सिंधू सरस्वती संस्कृती (भाग १)

सिंधू सरस्वती संस्कृती – भाग १

सुधीर भिडे

विषयाला सुरुवात करण्याआधी भारतातील मानव वस्तीचा घटनाक्रम पाहू . भारतात एक लाख वर्षांपासून मनुष्य वस्ती आहे. उत्क्रांतीतून हे पहिले मनुष्य प्राणी इथेच बनले की बाहेरून आले या संबंधी काही सांगता येत नाही. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतील जास्त प्रगत मानव प्राणी भारतात पोचला. या प्रजातीने सबंध भारतखंड व्यापले. दहा हजार वर्षापूर्वी येथे मानव शेती करू लागला. आठ हजार ते चार हजार वर्षापूर्वी – या चार हजार वर्षात सिंधू सरस्वती संस्कृती उदयास आली. त्यानंतर आर्यांचे आगमन झाले.

किती वर्षांपूर्वी घटना
१००,००० भारतातील प्राचीन मानवी प्रजाती ज्यांचे मूळ माहीत नाही
६५,००० आफ्रिकेतील प्रगत मानव भारतात पोचला. भारतीय लोकांवर त्याची छाप DNAमध्ये दिसते
२०,००० आफ्रिकेतील प्रगत मानव भारतीय उपखंडात पसरला.
१०,००० भारतीय उपखंडात शेतीची सुरुवात
७००० सिंधू सरस्वती संस्कृतीचा उदय
४००० सिंधू सरस्वती संस्कृतीचा शेवट आणि आर्यांचे आगमन, भारतीय लोकांवर त्याची छाप DNAमध्ये दिसते
३००० शेवटचे आर्य आले

सिंधू सरस्वती संस्कृती आणि Indus Valley Civilization

१८५६ साली इंग्रजांनी सिंध प्रांतात रेल्वेची लाइन टाकणे चालू केले. त्या भागात रुळाखाली टाकण्यास दगड मिळत नसल्याने आजूबाजूच्या गावात मिळणार्‍या जुन्या विटा त्यांनी रुळाखाली टाकण्यास सुरुवात केली. जेव्हा हजारोंनी विटा मिळू लागल्या तेव्हा इंजिनीयरला संशय आला. चौकशी करता असे समजले की या विटा फार जुन्या बांधकामातील आहेत. मग १९२० साली पुरातत्त्ववेत्त्यांनी उत्खनन चालू केले. साधारण १९२५ च्या सुमारास ब्रिटिश आर्किओलोजिस्टनी (पुरातत्त्ववेत्त्यांनी) सिंधू संस्कृतीचा शोध लावला. त्यानंतर जगभर ही संस्कृती Indus Valley Civilization म्हणून प्रसिद्ध झाली. याचे कारण शोध लागलेली दोन्ही स्थळे – मोहेंजोदारो आणि हडप्पा ही सिंधू नदीच्या काठी होती. मूळ शोधानंतर गेल्या शंभर वर्षात पाकिस्तानात आणि भारतात उत्खनन झाले. या उत्खननातून दोन सत्ये बाहेर आली.

या संस्कृतीचा विकास जास्त आधीपासून सुरू झाला होता .
ही संस्कृती सध्याच्या भारतात सरस्वती नदीकाठी मोठ्या प्रमाणावर विस्तारली होती.

