रॅबिलेच्या पायावर उभा भागवती प्रासाद

रॅबिलेच्या पायावर उभा भागवती प्रासाद

- हेमंत कर्णिक

'मायापूरचे रंगेल राक्षस' हे पुस्तक प्रथम वाचलं तेव्हा मी लहान होतो. पुस्तक वाचताना त्याची प्रस्तावना वाचायची असते, निदान डोळ्यांखालून घालायची असते, हे तेव्हा मला माहीत नव्हतं. त्यामुळे मी तेव्हापासून बरीच वर्षं ही गोष्ट भा. रा. भागवतांची स्वतःची आहे, असंच मानून चाललो होतो. भागवतांची 'रॉबिन हुड आणि त्याचे रंगेल गडी' आणि 'समुद्रसैतान' ही पुस्तकं अर्थातच मी वाचली होती. त्या दोन पुस्तकांतल्या पात्रांची, ठिकाणांची नावं परकी होती. त्यामुळे त्या गोष्टी इथल्या नव्हेत, हे कोणी सांगावं लागलं नाही. पण मायापूर, घंटासुर, चंडासुर, चक्रवाक ही नावं इथली होती. वातावरण इथलं होतं. तेव्हा बेहद्द आवडलेले त्यातले विनोद पूर्णपणे इथले होते. त्यातल्या कशालाही परक्या संस्कृतीचा किंवा भाषांतरातून हमखास येणारा कृत्रिमतेचा वास बिलकुल नव्हता. लहान मनाला आवडेल, असं लिखाण कसं असतं, असं जर मला कुणी विचारलं असतं; तर मी तत्काळ या गोष्टीचं नाव घेतलं असतं. ना. धों. ताम्हनकरांचा 'गोट्या' मला आवडला नाही, बाळबोध वाटला. 'श्यामची आई' आवडली नाही, असं म्हणायची माझी टाप नव्हती (आणि नाही); पण ते रडू आणणारं पुस्तक. विरंगुळा म्हणून, वाचनाचा आनंद घ्यायचा म्हणून लहान वयात कोण 'श्यामची आई' वाचत बसेल!

तर, खूप वर्षांनंतर जेव्हा मला 'मायापूर'सुद्धा रूपांतरित आहे, असं कळलं; तेव्हा आश्चर्य वाटलं. आणि तेव्हा वय वाढलेलं असल्याकारणाने मूळ लिखाण वाचावंसं वाटलं. ते वाचल्यावर - खरं तर वाचण्याचा प्रयत्न केल्यावर - जे सापडलं, ते इथे मांडायचं आहे. आणि तसं करण्याअगोदर मूळ पुस्तकाचा संदर्भ न घेता केवळ मराठी 'मायापूर'कडे पाहिलं, तर काय वाटतं, हे तपासणं गरजेचं आहे.

आता काही घटकांचा विचार करू. एक, कथावस्तू.

काहीही म्हणायच्या अगोदर एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे; ती म्हणजे मला फ्रेंच येत नाही. त्यामुळे मी रॅबिले या फ्रेंच लेखकाने लिहिलेलं मूळ पुस्तक वाचलेलं नाही. भा रा भागवतांच्या 'मायापूरचे रंगेल राक्षस' या साहित्यकृतीवर लिहिताना मी 'गर्गांटुआ अँड पेंटाग्रुएल' या इंग्रजी पुस्तकालाच मूळ लिखाण म्हणणार आहे. पुढे.

गोष्ट सुरू होते, ती वास्तव काळात. जानूला शेतात भलं मोठं पुस्तक सापडतं आणि त्यात साऱ्या साऱ्या राक्षसांच्या कुळकथा दिलेल्या असतात.

