Skip to main content

समलिंगी विवाहास मान्यतेचा निर्णय - शुभेच्छुकांचे आभार

जून २६, २०१५ तारखेला यू. एस. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला. कोर्ट म्हणाले, की दोन व्यक्ती एकाच लिंगाच्या असल्या तरी त्यांना कायदेशीर विवाह करण्याचा हक्क आहे. असे विवाह जरी पारंपरिक नसले, तरी विवाहाची चौकट सदैव बदलत आहे हे कोर्टाने लक्षात घेतले. या बदलत्या चौकटीला कोर्टाने घटनेतच स्पष्ट सांगितलेले मूलभूत हक्क लागू केले. त्या आधारावर कोर्टाने निर्णय दिला.

वैयक्तिक संवाद साधून, जाहीर जालीय नोंद करून, किंवा फेसबुकवर इंद्रधनुषी चिन्ह घालून अनेक मित्रांनी मला आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. कित्येक शुभेच्छुकांना या निर्णयातून थेट वैयक्तिक फरक पडणार नव्हता. त्या सर्वांचे माझ्या वतीने मी मनःपूर्वक आभार मानतो. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांचे, आधाराचे, साहाय्याचे महत्त्व तुमच्या अन्य समलिंगी मित्रांनी आणि कुटुंबीयांनी सांगितलेच असेल. गडबडीत कोणाचे सांगायचे राहून गेले असेल, तसे माझ्याकडून न होवो.

समाज तडकाफडकी बदलत नाही. त्या साहाय्याची, आधाराची, शुभेच्छांची गरज चालू राहील. तुमच्या ताज्या पण कोमल शुभेच्छा करपू नयेत, म्हणून मी आणखी काही सांगू इच्छितो.

एखादा परिचित तुम्हाला "ढोंगी" म्हणून हिणवेल, आणि तुम्ही हडबडून विचारात पडाल. कदाचित तुमच्या मनात स्वतःबद्दलच शंका उत्पन्न होईल. आपण या बाबतीत अर्धवट पटून बाकी ढोंग करत आहोत का? आपण या धनंजयला, त्या तिथल्या बिंदूला, पलीकडल्या जॉर्जला मारे पाठिंबा देत आहोत. पण अजून आपल्या कुटुंबात तर अशी परिस्थिती आलेली नाही. आपल्या आईवडलांपैकी कोणी समलिंगी असल्याचे कळले तर आपण त्यांना आधार देऊ की कुटुंबाची वाताहात केल्याचा दोष देऊ? आपल्या मुलामुलींपैकी कोणी समलिंगी जोडीदार शोधू लागेल तर आपण त्यांना प्रेमळ आधार देऊ की रागावून विरोध करू? याबद्दल तुमच्या मनात चलबिचल असेल. तुमच्या याच ऊहापोहाला हेरून तुमचे हसू करू बघणारे लोक तुम्हाला डळमळीत करायचा प्रयत्न करतील. अहो, डळमळीत नसणार्‍यांची सुद्धा "तुम्ही सुसंगत नाही" अशी निंदा करतात - तर इथे ढोपराने नाही का खणणार? अगदी यू. एस. सुप्रीम कोर्टाच्या निकालात सुद्धा फारकत घेणारे जस्टिस स्कलीयाचे पुरवणी मत म्हणते :

“The opinion is couched in a style that is as pretentious as its content is egotistic. It is one thing for separate concurring or dissenting opinions to contain extravagances, even silly extravagances, of thought and expression; it is something else for the official opinion of the court to do so. Of course the opinion’s showy profundities are often profoundly incoherent.”
(मुख्य निर्णयाची) शैली जितकी ढोंगी आहे, तितकी अहंमन्य आहे. निर्णयातील वेगवेगळ्या साहाय्यक आणि विरुद्ध पुरवणी मतांमध्ये विचारांचा आणि अभिव्यक्तीचा अतिरेक असणे, इतकेच काय मूर्ख अतिरेक असणे, हे एकीकडे. परंतु कोर्टाच्या अधिकृत मतामध्ये असे असणे म्हणजे अगदीच वेगळी गोष्ट होय. अर्थात, (अधिकृत) मतातील दिखाऊ खोलपणा स्वतःशी खोलपणे विसंगत आहे. (अधोरेखने माझी आहेत.)

