सोसायटीमधल्या तरुणांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये असं काल आम्ही सोसायटीच्या मीटिंग मध्ये ठरवलं. एक तर व्हॅलेंटाईन हा तमाशा आपला नाही. ती परक्यांची थेरे. आपली प्रभुरामाची भूमी. सीतामाईने नाही म्हंटले प्रभूंना 'व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करूया.' इथे या असल्या गोष्टी खपवून घेणार नाही. समाजाचे पावित्र्य आपणच जपायला हवे. आपल्या परीने आपण समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, हाच आमचा विचार. पाचव्या मजल्यावरील ठाकरे सेक्रेटरी आहेत. त्यांना म्हंटलं, सरळ एक पत्रक छापूया. आणि डकवूया लिफ्ट जवळ. वाटलं तर लिफ्ट मध्ये, एवढंच काय प्रत्येकाच्या घरी जाऊन देऊया. मी स्वतः डीटीपीवाल्या कडून छापून आणायला तयार आहे. ' कोण वाचणार ?' असं त्यांचं म्हणणं. मी म्हटलं, 'हल्लीची मुलं पत्रक नाही वाचणार पण तेच व्हॉट्सअँप मेसेज म्हणून आलं तर काय चॉईस आहे का साल्यांसमोर ? दिवसरात्र थोबाड मोबाईल मध्येच असतं यांचं.'
मीच एक मेसेज बनवून ग्रुप वर पाठवावा असं सर्वानुमते ठरलं. मला कल्पना होतीच की हे काम मलाच करावे लागणार. शेवटी कुणाला तरी अंधारातील ज्योत व्हावेच लागते.
मी सरळ एक पत्रक.. सॉरी मेसेज बनवला.
तरुणमित्रांनो, या वॅलेंटाईन्स डे ला पुढील गोष्टी आचरणात आणा आणि एक जबाबदार आणि प्रगल्भ नागरिक होण्याचे पुण्यकर्म करा.
१. आय लव यू म्हणू नका. प्रत्येक आय लव यू ची जागा जय श्रीरामाने घेतली पाहिजे.
२. प्रेयसी अथवा प्रियकराला चॉकलेट देणे बंद करा. चॉकलेट ही आपली संस्कृती नाही. प्रेम व्यक्त करायला ना नाही आमची. चॉकलेट ऐवजी तिळाची वडी अथवा लाडू द्यावा. तिळात स्नेह आहे. आत्ताच संक्रांत होऊन गेली आहे त्यामुळे तिळवड्या सापडण्यास कष्ट पडणार नाहीत.
३. व्हॅलेंटाईन डे च्या पार्ट्या बंद झाल्या पाहिजेत. तुम्हाला दिवस साजरा करायचाय ना? मग त्याऐवजी स्नेहसंमेलन घडवून आणा. यावर्षी उशीर झाला असला तरी पुढच्या वर्षी दिवाळीपासूनच तयारीला लागा.
४. दारू पिऊन सेलिब्रेट करणे पूर्णपणे बंद झाले पाहिजे. तरुणवर्गाने कोकम सरबताचा पर्याय लक्षात घ्यावा. (कोकम सरबत लाल असते. मला स्वतःचा अभिमान आणि कौतुक वाटले !)
५. गुलाबांबद्दल आमचे काही म्हणणे नाही. ते चालू द्या तुमचे. आम्ही, म्हंणजे आमची पिढी कायमच ओपन माईंडेड राहिली आहे, हे मी इथे नमूद करू इच्छितो.
६. मुद्दा ३ मधल्या स्नेहसंमेलनाची जबाबदारी घेण्यासाठी तरुणवर्गाने पुढे यावे. या वेळी गाण्याच्या भेंड्या खेळण्यास आमची ना नाही. आम्ही सगळ्याच नवीन गोष्टींचा तिरस्कार करणाऱ्यातले नाही. उलट आम्ही प्रोत्साहनच देऊ.
७. विसविशीत आणि जाडजूड टेडी बिअर देऊन प्रेयसीची दिशाभूल करू नका. फिट अँड फाईन असणे हीच काळाची गरज आहे. या रविवारपासून सकाळी ५.३० वाजता मी स्वतः गच्चीवर योगासने शिकवण्यास सुरुवात करीत आहे. या बहुमोल संधीचा फायदा घ्या. उदंड प्रतिसाद अपेक्षित. प्रवेश मूल्य रुपये ५३० फक्त. ( टेडी बिअरच्या किमतीपेक्षा खूपच कमी!)
हा मेसेज मी ग्रुपवरच्या सर्वांना पाठवला. आमच्या हिच्या म्हणण्यानुसार या तरुण मुलांचा वेगळा ग्रुप आहे. हिला बऱ्या माहित असतात असल्या गोष्टी. मला इतका वेळच नसतो.
