Skip to main content

अलीकडे काय पाहिलंत? -६

याआधीचे भाग:

जाफर पनाहीचा 'ऑफसाईड' पाहून त्याच्याबद्दल उत्सुकता होती. त्याचा 'द मिरर' पाहिला. ही सगळी गोष्ट गजबजलेल्या तेहरानमधली. प्राथमिक शाळेतली एक मुलगी शाळा सुटल्यावर आईची वाट पहाते आहे इथे चित्रपट सुरू होतो. आईला तिथे यायला उशीर होतो. डावा हात मोडल्यामुळे हाताला प्लास्टर, हात गळ्यात अडकवलेला, खास इराणी पद्धतीने रूमालाने डोकं झाकलंय, छोटीशी, गोड मुलगी आणि या सगळ्याला विसंगत असं तिचं भलंथोरलं दप्तर. नक्की कोणती बस पकडायची, कोणत्या स्टॉपवरून पकडायची, घरचा पत्ता असं काहीही तिला नीट सांगता येत नाही; खाणाखुणा, या दिशेने जायचं, मग डावीकडे, अशा प्रकारे तिला पत्ता सांगता येतोय. पण रस्ता एकटीने ओलांडण्याची भीती वाटते.

शाळेतली एक शिक्षिका हिला ओळखीच्या एकाबरोबर बस स्टॉपवर पाठवते. तो माणूस आणि शिक्षिका यांचा आपसातला कंटाळवाणा होत जाणारा संवाद ही मुलगी ऐकते आणि स्वतःची सोय शक्यतोवर लावून घेते. पुढे बसमधे चढते, तिथेही आजूबाजूच्या स्त्रिया, गाणी म्हणणारे भिकारी असं काय काय तिच्या कानावर पडत रहातं. आयुष्याला गांजलेली एक म्हातारी, एक 'भविष्य' सांगणारी आणि तिच्या बसमधल्या गिर्‍हाईक, असं सामान्यांचं आयुष्य ऐकत ऐकत ती भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचते. एक भला बस ड्रायव्हर तिच्याकडून वर्णनं ऐकून तिला योग्य बसमधे बसवून देतो; आता ही आपल्या इप्सित स्टॉपवर पोहोचणार आणि तिथून घरी जाणार असं काही वाटत असतं ...

मधेच ही मुलगी वैतागते. हातातलं प्लास्टर उतरवते आणि "मला नाही करायचं तुमच्या पिक्चरमधे काम!" असं म्हणत सत्याग्रह सुरू करते. हिला कसंही करून आजचा सीन पूर्ण करायला लावायचं या प्रयत्नात दिग्दर्शक जाफर पनाही दिसतो. एकाच्या हातात कॅमेरा, एकाकडे आवाज रेकॉर्ड करण्याची उपकरणं, एकाकडे आणखी काही ... आत्तापर्यंत घाबरत घाबरत घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात असणारी मिना, हिचं नाव इथे समजतं, आता "मी माझी माझी एकटी घरी जाणार" असं म्हणायला लागते. तिच्या कपड्यांना लावलेला मायक्रोफोन तसाच राहू देतात आणि छोट्या कारमधून तिचा पाठलाग सुरू होतो. मिना घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात असताना ती सामान्य इराणी लोकांचे आणखी संवाद ऐकत जाते.

चित्रपट काय, प्रत्यक्षात काय-काय घडतंय यातली सीमारेखा अस्पष्ट होत जाते. हे सगळं ठरवून, स्क्रिप्टमधेच ठेवलेलं आहे का नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. या उत्तराची आवश्यकताही नाही. सामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्यात धर्म, अणूऊर्जा असे काही प्रश्न येत नाहीत. कोणा स्त्री-पुरुषांचा पारंपरिक मूल्य आणि आधुनिक लिंगसमानता याबद्दल चालणारा वाद, "नशीब तुझं, तुझा नवरा सोबत असता तर बघून घेतलं असतं" असं वैतागलेल्या टॅक्सी ड्रायव्हरचं वाक्य आणि त्याच्याच जोडीला म्हातारीचं गांजलेपण सगळं लहान मुलीच्या दृष्टीकोनातून दाखवण्यामुळे जाफर पनाही (बहुदा) सेन्सॉरच्या कचाट्यात न अडकता सांगू शकला. दुसरीतल्या मुलीने तिची चादोर नाकारण्यावरही आक्षेप घेणं कठीण झालं असावं.

या लहान मुलीने फारच सुरेख काम केलंय आणि लेखन, संकलन, दिग्दर्शनाचं जाफर पनाहीनेही! या मुलीचा ड्यँबिसपणा फारच आवडला.

