Skip to main content

माझा प्रवास - आणखी काही उतारे

माझा प्रवास गोडसे भटजी

माझा प्रवास - आणखी काही उतारे

- गोडसे भटजी

'माझा प्रवास'मधले आणखी काही उतारे सुचवल्याबद्दल व ते निवडूनही दिल्याबद्दल अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी यांचे आभार.

---

कोठें आवाज होत नाहीं अशी संधी पाहून बंड्यांतून बाहेर पडलो. धांवत धांवत विहिरीवर येऊन मडकें फासास लावून झराझर पाणी काढलें व मडकें तोंडास लाविलें. घोट दोन घोट पाणी घशाखालीं उतरतें न उतरतें इतक्यांत जवळच्या वाड्यांत बंदुकीचा आवाज कानीं पडला. जीवाची आशा मनुष्यास कधीही सुटत नाही. मडकें हातांतून टांकून धांव ठोकली तों घोंटाळून जाऊन आमचे बंड्याचा रस्ता चुकलों. तेंव्हां माझे हातपाय कापूं लागले व सैरावैरा इकडेतिकडे घाबरून धांवत सुटलो, इतक्यांत एका बंड्याचें तोंड दृष्टींस पडले. त्यांत डोंके घालून शिरण्यांस लागलों तों आंत दोघी तरुण बायका दृष्टींस पडल्या. त्यांनीही मोठ्यां घाईने आंत लवकर या असें सांगितलेंं. तो बंड्या फार लहान असल्यामुळें आंत दोघां बायकांसहित पुरेशी जागा बसण्यांस नव्हती. परंतु त्या कोमल अंत:करणाच्या स्त्रियांनी अडचण सोसून मला आंत घेतलें. त्यांची तोंडे पश्चिमेंस होती व मी आंत शिरून फिरावयास जागा नव्हती म्हणून माझें तोंड पूर्वेस होतें. या प्रमाणें तोंडास तोंड लावून उराशी उर लावून आम्ही बसलों. पुढेंच जी स्त्री होती तिचें आंग सर्व घामानें भिजलेलें होतें. त्यावेळेस माझें वय सुमारें तीस वर्षांचें असावें व त्या स्त्रीचे वय अठरा वर्षांचे असावें. अशी तरुण स्त्रीपुरुषें एकमेकांशी घट्ट मिठी मारून बसली असतांही कामवासना बिलकुल उत्पन्न झाली नाही, हा भयंकर मृत्यूभीतीचा प्रभाव म्हण्टला पाहिजे. साहा सात घटका झाल्यावर जवळ आसपास कोठें आवाज होत नाहींत असें पाहून मीं त्या बंड्यांतून बाहेर पडलों.

---

ब्रह्मावर्तास अस्ता येके दिवशी सासू-सुनेचा कज्जा जबर जाहाला. त्यांत सूनबाईने सासूबाईस असे सांगितले की, आम्ही गंगास्नानास जाते समई येखादे मित्राकडे जातो. परंतु पूरवी तुमचे उमेदीत माजघरांत चोळी लुगडे सोडून टाकून जिन्यानी माडीवर जाऊन दिवाणखाण्यांत पाचचार मंडळी महाराज श्रीमंतांपासी बसली अस्ता तेथे येऊन सर्वांस नमस्कार करून खुंटीवर ठेविलेली पैठणी घेऊन त्याजसमोर नेसून चोळी घालून त्या मंडळीत श्रीमंत सांगतील त्याचे मांडीवर बसून विडा खात असा, असा तर आमचा धिंगाणा नाही ना? इत्यादि भाषणे ऐकून फार मौज वाटली.

---

शांडिल्य ऋसीचे आश्रमास म्हणतात, तेथे येऊन पोचलो. साडिया या नांवाचा तेथे गांव आहे. त्या गांवात देवाचे मंदिर आहे तेथे आम्ही उतरलो. तो गांव नर्मदा तीरींच आहे. तेथे असी वहिवाट आहे की, सर्व स्त्रिया पाच वर्षापासून शंभरपर्यंत नर्मदा गंगेवर लुगडी सोडून नि:शंकपणे स्नानास गंगेत नागव्यानी उतरतात. जवळ पुरुष मंडळी असली तरी त्या स्त्रियांचे मनात कपट नाही. अंगे चोळीत उभ्या राहातात. याप्रमाणे विशेष मौज दृष्ट जाहाली. तेथे तीन दिवस राहून हुसंगाबादेस निघून गेलो.

