Skip to main content

एल पावो रेआल

गॅब्रिएल गार्सिया मार्केझच्या वाङ्मयावर पीएचडी करणारा अभ्यासक म्हणून महिनाभर बोगोटाला येणं ही माझ्यासाठी मोठी संधी होती, आणि साहसदेखील. मी पहिल्यांदाच परदेशप्रवास केला होता, आणि सेमिनार आणि वर्कशॉप्सबाहेरचं बोगोटा बघायची संधीही बिलकुल सोडली नव्हती.

ट्रिप संपण्यापूर्वीचा शेवटचा वीकेंड म्हणून शुक्रवारी रात्री हॉटेलच्या बारमध्ये पीत बसलो होतो तिथे एकाशी ओळख झाली. गप्पा मार्केझवरून सुरु झाल्या आणि पितापिता नार्कोजवर आल्या.

"नार्कोजमधे दाखवलं तो जुना इतिहास. आता बदललंय सगळं. पण बिझनेस चालूच आहे."

"काहीचरीत काय?" मी कसंबसं विचारलं.

"खरंच. एक डॉन तर जाम इंटरेस्टिंग आहे. अख्ख्या लॅटिन अमेरिकेतला एकमेव इंडियन डॉन. त्याची माहिती फारशी कोणाला नाही, आणि तो कोणाला भेटत नाही. पण माझी ओळख आहे. तुला भेटायचं असेल तर मी घेऊन जातो."

"अरे पण माझी सोमरावी फ्लाईट आहे," मी बोललो, पण टेम्प्ट तर झालो होतोच.

"उद्या सकाळी जाऊ आणि रविवारी सकाळी परत येऊ. अशी संधी पुन्हा मिळणार नाही."

मी एक मिनिट जमेल तेवढा विचार केला. मी इथे कोणाशी पंगे घेतले नव्हते, त्यामुळे मला काही रिस्क नव्हती. बरं, मी स्टुडंट आहे, पैसेवाला नाही हेदेखील इथल्या कलीग्सना माहीत होतं म्हणजे पैशासाठी अपहरण वगैरे व्हायची शक्यता नव्हती. आणि चालत्याबोलत्या डॉनला भेटायची संधी खरंच पुन्हा कधी मिळाली नसती.

"डन. उद्या सकाळी किती वाजता, आणि कसं जायचं?"

दुसऱ्या दिवशी सहा वाजता इंटरकॉम वाजला. पाऊलो अगदी वेळेवर आला होता. मला जरा हँगओव्हर होता, पण कपभर ब्लॅक कॉफी पिऊन निघालो. पाऊलोच्या गाडीत बसलो आणि प्रवासाची सुरुवात झाली.

शहराबाहेर पडलो आणि पाऊलो म्हणाला, "आता तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधावी लागेल. तुला रस्ता कळता कामा नये असा एल पावो रेआलचा आदेश आहे."

"ठीक आहे," मी म्हणालो. आता जे जे होईल ते ते पाहावे - किंवा डोळ्यांवर पट्टी बांधल्याने पाहू नये - हाच पर्याय होता.

पाऊलोने पट्टी बांधली, आणि मी डॉन कसा असेल याचं मन:चक्षूंमध्ये चित्रण करू लागलो. एकमेव इंडियन डॉन - म्हणजे नेटिव्ह अमेरिकन पोशाख असेल का नॉर्मल वेस्टर्न कपडे असतील, सोम्ब्रेरो घालत असेल का, सिगार ओढत असेल का, दाढी असेल का, इत्यादी इत्यादी.

दोनेक तासांच्या प्रवासानंतर गाडी थांबली. दोन तास हे कसं कळलं, तर गाडीतल्या रेडियोवरच्या बातम्यांमधून. पाऊलोने डोळ्यांवरची पट्टी काढली, आणि डोळे किलकिले करत मी आजूबाजूला बघू लागलो.

समोर प्रशस्त बंगला होता. बाहेर मोठा गझीबो होता, तिथे वेताच्या टेबल-खुर्च्या होत्या. पाऊलोने मला तिथे बसवलं आणि तो बंगल्यात गायब झाला. मी आता टेन्स झालो होतो - एल पावो रेआल कसा असेल, त्याच्याशी मी जुजबी स्पॅनिशमध्ये कसा बोलणार वगैरे प्रश्न पडू लागले.

