Skip to main content

विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका

(वैज्ञानिक संकल्पनांवर सरळसोप्या भाषेत भाष्य करण्यासाठी ही लेखमाला सुरू केलेली आहे)

कधीतरी एखाद्या शांत, स्वच्छ रात्री; शहराच्या प्रकाश प्रदूषणापासून दूर कुठेतरी आकाशात पाहिलं की अक्षरशः अगणित तारे दिसतात. मंदपणे लुकलुकणारे, स्थिर. आणि त्या क्षणात आत्तापर्यंत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक मनुष्यप्राण्याशी आपण जोडले जातो. याच किंवा अशाच आकाशावर त्यांनीही आपले डोळे रोखलेले होते. कोणी तारकांच्या समूहात व्याधांची आणि हरणांची चित्रं पाहिली, कोणी त्यांचा वापर करून जहाजांमधून दर्यावर हुकुमत मिळवत नवीन प्रदेश धुंडाळले, कोणी त्या चांदण्याला कवितेत बांधलं तर कोणी त्यांची निरीक्षणं करून पंचांगं तयार केली, तर बहुतेक इतरांनी जमिनीला पाठ लावल्यावर झोपेच्या अधीन होण्याआधी डोळे भरभरून हे तारे पाहिले. प्रत्येकालाच या अथांग आकाशाने कधी ना कधी मंत्रमुग्ध केलं हे निश्चित. पूर्वी अनेकांची समजूत होती की देवाने माणसाला प्रकाश मिळावा म्हणून चंद्र-सूर्य तयार केले आणि आकाशाचं छप्पर त्यावर बांधलं. त्या छपराला पडलेल्या भोकातून त्या पलिकडचा स्वर्गीय प्रकाशच लुकलुकतो जणू. पण आता आपल्याला माहीत आहे की हे लुकलुकणारे ठिपके म्हणजे आपल्या सूर्यासारखेच तारे आहेत. काही ठिपके तर आपल्या आकाशगंगेप्रमाणे इतर दीर्घिका आहेत. त्यांमध्ये अब्जानुअब्ज तारे आहेत. किती तरी ताऱ्यांभोवती पृथ्वीसारखे ग्रह आहेत. आणि कुणास ठाऊक, त्यांतल्या अब्जावधी ग्रहांवर आपल्यासारखेच जीवही असतील.

हा महाप्रचंड पसारा पाहिल्यावर आपल्याला अनेकदा आपल्या लहानपणाची जाणीव होते. मी, माझं विश्व, माझे त्रास, माझे प्रश्न, माझे आनंद, माझी दुःखं - ही सगळी मला मोठी वाटतात. पण अब्जावधी प्रकाशवर्षांच्या महाप्रचंड विश्वात आपण म्हणजे कःपदार्थ! हा स्वतःच्या क्षुद्रतेचा विचार काहीसा धक्का देणारा असतो. पण त्याच धक्क्यामध्ये आपलं मीपण सांडवून टाकून देण्याची क्षमता आहे. वैज्ञानिक लोक कदाचित विश्व नक्की किती मोठं आहे हे गणितं करून सांगू शकत असतील. पण आपल्या डोळ्यांसाठी ते अनंतच दिसतं. या अनंतात एक क्षणभर का होईना, विलीन होणं हे सुखद असतं.

