रामायण व महाभारत - भाग २
रामायण व महाभारत – दोन कथांतील साम्य
सुधीर भिडे
मागील भाग इथे.
विषयाची मांडणी
- अद्भुत प्रसंग
- राक्षस
- वनवास
- कथेचे दोन भाग
- कथेचा शेवट युद्धाने
- उत्तर कथा
- दोन नायक
---
अद्भुत प्रसंग
दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या आणि तीन हजार वर्षांपूर्वीच्या समाजाचे वर्णन करणाऱ्या कथांत अद्भुत प्रसंग असतील यात काही नवल नाही. येशूच्या चरित्रात अद्भुत प्रसंग आहेतच. आजच्या कालात साईबाबा यांच्या चरित्रातही अद्भुत प्रसंग घडल्याचे सांगितले जाते. ज्या व्यक्तींना देवत्व द्यायचे असते त्यांच्या जीवनात अद्भुत प्रसंग असणे मानवी मनाला गरजेचे वाटते. आधुनिक काळात व्यक्तीच्या मोठेपणाला अद्भुत प्रसंगांची गरज राहिली नाही.
महाभारतात पांडवांच्या जन्मापासून अद्भुत प्रसंग चालू होतात. कुंतीला चार मुले – कर्ण – (सूर्य), युधिष्ठिर (यम), भीम (वायू), अर्जुन (इंद्र) या देवांच्या कृपेने होतात. थोडा प्रसाद कुंती आपल्या सवतीला – माद्रीला देते. माद्रीला नकुल आणि सहदेव ही मुले होतात. त्या काळात नियोगाने पुत्रप्राप्ती करून घेणे सर्वमान्य होते. कुंतीचे पती, पांडू आणि दीर नियोगानेच झाले होते. येथे नियोगाचा उल्लेख येत नाही म्हणून अद्भुत प्रसंग म्हणायचे.
सूर्य आणि कुंती - रवि वर्मा प्रेस.
कर्णाच्या अंगावर जन्मत:च कवचकुंडले असतात. हे कवच कर्णाच्या शरीराबरोबर मोठे होत असावे. या कवचामुळे कर्ण अवध्य असतो. युद्धाआधी इंद्र लबाडीने कवच कुंडले घेऊन टाकतो आणि कर्ण वध्य होतो.
कौरवांच्या जन्माची कथा अशीच अद्भुत आहे. गांधारी जेव्हा गर्भ धारण करते तेव्हा तिला समजते की कुंतीला तीन मुले अगोदरच झाली आहेत. याचा अर्थ राज्यावर कुंतीचा मुलगा येणार. वैतागाने गांधारी आपल्या पोटावर प्रहार करते. त्यामुळे गर्भ बाहेर येतो. त्या गर्भाचे शंभर तुकडे करून व्यास ते शंभर मडक्यात ठेवतात. त्यातून शंभर मुले होतात.
पांडवांच्या जन्माप्रमाणेच रामाचा जन्मही अद्भुत आहे. दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करतो. यज्ञातून यज्ञपुरुष बाहेर येतो आणि दशरथाला एका भांड्यात खीर देतो. दशरथाच्या राण्या ती खीर पितात आणि त्यांना चार मुले होतात.
युद्धाच्या वेळी लक्ष्मण गंभीर रितीने जखमी होतो. वैद्य असे सांगतात की हिमालयात असलेली एक वनस्पती लक्ष्मणाचा जीव वाचवू शकेल. मारुती तत्काळ उडत हिमालयात जातो आणि हिमालयाची एक टेकडीच उचलून लंकेत आणतो.
युद्ध संपल्यावर राम परिवारासह पुष्पक विमानाने अयोध्येत पोचतो.
राक्षस
दोन्ही कथांत राक्षस येतात.