दहा मिनिटं अशीच गेली. मग बंगल्यातून एक मध्यमवयीन इसम बाहेर आला आणि चालत इथेच येऊ लागला. मी उठून उभा राहिलो आणि स्पॅनिशमध्ये गुडमॉर्निंग घालायची मनात उजळणी करू लागलो. एल पावो रेआल तसा साधाच वाटला. रापलेला वर्ण. थोडे पिकू लागलेले काळे केस. काळी पॅण्ट, पांढरा बुशशर्ट, क्लीन-शेव्हन. गॉगल वगैरे नव्हता, पण पनामा हॅटची सावली त्याच्या डोळ्यांवर पडली होती. नाव एल पावो रेआल - म्हणजे पीकॉक - असलं तरी माणूस बिलकुल रंगीन वाटत नव्हता.

एल पावो रेआल गझीबोत आला. मी अदबीने म्हणालो, "ब्युनोस डियास, डॉन एल पावो रेआल." त्याने उजव्या हाताने थांब अशी खूण केली, एका खुर्चीवर बसला, आणि पनामा हॅट कॉफी टेबलवर म्हणाला, "नमस्कार, तुम्हाला भेटून आनंद झाला."

आता, पाऊलो आणि माझं स्पॅन्गलीशमध्ये झालेलं संभाषण मी मराठीत टाईप केलंय. पण एल पावो रेआल ऍक्चुअली मराठीतच बोलत होता. मी हबकलो.

"सॉरी, आपलं - लो सीएन्तो, आपलं - माफ करा, डॉन एल पावो रेआल."

एल पावो रेआल हसला. "माफी कशाला मागताय? मला मराठी येतं याची तुम्हाला पूर्वकल्पना नव्हती, मग तुम्ही भांबावणं स्वाभाविकच आहे. काही काळजी करू नका. आपण न्याहारी करू आणि खाद्यपेयांचा आस्वाद घेत गप्पा मारू. चालेल ना?"

मी कशीबशी मान डोलावली. पाऊलोचा काहीतरी एलॅबोरेट प्रॅन्क असणार असं मला वाटू लागलं होतं.

गणवेशातले दोन वेटर ब्रेकफास्टच्या ट्रॉल्या ढकलत आले. "साबुदाण्याची खिचडी, थालीपीठ, आणि चहा. इथली स्थानिक फळं आहेतच. घ्या ना, अनमान करू नका," एल पावो रेआल म्हणाला, आणि मी पडत्या फळाची आज्ञा म्हणून प्लेटमध्ये एक थालीपीठ घेऊन खाऊ लागलो.

"मला पाऊलोने सांगितली, तुम्ही मुंबईतून आलात ते. कसा वाटला आमचा कोलंबिया? प्रवासवर्णन लिहायचा विचार आहे का?" एल पावो रेआलने विचारले.

"कोलंबिया सुंदरच आहे. पण प्रवासवर्णन वगैरे लिहिणार नाही. पीएचडीचा थिसीस लिहायलाच वेळ द्यावा लागेल." मी थालीपिठाचा तुकडा तोडत उत्तर दिलं. "पण तुम्ही मराठी कसं बोलता? 'शांताराम' लिहिणाऱ्या ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्ससारखं तुम्हीही मुंबईत राहिला होता का?"

एल पावो रेआल हसला. "मी मूळचा महाराष्ट्रातलाच. पेट्रोकेमिकल अभियंता झालो, आणि एकदोन वर्षं इराणच्या आखातात काम केल्यावर व्हेनेझुएलामध्ये माराकाईबो या ठिकाणी काम करू लागलो. काही वर्षं काम करून भारतात परतायचा मानस होता. पण प्राक्तनात काय असतं हे आपल्याला ठाऊक नसतं. गदिमांनी लिहिलं आहे ना - पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, तसा प्रकार. कोलंबियात आलो, अंमली पदार्थांच्या व्यवसायात कार्यरत झालो, आणि हळूहळू साम्राज्य प्रस्थापित केलं."

"आणि हे नाव - एल पावो रेआल? द पीकॉक?"

"माझं नाव मयूर महाबळेश्वरकर. हे नाव उच्चारणं इथल्या सहकाऱ्यांना जमत नव्हतं, त्यामुळे कोणीतरी गूगल ट्रान्सलेट हे आंतरजालीय संकेतस्थळ वापरून स्वैर भावानुवाद केला, आणि एल पावो रेआल हे नाव प्रचलित झालं."

मी अवाक झालो होतो.

"चहा घ्या ना. धारोष्ण दुधाचा आहे, अगदी अमृततुल्यतुल्य!" महाबळेश्वरकर म्हणाले.

"हो सर, घेतो, थँक्स," मी एवढंच बोलू शकलो.

चहा पिताना मी विचार करत होतो. आता आलोच आहोत तर काहीतरी बोलायला हवं.

"सर, एक विचारू का? तुमच्याबद्दल फारशी कोणाला माहिती नसते; असं का?"