कायदेभंग केला म्हणून इस्लामिक रिपब्लिक ऑफ इरानमधे जाफर पनाही स्वतःच्याच घरी नजरकैदेत आहे. डिसेंबर २०३० पर्यंत चित्रपट बनवण्यावर त्याच्यावर बंदी घातलेली आहे. (बातमी)

ऋता Thu, 01/08/2013 - 00:57

In reply to by अमुक

सहमत आणि छान शेवट सुचवले आहेत. मला हा चित्रपट कृष्णधवल आणि मूकपट वगळता (आताच्या काळात म्हणून... नाहितर तसे भरपूर चित्रपट बनलेच होते पूर्वी) इतर कुठल्याच बाबतीत वेगळा/असामान्य वाटला नाही.
बाकी इतरांचा रसभंग होईल म्हणून इथे लिहीत नाही.(मी इतर रंगात लिहिलं तरी त्या रंगात दिसत नाही...काळ्या शाईतच दिसतं...कोणाला तंत्राबद्द्ल काही माहित असल्यास कळवा.)

चिंतातुर जंतू Tue, 30/07/2013 - 13:31

स्टार वर्ल्डवर चालू असलेली 'ब्रेकिंग बॅड' ही मालिका सध्या पाहतो आहे. रसायनशास्त्रात निपुण असणारा, अत्यंत हुशार, पण आयुष्यात फारसं काही न जमलेला (ज्याला आजच्या काळात 'लूजर' म्हणतात असा) अँटिहीरो आणि त्याचं उपनगरीय दैनंदिन कंटाळवाणं वास्तव पाहून 'अमेरिकन ब्यूटी'ची आठवण झाली. त्यातल्या लैंगिक आकर्षणाऐवजी इथे मादक द्रव्यांचं अधोविश्व अँटिहीरोला गर्तेत खेचत राहतं. काही कल्पनांत हुशारी जाणवते. चाळिशीत गरोदर बायको, सेरेब्रल पाल्सी असणारा मुलगा आणि कॅन्सर झालेला नायक हे मिश्रण रोचक आहे. नेमका मेव्हणा ड्रग्ज एन्फोर्समेंटमध्ये असणं ह्यासारखा योगायोग थोडा जास्त वाटतो. प्रत्येक समस्येसाठी रसायनशास्त्रात उत्तर शोधणारा नायक आणि त्याची अपरिहार्य परिस्थिती हळूहळू कंटाळवाणे वाटू लागतात. मालिकेविषयी जितकं ऐकलं होतं त्या मानानं अपेक्षाभंग झाला. तरीही गीक लोकांनी एकदा पाहायला हरकत नाही.
जाताजाता : एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज वापरलेले (विशेषतः त्यात कोणताही उपदेशपर मसाला न घालता) पूर्वी कधी भारतीय टेलिव्हिजनवर दाखवल्याचं आठवत नाही.

ॲमी Wed, 31/07/2013 - 13:08

जेन ऑस्टीन तै १० पौँडच्या नोटवर आल्या म्हणे. त्याच बातमीत प्राइड अँड प्रिजुडाइस BBC सिरीज बद्दल कळलं. युट्युबवर मिळाली सहज, म्हणुन पाहतेय आणि पुस्तकपण वाचतेय परत एकदा. www.youtube.com/watch?feature=relmfu&v=WLSPQEv2cwc&rl=yes&gl=IN&client=…

ऋषिकेश Wed, 31/07/2013 - 14:07

In reply to by ॲमी

प्राइड अँड प्रिजुडाइस ची BBC सिरीज ही माझी ऑल टाईम फेवरीट आहे!
ही 'पिरीयड फिल्म' बनवताना तत्कालीन सामाजिक तथ्यांचा केलेला अभ्यास अनेक लहान प्रसंगांतून बेमालूम उतरला आहे. ६ सीडीजचा संच घेतला होता तो वाजवून वाजवून खराब झाल्याने नुकतान नवा संच विकत घेतला आहे व तो हार्ड दिस्कवरही कॉपी करून ठेवला आहे. जितक्या वेळा बघु तितक्या वेळा नवे काहितरी मिळते.

