रामायण व महाभारत - भाग १
रामायण व महाभारत – दोन महाकाव्ये
सुधीर भिडे
(रामायण व महाभारत या काव्यांकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येते. त्याविषयीची ही एक साप्ताहिक लघुलेखमाला.)
लेखातील विषयाची मांडणी
- विचारांचे द्वंद्वभाजन
- भौगोलिक विस्तार
- ही महाकाव्ये केव्हा लिहिली गेली?
- लिखाणाचा काल आणि कथानकाचा काल
- नीतिमत्तेचे मानदंड?
- लेखनाचे स्वरूप
---
विचारांचे द्वंद्वभाजन (Dichotomy)
राम आणि कृष्ण या व्यक्तींविषयी आपल्या मनात काहीसा गोंधळ असतो. एका बाजूला आपण असे म्हणतो की हा आपला इतिहास आहे. पण मग इतिहासाचे नियम लावण्याची आपली तयारी नसते. त्याचबरोबर आपण असे म्हणतो की या दोन व्यक्ती देव होत्या. साहजिकच मानवांचे नियम यांना लागू होत नाहीत.
एका तिसऱ्या प्रकारे आपण या काव्यांकडे पाहू शकतो. हा इतिहास आहे की नाही; राम आणि कृष्ण देव होते की नाही हे प्रश्न बाजूस ठेवू. ही दोन काव्ये त्या काळातील आपला देश आणि समाज याबाबत बरेच काही सांगतात. जी माहिती मिळते ती फार उद्बोधक आहे.
एक गोष्ट जाणवते ती ही की दोन्ही महाकाव्ये ज्यांनी लिहिली त्यांना भारताचा भौगोलिक प्रदेश आणि वैशिष्ट्ये यांची नीट माहिती होती. ज्यांना भारत एक राष्ट्र आहे की नाही याची शंका आहे त्यांनी ही गोष्ट ध्यानात घ्यावी. दोन हजारांपेक्षा जास्त वर्षांपूर्वी या देशाच्या भूगोलाची माहिती सर्वसाधारण होती.
भारतीय जेव्हा दक्षिण-पूर्व आशियात पसरले तेव्हा त्यांनी रामकथा आपल्याबरोबर नेली. तिथे रामकथेला स्थानिक स्वरूप मिळाले. त्या देशांत असा विश्वास आहे की रामकथा त्यांच्या देशात घडली, भारतात नाही.
त्या प्रमाणात महाभारत जगात पसरलेले दिसत नाही.
भौगोलिक विस्तार
महाभारताची गोष्ट भारताच्या वायव्य भागात घडते. वायव्येकडील सर्वात दूरचा भाग म्हणजे गांधार. गांधारी येथे जन्मली. महाभारताचा खलनायक, गांधारीचा भाऊ, शकुनी हा गांधारचा राजपुत्र. हा भाग सध्याच्या अफगाणिस्तानात आहे.
महाभारतात सर्वात पूर्वेकडील दूरच्या जागांचा उल्लेख येतो त्या जागा अंग आणि काशी. दक्षिणेकडे विदर्भ, येथील राजकन्या रुक्मिणीचा कृष्णाशी विवाह होतो. आर्य इराणच्या दिशेने आले असे समजले जाते. महाभारताची गोष्ट ज्या भागात घडते तो प्रदेश आर्यांनी प्रथम व्यापलेला प्रदेश.
पांडवांची कटकट नको म्हणून त्यांना इंद्रप्रस्थ ही जागा देण्यात येते. इंद्रप्रस्थ ही जागा उजाड असा उल्लेख येतो. इंद्रप्रस्थ ही सध्याची दिल्लीची जागा. एकोणिसाव्या शतकापर्यंत तेथे दिल्लीजवळ एक इंदरपत नावाचे खेडे होते. द्रोणाचार्य गुडगावजवळ राहत. या सर्व जागा आर्यांच्या वस्तीच्या टोकावरच्या समजल्या जात. यादवांचे राज्य आणि द्रौपदीच्या वडिलांचे पांचाल राज्य इंद्रप्रस्थाच्या दक्षिणेला होते. याचा अर्थ कुरुराज्याचे क्षेत्र सप्तसिंधूच्या प्रदेशात होते.

आता आपण रामायणाच्या गोष्टीचा प्रदेश पाहू. प्रथम अयोध्या ही जागा सप्तसिंधू प्रदेशाहून बरीच दूर आहे. रामायणाची बरीचशी गोष्ट दंडकारण्यात घडते. महाराष्ट्रात पंचवटी आणि कर्नाटकात किष्किंधा या वाटेवरून राम लंकेपर्यंत पोचतात.

