Skip to main content

माझं आणि फाफेचं नातं अजून संपलेलं नाही

माझं आणि फाफेचं नातं अजून संपलेलं नाही

- सुमीत राघवन

.इतकी वर्षं काम करत असूनही फास्टर फेणेच्या नावानं मला ओळखणारे लोक अजूनही भेटतात. ’फास्टर फेणे' ही मालिका १९८८ साली 'दूरदर्शन'वरून प्रदर्शित झालीे; म्हणजे जवळजवळ २७ वर्षांपूर्वी. तरीही ती ओळख अजून कायम आहेच.

परवाच मला कुणीतरी विचारलं, "चिडचिड नाही होत? तीसेक वर्षांपूर्वीच्या कामात अडकून बसल्यासारखं नाही वाटत?" मला काय उत्तर द्यावं कळेना. कशी होईल चिडचिड? उलट सुखद धक्का बसतो. एखाद्या अजरामर व्यक्तिरेखेशी असं जोडलं जाणं, ही किती मजेची, सन्मानाची, आनंदाची गोष्ट आहे! लेखकानं निर्माण केलेल्या व्यक्तिरेखेची ती ताकद आहे. त्यात बाकी कुणाचाही मोठेपणा नाही, वा कमीपणाही नाही. ती भारांच्या लेखणीची जादू आहे.

फास्टर फेणे म्हणून माझी निवड झाली, तेव्हा मी फाफेचं काहीच वाचलं नव्हतं. ते नंतर तयारीसाठी म्हणून वाचलं. पण उत्साह मात्र जाम होता. तेव्हा फार काही कळतही नव्हतं. आपण काहीतरी भारी करणार आहोत, इतकंच वाटायचं.

फाफे'च्या रूपात सुमीत

मस्त वातावरण असायचं सेटवर. तेव्हा तिथे भा. रा. भागवत आणि लीलाताई, हे आजीआजोबाही यायचे. त्यांचा फाफे रूपेरी पडद्यावर जाणार, याचं त्यांना अतिशय कौतुक होतं. ते सेटवर यायचे खरे, पण कधीही कशातही लुडबुड नसे. ते शांतपणे बाजूला बसून सगळ्या गोष्टी निरखत असत. त्यांचा धाक कसा तो वाटत नसे. एक विलक्षण शांत गोडवा होता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात. फास्टर फेणेमध्येही तोच गोडवा उतरलेला आहे, असं मला वाटतं. तो धडपड्या मुलगा आहे, पण त्याचा निरागसपणा - त्याच्यातला गोडवा हरवलेला नाही. हा गोडवा जपणं, हे त्या मालिकेपुढचं मुख्य आव्हान होतं, मला वाटतं. एकतर मूळ कथा मराठीत - आणि फास्टर फेणे केला हिंदीत. अर्थात त्याची मजा वेगळी होती. मराठीचं किती नाही म्हटलं, तरी सीमित वर्तुळ असतं. हिंदीची पातळीच निराळी असते. तुम्ही थेट राष्ट्रीय पातळीवरून निरखले जात असता. त्यात मूळ कथेची खुमारी जपायची, राष्ट्रीय प्रेक्षकांना - महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनाही - तो आवडेल याची काळजी घ्यायची आणि गोष्ट म्हणून रंजकता राखायची - असं ते तिहेरी आव्हान होतं. ते त्या मालिकेनं पेललं असं मला वाटतं. नाहीतर इतक्या वर्षांनंतरही मला फास्टर फेणेबद्दल प्रश्न का बरं विचारले गेले असते?!

अगदी सुरुवातीच्या भागात उसाचं गुर्‍हाळ, रस उकळणारी चुलाणं, गुळाच्या ढेपी... असलं काय काय होतं. ते सगळं मी तेव्हाच प्रथम पाहिलं. त्याच भागात मी चक्क एका गाईसोबत काम केलं. तेव्हाची घाबरगुंडी काय सांगू! माझी हालत मला माहीत!

मला आठवतं, त्यानुसार सुरुवातीच्या भागांमध्ये फार गुंतागुंत नव्हती. साध्या-सरळ एकरेषीय गोष्टी होत्या.