सांगोपांग निर्णयाची "दिखाऊ" आणि "असंगत" अशी हेटाळणी हा विरोधी न्यायाधीश करतो, तर मग साध्यासुध्या तुम्हा-आम्हाला "दिखाऊ" आणि "स्वतःच्या वागण्याशी विसंगत" म्हणाणारे लोकही असणारच ना!

परंतु ज्या लोकांचा मुळातच वैरभाव आहे, ते काहीही करून विरोधच करणार. हे जाणवले, की त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे जमू शकते. "विधवेशी खुद्द विवाह केल्याशिवाय विधवाविवाहाचा पुरस्कार ढोंगीच असतो" असे म्हणणारे कोण असतात? कर्व्यांच्या संस्थांना आर्थिक, राजकीय मदत करणार्‍यांनी त्या संस्था तगू दिल्या हे काय त्यांना कळत नसते? परंतु त्या साहाय्यकांनी खुद्द विधवाविवाह करण्याचा मुद्दा विचारार्ह आहे असा जावईशोध ते लावतात. कर्व्यांच्या समर्थकांनी असल्या निरर्थक टीकांकडे दुर्लक्ष केले. आणि ज्या वेळी जी गरज होती त्या वेळी योग्य ती मदत केली. तेच धोरण तुम्हीही पत्करावे. आज गरज उघड-उघड दिलेल्या आधाराची आणि शुभेच्छांची आहे, तो आधार, त्या शुभेच्छा देत राहाव्या.

परंतु उलट्या टोकाचे परिचित - दुष्ट हेतू नसूनही - अगदी त्याच-त्या शब्दांत तुमची हेटाळणी करतात, तेव्हा तुम्ही खट्टू व्हाल. कारण हे टीकाकार होणार्‍या सामाजिक बदलाचे समर्थक असतात. तुम्ही याबाबत नीट विचार केला नव्हता, पूर्वी विरोध करत होता, तेव्हापासून हे मित्र-परिचित प्रगतीचा पुरस्कार करत होते. म्हणून त्यांचे बोल आपल्याला जिव्हारी लगू शकतात. पण आपण त्यांना थोडे समजून घेऊया.

या लोकांना वाटत असेल - आम्ही केव्हापासून सांगतो आहोत, आणि हे अर्धकच्चे लोक आता पुढेपुढे करत आहेत. तरी या लोकांची टीका तात्पुरती आहे, हे ओळखले पाहिजे. आधीपासून ते प्रगतीचा पुरस्कार करत होते, म्हणजे तुमचेच मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करत होते ना? आता तुमचे मत परिवर्तित होऊ लागले आहे, हे तर या जुन्या शिलेदारांनी आपले यश मानायला पाहिजे. कानामागून आलेल्यांचा तिखटपणा त्यांना तात्पुरता झोंबत असेल. तरी तुम्ही सामील होऊन वाढलेल्या प्रवाहाचे खरे बळ त्यांना लवकरच लक्षात येईल. जर हे त्यांच्या लक्षात येत नसेल, तर ते लोक सारासार विचार करत नाही आहेत - या बाबतील तुम्ही नव्हे, तर त्यांनी बदलले पाहिजे.

हळूहळू बदल होण्याच्या याच तर पायर्‍या असतात. आपण एखाद्या बाबतीत थोडेथोडे पटत जातो, तसे काही-काही बाबतीत कृती बदलत जातो. ज्या कृती बदलणे सोपे आहे, त्या आधी बदलू शकतो - आपले मित्र, सहकारी वगैरे यांना आधार देणे, त्यानंतर तिर्‍हाइतांचे समर्थन, ही सोपी पहिली पावले आहेत. आपल्या कुटुंबातील गुंतागुंत त्या मानाने खूपच क्लिष्ट असते. कठिण बाबतीत तुमच्या मनात अजून चलबिचल आहे - आपल्या मुला वा मुलीने हे सांगितले तर काय करू? - हा दोष नाही. काहीही न करण्यापेक्षा आधी सोपी पावले घेणे निश्चितच चांगले.