अवकाशाचा आवाका जसा महाप्रचंड आहे तसाच काळाचाही. आपण जन्मतो आणि ऐशी-शंभर वर्षं जगतो. आपल्या आजीआजोबांविषयीची माहिती आपल्याला त्यांच्या तोंडून कळते. त्याआधीचा इतिहास आपण पुस्तकांमधून वाचतो, सिनेमांमधून पाहातो. पण हजार दोन हजार वर्षं मागे जायला लागलं की इतिहासही अंधूक, धूसर व्हायला लागतो. आणि तेही समजण्यासारखं आहे. माणूस ज्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जन्माला आला, त्या प्रक्रियेचा हा परिणाम आहे. जगण्यासाठी त्याला काल, परवा, आत्ता, या क्षणी, गेल्या मिनिटात, काय झालं एवढंच जाणून घेणं आवश्यक असतं. एखाद्या गोष्टीचे परिणाम शंभर वर्षांनी काय होतील याची पर्वा करण्याची गरज नसते, उपयोगही नसतो. तसंच शंभर वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी काय झालं ज्यामुळे आजच्या क्षणीचं सत्य समोर दिसतं आहे, हेही समजून घेण्याची गरज नसते. त्यामुळे आपली काळाची जाण ही सेकंद-मिनिट-तासावर अधिक असते. दिवस-महिना-वर्षाच्या गोष्टीही जाणून घेऊ शकतो. पण त्या जाणीवांना तितकी धार नसते. दशकं-शतकं-सहस्रकांची तर बातच सोडा. ताऱ्यांकडे पाहाताना जशी दृष्टी तोकडी पडते, तशीच अतिप्राचीन काळाकडे मागे वळून पाहातानाही आपली जाणीव थिटी पडते.

अतिप्राचीन म्हणजे नक्की किती प्राचीन? या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला. पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला. मनुष्याचे जवळचे जातभाई सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर अवतरले. आणि आपला ज्ञात इतिहास आहे काही हजार वर्षांचा. अब्ज, कोटी, लाख, हजार - नुसते कोरडे आकडे बनतात. इतक्या मोठ्या आकड्यांनाही आपल्याला सहजपणे गवसणी घालता येत नाही. एकावर तीनचार पलिकडे शून्यं पडली की 'खूप खूप' पलिकडे समजण्यासाठी आपल्याला गणितं करावी लागतात. त्यापेक्षा आपण एक डोळ्यासमोर प्रतिमा उभी करू. कल्पना करा की तुम्ही दोन्ही हात पसरून उभे आहात. तुमची पसरलेली एक वाव म्हणजे आत्तापर्यंत पृथ्वीवर गेलेला एकंदरीत काळ. तुमच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे पृथ्वीचा जन्म. शून्य वर्ष. आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे आत्ताचा क्षण. या कवेत तुम्ही पृथ्वीचं आख्खं आयुष्य सामावून घेत आहात. या हातावर मनुष्यप्राणी नक्की कुठे आहे? असं विचारणं म्हणजे 'या महाप्रचंड अवकाशात आपण नक्की कुठल्या कणावर आहोत?' असं विचारण्यासारखंच. आपण प्रयत्न करून पाहू.

तुमच्या डाव्या हाताच्या मनगटापर्यंत संपूर्ण अंधार आहे. त्या पहिल्या सुमारे पन्नास कोटी वर्षांआधीचं आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला माहीत असलेले सर्व दगड त्यानंतरचे आहेत. तुमचं मनगट आणि कोपर यामध्ये कुठेतरी अगदी साधे, आदीम जीव पृथ्वीवर अवतरले. हे सर्व जीव एकपेशीय होते. आणि पुढच्या काहीशे कोटी वर्षांपर्यंत सगळी जीवसृष्टी एकपेशीयच होती. तुमच्या डाव्या खांद्याच्या आसपास कधीतरी वातावरणात ऑक्सिजनची वाढ व्हायला लागली. आणि त्याचबरोबर एकपेशीय जीवांची सद्दी संपण्याचे दिवस सुरू झाले. पण तरी हे ताबडतोब झालं नाहीच. पृथ्वीच्या आयुष्याचा विचार करताना तसंही 'ताबडतोब' काहीच होत नाही. त्यानंतर शंभरेक कोटी वर्षांनी, तुमच्या डोक्यापलिकडे, उजव्या खांद्याच्या आसपास पृथ्वीला द्विपेशीय जीवांचं दर्शन झालं. एकदा दोन पेशींचे जीव तयार झाल्यानंतर मग पुढच्या उत्क्रांतीने काहीसा 'वेग' पकडलेला दिसतो. उजव्या कोपराच्या थोडं पुढे, म्हणजे पुन्हा साधारण शंभरेक कोटी वर्षांनी आपल्याला आपल्याला काही जटिल जीवांचे पुरावे मिळतात. पण तुम्ही जोपर्यंत मनगटांपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याच जीवाला हाडं, कवच, दात वगैरेंप्रमाणे कठीण भाग तयार झालेले दिसत नाहीत. तसं झाल्यानंतरच अश्मीभूत झालेले जीवनाचे स्पष्ट ठसे आपल्याला सापडतात. मधल्या बोटाची पहिली दोन पेरं म्हणजे डायनोसॉरचा कालखंड. उरलेलं पेर म्हणजे त्यानंतरची साडेसहा कोटी वर्षं.