या सिरीजच्या पुढ्यात याच्याशी संबंधीत सगळ्या फिल्म्स टुकार वाटतात. "ब्राईड अ‍ॅड प्रेज्युडाईस" वगैरे कलाकृती तर पी&पीचे पॉर्निकरण आहे :(

ॲमी Wed, 31/07/2013 - 16:21

In reply to by ऋषिकेश

ब्राइड अँड प्रिजुडाइस लै च वाईट होता... ऐश तशीही डोक्यात जाते.
खरंतर मी १२ वर्षापुर्वी पुस्तक वाचलेलं तेव्हा आवडलं नव्हतं. एमा आणि सेन्स अँड सेन्सीबलीटी पण रटाळ वाटलेले. त्यामुळे मी ऑस्टीन पंखा नाहीय. पण या सिरीजचा पहीला भाग आवडला. म्हणुन परत पुस्तक वाचायला घेतलं :-)

ऋषिकेश Wed, 31/07/2013 - 16:35

In reply to by ॲमी

पुस्तक आणि चित्रपट दोन्हीची तुलना अपरिहार्य आहेच. आणि यात BBCची फिल्म पुरेपुर उतरते.
नेमके कास्टिंग, निवडलेल्या जागा, पुस्तकातील चित्रीत करण्यासाठी निवडलेले प्रसंग, दिग्दर्शकीय सौम्य पण कथाभाग खुलवणारी भर सारेच उत्तम आहे.
सगळे भाग बघाही आणि पुस्तकही वाचाच!

अवांतरः त्या 'भाग मिल्खा...' वाल्यांनी पिरीयड फिल्म बनवताना या चित्रपटाच्या १०% खबरदारी जरी घेतली असती तरी चित्रपट कित्येक पटिने प्रामाणिक वाटला असता असे सारखे वाटत होते. ;)

अमुक Wed, 31/07/2013 - 20:45

In reply to by ऋषिकेश

पुस्तक आणि चित्रपट दोन्हीची तुलना अपरिहार्य आहेच. आणि यात BBCची फिल्म पुरेपुर उतरते.
..........यावरून आठवले.. दूरदर्शनवर साधारण १९८५-८६ साली 'तृष्णा' नावाची हिंदी मालिका येत असे. ती 'प्राईड् अ‍ॅण्ड् प्रेज्युडिस्' वर बेतली होती. संगीता हांडा ही नवी अभिनेत्री मुख्य भूमिकेत होती चांगलीच शोभली होती. तरतरीत नाक, मोठे डोळे, एकूण बुद्धिमान सौंदर्य होते. तरूण धनराजगीर ह्या त्याकाळच्या सुटिङ्ग-शर्टिङ्गवाल्या जाहिरातींत दिसणार्‍या ठोकळ्याला डार्सीची भूमिका शोभली होती. किटू गिडवानीदेखील नुकतीच उदयास आली होती. तिने धाकट्या थोड्या उतावीळ बहिणीची भूमिका केली होती.
मूळ कादंबरीला आत्ताच्या काळात आणण्याचा तो चांगला प्रयत्न होता. पुन्हा पाहायला आवडेल. ही मालिका यू-ट्यूबवर सापडली नाही. कुणाला एखादा स्त्रोत माहित आहे का ?

अमुक Thu, 01/08/2013 - 01:57

In reply to by मिहिर

एकतर ती सवय नव्हती. जाणीवपूर्वक होते. आत्ताही परसवर्ण केवळ आंग्ल शब्दांसाठी राखून ठेवले आहेत हे इतर मजकुरावरून लक्षात आले असेलच. :)

मेघना भुस्कुटे Wed, 31/07/2013 - 18:13

गावातले कौतुकाचे कढ ऐकूनऐकून एकदाचा 'भाग मिल्खा भाग' बघितला. बर्‍याच लीला आहेत सिनेमात. चांगला सव्वातीन तासांचा सिनेमा असून कंटाळा म्हणून येत नाही. (बघताना 'फारेण्डा'ची लई म्हणजे लईच आठवण होत राहिली. असो.) पण या काही विशेष -

१. नेहरू: बाकी कशासाठी हा सिनेमा बघाल न बघाल, पण नेहरूंसाठी बघाच. नेहरूछाप वेषातला (गुलाबाचं ते प्लॅस्टिकी सदाबहार फूल. वा!) गोलमटोल दिलीप ताहिल समोर आला, की सुरुवातीला आपण थोडे बावचळतो खरे. पण मग आपण सरावतो. नंतर नंतर तर मी नेहरूंची वाट बघायला लागले होते. हमखास मनोरंजनाची हमी. सर्वांत थोर सीन म्हंजे, भारतीय खेळाडूंच्या पथकाला दिलेल्या खास गार्डन पार्टीत नेहरूंना 'पाकिस्तान के प्रधानमंत्रीजी का' फोन येतो, तो. मग ट्रेवर ठेवून फोन आणला जातो. नेहरू तिथेच फोनवर बोलतात. आणि मग 'अभी अभी पाकिस्तानी प्रधानमंत्रीजीके साथ बात हुई. उन्होनें दोस्ती कायम करने के लिये दोनों देशोंमे प्रतियोगिता का प्रस्ताव रख्खा है' अशी गोड बातमी लग्गेच सगळ्या पाव्हणांसमोर जाहीर करतात. पाहून जीव धन्य धन्य झाला. असे इतर बरेच सीन आहेत. पण हा सरताज.

