स्वतंत्र पुस्तकचाचे
आज सकाळचीच गोष्ट.
एमेच एसेच ५५च्या एका निर्मनुष्य पट्ट्यात मी ड्राईव्ह करत होतो. सकाळचं कोवळं ऊन आणि नोव्हेंबरची गुलाबी थंडी असं आल्हाददायक वातावरण होतं. ट्रकमध्ये ज्वालाग्राही माल होता, पण लोडिंग करताना आम्ही सुयोग्य काळजी घेतली होती. एकूण, मी आणि क्लीनर प्रत्युत्पन्नमती (त्याच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला पंचतंत्र वाचायचे डोहाळे लागले होते म्हणे) दोघेही रिलॅक्स्ड होतो.
अचानक आम्हांला समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवरून एक वॅगनआर भरधाव येऊ लागली. खरंतर सर्व्हिस रोड खरोखर समांतर असता तर ती आमच्यापर्यंत कधीच पोचली नसती; पण तो हायवेला छेद देत होता.
"ट्रक पळव, त्यांची चाल ही अदिश राशी आपल्याहून अधिक आहे आणि वेग ही सदिश राशीदेखील!" प्रत्युत्पन्नमती तातडीने बोलला.
मी टाॅप गिअर टाकला आणि ट्रकची चाल वाढवली. वाटमारी वॅगनआर हायवेला पोचण्यापूर्वी आम्ही सुमारे दोन फर्लांग पुढे पोहोचलो होतो. हो - ती वॅगनआर वाटमारी होती, तिच्यावर दिमाखात फडकणारा चाच्यांचा जॉली रॉजर झेंडाच ते सांगत होता!
रस्ता गुळगुळीत असता आणि ट्रकमध्ये ज्वालाग्राही माल नसता तर आम्ही निसटलो असतो. पण रस्ता गुळगुळीत नव्हता आणि ट्रकमध्ये ज्वालाग्राही माल होता, त्यामुळे वाटमाऱ्या वॅगनआरने आम्हाला ओव्हरटेक करून रस्ता अडवला आणि गाडी आडवी लावून आम्हालाही अडवलं. ब्रेक दाबून मी ट्रक थांबवला आणि आम्ही वाटमाऱ्यांची वाट बघत बसलो.
वॅगनआरचे दोन्ही दरवाजे उघडून दोघेजण आमच्या ट्रककडे चालत आले. एकाने एक पाय दुमडून बांधला होता - अगदी "अप्पू राजा" सिनेमातल्या कमल हासनसारखं. दुसऱ्याच्या खांद्यावर रंगीबेरंगी यांत्रिक पोपट "पीसेस ऑफ एट, पीसेस ऑफ एट" असं मृदू स्वरात किंचाळत होता.
"आहेत-नाहीत ते सगळे पैसे देतो; पण इजा करू नका," प्रत्युत्पन्नमतीने वाटमाऱ्यांना विनवलं.
"इजा-बिजा-तिजा काही करणार नाही. तुमचे पैसेही नकोत. ट्रक उघडा. आम्ही माल घेऊन निघून जाऊ." वाटमाऱ्या चाचा क्र. १ (दुमडलेला पायवाला) शांतपणे म्हणाला.
"पण, पण, काही मौल्यवान माल नाहीये!" मी म्हणालो.
वाटमाऱ्या चाचा क्र. २ (पोपटवाला) सात्विक संतापाने ओरडला - "ग्रंथांपेक्षा मौल्यवान काय असणार? न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते!"
वाटमाऱ्या चाचा क्र. १ शांतपणे म्हणाला, "बित्तंबातमी काढल्याशिवाय आम्ही मोहिमेची सुरुवात करत नाही. उघडा तो ट्रक आणि सुपूर्द करा सगळे दिवाळी अंक!"
"चिद्घनचपल, ऐक त्यांचं," प्रत्युत्पन्नमतीने मला विनवलं.
"हो प्रत्युत्पन्नमती, आपल्याला इतर पर्यायच नाही. नाही ऐकलं तर शस्त्रं काढतील हे!"
"डोन्ट वरी. आमच्याकडे शब्दांचीच शस्त्रे असतात," वाटमाऱ्या चाचा क्र. २ चा सात्विक संताप आता थंडावला होता.
मी ट्रकचं दार उघडलं, आणि प्रत्युत्पन्नमती दिवाळी अंकांचे गठ्ठे वॅगनआरमध्ये ठेवू लागला.
"तुमची नावं बाकी रोचक आहेत हो," वाटमाऱ्या चाचा क्र. २ आता गप्पा मारायच्या मूडमध्ये आला होता. "पूर्वपीठिका काय या नावांची?"
"प्रत्युत्पन्नमतीच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला पंचतंत्र वाचायचे डोहाळे लागले होते म्हणे. आणि माझं, माझं ... हे टोपणनाव आहे." मी विनयपूर्वक उत्तर दिलं.
शेवटचा गठ्ठा ठेवत प्रत्युत्पन्नमतीने पृच्छा केली, "पण तुम्ही या दिवाळी अंकांचं काय करणार?"
