Skip to main content

बॉलीवूडचे ‘बोलट’

अनेक चित्रपटांत तो दिसतो. कधी पार्टीमध्ये हातात चषक घेऊन, तर कधी सगळं रामायण घडून गेल्यावर एण्ट्री मारणारा पोलिस ऑफिसर म्हणून. त्यातल्या त्यात उल्लेखनीय म्हणजे, ‘दामिनी'मध्ये ज्या जज साबला सनी देओल ‘तारीख पे तारीख’वरचं लेक्चर सुनावत असतो, तो जज साब ‘तो'च होता. किंवा ‘इश्क'मध्ये जॉनी लिवर एका पार्टीमध्ये एका आगंतुक पाहुण्याची मजा उडवतो, तो आगंतुक पाहुणा म्हणजे ‘तो'. ‘तो'ला नाव गाव काही नाही. ‘तो’ बहुतेक इथे हिरो बनायला आला असेल. आता तर तो डायनॉसॉरसारखा नामशेष झाला असेल. असाच एक ‘तो', काही वर्षांपूर्वी मुंबईमधल्या आमदार निवासात मुक्काम ठोकायचा प्रसंग आलेला तेव्हा माझ्या बाजूला सतरंजीवर अंगाचं मुटकुळं करून झोपला होता. त्याने ‘सत्या'मध्ये होम मिनिस्टरचा रोल केला होता. मी त्याला ओळखलं आणि त्याच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. आपल्याला पण ओळखणारे लोक आहेत, हे बघून त्याच्या डोळ्यात पाणी यायचं शिल्लक होतं. "एमएलए साबके पीए को कभी कभार शूटिंग दिखाने ले जाता हूँ, तो रात को सोने का प्रबंध हो जाता है।’ शुद्ध तुपातल्या हिंदीमध्ये त्याने मला सांगितलं होतं. ‘आगे क्या?’ या माझ्या प्रश्नावर स्वस्त सिगारेटचा झुरका घेत तो शून्यात बघत बसला होता...
एखाद-दुसऱ्या प्रसंगांपुरते हजेरी लावून जाणारे अभिनेते, हा बॉलीवूडमधला अतिशय दुर्लक्षित विषय आहे. व्यक्तिपूजा हा स्थायीभाव असणाऱ्या देशात हे तसं स्वाभाविकच. हे लोक नव्वदच्या दशकातल्या सिनेमांमध्ये खूपदा दिसतात. या लोकांना आयुष्यात एकदाही मुख्य भूमिका मिळत नाही. हे लोक बहुधा मुख्य खलनायकाचे ‘साइड किक' असतात. काही बिनमहत्त्वाचे संवाद, जमलं तर बलात्काराचा एखादा प्रयत्न, तीन-चार विकट हास्य आणि यांचा पडद्यावरचा खेळ खतम!
अभिनयाला उपजीविका बनवण्याचा निर्णय घेताना यांच्या डोक्यात नेमकं काय होतं, याचं कुतूहल मला नेहमी वाटतं. लोक यांना फक्त चेहऱ्याने ओळखतात, नावाने नाही! एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली असू शकते? खलनायक किंवा पडद्याला व्यापून दशांगुळे उरलेल्या नायकांच्या वटवृक्षात ही रोपटी कायमची खुरटून गेलेली असतात...
या संदर्भात, सर्वात प्रथम आठवतो तो महावीर शाह. काही लोकांच्या चेहऱ्यावरच खलनायक असं लिहिलेलं असतं. महावीर शाह त्यांच्यापैकी एक होता. त्याने चुकून एकदा सलमान खानच्या ‘जुडवा' चित्रपटामध्ये एका सज्जन पोलिस ऑफिसरची भूमिका केली होती, तर प्रेक्षकांना शेवटपर्यंत (म्हणजे पडद्यावर त्याची हत्या होईपर्यंत) हा कधी ‘कलटी' मारतो, याची भीती वाटत होती. मध्ये अझीझ मिर्झा आणि शाहरुख खानच्या चित्रपटांचं पेव फुटलं होतं, त्यात हा हमखास असायचा. हा २०००मध्ये एका अपघातात मेला. काही वर्तमानपत्रांनी चौथ्या-पाचव्या पानावर ही बातमी छापली. महावीर शाह या दुर्लक्षित अभिनेत्याची प्रसारमाध्यमांनी घेतलेली ही पहिली आणि शेवटची दखल.
शोले’मध्ये मॅकमोहनचा दुसरा संवाद कुठला, ते सांगा? असा क्रूर विनोद मध्यंतरी फिरत होता. क्रूर या अर्थाने की, आयुष्यातली चाळीस वर्षं फिल्म इंडस्ट्रीमध्ये घालवून पण या माणसाचा ‘शोले' तर जाऊच दे, इतर कुठल्याही चित्रपटामधला दुसरा संवाद पण कुणाला माहीत नाही. (खरं तर ‘शोले'मध्येच ‘चल बे जंगा, चीडी की रानी है’ असा संवाद इतर डाकूंसोबत पत्ते खेळताना तो बोलतो). आपला चित्रपटामधला रोल खूप लहान आहे, म्हणून स्वतः मॅकमोहनने आयुष्यात कधीच ‘शोले’ बघितला नाही. क्रिकेटर बनण्यासाठी मुंबईला आलेला मॅकमोहन कायम चित्रपटात दुय्यम-तिय्यम भूमिका बजावत राहिला. तो गेला तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेला इनमिन दहा लोक होते...
