चटका-२

चटका-१

मी नरेन. संयुक्ताचा नवरा. अंहं संयुक्ताचा नवरा हा माझ्या ओळखीचा एक भाग हवा खरं तर. पण तो तसा न रहाता, माझे आयुष्य व्यापून, तो दशांगुळे वरती उरलेला आहे.
खरं तर असा मी पूर्वी नव्हतो. माझी स्वतःची एक ओळख होती. कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये रमणारा नरेन, गिटारच्या क्लासला जाणारा नरेन, खवैय्या नरेन आणि होय स्वप्ने पहाणाराही. ही ओळख होउन १० वर्षे तरी लोटली. त्या प्रसंगानंतर ती ओळख कणाकणाने खिरत गेली, विरत गेली. १८ वर्षांचा होतो मी. माझ्या मित्राकडे जायला , उत्साहाने निघालो होतो. संध्याकाळच्या साडेसात, पावणेआठ वाजता. खरं तर आई म्हणत होती, "नरेन रात्र झालेली आहे. आज जाऊ नकोस. उद्या जा" पण आईचं त्या वयात कोणी तरी ऐकतं का. मी रस्त्याने चालत निघालो. डिसेंबरची थंडी पुण्यात पडलेली होती. स्वेटर मध्ये सुद्धा गार वारा बोचत होता. हे काय शिंदे छत्रीपासून ते वानवडी फार फार तर मैलभर अंतर. त्या वयात, उत्साहाला उधाण असते तेव्हा मला थोडीच जाणवणार तो गारठा, ते बोचरे वारे! हां रस्त्यावर अगदी तुरळक गर्दी तीही वाहनांची. बाकी चिटपाखरु नव्हते. अर्थात कॅन्टॉनमेन्ट भागात हे नवीन नव्हतेच. उजवीकडे कबरस्तान आणि वड-चिंचेची झाडे. ते मात्र हृदयात धडकी भरवणारे. मी झपाझप चालायचा प्रयत्न करत एकीकडे मनात राम राम चालूच.
अचानक समोरच्या बाजूने एक मोटरसायकलवरुन २ जण आले काय आणि माझ्यापुढे येउन उभे राहीले काय. सगळच बावचळवणारं आणि भितीदायक. दोघेही आडदांड ...दोघांनी मला पकडुन ... फरफटवत .... कबरस्तानमधील चिंचेमागे ....... आयुष्य उध्वस्त करायला १० मिनीटही पुरेशी असतात नाही का! निव्वळ शरम आणि स्वतःबद्दल घृणा, चीड, ....... आईबाबांना कोणत्या तोंडाने सांगणार, पोलिस कम्प्लेन्ट केली तरी कोणी विश्वास ठेवेल का वर नाचक्की?
नंतरची किती तरी वर्षे, आत्महत्येचे विचार मनात घोळत राहीले. नाही हिंमत नाही झाली पण आयुष्य कोळपूनच गेले. अभ्यासावर, प्रकृतीवर परिणाम. हे माझ्याच बाबतीत का घडलं? का असा ' हिट- अँड - रन' अन्याय माझ्याबरोबरच व्हावा. दु:स्वप्ने,नाईटमेअर्स संपेनात. रात्री घशाला कोरड पडे, घशाचे स्नायू आवळले जात. आपणच भ्याड होतो, आहोत. आय डिझर्व धिस!! धीर करुन कोणा एका मित्राला सांगायचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा तोच भेदरला. कोणाला सांगू नकोस येड्या म्हणाला. कदाचित तुझ्या मनाचे खेळ आहेत म्हणाला. असेल बाबा ... असेल. माझ्या मनाचेच .... मात्र तेव्हापासून एक विकृत विचित्र चित्र डोळ्यासमोर येउ लागले. कधी जर संप्रेरकांनी, शरीराने मागणी केली तरी कल्पनेमध्ये आकर्षक स्त्री न येता ते गुंड ..... असो!! माझे टर्न ऑन व्हायचे ट्रिगर्सच मेस अप झाले. त्यातून माझ्या मनात इन जनरल टर्न ऑन होण्याबद्दल तीव्र घॄणा आणि संताप निर्माण होत गेला. सगळं विकृत आहे जाणतो मी. पण सांगणार कोणाला? आई-बाबा तर लग्न कर म्हणु लागलेले - त्यांना टाळायचे कसे? शेवटी लग्न केले खरे पण मनावर भीतीचा, शरमेचा धोंडा होताच.
कदाचित तिला, माझ्या बायकोला मी सांगेन, ती समजावुन घेइल? पण हिंमत होत नव्हती. संध्याकाळ झाली की खूप काळजी वाटू लागायची. तिला आपोआप समजेल असे वाटायचे. पण तीही नवी नवरी. असा पटकन कसा विश्वास बसणार तिचा? माझ्या मनातील तिला कसे कळणार. भयंकर दिवस होते-आहेत. मदत हवी आहे. मदत हवी आहे.
मला मदत हवी आहे हो. पण हिंमतच होत नाही. घरातही कळलं तर - विश्वास ठेवतील? बरं विश्वास ठेवला तर माझ्यावरच आरोप करतील - आधी का नाही बोललास? बायकोने घटस्फोट दिला तर शेजारी पाजारी बभ्रा होइल. मी 'पुरुष' नाही हे मित्रांमध्ये, समाजात पसरेल. त्यापेक्षा असाच संसार घसटत रहाणे काय वाईट? निदान झाकली मूठ सव्वालाखाची. हां हेच योग्य आहे. तिला देइन ना मी पैसा-अडका, सुरक्षितता, सन्मान. पुरेसं आहे की तेवढं जगायला. मी नाही तेवढ्यावर जगत? मला कुठे दुसरं आयुष्य आहे?
पण तिला कळलं तर? नाही तिला कळताच कामा नये. कोणालाच कळून उपयोग नाही. मी तिचा नवरा आहे आणि हीच माझी ओळख आहे. तिलाही मी सुखात ठेवलेली आहे. मी ...मी .... सुरक्षित आहे, भक्कम आहे. मला काहीही झालेले नाही. हेच आणि एवढेच सत्य आहे.
---------------------------------------------------
डिस्क्लेमर -
सेक्श्युअल असॉल्ट फक्त स्त्रियांवरतीच होतो हा गैरसमज आहे. पुरुषांना तर याबद्दल बोलणं जास्त अवघड जातं. असे व्हिक्टिम्स (शोषित?) आयुष्यात बरेचदा आत्महत्येचा विचार करतात. - वाचिक माहीती.

चटका-२.५

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet