नेमेचि येतो ऑस्कर सोहळा (भाग २)
(भाग पहिला इथे.)
डॉक्युमेंटरी हा आपल्याकडे बराचसा दुर्लक्षित राहिलेला प्रकार आहे. कदाचित अमेरिकेतही तो दुर्लक्षित असावा, आणि त्यामुळे इतर ऑस्कर पुरस्कारांसाठी ज्या प्रमाणात (आणि जितके पैसे टाकून) लॉबिंग चालतं तितकं ते डॉक्युमेंटरीसाठी होत नाही. आणि म्हणूनच काही उत्कृष्ट डॉक्युमेंटरीज पुरस्काराच्याही धनी होऊ शकतात. सनडान्स चित्रपट महोत्सवात आधी गाजलेली, पुतिनविरोधक ॲलेक्सी नाव्हाल्नीवरची डॉक्युमेंटरी गेल्या वर्षी विजेती ठरली होती. ह्या वर्षीही सनडान्समध्ये गाजलेली रशियाविरोधी डॉक्युमेंटरी ऑस्करविजेती ठरली. ‘२० डेज इन मारियूपोल’मध्ये यूक्रेनमधल्या मारियूपोल ह्या गावावरचं रशियन आक्रमण ‘असोसिएटेड प्रेस’च्या एका पुलित्झर पुरस्कारप्राप्त वार्ताहरानं चित्रित केलं आहे. फेब्रुवारी ते मे २०२२ दरम्यान चाललेल्या ह्या आक्रमणात वीसेक हजार यूक्रेनियन लोक मारले गेले असावेत असा अंदाज आहे. टीव्हीवर बातम्यांत जे दाखवणं बऱ्याचदा टाळलं जातं ती हिंसा आणि तिचे भयावह परिणाम ह्यात दाखवले आहेत (उदा. मेलेल्यांच्या आप्तस्वकीयांचा आक्रोश, सामूहिक दफन, आणि नंतर दैनंदिन जीवनातल्या वस्तू मिळेनाशा झाल्यावर गावातल्याच लोकांनी अखेरचा उपाय म्हणून केलेली लुटालूट). त्यामुळे मन घट्ट करूनच पाहायची ही फिल्म आहे. त्यातलं वास्तव सुन्न करणारं आहे. रशियाचं क्रौर्य जगासमोर आणण्याचं श्रेय तिला मिळायला हवंच होतं. यूक्रेनला मिळालेलं हे पहिलंवहिलं ऑस्कर आहे असा उल्लेख दिग्दर्शकानं पुरस्कार स्वीकारताना केला. खरं तर ही डॉक्युमेंटरी बनवायची वेळच माझ्यावर आली नसती तर बरं झालं असतं असंही तो म्हणाला (म्हणजे अर्थात रशियानं यूक्रेनवर आक्रमण केलंच नसतं तर). आणि पुढे : “Cinema forms memories and memories form history.” एकीकडे यूक्रेनला आर्थिक मदतीसाठीचं बिल अमेरिकन लोकप्रतिनिधी पास होऊ देत नाहीत, तर दुसरीकडे ह्या फिल्मला ऑस्कर मिळतं, हे आजचं वास्तव आहे. अमेरिकेत ही बहुधा पीबीएस आणि प्राइम व्हिडिओवर असावी, पण भारतात ती अधिकृतरीत्या उपलब्ध नाही. (तशी तर गेल्या वर्षीची विजेती ‘नाव्हाल्नी’ही नाही.) भारतात काही फिल्म फेस्टिव्हल्समध्ये मात्र ‘२० डेज इन मारियूपोल’ दाखवली गेली. ट्रेलर इथे.
