मी विणायला लागते.
मी आता विणकाम शिकले आहे, इतकेच नव्हे तर चक्क विणू लागले आहे.
माझी खात्री आहे की हे वाक्य वाचून पुष्कळ भगिनीमंडळी भुवया उंचावून म्हणतील, ’इश्श त्यात काय एवढं, मी तर कित्ती लहानपणीच विणायला शिकले आणि विणतेच आहे तेव्हापासून!’
खरं म्हणजे अगदी लहानपणी नाही तरी ज्या वयात मुलीच्या जातीला यायलाच हव्या अशा विविध गोष्टी, म्हणजे गृहकृत्यदक्षता, थोडीफार कलाकुसर, विणकाम ह्या बाबींमध्ये आपल्या मुलींना निपुण करायच्या मागं आईमंडळी लागायची त्या वयात मी असतांना माझी आईहि माझ्या मागं हात धुवून लागली होती की मी विणायला शिकावं. माझ्या विविध आकारांच्या पोळ्या, अर्धवट भरलेले उशांचे अभ्रे आणि विणण्याचा तीव्र कंटाळा बघून ’तू आणि तुझं नशीब’ असे जातायेता वैतागानं म्हणत मला गुणसंपन्न करायचा नाद तिनं नंतर सोडला. माझा छळ तात्पुरता थांबला असं मला वाटलं.
पण छे, तेव्हढं कोठलं माझं नशीब? मला कलासंपन्न विद्यार्थिनी बनवण्याचं माझ्या आईचं अपुरं कार्य शाळेतल्या शिक्षकमंडळीनं हातात घेतलं. शाळेत शिवण्याटिपण्यासाठी दोन तास असत. आता विणकामाबरोबरच शिवणकामाचीहि कटकट मागं लागली. ह्या सलग दोन तासांमध्ये हातात शिवणकामाचं नाहीतर विणण्याचं सामान धरून गप्पा मारणंच मला अधिक आवडायचं. उलटेसुलटे टाके जेमतेम कळले पण गप्पांच्या नादात सुईवर मोजून घातलेले टाके केव्हा ओघळून जात तेच मला कळत नसे. ह्या कौशल्यावर परीक्षेत मोजे विणून मार्क कसे मिळणार ह्या चिंतेमध्ये मी असतांना एक मैत्रीण मदतीला आली. तिनं मला मोजे विणून दिले आणि त्याच्या बदल्यात माझ्याकडून एक वही लिहून घेतली. मीहि आनंदानं माझ्या विणण्याच्या आवडीची किंमत दिली.
लग्नानंतर आपणहून नाही पण माझ्या जावेच्या आग्रहाला आणि इच्छेला मान देण्यासाठी मी तिच्याकडून विणकामाचे धडे घ्यायला लागले. लवकरच मी विणत असलेली अगम्य आकाराची कलाकृति आणि तिचा वाढता आकार पाहून ती छोटया मुलासाठी आहे की हत्तीच्या पिलासाठी ह्याचा अंदाज न आल्याने मला शिकवण्याच्या बाबतीत तिनं सपशेल माघार घेतली आणि माझ्या विणकामाला पुन: विराम मिळाला. ’न धरी शस्त्र करी मी’च्या चालीव ’न धरी सुया करी मी’ असं म्हणत मी सुया खाली ठेवल्या.
पण त्या सुया माझ्या नशिबात असाव्यातच. सुया पुन: हातात धरण्याचा योग तब्बल ५० वर्षांनी २०१४ साली पुन: आला. प्रत्येक वेळी कोणीतरी हितचिंतक माझ्या हाती सुया द्यायला उत्सुक असतोच.
मी राहते त्या सीनियर बिल्डिंगमध्ये एक विणणार्यांचा ग्रुप आहे. तेथे मी नेहमी जाते आणि तेथे बसून मला जमत असलेले भरतकाम करत करत आणि गप्पा मारत इतरांचे कौशल्य बघत असते. ह्या गटातल्या आज्या-पणज्या ७० ते ९० वयाच्या युरोपियन, मेक्सिकन आणि मी एकमेव इंडियन. त्यातल्या एका डच आजीनं, जी गेली ८० वर्षं विणत आहे, तिनं मला विणायला शिकवायचा चंग बांधला आणि माझ्या हातात पुन: सुया दिल्या. ’दिल्या’ म्हणण्याऐवजी ’कोंबल्या’ असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. मी ज्या पद्धतीनं सुया धरल्या त्यामुळं आणि एकंदरच माझी विणकामाशी चाललेली झटापट बघून सर्वांची मोठी करमणूक झाली आणि सर्वांनी 'knitting is not for you' असा एकमुखानं निर्णय देऊन माझी पुन: सुटका केली. ’ग्रुपला यायचं सोडू नकोस’ असंहि प्रेमानं सांगितलं.