लंकेत जाण्यासाठी ज्या सेतूचा वापर केला गेला तशी भौगोलिक रचना आजही दृष्टीस पडते.

महाभारताच्या काळात आर्य सप्तसिंधूच्या भागात होते. दिल्लीपर्यंतचा भागही उजाड आणि त्या काळातील ‘अनार्य’ लोकानी वस्ती केलेला होता. रामायणाच्या काळात आर्य आग्नेय दिशेने पसरले होते. रामाच्या गोष्टीत आर्यांचे लक्ष दक्षिणेकडे होते. त्या भागात आर्यधर्म वाढवायचा होता. यावरून असे वाटते की महाभारताची गोष्ट रामायणाच्या आधीच्या समाजाचे वर्णन करते.
ही महाकाव्ये केव्हा लिहिली गेली?
महाभारताची पहिली हस्तलिखित पोथी १२०० सालातली आहे. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने महाभारताची संशोधित आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. या आवृत्तीत ८९,००० श्लोक आहेत. ही आवृत्ती बनविताना १००० हस्तलिखितांचा संदर्भ घेण्यात आला.
वाल्मिकींनी रामायण रचले. रामायणात २४,००० श्लोक आहेत. रामायणाला आदिकाव्य म्हटले जाते. सहाव्या शतकात लिहिलेले रामायणाचे हस्तलिखित उपलब्ध आहे. (टाइम्स ऑफ इंडिया, १८/१२/२०१५)
कोणत्या ग्रंथात काय संदर्भ येतो यावरून ग्रंथाच्या रचनेचे साल अनुमानित करता येते. भारतरत्न काणे आपल्या ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या ग्रंथात लिहितात (पृष्ठ ५०) -
मनुस्मृतीचा रचनाकाल सन १५० असावा. महाभारतात मनुस्मृतीचे बरेच संदर्भ आले आहेत. मनुस्मृतीत महाभारताचा कोठेही नामनिर्देश नाही. उलटपक्षी महाभारतात बहुतेक पर्वात मनुच्या स्मृतिचे संदर्भ आले आहेत. महाभारतातील शेकडो श्लोक मनुस्मृतीतील श्लोकांशी तंतोतंत जुळतात. या सर्व पुराव्यावरून मनुस्मृती महाभारताच्या अगोदर झाली असावी असे वाटते.
(धर्मशास्त्राचा इतिहास, भारतरत्न महामहोपाध्याय पां वा काणे, अनुवाद प्रकाशक – साहित्य आणि संस्कृती मंडळ. महाराष्ट्र राज्य प्रकाशन, १९६७)
- महाभारतात रामायणाचे संदर्भ येतात.
- महाभारताच्या वनपर्वात मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला रामाची गोष्ट सांगतात असा प्रसंग आहे.
- रामायणात हस्तिनापुर आणि इंद्रप्रस्थ यांचे उल्लेख येत नाहीत.
- अगस्ती ऋषी रामायणात भाग घेतात, तर महाभारतात त्यांचा उल्लेख इतिहासातील व्यक्ती असा येतो
- भगवद्गीतेत कृष्ण रामाचा उल्लेख एक महायोद्धा असा करतो .
- महाभारतकार व्यास वाल्मिकींचा उल्लेख करतात पण वाल्मिकी व्यासांचा उल्लेख करत नाहीत.
या सर्वांवरून असे म्हणता येते की रामायण महाभारताच्या आधी रचले गेले. दोन्ही काव्यांत इंद्र आणि परशुराम या व्यक्तिरेखा येतात. असे शक्य आहे की दोन्ही काव्ये शंभर वर्षांच्या काळात रचली.
माधवराव चितळे यांनी वाल्मिकी रामायणाचे मराठी रूपांतर लिहिले आहे. त्यात एक प्रसंग असा आहे –
विश्वामित्र (ऋषी बनण्याआधी) एकदा आपल्या सैन्यासह वशिष्ठांच्या आश्रमाला भेट देतात. वशिष्ठांची शिष्या शबाला पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करते. शबालाच्या कामाचे व्यवस्थापन पाहून विश्वामित्र प्रभावित होतात आणि वशिष्ठांकडे शबालाची मागणी करतात. वशिष्ठांनी नकार दिल्यावर विश्वामित्र जबरदस्तीने शबालाला नेऊ पाहतात. शबाला आरडाओरडा करून बाजूला राहणाऱ्या शकांना मदतीस बोलावते. शक आश्रमात येऊन शबालाची सुटका करतात. शक भारतात ख्रिस्तपूर्व ५० ते इ.स. १०० या काळात आले. याचा अर्थ रामायण (आणि महाभारत) त्यानंतर लिहिले गेले.