---

सत्त्व परीक्षा
नंतर त्या ब्राह्मणाकडील सर्व मनुष्यांची चौकसी करिता मुख्य यजमान पंचावन वर्षाचा व त्याची बायको पन्नास वर्षाची असी उभयता होती व येक पुत्र आहे म्हणोन सांगितले. तो परगांवी काही कामास गेला आहे व त्याची बायको माहेरी आहे. ही घरात मुलगी आहे, हीचे सासुरे येथून दाहा कोशावर आहे. मुलीचे वय वीस वर्षाचे आहे. परंतु या मुलीस तिचा नवरा बाळगीत नाही. त्याणी दुसरे आपले लग्नसुद्धा केले आहे, असी सर्व चौकसी करून तेथेच राहिलो होतो. कारण या शहरांत भाजीपाला, चिंच, दूध, दई वगैरे जिनस स्वस्त फार होते, याचे कारण जवळ जवळ शहर मोठे नाही. इंदूर तेथून शंभर कोश सुमारे आहे. म्हणोन स्वस्ताई फार आहे. आम्ही स्वइच्छ तेथे होतो. येके दिवसी असा प्रसंग आला. आश्वीन शु ॥१५ रोजी तो गौड ब्राह्मण कोजागिरीकरिता कथा सांगण्यास बाहेर रात्रौ गेला व ती ॥ काका व राहाळकर हे दोघेही रात्री कोजागिरीकरिता दप्तरदार दक्षणी होता त्याजकडे बोलाविले, सबब रात्रौ तेही गेले. नंतर ती वृद्ध स्त्री ब्राह्मणाची व उमेदवार मुलगी असी दोन्ही माणसे मजपाशी दिवाणखान्यांत गोष्टी सांगत येऊन बसल्या होत्या. पुढे दोन घटकेने ती वृद्ध स्त्री निजण्यास गेली. उमेदवार मुलगी तेथेच बसली होती. ती गोष्ट सांगता सांगता माझे जवळ सरत सरत हातरुणावर येऊन बसली. तेव्हा मी फार घाबरून गेलो, कारण प्रयागास गंगा भरल्यापासून या काळापर्यंत ईश्वरे व्रत बरेच चालविले. येते समई झासीस गेलो होतो तेथे ओळखीही बऱ्याच होत्या. परंतु हा प्रसंग फार वाईट आहे. ईश्वर निभावतील ते खरे क्षणभर सुखाकरिता व्रत मोडणे हे बरोबर नाही. हे मनात आणोन तिजला वारंवार रात्र फार जाहली तू आता निद्रा करण्यास जावे, असेही बहुत वेळा सांगितले. परंतु त्या स्त्रीने असे कळविले की, मी गौरवर्णाची सुरूप चांगली असून माझे चित्त जर तुम्हाकडे वेधिले आहे, तर माझे समाधान केल्यासिवाय तुम्हास बरे नाही व असी बायको गळी पडल्यास पुरुष तिजकडे पाहीना तर माजे ऐकिण्यात असे आहे की, पुरुषास दोष फार आहे. त्याजवरून मजला आपण सोडू नये असे बोलून हात अंगावर टाकिला ते समई मजला भीति उत्पन्न होऊन सर्वांगास कंप घाम सुटला. तो ईश्वरी इचछेने राहाळकर व काका असे दरवाज्यावर येऊन हाका मारू लागले. ती स्त्री घरात उठोन गेली.

---

तळटीप : मूळ लेखनातील जुने प्रमाणलेखन तसेच्या तसेच ठेवण्यात आले आहे.

विशेषांक प्रकार

अरविंद कोल्हटकर Sun, 05/06/2016 - 10:03

चिंतामण विनायक वैद्य ह्यांनी वरसईकर गोडसे भटजी ह्यांच्याकडून लिहवून घेऊन आणि संपादित करून १९०७ साली 'माझा प्रवास अथवा सन १८५७ च्या बंडाची हकीगत' अशा नावाचे पुस्तक दामोदर सावळाराम ह्यांच्याकडून प्रकाशित करून छापले. त्याची मुळाची डिजिटल आवृत्ति मजजवळ आहे.

त्या आवृत्तीमध्ये (१) 'कोठें आवाज होत नाहीं अशी संधी पाहून बंड्यांतून बाहेर पडलो' अशी सुरुवात असलेला उतारा आहे. (पृ. १२४-१२५) ( दर्शविलेल्या उतार्‍यात आणि मूळ उतार्‍यात किरकोळ शब्दांचे फरक आहेत पण ते महत्त्वाचे नाहीत.

त्यापुढील (२)'ब्रह्मावर्तास अस्ता येके दिवशी सासू-सुनेचा कज्जा जबर जाहाला.' हा उतारा,(३)'शांडिल्य ऋसीचे आश्रमास म्हणतात, तेथे येऊन पोचलो.' हा उतारा, (४) 'शांडिल्य ऋसीचे आश्रमास म्हणतात, तेथे येऊन पोचलो.' हा उतारा, तसेच (५) 'नंतर त्या ब्राह्मणाकडील सर्व मनुष्यांची चौकसी करिता मुख्य यजमान पंचावन वर्षाचा व त्याची बायको पन्नास वर्षाची असी उभयता होती व येक पुत्र आहे म्हणोन सांगितले.' हा उतारा मजजवळच्या आवृत्तीत दिसत नाहीत.

मी हे पुस्तक अनेक वेळा डोळ्याखालून घातले आहे पण वरील क्र. २ ते ५ हे उतारे कोठेहि दिसले नव्हते. रावबाजीच्या ख्यालीखुशालीच्या आणि लंपटपणाच्या अनेक कथा ठाऊक आहेत. काही लोकहितवादींच्या लिखाणात मिळतात पण क्र.२ ची कथा कोठेहि पाहिली नव्हती. ती येथेच पहिल्यांदा दिसली.

