कुटुंबातले श्रीपु

कुटुंबातले श्रीपु

बालमोहन लिमये

(२०२३ हे श्री.पु. भागवत यांचे जन्मशताब्दी वर्ष. २१ ऑगस्ट २००७ रोजी त्यांचे निधन झाले. त्या निमित्ताने हा पूर्वप्रकाशित लेख ‘ऐसी अक्षरे’वर पुनः प्रकाशित करत आहोत.)

श्री.पु. भागवत माझे मामेसासरे. म्हणजे माझी पत्नी निर्मला ही श्रीपुंच्या पाठची बहीण कमल यांची मुलगी. तसं पाहिलं तर मी एक प्रकारे त्यांच्या कुटुंबीयांपैकीच, पण काहीसा बाहेरच्या वर्तुळातला. पण भागवत कुटुंबीय ‘श्रीपुंचे आवडते जावई’ अशी माझी थट्टा करीत असत.

ShreePu Bhagwat

१९७० साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये काम करत असताना मी आणि निर्मलानं विवाहबद्ध होण्याचं ठरवलं. त्यानंतर मला भागवत लोकांना दाखवायचे जे अनेक कार्यक्रम झाले त्यातला पहिला कार्यक्रम गिरगावात श्रीपुंच्या कचेरीत झाला. लग्नानंतर पहिले दोनचार महिने त्यांनी मला जावयाचा मान राखायचा म्हणून ‘अहोजाहो’ केलं पण लवकरच एकेरी नावावर आले; एकेरीवर नाही. अर्थात तसे ते कधीच कुणाच्या एकेरीवर आले नाहीत. कित्येकदा त्यांच्या घरी गेल्यावर माझं स्वागत ‘जामातो दशमो ग्रहः’ या वाक्याने होत असे. पुढं तर आमचे संबंध इतके मोकळे झाले की कधीकधी मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे श्रीपुंची पण थट्टा करायला धजू लागलो. एक असा प्रसंग मला आठवतोय. त्या काळी रिलायन्स कंपनीच्या वेगवेगळ्या टेक्सटाइल्सच्या जाहिरातींत ‘Only Vimal’ असा शब्दप्रयोग असे. तोच शब्दप्रयोग मी माझ्या मामेसासूबाईंना – विमलाबाईंना उद्देशून श्रीपुंच्या समोर केला, तेव्हा शेजारी बसलेल्या माझ्या पत्नीने मला काढलेला चिमटा मला अजूनही आठवतोय. श्रीपुंनी मात्र आपण त्या गावचेच नाही असा चेहरा केला होता.

भागवतांचं कुटुंब खूप मोठं – सात भाऊ, तीन बहिणी, त्यांची मुलं, सुना, जावई आणि नातवंडं; इतका मोठा गोतावळा की एखादा मामा भाच्यापेक्षाही लहान! मी तर सुरुवातीला कुणाकडे जाताना जरूर ती वंशावळ घोकून (आणि एका चिठ्ठीवर लिहून ती खिशात बाळगून) जायचो. अशा मोठ्या कुटुंबाच्या कुठल्या ना कुठल्या शाखेत काही ना काही अडचणी सतत उद्भवणारच. त्यांना सामोरं जाऊन त्यातून मार्ग काढण्याचं काम श्रीपु आणि त्यांचे बंधू यांनी मोठ्या आत्मीयतेने केलं. माझी पत्नी निर्मला तिच्या बी.एससी.च्या आणि एम.एससी.च्या परीक्षांच्या वेळेला तीन-तीन महिने श्रीपुंकडे शीवला जाऊन राहिलेली होती, आणि तिच्याप्रमाणंच तिच्या कित्येक मामेभावंडांनी असा आधार मिळवला होता. माझ्या धाकट्या मुलीला १९८२ साली मूत्रपिंडाचं दुखणं असल्याचं लक्षात आलं. दवाखान्यातनंच आम्ही श्रीपुंना फोन केला. घरी परतेपर्यंत त्यांनी डॉ.अजित फडक्यांची अपॉईंटमेंट घेऊन ठेवली होती! कुटुंबियांवरचं हे असं छत्र आता उरलं नाही.

श्रीपुंना फार कुणाकडे जाऊन तिथं राहायला आवडायचं नाही. कुणाकडे गेले तरी मुक्कामाला शीवला आपल्या मकाणात परतायचे. आमच्याकडे मात्र ते कित्येकदा येऊन राहिले. मी जिथं काम करत व राहात असे तो आयआयटीचा परिसर त्यांना आवडायचा. रात्री कोणी आपल्याकडे राहिले की बरेच बारकावे लक्षांत येतात. जसे : श्रीपुंची आणि विमलाबाईंची झोपायची व्यवस्था आम्हांला वेगवेगळ्या खोल्यांमधे करायला लागे, कारण श्रीपुंना मच्छरदाणीशिवाय झोप लागायची नाही आणि विमलाबाईंना पंखा सर्वात वेगानं लावल्याशिवाय चैन पडायचं नाही. श्रीपु अगदी गोडखाऊ तर विमलाबाईंना मधुमेहामुळे गोड वर्ज्य. श्रीपु अगदी निर्व्यसनी आहेत असं मी कित्येकदा ऐकलं आहे. पण ते खरं नाही. त्यांना एक फार मोठं व्यसन होतं. आणि ते म्हणजे काळजी करण्याचं. साऱ्या जगाची काळजी त्यांना. अर्थात ती त्यांच्या आत्मीयतेतून निर्माण व्हायची. शीवहून निघून आम्ही आमच्या पवईच्या घरी येताच आम्ही आमच्या घरी पोचल्याचा फोन झाला पाहिजे. जरा दहा मिनिटे उशीर झाला तर शीवहून श्रीपुंचा फोन आलाच – “काय पोचलात की नाही अजून?”