नितीन वाघ यांनी ‘प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत’ हे बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाविषयी पुस्तक लिहिले आहे. ते लिहितात की बौद्ध धर्माचे वाङ्मय त्रिपिटीका रामायण आणि महाभारताचा उल्लेख करीत नाही. वाल्मिकी रामायणात एका श्लोकात बुद्धाचा उल्लेख येतो – बुद्धाय, शुद्धाय, दैत्य मोहिनी. यावरून ते असा निर्णय काढतात की रामायण आणि महाभारत बुद्धाच्या नंतर लिहिले गेले. हा निर्णय वरच्या विधानाशीही जुळतो.
यावरून ढोबळ मानाने रचनेचा काल समजायचा तर -
- मनुस्मृती – सन १५०
- रामायण – सन २५०
- महाभारत – सन ३५०
- १८ पुराणांची रचना यानंतर ३०० वर्षांपर्यंत झाली.
लिखाणाचा काल आणि कथानकाचा काल
वि. स. खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी विसाव्या शतकात लिहिली. या कादंबरीचा लिखाणाचा काल विसावे शतक तर कथानकाचा काल चार हजार वर्षांपूर्वीचा.
समजा १९५० साली एका लेखकाने माधवराव पेशव्यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली. दुसऱ्या लेखकाने २०२० साली शहाजी राजांच्या जीवनावर कादंबरी लिहिली. म्हणजे नंतर लिहिलेली कादंबरी आधीच्या कालाचा इतिहास सांगते.
असाच काहीसा प्रकार महाभारत आणि रामायण या बाबतीत झाला असावा. दोन्ही ग्रंथांची निर्मिती बुद्धाच्या कालानंतर झाली. दोन्ही ग्रंथातून ज्या समाजाचे वर्णन आले आहे तसा समाज बुद्धपूर्व ५०० वर्षांत म्हणजे आजपासून साधारणपणे ३००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असावा. आता असा प्रश्न निर्माण होतो की या दोन काव्यांपैकी कोठले काव्य आधीच्या समाजाचे चित्रण करते?
वर पाहिल्याप्रमाणे रामायणाचा लिखाणाचा काल सन २५० आणि महाभारताचा सन ३५०.
निरनिराळ्या प्रकारे विचार केला तर महाभारतातील समाज रामायणातील समाजाच्या आधीचा असावा.
समजण्यासाठी असे म्हणू की महाभारताच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व १००० तर रामायणाच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व ८००. (हे सर्व काल अर्थातच ढोबळ मानाने लिहिले आहेत.) हा कालखंड वेदकालानंतर आणि बुद्धकालाआधी येतो.
महाभारताच्या कथानकाचा काल रामायणाच्या कथानकाच्या आधीचा वाटतो याचे एक कारण भौगोलिक विस्तार. महाभारताची कथा सप्तसिंधूच्या प्रदेशात घडते. इंद्रप्रस्थ ही जागा ओसाड असे वर्णन येते. तेथे नाग लोकांची वस्ती होती. त्यांना तेथून घालवून लावून पांडवांनी आपले राज्य स्थापिले असा उल्लेख येतो. या उलट अयोध्या सप्तसिंधूपासून पुष्कळ पूर्वेकडे आहे. आणि रामकथा तेथून दक्षिणेला जाते.
महाभारतात कुटुंबरचना विस्कळीत आहे कोणाचा कसा जन्म झाला याला महत्त्व नाही. रामायणात लग्न आणि कुटुंब ही कल्पना सुनिश्चित आहे.
नीतिमत्तेच्या कल्पना
रामायणातील व्यक्तिरेखा वागणुकीचे मानदंड उभे करतात. आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श पत्नी अशा व्यक्तिरेखा आपण पाहतो. राम व्यक्तिगत आयुष्यात नीतीची परिसीमा आहे. कैकेयी जेव्हा हे व्यक्त करते की रामाने राज्य सोडून चौदा वर्षे वनवासाला जावे त्यानंतरही राम कैकेयीला आदराने संबोधतो. अयोध्येस परतल्यावर राम राज्यावर बसतो तेव्हा तो आदर्श राजा बनतो. अजूनही भारतीय मनात चांगले राज्य म्हणजे रामराज्य.
सीता सर्व सुखाचा त्याग करून रामाबरोबर वनवासाला जाते. चौदा वर्षांनंतर जेव्हा सीतेच्या हे ध्यानात येते की अयोध्यावासी तिच्या शीलाविषयी संशय घेत आहेत तेव्हा ती अयोध्या सोडून आश्रमात जाते.
भरत आणि लक्ष्मण आदर्श भावांच्या मूर्ती आहेत.
