"अशीही एक झुंज" - एका महत्त्वाच्या पुस्तकाचा परिचय
"अशीही एक झुंज" नावाचे डॉ. मृदुला बेळे यांनी लिहिलेले पुस्तक वाचनात आले.
पुस्तकाचा विषय असा आहे की अमेरिका युरपमध्ये १९८०च्या दशकात पसरलेली एड्सची साथ आफ्रिकेतील काही भागात त्यानंतर पाठोपाठ पसरली. आफ्रिका खंडातील देशांची व लोकांची प्रचंड गरिबी व अतिशय प्राथमिक अवस्थेतील असलेली आरोग्यसेवा या कारणांनी एड्सच्या साथीचे सर्वात जास्त भयानक परिणाम आफ्रिका खंडात होत होते. १९९०च्या दशकात लाखोंच्या संख्येत लोकं मरत होती. या काळात एड्सला आटोक्यात आणणाऱ्या कुठल्याही औषधाचा शोध लागला नव्हता (एड्स सर्वार्थाने पूर्ण बरा करणाऱ्या औषधाचा शोध अजूनही लागलेला नाही.)
१९९५-९६च्या आसपास एड्स आटोक्यात आणणाऱ्या औषधांचा शोध लागू लागला. लोकांना औषधे उपलब्ध होऊ लागली. परंतु ही औषधे मोठ्या फार्मा कंपन्या अतिशय महाग विकत होत्या. एका पेशंटच्या इलाजाचा वार्षिक खर्च साधारण १५००० यूएस डॉलर्स!!! पेटंट कायद्यामुळे ही औषधे इतर कुणी कमी किमतीत तयार करू शकत नव्हते.
आफ्रिकेतील गरीब सरकारे आणि गरीब प्रजा या भयानक किमतींमुळे या औषधांचा विचारही करू शकत नव्हती. 'डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स' व इतर स्वयंसेवी संस्था ही औषधे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी बरेच प्रयत्न करत होत्या परंतु पेटंट कायदा आड येत होता आणि मोठ्या फार्मा कंपन्या नफेखोरी करणे सोडत नव्हत्या.
भारतात तत्कालीन पेटंट कायदे वेगळे होते. त्यामुळे भारतात वेगळ्या प्रोसेसने ही औषधे तयार करणे, तीही कमी खर्चात, हे शक्य होते. सिप्ला नावाच्या प्रसिद्ध भारतीय कंपनीने ही औषधे भारतात तयार करणे सुरू केले व भारतात याचे वितरणही सुरू झाले. पण आंतरराष्ट्रीय पेटंट कायद्यामुळे भारताबाहेर ही औषधे पाठवणे शक्य नव्हते.
आफ्रिकेत लोकं मरतच होती.
डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स, बायोजेनेरिक्स, कन्झ्युमर प्रोजेक्ट ऑन टेक्नॉलॉजी व इतर स्वयंसेवी संस्थांनी सिप्ला कंपनीचे मालक (जे नुसते मालक नाहीत तर स्वतः औषधशास्त्रात उच्चविद्याविभूषित आहेत) डॉ. हमीद यांना हा तिढा मोडण्यासाठी साकडे घातले आणि डॉ. हमीद यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून जवळजवळ 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर एका पेशंटच्या इलाजाचा खर्च प्रतिवर्षी फक्त ३५० डॉलर्स किमतीवर हे औषध उपलब्ध करून देण्याचे ठरवले.
यापुढे झुंज सुरू झाली ती स्वयंसेवी संस्था, सिप्ला कंपनी, आफ्रिकेतील गरीब सरकारे विरुद्ध आंतरराष्ट्रीय पेटंट कायदे (ज्याला ही सरकारे बांधील होती), मोठ्या फार्मा कंपन्या व त्या कंपन्यांच्या दबावाखाली असलेली प्रगत देशांतील सरकारे!!
जास्त माहिती न लिहिता शेवटी एवढेच लिहितो की या झुंजीमध्ये सिप्ला, स्वयंसेवी संस्था, आफ्रिकेतील गरीब जनता यांचा विजय झाला आणि अतिशय कमी खर्चात आफ्रिकेत एड्स आटोक्यात आणणारी औषधे उपलब्ध झाली. भयानक पसरलेल्या एड्सची साथ आटोक्यात आणण्यात थोडेफार यश प्राप्त झाले आणि यात सिप्ला कंपनीचे अतिशय मोठे योगदान होते. भारतातील या कंपनीचे हे मोठे काम खचितच अभिमानास्पद आहे.