शंकरभटजी ते चाळून वृत्रासुर, भस्मासुर, घटोत्कच, सुंद-उपसुंद, अशा पुराणातल्या अनेक राक्षसांची नावं घेतात. म्हणजे, मायापूर हे जरी एक काल्पनिक गाव असलं, तरी मायापूरची गोष्ट पुराणातल्या गोष्टींच्या नंतरची आहे, असं लेखक सांगतो. गोष्टीत राक्षसांच्या अवाढव्य आकाराचा अपवाद सोडला, तर अद्‍भुत, अतार्किक घटना वा वैशिष्ट्य जवळपास नाही. तो आकारही एक प्रकारे लवचीक आहे. केवळ अतिरेकातून विनोद निर्माण करायला आकाराचा आधार घेतला आहे, असं म्हणता येतं. बाकी त्या आकाराला वेगळा संदर्भ नाही, जसा गलिवरच्या गोष्टीत उघडपणे आहे. जोनाथन स्विफ्टने आकारांच्या विषमतेमधून मानवी दृष्टिकोन आणि पूर्वग्रह यांच्यावर जसं भाष्य केलं आहे, तसं 'मायापूर'चं नाही.

अर्थात, हे असं मुळातच आहे, असं म्हणता येईल. पण भागवतांनी रूपांतर करताना स्पष्टपणे एक पथ्य पाळलं आहे, ते म्हणजे ही गोष्ट त्यांनी बालकांना समोर ठेवून सांगितली आहे. मूळ गोष्टीतलं जे काही बालकांपुढे ठेवणं त्यांना अयोग्य वाटलं, ते त्यांनी गाळलं आहे. गंमत अशी, की ते गाळल्यामुळे भागवतांनी सांगितलेल्या गोष्टीत न्यून येत नाही! त्यात विस्कळीतपणा, तुटलेपणा येत नाही. याचा एक अर्थ असा, की मूळ गोष्टीत जे काही 'ओंगळ', 'वाह्यात' आहे, ते अलंकार म्हणून घातलं आहे; ते नसलं तरी बिघडत नाही. दुसराही अर्थ आहे, तो असा की भागवतांची छोट्यांची गोष्ट मराठीकडून उलट मूळ कथावस्तूकडे गेल्यावर मोठ्यांसाठी होते, ती त्या गाळलेल्या भागामुळेच! काही असो; भागवतांनी एक सुसंगत निर्णय घेतला, ज्यामुळे गोष्टीतलं एक अंग कमी झालं, पण दुसरं वाढलं : त्यात बालकांवर कुसंस्कार करणारं काही न राहिल्याने ते बालकांची निखळ करमणूक करणारं झालं.
इथे एक मुद्दा मांडायला हवा. मूळ गोष्टीत असलेली ओंगळ वर्णनं ही, मराठी मुलांनाच काय, थोरांनाही चालली नसती. मुळात रॅबिलेने जरी काही ओंगळ आणि वाह्यात वर्णनं केली असली, तरी त्यांना 'ओंगळ' आणि 'वाह्यात' ही विशेषणं लावणं ही एक विशिष्ट सांस्कृतिक भूमिका आहे. त्या भूमिकेपासून दूर असणाऱ्या वर्गाला त्यात काही खटकणारही नाही. समाजात असे दोन वर्ग दिसतात. एक अर्थातच कष्टकरी वर्ग, ज्यावर अभिरुचिसंपन्न कलास्वादाचे, साहित्यवाचनाचे संस्कार झालेले नाहीत. दुसरा, असे संस्कार अजून व्हायचे आहेत असा अल्लड, अल्पवयीन वर्ग. या दोन वर्गांमध्ये फरक असा, की कष्टकरी वर्ग स्वतःला हवं ते वाचायला, करायला मोकळा असतो, बालकांनी काय करावं, काय वाचावं हे वडीलधारे ठरवत असतात. या दुसऱ्या कारणामुळे ओंगळ वर्णनं आणि वाह्यात संवाद बालकांच्या साहित्यातून बाद होतात.

भागवतांची शैली प्रसन्न आहे. गोष्ट लहान मुलांना सांगायची आहे, असं ठरवल्याने बुद्धिगम्य क्लिष्टता, बहुपदरी व्यक्तिमत्त्वं, छुपा गर्भितार्थ, सूक्ष्म उपहास यांना जागा नाही. एखाद्या पात्राविषयी प्रथमदर्शनी जे मत होतं, तेच खरं असतं आणि ते धरून ठेवून वाचत गेल्याने फसगत होत नाही, उलट घटनांची संगती नीट लागत राहते. मित्रपक्षातला कुणी अचानक सुप्‍त कुहेतूने वाईट वागायला लागत नाही.