श्रीपुंच्या घरी शीवला बरेच महिने राहिल्यामुळे निर्मलाने त्यांच्या काही बारीकसारीक सवयी आत्मसात केल्या, म्हणजे तिला आत्मसात करायला लागल्याच. उदाहरणार्थ, गादीवर चादर कशी घालायची: ती इतकी ताणून बसली पाहिजे की एक चूणही दिसता कामा नये. उशी किंवा तक्क्या अगदी मधोमध ठेवला पाहिजे. या गोष्टी अगदी क्षुल्लक दिसत असल्या तरी त्यामागं एक विचारसरणी आहे – जी गोष्ट करायची ती मी उत्तम प्रकारेच काटेकोरपणे, नीटनेटकेपणे, सुबकतेनं करेन अशी तीव्र इच्छा यामागे आहे. गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात यालाच ‘योग’ म्हटलं आहे: योगः कर्मसु कौशलम्. कुशलतेनं केलेलं कर्म म्हणजेच योग.

श्रीपुंचा मितभाषी स्वभाव सर्वश्रुतच आहे. आम्हांला आलेला एक अनुभव सांगतो. टाटा इन्स्टिट्यूटमध्ये असताना निर्मलाची पीएच.डी.ची व्हायव्हा झाल्यावर आम्ही दोघे गिरगावात श्रीपुंना आणि विपुंना भेटायला गेलो. बातमी सांगितल्यावर श्रीपु आनंदले तर खरेच, पण फक्त म्हणाले, “मंगे, विद्यापीठाकडून रीतसर पत्र येऊ दे आधी.” याउलट श्रीपुंच्या ऑफिसातून विपुंच्या ऑफिसात गेलो तर काय – पेढ्यांचा एक मोठा पुडा आणलेला! तो उघडून अप्पामामानं आपल्या हातानं एक पेढा निर्मलाच्या तोंडात घातला आणि एक जोरात पाठीवर शाबासकी मारली. असा हा दोघांच्यातला फरक.

श्रीपु जसे आनंदानं हुरळून जात नसत तसे अडचणीच्या प्रसंगी यत्किंचितही डगमगून जात नसत, किंवा मतभेदाच्या प्रसंगी समोरच्या माणसावर भडकत नसत – त्यांच्या अगदी नजिकच्या कुटुंबीयांखेरीज – ही एक प्रकारची स्थितप्रज्ञताच म्हटली पाहिजे. माझ्या लग्नानंतर माझ्या आईनं मला निक्षून सांगितलं होतं – “बालमोहन, जरा तुझ्या मामेसासऱ्यांकडून धडा घे, म्हणजे तुझा भडकूपणा कमी होईल.” एकदा श्रीपु आमच्या घरी आले असताना काही प्रसंगानं माझ्या डोळ्यांतून अश्रू घळू लागले. या वागण्याची मी क्षमा मागितली तेव्हा श्रीपु म्हणाले “बालमोहन, डोळ्यांत पाणी येणं हे संवेदनक्षमतेचं लक्षण आहे, पण ते डोळ्यांच्या बाहेर पडू न देणं हे संयमाचं लक्षण आहे.” असो.

एकदा श्रीपुंशी बोलताना निरनिराळ्या नात्यांसंबंधी चर्चा निघाली. मी विचारलं, “कुठलं नातंं तुम्हाला सर्वश्रेष्ठ वाटतं? आईमुलाचं पतिपत्नीचं, मित्रामित्रांतलं की आणखी कुठलं?” याचं श्रीपुंनी फार मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, “नातं कुणाकुणाच्यात आहे यापेक्षा ते कशा प्रकारचं आहे याला जास्त महत्त्व आहे; माझ्या दृष्टीने कुठल्याही नात्यात निरपेक्ष प्रेम किती आहे यावरून त्या नात्याचा कस ठरतो. निरपेक्ष प्रेमाचा अंश जितका जास्त तितकं ते नातं जास्त सकस. माझ्या मते मित्रत्वाच्या नात्यात अपेक्षारहित प्रेम सहजपणे वसू शकतं; म्हणून मी असं म्हणेन की, कुठल्याही नात्यात सहजसुलभ मित्रत्वाचं प्रमाण जास्त तितकं ते सरस.” या उत्तराने मी खूप अंतर्मुख झालो. माझी इतरांशी असलेली नाती, श्रीपुंनी सांगितलेल्या निकषावर तपासून पाहू लागलो – त्यांत माझं श्रीपुंबरोबरचं नातंही आलंच. एक आगळीच दृष्टी मिळाली मला त्यानंतर.