सिप्लाबरोबरच डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स , बायोजेनेरिक्स ,कन्झ्युमर प्रोजेक्ट ऑन टेक्नॉलॉजी व इतर स्वयंसेवी संस्थांनी बिग फार्मा, आंतरराष्ट्रीय पेटंट कायदे, ट्रिप्स यांविरोधी लढलेल्या लढ्याचे रोचक वर्णन डॉ मृदुला बेळे यांच्या या पुस्तकात वाचायला मिळते
तसेच दक्षिण आफ्रिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष थाबो एमबेकी यांचा एड्सची साथ देशात सुरू असताना एचआयव्ही डिनायलिझम, एड्सवर उपाय म्हणून छद्मशास्त्रावर आधारित औषधांचा पुरस्कार व नवीन उपचार पद्धतींना केलेला विरोध हा धक्कादायक भागही वाचायला मिळतो.
लेखिका डॉ. मृदुला बेळे या अतिशय उच्चविद्याविभूषित आहेत. औषधनिर्माणशास्त्र विषयात त्या पीएच. डी. आहेत. त्याशिवाय इंटेलेच्युअल प्रॉपर्टी राईट्स या विषयात त्यांनी परदेशातून LLM ही पदवी प्राप्त केली आहे. काही वर्षांपूर्वी लोकसत्तामधे त्यांचे "कथा अकलेच्या कायद्याची" नावाचे साप्ताहिक सदर अतिशय लोकप्रिय झाले होते. याच नावाचे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.
मराठीत 'अशीही एक झुंज ' हे पुस्तक लिहिल्याबद्दल डॉ मृदुला बेळे यांचे अभिनंदन नक्कीच करायला पाहिजे.

परंतु या पुस्तकात अनेक चुका आहेत हे खटकते. यातील बऱ्याचशा चुका साधा गुगल सर्च करूनही टाळण्याजोग्या आहेत असे वाटते. शिवाय पुण्यात एड्स पेशंट्सना गेली तीस-पस्तीस वर्षे वैद्यकीय सेवा पुरविणारे डॉक्टर्स आहेत, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची १९९६ साली स्थापित झालेली संस्थाही आहे, यांपैकी कुणाहीकडून मदत मिळू शकली असती, ती का घेतली नसावी हे लक्षात येत नाही.
या पुस्तकातील मोठ्या चुका इथे नमूद करतो.
१. पान ४४वर लेखिका लिहितात की -
"१९८४ साली बॉब गॅलो या विषाणूतज्ज्ञाने शोधून काढलं की, हा कुठलातरी रेट्रो व्हायरस असावा, याच विषाणूचं नाव नंतर ठेवलं गेलं एच आय व्ही."
वस्तुस्थिती :
डॉ. रॉबर्ट गॅलो हा एक या विषयातील अत्यंत नामवंत शास्त्रज्ञ. आपल्या नावाचा दबदबा असणारा.
परंतु -
पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिट्यूट व अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) इथे एड्सला कारणीभूत असणारा विषाणू शोधण्याचे संशोधन युद्धपातळीवर सुरू होते. डॉ. रॉबर्ट गॅलो हे या विषयातील एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ मानले जात होते. तेही या एड्सला कारणीभूत असणारा विषाणू शोधण्याचे काम NIH मध्ये करत होते.
पाश्चर इन्स्टिट्यूटमधील डॉ फ्रान्स्वाज बारे सिनुसी (Françoise Barré-Sinoussi) आणि डॉ. ल्युक मोंतान्यिए (Luc Montagnier) यांना एड्सला कारणीभूत असणारा (causative agent) तोपर्यंत अज्ञात असणारा विषाणू शोधण्यात १९८३ साली यश आले.
यानंतर सुमारे एक वर्षाने डॉ रॉबर्ट गॅलो यांना हाच विषाणू शोधण्यात यश आले.