नवीन माहितीप्रमाणे या संस्कृतीच्या विकासाचे सहा कालखंड विचारात घेतले जातात –

आद्य नवाश्म युग - (इ स पू ७५००–६०००) – अफगाणिस्तान पाकिस्तानच्या सीमेवर छोट्या वस्त्या आणि शेतीचे पुरावे मिळाले. मातीची घरे बांधली जात. विटांचे तंत्र विकसित झाले नव्हते.
उत्तर नवाश्म युग – इ स पू (६०००–५०००) – मातीच्या भांड्यांचा उपयोग सुरू झाला. मृतांची दफने सापडली.
टोगो संस्कृती – (इ स पू ४५००–३८००) – कोणी निराळ्या वंशाचे नवीन लोक या भागात आले. हे लोक इराणमधून आले असावेत. हे लोक मूळ रहिवाश्यांपेक्षा जास्त प्रगत होते. विटांची घरे बांधली जात. कुंभाराचे चाक वापरात आले. त्यामुळे घाटदार मातीची भांडी वापरात आली.
हाक्रा संस्कृती – इ स पू (३८००–३२००) – लोक पूर्वेकडे सरस्वतीच्या खोऱ्यात पोचले. वस्ती मोठ्या आकाराच्या खेड्यात राहत असे.
आद्य सिंधू – (इ स पू ३२००–२६००) – या काळात शहरे नव्हती . गावांना तटबंदी असे. काही गावे आगीने भस्मसात झालेली आढळली
नागरी सिंधू – (इ स पू २६०० – २०००) – मोठाली शहरे सिंधू आणि सरस्वतीच्या खोऱ्यात वसवली गेली. पश्चिम आशियाशी व्यापारास सुरुवात झाली. सोन्याचे अलंकार बनविण्यास सुरुवात झाली. सिंधू सरस्वती संस्कृतीचा हा सुवर्ण काल होता.
उत्तर सिंधू – (इ स पू २००० – १६००) – वातावरणातील बदलांमुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय आर्किओलोजिस्टना सिंधू नदीच्या बाजूला काम करणे शक्य नव्हते. त्यांनी भारतात शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांना गुजरातपासून हरियाणापर्यंत अनेक प्राचीन वस्ती असलेली स्थळे मिळाली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व प्राचीन शहरात Indus Valley Civilization मध्ये साम्य दिसून आले. इतकेच नाही तर ढोलाविरासारख्या प्राचीन शहरांची रचना हडप्पाच्या आधी झाली असावी असे वाटते. ही सर्व प्राचीन शहरे त्या काळात अस्तित्वात असलेल्या सरस्वती नदीच्या बाजूला आहेत असे ध्यानात आले.

सरस्वती नदी
सरस्वती नदीच्या अस्तित्वाबद्दल दोन लेखांचा संदर्भ घेतला आहे. पहिले संशोधन इस्रोद्वारा करण्यात आले
RIVER SARASWATI: AN INTEGRATED STUDY BASED ON REMOTE SENSING & GIS TECHNIQUES WITH GROUND INFORMATION. Prepared By Regional Remote Sensing Centre (RRSC-W) NRSC / ISRO, Department of Space, Govt. of India CAZRI Campus, Jodhpur – 342003, November, 2014
या संशोधनात उपग्रहाद्वारा केलेले चित्रीकरण, जमिनीखालील पाण्याच्या स्रोतांचा अभ्यास आणि त्या ठिकाणांचा रेडीओमेट्रिक डेटा याचा वापर करून अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावरून असे दिसते की सरस्वती नदी २८००० वर्षापासून ३००० बी सी पर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर हिमालयात झालेल्या भूकंपामुळे नदीला मिळणारा पाणीपुरवठा थांबला आणि नदी आटून गेली.
दुसरा अभ्यास आय आय टी, खरगपूर, डेक्कन कॉलेज , पुणे आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद यांच्यातर्फे करण्यात आला. (Hindustan Times, NewDelhi, By Anonna Dutt, ४/१/२०२०)
या अभ्यासाप्रमाणे साधारण २००० बी सीला भयंकर दुष्काळ आला. हा दुष्काळ २५० वर्षे चालू होता आणि सरस्वती नदी आटून वाळवंटात विलीन पावली.
हे दोन अभ्यास नदी नाहीशी होण्याची निराळी कारणे देतात पण निष्कर्ष एकच आहे – नदी ३००० बी सी पर्यंत अस्तित्वात होती.


