माझं पॉर्नचं व्यसन

माझं पॉर्नचं व्यसन
- आभास
आभास केसकर ह्या विद्यार्थ्याने आपल्याला एके काळी पॉर्नचं व्यसन लागलेलं आहे हे मान्य करून, ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्या ह्या प्रवासाबद्दल त्याच्याच शब्दांत -
विशेषांक प्रकार
व्यसन आणि अपराधीपणा
कोणत्याही गोष्टीवाचून तुम्ही जेव्हा अस्वस्थ अथवा बेचैन होता, तेव्हा त्याला त्या गोष्टीचं व्यसन आहे, असे म्हणतात. उदा. बिडी पिणाराला बिडी वाचून अस्वस्थ वाटते. दारु पिणारास दारुवाचून अस्वस्थ वाटते. करमत नाही. एखाद्याला पॉर्नवाचून अस्वस्थ वाटत असेल, तर ते व्यसनच म्हणावे लागेल. अपराधी भावना असणे न नसणे हा वैयक्तिक भाग आहे. बिडी पिऊन आपण फार अपराध करीत आहोत, अशी भावना असलेले अनेक जण मी पाहिले आहेत. इतकेच काय चहा पिणे वाईट आहे, असे मानणारा माझा एक मित्र आहे. तो पाहुण्यांकडे गेला तरी चहा पित नाही. काहींना आपले नसलेले पैसे हडप करूनही अपराधी वाटत नाही. सबब अपराधी वाटणे याचा व्यसनाशी काहीही संबंध नाही, असे मला वाटते.
माफ करा, पण फार अंदाधुंद
माफ करा, पण फार अंदाधुंद विधानं केली आहेत, असं वाटलं.
तुमच्या व्याख्येनुसार जायचं, तर मला फॅनफिक्शन वाचायचं व्यसन लागलं होतं. दिवसातले जवळजवळ ७ तास मी त्या वाचनात घालवत असेल. बरं, सोवळेपणानंच बोलायचं म्हटलं, तर त्या वाचनात प्रचंड प्रमाणावर शारीर तपशील येत असत. बरेचदा रोमांचित व्हायला होत असे. मग काय बिघडलं माझं? कोणतेही प्रयत्न करावे न लागता, त्यातून फार काही सखोल मिळेनासं झाल्यावर, माझा त्यातला रस हळूहळू ओसरला. उद्या अजून एखादं निराळं फ्यानडम आकर्षक वाटलं, तर पुन्हा नव्यानं गुंतून जाईन. इन फ्याक्ट, असं व्हावं अशी माझी इच्छा आहे. अशा प्रकारे एखाद्या गोष्टीच्या नादानं वाहवत जाणं मोठं सुखाचं असतं असं मला वाटतं.
तुमच्या बाबतीत, अडचण नक्की कुठे नि का होती?
समजलेली काही उत्तरं
तुमच्या बाबतीत, अडचण नक्की कुठे नि का होती?
ह्याचा काहीसा उल्लेख फितीत आहे. समवयस्क मुलींशी बोलताना मनात निर्माण झालेला गंड, त्यांच्याकडे आपल्यासारखीच एक व्यक्ती म्हणून बघू न शकणं, त्यांना त्यांच्या शरीराच्या ठेवणीवरून जोखणं असे काही उल्लेख आहेत. ह्या सगळ्याबद्दल वाटणारी अपराधभावना, त्यातून होणारी कुचंबणा ह्यांचा उल्लेख नसला तरीही ते आभासच्या बोलण्यातून जाणवतं.
ह्याचा दोष पूर्णतया पॉर्नलाच देता येईल का देता येणार नाही ह्यासाठी पुरेशी माहिती ह्या फितीत नाही. अशी मानसिकता बनण्यासाठी पॉर्न हा एकमेव घटक कारणीभूत असतो असं नाही; योग्य शिक्षण आणि वातावरणाच्या अभावातूनही अशी मनःस्थिती निर्माण होऊ शकते.
... नवनवीन पॉर्न शोधण्यात वेळ जाऊ शकतो, वगैरे
ह्याची तुलना थोडी व्यायामाशी करता येईल. नियमित व्यायामाची सवय झाल्यावर काही नवीन आणि अधिक व्यायाम केल्याशिवाय शरीरात बदल घडून येत नाहीत. पण व्यायामामुळे इतर व्यक्तींचं वस्तुकरण करण्याचा आणि त्यातून निपजणाऱ्या अपराधगंडाचा त्रास होत नाही.
शंकासुर
चारचौघांत ज्या गोष्टीला कमी लेखलं जातं, ती गोष्ट 'मी करत असे' असं मान्य करायला धैर्य लागतं. त्यातून आपलं काय व्यक्तिगत नुकसान होत होतं ह्याचा विचार करून ते स्वतःशी मान्य करणं, ह्याबद्दल पॉर्नला दोष न देता स्वतः त्याची जबाबदारी स्वीकारणं आणि त्यातून बाहेर पडणं ही गोष्ट अभिनंदनपात्र आहे. आभासचं त्याबद्दल अभिनंदन आणि त्याला पुढच्या आयुष्यालासाठी शुभेच्छा.
पण मला काही शंका आहेत. या व्हिडिओत मुळात व्यसन म्हणजे नक्की काय, व्यसन लागलं होतं तेव्हा नक्की काय होत असे, अशासारख्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. अमेरिकी मानसशास्त्रज्ञांच्या संघटनेने पॉर्नच्या सवयीला व्यसन असं लेबल लावायला नकार दिला आहे.
एकदा एक गोष्ट करायला घेतल्यावर पाच-सहा तास तीच कृती करणं ह्याला व्यसन म्हणणार का? पॉर्नची ओसीडी आणि पॉर्नचं व्यसन यांत फरक करता येईल का?
त्यामुळे नैतिकतेच्या कल्पनांमधून आलेला अपराधगंड या पलीकडे काही होतं का, याचं उत्तर मिळत नाही. सुरुवातीला ठराविक विधेचं पॉर्न बघणं, पुढे त्याचा कंटाळा असं काही झाल्याचं किंवा न झाल्याचं समजत नाही. लागलेलं 'व्यसन' कसं सोडवलं याचाही काही उल्लेख नाही. इतर व्यसनांबद्दल काही माहिती असेल तर 'रिकव्हरी'बद्दल समजतं. त्यामुळे व्यक्तिगत अनुभव म्हणूनही हा व्हिडिओ तोकडा वाटतो.
सगळ्या व्हिडिओचा टोन 'आपण फार मोठे दुष्ट, पापी, गुन्हेगार होतो' असा वाटतो. ही नकारात्मकताही मला आवडली नाही; पॉर्नबद्दल सोडच, कोणत्याही माणसाने स्वतःबद्दल एवढं नकारात्मक असू नये. त्या नकारात्मकतेमुळे स्वतःचं मूल्यमापन करताना उगाच, नको तेवढं कमी लेखलेलं आहे असं वाटतं.
ह्या प्रतिसाद बरीच जास्त टीका केली आहे असं दिसतंय. पण ह्या व्हिडिओमुळे माझ्या मनात बऱ्याच अभ्यासपूर्ण शंका निर्माण झाल्या; आणि त्याचा आणखी अभ्यास करण्याची इच्छा निर्माण झाली. त्याबद्दल आभासचे मनापासून आभार.