नंतर गेल्या वर्षी साधारण ह्याच सुमाराला माझी मैत्रीण देवयानी हिनं तिच्या नातवाचा आपल्या आईसाठी तो स्कार्फ विणत असतानाचा फोटो दाखविला. एकाग्रतेनं आणि नकळत जीभ बाहेर काढून विणतानाचा त्याचा तो फोटो पाहून माझं मन कौतुकाने भरून आलं. मनात असा विचार आला की एवढंसं मूलहि विणू शकतं, आपण नुसतेच वयानं मोठे झालो आहोत. त्यानंतर मी पुन: विणायला शिकण्याचा निश्चय केला आणि माझं शिकणं पुन: सुरू झालं. कोठलीहि गोष्ट शिकण्याची प्रेरणा देणारा वयानं लहान असला तरी त्यानं काय फरक पडतो? मला विणायला शिकायची पुन:प्रेरणा देणार्या त्या छोटयाचे मी मनापासून आभार मानते.
मी पुन: विणायचे ठरवल्यावर माझ्या ग्रुपनं मला खूप मदत केली. त्यांच्या मदतीनं मी आता स्कार्फ, विंटरहॅट्स् आणि छोटी ब्लॅंकेट्स् विणू लागले आहे. माझा उत्साह आणि झपाटा पाहून ’knitting is not for you’ असा मला बजावणार्या माझ्या मैत्रिणी ’we have created a knitting monster' असं आता म्हणू लागल्या आहेत. माझ्या मतानं माझं विणकाम अजून प्राथमिक अवस्थेतच आहे पण मी माझ्या जेव्हा होतील त्या पतवंडांसाठी काहीतरी विणू शकेन अशी मला खात्री वाटत आहे. (माझ्या दोन नातवंडांची १४ साली लग्नं झाली आहेत, आता पतवंडांची वाट पाहाते आहे - पण जरा विषयान्तर झालं...)
आमच्या बिल्डिंगमधल्या महिला आमच्या ग्रुपला त्यांची घरात पडून असलेली लोकर देतात. आम्ही काही जणी स्वत: दुकानात जाऊनहि सर्वांसाठी लोकर आणतो. आमच्या ग्रुपमधली सर्वांची आवडती एक आजी अलीकडेच वारली. तिच्या इच्छेनुसार तिची उरलेली लोकर, सुया आणि अन्य काही साहित्य तिच्या मुलानं आम्हाला दिलं. तिच्या लोकरीतून तिच्याच आठवणी काढत नव्या वस्तु आम्ही बनवत आहोत.
आमच्या विणलेल्या वस्तु घेऊन जायला आम्ही इथल्याच सेंट जोसेफ हॉस्पिटलच्या व्हॉलंटिअर ग्रुपला बोलावलं. ते लोक येऊन आमचे आभार मानून आमच्या बनवलेल्या गोष्टी घेऊन जातात. ह्या वस्तु म्हणजे बेबी हॅट्स्, स्कार्फ, आणि ब्लॅंकेट्स् त्यांच्या कीमोथेरपी, डायलिसिस, मॅटर्निटी आणि इमर्जन्सी भागात वापरल्या जातात असे त्यांनी आम्हांस सांगितले. आपण करत असलेल्या गोष्टींचा योग्य उपयोग होत आहे हे ऐकून आम्हा सर्वांना आन्तरिक समाधान मिळाले आहे.
सध्या आमच्याजवळ भरपूर लोकर आहे आणि सर्वजण उत्साहानं काम करीत आहेत. नुकताच एप्रिलमध्ये आमच्या विणलेल्या वस्तूंचा दुसरा लॉट आम्ही हॉस्पिटलला दिला.