रामायणामध्ये आर्य राम आणि राक्षस राजा रावण यांच्यातील संघर्ष आहे. उत्तरेतील आर्यांनी व्यापलेल्या भागाच्या बाहेर दक्षिणेत दंडकारण्यात राहणाऱ्या लोकांस आर्य राक्षस असे संबोधत. त्या काळात दंडकारण्य घनदाट अरण्यांनी व्यापलेले होते. रामायणात त्या अरण्याचे वर्णन येते. माली आणि सुमाली हे दोन भाऊ दंडकारण्यात राज्य करत होते. त्यांचा मुख्य देव शंकर. आर्यांनी हा देव त्यांच्या देवांत नंतर सामावलेला दिसतो. आर्यांचा देव इंद्र आणि राक्षस यांच्यात कायम संघर्ष चाललेला दिसतो.
असुर, दानव आणि राक्षस हे शब्द बऱ्याच वेळेला समानार्थी म्हणून वापरले जातात. पण हे शब्द एकाच अर्थाचे नाहीत. नाहीत. असुर आणि दानव हे देवांचे चुलतभाऊ. लवकरच देव आणि दानव यांच्यात संघर्ष चालू झाला.
राक्षस हा शब्द आर्य वस्तीच्या बाहेर राहणाऱ्या आदिवासी लोकांसाठी वापरला जातो. रामायणात असा उल्लेख येतो की राक्षस ऋषींच्या यज्ञकर्मात विघ्न आणतात. रामाने प्रथमपासूनच राक्षसांचा पराभव / नाश करण्याची जबाबदारी घेतलेली दिसते. उत्तर रामायणात असा संदर्भ येतो की मथुरेत लवण नावाचा राक्षस त्रास देत आहे. हा लवण रावणाचा पुतण्या आहे असे सांगितले जाते. लवणाच्या तोंडी असे वाक्य आहे – मला वैदिक धर्माचा नाश करायचा आहे. शत्रुघ्नाला त्याचा बिमोड करण्यासाठी पाठवले जाते.
असे म्हणतात की इतिहास हा जेत्यांची कथा असते. जेते नेहमीच हारलेल्या लोकांना हीन लेखतात. बाबराने हिंदूंविषयी असेच लिहिले. इंग्रजांनी भारतीयांविषयी असेच लिहिले. आर्यांच्या कथांतून राक्षसांविषयी वाईट लिहिलेले दिसते. आर्यांनी त्यांचा देश व्यापला. त्यांना त्यांच्या निवासातून हुसकावून लावले. त्याचे समर्थन करण्यासाठी त्यांना असंस्कृत ठरविण्यात आले.
रामायणाच्या कथेचा गाभा हा आर्यांचा दंडकारण्यामध्ये प्रसार आणि राक्षसांवर विजय हा आहे.
कुंभकर्ण
महाभारताच्या कथेत राक्षसांना खास स्थान नाही. वनवासात भीमाचे राक्षसकन्येशी – हिडिंबा – लग्न आणि त्यांना झालेला पुत्र – घटोत्कच – हा एक उल्लेख येतो. बकासुराचा वध असा राक्षसांचा दुसरा उल्लेख येतो. महाभारताची मुख्य गोष्ट सप्तसिंधू प्रदेशात घडते. महाभारत काळापूर्वी तेथील मूळ वस्तीला घालवून लावण्यात आले होते हे कारण असावे.
क्षत्रिय भीम आणि राक्षसकन्येचा विवाह त्या काळातील समाजव्यवस्था दाखवितो.
वनवास
दोन्ही गोष्टींत वनवास हा महत्त्वाचा भाग आहे.
पांडव दोन वेळेला वनवास भोगतात. लाक्षागृह घटनेनंतर पांडव स्वत:च वनवासात राहतात. या वनवासाचे कारण समजत नाही. पांडव हस्तिनापुराला परत येऊन दुर्योधनाच्या दुष्कृत्याविषयी बोलू शकले असते. विदुर आणि भीष्म यांना ही गोष्ट माहीत असतेच. पांडवांचा दुसरा वनवास युधिष्ठिराच्या बेजबाबदार वागणुकीने ओढवला जातो. हा वनवास म्हणजे युद्धाची तयारी असते.
