शंभर वर्षांपूर्वी गडकऱ्यांच्या 'एकच प्याला'ने महाराष्ट्रात खळबळ माजवली होती. आता वेळ आली आहे एका आगळ्याच 'कपा'तल्या वादळाची! हा काही चहाचा कप नव्हे. मला सांगायचं आहे 'मेन्स्ट्रुअल कप' म्हणजे ऋतुस्रावाच्या कपाबद्दल. आपल्याकडे मुळातच हा विषय चारचौघातच काय - अगदी चार बायकांतही काढला जात नाही. म्हणूनच गेल्या सहा खेपांच्या वेळी यशस्वीरित्या कप वापरल्यावर मला हा लेख लिहायचे बळ आलं. ह्या विषयाबद्द्ल मी आता 'व्हीस्पर' न करता उघडपणे सांगायला लागले आहे. माझ्या एका मैत्रिणीने दोन वर्षापूर्वी मला "मेन्स्ट्रुअल कप" बद्दल सांगितलं होतं. ही मैत्रीण पर्यावरणासाठी काहीही करायला तयार असते.