Sindhu Saraswati

या संस्कृतीची आतापर्यंत १४०० ठिकाणे अभ्यासली गेली आहेत. त्या पैकी भारतात ९२५ स्थळे आहेत. या १४०० स्थळांपैकी सर्वात मोठी जागा राखीगढी येथे सापडली आहे . या सर्व शोधांच्या नंतर खरे म्हणजे या संस्कृतीस सिंधू सरस्वती संस्कृती असेच म्हटले पाहिजे. पण आपले पश्चिमधार्जिणे अभ्यासक अजूनही IVC असाच शब्दप्रयोग करतात. सिंधू सरस्वती संस्कृती २ दशलक्ष चौरस मैल एवढ्या मोठ्या भूभागावर पसरली होती. या संस्कृतीचा काल ५५०० ते १५०० ख्रिस्तपूर्व असा ४००० वर्षे होता. या संस्कृतीत न कोणी राजा होता न सैन्य होते. या संस्कृतीतील २/३ स्थळे भारतात सरस्वती नदीकाठी होती. आपण सिंधू सरस्वती संस्कृतीचा नकाशा पाहू. नकाशात लोथल आणि धोलाविराची जागा चुकीची दाखविली आहे.


Sindhu Saraswati

लोथल आणि ढोलाविरा याच्या जागा विचारात घेण्यासारख्या आहेत. लोथल हे एक मोठे बंदर होते. आज लोथल समुद्रापासून ६० किलोमीटर दूर आहे. ढोलाविरा कच्छच्या रणात आहे. ६००० वर्षापूर्वी ही दोन्ही शहरे समुद्राजवळ होती. कच्छ हे एक बेट होते. समुद्राची उंची आजच्यापेक्षा खूपच जास्त होती.

विषयाची मांडणी सहा भागात केली आहे. पहिल्या दोन भागात आपण सरस्वती संस्कृतीचे हरयाणा (राखीगढी), राजस्थान (कालीबंगण)आणि गुजराथमधील ढोलाविरा, लोथल, या ठिकाणी काय अवशेष मिळाले ते पाहू. तिसर्‍या भागात दक्षिण भारताचा या संस्कृतीशी काही संबंध होता का याचा विचार करू
चवथ्या आणि पाचव्या भागात आपण या संस्कृतीच्या धर्माचा विचार करू.

शेवटच्या भागात हे सिंधू सरस्वती संस्कृतीचे लोक कोण होते, आर्य कोण आणि आपण भारतवासी कोण याचा मानववंशशास्त्रदृष्ट्या विचार करू.

आपण सिंधू सरस्वती संस्कृतीमधील भारतातील स्थळांचा विचार करणार आहोत. आपण मोहेंजोदारो आणि हडप्पा यांचा विचार करणार नाही. कारण आपण ह्या अवशेषांबाबत वाचलेले असते. नवीन संशोधनामध्ये भारतात त्या काळातील शहरे सापडली आहेत. त्याचा आपण विचार करू. या जागांची नावे उत्खननाच्या जागेजवळच्या खेड्यांची आहेत . त्या काळात या जागांची काय नावे होती हे माहीत नाही.

हरियाणा आणि राजस्थानमधील स्थळे
राखीगढी
हरियाणामध्ये राखीगढी गावाजवळ सिंधू सरस्वती संस्कृतीचे अवशेष फार मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत. हे गाव दिल्लीपासून १५० किमी अंतरावर वायव्येकडे आहे. हे स्थान जुन्या सरस्वती नदीच्या किनार्‍याशी आहे. ५५० हेक्टरवर पसरलेले हे स्थान मोहेंजोदारो आणि हडप्पापेक्षा मोठे आहे. इथे सापडलेले अवशेष मोहेंजोदारो आणि हडप्पा यापेक्षा जास्त जुने आणि जास्त मोठ्या प्रमाणावर आहेत. गेले १० वर्षे इथे काम चालू असून अजून २० वर्षे काम चालू राहील एवढी मोठी ही वस्ती असावी. कार्बन डेटिंगवरून येथील वस्तीचा आरंभ आठ हजार वर्षापूर्वी झाला असा अंदाज आहे.

त्या काळच्या इतर शहरात आहे त्याप्रमाणे राखीगढीमध्ये पण सांडपाण्याची व्यवस्था प्रत्येक घरात आढळते. भाजलेल्या मातीची खेळणी सापडली. त्या शिवाय हिरेजडित सुवर्ण अलंकार बनविण्याच्या जागा मिळाल्या. तांबे आणि ब्राँझच्या वस्तू उत्खननात मिळाल्या. धान्य साठविण्यासाठी एक गोदाम मिळाले.