पांडवांचा वनवास म्हणजे पूर्वेकडे जाणे. रामाचा वनवास म्हणजे दक्षिणेकडे जाणे.
वडलांच्या इच्छेनुसार रामाचा वनवास चालू होतो. कथानक अशा तऱ्हेने रचले आहे की रामाचा वनवास आर्य संस्कृतीचा दक्षिणेत प्रसार करण्याचा प्रयत्न दिसतो. रामायणात अशा अर्थाचा एक श्लोक आहे. राम वनात जाणे ही शिक्षा मानत नव्हते तर एक संधी म्हणून बघत होते. त्यांनी वनात जाणे म्हणजे दंडकारण्यात जाणे अशी अट होती. दंडकारण्य म्हणजे विंध्याच्या दक्षिणेचा प्रदेश.
आर्य लोक आदिवासींच्या प्रदेशात घुसले आणि त्यांनी जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांना नष्ट करण्याचा चंग बांधला.
जेव्हा वाली आणि रावण यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांची उत्तरक्रिया वैदिक रीतीने राम करवून घेतात.
महाभारतात कुटुंबातील संघर्ष आहे, तर रामायणात दोन संस्कृतीमधील संघर्ष आहे.
राज्य कोणाला – राजा कोण?
दोन्ही कथांच्या मुळाशी हा प्रश्न आहे. रामायणात दशरथानंतर राजा कोण? राम की भरत हा प्रश्न आहे. हा प्रश्न भरत निर्माण करत नाही, त्याची आई निर्माण करते. महाभारतात पण राज्य कोणाचे हा प्रश्न आहे – दुर्योधन की युधिष्ठिर – कोण राजा होणार? अशी कौटुंबिक लढाई युगांपासून चालली आहे. त्यात बरेच वेळा सामान्य भरडले जातात.
कथेचे दोन भाग
दोन्ही कथांत एक जागा अशी येते की तेथून युद्धाचे वेध लागतात.
रामायणात ही जागा येते जेव्हा राम अगस्तींच्या आश्रमात पोचतात. या घटनेपर्यंत वनवासाची अकरा वर्षे झालेली असतात. अगस्ती रामाला सांगतात की येणारा काळ संघर्षाचा आहे. अगस्ती रामाला विशेष शस्त्रे देतात जी अगस्तींना इंद्राकडून मिळाली असतात.
महाभारतात ही जागा येते जेव्हा पांडव वनवासात जातात. वनवासानंतर युद्ध अनिवार्य होणार असते. यासाठी कृष्ण अर्जुनाला इंद्राकडून विशेष शस्त्रे घेऊन येण्यास सांगतात.
कथेचा शेवट युद्धाने
युद्धापूर्वी शांतीचा प्रस्ताव दोन्ही कथांत आहे. रामायणात अंगद शांतिदूत म्हणून रामाकडून शांतीचा संदेश घेऊन जातो.
महाभारतात कृष्ण शांतिप्रस्ताव घेऊन जातो. शांतिप्रस्ताव घेऊन गेलेल्या दूतांचा दोन्ही गोष्टींत अपमान केला जातो आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न होतो. दोन्ही दूत आपली विशेष शक्ती दाखवून निघून जातात.
शांतिदूत कृष्ण - राजा रवि वर्मा
युद्धाने प्रश्न सोडविण्यापेक्षा सामोपचाराने प्रश्न सोडवावेत हा संदेश दोन्ही कथांत आहे.
दोन्ही कथांतून दोन महाकाय राक्षस युद्धात भाग घेतात. ज्या दिवशी ते लढतात त्याच दिवशी ते मारले जातात. हे दोन्ही राक्षस सत्य आणि धर्म यांची मूल्ये जाणणारे आहेत.
घटोत्कच हा भीमाचा राक्षसीपासून झालेला पुत्र. त्याला युद्धाची बातमी उशिरा पोचते. जेव्हा कळते तेव्हा हा पांडवांच्या बाजूने लढण्यास हजर होतो. युद्धात तो कौरव सेनेचा मोठ्या प्रमाणावर संहार चालू करतो. निरुपायाने कर्णाला त्याला मारण्यासाठी अमोघ अस्त्र वापरावे लागते. परंतु ते अस्त्र वापरले गेल्याने अर्जुनाचा जीव सुरक्षित होतो.
