी श्रीकृष्णावर सोडून मोकळा झाला', हे सुचवणे चूक आहे.

'त्याने स्वतःला कोणत्या स्वरूपात ओळखले असेल? श्रीकृष्णाच्या की अर्जुनाच्या? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे ...' असं म्हणत म्हणत युद्ध परिणामांच्या मुद्द्यात मात्र ओपनहायमर आणि अर्जुन कसे सारखे असंही सुचवायचं इथं गडबड झाली आहे.

बाकी लेख उत्तम. देवदत्त पटनाईक ला दिलेलं उत्तर तर अतिशय सुंदर आहे.

पांडवांना सत्ता हवी म्हणून काही अक्षौहिणी (म्हणजे किती) सैन्य बळी पडलं. दुर्योधन राज्यकर्ता म्हणून कसा होता?

ओपनहायमरला निष्पाप जपानी लोकांच्या मृत्यूबद्दल वाईट वाटलं. अर्जुनाचं काय?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>पांडवांना सत्ता हवी

सत्ता की धर्मानुसार त्यांचा हक्क? पांच गांवे हक्काची मिळाली तरी चालेल ही कृष्णशिष्टाई आपणास माहीत नसावी. सुईच्या अग्राएवढी पण जमीन मिळणार नाही अशी कौरवांची भुमिका इत्यादी गोष्टी डाव्या विचारसरणीच्या विद्वानांसारखी अलगद बाजुला करुन सोईस्कर टिप्पणी मजेशीर आहे.

>>दुर्योधन राज्यकर्ता म्हणून कसा होता?

प्रजेचे मत माहित नाही पण त्याचे स्वत:चे मत कसे होते ते व्यासांनी त्याच्या तोंडून वदवले आहे.
संस्कृतात असले तरी समजावे

जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति:
जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति:
केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि ।

>> अर्जुनाचं काय?

अर्जुन विषाद योगाने तर भगवतगीता जन्माला आली.

- अहिरावण

अवरंग्याला महान सिद्ध करणे हा डाव्या विचारांच्या आणि स्वत:ला उदारमतवादी समजणा-या मतलबी, धुर्त, स्वार्थी लोकांचा सध्याचा धंदा आहे.

पांडवांना सत्ता हवी होती?
युद्ध पांडवांना सत्ता हवी होती म्हणून नव्हे तर दुर्योधन अधर्मी वागण्यामुळे झाले. कृष्णाने, विदुराने आणि शेवटी धृतराष्ट्रानेही दुर्योधनाला समजवायचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. पांडवांनी शेवटी फक्त पांव गावं मागितली होती. एकेकाळी रानावनात असलेल्या इंद्रप्रस्थचं पांडवांनी जे नंदनवन केलं होतं ते दुर्योधन विसरला नव्हता. त्याला पांडवांच्या कर्तूत्वाचा पूर्ण अंदाज होता म्हणूनच पाच गावं द्यायला दुर्योधन तयार नव्हता. पांडव त्यांच्या अस्तित्वासाठी आणि न्याय्य मागणीसाठी लढायला तयार झाले होते. त्यामुळे ‘पांडवांना सत्ता हवी होती’ हे चूक आहे.

काही अक्षौहिणी (म्हणजे किती) सैन्य बळी पडलं
अक्षौहिणी म्हणजे किती यात historicization ला फार महत्व नाही. असतील समजा शेकडो, हजारो, लाख किंवा अजून कितीतरी! सैन्य बळी पडलं म्हणतानाचा एक सुर पांडवांनी या संहाराची जबाबदारी घ्यावी असा आहे. मूळ महाभारत वाचलं तर लक्षात येतं की पांडवांच्या बाजूने उभे असलेले योद्धे हे अन्यायाविरुद्ध लढायला सिद्ध झाले होते आणि दुर्योधनाच्या बाजूने जे उभे होते ते, एकतर पांडव द्वेष्टे होते किंवा कृष्णद्वेष्टे. बलराम आणि रुकमी तटस्थ राहिले. आज आपण जसे multi-polar जग बघतो तसंच काहीसं महाभारताचं तत्कालीन चित्र होतं.

दुर्योधन राज्यकर्ता म्हणून कसा होता?
दुर्योधनाच्या पराक्रमाची रसभरीत वर्णनं व्यासांनी महाभारतात केली आहेत. कृष्णानं आणि भीष्मानंही काही ठिकाणी दुर्योधनाचं कौतुक केलं आहे. परंतु दुर्योधन अधर्मी होता आणि धृतराष्ट्रापाठी दुर्योधनाच्या राज्यात अधर्म व हिंसा यांचं प्राबल्य वाढलं असतं यात काही शंका नाही. त्यामुळं ‘दुर्योधन राज्यकर्ता म्हणून कसा होता?’ याला काही अर्थ नाही.

अर्जुनाचं काय?
पुन्हा तोच मुद्दा. युद्ध दुर्योधनाच्या अधर्मी वागण्यामुळे, धृतराष्ट्राच्या आंधळ्या पुत्रप्रेमामुळे आणि ‘अर्थस्य दासो पुरुष:’ वगैरे म्हणणाऱ्या भीष्म-द्रोणांच्या मिंधेपणामुळे झाले.

असं पदच्छेद आणि अन्वय असलेलं पुस्तक कुठल्या प्रकाशनाने छापले आहे?कुठ मिळेल?

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

गीता प्रेस, गोरखपूर (https://www.gitapress.org) यांनी प्रकाशित केलेल्या गीतेच्या आवृत्तीत पदच्छेद, अन्वय व त्यातील शब्दांचे हिंदीमधील अर्थ दिले आहेत.

'गीताई' हे विनोबा (विनायक नरहरि भावे) यांनी 1932 साली लिहिलेले पुस्तक परंधाम प्रकाशन, पवनार यांनी प्रकाशित केले असून अत्यल्प किंमतीला मिळत आले आहे.

'गीतार्थदर्शन' हे कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनी 1995 साली लिहिलेले पुस्तक आनंदाश्रम संस्था, पुणे (www.aanandashram-sanstha.org) यांनी प्रकाशित केले असून ते आजही माफक किंमतीला मिळू शकते. एक आवृत्ती आहे संक्षिप्त, व दुसरी आहे विस्तृत.