वैयक्तिक जीवनातील व व्यावसायिक कार्यभागातील श्रीपुंची शिस्तप्रियता सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांच्या त्या काटेकोरपणामुळे अनेकजणांना (त्यांत त्यांचे जवळचे कुटुंबीयही समाविष्ट आहेत.) त्यांचा धाक वाटे. ते त्यांच्याशी मोकळेपणे बोलायला धजत नसत. परंतु उलटपक्षी, जटिल प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे आणि इतरांना मनापासून मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे बरेच जण त्यांच्याकडे ओढले जात. हे लिहिताना मला कालिदासानं ‘रघुवंशा’च्या पहिल्या सर्गामध्ये दिलीपराजाचं केलेलं वर्णन आठवतं:

भीमकान्तैर्नृपगुणैः स बभूवोपजीविनाम्।
अधृष्यश्चाभिगम्यश्च यादोरत्नैरिवार्णवः॥

सागराच्या जलचरांमुळे आपण त्यात उडी घ्यायला कचरतो, पण त्याच सागरातल्या रत्नांमुळे आपण सतत तिकडे ओढले जातो. तसंच होतं दिलीपराजाचं, त्याच्यातल्या ‘भीम’गुणांमुळे एकीकडे तर ‘कान्त’ गुणांमुळे दुसरीकडे. मला वाटतं असेच श्रीपुही एका परी ‘अधृष्य’ होते. तर दुसऱ्या परी ‘अभिगम्य’ होते.

श्रीपुंनी कुटुंबातल्या अनेकांचे मृत्यू पाहिले आणि पचवले – भावांचे, बहिणींचे, वहिन्यांचे आणि अगदी तीन महिन्यांपूर्वी आपल्या पत्नीचा. विमलाबाई तीन ते चार वर्षं अंथरुणाला खिळून असताना श्रीपुंचा जीव तिळ तिळ तुटत होता. आपण आपल्या पत्नीच्या आधी जाऊ नये या जबरदस्त इच्छेनं ते तग धरून होते. विमलाबाई गेल्यानंतर तो बांध मोडला. त्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा श्रीपु गीतेतला एक श्लोक आठवायचा प्रयत्न करत होते: “नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः” आत्म्याला शस्रं चिरू शकत नाहीत, त्याला अग्नी जाळू शकत नाही. त्यांनी मला विचारलं, पुढची ओळ काय? सुदैवानं मी लगेच सांगू शकलो “न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत:” पाणी न भिजवी यास, यास वारा न वाळवी. अशी ही आध्यात्मिक भूमिका आपल्या पत्नीच्या मृत्यूबद्दल घेतल्यावर आपल्या स्वतःच्या आजाराबद्दल, व्याधींबद्दलही ते अलिप्तपणे बघू शकत होते.

ते ज्या दिवशी संध्याकाळी गेले त्याच दिवशी दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास त्यांचा आमच्याकडे फोन आला होता. मीच प्रथम तो घेतला. श्रीपु माझे मामेसासरे; पण खरे म्हणजे ते माझे मामेसासरे नव्हेत, माझे मामाच होते. माझ्या पितृस्थानीच होते. मी विचारलं “बरे आहांत ना?” ते म्हणाले “हो, बरा आहे. पण दोन दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधून घरी आल्यावर आपलं घरच मला परकं, नवखं वाटतंय.” मला नीट उमगलं नाही त्यांचं म्हणणं. नंतर ते आमच्याच घरी राहत असलेल्या त्यांच्या पाठच्या बहिणीशी – कमलशी काही काळ बोलले. त्यांचा एकमेकांवर खूप जीव होता. “काळजी घे” असं म्हणाले. नंतर मला असं कळलं की साडेसहाच्या सुमारास डॉ.अजित पाडगावकरांना त्यांनी फोन केला; त्यांच्याशी ते पंधरा-वीस मिनिटं बोलले. त्यांनाही “काळजी घे” असं त्यांनी सांगितलं आणि तासाभरातच त्यांनी देह ठेवला. आपल्या निर्वाणाची पूर्वसूचना तर त्यांना मिळत नव्हती असं आता वाटल्याशिवाय राहवत नाही.

ShreePu Bhagwat

पूर्वप्रकाशन – मौज, दिवाळी २००७.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

लहान-थोर आठवणी फार छान् गुंफल्या आहेत सर. खूप चांगल्या लोकांचा निकटचा सहवास आपल्याला लाभला. मुख्य म्हणजे त्यातून तुम्ही वेचक दृष्टी मिळवलीत. शिकण्यासारखे आहे.

छान लेख. आवडला.