"त्याचं काय आहे, इथे पूर्वापारपासून कार्यरत असणारे जे गट होते, त्यांना आपल्या व्यवसायात उपरा कोणी आलेलं फारसं रुचलं नाही. त्यांच्या नाकावर टिच्चून मी व्यवसायात आगेकूच केली, परंतु इथली वर्तमानपत्रं, आकाशवाणी, आणि दूरचित्रवाणी हे त्यांच्या अंमलाखाली असल्यामुळे माझा कुठे उल्लेखही होऊ नये अशी तजवीज माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी केली."

"काय सांगताय काय?"

"अहो खरंच सांगतोय. आता पाब्लोचे - म्हणजे एस्कोबारचे - पाणघोडे या किश्श्याबद्दल लोक अजूनही आनंदाने चर्चा करतात. पण मी पाळलेल्या एकशिंगी गेंड्यांच्या कळपाबद्दल कोणाला माहितीही नसते. तरुणपणी अशी तीव्र सणक डोक्यात जायची ना!"

"आणि आता?"

"मला हळूहळू साक्षात्कार झाला, की माध्यमांमध्ये माझा उल्लेख नसणं ही इष्टापत्ती आहे. मी शांतपणे माझ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकतो. तसाही मी लहानपणापासून प्रसिद्धीपराङ्मुख. आपण बरं आणि आपलं काम बरं - कशाला हवी माध्यमांची वक्रदृष्टी?"

"पण मग मला भेटीची संधी कशी दिलीत? म्हणजे, मी मनापासून आभारी आहे, पण कुतूहल म्हणून विचारतोय." मी लगेच खुलासा केला.

महाबळेश्वरकरांनी स्मितहास्य केलं. "मराठीभाषिक मनुष्य कोलंबियात आलाय हे कळल्यावर मीच हस्तकांकरवी तुमची माहिती काढली आणि पाऊलोला तुम्हाला भेटायला पाठवलं. त्यानं सांगितल्यावर तुम्ही मला भेटायला याला अशी माझी अटकळ होती, आणि ती खरी ठरली. माणसांची पारख आहे मला!"

मी प्रचंड कन्फ्यूज झालो होतो. "पण का?"

महाबळेश्वरकरांनी सुस्कारा सोडला. "परमेश्वराच्या कृपेने माझ्याकडे बरंच काही आहे. व्यवसाय चांगला चाललाय, स्थावरजंगम मालमत्ता आहे, एकशिंगी गेंड्यांचा कळप आहे, पण मातृभाषेत बोलायला कोणी नाही. परमेश्वरानेच तुम्हाला पाठवलं. आता तुमच्यासोबत रोज कलाशास्त्रविनोदाची चर्चा करता येईल. मोठी मौज येईल."

"अहो पण मला परवा भारतात जायचंय! माझा व्हिसा संपत आलाय. त्यानंतर कोलंबियात राहिलो तर ते बेकायदेशीर असेल." मी सुचेल तो बोलू लागलो.

"तुम्ही कसलीही काळजी करू नका. भारतीय दूतावासात माझ्या हस्तकाला पाठवून तुमच्या व्हिसाची मुदत वाढवण्याची तजवीज मी करतो. हवं तर मंत्र्यांशी दस्तुरखुद्द बोलून तुम्हाला कोलंबियाचं नागरिकत्व देववतो, मग प्रश्नच सुटला."

"म्हणजे तुम्ही मला कैदी म्हणून ठेवणार? धाकदपटशा दाखवून?" मी विचारलं. असं विचारण्याचे परिणाम काय होतील हे ठाऊक नव्हतं, पण त्या क्षणी एवढा विचार केला नाही.

महाबळेश्वरकर हसले. " कैदी? धाकदपटशा? बिलकुल नाही. मी तुम्हाला म्हटलं ना - मला माणसांची चांगली पारख करता येते. तुमच्यासारख्या महत्वाकांक्षी तरुणाला नवीनवी आव्हानं आणि संपत्ती या दोनच गोष्टी हव्या असतात. इतर सर्व दुय्यम असतं, बरोबर ना?"

मी काही क्षण विचार करून मान डोलावली. "पण त्यासाठी मला माझं करियर करावं लागेल ना!"

"मी बालपणी बरंच बालवाङ्मय वाचायचो. त्या कथांमध्ये एखादा कठीण पण पूर्ण करणाऱ्या कथानायकाला राजा आपलं अर्ध राज्य देत असे. मथितार्थ असा, की इथे राहा, माझ्या व्यवसायाच्या क्ऌप्ती शिकून घ्या, पुढे व्यवसायाची धुरा वाहा. नवीनवी आव्हानं आणि संपत्ती तुमच्या पायाशी लोळण घेतील. अट एकच - माझ्याशी शुद्ध मराठीत बोलायचं."