दर वर्षी काही फिल्म्स खास ऑस्कर गळाला लागावं ह्याचसाठी बनवल्या जातात. कधी त्यांना यश मिळतं तर कधी अपयश. ह्या वर्षी काही बायोपिक्स अशा अपयशी ठरल्या. त्यांत सोफिया कोपोलाची ‘प्रिसिला’ सर्वाधिक अपयशी म्हणावी लागेल. ‘एल्व्हिस अँड मी’ ह्या प्रिसिला प्रेस्लेच्या आत्मचरित्रावर ही आधारित आहे. स्वतः प्रिसिला त्याची सहनिर्माती आहे. एल्व्हिसच्या छायेत जगणं मान्य नसलेल्या प्रिसिलाची ही कहाणी आहे. फिल्म तशी देखणी आणि निगुतीनं केलेली आहे. पोशाख आणि प्रॉडक्शन डिझाईनसारख्या गोष्टी उल्लेखनीय आहेत, पण शॉर्ट फिल्मचा ऐवज घेऊन फीचर फिल्म केल्यासारखी वाटत राहते. व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल हल्ली बऱ्याचदा कुणाला ऑस्करवारी घडेल ह्याची पूर्वसूचना देतं. तिथं प्रिसिलाच्या भूमिकेसाठी केली स्पेनीला पुरस्कार मिळाला. इतरही काही नामांकनं मिळाली, पण एकही ऑस्कर नामांकन मिळालं नाही. भारतात ‘प्रिसिला’ मुबीवर पाहता येईल. ट्रेलर इथे.
अशीच अपयशी ठरलेली ‘रस्टिन’ पाहण्याजोगी आहे. बायोपिकचा विषय म्हणून बायर्ड रस्टिन ह्या अमेरिकन सिव्हिल राईट्स चळवळीतल्या कार्यकर्त्याचं चरित्र खूपच सुरस आहे. १९६३ साली वॉशिंग्टन डीसीमध्ये आपल्या हक्कांसाठी लाखोंचा समुदाय जमला होता. तिथेच मार्टिन ल्यूथर किंग ज्यु. यांनी आपलं विख्यात ‘आय हॅव अ ड्रीम’ भाषण केलं. (अधिक माहितीसाठी पाहा March on Washington) ही संकल्पना आणि त्याचं संयोजन रस्टिनचं होतं. काळ्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्यात तो होताच, पण ज्या काळात समलैंगिकतेला सामाजिक स्वीकार नव्हता त्या काळात तो आपली समलैंगिकता लपवतही नव्हता. कदाचित त्यामुळेच सिव्हिल राईट्स चळवळीतलं त्याचं योगदान तुलनेनं दुर्लक्षित राहिलं असावं. किंबहुना सिव्हिल राईट्स चळवळीतल्या लोकांचे मातीचे पायही त्यामुळे दिसले. फिल्मसाठी वापरलेलं संगीत चांगलं आहे, तो काळ उभा करण्यासाठी कष्ट घेतले आहेत, अभिनय चांगला आहे, अशा अनेक कारणांसाठी ‘रस्टिन’ अधिक लोकांनी पाहायला हवी. अर्थात, फिल्ममध्ये उणिवाही आहेत. गोष्ट तशी रोचक असली तरीही काहीशा सरळसोट, ठोकळेबाज पद्धतीनं सांगितलेली असल्यामुळे की काय, पण ऑस्करवर ही फिल्म फारशी छाप पाडू शकली नाही. काळ्या लोकांची गोष्ट, अमेरिकन इतिहासातल्या एका महत्त्वाच्या घटनेवर आधारित, आणि नायकाची समलैंगिकता हादेखील एक प्रमुख विषय हे सगळं असूनही फिल्मला त्याची मदत झाली नाही. खुद्द बाराक आणि मिशेल ओबामा फिल्मचे सहनिर्माते आहेत, तरीही. केवळ कोलमन डोमिंगोला अभिनयासाठीचं ऑस्कर नामांकन मिळालं. ही नेटफ्लिक्सची निर्मिती आहे, त्यामुळे तिथे ती पाहता येईल. ट्रेलर इथे.