२. धावपटूंसाठी टिप्सः तांत्रिक माहिती वगैरे फडतूस गोष्टी तर तुम्हांला तुमचा कोचपण देईल. पण त्यापलीकडच्या टिप्स 'मिल्खा'तून मिळतात. स्पर्धा जिंकायच्या असतील, तर दोनच मुख्य गोष्टी - रक्त ओका, घाम गाळा. रोज साधारण दीड-दोन कप. अनुक्रमे. तरच काही आशा आहे पदकाची. नैतर विसरायचं. अजून एक. धावण्याच्या खेळाला स्त्रीसंग वाईट. स्ट्यामिना अगदी जातो. त्यामुळे तो टाळा. बाकी कै प्रॉब्लेम नै.

३. लहान मुलांना खाण्यापिण्याचे मॅनर्स शिकवणे: मिल्खाला काहीही न सांडता पिता म्हणून येत नाही. दूध म्हणू नका, तूप म्हणू नका, बिअर म्हणू नका. सतत याच्या तोंडाच्या दोन्ही बाजूंनी ओघळ खाली येऊन दाढीत नि मग खाली अंगावर. बघूनसुद्धा नुसती चिडचिड होते. लहान पोरांना दाखवलं की त्यांच्या डोक्यात फिट बसेल, हे असंअसं प्यायचं नाही. काम झालं.

बाकी आपल्यासोबतच्या लहान पोरालाही पुढे काय ते ओळखता येईल असं भारी स्क्रिप्ट लिहिणे, जन्मानं-कर्मानं पंजाबी असलेल्या बाईच्या तोंडी 'मेरे को सब पता है' असा संवाद घालणे, फरहान्याची बैलासारखी वारेमाप बावडी सत्तत जमेल तिथे दाखवणे... अशा अनेक फुटकळ चिजाही आहेत. पण ते ठीक. पिच्चर मात्र खास.

बॅटमॅन Wed, 31/07/2013 - 18:27

In reply to by मेघना भुस्कुटे

मस्त श्राद्ध घातले आहे. फारेण्ड साहेब/साहेबीण तेंनी एक थोडं उत्तरक्रिया उरकूनच टाकावं म्हंटो मी!

नेहरू: बाकी कशासाठी हा सिनेमा बघाल न बघाल, पण नेहरूंसाठी बघाच. नेहरूछाप वेषातला (गुलाबाचं ते प्लॅस्टिकी सदाबहार फूल. वा!) गोलमटोल दिलीप ताहिल समोर आला, की सुरुवातीला आपण थोडे बावचळतो खरे. पण मग आपण सरावतो. नंतर नंतर तर मी नेहरूंची वाट बघायला लागले होते. हमखास मनोरंजनाची हमी. सर्वांत थोर सीन म्हंजे, भारतीय खेळाडूंच्या पथकाला दिलेल्या खास गार्डन पार्टीत नेहरूंना 'पाकिस्तान के प्रधानमंत्रीजी का' फोन येतो, तो. मग ट्रेवर ठेवून फोन आणला जातो. नेहरू तिथेच फोनवर बोलतात. आणि मग 'अभी अभी पाकिस्तानी प्रधानमंत्रीजीके साथ बात हुई. उन्होनें दोस्ती कायम करने के लिये दोनों देशोंमे प्रतियोगिता का प्रस्ताव रख्खा है' अशी गोड बातमी लग्गेच सगळ्या पाव्हणांसमोर जाहीर करतात. पाहून जीव धन्य धन्य झाला. असे इतर बरेच सीन आहेत. पण हा सरताज.

दुस्त कुतले!!! उगीच आम्च्या भार्ताला शिव्या देता ते ! अहो तै, मोबाईलचा शोध तेव्हाच लावला होता हे दाखवलंय त्यांनी. असलं टाप शीक्रेट उघडपणे दाखवायची टाप आहे का कुणाची?