शिकायच्या प्रयत्नातल्या अनेक अर्धवट गोष्टी माझ्या आईनं पाहिल्या होत्या. आता उशीरानं का होईना पण मला विणता येऊ लागलं हेहि तिनं पाहयाला हवं होतं असं राहून राहून वाटतं.
ग्रुपमध्ये बसून सुखदु:खाच्या गोष्टी बोलत हसत खेळत घातलेले टाके, त्यातून घडणार्या गोष्टी नवजात बालकांना आणि आजारी व्यक्तींना ऊब देत आहेत. विणत असतांना मनात येतं की नव्यानं सापडलेला हा छंद मला सामाजिक बांधिलकीच्या कार्यात खारीचा वाटा उचलायला मदत करतो आहे. ह्या आनंदानं माझं मन भरून पावलं आहे.
ललित लेखनाचा प्रकार
काव्याताई, तुमच्यातला सुप्त
काव्याताई, तुमच्यातला सुप्त समीक्षक जागृत होतोय का काय? तरल, हळूवार, उत्कट, ध्यास, प्रेरीत, गरूडभरारी, दुर्दम्य, आकांक्षा, जागवून जातो - हुश्श; उण्यापुर्या दोन वाक्यात अर्थ म्हणजे नुसता ठासून भरलाय, गटणे लाजेल हे वाचून :p :p
(जोत्स्नाआजी, अर्थातच तुमच्या लिखाणाला उद्देशून यातलं काहीही नाही. काव्याची फिरकी घेतोय ईतकंच!)
लॉन्ग वीकेन्ड आला की असं
लॉन्ग वीकेन्ड आला की असं काहीबाही होऊ लागतं. उद्या (शुक्रवारी) तर विचारायलाच नको आधीच शुक्रवार - त्यात लॉन्ग वीकेन्डचा. अर्थात लगोलग धागे प्रसवणार नाहीये अन भिंतीही रंगवणार नाहीये. इथल्या काही काळजीवाहू सदस्यांनी आत्मपरीक्षण करण्याची सद्बुद्धी देऊ केलीली आहेच तर असोच ;)
छान झालाय लेख! विणकामाचा
छान झालाय लेख! विणकामाचा मलाही लहानपणापासूनच अतिप्रचंड कंटाळा असल्याने वाचताना मजा आली; कोण जाणे वयाच्या वेगळ्या उंबरठ्यावर कदाचित आपल्यालाही त्यात गोडी निर्माण होण्याची शक्यता आहे असाही विचार मनात आला.
आमच्या विणलेल्या वस्तु घेऊन जायला आम्ही इथल्याच सेंट जोसेफ हॉस्पिटलच्या व्हॉलंटिअर ग्रुपला बोलावलं. ते लोक येऊन आमचे आभार मानून आमच्या बनवलेल्या गोष्टी घेऊन जातात. ह्या वस्तु म्हणजे बेबी हॅट्स्, स्कार्फ, आणि ब्लॅंकेट्स् त्यांच्या कीमोथेरपी, डायलिसिस, मॅटर्निटी आणि इमर्जन्सी भागात वापरल्या जातात असे त्यांनी आम्हांस सांगितले. आपण करत असलेल्या गोष्टींचा योग्य उपयोग होत आहे हे ऐकून आम्हा सर्वांना आन्तरिक समाधान मिळाले आहे
हे छान आहे. माझी मुलगी सातव्या महिन्यांत जन्मली होती त्यावेळी ती हॉस्पिटलमधे असताना तिथले बाहुल्यांचे असतात तसले इवलेशे स्वेटर, कानटोप्या वगैरे घालत असे. त्यावेळी ते कोण पुरवतं याची कल्पना नसायची पण त्यामागे अशाच कोण्या हौशी विणकराचे हात लागले असावेत असे वाटून मौज वाटली. पुढे माझ्या आईने विणलेले ते इवलेशे स्वेटर्स हॉस्पिटलला देऊन टाकले पुढच्या प्रिमच्युर बाळांसाठी!