"आणि मी नकार दिला तर?"

"पाऊलो तुम्हाला बोगोटाला सोडेल. मला दुसरा एखादा होतकरू तरुण यथावकाश गवसेलच, तुम्ही मात्र करंट्यासारखे ही संधी दवडाल."

मी आवंढा गिळला. "मला तुमची ऑफर कबूल आहे."

महाबळेश्वरकर हसले, आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. "माझी ऑफर नाही - माझा प्रस्ताव!"

Node read time
6 minutes

ललित लेखनाचा प्रकार

6 minutes

'न'वी बाजू Sat, 25/11/2023 - 17:28

:-)

एकच शंका: भारतीय दूतावास कोलोंबियन व्हिसाची मुदत कधीपासून वाढवू लागला?

(की हे लिहितेवेळी काल रात्रीची अद्याप उतरलेली नव्हती?)

(‘काहीचरीत काय?’, ‘सोमरावी फ्लाईट आहे’ वगैरेंवरून अंदाज आला होताच, म्हणा. थोडक्यात, Whatever it is that he had been drinking, I want that!!!)

देवदत्त Sun, 26/11/2023 - 09:07

In reply to by 'न'वी बाजू

"मी"ची उतरली होती. महाबळेश्वरकरांची (किंवा लेखकाची) उतरली नसावी.

'न'वी बाजू Sun, 03/12/2023 - 21:09

In reply to by देवदत्त

पण… महाबळेश्वरकर पीत नाहीत, असे उत्तरार्धात म्हटले आहे ना?

देवदत्त Sun, 03/12/2023 - 22:20

In reply to by 'न'वी बाजू

... असं महाबळेश्वरकर म्हणाले. त्यांच्यावर विश्वास ठेवावा का?

'न'वी बाजू Sat, 25/11/2023 - 19:54

"चहा घ्या ना. धारोष्ण दुधाचा आहे, अगदी अमृततुल्यतुल्य!"

हा चहा बायेनीचान्स ‘ते इंदु’ (‘té hindú’) ब्रँडचा असावा काय?

कोलोंबियातला सर्वाधिक खपाचा चहाचा स्थानिक ब्रँड आहे, म्हणे. (लोगोदेखील छानपैकी जेठा मारून बसलेला कोणी अनामिक हिंदू स्वामी आहे. (स्वामीजींचे मुंडके हे काहीसे सरदारजींच्या मुंडक्यासारखे दिसते, तेवढा भाग सोडून द्या.)) हा ब्रँड कदाचित महाबळेश्वरकरांनी स्थापिला असावा काय?

अधिक तपासाअंती, या ब्रँडच्या मुख्यालयाचा पत्ता Calle 15 No 31A-33 Bodega 2 Centro Industrial Palmaseca Acopi-Yumbo CALI, COLOMBIA असा आढळला. म्हणजे, (हा ब्रँड महाबळेश्वरकरांनी स्थापिला, असे गृहीत धरल्यास) महाबळेश्वरकर हे Cali cartelचे सन्माननीय सदस्य असावेत काय?

देवदत्त Sun, 26/11/2023 - 09:08

In reply to by 'न'वी बाजू

स्थानिक ब्रॅन्डचा चहा नसावा. आसाममधून गेंडे आयात करणारा इसम त्याच कन्साईनमेन्टमध्ये चहादेखील आयात करत असेल.

'न'वी बाजू Sun, 26/11/2023 - 23:01

In reply to by देवदत्त

...आसाममधून चहा आयात करणारा इसम तो विकून त्याचा मोठा धंदाही करू शकतो. तेवढेच फ्रंट ऑर्गनायझेशन...

(आता, 'मराठी माणूस, आणि धंदा? हॅहॅहॅ!' असे कृपया म्हणू नका!)

'न'वी बाजू Sat, 25/11/2023 - 20:18

¿स्पॅनिशभाषक कोलोंबियन मनुष्याचे नाव ‘पाउलो’ कसे असू शकेल? (¿‘पाब्लो’ असायला हवे ना?)

'न'वी बाजू Sun, 26/11/2023 - 22:22

In reply to by देवदत्त

...इतक्या दुरून आणण्याची गरज नाही. ब्राझीलवरून आणला तर?

(तसेही, इटालियन इमिग्रंट हा 'पाओलो' असू शकेल. 'पाउलो' पोर्तुगीज वाटतो.)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 30/11/2023 - 05:12

देवदत्त हा अंमळ वेडा इसम आहे! :ड

'न'वी बाजू Thu, 30/11/2023 - 07:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Understatement of the millennium.

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 01:59

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)