कुंभकर्ण हा रावणाचा लहान भाऊ आणि बिभीषणाचा मोठा भाऊ. त्याला युद्धात भाग घेण्यासाठी उठवले जाते. युद्धाचे कारण समजताच तो मोठ्या भावाला – रावणाला – तो अनीतीने वागत आहे हे सांगतो. तरी कुंभकर्ण रावणासाठी युद्धास तयार होतो. युद्धभूमीवर तो लहान भाऊ, बिभीषणास भेटतो. आपला देश आणि कुल यांना सोडून रामास मिळाल्याबद्दल कुंभकर्ण बिभीषणास दोष देतो. कुंभकर्णाचे रावण आणि बिभीषण यांच्याबरोबरचे संवाद जीवन कसे जगावे हे सांगतात. कुंभकर्णाला हे माहीत आहे की तो युद्धात रामाच्या हाती मारला जाणार आहे. सर्व मरण पावलेल्या राक्षसांचे अंत्यसंस्कार करण्यास तो बिभीषणाला सांगतो आणि युद्धात उतरतो. त्याच दिवशी तो मरण पावतो.
दोन्ही कथांचा शेवट युद्धाने होतो. नीतीचा अनीतीविरुद्ध विजय होतो. रामायणात रावण आणि त्याचे सर्व साथीदार आणि सेनापती मारले जातात. रामाचे सर्व साथीदार – लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव, अंगद, जांबुवंत – जिवंत राहतात. बिभीषण युद्धात भाग घेत नाही.
कौरव-पांडव युद्ध - मेवाड शैलीतील चित्र १७-१८वे शतक.
महाभारतात दुर्योधन आणि त्याचे सर्व समर्थक आणि सेनानी मारले जातात. कृपाचार्य कुलगुरू असल्याने त्यांना मारले जात नाही. अश्वत्थामा चिरंजीवी असल्याने मरत नाही. सर्व पांडव जिवंत राहतात. कृष्ण युद्धात भाग घेत नाही.
उत्तर रामायण / उत्तर महाभारत
काही तज्ज्ञांचे असे मत आहे की उत्तर रामायण हे मूळ रामायणाचा भाग नाही. उत्तर रामायणात मथुरा आणि काशी या शहरांचा उल्लेख आहे. ही शहरे वाल्मिकी रामायणात येत नाहीत. वाल्मिकी रामायणात शूद्र असा उल्लेख नाही जो उत्तर रामायणात येतो. उत्तर रामायणात चार प्रमुख घटना आहेत.
- रामाने राज्य करणे, आजही रामराज्याची कल्पना आदर्श म्हणून मान्य केली जाते
- सीतेचा त्याग
- लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या मुलांना स्वत:ची राज्ये मिळणे.
- रामाचे निर्वाण
उत्तर महाभारतात अशा महत्त्वाच्या घटना घडत नाहीत. कृष्ण आणि पांडव यांचा अंत कसा होतो ही प्रमुख घटना उत्तर महाभारतात येते.
दोन नायक : राम आणि कृष्ण
दोन्ही कथांचे नायक राम आणि कृष्ण हे विष्णूचे अवतार मानले जातात.
अवतार ही कल्पना वेदकाळानंतर पुढे आली. खर्या अर्थाने रामायण आणि महाभारत यांच्यामुळे राम आणि कृष्ण यांची गणना अवतारात करण्यात आली. पुराणे रामायण आणि महाभारत यांच्यानंतर, सन १०० ते सन ७००पर्यंत रचली गेली. पुराणांत राम आणि कृष्ण यांना अवतारस्वरूप देण्यात आले. या काळात चंद्रगुप्ताचे साम्राज्य होऊन गेले होते. महाराष्ट्रात सातवाहन आणि राष्ट्र्कुटांची सत्ता होती. पुराणे लिहिली गेली त्या काळात ऐतिहासिक काळाची सुरुवात झाली होती.