मात्र 'यामध्ये लपून बसलेला अर्थ आपल्या बुद्धीला समजला' यात लहान मुलांनाही आनंद मिळत असतोच. 'मायापूर'मध्ये हे भाषेच्या माध्यमातून साधलं जातं. घंटासुराच्या गुरूचं नाव आहे 'कस्तमहाम'. या अगम्य आणि उटपटांग नावाचा उलगडा त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीतून होतो. तो ज्ञ पासून अ पर्यंत मुळाक्षरं शिकवतो. "शब्द उलटे वाचायचे, ते कसे?" असं विचारल्यावर कस्तमहाम उत्तरतो, "हीना चंयळाक ते लातु रमाकुजरा!" म्हणजे काय, हे लक्षात आल्यावर पुढे "लालचा लार्याकाष्ट्ररा राडे झातु नि डारे झातु!" याची दुहेरी मजा बालवाचक घेऊ शकतो. त्याला त्याचा अर्थ तर कळतो - आणि त्यातला विनोद आकळतो - शिवाय या उद्‍गारातली लयसुद्धा त्याला आस्वादता येते. हे भागवतांचंच! हे कुठून परभाषेतून येणार? भागवतांनी एकदा ही रीत उचलली की मग "तू राक्षस होतास, आता साक्षर झालास." असं ते लीलया लिहून जातात.

भाषेमध्ये वाच्यार्थ आणि लक्षणार्थ, असं असतं; व्याजोक्‍ती असते; त्याबरोबर भाषेतल्या शब्दांना रूप असतं, नाद असतो. शब्दाच्या अर्थापलीकडल्या या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळेदेखील भाषेला सौष्ठव प्राप्‍त होत असतं. बालकांकडून अनवधानाने या वैशिष्ट्यांचा वापर होत असतो आणि शब्दांची अर्थावेगळी तोडमोड करून मुलं शब्दरूपाची, नादाची गंमत अनुभवत असतात. म्हणूनच त्यांच्या आपापल्या कूट भाषा असतात. त्या कूट भाषांत संभाषणाचे प्रयत्न चालतात. याची दखलही अर्थातच 'मायापूर'मध्ये आहे. चक्रवाक हे पात्र असं बोलतं, लिहितं. "आमवर्तला आखूवर्तप आभावर्तषा आयेवर्ततात." हे त्याचं एक उदाहरण. "चक्रचारवि चक्ररतोक." हे दुसरं.

पुढे दोन बेटांची जोडगोळी येते. तिथल्या उधळ गावात माधळ पेठ असते. नदीवर समोरासमोर आदळ आणि हापट नावाचे दोन घाट असतात. तिथला बाप धष्ट असला की मुलगा पुष्ट असायचाच. अक्राळ आणि विक्राळ हे तिथे राज्य करत असतात; एक आड असतो, तर दुसरा दांड. अक्राळची राणी तिच्या साळकाया आणी, तर विक्राळची राणी तिच्या माळकाया घेऊन येई. अक्राळ शेंडीतोड्या (चांडाळाचं डोकं कापून डाळ करणारा) तर विक्राळ पोटफोड्या. पाहुणीचं पोट फाडून पाणी मिळवणारा!

ज्याला भाषेत रस आहे, त्याला यातून अचाट आनंद मिळेल आणि भाषेकडे बघण्याची नवी दृष्टी मिळेल. ज्याला रस नसेल, त्याला रस उत्पन्न होईल! एकूणच भाषा नुसती परस्परसंपर्काचं काम करत नाही; त्याहीपेक्षा खूप गंमतजंमत तिच्यात असते, ही संकल्पना बालकाच्या मनात शिरकाव करेल. वाढत्या, संस्कारशील वयात त्यामुळे बुद्धीच्या वाढीला नवा आयाम मिळेल. लहान मुलांची नुसती निर्भेळ करमणूक करणंसुद्धा अत्यंत संस्कारशील असू शकतं, ते असं!

