Skip to main content

ASS - ऐसी स्वयंसेवक संघ

नुकताच 'पॉर्न ओके प्लीज' हा विशेषांक येऊन गेला. आता कधीतरी दिवाळी अंक येईल. या कल्पनेनेच माझ्या हृदयात धडकी भरायला लागलेली आहे. कारण एक विशेषांक काढायचा तर आम्हा व्यवस्थापकांची, संपादकांची, आणि मदत करणाऱ्या काही अव्यवस्थापकांची (अव्यवस्थापक म्हणजे अव्यवस्था निर्माण करणारे नव्हेत, व्यवस्थापक नाहीत ते) दमछाक होते. त्यामुळे ज्या ऐसीकरांच्या मानसिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि इतरही कसल्या कसल्या भल्यासाठी अंक काढणारे लोक झटतात त्या मायबाप ऐसीकरांच्या पायांवर लोटांगण घालून 'प्लीज, प्लीज, प्लीज थोडी मदत करा ना. प्लीज....' असं म्हणण्याचं मी ठरवलं. म्हणून माझ्या डोक्यातून ही 'ऐसी स्वयंसेवक संघ'ची कल्पना निघाली. ती तुमच्यासमोर मांडतो आहे.

आता तुमच्यापैकी काही हुशार लोकांनी हे जाणलंच असेल की 'ऐसी स्वयंसेवक संघ'चं लघुरूप ASS होतं. अॅस म्हणजे गाढव. तर तेही एका अर्थाने खरंच आहे. विशेषांक काढताना अनेक गधामजदुरीची कामं उपस्थित होतात. बहुतेक वेळा थोडीफार मदत सोडली तर तीही अंक काढणाऱ्या टीमलाच करावी लागतात. तर ही कामं क्राउडसोर्स केली तर सगळ्यांवरतीच बोजा कमी होईल असं मला वाटतं. म्हणजे जितकी जास्त गाढवं तितकं प्रत्येकाच्या पाठीवर ओझं कमी. आणि ओझं कमी झालं की गाढवंच काय, घोडेसुद्धा चौखुर उधळू शकतात!

तर विशेषांकासाठीची कामं कुठची?
१. लेख मिळवणं - हे खरंतर गधामजदुरीचं काम नाही, थोड्या वरच्या पेग्रेडचं काम आहे. त्यासाठी विषयानुरुप कोण लिहू शकेल, किंवा कोणाची मुलाखत घेता येईल याची कल्पना मांडायची. ती व्यवस्थापनाने किंवा अंकप्रमुखाने मान्य केली तर जरूर त्यांना 'प्लीज प्लीज लेख देता का, प्लीज...' म्हणून आर्जवं करायची. काही वेळा त्यांच्या मुलाला ओलिस धरायचं वगैरे वगैरे गोष्टी कराव्या लागतात. (ते ओलिस धरण्याचं फार मनावर घेऊ नका. नाहीतर ऐसीकर लोकं आहेतच गुंड प्रवृत्तीचे.)

२. संपादकीय संस्करण - म्हणजे या लेखात हा मुद्दा बरोबर नाही, किंवा याविषयी चर्चा नाही वगैरे लेखकाला सांगायचं आणि त्यांच्याकडून लेख सुधरून घ्यायचा. हे अर्थातच गधामजदुरीचं काम नाही, संपादक मंडळींचं महत्त्वाचं काम आहे. त्यासाठीच त्यांना ठेवलेलं आहे. अर्थात बऱ्याच वेळा असं होतं की इतर कटकटीच्या कामांच्या रगाड्यात हे काम राहून जातं, किंवा त्यासाठी तितकासा वेळ देता येत नाही. म्हणूनच इतर कामं किंचित हलकी करण्यासाठी ASS ची स्थापना व्हावी असा माझा विचार आहे.