त्यानंतर माणूस कधी आला? सुमारे साठ ते सत्तर लाख वर्षांपूर्वी मानवाचा मूळ पूर्वज पृथ्वीवर वावरत होता. हा प्राणी दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करत असे. चिंपांझी किंवा गोरिलांप्रमाणे चालताना हाताची मूठ टेकवून चालत असे. त्याच सुमाराला दोन पायांवर चालणारे आणि हाताच्या मुठींचा वापर करत चालणारे चिंपांझी-गोरिलासारखे प्राणी यांच्या वंशवृक्षाच्या फांद्या वेगळ्या झाल्या. त्यानंतर द्विपादांची फांदी ऑस्ट्रॅलोपिथेकस, आणि होमो इरेक्टस, होमो सेपिअन्स अशा पायऱ्यांनी पुढे गेली. आपण पसरलेल्या काळाच्या वावेत हे अंतर किती आहे? सुमारे सत्तर लाख वर्षं म्हणजे आपल्या बोटाच्या पेराचा एक दशांश भाग. त्यानंतर आलेले होमो सेपिअन काही लाख वर्षांपूर्वीचे, साधारण पंधरा दिवस वाढलेल्या, आता कापायला झालेल्या नखाइतकं अंतर व्यापतात. आणि आपल्याला माहीत असलेला लिखित इतिहास? शेतीप्रधान संस्कृतीनंतरचा इतिहासच आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती म्हणून ठाऊक आहे. या संस्कृतीत काय येत नाही! हराप्पा-मोहेंजोदारो, इजिप्तचे पिरॅमिड, बाबिलोनियन सुमेरियन संस्कृती, महाभारत-रामायणांसारखी महाकाव्यं, सिकंदर-पोरसाची लढाई, येशू-बुद्ध-पैगंबरांचे धर्म, चेंगीझ खान-हिटलरसारखे क्रूरकर्मा आणि त्यांची युद्धं सगळं काही येतं. ज्ञात-अज्ञात अशा अब्जावधी लोकांची आयुष्यं, त्यांची सुखं-दुःखं, त्यांनी जीवनाशी दिलेले लढे, त्यांचे लहानमोठे जय-पराजय... अब्जावधी आयांनी आपल्या मुलांना दिलेले जन्म आणि सोसलेल्या वेदना, जोपासलेल्या आशा, त्यांची फळलेली किंवा विझलेली स्वप्नं... एवढा महाप्रचंड आवाका या काळाच्या कवेत कुठे बसतो?

तुमच्या किंचित वाढलेल्या नखाकडे पाहा. आता ते नख भिंतीवर थोडं घासा. नखाचे काही कण निश्चितच भिंतीला चिकटले असतील. तुमच्या नखाची लांबी किंचित कमी झाली. काळाच्या कवेच्या तुलनेत मनुष्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची लांबी एवढीच आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या सुमारे एक शतांश!