या यादीत महिला कलाकार पण आहेत. सगळ्यात पहिलं आठवतं, ते नाव मनोरमाचं. हिचं खरं नाव एरिन इसाक डॅनियल. ही मूळची लाहोरची. हिरोइन बनण्यासाठी मुंबईला आली. हिचा अवतार बघून हिला कोण मुख्य अभिनेत्रीचं काम देणार? मग हिने मिळतील त्या फुटकळ भूमिका करायला सुरुवात केली. पण हिचा अभिनयाचा सेन्स उत्तम होता. ‘सीता और गीता’मधल्या हेमामालिनीच्या खाष्ट काकूच्या भूमिकेत हिने मस्त रंग भरले. ‘नया दिन, नयी रात’मधली हिची छोटी, पण छान भूमिका चित्रपट रसिक लक्षात ठेवतील. सुंदर आणि सडपातळ नसल्याचा फटका हिला बसला आणि आयुष्यभर ‘फुल फ्लेज’ म्हणावी, अशी एक पण भूमिका हिला मिळाली नाही.
रझ्झाक खान म्हटल्यावर प्रेक्षक "कोण हा?' असे विचारतील. दुर्दैवाने लोक याला ‘गुंडा’ चित्रपटातल्या त्याच्या ‘लकी चिकना’ या विचित्र नावाच्या व्यक्तिरेखेमुळे ओळखतात. अक्षय कुमारच्या ‘मोहरा’मध्ये त्याने एका उपखलनायकाची आणि त्याच्या कारकिर्दीमधली एकमेव सिरियस भूमिका केली होती. गोविंदाच्या नव्वदच्या दशकामधल्या चित्रपटात हा हमखास हजर असायचा. पण सध्या चित्रपटांमध्ये त्याच्यासारख्या अतरंगी नटाला स्पेसच राहिलेली नाही...
बॉब क्रिस्टो. ‘विदेशी स्मगलर’चा बॉलिवूडी चेहरा. पडद्यावर सगळ्यात जास्त मार खाणारा इसम म्हणून याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‌्स’मध्ये नोंद होऊ शकते. सिडनीमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असणारा हा उंचापुरा माणूस, झिनत अमानच्या प्रेमापोटी (अर्थातच एकतर्फी) मुंबईला आला आणि इथलाच झाला. ‘स्मगलर’च्या भूमिकेत टाईपकास्ट झाल्यामुळे याला ठरावीक लांबीच्या आणि वकुबाच्या भूमिका मिळत गेल्या. ‘मिस्टर इंडिया'मधली याची भूमिका त्यातल्या त्यात गाजली. मिस्टर इंडिया याला हनुमानाच्या मूर्तीने मारतो, तेव्हा त्यात आता ‘धार्मिक राष्ट्रवाद' शोधणारं पब्लिक टाळ्या पिटायचं.
कांती शाहचा ‘It's so bad, that it's good’ सिंड्रोममुळे प्रेक्षकप्रिय असलेला ‘गुंडा’ चित्रपट म्हणजे या ‘साइड किक’चे जागतिक संमेलन होते. लंबू आटाच्या भूमिकेमधला इशरत अली, इबु हटेलाच्या भूमिकेमधला हरीश पटेल, इन्स्पेक्टर काळेच्या भूमिकेमधला राणा जंग बहादूर, काला शेट्टीच्या भूमिकेमधला रामी रेड्डी, बचुभाई भिगोनाच्या भूमिकेतले दीपक शिर्के, लकी चिकनाच्या भूमिकेमधला रझ्झाक खान अशी उपखलनायकांची मांदियाळी या चित्रपटात उसळली होती.
अजूनही कित्येक नावं आहेत. तेज सप्रु, महेश आनंद, राणा जंगबहादूर, पिंचू कपूर, पद्मा खन्ना किती नावं घ्यावीत. हल्ली खलनायकाचे ‘साइड किक' ही गोष्ट आपल्या चित्रपटामधून नामशेष होत आहे. कारण मुळात ‘खलनायक’ ही संस्थाच नामशेष होत चालली आहे. ती का नामशेष होत आहे, हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. मागच्या पाच वर्षांतला एक प्रभावी खलनायक सांगा म्हटलं तर कुठलं नाव आठवतं? एखादा प्रकाश राज सोडला तर दुसरं नावं आठवणार नाही. मग मुळात खलनायकच नसेल तर त्याचे ‘साइड किक' कुठून दिसणार?
पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली'मधील ‘जनार्दन नारो शिंगणापूरकर' उर्फ बोलट ही एक व्यक्तिरेखा होती. पुलंच्या शब्दांत... जनू ‘बोलट' होता. नाटक कंपनीत ज्याच्या नावाची जाहिरात होते तो नट आणि बाकीचे ‘बोलट', अशी एक विष्णूदास भाव्यांच्या काळापासून चालत आलेली कोटी आहे. या दरिद्री कोटीचा जनक कोण होता कोण जाणे; परंतू जनू हा त्या कोटीचा बळी होता... हे ‘साइड किक' अभिनेते म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे बोलटच. यांचं कधी नाव झालं नाही. समीक्षकांनी कायम यांना अनुल्लेखाने मारले. त्यांची कधी धड नोंद पण घेतली गेली नाही. बॉलीवूड म्हणजे सुपरस्टार्स, हिरो-हिरोईनची लफडी, करोडोंची आकडेमोड नाही तर अनेक तुटलेल्या आणि कधीच पूर्ण न झालेल्या शेकडो स्वप्नांची कब्रस्तान पण आहे. आपल्या मर्यादित वकुबाने बॉलीवूडला पुरेपूर योगदान देणाऱ्या आणि कधीच श्रेय न मिळालेल्या अभिनेत्यांना एका चित्रपट चाहत्याचा मानाचा मुजरा.