सर्वात महत्त्वाची मिळालेली माहिती म्हणजे दफनभूमी. दफन केलेल्या सर्व मृतांचे डोके उत्तरेकडे होते. राखीगढीजवळ जे मृतांचे अवशेष मिळाले आहेत ते ४५०० वर्षे जुने आहेत. मृताच्या बरोबर मातीची भांडी पुरलेली मिळाली. मृताच्या पुढच्या प्रवासासाठी त्यात धान्य ठेवले जात असावे. मृतांच्या DNA टेस्टिंगवरून हे सिद्ध झाले की यांचा डीएनए मागून आलेल्या आर्यांपेक्षा निराळा आहे. त्यांच्या चेहेर्‍याचे कॉम्प्युटर ने मॉडेलिंग केले. त्यावरून हे लोक चित्रात दाखविल्याप्रमाणे दिसत असावेत.


Sindhu Saraswati

राखीगढी येथे एक पुरुष आणि स्त्री एका वेळी पुरले गेल्याची कबर मिळाली आहे. सांगाड्यात पुरुषाचे डोके स्त्रीकडे वळलेले दिसते.


Sindhu Saraswati

भिराना / भिर्दाना

भिराना ही जागा दिल्लीच्या नैऋत्येला २०० किमी अंतरावर आहे. या जागेपासून आता लुप्त झालेली सरस्वती नदी वहात असावी असा अंदाज आहे. या जागेवर हाक्रा संस्कृती – इ स पू ३८००-३२०० – काळातील अवशेष मिळाले आहेत. अवशेषात एक तांब्याची बांगडी आणि तांब्याचे बाणाचे टोक मिळाले आहे.


Indus Valley Civilization

सर्वात विशेष म्हणजे मातीच्या भांड्यावर कोरलेले एका नर्तिकेचे चित्र मिळाले आहे . मोहेन्जोदारोत जी नाच करणाऱ्या मुलीची ब्राँझमधील प्रतिमा मिळाली आहे, हुबेहूब तशाच मुद्रेत हे कोरलेले चित्र आहे. ५०० कि मी दूर दोन वस्त्यांत तशीच प्रतिमा का मिळावी? याचा काही धार्मिक संबंध असावा का? याचबरोबर चाक असलेली खेळणी मिळाली आहेत. याचा अर्थ ५००० वर्षांपूर्वी या लोकांना चाकाचा उपयोग माहीत होता.


Indus Valley Civilization

Indus Valley Civilization

उत्खननात जी घरे मिळाली आहेत त्यात तीन चार खोल्या होत्या. एका खोलीत चूल मिळाली आहे. याचा अर्थ ही संस्कृती झोपडीपेक्षा जास्त प्रगत झालेली होती. उत्खननात गुरांची हाडे मिळाली आहेत. याचा अर्थ हे लोक पशुपालन करीत होते.

काली बंगण
कालीबंगण बिकानेरच्या जवळ राजस्थानात आहे. हा भाग घग्गर नदीजवळ येतो. ह्या नदीचा सरस्वती नदीशी संबंध आहे असे भूजलशास्त्रज्ञांना वाटते.


Sindhu Saraswati

३४ वर्षाच्या उत्खननांनंतर २००३ साली शास्त्रज्ञांनी या ७००० वर्षापूर्वीच्या वस्तीविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला. पाच हजार वर्षापूवीचे एक नांगरलेले शेत शास्त्रज्ञांनी शोधून काढले.


Sindhu Saraswati

याशिवाय अग्निपूजेचे काही चौथरे मिळाले जे चौथरे मोहेंजोदारो आणि हडप्पा या ठिकाणी मिळाले नाहीत.


Sindhu Saraswati

शहरापासून ५०० मीटर अंतरावर मृतदेह पुरण्याची जागा मिळाली.