ब्रॅडली कूपर दिग्दर्शित आणि अभिनीत ‘माएस्ट्रो’ हीही अशीच एक अपयशी बायोपिक. लेओनार्ड बर्नस्टाईन या अमेरिकन संगीतकाराच्या आयुष्यावर ती आधारित आहे. हा एक बराच काळ अडकलेला प्रकल्प होता. मार्टिन स्कोरसीसीला ती दिग्दर्शित करण्यात मुळात रस होता. काही काळ स्टीव्हन स्पीलबर्गलाही रस होता. अखेर स्पीलबर्ग आणि नेटफ्लिक्सची ही सहनिर्मिती दिग्दर्शित करण्यासाठी ब्रॅडली कूपरचं नाव पुढे आलं. त्यानं त्यासाठी काही वर्षं ध्यास घेऊन कसा अभ्यास केला वगैरे पुष्कळ प्रसिद्धीवजा ऐवज गाजवला गेला. अगदी त्याच्या नाकाच्या प्रोस्थेटिकलाही गाजवलं गेलं. पण ते सर्व बाजूला ठेवलं तर लेओनार्ड बर्नस्टाईन या व्यक्तीत असलेले अनेक विरोधाभास, त्याचे स्वतःशी लढे, त्याचं वैवाहिक जीवन आणि त्याची उर्जा, कलेच्या ध्यासापोटी इतर गोष्टींवर आणि व्यक्तींवर अन्याय, अशा अनेक गोष्टींना चित्रपट (आणि कूपरचा अभिनय) समोर आणतो. कॅरी मलिगननं त्याच्या पत्नीच्या भूमिकेत जीव ओतला आहे. बर्नस्टाईनचं संगीतही बऱ्यापैकी ऐकू येतं. मात्र, बर्नस्टाईनच्या वैवाहिक आयुष्यावर आणि त्याच्या आयुष्यातल्या पुरुषांवर जास्त वेळ घालवला आहे, आणि त्या मानानं संगीतावर कमी वेळ घालवला आहे असा आक्षेप मात्र घेतला गेला. पुरस्कार मिळवण्यात अपयशी ठरला असला, तरीही ‘माएस्ट्रो’ एकदा पाहण्यासारखा आहे. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या टॉप टेन यादीत समाविष्ट. नेटफ्लिक्सवर उपलब्ध. ट्रेलर इथे.
ह्या झाल्या ऑस्करकडे डोळा ठेवून केलेल्या पण अपयशी ठरलेल्या काही फिल्म्स. पण एका फिल्मला मात्र अनपेक्षित यश मिळालं. यॉर्गोस लँथिमोस हा ग्रीक दिग्दर्शक कारकिर्दीची सुरुवातीची काही वर्षं ग्रीक चित्रपट करत होता. हेतुपुरस्सर धक्कादायक, व्यवस्थेच्या चौकटी मोडणारे ते चित्रपट विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये गाजत होते. यथावकाश त्यानं हॉलिवूडमधले परिचित अभिनेते घेऊन तिथल्या मुख्य प्रवाहात उठून दिसतील असे चित्रपट करायला सुरुवात केली. त्याचा एक कल्ट आधीच निर्माण झाला होता, तो आता आणखी वाढला. ॲलॅस्डेअर ग्रेच्या कादंबरीवर आधारित ‘पुअर थिंग्ज’ ह्या त्याच्या फिल्मची गोष्ट फ्रँकेन्स्टाईनच्या गोष्टीची अगदी स्पष्टपणे आठवण करून देते. यातला मानवनिर्मित ‘जीव’ म्हणजे एका मृत स्त्रीच्या देहात एका नवजात अर्भकाचा मेंदू घातलेली स्त्री आहे. तिचा देह उफाड्याचा आहे, तर मेंदू लहान मुलाचा. आणि हे सगळं घडतंय व्हिक्टोरियन काळातल्या ‘पोलाइट सोसायटी’त. लँथिमोस यातून एक मॅडकॅप साहसकथा सादर करतो. लहान मुलाचा मेंदू पूर्वग्रहदूषित नसल्यामुळे ती स्त्रीही त्या काळातल्या स्त्रियांची नैतिकता आणि रीतभात यांसारखी ओझी बाळगत नाही. त्यातून ती नवनव्या कल्पना आणि नवनवे अनुभव घेण्यासाठी