जोत्स्नाआजी, सुरेख लेखन
जोत्स्नाआजी, सुरेख लेखन. काय गंमत आहे पहा - एका आजीला, लहानग्या मुलीसारखं "...आपल्या आईला आपली कर्तबगारी दाखवता आली नाही, तिचं लाख मोलाचं सर्टिफिकेट मिळणार नाही..." याचं वैषम्य वाटतंय!! मला वाटतं तुमच्या आईला नक्कीच दिसतंय तुमचं विणकाम...
एव्हढं लिहायची खटपट केलीताहा, एखाद-दुसरा फोटो टाकता आला तर पहा. आम्हाला बघू दे तरी knitting monster चा पराक्रम !!
लेख आवडला.
लेख आवडला. विशेषतः हे वाक्य -
लवकरच मी विणत असलेली अगम्य आकाराची कलाकृति आणि तिचा वाढता आकार पाहून ती छोटया मुलासाठी आहे की हत्तीच्या पिलासाठी ...
आपुल्या जातीचे कोणी भेटल्याचा आनंद झाला.
विणायला मला अजिबात आवडत नाही. कधीच नाही. पण तुमच्यासारखे लोक असे लेख लिहितात आणि मला बिघडवतात. मागे रोचनाने हा धागा काढला तेव्हा विणण्याचा विषय घरी निघाला. तेव्हा नवऱ्याने दोन सुयांवर विणकाम करून रिस्टबँडच्या आकाराची पट्टी विणून दाखवली. मी दात काढून "मला नाही असलं काही येत" म्हणत त्याचं कौशल्य बघितलं. यथावकाश त्या सुया हातात घेऊन आम्ही तलवारयुद्धाचा सराव करून पाहिला.
वाह! छानच खुसखुशीत लेख
वाह! छानच खुसखुशीत लेख आहे!
विणकामासारखा मनातील डचमळ घालवायला दुसरा उपाय नाही. साखळ्या, खांअ वगैरे लक्षपूर्वक विणता विणता आपल्यालाही शांत वाटू लागते.
अनेकदा वैतागलो असलो किंवा भरपूर कामे डोक्यावर असल्याने काही सुचत नसलं की सरळ सुया काढाव्यात नी विणायला बसावं, डोकं शांत होतं... त्या साखळीतल्या ओळींबरोबरच एका 'लायनी'वर येतं असा स्वानुभव!
विणलेल्या गोष्टी हॉस्पिटल्सना देणेही स्तुत्य!
ऐसीवर स्वागत आहे. तुमच्या विणलेल्या कपड्यांचे फोटो इथे कलादालनात जरूर टाका!
माझी खात्री आहे की हे वाक्य वाचून पुष्कळ भगिनीमंडळी भुवया उंचावून म्हणतील
आम्ही 'भगिनी' वर्गात नसूनही आम्हाला विणकाम बरे येते (दोन सुयांचे नाही पण क्रोशाचे येते).
अरे वा! तू केलेल्या काही
अरे वा! तू केलेल्या काही छोट्या मोठ्या वस्तूंचे फोटो टाक की इथे. विणकाम वयस्कर स्त्रियांचाच प्रदेश आहे या मिथला आपण कधीही घालवू शकणार नाही.
तू क्रोशा कसा शिकलास? घरी कोणी शिकवलं की शाळेत? माझ्या आईने घरात जमेल तितक्या मुलांना शिकवलंय. माझा मुला सध्या शिकायची खूप इच्छा आहे पण हाताचे कोऑर्डिनेशन अजून जमत नाही त्याला.
मी अलिकडे जास्त क्रोशाच करते. अधिक मास आला की आईचा जावयांसाठी ३३ वस्तू द्यायच्या आग्रह असतो. ३३ अनारसे, ३३ लाडू, ३३ असेच काहीतरी. या वर्षी माझ्याकडे पडून राहिलेल्या सुती लोकरीचे आम्ही दोघी मिळून ३३ पॉटहोल्डर्स करायचे ठरवले. (ते चित्र फक्त नमुनादाखल दिलंय, मी विणलेलं नाहीये)
ता.क.: बर्याच जणांनी आपापल्या विणकामाचे फोटो टाकले तर "विणकर ऐसीकर" म्हणून नवीन धागा काढायचा का?