दोन्ही टोकांकडून तुम्हाला मिळणारे टोमणे तात्पुरते आहेत. मागे अडकलेले मागे उरतील, आणि पुढून तुम्हाला हिणावणारे तुमच्या साथीचे मोल लवकरच जाणतील. मात्र मी तुमचे मानतो आहे, ते आभार तात्पुरते नव्हेत. तुम्ही तुमच्या शुभेच्छांनी आणि आधारानी माझे जगणे आधी सुसह्य, आणि मग खरोखर आनंदी केलेले आहे. तुम्ही केलेल्या सत्कार्याची शिल्लक तुमच्या शंकाकुशंकांच्या वजेपेक्षा खूप जास्त आहे. माझे टिकाऊ आभार कोणाकोणाच्या तात्पुरत्या टोमण्यांना चुरून उरेल.

पुन्हा मनापासून धन्यवाद.

Node read time
4 minutes

ललित लेखनाचा प्रकार

4 minutes

बॅटमॅन Tue, 30/06/2015 - 12:26

In reply to by आदूबाळ

जर द्वेष करण्याच्या स्वातंत्र्याचा कुणी वापर केला तर त्याचा द्वेष करण्याचे स्वातंत्र्य लोकांना मान्य असते. पण मुळात एखाद्या गोष्टीचा द्वेष करण्याचे स्वातंत्र्य मान्य नसते. भलताच रोचक अन टिपिकल दुटप्पी, ढोंगी प्रकार आहे.

चिंतातुर जंतू Tue, 30/06/2015 - 17:22

In reply to by काळासरदार

>> एखाद्या गोष्टीचा द्वेष करण्याचा स्वातंत्र्याकडे आपण कनवाळू नजरेने का बघत नाही?

मुद्दा नीटसा कळला नाही. म्हणजे तुम्हाला असं काही तरी म्हणायचंय का?

  1. आज प्रगत देशांतले मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर वगैरे समलिंगी लोकांना आजारी समजत नाहीत किंवा ज्यावर आजार नसतानाही उपचार केले जावेत अशा कोणत्याही कॉस्मेटिक व्यंगाचेही (जसे क्लेफ्ट लिप वगैरे) बळी समजत नाहीत.
  2. आज प्रगत देशांतले कायदे समलिंगींना शोषणापासून सुरक्षितताच नव्हे, तर विवाहासारखे अधिकारही देऊ करण्याच्या पक्षाचे होत आहेत.
  3. आज माहितीच्या महास्फोटामुळे वगैरे भारतासारख्या देशांतही हे विचार पोचू लागले आहेत.

अशा परिस्थितीतही एखादा इंटरनेटवर वावरणारा, सुशिक्षित वगैरे असणारा आणि म्हणून समाजात सुसंस्कृत वगैरे मानला जाणारा माणूस जर समलिंगी लोकांचा आणि त्यांच्या लढ्याचा द्वेष करत असेल, किंवा इतरांच्या समलिंगी असण्याला विकृती वगैरे समजत असेल किंवा त्यांना समान हक्क देण्याच्या विरोधात असेल, तर अशा माणसाचं डोकं ठिकाणावर नाही किंवा तो मंदबुद्धी आहे म्हणून त्याच्याकडे कनवाळूपणानं पाहा असं तुम्ही म्हणताहात का?

अजो१२३ Tue, 30/06/2015 - 17:31

In reply to by चिंतातुर जंतू

...प्रगत देशांतले मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर वगैरे समलिंगी लोकांना आजारी समजत नाहीत...

प्रगत देशांतले मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर वगैरे अंध. लंगड्या लोकांना देखिल आजारी समजत नाहीत. त्यांना अंध वा लंगडे आहेत म्हणून अनुचित वागवू नये म्हणणे, त्यांना समाजात समान स्थान, संधि द्या म्हणणे वेगळे, आणि अंध असणे ही समस्याच नाही असे म्हणणे वेगळे.

चिंतातुर जंतू Tue, 30/06/2015 - 17:41

In reply to by अजो१२३

>> प्रगत देशांतले मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर वगैरे अंध. लंगड्या लोकांना देखिल आजारी समजत नाहीत. त्यांना अंध वा लंगडे आहेत म्हणून अनुचित वागवू नये म्हणणे, त्यांना समाजात समान स्थान, संधि द्या म्हणणे वेगळे, आणि अंध असणे ही समस्याच नाही असे म्हणणे वेगळे.