एड्सला कारणीभूत असणाऱ्या HIVचा शोध लावल्याबद्दल २००८ मध्ये डॉ फ्रान्स्वाज बारे सिनुसी आणि डॉ. ल्युक मोंतान्यिए यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारात डॉ गॅलो यांना कुठलेही स्थान देण्यात आले नाही.
२. पान क्रमांक पंचवीसवर दोन फोटो दिले आहेत. शीर्षक आहे "युगांडाच्या अराजकाचे शिल्पकार". फोटोखाली नावे आहेत मिल्टन ओबोटे आणि ईदी अमीन.

हे दोन्ही फोटो ईदी अमीन यांचेच आहेत.
३. पान क्र. चोवीसवर लेखिका लिहितात की :
"१९९५ पर्यंत सगळ्या जगातील सुमारे १५ टक्के जनता एड्सनी ग्रासलेली होती."
त्याच्याच खाली दोन ओळी सोडून त्या लिहितात की :
" १९९५ सालात जगात एड्स ने ग्रासलेले साधारण दोन कोटी लोक होते , त्यातले दीड कोटी एकट्या आफ्रिकेत होते "
वस्तुस्थिती : १९९५ साली जगाची लोकसंख्या सुमारे ५७२ कोटी होती. त्याच्या पंधरा टक्के म्हणजे सुमारे ८५ कोटी.
जी संख्या १९९५ साली दोन कोटीच्या आसपास होती असे लेखिका म्हणते, तीच संख्या १९९५ पर्यंत जगातील सुमारे १५ टक्के (म्हणजे ८५ कोटी) आहे असे त्या का लिहीत आहेत हे लक्षात येत नाही.
आजतागायत एड्सबाधित लोकांची एकूण संख्या पाच कोटीच्या वर गेलेली नाही.
४. पान क्रमांक २३ वर HIVचा उगम कुठे झाला असेल याबद्दल एक तथ्यहीन कॉन्स्पिरसी थिअरी लिहिली गेली आहे.
“आफ्रिकन 'लोकांच्या' म्हणण्यानुसार मात्र प्रगत देशांनी काहीही पुरावा नसताना एड्स आफ्रिकेत जन्माला आला असं छातीठोकपणे म्हणणं हा तद्दन वंशवाद आहे. 'जे जे उत्तम उदात्त उन्नत - ते ते युरोप अमेरिकेचे आणि जे जे अमंगल अनारोग्य ते मात्र आफ्रिकेचे' हे म्हणणं वंशवादामुळे होत आहे.”
"आफ्रिकन तज्ज्ञ असं म्हणतात की आपण आधी मांडलेल्या ' आफ्रिकेत एड्सचा जन्म झाला' या सिद्धांताला खतपाणी घालण्यासाठी खोटा पुरावा ओढून ताणून शोधून काढला आहे"
यासारखी अनभ्यस्त व बेजबाबदार विधाने केली गेली आहेत.
लेखिका म्हणते तशी थिअरी असलेले प्रकाशित साहित्य सापडले नाही. सापडल्या त्या बऱ्याच इतर कॉन्स्पिरसी थिअरीज, पण त्याही वेगळ्या प्रकारच्या.
सध्या अशी परिस्थिती आहे की एचआयव्ही कुठे प्रथम आला असेल याबद्दल पूर्वीच्या (१९५९ सालापासूनच्या) साठवून ठेवलेल्या (preserved) सॅम्पल्सनी बराच प्रकाश टाकला आहे. एचआयव्ही टेस्टिंग सुरू झाल्यानंतरच्या काळात अशी बरीच सॅम्पल्स टेस्ट केली गेली आणि त्यात उगमाची दिशा काँगोच्या आसपास आहे असे निष्कर्ष निघाले.
या व्यतिरिक्त अनेक ढोबळ चुकाही या पुस्तकात आढळतात.
उदाहरणार्थ : ईदी अमीनच्या जुलमी राजवटीला कंटाळून युगांडातील उत्तमोत्तम वकील प्राध्यापक डॉक्टर्स जिवाच्या भीतीने देश सोडून पळून गेले वगैरे लिहिताना डॉ मुजीनी आणि त्यांचे दोन मित्र गुपचूप देशाची सीमा ओलांडून 'शेजारच्या' लेसोथो या देशाच्या राजधानीत गेले असा उल्लेख आहे .