आपल्या आकाशगंगेत दहाहजार कोटी तारे आहेत, अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत... कित्येक ताऱ्यांभोवती ग्रह फिरतात... त्या ग्रहांवरही कदाचित सृष्टी असेल, त्यांच्यातही आपल्यासारखे प्रगत जीव असतील. त्यांचेही इतिहास कदाचित असेच समृद्ध असतील. कदाचित त्यांचेही इतिहास अशाच नखाच्या टोकांवर मावणारे असतील. त्यांनाही त्या नखाच्या टोकावरच्या कणाच्याही कणात आपलं आयुष्य मर्यादित करण्याची सवय असेल. आपण आपलं आयुष्य असं कणात व्यतित करतोच. पण याचा अर्थ असा नाही की तो आपला लहानगा कप्पा सोडून इतर विश्व तपासून पाहूच नये. आपण लहान आहोत, क्षुद्र आहोत म्हणून इतक्या भव्य दिव्यतेकडे डोळे उघडून पाहूच नये असं नाही. किंबहुना या विराट विश्वाकडे पाहून त्यातल्या प्रत्येक कणाच्या वेगळेपणातून आपण थक्क व्हायला हवं. आपल्या मर्यादित कणाच्या मर्यादित अवकाशात डोळ्यांवर झापड लावून बसलो, तर या आनंदाला आपण मुकून जाऊ.

कणाकणाने का होईना, पण या विश्वरूपाचं आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करायला हवा. या काळाच्या विशाल कवेत आपला कण सामावून देऊन त्याला आपले हात पसरून मिठी मारायला हवी.

(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

Node read time
5 minutes

ललित लेखनाचा प्रकार

5 minutes

स्नेहांकिता Mon, 10/08/2015 - 09:34

विश्वाच्या ओळखीची सुरुवात रोचक झाली आहे. सोपी भाषा आणि उपमा यामुळे लेखन खुमासदार झाले आहे.
पुढे ?

राजेश घासकडवी Mon, 10/08/2015 - 09:37

In reply to by स्नेहांकिता

दर सोमवारी मीमराठी लाइव्ह या वर्तमानपत्रात या लेखमालेचे भाग प्रसिद्ध होतात. आत्तापर्यंत तीन भाग प्रसिद्ध झाले आहेत. ऐसीवर प्रसिद्ध करायचे असल्यास ते काही काळाने प्रसिद्ध करावेत अशी विनंती मीमराठी लाइव्हच्या संपादकांनी केलेली आहे. तेव्हा साधारण आठवड्याला एक या दराने ही लेखमाला इथेही प्रसिद्ध करण्याची इच्छा आहे.

राही Mon, 10/08/2015 - 14:58

लेखमालेचे स्वागत.
पहिला भाग आवडला.
वेगळ्या विषयावरची शास्त्रशुद्ध माहिती वाचायला मिळणार या अपेक्षेने आनंदित.

अतिशहाणा Mon, 10/08/2015 - 20:04

In reply to by राही

गुरुजींकडून चांगलीच लेखमाला येणार या अपेक्षेने अानंदित झालो आहे.

अजो१२३ Mon, 10/08/2015 - 18:16

लेखमाला अतिशय सुंदर भाषेत सुरु झाली आहे. प्रचलित शास्त्रीत ज्ञान आणि तत्त्वज्ञान मांडायला अतिशय नेमके शब्द वापरले आहेत.
===================================================
या लेखमालेचा प्रतिवाद बहुधा अभिप्रेत नसावा. तरीही ... द्विपेशी जीवांबद्दल केलेले विधान धाडसी वाटते.

तिरशिंगराव Mon, 10/08/2015 - 19:27

पुढच्या भागांची दर आठवड्याला वाट पाहिली जाईल.

गवि Tue, 11/08/2015 - 12:59

काळाप्रमाणेच या एकूण विषयाचा आवाका फार मोठा आहे. धाडस आहे यावर काही लिहायला सुरु करणं म्हणजे सुद्धा. स्वतःला किती थोपवणार आणि विचार चॅनेलाईज कसे करणार, फॅक्चुअल माहिती त्यात नेमकी कशी आणि कुठे पेश करणार? असे प्रश्न जागोजागी तुम्हाला पडत असणार. कष्टाचं काम आहे. शुभेच्छा.