तर्कशास्त्रात अंमळ थोडी गफलत आहे असं नम्रपणे सुचवू इच्छितो. एखाद्या अंध व्यक्तीला शस्त्रक्रियेने दिसू लागणार असेल, तर डॉक्टर ती शस्त्रक्रिया करण्याच्या पक्षाचे असतील. तसंच एखाद्या अपघातात पाय गेल्यामुळे पांगळ्या झालेल्या व्यक्तीला प्रोस्थेटिक पाय बसवून चालता येणार असेल, तर ते करण्याच्या पक्षाचे असतील.

अजो१२३ Tue, 30/06/2015 - 18:42

In reply to by चिंतातुर जंतू

एखाद्या अंध व्यक्तीला शस्त्रक्रियेने दिसू लागणार असेल, तर डॉक्टर ती शस्त्रक्रिया करण्याच्या पक्षाचे असतील...

पण अगदी कोणताही काळ असो, प्रगतीचा स्तर काहीही असो, दिसणे इष्ट असते, अंधाला दिसावे असेच वैद्याला आणि तुम्हाआम्हाला वाटले पाहिजे ना?
==========================================================================================
समलैंगिकता येते कशी हे जाणण्यातच आज वैद्यकशास्त्राची बोंबाबोंब आहे, ती कशी दुरुस्त करायची हा फार पुढचा भाग आहे. सोशोटेक्निकल बाबी लक्षात घेऊन मला खालिल बाबी उतरत्या प्राधान्याच्या वाटतात.
१. ट्रान्सजेंडर लोकांना (ज्यांना क्लॉझिटेड आयुष्य पण जगायचे ऑप्शन नाही.)सन्मान मिळणे.
२. समलैंगिक लोकांना त्यांच्या ओरियेंटेशन प्रमाणे जगता येणे.
३. या विषयांवर रिसर्च होऊन या समस्या कालांतराने नष्ट होणे.

गवि Tue, 30/06/2015 - 18:46

In reply to by अजो१२३

३. या विषयांवर रिसर्च होऊन या समस्या कालांतराने नष्ट होणे.

किंवा

३. ही बाब समस्या नसून नॅचरल व्हेरियंट आहे हे सिद्ध होणे.

हे ऑलरेडी झालं असावं अशी समजूत होती. अजूनही ते सिद्ध व्हायचं असेल तर तुमचा मुद्दा रास्त आहे.

चिंतातुर जंतू Tue, 30/06/2015 - 19:16

In reply to by अजो१२३

१. तुमची स्वाक्षरी -

>> थोर लोकांनी आवश्यक तितके कर्तृत्व अगोदरच करून ठेवले आहे. त्याचा सर्वांनी नीटपणे अनुनय केला तरी पुरे.

२. तुमचे हे वाक्य -

>> समलैंगिकता येते कशी हे जाणण्यातच आज वैद्यकशास्त्राची बोंबाबोंब आहे, ती कशी दुरुस्त करायची हा फार पुढचा भाग आहे.

आणि ३. विकीपीडियावरील ही माहिती -

The longstanding consensus of research and clinical literature demonstrates that same-sex sexual and romantic attractions, feelings, and behaviors are normal and positive variations of human sexuality. There is now a large body of research evidence that indicates that being gay, lesbian or bisexual is compatible with normal mental health and social adjustment. The World Health Organization's ICD-9 (1977) listed homosexuality as a mental illness; it was removed from the ICD-10, endorsed by the Forty-third World Health Assembly on 17 May 1990.

ह्याची सांगड कशी घालायची हे समजत नाही. त्यामुळे तूर्तास थांबतो. बाकी चालू द्या.

अजो१२३ Tue, 30/06/2015 - 19:28

In reply to by चिंतातुर जंतू

अंधत्व "मानसिक" आजार नाही हे म्हणणं वेगळं (जे निर्विवाद सत्य आहे) नि अंधत्व द्रूष्टी रिलेटेड डीसऑर्डर नाही हे म्हणणं वेगळं. इथे अंधत्वाच्या जागी समलैंगिकता घालून पहा. दुर्दैवानं समलैंगिकतेच्या बाबतीत सोशल स्टीग्मा हा जबरदस्त इश्श्यू आहे, शिवाय हार्मोन्स रिलेटेड गोष्टी आहेत. म्हणून ती मानसिक समस्या नाही असं आवर्जून सांगावं लागतं. पण ती लैंगिक समस्या मानायची कि व्हेरियंट मानायचा हा प्रश्न उरतोच. असो.