हा 'शेजारचा' देश लेसोथो आणि युगांडा यांच्यामध्ये साधारण तीन हजारापेक्षा जास्त किलोमीटर अंतर आहे. मराठी वाचकांना आफ्रिकेचा भूगोल माहीत नसल्यामुळे अशी बेधडक विधाने आढळतात की काय असा समज होतो.
अशी अनेक उदाहरणे या पुस्तकात आहेत. फार महत्त्वाची नसल्यामुळे जास्त लिहीत नाही.
सत्यघटनांवर आधारित पुस्तक लिहिताना कादंबरी पद्धतीने लिहिण्याचे लेखिकेने ठरवले असावे. (हे असे असावे की नसावे हे ठरवण्याचा हक्क फक्त आणि फक्त लेखिकेचाच) परंतु यामुळे अनवधानाने विनोदनिर्मिती झाली आहे.
इंग्रजीत अशा वेगळ्या पण महत्त्वाच्या विषयांवरची पुस्तके उपलब्ध असतात. मराठीत फारशी नसतात.
यामुळे अनेक त्रुटी असूनही हे पुस्तक जरूर वाचावे असे वाटते.
पुन्हा एकदा डॉ. मृदुला बेळे व राजहंस प्रकाशन यांचे हे असे वेगळ्या विषयावरचे पुस्तक मराठीत आणल्याबद्दल आभार मानावेसे वाटतात.
प्रतिक्रिया
चार चांदण्या दिल्यात
एका महत्वाच्या पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
लेख आवडला.
मी विज्ञान शिकलेली आहे, तरीही मला किती काय-काय माहिती नाही याचीही जाणीव झाली. आणि मराठीत संपादन हा प्रकार किती गंडलेला असू शकतो, याची जाणीवही पुन्हा एकदा झाली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उत्तम
उत्तम परिचय. या पुस्तकाचे परीक्षण इतरत्र वाचले होते. लेखिका अर्थातच परिचयाच्या आहेत. वैज्ञानिक विषयावर कादंबरी या स्वरुपात लिहिले असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे असे मला वाटते. तांत्रिक स्वरूपाचे लेखन म्हणजे फक्त विदासंकलन नसावे. ते रंजक करण्याचा लेखिकेचा प्रयत्न असेल तर बिघडले कुठे? त्याने मूळ लेखनाच्या गाभ्याला, आशयाला किंवा उद्देशाला ढळ लागत असेल तर गोष्ट वेगळी.
असो.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आपल्याला हा पुस्तक परिचय
आपल्याला हा पुस्तक परिचय आवडला हे वाचून आनंद वाटला.
'कादंबरी स्वरूपात लिहिले असेल तरीही आक्षेप असण्याची काही गरज नाहीच'.
अहो रावसाहेब, वर मी लिहिले आहेच की 'हे ठरवण्याचा हक्क फक्त आणि फक्त लेखिकेचाच.'
परंतु मला या पद्धतीने लिहिल्यामुळे या पुस्तकात काही विनोद सापडले.अर्थात मला विनोद वाटले ते इतरांना वाटतीलच असेही नाही. तेव्हा ते ठीकच.
तुम्हाला हवे असतील तर ते विनोद तुम्हाला पाठवू शकतो.
" तांत्रिक स्वरूपाचे लेखन म्हणजे फक्त विदासंकलन नसावे."
याच्याशी सहमत आहेच परंतु या दोन्ही टोकांच्या मध्ये एक साधे सरळ रिपोर्टींग हेही होऊ शकते. जसे या विषयावरच्या अनेक इंग्रजी पुस्तकांमध्ये वाचायला मिळते.
ज्या विषयावर हे पुस्तक लिहिले गेले आहे तो विषय इतका जबरदस्त आणि इतका नाट्यमय आहे (हा विषय निवडल्याबद्दल लेखिकेचे वारंवार अभिनंदन करावेसे वाटते) की खरे तर साधे सरळ रिपोर्ट फॉर्म मध्ये लिहिले असते तरीही त्यात रंजकता खूप आली असतीच त्यामुळे .... (बाकी हे माझे वैयक्तिक मत , जे मी लिहिले.)
दुसऱ्या कुणाचे वेगळे मत असू शकतेच , आणि त्याचेही स्वागत.