महाभारतात हे चित्र नाही. त्यामुळे महाभारतातील व्यक्तिरेखा आपल्याला जवळच्या वाटतात. विदुराने सांगितल्याप्रमाणे – शठम प्रतिशाठ्यम असा प्रकार आहे. या सर्वात कृष्ण पुढाकार घेतो. युद्धात भीष्म, द्रोण, कर्ण आणि दुर्योधन यांच्या पाडावात कृष्णाने सुचविलेल्या क्लृप्त्या या नैतिक म्हणता येत नाहीत. रामायणात राम फक्त एकदाच नीतीच्या बाहेर वागताना दिसतो – वालीचा वध करताना. त्यावेळी आर्यधर्माचे संवर्धन असे राम कारण देतो.
लेखनाचे स्वरूप
या प्रस्तावनेनंतर आपण त्या काळातील समाजाचा निरनिराळ्या अंगाने तीन भागात विचार करू.
भाग २ – दोन कथांतील साम्य
भाग ३ – कथेतील पात्रे
भाग ४ – तत्कालीन समाज
---
(पुढील भाग इथे)
संदर्भ ग्रंथ
- Land of seven Rivers, Chapter 3, Sanjeev Sanyal, Penguin Books 2012
- युगांत, इरावती कर्वे
- वास्तव रामायण, डॉक्टर वर्तक, चौथी आवृत्ती, १९९३
- Thesis on diet in Sanskrit literature, Sreeja, Calicut University
- महाराष्ट्र टाइम्स लेखमाला एप्रिल ते ऑगस्ट २०२२
- रामायण काही अभ्यास आणि विचार, प्रभाकर फडणीस
- आयोध्यानो रावण अने लंकाना राम, दिनकर जोशी (ही एक कादंबरी आहे. परंतु कथानक निरनिराळे प्रश्न उभे करते.)
- भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, इतिहासाचार्य राजवाडे, लोकवाङ्मय गृह
- ज्येष्ठ, अनंत मनोहर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन
- महाभारताचे वास्तवदर्शन, प्राचार्य आठवले, श्री राधा दामोदर प्रतिष्ठान, २०००
- धर्मशास्त्राचा इतिहास, भारतरत्न महामहोपाध्याय पां वा काणे, (अनुवाद), साहित्य आणि संस्कृती मंडळ. महाराष्ट्र राज्य प्रकाशन, १९६७
- वाल्मिकी रामायण, माधव चितळे, माधवराव चितळे यांची प्रवचने, साकेत प्रकाशन, २०१६.
पुढच्या भागांची उत्सुकता
लेखमाला नेहमीप्रमाणे ज्ञानवर्धक होईल यात शंका नाही. त्यामुळे पुढच्या भागांची उत्सुकता आहे.
सध्या सेव्हन मुन्स ऑफ माली अल्मेडा हे पुस्तक वाचताना संदर्भ म्हणून, श्रीलंकेचा इतिहास चाळला, तेव्हा या विषयाच्या संदर्भात काही प्रश्न पडले होते. लेखमालेतून त्याची उत्तरे मिळतील अशी आशा करतो.
१. महाकाव्यांच्या लिखाणाचा काळ
२. महाकाव्यांच्या कथानकाचा काळ
?
बाकीच्या मुद्द्यांबद्दल काही विवरण करण्याची माझी पात्रता नाही; परंतु, एक शंका:
का बुवा? सिंधुलिपी ही चित्ररूप लिपी आहे, म्हणून?
चिनी भाषेत कधी काव्यरचना झालीच नाही काय?
फॉर्दॅट्मॅटर, लिपीचा (चित्राक्षर असो की मुळाक्षर) नि काव्यक्षमतेचा संबंध काय? काव्य हा मुख्यत्वेकरून भाषेचा, तिच्यातील ध्वनींचा नि तिच्याद्वारे व्यक्त केल्या गेलेल्या संकल्पनांचा खेळ असावा. लिपीचा काव्यनिर्मितीत नेमका सहभाग काय? हं, कवीला आपण मागच्या काही ओळींत नेमके काय लिहिले होते ते लक्षात ठेवून त्याच्याशी सुसंगत अशी पुढची काव्यरचना करण्याकरिता aide-mémoire म्हणून, झालेच तर काव्यरचना झाल्यानंतर तिचा प्रसार करण्यासाठी लिपीचा काही मर्यादित फायदा आहे, हे नाकारता येणार नाही. परंतु म्हणून, या दोन्ही कामांकरिता ती आवश्यक आहेच काय?