अजो१२३ Tue, 30/06/2015 - 20:55

In reply to by चिंतातुर जंतू

ह्याची सांगड कशी घालायची हे समजत नाही.

कशी सांगड घालायची ते सांगणं आवश्यक आहे. आपण फक्त (या संदर्भात तरी) सायकॉलॉजी अँड होमोसेक्स्यूअ‍ॅलिटी हे सब-सेक्शन वाचले आहे. त्यात आपण वाचले आहे ते योग्य आहे.
त्यानंतर -
https://en.wikipedia.org/wiki/Biology_and_sexual_orientation

https://en.wikipedia.org/wiki/Environment_and_sexual_orientation
हे वाचा.
किमान त्यानंतर कशाला व्हेरीएंट म्हणायचे आणि कशाला संशोधन नि उपचार आवश्यक असलेली बाब म्हणायचे हे कळायला हवे.
त्यातले हे पहिलेच वाक्य महत्त्वाचे आहे - The relationship between biology and sexual orientation is a subject of research.
आणि हे दुसरं
A simple and singular determinant for sexual orientation has not been conclusively demonstrated; various studies point to different, even conflicting positions, but scientists hypothesize that a combination of genetic, hormonal, and social factors determine sexual orientation.
हे मानायला नकार देऊ नये इतकंच म्हणायचं आहे.
===============================================
एकदा शास्त्रज्ञांचं पक्कं होऊ देत. तोपावेतो व्हेरिएंट की व्याधी ही चर्चा पामर लोकांनी पॉजवावी.

चिंतातुर जंतू Wed, 01/07/2015 - 11:12

In reply to by अजो१२३

>> एकदा शास्त्रज्ञांचं पक्कं होऊ देत. तोपावेतो व्हेरिएंट की व्याधी ही चर्चा पामर लोकांनी पॉजवावी.

कारणं पूर्णतः समजली नसतील, तरीही हे वास्तव बदलत नाही -

There is now a large body of research evidence that indicates that being gay, lesbian or bisexual is compatible with normal mental health and social adjustment. The World Health Organization's ICD-9 (1977) listed homosexuality as a mental illness; it was removed from the ICD-10, endorsed by the Forty-third World Health Assembly on 17 May 1990.

अजो१२३ Wed, 01/07/2015 - 11:15

In reply to by चिंतातुर जंतू

In the context of all my prior responses -
एखादी व्याधी मानसिक व्याधी नाही म्हणजे ती व्याधी नाही असे होत नाही.

चिंतातुर जंतू Wed, 01/07/2015 - 11:28

In reply to by अजो१२३

>> एखादी व्याधी मानसिक व्याधी नाही म्हणजे ती व्याधी नाही असे होत नाही.

आणि व्याधी आहे असं जोवर सिद्ध होत नाही, तोवर तिला व्याधी मानता येत नाही. :-)

अजो१२३ Wed, 01/07/2015 - 11:46

In reply to by चिंतातुर जंतू

अर्थातच.

निसर्गातल्या एखाद्या पाहणीस कोठपर्यंत नॉर्म म्हणायचे, कोठपर्यंत व्हेरिएंट म्हणायचे नि कोठे उपचारणीय व्याधी म्हणायचे याबद्दल शास्त्रज्ञांनी कंक्लूसिव स्टँड घेतलेला नाही. आपणही असं काही म्हणायची घाई करू नये. या तिन्हींच्या शक्यतांच्या, संभावनांच्या (अमॅच्यूअर?) चर्चेस मोकळेपणाने सामोरे जावे. "सिद्ध होत नाही तोपर्यंत नाही" आणि "या विषयावर संशोधन चालू आहे. अजून काही म्हणता येत नाही" इतके जुजबी सब्जेक्टीव मतांतर सन्माननीय आहे.

अजो१२३ Wed, 01/07/2015 - 12:05

In reply to by Nile

नियम चुकीचे? ९८% चा नियम वापरल्याने स्मृती अशी चालत असेल. असो.
===========================================
To be more exact -
न्यूटनचे नियम नियम नसून अ‍ॅक्झियॉम्स आहेत. त्यांना "सिद्ध" नियम मानणे अंधश्रद्धा आहे.