भारतीय जनमानसात राम आणि कृष्ण यांचे स्थान देवांचे आहे. रामाचे कुटुंबीय आणि समाज रामाला विष्णूचा अवतार मानतात. राम स्वत:ला साधा मानव म्हणून घेतो. राम नैतिक वागणुकीचे मानदंड तयार करतो. राम हा आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श मित्र आहे. तो आदर्श राजाही आहे.
मुलांच्या जन्मासाठी दशरथाने यज्ञ केला. देवतांनी तेथे येऊन सांगितले की रावण नावाचा राक्षस सर्वांना त्रास देत आहे. त्याच्या निवारणाकरिता विष्णूंनी मानवरूपात जन्म घेण्याचे ठरविले. देवनिर्मित खीर त्यांनी दशरथाला दिली. रामाचा जन्मच रावणाला मारण्यासाठी झाला आहे. कैकयीचे वर आणि वनवास हा गोष्टीचा भाग झाला.
आपल्या मर्जीप्रमाणे जनमत मानायचे की नाही हे राम ठरवताना दिसतो. जेव्हा राम वनवासाला निघतो तेव्हा त्याची नियुक्ती राजा म्हणून झालेली असते. मंत्री सुमंत रामाला हे सांगतात की त्याची प्रजेबाबतही कर्तव्ये आहेत. जनमत हे सांगत असते की त्याने पित्याची आज्ञा न मानता राज्यारोहण करावे. पण जनमताला महत्त्व न देता राम वनात जातो. जेव्हा प्रजा सीतेवर आळ घेत आहे अशी वार्ता रामाच्या कानावर येते तेव्हा जनमताला मानून राम सीतेला बाहेर काढतो.
सुग्रीव-वाली लढाई - ख्मेर मंदिर
वनवासात वालीचा वध झाल्यावर राम वालीच्या पत्नीस सुग्रीवाशी लग्न करण्यास सांगतो. रावणाचा वध झाल्यावर रावणाच्या पत्नीस राम बिभिषणाशी लग्न करण्यास सांगतो. अशा काल्पनिक स्थितीत समजा रामाचा मृत्यू लक्ष्मणाआधी झाला, तर सीतेने लक्ष्मणाशी लग्न करणे योग्य झाले असते का?
लंकेतील युद्धात विजयाचा मोठा वाटा बिभीषणाचा आहे. इंद्रजित अजेय शक्ती मिळविण्यासाठी देवीची पूजा चालू करतो. ही पूजा तोडण्याचे महत्त्व बिभीषण सांगतो. रावणाच्या मृत्यूचे गुपित बिभीषण रामास सांगतो. अस्त्र रावणाच्या बेंबीवर मारले पाहिजे ही माहिती बिभीषण पुरवितो.
महाभारतात हेच काम कृष्ण करतो. प्रत्येक अडचणीच्या वेळी कृष्ण मार्ग सांगतो.
राम आणि कृष्ण यांच्या व्यक्तित्वात मोठा फरक आहे. राम स्वत:ला साधा मानव समजतो. कृष्ण मीच ईश्वर आहे असे मुक्तपणे सांगतो. वेळ आली तर सुदर्शन चक्र काढून अपराध करणाऱ्याला मारायला मागे पुढे पाहत नाही.
राम एकपत्नीव्रत पाळतो, कृष्णाच्या बऱ्याच स्त्रिया आहेत.
नैतिकतेच्या बाबतीत दोन व्यक्ती अगदी निराळ्या आहेत. प्रत्येक क्रिया करताना ती नैतिकतेच्या निकषावर सुलाखूनच मग राम क्रिया करतो. कृष्णाच्या दृष्टीने अंतिम ध्येय नैतिकदृष्ट्या योग्य असेल तर ते प्राप्त करण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबिला तरी चालते. कृष्णाच्या दृष्टीने साधन महत्त्वाचे नाही, साध्यापर्यंत कसेही पोचले तरी चालते.