३. मुलाखतीचं लेखीकरण - मुलाखत घेणारा बहुतेक वेळा रेकॉर्डिंग किंवा नोट्सच्या आधारे त्यातून एक मुलाखत/लेख तयार करतो. 'राइट टु पी'विषयीचा लेख म्हणजे मुलाखतीपासून लेख कसा बनवावा याचा आदर्श आहे. पण काही वेळा चार चार हजार शब्दांचं रेकॉर्डिंग ऐकून मुकाट्याने सगळे शब्द टंकावे लागतात. २०१५च्या दिवाळी अंकात अशा काही मुलाखतींची उदाहरणं आहेत. केवळ ऐकून ते टंकून काढणं यातच बराच वेळ जाऊ शकतो. थोडक्यात मुलाखत घेतली म्हणजे काम संपलं असं होत नाही. तर तिथेच खरं काम सुरू होतं. त्यात संक्षेपीकरण, मांडणी, आणि निव्वळ टंकन असे भाग असतात.

४. टंकन - वरती मुलाखतीविषयी लिहिलेलं आहेच. पण एकंदरीतच टंकन करणं हेही एक मोठं काम असतं. अनेक वेळा छापील माध्यमांत पूर्वप्रकाशित असलेलं लेखन कागदावर पाहून युनिकोडात टंकून काढावं लागतं. किंवा काही वेळा लेख पीडीएफमध्ये येतात, किंवा श्रीलिपी वगैरे स्वरूपात येतात. त्याचं युनिकोडात रूपांतर करणं हा एक मोठा प्रकल्पच असतो. सध्या अस्तित्वात असलेली सॉफ्टवेअरं इतकी अपुरी आहेत की बऱ्याच वेळा दुरुस्ती करत बसण्यापेक्षा ते वाचून पुन्हा टंकून काढणं सोपं पडतं. आणि त्यात प्रत्येक लेखावर काही तास जाऊ शकतात.

५. मुद्रितशोधन - ऐसीच्या विशेषांकांचा मुद्रितशोधनाचा दर्जा हा अनेक व्यावसायिक छापील दिवाळी अंकांपेक्षा निश्चितच वरचा आहे. पण त्यासाठी जे कष्ट पडतात ते सहज दिसत नाहीत. उदाहरणार्थ २०१५च्या अंकात आलेली एक कथा - तिच्यात दर वाक्याला एक किंवा दोन चुका होत्या. चारेक हजार शब्दांची अशी कथा दुरुस्त करण्यासाठी मला अनेक तास लागले. मात्र तरीही ते काम पूर्ण झालं नव्हतंच. त्यातला पाचेकशे चुका काढून झाल्यावरही पन्नासेक शिल्लक होत्याच - त्या पुन्हा एकवार चाळणी लावणाऱ्या एक्स्पर्ट लोकांना सापडल्या. तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही जरी एक्स्पर्ट नसाल, तरीही फायरफॉक्सचं प्लगिन वापरून आणि काही स्टाइल गाइडचे नियम वापरून मूळ लेखाचा दर्जा प्रचंड सुधारू शकाल. जर तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर याहून अधिक विश्वास असेल तर उत्तमच.

६. चित्रं - लेखासाठी अनुरूप चित्रं काढणं, मिळवणं हे विशेष कसब आहे. तुम्हाला जर हे करायला आवडत असेल तर तुम्ही जरूर ASS मध्ये नावनोंदणी करा.

७. लेख फॉर्मॅटिंग - सध्या विशेषांकांसाठी एक विशिष्ट रूपडं प्रस्थापित होतं आहे. त्यासाठी प्रत्येक लेखाच्या वर लेखानुसार एक चित्राची लिंक, लेखकाचं नाव, त्याच्या आयडीची लिंक वगैरे लावावं लागतं. तसंच लेखाच्या प्रत्येक परिच्छेदाआधी व नंतर काही कोड कॉपीपेस्ट करावा लागतो. म्हटलं तर हे तसं सोपं काम, पण आयत्यावेळी लेख प्रकाशित करायचा आहे अशा वेळी अशा कामांचंही ओझं संपादकांवरच पडतं. ज्यांना फार डोकं चालवायचं नाही, पण ऐसीच्या विशेषांकांच्या पवित्र यज्ञकार्याला हातभार लावायचा असेल अशांनी काही लेखांसाठी असं काम करणं फारच उपयुक्त ठरेल.