व्यक्तिरेखांची ओळख करून देण्यासाठी म्हणून कथानकात तो साधेपणा आपोआपच राखला गेला असावा. पण पुढे पुढे कथानकं थोडी क्लिष्ट, गुंतागुंतीची होत गेल्याचं मला आठवतं. त्यात पात्रंही थोडी जास्त होती, कथानकात थोडे बदलही होते. पण ते भारांच्या गोष्टीला धरून असेल, याची काळजी सुलभामावशी - म्हणजे सुलभा देशपांडे, 'फास्टर फेणे'च्या दिग्दर्शिका - घेत असत.

भारांच्या फास्टर फेणेमध्ये थोडी सुपरहिरोची छटा आहे. त्याला पाहताना आपल्याला ते खटकत नाही, कारण भारांची लेखणी. ते आपल्याला विश्वास ठेवायला भाग पाडतात. पण एरवी तो काही साध्यासुध्या मुलांसारखा नाही. 'अशक्य ते शक्य' करून दाखवणारी एक किमया त्याला अवगत आहे. हा भाग सुलभामावशीला थोडा कमी करायचा होता. कुठल्याही मुलाला शक्य होतील अशी त्या मालिकेतल्या मुलांची साहसं असावीत, 'फार फेच्ड्‍' वाटू नयेत, यासाठी ती प्रयत्न करत असे. तसाच तेव्हाच्या महत्त्वाच्या घडामोडींचाही अंतर्भाव गोष्टींमध्ये करत असे. कर्जतला चित्रित झालेला फास्टर फेणेचा भाग मला अजून स्पष्ट आठवतो. त्या भागातली गोष्ट तेव्हा ऐन भरात असलेल्या चिपको आंदोलनाशी संबंधित होती. तेव्हा खूप मुलांसोबत काम केल्याची मला आठवण आहे.

फाफे आणि कंपू

माझ्या पहिलेपणाच्या खूप आठवणी त्या मालिकेशी निगडित आहेत. पण दुर्दैवाचा भाग असा की, त्याची कोणतीही दृश्य आठवण माझ्यापाशी आज शिल्लक नाही. खरे म्हणजे, माझ्याकडे मालिकेचे काही भाग होते. पण २६ जुलैचा 'तो' पाऊस झाला, त्या वर्षी माझ्याही घरात पाणी शिरलं. त्यात त्या टेप्सही गेल्या. आता त्या मिळवायचा प्रयत्न मी करतो आहे.

फास्टर फेणेचं काम करून झालं, पुढे माझ्या कारकिर्दीत बर्‍याच निरनिराळ्या गोष्टी घडल्या. पण माझं आणि फाफेचं नातं अजून संपलेलं नाही. भागवतांचे चाहते फाफेला विसरलेले नाहीत, हे कारण तर आहेच. पण निराळं, गंमतीदार आणि मला अभिमान वाटेल असंही एक कारण आहे. शाळेत असताना, माझ्या मुलानं, नीरदनं, शाळेच्या वार्षिकोत्सवात फास्टर फेणेची भूमिका केली होती. आता बोला!
---

शब्दांकनः मेघना भुस्कुटे
सर्व छायाचित्रे: जालावरून साभार.

***

ऋषिकेश Tue, 02/06/2015 - 14:57

हा लेख वाचनातून कसा निसटला माहित नाही!
ही मालिका पाहिलेली नाही पण मोठ्यांकडून याबद्दल ऐकलं जरूर आहे.

या मलिकेला मिळवून युट्युबवर वगैरे टाकता आलं तर एक प्रेक्षक म्हणून आनंदच होईल.

==

लेखन/आठवणी आवडल्या.
महाराष्ट्राबाहेर फाफेबद्दल काय मत/प्रतिक्रीया होत्या हे अधिक तपशीलात समजून घ्यायला आवडले असते - उत्सुकता आहे.

बॅटमॅन Tue, 02/06/2015 - 15:02

In reply to by ऋषिकेश

महाराष्ट्राबाहेर फाफेबद्दल काय मत/प्रतिक्रीया होत्या हे अधिक तपशीलात समजून घ्यायला आवडले असते - उत्सुकता आहे.

मुळात महाराष्ट्राबाहेर फाफे किती लोकांना माहिती होता/आहे? यात अनिवासी मराठी आणि नॉनमराठी असे दोन भाग आले. नॉनमराठी जन्तेला फाफे किंवा भारा माहिती तरी असेल की नाही याबद्दल बर्राच डौट आहे.