१४ फेब्रुवारीच्या सकाळी गजाननाने सकाळीच सुनेला ओठांवर चुंबन दिलेले बघितले. म्हणजे मी बघत नव्हतो. दारे उघडी ठेऊन करायचे कशाला असले धंदे? ही म्हणते ते दोघे रोजच घरातून निघतांना असंच करतात. ही कसली आली आहे निरोपाची पद्धत .. नात सकाळीच बाहेर पडली . रात्री उशीर होईल म्हणाली. ती अजून सोसायटीच्या वॉट्सअप ग्रुप वर नाही... माझ्या मताचा ती अनादर करणार नाही.
पुढच्या १४ फेब्रुवारीला सोसायटी मध्ये कोकम सरबताच्या बाटल्या आणि तिळवड्या यांचा स्टॉल लावता येतो का ते बघतो. उद्याच ठाकरेंशी बोलतो.
तिळवड्या हार्ट शेप मध्ये करता येतील का?.. हिला विचारायला हवं.
नरेंद्र बरवे
व्हॉट्सॅप विद्यापीठाचे कुलगुरू
व्हॉट्सॅप विद्यापीठाचे कुलगुरू बरवे इथे ऐसीसारख्या ओसाडवाडीत काय करत आहेत?
त्यांचा मेसेज कुणीतरी वाचावा
त्यांचा मेसेज कुणीतरी वाचावा ह्या अपेक्षेने आले असतील इकडे!
चूक
अपेक्षा करणं चुकीचं नसतं . चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं . - नरेंद्र बरवे
व्यक्तिस्वातंत्र्य
व्यक्तिस्वातंत्र्य. कुणीही, कधीही, कुठेही, कसंही जाऊ शकतं
अडला हरी ..
अडला हरी ..
शंका
हार्ट-शेप्ड तिळाच्या वड्या करण्यासाठी हार्ट-शेप्ड तीळ कोठून आणायचे?
(कोठल्या दुकानात मिळतात?)
वाण्याकडे
वाण्याकडे मिळू शकतील. नाही मिळाले तर कळवा. मी नॉर्मल तिळाला हार्ट शेप कसा द्यायचा ते कळवू शकते. सध्या कामात थोडी व्यस्त आहे त्यामुळे पहिले वाण्याकडे चेक करा.
गूळ पाडण्याचा क्षीण प्रयत्न नाही केला?
तुम्ही गुळाच्या पोळीचा आकार बदामासारखा करायचा, असं का म्हणाला नाहीत याबद्दल कुतूहल वाटतं.
कारण बदाम म्हंटलं की लोकांना
कारण बदाम म्हंटलं की लोकांना खाण्याचा बदामही आठवू शकतो.
विचार केला जाईल
पुढच्या वेळेस याचा विचार केला जाईल.
पुढच्या वर्षीच्या वड्याच्या
पुढच्या वर्षीच्या वड्याच्या पॅकिंगवर आकर्षक चित्र टाकायला विसरू नका.
दोन फुलं एकमेकांत गुंतलेली. पूर्वी हिंदी सिनेमाची शुटिंग आरे छोटा काश्मिर गोरेगावला होत असे. त्या वेळच्या सेन्सॉरला भावणारे ओठांवर चुंबन प्रतिक म्हणून दोन फुले वापरत. आकर्षक सूचक मार्केटिंग हवं. मह्याकडे ( इथे लेख असतात) फक्कड आइडिया असतात.
छान
पुढील वर्षी सार्वजनिक पने . किसींग ,आणि ....... स्पर्धा व्हॅलेंटाईन डे दिवशी घ्या.
सह कुटुंब सह परिवार हजर राहावे असे आग्रहाचे आमंत्रण सर्वांना ध्या.
बघुया किती लोक उदार मतवादी आहेत.
गुलाब
बाकी सर्व सूचना योग्य आहेतच, फक्त गुलाबाऐवजी झेंडूची फुले द्यावीत असा एक बदल सुचवतो. (गूगलच्या मते गुलाब हे फूल "इथले" नाही)
+
अगदी!
अहो, ‘गुलाब’ (गुल + आब) हे नावच मुळात यावनी आहे.
(त्याऐवजी झेंडू तरी द्या, नाहीतर मग गुलाबच जर द्यायचा असेल, तर त्याचे ‘शुद्धीकरण’ तरी करा — ‘जलपुष्प’ म्हणा त्याला!)
(परंतु अर्थात, साबूदाण्याची खिचडी खाऊन एकादशी करणाऱ्यांकडून अपेक्षा तरी किती करणार?)
प्रमाणलेखन पोलिस!
साबुदाणा.
.
साबूदाणा.
(आणि, पोलीस.)
प्रमाणलेखनात मी तुम्हाला हार जाणार नाही.
दीर्घ
साबूदाणा मधल्या दीर्घ बू मध्ये बगावतकी बू आ रही है .
गुलाबाच्या पाच वन्य जाती जगात
गुलाबाच्या पाच वन्य जाती जगात आहेत.
अमेरिका, युरोप, इराण,चीन आणि भारतात हिमालयात आहेत. या सर्व जातींना सुगंध असतो आणि फळे येतात.
हिमाचलमध्ये स्थानिक झाड पंधरा फुट उंच वाढते. फूल आपले आहेच.
लांब दांड्याचे देठाचे , सुगंध हरवलेले गुलाब हे संकरित (cultiver) आहेत