भागवतांनी गोष्टीच्या तपशिलांमध्येसुद्धा ही भाषिक गंमत भरली आहे. आणि बाकी तपशिलांमध्ये लहान वयाला पसंत पडेल अशी गंमत आहे. साहसकथा म्हटल्यावर युद्ध होणारच. पण 'मायापूर'मधलं युद्ध बऱ्यापैकी अहिंसक आहे. त्यात तेलावरून घसरणं आहे आणि उसाने घायाळ करणं आहे. महापुरामुळे कलिंगडं अमाप होतात आणि कुणाचं पोट फुगतं, तर कुणाचं डोकं, कुणाचं नाक. तीक्ष्ण बुद्धी असूनही "वाचल्याने डोळे बिघडतात" असं म्हणून ग्रंथाचं एकही पान न उघडणारे पंडित इथे भेटतात; तसेच अर्ध्या तासात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात पटाईत असणारे हातातल्या कात्रीने केवळ नाकातले केस कापत असतात.

या एकूण आनंदी, प्रसन्न वातावरणातला विनोद दुसऱ्याच्या व्यंगावर हसणारा नाही. यात अतिशयोक्‍ती आहे, शाब्दिक कोट्या आहेत, विसंगती आहे. पण ओंगळपणा, वाह्यातपणा औषधाला नाही! वरवर पाहता 'मायापूर'चा सर्वात मोठा दोष त्यातली भाषा आता जुनी झाली, हा आहे. मात्र या 'दोषा'ची दुसरी बाजूदेखील बघायला हवी. मुळात ही कहाणी लहान मुलांसाठी लिहिलेली असल्यामुळे आजही त्यातली गंमत नष्ट झालेली नाही. नगरांची, पात्रांची नावं मजेदार आहेत, भाषा शुद्ध (म्हणजे प्रमाण नव्हे. शुद्ध म्हणजे जिच्यात स्मार्ट, थँक्यू असल्या इंग्रजी टर्म्स वा 'गंभीरपणे घेणे' या प्रकारच्या रचना वा 'माझी मदत कर' यासारख्या हिंदीसम रचना नाहीत; अशी) मराठी आहे. म्हणजे, गोष्टीतल्या मजेदार, मनमोहक ऐवजामुळे मुलं रमतील आणि आपोआप 'शुद्ध' मराठीचे संस्कार करून घेतील!

आता या गुणवैशिष्ट्यांपैकी किती श्रेय मूळ लेखक रॅबिले याचं आहे, हे पाहू.


गर्गांटुआ अँड पेंटाग्रुएल

रॅबिलेने लिहिलेल्या मूळ फ्रेंच गोष्टीचं नाव आहे 'गर्गांटुआ अँड पेंटाग्रुएल'. जोनाथन स्विफ्टच्या 'गलिवर्स ट्रॅवल्स'प्रमाणे ही गोष्टदेखील लहान मुलांसाठी लिहिलेली नाही. दोन्हीकडे प्रौढ मनाला उद्देशून केलेली वर्णनं आहेत. दोन्हींमध्ये अद्‍भुत घटना भरपूर आहेत आणि दोन्हीकडे अद्‍भुताचा उद्देश वाचकाचं लक्ष पकडून ठेवणे, हाच आहे. वाचनात रमलेल्या वाचकाला त्याच्या नकळत स्वतःच्या - काहीशा बंडखोर - विचारांचे घास भरवता येतील असं लेखकाचं गणित आहे. मात्र स्विफ्टच्या तुलनेत रॅबिलेच्या गोष्टीत फारच पाल्हाळ आहे. रॅबिलेच्या लिखाणातलं पाल्हाळ एका अर्थी त्याच्या काळातल्या लेखनमूल्यांचा (सोळाव्या शतकातल्या लेखनमूल्यांचा) भाग आहे. भागवतांनी जेव्हा ते मराठीत आणलं, तेव्हा अतिपाल्हाळामुळे रंजकतेला, वाचकाचं लक्ष धरून ठेवण्याच्या हेतूलाच छेद गेला असता. लहान मुलांच्या बाबतीत तर हे फारच मारक ठरलं असतं. लहान, निरागस मनाचं निखळ मनोरंजन करण्याच्या स्वतःच्या उद्देशाला अनुसरत त्यांनी मूळ गोष्टीतलं पाल्हाळ काढून टाकलं आहे. आणखीही बरंच काही केलं आहे. रॅबिलेची भूमिका भागवतांच्याच शब्दात वर्णन करायची तर 'ढोंगधत्तुऱ्याचे भस्म अन् समाजकंटकांचे चूर्ण करणे आणि निरागस (की बावळट?) नागरिकांना अकलेच्या मात्रा उगाळून देणे' ही आहे. गर्गांटुआला घंटासुर आणि पेंटाग्रुएलला चंडासुर करताना भागवतांनी भूमिका बदलली आहे. वर म्हटल्याप्रमाणे निरागसच पण वयाने लहान मनाला एक रंजक गोष्ट मराठीत सांगताना भागवतांनी भरपूर स्वातंत्र्य घेतलं आहे. त्यांनी ओंगळ आणि वाह्यात वर्णनं पूर्णपणे काढून टाकली आहेत. मात्र, रॅबिलेच्या विनोदातच असलेली बालसुलभ निरागसता त्यांनी नीट सांभाळली आहे आणि रॅबिलेचा एकूण रोख, तसंच त्याच्या लिखाणाची प्रकृती लक्षात घेऊन त्यात स्वतःची भर टाकली आहे.