८. पीडिएफ रूपांतर - जेव्हा सगळे ऐसीकर विशेषांकातले लेख मिटक्या मारत वाचत त्यावर गरमागरम चर्चा करत असतात तेव्हा कुठल्यातरी अंधाऱ्या कोपऱ्यात बसून कोणी अभागी संपादक/व्यवस्थापक (बहुतेक वेळा अदिती) या लेखांचं पीडीएफीकरण करण्यात गर्क असतो. हे अतिशय कंटाळवाणं काम आहे. आणि पन्नास-साठ लेखांसाठी करणं बरंच तापदायक आणि वेळखाऊ आहे.

९. फॉलोअप - लेखकांना त्यांचा लेख प्रकाशित झालेला आहे हे सांगणं, त्यांना मानधनाचा चेक पोचला की नाही याची खात्री करणं अशी अनेक कामं मागाहून येतात. यासाठीही जर काही 'लेखक संपर्क समिती' स्थापन झाली तर बरेच कष्ट कमी होतील.

१०. दिनवैशिष्ट्य वगैरे - अंकाच्या भाऊगर्दीत काही वेळा दिनवैशिष्ट्य अपडेट करणं वगैरे गोष्टी राहून जातात. अशा काही कामांसाठीही काही स्वयंसेवक मदत करू शकतील.

थोडक्यात - ही व इतर कामं करण्याची अमूल्य संधी मिळण्यासाठी कृपया ASS मध्ये नावनोंदणी करा. यातून तुम्हाला काही पैसे मिळणार का? अर्थातच नाही. एका महान, पवित्र कार्याला आपला हातभार लावण्याचा जो आनंद मिळतो तो निश्चित मिळेल. इतर संघांतही तसं काहीच मिळत नाही. तरीही तुम्हाला काहीतरी गणवेश घालून कुठेतरी दक्षबिक्ष करण्याची वेळ येणार नाही हे काय कमी आहे? आणि न जाणो, पुरेसं चांगलं काम केलं तर इतर संघातले चायवालेही पंतप्रधान बनतात. तेवढं नाही तरी ऐसीच्या व्यवस्थापनपदी वर्णी लागू शकेल हे मधाचं बोट आहेच.

असो. सीरियसली - अशा कामांमध्ये मदतीची अत्यंत गरज आहे. ज्यांना वर्षातून चारपाच तास काढू शकण्याइतका वेळ आणि ऐसीबद्दल कळकळ असेल त्यांनी जरूर या धाग्यावर किंवा मला व्यनि पाठवून नावनोंदणी करावी.

विसुनाना Sat, 18/06/2016 - 14:03

कोण? ३_१४_विक्षिप्त अदिति?? अभागी? अंधारा कोपरा? असो,असो!
***
". तरीही तुम्हाला काहीतरी गणवेश घालून कुठेतरी दक्षबिक्ष करण्याची वेळ येणार नाही हे काय कमी आहे? आणि न जाणो, पुरेसं चांगलं काम केलं तर इतर संघातले चायवालेही पंतप्रधान बनतात. " >>> प्रचंड आक्षेप! रिपोर्ट करू का?
***
४. टंकन - यासाठी 'गमभन'सम टंकलेखनाची सोय इथेच ऑनलाईन उपलब्ध करून देणे. ड्राफ्ट-सेव सोयीसह असेल तर उत्तम.
५. मुद्रितशोधन - पलिकडच्या एका गतकालात प्रसिद्ध असलेल्या संस्थळावर शु.चि. ची सोय होती... तशी काही सोय ढापरता आली तर बरे होईल.
***
मानधनाचा चेक पोचला की नाही? - म्हणजे लेखकांकडून मानधनही घेणार का आता? ;)
***
बाकी चालू द्या!

