फुसके बार – २९ जानेवारी २०१६

फुसके बार – २९ जानेवारी २०१६
.
१) स्मार्ट शहरांमध्ये महाराष्ट्रातून पुण्यासह सोलापूरची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली आहे. नागपूरची कशी झाली नाही यावरून आता गदारोळ उठेल. तसेच उत्तर प्रदेश आणि बिहारमधले एकही शहर नाही यावरूनही आरोप-प्रत्यारोप होतील.

बाकी सोलापूरची निवड झाली खरी, पण स्मार्ट सिटीला पाण्याची गरज पडत नाही की काय? किंवा सोलापूरसाठी एखादी नदी तयार करणार असावेत.

२) थंडी कमी झाली का हे तपासायला टीव्ही किंवा वर्तमानपत्रे वाचायची गरज नाही. तेल गोठायचे थांबले की लगेच कळते.

३) गेंड्याची कातडी असलेल्यांना थंडी कमी वाजते का?

४) सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस यांची दुहेरीची जोडी चांगलीच भरात आहे. सानियाचा वैयक्तिक खेळही चांगला आहे. पण एकेरीत व्यवस्थित बस्तान बसत नसल्याचे पाहिल्यावर तिने शहाणपणाने दुहेरीचा रस्ता पकडला. तेथेही अनेक पार्टनर बदलल्यानंतर तिची आता मार्टिनाशी चांगली जोडी बनलेली आहे.

त्या दोघींचा सध्याचा खेळ कोणतेच आव्हान नसल्यासारखा एकतर्फी चाललेला आहे.

२००२मधील पुनरागमनापेक्षा हिंगीसचे २००७नंतरचे पुनरागमन भलतेच यशस्वी झाले आहे.

५) आंधळा मोदीविरोध करणा-यांनी गुजरातमधून फार कोणी लष्करात जात नाही हा जणु मोदींचाच दोष असल्यासारखे त्यांना व गुजराती लोकांना दोष द्यायला सुरूवात केली होती.

आता मात्र जेमतेम २,५००ची लोकसंख्या असलेल्या साबरकांटा जिल्ह्यातील कोडियावाडा या छोट्याशा गावातील ७२५ लोक लष्करात दाखल झाले असल्याचे वाचले.

६) आयबीएन लोकमतवर बातम्या देणा-या आरती कुलकर्णी यांचे हात बोलताना इतके हलतात, की ते अतिशय कृत्रिम वाटते. पूर्वी एमटीव्हीवरील एक व्हीजे होती तिचे नाव विसरलो, बहुधा सोफिया असावी. तिच्या बाबतीतही हाच प्रकार दिसे.

आरती कुलकर्णी त्यांच्या चेल्या असाव्यात असे वाटावे इतका हा प्रकार पहायला मिळतो.

बाकी अशी कृत्रिम सवय लागल्यानंतर ती कॅमे-यासमोरच चालू होते, की एरवीही तसेच होत राहते?

७) मागे फ्लिपकार्ट या भारतीय ऑनलाइन खरेदी विक्रीच्या पोर्टलच्या प्रचंड मोठ्या तोट्याचे आकडे पाहण्यात आले होते. त्यावेळी भारतातील अॅमेझॉनचे मात्र त्यांच्या तुलनेने चांगले चाललेले आहे असा काहीसा समज होता. मात्र आता अॅमेझॉन इंडियालाही गेल्या वर्षात सतराशे कोटीपेक्षा अधिक तोटा झाल्याचे वाचले आणि हा समज चुकीचा होता असे कळले.

या कंपन्या विकणा-यांकडून विक्रीच्या रकमेतील काही टक्के कमिशन म्हणून कापून घेत असताना हा व्यापार मुळात तोट्यात जाण्याची व त्यातही हा व्यापार इतका आतबट्ट्याचा ठरण्याची कारणे काय असावीत?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वारंवार समजावून सांगूनही योग्य ठिकाणी लेखन न केल्यामुळे धागा वाचनमात्र करत आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0