आदूबाळ Sun, 17/01/2016 - 19:47

क्या बात! जबरदस्त!

किरण नगरकरांच्या "रावण अँड एडी"चा दुसरा भाग "दि एक्सट्राज" वाचला नसेल तर जरूर वाचा.
......

अशीच आमिर खानच्या चित्रपटातली बोलटमंडळी आठवली. जो जीता वहीं सिकंदर मधला "घोडा" म्हणजे लगानमधला "कचरा" आदित्य लाखाणी. त्याचा जोडीदार घनशू मात्र पुढे चमकला - साराभाई वि साराभाईचा दिग्दर्शक आणि साराभाईचा टेकक्रेझी जावई दुष्यंन्त. नाव मात्र विसरलो.

अमुक Sun, 17/01/2016 - 20:37

In reply to by आदूबाळ

देवेन भोजानी. 'जो जीता..'नंतर लगेचच 'देख भाई देख'मध्ये नोकराच्या भूमिकेत आला.
त्याने आता 'सुमीत सँभाल लेगा' ही Everybody Loves Raymondच्या धरतीवर मालिका दिग्दर्शित केली आहे.

गब्बर सिंग Fri, 22/01/2016 - 10:12

In reply to by आदूबाळ

किरण नगरकरांच्या "रावण अँड एडी"चा दुसरा भाग "दि एक्सट्राज" वाचला नसेल तर जरूर वाचा.

आयम मिस्सिंग निपो !!

अमुक Sun, 17/01/2016 - 20:39

येथील सदस्या मेघना भुस्कुटे यांनी यापूर्वी अश्याच आशयाचा 'आसमाऽऽन में... लाऽऽखों तारें...टॅडॅड्यॉव...' हा धागा काढला होता. त्याखालील प्रतिसादही अवश्य वाचावेत.

नगरीनिरंजन Mon, 18/01/2016 - 05:44

बळंच! असं तर मग बँकेतले कारकून, पोस्टमन आणि शाळेतले शिपाई वगैरे लोकांनाही मानाचा मुजरा केला पाहिजे. कमीतकमी ते स्वतःची कुवत ओळखून आणि प्रसिद्धी-पैशाची हाव न धरता साधं जगतात. बॉलिवूडच्या नटांना जिथे साधा रामराम घालायची इच्छा नाही तिथे बोलटांना मानाचा मुजरा कोण घालणार?