अनुप ढेरे Tue, 02/06/2015 - 15:14

In reply to by ऋषिकेश

महाराष्ट्राबाहेर फाफेबद्दल काय मत/प्रतिक्रीया होत्या हे अधिक तपशीलात समजून घ्यायला आवडले असते - उत्सुकता आहे.

माझा एक युपी(लखनौ)चा एक (नॉन मराठी) मित्र आहे. त्याने फाफेची मालिका पाहिली होती ८०च्या दशकात. त्याला ती मालिका आणि फा.फे चं पात्र आवडलं होतं. फा.फे चे इंग्रजी अनुवाद शोधत होता. त्या मालिकेचे भाग नेटवर मिळतायत का कुठे ते शोध असही म्हणत होता.

बाळ सप्रे Tue, 02/06/2015 - 16:44

फाफे आणि त्यावरील मालिका विस्मृतीत गेली होती. ऐसीवरील या प्रपंचामुळे आणि खुद्द सुमीतने त्यावरील आठवणी लिहिल्याने परत आठवणींना उजाळा मिळालाय.. उत्खनन करुन कुठे मालिका बघायला मिळाली तर नक्कीच आवडेल..

गवि Wed, 03/06/2015 - 11:00

मस्त लेख.

ही मालिका १९८३ मधे बनवली / दाखवली गेली असा उल्लेख आहे. त्यानंतर पुन्हा एकदा १९८७ - ८८ च्या सुमारास एक री- रन झाला होता का ? कारण कोंकणात आमच्या गावी मुळात टीव्ही दिसायला लागला तोच १९८७ नंतर. आणि तरीही ही मालिका पाहिल्याचं आठवतंय. त्यावेळी ती नव्यानेच बनल्याप्रमाणे वातावरण होतं. फाफेवर टीव्ही सीरियल आली म्हणून प्रचंड उत्साह सुरुवातीला होता. पण भारांच्या पुस्तकात खूप जास्त रमलो असल्याने जसे बघत गेलो तसे या हिंदीतल्या टीव्ही सीरियलने (सर्वच गाजलेल्या पुस्तकांचा दृष्य अवतार बघताना होतो तसा) उत्साह जरा उतरलाच होता.

१. असा मी असामी, शाळा, दुनियादारी इ. यापैकी शाळा आणि दुनियादारीने इन इटसेल्फ फार चांगलं काम केलं होतं, पण पुस्तकाशी तुलना हीच चूक ठरत असावी. फाफेलाही हेच लागू आहे. मुळात भाषाबदलानेच एकदम एलियनेशन झालं. रामायणातला राम इंग्लिश बोलताना कसं वाटेल तत्सम. अर्थात सुमीत यांचं काम तेव्हापासून नेहमीच आवडतं. हिंदी फाफेच्या मर्यादा भाषेमुळेच जाणवत होत्या.

आणखी एक पॉईंटः सुमीत त्यावेळीसुद्धा गोड, देखणे, गोरे, रुबाबदार,शहरी कुमारवयीन मुलाप्रमाणे दिसत असल्याने, फाफेचा खेडवळ, काटकुळा, किडकिडीत, चेहर्‍याचीदेखील हाडे दिसणारा, कदाचित काहीसा कुरुप पोरगा या आधी डेव्हलप झालेल्या इमेजपेक्षा वेगळे दिसले. ;)

गवि Wed, 03/06/2015 - 16:22

In reply to by बाळ सप्रे

खुद्द श्री. सुमीत यांनीच १९८३ लिहिलंय म्हणजे मूळ वर्ष तेच असणार. विकीपानावरही ८३ असाच उल्लेख आहे.

८७ -८८चा बहुधा री-रन असावा.

मेघना भुस्कुटे Wed, 03/06/2015 - 17:16

In reply to by गवि

खातरजमा करून घेण्यासाठी विचारणा केल्या आहेत. पुरेशी उत्तरे मिळाल्यावर माहिती देते. चुकीची शक्यता नजरेस आणून दिल्याबद्दल आभार.
***

ते वर्ष १९८३ नसून १९८८ असे आहे. योग्य तो बदल केला आहे.