तेव्हा हे उतारे कोठल्या आवृत्तीत मिळाले आणि ते कितपत अधिकृत आहेत हे जाणण्याची जिज्ञासा आहे. त्याचे स्पष्टीकरण मिळाल्यास माझ्या माहितीत भर पडेल.

आपल्या सदस्या रोचना ह्यांनी चिं.वि.वैद्यांनी भटजींच्या आठवणींवर तकालीन समाजाला रुचेल इतपत संस्करण केले आहे असे सुचविणारा एक लेख लिहिला आहे असे काहीसे स्मरते. संदर्भ देऊ शकत नाही पण हे मी वाचलेले आहे. त्या संस्करणामधून वगळले गेलेले हे उतारे नाहीत ना?

बॅटमॅन Sun, 05/06/2016 - 15:04

In reply to by अरविंद कोल्हटकर

वैद्यांच्या आवृत्तीत असले उतारे गाळले गेले होते. १९५१ साली मूळ हस्तलिखितावरून द वा पोतदारांनी पुनरेकवार "आहे तशी" मूळ प्रत प्रसिद्ध केली त्यातले हे उतारे असावेत.

रोचना Tue, 14/06/2016 - 17:01

In reply to by अरविंद कोल्हटकर

प्रकाशन इतिहास असा आहे:
१९०७ - वैद्यांनी अनेक फेरफार करून छापलेली संहिता
१९२२ - वैद्यांनी मूळ मोडी हस्तलिखित भा.इ.सं.मंडळाच्या सुपूर्त केली
१९४८ - न र फाटकांनी नवीन आवृत्ती काढताना वैद्यांची छापील प्रत आणि मूळ हस्तलिखित ताडून पाहिले, व प्रथम फेरफाराची चर्चा करून नजरेस आणले. गाळलेले अनेक उतारे मागे पुरवणीस्वरूपात दिले. यात फक्त 'अश्लील' उतारे नव्हते, तर बंडाच्या इतिहासाला निरुपयोगी म्हणून गोडसेभटजींच्या यात्रेचे तपशीलही होते.
१९६६ - द वा पोतदारांनी पुन्हा मूळ हस्तलिखिताचे नव्याने बाळबोधीकरण करून घेऊन जसेच्या तसे छापले.

माझा लेख १९०७ आणि १९६६ प्रतींची तुलना करून, वैद्यांनी केलेल्या बदलांच्या आधारे तत्कालीन ऐतिहासिक चर्चांची, कल्पनांची चिकित्सा करतो. लेख इथे आहे.

ता.कः खाली चार्वीने म्हटल्याप्रमाणे, मृणालिनी शहा यांनी काही वर्षांपूर्वी पुन्हा मूळ प्रतीवर आधारित एक आवृत्ती काढली होती. ती सहज मिळते. मूळ मोडी हस्तलिखित अत्यंत सुंदर आहे. त्याचे एक पान इथे देते:
Godse modi

अरविंद कोल्हटकर Sun, 05/06/2016 - 23:15

आणखी शोध घेतल्यावर क्र. २,३-४ आणि ५ हे उतारे पृ.११०, ११२ आणि ११४ येथे ह्या संस्थळावरील पीडीएफ मध्ये दिसले. येथील सर्व मजकूर कोठून घेतला आहे असा काही उल्लेख तेथे नाही.

मात्र इतके म्हणू शकतो की उतारे खरेखुरे गोडसेभटजींचेच असावेत कारण त्यातील भाषा ही नक्कल केल्यासारखी दिसत नाही. आता प्रश्न इतकाच उरतो की जेथून हे उतारे आले त्याचा अधिकृतपणा कसा ठरवायचा. उपरिनिर्दिष्ट पोतदार आवृत्ति कोठे उपलब्ध आहे?

चार्वी Mon, 06/06/2016 - 08:58

हस्तलिखिताची मूळ मोडी प्रत भारत इतिहास संशोधन मंडळात आहे. मूळ प्रतीवरून (लिप्यंतर करून) राजहंस प्रकाशनाने काढलेली आवृत्ती सध्या बाजारात आहे

अनिरुद्ध गोपाळ… Wed, 08/06/2016 - 10:16

कोठें आवाज होत नाहीं - This is from PDF file of a book published by 'Damodar Savalaram and Mandali', 1907....page 124 in book and PDF shows it as 134/213

Others are from:

'Maza Pravas' by Godse Bhatji, edited by Mahamahopadhyay, Sahityavachaspati Datto Vaman Potdar, Publisher: Venus Prakashan, edition: June 1966

ब्रह्मावर्तास अस्ता- page 168-169

शांडिल्य ऋसीचे- page 172

सत्त्व परीक्षा- page 173-174

मेघना भुस्कुटे Tue, 14/06/2016 - 10:30

पुढे फुकाच्या रंगसफेदी-सवयींमुळे निसटून गेलेले अनेक तपशील मूळच्या पाठ्यातून कळून घेताना धमाल आली. लेखकाने नसते संकोच बाळगता नयेत - हा धडा पुन्हा गिरवला!