अरविंद कोल्हटकर Mon, 18/01/2016 - 10:19

Shukno Lanka अशा नावाचा एक बंगाली चित्रपट माझ्या पाहण्यात काही वर्षांपूर्वी आला होता. मूळ धाग्यात वर्णिलेला विषयच येथे अतिशय समर्थपणे दाखविण्यात आला आहे.

चित्रपट बंगाली असला तरी वरच्या यूटयूब लिंकमध्ये त्याला इंग्रजी सबटायट्लसहि आहेत त्यामुळे चित्रपट चांगला समजतो. मिथुन चक्रवर्तीने येथे 'ज्यूनिअर आर्टिस्ट'ची - तुमच्या भाषेत बोलट - भूमिका केली आहे. तीस वर्षे अशा भूमिका करूनहि तो अंधारातच आहे आणि साधेसुधे मध्यमवर्गी जीवन जगत आहे. अखेर दिग्दर्शकाची नजर त्याच्यापर्यंत पोहोचते - कसे ते आता आठवत नाही आणि ते शोधण्यासाठी पूर्ण सिनेमा पाहण्याचाहि कंटाळा आला आहे - आणि अखेर एका सिनेमात त्याला प्रमुख भूमिका मिळून त्याचा चेहरा सिनेमाच्या पोस्टर्सवर झळकतो. ते आपल्या साध्यासुध्या बायकोला दाखविण्यासाठी तो एका संध्याकाळी घोडागाडीतून जातो आणि पोस्टर तिला दाखवतो येथे चित्रपट संपतो.

चित्रपटाला काही अ‍ॅवॉर्डस वगैरे मिळालेली दिसत नाहीत पण IMDB rating ७.९ आहे. जरूर पहावा असा चित्रपट.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/01/2016 - 01:17

दोन-चार दिवसांपूर्वीच लगानमधला, आमीर खानच्या क्रिकेटटीममधला एक खेळाडू असणारा नट गेला. मलाही आता त्याचं नाव आठवत नाही.

राम गोपाल वर्माच्या सिनेमात एक काळसर, तुकतुकीत, गटलू असतो. "साला चाय से जादा केटली ही गरम है" हा त्याचा हेराफेरीतला डायलॉग आणि एकंदर अभिनय भारीच. हा तो प्रसंग - https://youtu.be/bclbJ6X-UeM?t=1m33s

फारएण्ड Sat, 23/01/2016 - 10:23

In reply to by नितिन थत्ते

पॉइंट बरोबर आहे. पण थोड्याश्या लक्षात राहणार्‍या आहेत - सुधीर म्हणजे सत्ते पे सत्ता मधला 'सोम' बहुधा, तसेच 'फेके हुए पैसे' चा ओरिजिनल बुट बॉलिश सीन आहे त्यातला तो उचलून देणाराही, शान मधेही एक दोन लक्षात राहणारे सीन्स आहेत. जगदीश राज चा ही डॉन मधला दोन मिनीटाचा रोल लक्षात राहणारा आहे. राम सेठी म्हणजे 'प्यारेलाल' ना? अमिताभचा साईडकिक अनेक चित्रपटात? आता पीके मधेही येउन गेला.

अनु राव Mon, 25/01/2016 - 18:27

In reply to by फारएण्ड

सुधीर देवांनद च्या ७० च्या दशकातल्या सर्वच सिनेमात असायचा. आणि रोल पण असायचे बर्‍यापैकी. आठवा गँबलर

अस्वल Fri, 22/01/2016 - 00:13

मॅकमोहन- एका ओळीचा बादशाह. शिवाय रविना टंडनचे मामा.
सत्येन कपूर - ३०० पेक्षा जास्त चित्रपटात बाबा, कमिशनर, चांगुलपणावाला माणूस इ.
जगदीश राज - स्वत:च घरून पोलिसाचे कपडे चढवून येणारा कलाकार.
शेट्टी- रोहित शेट्टीचे बाबा म्हणून ओळखले जाण्याआधीचा टॉप साईड विलन.
दिनेश हिंगू - "हॅ हॅ हॅ".. हिंदी चित्रपटातला पारशी बावा
अपराजिता - निरूपा रॉय नंतरची हिंदी चित्रपट आई (८०-९०)
गेविन पॅकार्ड/ बॉब क्रिस्टो - हमखास फिरंगी दुष्टात्मे.
हरपाल सिंग/मनमौजी/चार्ली - दुय्यम किंवा तिय्यम विनोदी पात्र.