म्हणजे हे भाषांतर नाही, रूपांतर आहे. 'मूळ कल्पना परकीय' असं म्हणून खुशाल मोकळं होणं जरी भागवतांना शक्य होतं, तरी त्यांनी रॅबिलेचं ‍ऋण मान्य केलं आहे. आणि ऐसपैस स्वातंत्र्य घेताना त्यांनी रॅबिलेच्या गाभ्याला धक्का लावलेला नाही. विनोद बऱ्याचदा कोणावर तरी - at the cost of somebody - केलेला असतो. तशा विनोदाचा संस्कार सातत्याने झाल्यास विनोद म्हणजे तेच, विनोद करताना कोणाला तरी खाली खेचायचं असतंच, असं मूल्य रुजतं. भा. रा. भागवतांचं काहीही वाचलं तरी हा कुसंस्कार बालकांवर होणार नाही.

आता काही उदाहरणं पाहू.

शेजारच्या राज्यातल्या 'केक बेकर्स'ना भागवतांनी बुंदीच्या लाडवांचे हलवाई बनवलं. आपोआप, लढाई करताना लाडू भिरकावणं आलं आणि लढाईला 'बुंदीच्या लाडवांचे युद्ध' असं नाव मिळालं! या लढाईत विशेष पराक्रम गाजवणाऱ्या फ्रायर जॉनचा झाला 'दंडभद्र'. क्रुसाचा दांडा काढून जॉन तो हातात घेतो आणि त्यानं शत्रूचं निर्दाळण करतो. तो एकेकाला कसा कसा मारतो, हे अगदी तपशीलवार सांगताना रॅबिले 'चविष्ट' म्हणावं अशा रीतीने त्या हिंसाचाराचं वर्णन करतो. शत्रुसैनिक ठार झाल्याचा स्पष्ट उल्लेख करतो. भागवत द्राक्षांच्या मळ्याच्या जागी उसाचं शेत आणतात. आपोआप दंडभद्राच्या हाती उसाची कांडकं येतात. उसाचा उल्लेख 'इक्षुदंड' असा होतो. आणि दंडभद्र उसाच्या दांडक्याने शत्रुसैनिकांना रट्टे लगावतो. 'ते वार झेलताना त्या शेंदाड शिपायांचे दंड नि बरगड्या दुखायला लागल्या' इथवरच भागवतांच्या हिंसेची मजल जाते! पुढे 'त्याच्याभोवती घायाळ आणि मृत सैनिकांचा खच पडला" असं म्हटल्यावर 'रक्‍ताने न्हालेले सैनिक गोड गोड मिठ्ठास रसात बुचकळलेले दिसत होते' असंही येतं!