---
(पुढील भाग)
रामायण आणि महाभारत ही दोनही
रामायण आणि महाभारत ही दोनही महाकाव्ये अतिशय रसाळ आहेत. प्रत्येकाला त्यात काही ना काही गवसतेच. पण या कथा घडल्या तो कालखंड अती प्राचिन आहे. त्या काळातील समाज, पद्धती, नीती, नियम हे सर्वस्वी अनोळखी आहेत. त्यातील घटना, प्रसंगांना वर्तमानकालीन निकष लावणे योग्य नाही. अनेक नाट्यमय प्रसंग, अनेक पिढया आणि त्यातील घटना आणि त्याचे पुढील प्रसंगी मिळालेले संदर्भ हे देखिल एक महत्वाचे साम्य आहे. गुंतलेली अनेक नाती आणि व्यक्ती, काही अती महान तर काही अती नीच व्यक्तीमत्वे दोन्ही कथानकांमधे अढळतात.
दोन्ही कथातील साम्य अगदी त्रोटक स्वरूपात आणि त्यातील काव्य, नाट्य, नवरस इत्यादी वगळून मांडणे खरोखरीच अवघड आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
चिकित्सा
रामायण आणि महाभारत ही दोनही महाकाव्ये अतिशय रसाळ आहेत. प्रत्येकाला त्यात काही ना काही गवसतेच. याच्यात दुमत नाही. मला स्वतःला रामाची काही आदर्शवादी मूल्ये मनापासून आवडतात. महाभारतामुळे किचकट नैतिक प्रश्नाला (कॉम्प्लेक्स एथिकल प्रॉब्लेमला) कशा पद्धतीने हाताळायचे याचे फ्रेमवर्क कळते.
यातल्या कथा या "अती प्राचीन" काळात घडून गेल्या आहेत असे जेव्हा बोलले जाते तेव्हा मतभिन्नता निर्माण होते. मग इतिहासाच्या नजरेतून त्याची चिकित्सा होण्याला पर्याय नाही. कारण तो नेमका काळ कोणता, त्या नेमक्या काळात लेखनकला, वास्तूकला, शिल्पकला कुठे पोहोचल्या होत्या या सारख्या प्रश्नांची उत्तरे देणे भाग पडते.
उदा. मौर्य ते गुप्तकाळ हा भारताच्या प्राचीन इतिहासातला एक महत्त्वाचा काळ आहे. या काळात तुम्हाला शिल्पकला, वास्तूकला, साहित्य याला बहार आलेली दिसते. याच कालखंडात तुम्हाला भास, कालिदास या सारखे प्रतिभावान नाटककार/कवी भेटतात. मिनाक्षी मंदिर, अजंठा-वेलोरा सारख्या सुंदर कोरीव काम केलेल्या लेण्या, मंदिरे दिसतात. भग्ना वस्थेत का होईना, पण अशोकाच्या काळातलेही शिलालेख सापडतात, दगडात कोरलेली शिल्प सापडतात. ही शिल्प घडवण्यासाठी अर्थात जे टूल्स लागतात ती त्याकाळात सुलभ रित्या उपलब्ध असल्याशिवाय असे होणे शक्य नाही. त्याच्या अगोदरच्या काळातले मात्र असे काहीच सापडत नाही. जर महाभारतच्या काळ आर्यन एजचा मॅच्युअर काळ असेल, लिपी पूर्णपणे विकसित झालेली असेल तर अशा लेण्या, शिल्पे, साहित्य फार अगोदरच घडायला हवीत. त्यामुळेच तो काळ नेमका कोणता? त्या काळात नेमकं काय काय होते याची चिकित्सा तर होणारच, त्यावर वेगवेगळ्या अभ्यासकांची वेगवेगळी मते पडणार. आणि त्यातल्या त्यात वाईडली अॅक्सेप्टेड मत ग्राह्य होणार. (जो पर्यंत नवीन संशोधन ते बदलत नाही तो पर्यंत.)