वाटमाऱ्या चाचा क्र. १ ने सविस्तर उत्तर दिलं, "वाचणार. ज्ञानप्राप्ती करणार. लेखकांना आणि कवींना अभिप्राय पाठवणार. मग कुठे छपाईत वगैरे तांत्रिक चुका आहेत का ते शोधणार. असल्यास संपादकांना पत्रं पाठवणार. मग चांगल्या अंकांची भारताबाहेर तस्करी करून चढ्या भावात विकणार. इतर अंक मिळतील त्या किंमतीत विकणार, नाहीतर ग्रंथसंग्रहालयांना दान करणार."
"आणि दिवाळी संपल्यावर इतर वर्षभर तुम्ही काय करता?" प्रत्युत्पन्नमतीने पुरवणी प्रश्न विचारला.
"संधीच्या शोधात जगभर हिंडतो. अमेरिका-युरोपमध्ये ख्रिसमस विशेषांक, चीनमध्ये चिनी नववर्ष विशेषांक, मध्यपूर्वेत रमजान विशेषांक यांवर डल्ला मारतो."
"मघाशी म्हणालात की बित्तंबातमी काढल्याशिवाय तुम्ही मोहिमेची सुरुवात करत नाही. अशी बित्तंबातमी तुम्हाला प्रतिस्पर्धी प्रकाशक पुरवतात का?" मी विचारलं.
"नाही! आम्ही स्वतंत्र पुस्तकचाचे आहोत. एका प्रकाशकाच्या वतीने प्रतिस्पर्ध्यांच्या दिवाळी अंकांवर डल्ला मारणारे प्रायव्हेटियर नव्हे!" वाटमाऱ्या चाचा क्र. २ चा सात्विक संताप पुन्हा जागृत झाला.
"ओके ओके. शांत व्हा," मी म्हणालो. "आणि आता आमचं काय करणार?"
वाटमाऱ्या चाचा क्र. १ शांतपणे म्हणाला, "काही नाही. तुम्ही पुन्हा मार्गस्थ व्हा. दिवाळी अंक पुस्तकचाच्यांनी नेले हे सर्वांना सांगा. फेसबुकवर पोस्ट टाका. आमची महती वाढवा."
मग काय, आम्ही तेच केलं.
प्रतिक्रिया
.
चाच्याचा सल्ला मान्य करून लगेच फेसबुकवर शेअर करणार.
?
ऑनलाइन दिवाळी अंकांचे काही करीत नाहीत का हे चाचे?
(तेवढाच मानवजातीला आधार!)
——————————
बाकी, (छापील) दिवाळी अंकांकरिता ‘ज्वालाग्राही माल’ हे वर्णन आवडले. (तांत्रिकदृष्ट्या खरे आहे ते!)
(आणि, बहुतांशी त्याच दर्जाचा माल असतो आजकाल.)
——————————
कुत्रे विचारीत नाही! फुकटात दिलेत, तरीसुद्धा कोणी घेणार नाही बहुधा. (वर पुन्हा फुकटचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च!)
(खपले असते, तर (सीझनमध्ये) गणपतीच्या मूर्तीपासून ते ‘सोहम्’च्या चटण्यांडांगरांपर्यंत (व्हाया ‘कैलास जीवन’, ‘चितळ्यां’ची बाकरवडी, ‘लक्ष्मीनारायण’चा चिवडा, ‘केप्र’च्या चटण्या नि ‘प्रकाश’चा कांदालसूणमसाला — नि बहुधा वर्षाअखेरीस ‘कालनिर्णय’सुद्धा! (चूभूद्याघ्या.)) काय वाट्टेल ते विकणाऱ्या आमच्या स्थानिक ‘पटेल ब्रदर्स’ने (‘आमच्या आख्ख्या यूएसएत वाट्टेल तेवढ्या शाखा आहेत.’) भरदिवाळीत गेलाबाजार एकदोन दिवाळीअंक नसते ठेवलेन् आपल्या दुकानांत?)
त्यापेक्षा रद्दीत विका — थोडेफार (पेट्रोलखर्चापुरते?) पैसे तरी सुटतील! (ग्रंथालयवालेसुद्धा तेच करीत असणार अखेरीस.)
——————————
(बाकी, ‘एमएच-एसएच-५५’ची काही खासियत आहे, की आपले उगाच?)
छान.
छान.
अशा युटोपीयन दिवाळीच्या कल्पनेनीच काही दिवस मस्त वाटत राहील.
हा हा हा!
काय पण कल्पना आहे ही!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चाच्यांनी डल्ला मारावा इतका
चाच्यांनी डल्ला मारावा इतका ज्वालाग्राही माल हे वर्णन.....
वाचून आनंद झाला हो.
आमच्याकडे काही मान्यवर लेखकांना अजूनही "दिवाळी अंकासाठी लेख पाठवा" ही चिठ्ठी येत आहे तोपर्यंत आम्ही किंचीत लेखकांनी कशाला हळहळावे? कुठेतरी काहीतरी आमचे छापून येते या विचारानेच उकळ्या फुटतात.
बाकी ड्राइवर किलिनर माल चोरला गेल्याची कंप्लेंट पोलिसांत देऊन वाटेला लागणार. माल त्यांचा नसतोच. ते एक 'भारवाही हमाल'. ढाब्यावर डाल फ्राय रोटी खाऊन बाजल्यावर ताणून देणार.