सदैव सज्ज राहते आणि त्यातून प्रगल्भ होत जाते. विशुद्ध शारीर प्रेरणा पूर्ण केल्या तर मिळणारा आनंद तिला हवासा वाटतो. पण मग जीवनविषयक तत्त्वज्ञानाची भूकही तिच्यात जागी होते. अखेर स्वातंत्र्याची सवय करून घेऊन ती जगाकडे एका पूर्ण वेगळ्या नजरेनं बघू लागते. रोमँटिसिझमनं प्रेरित हा तिचा प्रवास भोवळ आणणारा आहे आणि त्यासाठी लँथिमोस अनेक चित्रपटीय क्लृप्त्या आणि धक्कादायक तंत्रं वापरतो. हे कथानक अजिबात वास्तववादी नसल्याने आणि मूळ प्रेरणा फ्रँकेन्स्टाईनच्या गोष्टीची असल्याने ज्याला ‘गॉथिक हॉरर’ म्हटलं जातं त्या शैलीचा पुरेपूर वापर चित्रपटात केलेला आहे. शिवाय ह्यातल्या स्त्रीच्या जगाकडे बघण्याच्या मोकळ्याढाकळ्या नजरियातून तिच्या आसपासच्या पुरुषांना जो त्रास होतो त्यातून विनोदनिर्मितीही होते. त्याच्या भव्य दिमाखदार सेट्समुळे आणि कॅमेऱ्याच्या क्लृप्त्यांमुळे हा खरं तर मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा चित्रपट आहे. अर्थात, इथे हेही लक्षात घ्यायला हवं की एकदा कथानक कुठे चाललं आहे हे लक्षात आलं की पुढचा प्रवास कंटाळवाणा वाटू शकतो. किंबहुना, छोटासा आशय निव्वळ चलाख संवाद आणि दिपवून टाकणारी दृश्यात्मकता यांतून मोठा भासवण्याचा प्रयत्न यात आहे अशी टीकाही झालेली आहे, आणि ती अगदीच अस्थानी नाही. शिवाय, एमा स्टोन चित्रपटाची सहनिर्माती आहे आणि प्रमुख भूमिकेतही ती स्वतः आहे. थोडक्यात, ‘पुअर थिंग्ज’ हा केवळ ऑस्करकडे डोळा ठेवूनच केलेला नाही, तर एमा स्टोननं स्वतःसाठीच निर्माण केलेला आहे. त्यामुळे तिला यात पूर्ण वाव आहे. त्याचं फळ तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या ऑस्कर पुरस्काराद्वारे मिळालं. खरं सांगायचं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकित इतर अभिनेत्रींनी अधिक गुंतागुंतीच्या भूमिका साकारल्या आहेत आणि त्यात त्यांच्या अभिनयाचा अधिक कस लागलेला आहे. त्यातच, सर्चलाईट पिक्चर्स ही डिस्नीच्या मालकीची कंपनीही सहनिर्माती आहे. ऑस्करचा कारखाना असल्यासारखी ही कंपनी काम करते (उदा. २००९पासून पाच वेळा त्यांच्या निर्मितीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर आहे. बाकी पुरस्कार वेगळेच.) अर्थातच सर्चलाईट लॉबिंगवर प्रचंड कष्ट घेते आणि खर्चही करते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ह्या वर्षी ‘पुअर थिंग्ज’मधून त्यांना घबाडच मिळालं. आधी व्हेनिस चित्रपट महोत्सवातला सर्वोच्च पुरस्कार (गोल्डन लायन), नंतर गोल्डन ग्लोब, बाफ्टा ते ऑस्कर. अर्थात, एमा स्टोनचा पुरस्कार वगळता बाकी ऑस्कर पुरस्कार वेशभूषा, मेकप, प्रॉडक्शन डिझाईन, म्हणजेच चित्रपटाच्या ‘दिसण्याशी’ संबंधित आहेत, हे लक्षात घेण्याजोगं. ॲपल टीव्हीवर उपलब्ध. ट्रेलर इथे.