रेडियो कार्बन डेटिंगवरून असा निष्कर्ष काढण्यात आला की ४७०० वर्षापूर्वी येथील वस्ती नाहीशी झाली. याचे कारण सरस्वती नदी आटून गेली.
कालीबंगण येथील संस्कृतीचा संबंध सिंधू सरस्वती संस्कृतीशी तिथे सापडलेल्या शिक्क्यावरून आणि टेराकोटाच्या भांड्यावरून सिद्ध होतो.


Sindhu Saraswati

Sindhu Saraswati

बाणावली
बाणावली हे स्थळ कालीबंगण पासून जवळ आहे

बाणावली येथील वस्ती २६०० ते १७०० बी सी काळात होती असे कार्बन डेटींगवरून निश्चित करण्यात आले आहे. येथील वस्तीचे तीन भाग दिसतात -
हडप्पा पूर्व – २६०० ते २४०० बी सी
हडप्पा काल - २४०० ते १९०० बी सी
हडप्पा नंतर १९०० ते १७०० बी सी

हडप्पा पूर्व – २६०० ते २४०० बी सी
या काळात आखणी केलेली नगर रचना आढळून येते. घरे विटांची बनविली होती. मातीची भांडी सोप्या आकाराची होती. निरनिराळ्या प्रकारचे मणी आणि बांगड्या मिळाल्या. काही तांब्याच्या वस्तूही सापडल्या.

हडप्पा काल - २४०० ते १९०० बी सी


Sindhu Saraswati

नगररचनेमध्ये एक सुसूत्रता दिसते. नगराचे भाग केलेले दिसतात. नगराभोवती एक तटबंदी दिसते.

मातीच्या भांड्यांवर नक्षीकाम आढळून येते. निरनिराळ्या कामासाठी निराळ्या आकाराची भांडी दिसतात. शेतीच्या नांगराच्या आकाराचे खेळणे मिळाले. या वरून नांगराचा वापर करून शेती होत असे. वजनाच्या मोजमापाची सील्स मिळाली. याशिवाय हस्तिदंती बांगड्या आणि मणी मिळाले. मासे पकडण्यासाठी तांब्याचा हुक मिळाला.


Sindhu Saraswati

हडप्पा नंतर १९०० ते १७०० बी सी
भांड्याची गुणवत्ता सुधारली दिसते. भांडी बळकट दिसतात त्यावरून भांडी भट्टीतून गरम केलेली दिसतात. भांड्यांवर तेलकट चकाकी दिसते. भांड्यांवर काढलेली चित्रे कालीबंगण येथील भांड्यांवर काढल्यासारखी आहेत. त्यावरून दोन गावात ये-जा असावी. घोड्यासारख्या दिसणाऱ्या प्राण्याचे चित्र आढळले, यावरून आर्यांचे आगमन या काळात सुरू झालेले होते असे म्हणता येईल, कारण घोडा हा प्राणी आर्यांबरोबर भारतात आला असे समजले जाते.

(पुढील भाग)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पहिल्या नकाशात यमुना ही नदी (सतलजद्वारे) सरस्वती या (आता नामशेष) नदीची उपनदी असल्याचे दाखविले आहे, तर सरस्वती ही नदी (सिंधू नदी अरबी समुद्रास जेथे मिळते त्या ठिकाणाच्या थोड्याच पूर्वेस) (हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील) अरबी समुद्रास जाऊन मिळताना दाखविली आहे.

आजमितीस काय परिस्थिती आहे?

- सरस्वती ही नदी अस्तित्वात नाही.

- सतलज ही नदी चिनाबमार्गे सिंधूस मिळते.

इथवर ठीकच आहे. म्हणजे, नद्यांचे प्रवाहमार्ग थोडेफार बदलत जातात, त्या परिप्रेक्ष्यात इतक्या हजार वर्षांत इतके बदल हे फारसे आश्चर्यजनक नसावेत.

मात्र,

- यमुना ही नदी आपला प्रवाहमार्ग पूर्णपणे बदलून, आजमितीस पूर्वेकडील (आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या) गंगेद्वारे (हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱ्यावरील) बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.

हा अगदी १८० अंशांचा नाही तरी volte face आहे.