काळ हीच संकल्पना मुळात बरीच विचित्र आहे. निव्वळ "जाणवते" म्हणून मान्य करावी लागणारी. भौतिकशास्त्राचे नियम काळाची एकच एक दिशा न मानणारे आहेत, आणि आपण मात्र अपरिहार्यपणे काळ एका दिशेत न थांबता चालला आहे असं मानल्याशिवाय जगूच शकत नाही आहोत.

राजेश घासकडवी Tue, 11/08/2015 - 19:08

In reply to by गवि

वर्तमानपत्रात लिखाण करत असल्याने हजार शब्दांची मर्यादा आहे. त्यामुळे एका लेखात एक संकपना मांडणं असा विचार आहे. मोठ्या विषयांचे बाइट साइझ तुकडे करणार आहे. आकार कसा येतो ते पाहायचं.

आदूबाळ Tue, 11/08/2015 - 19:37

In reply to by गवि

..आपण मात्र अपरिहार्यपणे काळ एका दिशेत न थांबता चालला आहे असं मानल्याशिवाय जगूच शकत नाही आहोत.

म्हणजे?

मला वाटत होतं एकदिशीय (युनिडायरेक्शनल) काळ हे भौतिकशास्त्रातही वास्तव म्हणून स्वीकारलं आहे. उदा० माणूस म्हातारा होतो, फूल सुकतं, वगैरे.

धनंजय Tue, 11/08/2015 - 21:18

In reply to by ग्रेटथिंकर

नवीन नाही, बहुधा.

फाइनमन डायग्रॅम काढून कालावकाशाचे एकत्र अवगमन करतात, ते असेच.

नव्या सिद्धांतापेक्षा "त्याच सिद्धांताच्या वर्णनाची वेगळी पद्धत" असे म्हणू शकतो, कदाचित.

धनंजय Tue, 11/08/2015 - 22:30

ज्ञानेश्वरांच्या रचनेत ("विश्वाचें आर्त माझें मनीं प्रकाशलें") "आर्त" शब्दाचा अर्थ नेमका काय आहे?
आजकाल आपण "आर्त वेदना", "शोकार्त" वगैरे, उदाहरणांत ते रूप वापरतो, तो अर्थ नसावासे वाटते.
"ऋत=सत्य/चांगले" पासून झालेला असा हा "आर्त" शब्दाचा अर्थ असू शकेल का?

राजेश घासकडवी Wed, 12/08/2015 - 00:10

In reply to by धनंजय

मला नक्की माहीत नाही, पण एकंदरीत संदर्भावरून मला सार, इसेन्स किंवा कोळ अशा अर्थाचं काही वाटलं. त्यात एक प्रकारची तीव्रता ('तीव्र आम्ल'प्रमाणे) आहे. त्यामुळेच बहुधा इंटेन्स या अर्थानेही तो वापरला जात असावा.

पिवळा डांबिस Fri, 14/08/2015 - 01:21

आपण लहान आहोत, क्षुद्र आहोत म्हणून इतक्या भव्य दिव्यतेकडे डोळे उघडून पाहूच नये असं नाही. किंबहुना या विराट विश्वाकडे पाहून त्यातल्या प्रत्येक कणाच्या वेगळेपणातून आपण थक्क व्हायला हवं. आपल्या मर्यादित कणाच्या मर्यादित अवकाशात डोळ्यांवर झापड लावून बसलो, तर या आनंदाला आपण मुकून जाऊ.

कणाकणाने का होईना, पण या विश्वरूपाचं आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करायला हवा.

चांगली सुरुवात आहे, राजेश. आवडली.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत...

नितिन थत्ते Sat, 15/08/2015 - 16:59

वा वा वा

घासकडवींच्या साध्या सोप्या भाषेत मांडलेलं चांगलं काहीतरी वाचायला मिळणार आता.

(उत्क्रांती मालिकेपासूनचा घासुगुर्जींचा फ्यान) नितिन थत्ते