- कवीची स्मरणशक्ती जर चांगली असेल, तर त्याला अशा कृत्रिम साधनांची आवश्यकता असेलच, असे नाही. (मिळाल्यास फायदा होईल निश्चित; आवश्यकता नसेल.) आणि, नसेल स्मरणशक्ती तितकीशी चांगली, तरीसुद्धा, खुद्द कवीकडूनच नि काव्य रचीत असतानाच त्या काव्याचे कित्येक पाठभेद होतील फार फार तर, नि त्यातला शेवटला / कवीला त्यातल्या त्यात लक्षात राहिलेला पाठभेद पुढे प्रसारित होईल.
- काव्याच्या प्रसारात तो प्रसार करणाऱ्यांकडून, झालेच तर वेगवेगळ्या प्रसारकांना वेगवेगळ्या वेळी निवेदन करताना खुद्द कवीकडून, लिपीच्या मदतीअभावी असंख्य पाठभेद निर्माण होतील, फार फार तर. (कवीकडून पाठभेद झाल्यास त्यास त्या काव्याची पुढची 'आवृत्ती' म्हणता येईल काय? हा पूर्णपणे वेगळा प्रश्न.) यातील जे (एक वा एकाहून अधिक) पाठभेद समाजात प्रचलित होतील, ते टिकतील.
सबब, काव्याच्या पाठभेदांचे प्रमाण कमी करण्यासाठी (अर्थात, काव्याच्या 'स्टँडर्डायझेशन'साठी) लिपी (एका मर्यादेपर्यंत) उपयुक्त आहे, हे खरेच. परंतु म्हणून, मुळात काव्यरचनेकरिता ती आवश्यक आहे, हे पटत नाही.
- वेगवेगळ्या समाजांतील लोकगीते/पारंपरिक गीते घ्या. अनेकदा त्यांचे रचयिते हे निरक्षर असतात. दर खेपेस काही हे समाज शान्ता शेळक्यांसारख्या बाहेरच्या कवीकवयित्रींना काव्यरचना करण्याचे काम औटसोर्स करीत नाहीत. अनेकदा अशा काव्यांचा मूळ रचनाकार कोण, हे सांगणेही अशक्य असते. (अर्थात, मूळ रचनाकार कोण, हे माहीत नाही, याचा अर्थ आपोआप तो निरक्षर होता, असा होत नाही, हे खरेच; परंतु, ज्या समाजांत कागदपेन्सिल या रोजच्या वापरातल्या गोष्टी नाहीत, त्या समाजांतील काव्यरचना ही मुळात लिखित स्वरूपात होत नसावी, असा आपला एक अंदाज.)
- फॉर्दॅट्मॅटर, बहिणाबाई चौधरी या कवयित्री निरक्षर नव्हत्या काय?
असो. तर सांगण्याचा मतलब, लिपी ही मुळात जेथे काव्यरचनेसाठी आवश्यक नाही, तेथे ती चित्राक्षर आहे की मुळाक्षर, याने काव्यक्षमतेवर नेमका काय फरक पडतो?
उद्या देवनागरीतून उर्दू शेरोशायरी करता येत नाही, म्हणाल! (का? तर ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, म्हणून!)
काव्यरचनेसाठी लिपीची गरज नाही
हे खरेच की, छोट्या छोट्या कविता, लोकगीते यांचे रचनाकार अज्ञात असतात. त्यामुळे काव्यरचनेसाठी लिपीची गरज नाही हा मुद्दा पटला. तरीपण हे +२०००० श्लोकांचे महाकाव्य आहे. त्यामुळे मला तसे वाटले. एनीवे, मला यात संशोधकांचे एकमत (वा वेगवेगळे अंदाज) जाणून घ्यायला आवडेल.
कालनिर्णय
कालनिर्णय
ही महाकाव्ये केव्हा लिहिली गेली?
लिखाणाचा काल आणि कथानकाचा काल
याबाबत टिळकांच्या Orion ग्रंथाचीही नोंद घ्यावी ही विनंती.
पृथ्वीच्या परांचन गतीने एके काळी दोन राशी मागे असलेला वसंत संपात बिंदू आता मीन राशीत आहे. जुन्या ग्रंथातील मृगशिरस, कृत्तिका यांचा उल्लेख ग्रंथांचा काळ भौगोलिक तऱ्हेने निश्चित करतो. भिष्माचे मरण त्याने पुढे ढकलणे वगैरेही निर्देश करतात.
..............