बॅटमॅन Wed, 01/07/2015 - 12:18

In reply to by अजो१२३

न्यूटनचे नियम नियम नसून अ‍ॅक्झियॉम्स आहेत. त्यांना "सिद्ध" नियम मानणे अंधश्रद्धा आहे.

म्हणजे प्रयोग वगैरे करून ते व्हेरिफाञ झालेले नाहीत असं आहे का? नै म्हणजे शाळेत १२वी पर्यंतचे फिजिक्सचे बरेच प्रयोग आठवले म्हणून सांगितलं.

बॅटमॅन Tue, 30/06/2015 - 19:19

In reply to by अजो१२३

थोर लोकांनी आवश्यक तितके कर्तृत्व अगोदरच करून ठेवले आहे. त्याचा सर्वांनी नीटपणे अनुनय केला तरी पुरे.

ते १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या एका गृहस्थांची आठवण आली. त्यांनीही अनुनय केला असता तर...

काळासरदार Tue, 30/06/2015 - 19:51

In reply to by चिंतातुर जंतू

समलैंगिकता ही विकृती नाही, रोग नाही, नैसर्गिक व्हेरिएशन आहे. तसं द्वेष करणं ही विकृती नाही, रोग नाही, चूक नाही, नैसर्गिक व्हेरिएशन आहे मानवी स्वभावाचं असं.
उदारमतवादी असणं, लिबरल असणं, अनेकविधविभिन्न मते आणि जगण्याच्या तऱ्हा असू शकतात असं मानणारा मी असावं असं माझं माझ्याबद्दल मत आहे. पण सगळ्यांनी असं असावं आणि नसतील तर ते चूक आहेत असं जर मी मानत असेल तर घपला आहे.
समलैंगिकतेबद्दल द्वेषाची मते असणाऱ्या माणसाला त्याची कारणे असू शकतात आणि कारणे असलीच पाहिजेत असेही नाही. द्वेष, राग, तिटकारा ह्या आपल्या कृतीच्या प्रेरणा आहेत जसं आनंद ही आहे. आनंदाचा, सुखाचा शोध घेण्याचं माणसाचं स्वातंत्र्य हाच समलैंगिकता आपण मानवी प्रवृत्तीचा भाग मानतो ह्याचा पाया आहे. त्याच तर्कावर मी द्वेषाबद्दल कनवाळू दृष्टी ठेवा असं म्हणतोय.
इंटरनेटवर वावरणाऱ्या माणसाने समलैंगिकतेचा द्वेष करू नये असं गृहीतक आहे का? आणि मुळात तुमच्याकडे काय चूक-काय बरोबर ह्याची यादी आहे का? किंवा हे ठरवायचा निष्कर्ष? आणि कसा काय आला हा निष्कर्ष?

चिंतातुर जंतू Tue, 30/06/2015 - 20:26

In reply to by काळासरदार

>> इंटरनेटवर वावरणाऱ्या माणसाने समलैंगिकतेचा द्वेष करू नये असं गृहीतक आहे का? आणि मुळात तुमच्याकडे काय चूक-काय बरोबर ह्याची यादी आहे का? किंवा हे ठरवायचा निष्कर्ष? आणि कसा काय आला हा निष्कर्ष?

अजिबातच नाही. फक्त,
(१) आजच्या जगात एखादा माणूस जर आपल्या परिसराविषयी आणि जगाविषयी किमान कुतुहल बाळगत असेल, आणि
(२) त्याविषयी त्याला पडणारे प्रश्न सोडवण्यासाठी इंटरनेटवर पुरेशी आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध असेल,
(३) पण तरीही, त्या माहितीकडे दुर्लक्ष करून, असा द्वेष करावासा त्याला वाटत असेल, तर -
(४) तो द्वेष करायला अर्थात स्वतंत्र आहेच, पण मग
(५) त्याच्या वास्तवाच्या आकलनाविषयी काही मूलभूत प्रश्न इतरांना पडले, तर तेदेखील स्वाभाविकच म्हणायला हवं.

आणि, त्या पुढे जाऊन तो जर -
(६) इतरांसमोर द्वेषमूलक वक्तव्यं करत इतरांमध्ये हा द्वेष पसरवू पाहात असेल, तर मग त्याच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा मान राखला तरीही मग -
(७) इतरांना त्याच्याविषयी पडलेले प्रश्न अधिकच गंभीर होऊ लागले, तर तेदेखील स्वाभाविकच म्हणायला हवं.