आक्रमकांवर हल्ला करण्यासाठी निघालेला रॅबिलेचा गार्गांटुआ 'सेंट मार्टिन्स ट्री' नामक झाडाखाली थांबतो आणि गार्गांटुआ तो उंच दांडगा वृक्ष उपटून त्याचा, भाला व दांडकं असा, दुहेरी उपयोग करतो. हे भागवतांना मान्य आहे आणि ते याला 'मायापुरा'त स्थान देतात. पण गार्गांटुआची घोडी तिथे मुतते आणि तिच्या मूत्राचा प्रवाह शत्रूने बळकावलेल्या किल्ल्याच्या दिशेने गेल्याने तिथला खंदक ओसंडून वाहतो आणि त्यात तिथे असलेले शत्रूचे सर्व सैनिक बुडून मरतात; याला मात्र 'मायापूर'मध्ये जागा मिळू शकत नाही. एका बाजूने अशी सेन्सरशिप लागू करणारे भागवत, ज्या बाबतीत त्यांचा हातखंडा आहे, ते शब्दखेळ मुबलक प्रमाणात करून रंजकतेत भर घालतात. मग घंटासुराचे सैनिक "मारीचदुर्ग - भारीच दूर गं!" अशा घोषणा देतात, गडाजवळ पोचल्यावर "बघा बघा तो घंटासुर, बुरुजांचा करी चक्काचूर!" असं ओरडू लागतात.

मारीचदुर्ग सर केल्यावर 'मायापूर'मध्ये थेट कोबीच्या गड्ड्यात लपलेल्या यात्रेकरूंची कथा येते. म्हणजे मूळ गोष्टीत असलेला बाकीच्या लढाईचा, लोकांच्या राहणीवर्णनाचा, भाषणाचा वगैरे भाग गाळलेला आहे. त्या भागातही अतिशयोक्‍ती, विसंगती, चमत्कारिकपणा यांचा आढळ आहे; ज्यातून विनोद वा रंजकता यांची निर्मिती शक्य आहे. पण law of marginal utility आपल्याला सांगतो की प्रमाण वाढलं, की लाभ कमी होत जातो. तसंच, इथेही मजकुराची लांबी रंजकतेवर मात करण्याची शक्यता वाढते. एकूण पुस्तक किती लांबलचक असावं, याला मराठी बालसाहित्यात मर्यादा असल्याकारणाने रॅबिलेच्या प्रदीर्घ कहाणीत नुसती काटछाट करून भागणार नव्हतंच; बरंच काही अजिबात काढून टाकण्याला पर्याय नव्हता (गुटेनबर्ग प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेला ५ खंडीय मजकूर).

घंटासुराचा पुत्र चंडासुर. त्याच्या जन्माची गोष्ट रॅबिलेने रंगवून सांगितली आहे. त्यात तेव्हा पडलेल्या कोरड्या दुष्काळाचं खास रॅबिलेच्या अतिशयोक्‍तीपूर्ण शैलीत केलेलं वर्णन आहे. भागवतांनी केलेली अतिशयोक्‍ती अगदी माफक आहे आणि त्यात अतिरेकापेक्षा अतर्क्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे, दुष्काळात किती ऊन पडलं, किती गरम झालं, हे सांगत न बसता ते म्हणतात, 'त्या वर्षी बाराऐवजी अकराच महिने आले; जसा एखाद्या तिथीचा लोप होतो, तसा पुसाचा महिना लोप पावला. श्रावण महिन्यात नऊ सोमवार आले आणि उपास करणाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. मृगाचा ते हस्ताचा पाऊस पडला नाही; पण स्वाती नक्षत्रात जो पाऊस लागला, तो थेट शिवरात्रीपर्यंत.' म्हणजे, ते सगळं वातावरण देशी - मराठी - करून टाकतात. रॅबिलेने वर्णन केलेली अद्‍भुतं त्यांनी त्या त्या ठिकाणी न ठेवता विखरून टाकली आहेत. एका प्रकारे भागवतांनी रॅबिलेच्या लिखाणाला खनिज मानून त्यातून स्वतःचं खाणकाम केलं आहे. आणि ते करताना धार्मिकता, प्राचीन युरोपातल्या साहित्यकृती व साहित्यिक यांचे उल्लेख बाजूला केले आहेत.