पौराणिक कथांत रावणाचा मार्ग ( महादेवाचा वर मिळवून लंकेत परतताना गोकर्णमार्गे -किष्किंधा असा आहे. पुरातन काळी मंगळुरू ,कालिकात येथे अरब येत होते. ते धिप्पाड असत. त्यांच्याशी या धिप्पाड रावणाची हाणामारी झाली असेल. मग ते महादेवाचे लिंगरूपी पिंड तिथेच गोकर्णाला टाकावे लागले असेल. लंकेमुळे रावणास समुद्राचे आकर्षण असणार आणि म्हणून तो नाशिकनंतर कारवारकडे गेला असेल
तिथून लोंढा हुबळी होस्पेट (किंष्किंधा) मार्गे पूर्व किनाऱ्यावरील धनुष्कोडी किंवा पुंपुहार बंदरातून लंकेला गेला असेल.
.........
नीतिमत्तेचे मानदंड?
यावर भरपूर लोकांनी चर्वीतचरण केले आहे.
…
त्याच्याकडे एअरप्लेन/एरोप्लेन होते ना?
नै बहूतेक.
नै बहूतेक.
पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे
रामायण आणि महाभारत आणि हे दोन्ही सतत अभ्यासले पाहिजेत, सतत यावर चर्चा केलो पाहिजे. प्रत्येक पिढीला भेडसावणारे प्रश्न सोदवण्यासाठी सनातन धर्म कसे मार्गदर्शन करतो यासाठी हे गरजेचे आहे. म्हणून पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे.
'हा इतिहास आहे की नाही; राम आणि कृष्ण देव होते की नाही हे प्रश्न बाजूस ठेवू.' - या पद्धतीने अभ्यास केल्यास रामायण आणि महाभारतचे निर्जीव कलेवर आपण अभ्यासत आहोत हे इथे नमूद करुन ठेवतो.
Historicization - ऐतिहासिकीकरण ही आधुनिक पद्धत व भारतीय इतिहास
revelation (साक्षात्कार) आणि reincarnation (अवतार) वजा केले की श्रुती-स्मृती-पुराणे-इतिहास यांचा अभ्यास म्हणजे त्यातला प्राण काढून केवळ स्ठूल शरीराचा अभ्यास. आधुनिक काळात आपण इतिहासाचा विचार करताना मानवी प्रवास एकरेषीय (linear) म्हणजे प्रगतीकडे (progress) किंवा अधोगतीकडे वा सर्वनाशाकडे (apocalyptic) होणारा असा केला जातो. ‘आपण सगळे समाज म्हणून प्रगतीच्या दिशेने किंवा अधोगतीच्या दिशेने जातो आहोत’, असा इतिहासाकडे पाहण्याची पद्धत आता रूढ होवून बसली आहे. यांत प्रगती अथवा अधोगती ही सामुदायिक असते, शेवट किंवा अंत अपेक्षित असतो म्हणून काळाचा विचार एकरेषीय होतो. परंतु हिंदू विचारानुसार काळ एकरेषीय नाही. जन्माला आलेला प्रत्येक जीव (मनुष्यासहित) आपापल्या स्वतंत्र गतीत आहे आणि ही गती त्या त्या जीवाच्या संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण या कर्मावर अवलंबून असते. (‘दोन ओंडक्यांची होते, सागरात भेट’...). पुढे वैयक्तिक गतीमुळे जन्म-वृद्धी-मृत्यू हे चक्र सुरू राहते. म्हणजे काळ एकरेषीय नसून चक्रिय (circular) असतो. हा आधुनिक ऐतिहासिकीकरण या पद्धतीत आणि हिंदू विचारातला फरक आहे.
आज हे लिहिणे हे सुद्धा मानसिक मागासलेपणाचे लक्षण आहे इतपत Historicization आपल्या अंगवळणी पडले आहे.
'राम आणि कृष्ण या व्यक्तींविषयी आपल्या मनात काहीसा गोंधळ असतो. एका बाजूला आपण असे म्हणतो की हा आपला इतिहास आहे. पण मग इतिहासाचे नियम लावण्याची आपली तयारी नसते. त्याचबरोबर आपण असे म्हणतो की या दोन व्यक्ती देव होत्या. साहजिकच मानवांचे नियम यांना लागू होत नाहीत.'
अशी सरसकट थियरी मांडून सुरुवात केली आहे. एकाच वेळी देव (ईश्वर हा योग्य शब्द आहे, पण ते असो) आणि व्यक्ती असणे यात गोंधळ नाही. राम आणि कृष्ण हे ईश्वराचे अवतार असले तरी त्यांना मानवी जीवनातले नियम लागू होते. रामाच्या मनात संभ्रम निर्माण होवून तो निष्क्रिय होतो की काय अशी परिस्थिती आली तेंव्हा वशिष्ठ ऋषींनी 'योगवासिष्ठ' हा उपदेश केला. सीतेचा विरह सहन करीत रामाने 'राम-राज्य' निर्माण केले. कृष्णाला माता-पिता विरह सहन करावा लागला आणि सरतेशेवटी यादवकुलाचा नाश होणार हा अंदाज होताच. एका बाणाचा घात होवून कृष्णाचा अवतार संपला. राम-कृष्ण यांना मानवी नियम लागु होते हे समजायला असे अनेक दाखले मूळ ग्रंथात आहेत.