अजो१२३ Wed, 01/07/2015 - 12:01

In reply to by काळासरदार

इंटरनेटवर वावरणाऱ्या माणसाने समलैंगिकतेचा द्वेष करू नये असं गृहीतक आहे का?

याला उत्तर देण्याचा एक प्रकार म्हणजे तुम्हाला खोडसाळ मानणे. ते टाळू यात.
---------------------------------------------------------------------------------------------------
एक पर्यायी अप्रोच पाहू.
असं समजू या इंटरनेटवर अनेक लॉबीज आहेत आणि त्या अनेक द्वेषपात्र गोष्टींना पाठिंबा देतात. पण यात समलैंगिकतेला गोवायचं कारण काय? ती द्वेषपात्र ठरेल अशी मुद्देसूद कारणे असतील तर द्वेष करा. पण अकारण कशाचाही द्वेष करायची मुभा आहे ही काय विचारसरणी आहे?
---------------------------------------------------------------------------------------------------
आणि एला द्वेष करण्याचे स्वातंत्र्य, बीला त्या स्वातंत्र्याचा आदर करत प्रश्न करण्याचे स्वातंत्र्य, एला नि सीला त्या प्रश्नाचा द्वेष करण्याचे स्वातंत्र्य, बीला नि डीला त्या द्वेषावर प्रश्न करण्याचे स्वातंत्र्य, ... ही साखळी अनंतापर्यंत चालू राहिल. याला काही अर्थ?
===========================================================================================================

तिरशिंगराव Thu, 02/07/2015 - 14:37

समलैंगिक वृत्तीकडे माझा अजिबात कल नाही. मला कायम भिन्नलिंगी म्हणजे फक्त स्त्रियां बद्दलच आकर्षण वाटत आले आहे.
आता याच्याच विरुद्धार्थी वाक्य ऐसीवरील किती सदस्य लिहितील ? म्हणजेच समलिंगी संबंधांना नैसर्गिक म्हणणारे किती सदस्य या चर्चेत, 'होय, मी समलिंगी आहे' असे म्हणू शकतात ? म्हणजे नुसताच नैतिक पाठिंबा देणारे किती आणि ते आचरणात आणणारे किती ते कळेल.

ऋषिकेश Thu, 02/07/2015 - 14:40

In reply to by तिरशिंगराव

बापरे 'समलिंगीं संबंध ठेवणे हा गुन्हा नाही' असं म्हणायचं असेल तर "तुम्ही समलिंगी बना" हा आग्रह फारच लाडीक वाटला बॉ! ;)

ऑन अ सिरीयस नोटः ऐसीवर किमान दोन घोषित समलैंगिक व्यक्तींचे आयडी आहेत.

अजो१२३ Thu, 02/07/2015 - 19:17

In reply to by तिरशिंगराव

ब्रह्मांडात जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं नैसर्गिक आहे. निसर्गातले ते नैसर्गिक ना?
माणसाने जे जे आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर ठरवले, केले ते ते मनुष्यकृत नैसर्गिक.
जे जे जसं कसं आहे त्यात माणसाचा बुद्ध्या काही रोल नाही ते ते अमनुष्यकृत नैसर्गिक.
त्यामुळे समलिंगी संबंध नैसर्गिक, त्यांना नैसर्गिक म्हणणे नैसर्गिक आणि त्यांना अनैसर्गिक म्हणणे सुद्धा नैसर्गिक.
Request you to please rephrase what you wanted to ask.

बॅटमॅन Thu, 02/07/2015 - 19:31

In reply to by अजो१२३

त्यामुळे समलिंगी संबंध नैसर्गिक, त्यांना नैसर्गिक म्हणणे नैसर्गिक आणि त्यांना अनैसर्गिक म्हणणे सुद्धा नैसर्गिक.

वादी आणि प्रतिवादी या दोहोंचे म्हणणे ऐकून दोघांचेही बरोबर म्हटल्यावर प्रधानजी म्हणतात, पण हे राजा, दोघांचंही बरोबर कसं असेल? त्यावर राजा म्हणतो, प्रधानजी, तुमचेही बरोबर आहे.

त्या राजाची आठवण झाली.