राजेश घासकडवी Sat, 18/06/2016 - 16:39

In reply to by विसुनाना

लेख विनोदी करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी खरोखर अत्यंत निकडीची गरज आहे.

टंकनाची सोय इथे आहेच. ड्राफ्ट सेव्ह वगैरेसाठी स्वतःलाच व्यनि केला की काम भागतं. शुद्धिचिकित्सेबाबत - फायरफॉक्ससाठी एक कामचलाऊ प्लगिन आहे, ते फार थोर नाहीये, पण पहिल्या अॅप्रॉक्झिमेशनसाठी उत्तम आहे. अनेक वेळा शब्द अशुद्ध नसतात पण दुरुस्तीची आवश्यकता असते. उदाहरणार्थ काही लेखांत बोली भाषा आणि लेखी भाषा यांचं मिश्रण असतं. काही वेळा स्वल्पविरामाच्या किंवा पूर्णविरामाच्या आधी स्पेस असते. यातले बरेच दोष फाइंड रिप्लेस करून दुरुस्त करता येतात.

मिलिंद Mon, 20/06/2016 - 08:20

In reply to by विसुनाना

मुद्रितशोधन - पलिकडच्या एका गतकालात प्रसिद्ध असलेल्या संस्थळावर शु.चि. ची सोय होती... तशी काही सोय ढापरता आली तर बरे होईल.

विसुनाना, आर्य पतिव्रतेप्रमाणे ज्या 'तिकडच्या स्वारी'चा तुम्ही नाव न घेता उल्लेख केला आहेत त्यांच्याकडे मागे ही मागणी कोणीतरी केली होती, व त्यांनी राणी लक्ष्मीबाईच्या थाटात "मैं मेरी झांसी, आपलं, शु.चि. नहीं दूँगी" असे बाणेदार उत्तर दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून ऐकले आहे.

राजेश घासकडवी Sun, 19/06/2016 - 17:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खरंतर तुला चित्रं काढायला मिळावी याचसाठी हा धागा आहे. पीडीएफचं काम करायला कोणी हलवेंटियर सापडलं की मग तुला वेळच वेळ. फक्त त्या अंधाऱ्या कोपऱ्यात थोडा दिवाबिवा लाव बै.

नंदन Mon, 20/06/2016 - 14:47

In reply to by मिलिंद

(ह्या "आ, बैल, मुझे मार"लाच गद्धेपन्नाशी म्हणतात काय हो?)

'ऐसी' कळवळ्याची जाती | करी लाभावीण प्रीती || ;)

adam Mon, 20/06/2016 - 09:33

नमस्कार.
मी पुढील दोन कामांत बर्‍यापैकी मदत करु शकेन असं वाटतं --

४. टंकन
९. फॉलोअप

सुधीर Mon, 20/06/2016 - 09:58

माझं स्वतःचं "सुद्ध" लेखन यथातथा आहे. "बिनडोक आणि तातडीच्या" नसलेल्या कामांना वर्षाकाठी चारपाच तास देणं जमायला हरकत नाही असे सध्या तरी वाटते. त्यामुळे माझं नाव यादीत राहू द्या.

साती Tue, 21/06/2016 - 07:30

संपादकीय संस्करण आणि थोडीफार मुद्रितशोधनासाठी मदत करू शकेन.
मला आत मोजा. (काऊंट मी इन!)

'न'वी बाजू Tue, 21/06/2016 - 08:02

In reply to by साती

मला आत मोजा.

'मोज्यात पाय घालणे'ऐवजी 'पायात मोजा घालणे' असा वाक्प्रचार कसा रुळला असावा, याची अंधुकशी कल्पना येऊ लागली आहे.

आडकित्ता Tue, 21/06/2016 - 20:05

पोर्नांकावेळी काही करू शकलो नाही. नेक्ष्ट टाईम करण्याचा प्रेत्न करीन. मदत लागेल तशी हाक मारा.