शिवाय बाकी लोक जे कुठलेही छोटे रोल करून जातात... उ.दा. केदार सेहगल, राणा जंग बहादूर वगैरे.

विषारी वडापाव Sun, 24/01/2016 - 11:11

In reply to by अनुप ढेरे

मागच्या वर्षी येउन गेलेल्या 'सुलेमानी किडा ' या भन्नाट पिक्चरमध्ये याने एका मसाला फिल्म प्रोड्युसर चा भारी रोल केला होता .

फारएण्ड Sat, 23/01/2016 - 10:28

त्याची एक मुलाखत नुकतीच वाचली. त्यावरून तरी वरकरणी वाटतो त्यापेक्षा बराच 'थिंकिंग कॉमेडीयन' आहे असे दिसते. बराच अभ्यास आहे त्याचा. एवढ्यात त्याचा एखादा भारी रोल पाहिला नाही, त्यामुळे तुम्ही म्हणता तसेच मलाही वाटते. अब्बास-मस्तान यांच्या चित्रपटात त्याला एक कन्सिस्टंट कॅरेक्टर असायचे, बाजीगर मधल्या विसरभोळ्यासारखे. त्याची 'हम आपके दिल मे रहते है' मधली सतीश कौशिक बरोबरची बहुभाषिक जुगलबंदी महाधमाल आहे :)
https://www.youtube.com/watch?v=J-qTmS-p9Zo
(आणखी तीन चार क्लिप्स चे मिळून हे कलेक्शन आहे, कारण पिक्चर मधे ती रिकरिंग थीम आहे)

अतिशहाणा Tue, 26/01/2016 - 01:22

In reply to by फारएण्ड

जॉनी लिवरचे अनेक चित्रपटातले विनोदी सीन्स धमाल विनोदी आहेत. दिवाना मस्ताना मधला त्याचा रोल अनिल कपूर पेक्षा चांगला होता. लव के लिए साला कुछ भी करेगा मधला असलमभाई पण जबरा. जुदाईतल्या अब्बा-डब्बा-चब्बा सीक्वेन्समध्ये त्याने अनेक अभिनेत्यांची उत्कृष्ट नक्कल केली आहे. कादरखान बरोबरचे गोविंदाच्या चित्रपटातील त्याचे विनोदी प्रसंगही मस्त आहेत

राजन बापट Sun, 24/01/2016 - 06:02

In reply to by राजन बापट

आणि हाही :
http://hindi-movies-songs.com/actor-photos/Actor_Photos2.html

दोन्ही दुव्यांमधल्या काही रोचक गोष्टी :
- काही आघाडीचे मराठी कलाकार "कॅरॅक्टर आर्टीस्ट्स" म्हणून गणलेले दिसताएत
- सर्व लोकांची नावं असल्याचं एक मोठ्ठं समाधान वाटतं. "अरे हा कोण" "ही कोण" यामुळे वाटणारी हळहळ टळली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 26/01/2016 - 01:09

'क्रायटेरियन कलेक्शन' नावाची कंपनी जुन्या, उत्तमोत्तम चित्रपटांच्या डीव्हीड्या गेली काही वर्षं काढतंय. क्रायटेरियनचं नाव बघितलं की मी सिनेमाचं नाव न वाचता ग्रंथालयातून डीव्हीडी आणते आणि कधीही निराशा होत नाही. क्रायटेरियन फक्त सिनेमे प्रकाशित करतात असं नाही, ते दिग्दर्शकासंबंधी, चित्रपटासंबंधी मुलाखतीही त्यातून प्रकाशित करतात.

अशीच एक डीव्हीडी लुईस बुन्युएल या दिग्दर्शकाच्या चित्रपटाची आणि त्यात त्याच्याबद्दल मुलाखत होती. त्यात एकाने सांगितलं की त्याच्या चित्रपटात मुनी नावाची बाई कायम असायची. तिच्या भूमिका अगदी किरकोळ असत. दोन-चार मिनिटांच्या वर नाहीतच. 'बेल द ज्यूर' नावाच्या चित्रपटात तिचं काम एवढंच; घरातून तिची मुलगी शाळेत जायला निघाली आहे, तिला बाय करायचं, एवढंच. त्या प्रसंगात तिने गळाच काढला. बुन्युएल तिला म्हणाला, "ती शाळेत जात्ये, कायमची सोडून जात नाहीये. एवढी का रडत्येस?". ती म्हणाली, "त्या पात्राला फार वाईट वाटत असेल, असं मला वाटतं." प्रत्यक्ष चित्रपटात एवढी (काय, काहीच) रडारड नाहीये.