'नारायण नमस्कृत्य' अशी महाभारताच्या मंगलचरणाने सुरुवात होते. तो 'नारायण' अवतार होता की नाही हाच प्रश्न पडत असेल आणि तो बाजुला ठेवून महाभारत वाचायचं असेल तर महाभारत काय सांगेल याबद्द्ल उत्सुकता आहे.
पुढिल भागांसाठी शुभेच्छा.
चौदा वर्षांनंतर जेव्हा
चौदा वर्षांनंतर जेव्हा सीतेच्या हे ध्यानात येते की अयोध्यावासी तिच्या शीलाविषयी संशय घेत आहेत तेव्हा ती अयोध्या सोडून आश्रमात जाते.
परत एकदा वनातील आश्रमात जाण्याचा निर्णय सीता स्वत: घेते का?
मला माहिती असलेल्या कथेत आयोध्येतील एक धोबी त्याच्या पत्नीला घराबाहेर जायला सांगत असतो आणि तेव्हा म्हणतो, "मी काही आयोध्येचा राजा राम नाही, ज्याने परक्याच्या गृही राहिलेल्या पत्नीला स्विकारले." त्या वेळी श्रीराम वेष बदलून राज्याची व्यवस्था पाहण्यासाठी तिथे आलेले असतात. हा संवाद ऐकल्यावर ते सीतेचा त्याग करण्याचा निर्णय घेतात.
द्रौपदीनेही पांडवांसमवेत दोन वेळा (प्रत्येकी १२ वर्षे) वनवास भोगला असतोच आणि एक वर्ष आज्ञातवास.
सर्व पांडव युधिष्ठिराने इंद्र्प्रस्थाचे राज्य, सर्व बंधु आणि पत्नी दौपदीला द्युतामधे पणाला लावले तरी विरोध करीत नाहीत. हे आदर्श वर्तन नाही का?
गृहकलहामधे हस्तक्षेप केला म्हणून कृष्णाला (बहुदा गांधारीने) शाप दिला आणि नेमक्या त्याच कारणाने वालीने रामाला शाप दिला. कृष्णाच्या हयातीतच यादवी घडली आणि श्रीरामांच्या हयातीतच त्यांच्या राज्याची चार विभागात वाटणी झाली.
म्हणजे विष्णुचा अवतार असूनही सर्व मानवी यातना त्यांना सहन कराव्या लागल्याच.
*********
उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभाए |
जनम मरन का मेल है सपना, ये सपना बिसरा दे |
कोई ना संग मरे ...
, डॉ आंबेडकर काय म्हणतात ते
, डॉ आंबेडकर काय म्हणतात ते पण तपासून पहा......
१) "आर्य भारतात बाहेरून आलेत हा सिद्धांत सापाला ठेचल्या प्रमाणे ठेचून मारला पाहिजे. "
-डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज ..? डॉ .आंबेडकर रायटिंग अन्द स्पीचेस , खंड ७ ...प्रकरण ५ ,पृष्ठ क्र .८६ )
२) "आर्यन वंश सिद्धांत हा इतका बिनबुडाचा व मूर्खपणाचा आहे कि ह्या सिद्धांताचा फार पूर्वीच मृत्यू व्हायला पाहिजे होता ..."
-डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज.? पृष्ठ क्र -.८० )
३) "बाहेरून आर्यांनी भारतावर आक्रमण केल्याचा कणा इतकाही पुरावा ऋग्वेदामध्ये सापडत नाही ." -डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज..? पृष्ठ क्र .७४ ).
४) "पाश्चिमात्त्यांनी उभा केलेला हा आर्य वंश सिद्धांत प्रत्येक पातळीवर पराभूत होतो हे निर्विवाद सत्य आहे ."
-डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज..? पृष्ठ क्र .७८ )
५) "आर्य वंश सिद्धांताचे प्रसारक इतके उतावीळ आहेत की त्यांच्या हे लक्षातच येत नाही की त्यामुळे ते मूर्खांच्या नंदनवनात जाऊन पोहोचतात. त्यांना काय सिद्ध करायचे आहे हे त्यांनी आधीच ठरविले असून त्याप्रमाणे त्यांच्या सोयीने ते वेदांमधून पुरावे शोधत बसतात."
-डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज.? पृष्ठ क्र.८० ).