तू क्रोशा कसा शिकलास? घरी
तू क्रोशा कसा शिकलास? घरी कोणी शिकवलं की शाळेत? माझ्या आईने घरात जमेल तितक्या मुलांना शिकवलंय
कधी, कोणी, कसं वगैरे आता नक्की आठवत नाही. बहुदा ३री-चौथीच्या सुमारास शिकलो असेन.
काकू दोन सुयांचे विणकाम करत असे, ते तिने शिकवायचा प्रयत्न केलेला पण तेव्हा अजिबातच जमले नाही. त्यामुळे हिरमुसलेल्या मला आकडा असलेल्या सुईचे विणकाम - अर्थात क्रोशा - आई/काकू/आत्यापैकी कोणीतरी किंवा तिघींनीही शिकवले असेल - नक्की आठवत नाही. आणि आता तिघिंनाही विचारले तर त्यांना आठवणार नाहीच उलट मीच कसे शिकवल्याचे दावे सुरू होतील ;)
===
लहानपणी देव्हार्यातली देवांची छोटी चौकोनी बस्करं करायचो.
मग नव्या घरात जाताना (आठवी-नववीत) मी आणि आईने एक दारावरचे तोरण करायचा संयुक्त प्रकल्प केलेला आठवतोय. खूपच सुरेख तोरण झाले होते. दुर्दैवाने ते अतिशय छान झालेले तोरण दुसर्याच दिवशी चोरीला गेले.
मग इंजिनियरींगला गेल्यावर ते बंदच झाले.
थेट लग्न झाल्यावर, आमच्या कॅरमचे खिसे उसवल्यावर कॅरमला खिसे विणायला पुन्हा सुया हातात घेतल्या.
दरम्यान मुलीसाठी एक छोटा मफलर, तिच्या बाहुलीला टोपी वगैरे करणे चालु असते. मेव्हणीच्या रुखवतासाठी तोरण केले होते. त्याव्यतिरिक्त फार मोठ्या वस्तु करत नाही, फक्त नुसतं बसून रहाण्यापेक्षा हाताळा चाळा म्हणून घरातिल बायकांच्या केसांच्या क्लिपा, मुलीची खेळणी सारखी हाताळून- खेळून तोडण्यापेक्षा हा उद्योग बरा असतो ;)
पुढली काही वस्तु केली की टाकेन फोटो.
हाहा - मादाम दफार्ज सारखे
हाहा - मादाम दफार्ज सारखे विणायचे असेल तर मग सम हेड्स हॅव टू स्टार्ट रोलिंग अराउंड हियर! मला बरीच वर्षं हे टोपणनाव चिकटलेलं आहे.
सीरियसली - शिकायचे असेल तर या साइटीवर जा. अप्रतिम विडियोंमधून प्राथमिक टाके वगैरे शिकता येतात. यूट्यूब वर तर भरमसाठ प्रशिक्षणाचे विडियो आहेत.
खुप आवडल
माझी अवस्था अगदी पुर्वायुष्यातल्या सारखी किंबहुना त्याहुनही बिकट. म्हणजे लहानपणी बहुदा पेशंस नसल्याने असेल पण मला बेसिक उलट आणि सुलट टाकेहि कधी जमले नाहित. आमच्या शाळेत तही कार्यानुभव मध्ये विणकाम, भरतकाम, क्रोशा वगैरे असायच त्यात भरतकाम वगळता बाकि सगळी वर्गभगिनिंची कृपा! तेन्व्हापासुन "कलेची सेवा दोन प्रकारे करता येत एक म्हणजे स्वतः ती निर्मुन किंवा इतरांनी निर्मिलेल्या कलेचा आस्वाद घेउन, आपण दुसर्या प्रकारे ती करावी हे इष्ट" हा चिमणरावांना मिळालेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यामुळे वयाच्या ह्या टप्प्यावर एका क्षणी 'बस्स ठरल' म्हणुन केलेल्या श्रीगणेशाच एकदम अप्रुप वाटल. हॅट्स ऑफ टु यु!
तुमच हे लिखाण वाचुन मलाही आता श्रीगणेशा करण्याची इछ्छा झालिय. रोचना ने दिलेलि लिंक बघुन प्रयत्न करणार. होपफुली जमेल.
काही असफल कहाण्या........
लेख अतिशय आवडला आणि माझ्या कलाजीवनातल्या काही असफल कहाण्या आठवल्या.