(अर्थात, यालाही कारणे असतीलच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सर्व शोधांच्या नंतर खरे म्हणजे या संस्कृतीस सिंधू सरस्वती संस्कृती असेच म्हटले पाहिजे. पण आपले पश्चिमधार्जिणे अभ्यासक अजूनही IVC असाच शब्दप्रयोग करतात.

एका एरवी (निदान सकृद्दर्शनी तरी) चांगल्या लेखाला या गालबोटाची आवश्यकता होतीच का?

(अतिअवांतर: 'हिंदी महासागर' या शब्दप्रयोगास पाकिस्तान्यांचा असाच काही आक्षेप आहे, असे समजते. अर्थात, पाकिस्तानी काय किंवा आपण काय, शेवटी एकाच हाडाची माणसे; त्यांच्या नि आपल्या ॲटिट्यूड्ज़मध्ये मूलभूत फरक हा नसायचाच. फक्त, प्रतिबिंबेच जणू एकमेकांची! चालायचेच.)

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाच्या सुरवातीच्या आकड्यांत काहीतरी गोलमाल आहे. एक लाख वर्षांपूर्वी भारतात मनुष्यवस्ती होती असं म्हटलं आहे. वादासाठी ते गृहीत धरू. पण ५० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून आलेले मानव जास्त ‘प्रगत’ होते म्हणजे नक्की काय? आणि आधीपासूनचे मानव मधल्या ५० हजार वर्षांत प्रगत (म्हणजे उत्क्रांत?) न होता तसेच राहिले होते का? हे शंकास्पद वाटतं. (भारतातल्या लोकांवर स्थितिवादी असल्याचा आरोप होतो, पण हे फारच झालं.)

त्यापुढच्या तक्त्यात आफ्रिकेतले प्रगत मानव ६५ हजार वर्षांपूर्वी आले असा वेगळाच आकडा आहे. आणि ते उपखंडात पसरले मात्र २० हजार वर्षांपूर्वी. म्हणजे मधली ४५ हजार वर्षं खैबरखिंडीजवळच्या खेडेगावात वस्ती करून बसून होते का? प्रगत असतील तर इतके गतिशून्य का होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

साधारण इ.पू. ५ लाख ते इ. पू. ५० हजार हा अश्मयुगातला (Palaeolithic - Lower , Middle & Upper - 5L BC to 10K BC) सर्वात जुना आणि प्रदीर्घ कालखंड आहे (Lower Palaeolithic). या कालखंडात वातावरण अतिथंड होते (आईस एज) त्यामुळे या कालावधीत "माणूस प्राणी" हा फक्त शिकार आणि साठवणूकच करत होता. त्यामुळे आगीचा शोध वगळता फारसे काही शोध लागले गेले नाही. त्यामुळे "विकास" झाला नाही केवळ भारतातच नाही तर इतरत्रही. या कालावधीतल्या भारतातल्या साईट म्हणजे बेलन व्हॅली, सोना व्हॅली इ. तसेच आंध्रातल्या कर्नूल येथे राखेचे अवशेष सापडले आहेत. सेपिअन्सच्या अगोदरच्या प्रजातीचा एक जीवाश्म नर्मदा व्हॅलीजवळ सापडला आहे (नर्मदा मॅन). त्यामुळे निआंड्रथल सारखे हे पण संपले असावेत का? काही कल्पना नाही. बर्‍याचशा साईट या फॅक्टरी साईट्स आहेत ज्यात अश्मयुगीन हत्यारे सापडतात. १८५३ मध्ये रॉबर्ट ब्रुस फुट यांना दक्षिण भारतात सर्वप्रथम अशी हत्यारे भारतात सापडली.

त्यानंतरच्या मध्य अश्मयुगात (Mesolithic - 10K BC to 4K BC) वातावरण थोडे उष्ण झाल्यावर थोड्याफार शेत पिकाची ओळख झाली असावी. नर्मदा व्हॅलीच्या आसपास या साईट्स आहेत.