#आर्याक्रमण_आर्यअनार्यवाद_ऋग्वेद_आंबेडकर
#इतिहासाच्या_पाऊलखुणा_meme_स्पर्धा
मायग्रेशन थियरी
आता आंबेडकर काय म्हणतात ते तपासायचेच तर टिळक काय म्हणतात ते ही एकदा पहायला काय हरकत आहे?
वास्तविक आंबेडकर काय किंवा टिळक काय, दोघेही आपापल्या क्षेत्रात कितीही महान असले तरी इतिहास या क्षेत्रात त्यांचा फार अभ्यास होता याबाबत शंका आहे. खेरीज, त्यांच्या काळात Archeology आणि Linguistics ही दोन्हीही विद्याशाखा बाल्यावस्थेत होत्या. Genetics या विद्याशाखेचा तर जन्मही झाला नव्हता. तेव्हा त्या दोघांना फार गांभिर्याने घ्यायची आवश्यकता नाही.
आज ह्या तीनही विद्याशाखा फोफावल्या आहेत. भरपूर माहिती उपलब्ध आहे आणि नव्याने उपलब्ध होतही आहे. जगभरातील इतिहासतद्न्य आज आर्यन मायग्रेशन थियरी मान्य करतात. किंबहुना राखीगढी येथील संशोधनानंतर त्यावर शिक्कामोर्तबच झाले आहे.
टिळक नको की आंबेडकर नको.
टिळक नको की आंबेडकर नको.
जरा डीएनए काय म्हणतो ते पहायला काय हरकत आहे.
यातील लेटेस्ट पुस्तक - अर्ली इंडीयन्स https://www.amazon.in/Early-Indians-Story-Ancestors-Where/dp/938622898X
अनेकांना अंजन घालणारे ठरावे...
-स्थलांतरीत अहिरावण
- अहिरावण
अवरंग्याला महान सिद्ध करणे हा डाव्या विचारांच्या आणि स्वत:ला उदारमतवादी समजणा-या मतलबी, धुर्त, स्वार्थी लोकांचा सध्याचा धंदा आहे.
…
बाकी, सोयिस्कर तेथे(च) डॉ. आंबेडकरांचा दाखला देण्याचा प्रकार हा अंमळ रोचक. उदाहरणादाखल, ‘वर्णानां ब्राह्मणो गुरुः’बद्दल डॉ. आंबेडकरांचे म्हणणे काय असेल, याचाही आढावा घेणे कदाचित उद्बोधक ठरावे. (आणि म्हणूनच, कदाचित ते होणारही नाही. चालायचेच.)
अजुन इतिहासात च रमणारा भारत हा एकमेव देश असल
इतिहास मध्येच रमणाऱ्या लोकांमुळे भारताचे प्रचंड नुकसान होत आहे.
चीन नी जसा निर्णय घेतला होता त्या नुसार .
2023 पर्यंतच च सर्व इतिहास जाळून टाकला पाहिजे.
त्याचा उल्लेख पण करणे हा गंभीर गुन्हा झाला पाहिजे.
नवीन भारताची निर्मिती केली पाहिजे
"जाला"वर उपलब्ध असणारा इतिहास
"जाला"वर उपलब्ध असणारा इतिहास कसा जाळायचा?
जाळायलाच पाहिजे असे काही नाही
जाळायलाच पाहिजे असे काही नाही. बघितला नाही वाचला नाही तरी चालेल.
दृष्टी आड सृष्टी ...
त्यासाठी मनोनिग्रह मात्र पाहिजे.
*********
उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभाए |
जनम मरन का मेल है सपना, ये सपना बिसरा दे |
कोई ना संग मरे ...
लोकांची तोंडे कशी बंद करणार?
लोकांची तोंडे कशी बंद करणार?
लिखित इतिहासाच इतिहास २-३ हाजार वर्षे जुना आहे. तत्पुर्वीचा शेकडो वर्शांचा इतिहास कथन स्वरुपात सरकत आलेला होता, आहे आणि येईल.
भारताचे नुकसान जाउ द्या.. तुम्ही तुमचे आईबाप कोण हा इतिहास विसरा आणि प्रगति साधा.
- अहिरावण
अवरंग्याला महान सिद्ध करणे हा डाव्या विचारांच्या आणि स्वत:ला उदारमतवादी समजणा-या मतलबी, धुर्त, स्वार्थी लोकांचा सध्याचा धंदा आहे.
करेक्ट
आई बाप कोण हे पण विसरून स्वतःची ओळख असलीच पाहिजे.
नाही तर आम्ही पूर्वी सरदार होतो ,वतनदार होतो ही गुर्मी काहीच कर्तुत्व नसणारे पण करत असतात.
आणि तशीच वतनदारी वृत्ती बाळगून असतात