धावपटूंसाठी टिप्सः तांत्रिक माहिती वगैरे फडतूस गोष्टी तर तुम्हांला तुमचा कोचपण देईल. पण त्यापलीकडच्या टिप्स 'मिल्खा'तून मिळतात. स्पर्धा जिंकायच्या असतील, तर दोनच मुख्य गोष्टी - रक्त ओका, घाम गाळा. रोज साधारण दीड-दोन कप. अनुक्रमे. तरच काही आशा आहे पदकाची. नैतर विसरायचं. अजून एक. धावण्याच्या खेळाला स्त्रीसंग वाईट. स्ट्यामिना अगदी जातो. त्यामुळे तो टाळा. बाकी कै प्रॉब्लेम नै.

लंडनहून आणलेल्या "व्हिटामिन" च्या गोळ्यांबद्दल काही आहे का हो त्यात ;)

संदर्भः गुंडा.

लहान मुलांना खाण्यापिण्याचे मॅनर्स शिकवणे: मिल्खाला काहीही न सांडता पिता म्हणून येत नाही. दूध म्हणू नका, तूप म्हणू नका, बिअर म्हणू नका. सतत याच्या तोंडाच्या दोन्ही बाजूंनी ओघळ खाली येऊन दाढीत नि मग खाली अंगावर. बघूनसुद्धा नुसती चिडचिड होते. लहान पोरांना दाखवलं की त्यांच्या डोक्यात फिट बसेल, हे असंअसं प्यायचं नाही. काम झालं.

(ईईई ऊऊऊ यक्क इ.इ.इ. सगळे किळसदर्शक उद्गार) बरं झालं नै पाहिला ते.

हा उद्गार नसून इत्यादिमधला इ आहे. इ+इ=ई करून कोणी उगीच संधी साधू नये.

बाकी आपल्यासोबतच्या लहान पोरालाही पुढे काय ते ओळखता येईल असं भारी स्क्रिप्ट लिहिणे, जन्मानं-कर्मानं पंजाबी असलेल्या बाईच्या तोंडी 'मेरे को सब पता है' असा संवाद घालणे, फरहान्याची बैलासारखी वारेमाप बावडी सत्तत जमेल तिथे दाखवणे... अशा अनेक फुटकळ चिजाही आहेत. पण ते ठीक. पिच्चर मात्र खास.

ते मेरे को इ. प्रकरण दिल्लीतही मूळ धरू लागलेय अलीकडे असे आमच्या एका पंचनदीय मित्राचे म्हण्णे पडले. बाकी त्या बलीवर्दाला सहन करणे अंमळ अवघडच असेल याबद्दल पूर्ण सहमत आहेच.

नंदन Fri, 02/08/2013 - 13:56

In reply to by मेघना भुस्कुटे

जन्मानं-कर्मानं पंजाबी असलेल्या बाईच्या तोंडी 'मेरे को सब पता है' असा संवाद घालणे

अरारारारा. 'जंजीर'च्या आगामी तेलगाळलेल्या आवृत्तीच्या ट्रेलरातही 'आंखरी हंसी उस की नहीं होनी चाहिए, विजय!' हे to have a last laugh चे शब्दशः भाषांतर ऐकून प्रियंका चोप्राचं पात्र फावल्या वेळात मटा किंवा ट्यांड्या वाचत असावं, असा दाट संशय वाटतो :)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 31/07/2013 - 19:47

कंटाळा आला असेल तर 'भाग मिल्खा भाग' बघायचा आणि उत्साह असेल तर 'ब्रेकिंग बॅड' सुरू करायचं एवढं लक्षात आलं.

ऋषिकेश Thu, 01/08/2013 - 09:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नव्हे नव्हे! इतका रटाळ चित्रपट बघुन कंटाळा वाढायचा संभव आहे!
चित्रपट संपता संपत नाही

विसुनाना Fri, 02/08/2013 - 11:54

फिल्म्स डिव्हिजनच्या अनेक फिल्म्स (किंवा डॊक्यूमेंटरीज) यूट्यूबवर उपलब्ध आहेत. त्या एकेक करून पहातोय. गुलजारांनी भीमसेन जोशींवर केलेली डॊक्यू. पाहिली.
नव्या मुंबईसाठी चार्ल्स कोरिया यांनी केलेली (त्याकाळातली पॊवरपाईंट प्रेझेंटेशनसदृश) फिल्म पाहिली. कोकणातल्या ’चित्रकथी’ वरची डॊक्यू. पाहिली.इ.इ.

हल्ली ’फिल्म डिव्हिजन की भेंट’ पूर्णपणे बंदच झाली काय? चिंजंसारख्या दर्दींनी यावर प्रकाश टाकावा.