त्यानंतर आलेल्या नवाश्मयुगात Neolithic (Age 7K BC to 1K BC) पशुपालनाचे पुरावे आढळू लागतात. थोड्याफार धान्याची ओळख आहे असे पुरावे येतात (गहू, जव, तांदूळ याचे पुरावे सापडतात). धान्य, दूध साठवण्यासाठी पॉटरीची गरज लागली असावी त्यामुळे त्याचे पुरावे सापडतात. नंतर चाकाचा शोध लागल्यावर चाकावर बनवलेल्या पॉटरीचे अवशेष मिळतात. भटकेपण जाऊन स्थावरता आली असावी. मातीच्या घरांचे पुरावेही आढळतात. समाज, समाजाचे नियम, निसर्ग देवता याची जाणीवही याच कालावधीत झाली असावी. उदा. महेरगड (पाकिस्तान बोलन घाट जवळ) ही इ.पू. ७००० च्या आसपासची माझ्यामते नवाश्मयुगातली सगळ्यात जुनी साईट आहे. कर्नाटकातले हलूर, पिकलीहाल येथे पशुपालनाचे पुरावे सापडतात.

इ.पू. १८००च्या अगोदर तांब्याचा शोध भारतात लागला असण्याची शक्यता कमी आहे. या ताम्र युगात (Chalcolithic Age not older than 1800 BC) सिंधू-सरस्वती संस्कृती वा आयव्हीसी (*) च्या खेरीज अगदी महाराष्ट्रात जोरवे संस्कृती, मध्यप्रदेशातली माळवा संस्कृती येते. जी आयव्हीसी पासून वेगळी दिसते. महाराष्ट्रात दायमाबाद, इनामगाव येथे जे अवशेष सापडले त्यावरून तिथल्या लोकांना तांबे तर माहीत असावे पण ते फारसे उपयोगातही नसावे. आयव्हीसी मधल्या लोकांसारखे बेसिक (चित्रलिपी) का होईना पण लेखन कला अवगत नव्हती. पुरण्याच्या प्रथा पण वेगळ्या होत्या. घरातच किंवा घराजवळ मातीच्या भांड्यात पुरले जात होते. वेगळी अशी स्मशानभूमी नव्हती.

(*) अगदी आजच्या एनसीईआरटीच्या पुस्तकातही आयव्हीसी हाच शब्दप्रयोग आहे. पण जुने एनसीईआरटीचे पुस्तक खूप चांगले होते त्यातही आयव्हीसी हाच शब्दप्रयोग आहे. पण कुठल्याही नजरेने ते मला पाश्चिमात्य धार्जिणे वाटत नाही. उलट आजच्या एनसीईआरटीच्या (बारावी इतिहास) पुस्तकातला बराचसा भाग गाळला आहे. खास करून आर्य काल पूर्वार्ध-उत्तरार्ध, आणि आयव्हीसी मधला पशुपती-प्रोटोशिवा म्हणजेच आताचा शंकर तर नाही ना? वा घोडा असू शकतो का? असे जे तज्ज्ञांमध्ये एकमत नसलेले मुद्दे संदिग्धपणे घुसडवलेले दिसतात. आक्षेप असला तर इथे असायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निष्कर्ष कसे काढले जातात?.कोणत्या विश्वासू संस्था संशोधन करतात ,कोणत्या जग मान्य विश्वासू संस्था त्या मान्य करतात.
ही माहिती वाचायला आवडेल.

. भूतकाळात काळात घडून गेलेल्या प्रसंगाचे फक्त अंदाज असतात ते सत्य नसतात.
लोकांना पंजोबाचे नाव माहीत नसते १०० वर्षा पूर्वी च

विविध परिमाण वरून फक्त अंदाज असतो .
आणि ते परिमाण योग्य आहे की अयोग्य हे कोणी तपासात नाही.
पुरातन काळातील सर्व निष्कर्ष ,शोध ह्यांच्या कडे फक्त अंदाज म्हणून च बघा..
पुढे वेगळा अंदाज आला की पहिला अंदाज संशयाच्या. भोवऱ्यात अडकतो.
म्हणून.
सत्य च आहे असे समजू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0