माझी आई सुरेख भरतकाम करते ,त्यामुळे शालेय जीवनापासूनच मी भरतकाम शिकण्याचे क्षीण प्रयत्न केले.पांढरे शुभ्र रुमाल कळकट करून त्यावर रंगीत, कुरूप, रेशमी गुंतवळ करण्यापलीकडे माझी मजल गेली नाही.ओबडधोबड हेमिंग आणि किरकोळ दुरुस्तीसाठी बटबटीत टीप घालण अजून क्वचित करावं लागतं . कॉलेजमध्ये असताना यापेक्षा पेंटिंग नक्कीच सोपे असेल म्हणून मारे टेबल क्लॉथवर फुले रंगवली होती . तेंव्हा रंगांनी रेषांच्या चौकटी नाकारून वाट फुटेल तिथून स्वैर धाव घेतली होती.अजूनही ते भीषण टेबल क्लॉथ आईकडे माझ्या असफल रंगलेपनाची करूण कहाणी सांगण्यात रंगले आहेत.
नाकासमोर ;;) चालणारी सरळमार्गी स्त्री ;) असल्याने वीणकाम करण्यासाठी जे काही उलटसुलट धंदे करावे लागतात ते मला जमलेच नसते. एकोणीस उलट आणि साडेबत्तेचाळीस सुलट असली अवघड गणितं करावी लागत असल्याने, कसाबसा एक लाल रंगाचा हेअर ब्यांड करून झाल्यावर माझ्या विणकामाचे रामनाम सत्य झाले. क्रोशाचे विणकाम पाहूनच भोवळ येत असल्याने त्या चक्रव्युहात शिरून अभिमन्यु होण्याच धाडस केलं नाही.गतजन्मी कोळी असलेले कलावंत यात विनासायास नैपुण्य मिळवतात असे आढळले आहे.
ऐसीवर आपले स्वागत आहे.
खरं तर नीट, मनापासून अन योग्य प्रतिसाद देते - लेख खरच आवडला. आपण सिनियर आहात, इथल्या कोणाची आपण आई अथवा सासू आहात का हे माहीत नाही. पण काल प्रतिसाद दिल्यानंतर एकदम माझ्या सासूबाईंची आठवण आली. त्यांनी इथे एकच कविता टाकली होती -(http://aisiakshare.com/node/59)
.
ऐसीवर आपले स्वागत आहे.
धन्यवाद...
अशाप्रकारे आपले काही लिखाण आन्तरजालावर प्रकाशित करण्याची पहिलीच वेळ आणि त्यामुळे पहिलटकरणीला वाटते तशी धाकधूक वाटत होती. सुदैवाने मी लिहिलेले हे ’वेडेवाकुडे’ तुम्हा सर्वांना आवडले ह्यामुळे आनंद वाटला.
सोबत माझ्या आणि माझ्या मैत्रिणींच्या फावल्या वेळच्या शिवणकामाचे काही नमुने दाखवीत आहे. इथल्या काही सदस्यांच्या कामाच्या तुलनेने हे जरा नवशिकेच दिसत आहे पण ...
सर्वात पहिल्या चित्रातील तीन टोप्या मी विणलेल्या आहेत. पुढच्या दोन चित्रातहि माझे काही नमुने आहेत. अखेरच्या चित्रातील सर्वात डावीकडची yours truely हे कळतेच आहे.



बापरे, किती टोप्या आहेत!!
बापरे, किती टोप्या आहेत!! छानच.
सगळ्या लोकरीच्या आहेत की अॅक्रिलिक? माझी एक मैत्रिण अशीच उरलेल्या लोकरीच्या टोप्या करून हॉस्पिटल ला देत असते.
तुमच्या ग्रूपला Ravelry ची माहिती असेलच - विणकरांची पंढरी आहे ती साइट. लाखो पॅटर्न आहेत. तिथे भारतीय विणकरांचा देखील एक सक्रिय ग्रूप आहे.
अजून असेच येऊ द्या!
छान
ऐसीअक्षरेवर तुमचे स्वागत. छान लिहिलय. हे वाचून मला माझ्या आजीची आठवण झाली. ती माझ्यासाठी नेहमी स्वेटर विणत असे.
जमल्यास फोटोपण टाका.