याचाच अर्थ असा की रॅबिलेने जरी चमत्कृती, वैविध्य, संदर्भ, अद्‍भुततेच्या दिशा वगैरेंचा कच्चा माल पुरवला असला; तरी त्यातून एक सलग, सुसंगत, सुबोध आणि रंजक मराठी गोष्ट रचण्याचं कसब भागवतांचं आहे. 'मायापूरचे रंगेल राक्षस' हे भाषांतर नाही, ते रूपांतरही नाही; ती एक स्वतंत्र निर्मिती आहे. फक्‍त त्यातील पात्रं आणि 'मूड' हे सामान उधार घेतलेलं आहे. ज्या कोणाला हे विधान सोयीस्कर वाटेल, त्याने भागवतांच्या गंमतीजंमतींचं मूळ रॅबिलेच्या 'गार्गांटुआ आणि पेंटाग्रुएल'मध्ये शोधण्याचे कष्ट घेऊन पाहावेत!
---
सर्व चित्रे जालावरून साभार

***
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

छान अभ्यासपूर्ण लेखन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहीती-संपृक्त, सविस्तर पण पाल्हाळीक नसलेले अतिशय रोचक लेखन. विशेषतः चांगली ओळख आहे त्यांच्यासाठी, ज्यांनी हे पुस्तक कधी वाचले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख आणि महितीपुर्ण लेख - भारांचे हे पुस्तक वाचले नाही, कुठे मिळू शकेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पुस्तक बुकगंगावर येथे मिळेल. भागवतांची उपलब्ध पुस्तके इथे मिळतील. याशिवाय पुण्याच्या 'उत्कर्ष प्रकाशना'च्या दुकानात प्रत्यक्ष गेलात, तर अनेक पुस्तके मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या अंकातला मला सर्वांत जास्त आवडलेला लेख आहे हा. भागवतांच्या भाषिक गंमतींचं अप्रूप आपल्या सगळ्यांनाच आहे. पण त्या भाषिक गंमती नेमक्या कशातून घडवलेल्या आहेत, त्यानं काय साधतं याचं इतकं साधं आणि तरीही सखोल विवेचन करणं कर्मकठीण. हा लेख आणि ’पाडसा’वरचा लेख ही जोडी म्हणजे भाषांतराचं मूल्यमापन करताना कोणकोणत्या कोनांतून त्याकडे बघावं, याचा वस्तुपाठ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझ्यासाठी या अंकातला हा सर्वोत्कृष्ट लेख. याच अंकात कर्णिकांच्या 'यीअर्लिंग..'लेखात भारांची परकीय गोष्टी आपलंसं करण्यातली मर्यादा तर या इथे कोणतीही अवाजवी स्तुती न करता त्यांची हातोटी - यांचे विद्वज्जड नसलेले, एकेक मुद्दा घेऊन सहज गाठ उकलून दाखवण्याचे, तरीही काटेकोर असे विश्लेषण वाचायला मिळते.

अंकात काही लेखांत 'पात्रांची स्वाभावानुसार सरळसोट विभागणी' यावर खल आहे. इथे कर्णिक 'एखाद्या पात्राविषयी प्रथमदर्शनी जे मत होतं, तेच खरं असतं आणि ते धरून ठेवून वाचत गेल्याने फसगत होत नाही, उलट घटनांची संगती नीट लागत राहते.' या एकाच वाक्यात लहान मुले कुठल्या दृष्टीने गोष्टींकडे पाहत असतील याचे मार्मिक निरीक्षण नोंदवतात. अशी अनेक अचूक निरीक्षणे नेमक्या शब्दांत मांडली गेली आहेत. अंकात भागवतांच्या भाषणात 'परकीय गोष्टींचे रूपांतर असावे की भाषांतर' याविषयीचे विचार सापडतीलच पण एका वाचकाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या भूमिकेचे इतके अप्रतिम विश्लेषण नाही वाचायला मिळत.

तशी भागवतांची अनेक पुस्तकं मी वाचलेली नाहीत नि 'मायापूर..'ही नाही. परंतु हा लेख वाचून 'आता भागतांचे हे पुस्तक वाचायलाच नि आसपासच्या मुलांना वाचून दाखवायलाच हवे' असे इतक्या प्रकर्षाने आधी कुठल्या पुस्तकाविषयी वाटले नाही.

कर्णिकांचे अनेक आभार !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0