Skip to main content

एका व्यक्तीच्या नजरेतून

एका व्यक्तीच्या नजरेतून

#१

“आता तुझ्याशी बोलताना जपून बोललं पाहिजे. तूसुद्धा माझ्याविरोधात केस ठोकलीस तर?”
“कशाबद्दल? #MeToo छापाची?”
“...”
“वायझेड आहेस तू, अलेक्स! बोलणं निराळं, इतर काही करणं निराळं. महत्त्वाचं आणि दुसरं, आपण एका कंपनीत नोकरी करत नाही. तू माझा बॉस तर नाहीसच. तू माझं काही वाकडं करू शकत नाहीस. #MeToo म्हणून तक्रार करणाऱ्या बहुतेक स्त्रिया उच्चस्थानावरच्या पुरुषांबद्दल तक्रार करत आहेत.”
“ते ठीक. पण समज तुझ्याशी फोनवर बोलताना समजा स्कॉट एकीकडे मास्टरबेट करत असेल तर?”
“... तर तो गाढव आहे! दिसायला सुंदर, ढिगानं पदव्या, लठ्ठ पगार, लोकांशी नीट बोलता-वागता येतं, तरीही माझ्याशी फोनवर बोलताना त्याचा उजवा हात कामात असेल, तर मला त्याची कीव येईल… पण खरं तर मला काय त्याचं!”

#२

दुपारी डबा खात होते; एकीकडे नियतकालिक वाचन सुरू होतं. आजूबाजूला चेहऱ्यानं मला आणि मी त्यांना ओळखते ते मुलगे, पुरुष होते. ते एकाच वर्गात होते. त्यांच्या वर्गात एकही मुलगी नव्हती. सहा महिन्यांपूर्वी त्याच इमारतीत, तोच कोर्स पूर्ण मी केला होता. त्यांच्या गप्पांकडे दुर्लक्ष करत, मी वाचायचा प्रयत्न करत होते.

“आपल्या वर्गाला ‘ब्रोहोर्ट’ (कोहोर्ट म्हणजे विशिष्ट कारणामुळे बांधला गेलेला समूह) म्हणणं मला मान्य नाही. ‘ब्रो’ असणं ही मिरवण्यासारखी गोष्ट आहे, असं मला वाटत नाही.”

आता डोकं वर काढून, ‘यूं की, ये कौन बोला’ हे बघण्याशिवाय पर्याय नव्हता. हा तर अमेरिकेत राहून दक्षिण इंग्लंडच्या हेलांत बोलणारा मुलगा!

“तुझ्याशी सहमती न दर्शवणं म्हणजे मी माझ्याच पायावर धोंडा मारणं. पण तरीही यावरून तुला छळायला काय मज्जा येईल, असा विचार केल्याशिवाय मला राहवत नाही. मी संहिता, आणि तू?”

“माझं नाव ली.”

हा संवाद घडून काही महिने उलटले; त्याचा कोर्स पूर्ण झाला आणि लगेच त्याला नोकरी मिळाली.

“त्यांनी तुला नोकरी दिली म्हणून ठीक. एरवी या कंपनीत, ऑस्टिनात एकही स्त्री नसणं ही लज्जास्पद गोष्ट आहे.” मला त्याच कंपनीकडून नोकरीची ऑफर आल्यावर मी त्याच्याशी बोलत होते; आहे ती नोकरी सोडून ही नोकरी धरण्याबद्दल मत बनवण्याआधी तिथल्या वातावरणाचा अंदाज घेणं सुरू होतं; त्याची ही प्रतिक्रिया.

शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, अन्न वाया न घालवणं; आणि घरी मांजर पाळण्यापासून ते डावे-उदारमतवादी विचार अशा अनेक कारणांमुळे आमची मैत्री होणं साहजिकच होतं.

#३

लीच्या वर्गातल्या काही तरुण मुलांनीही याच कंपनीत नोकरी धरली. “ली तिथे आहे म्हणून आम्ही हो म्हटलं.” ली नसताना आम्ही त्याच्याबद्दल बोलत होतो.

#४

याच कंपनीत इतर कुठल्याशा फाजील संवादात, “तिथे जाण्याएवढे आचरट आणि मूर्ख तुम्ही पोरं दिसत नाहीत.” (मूळ उल्लेख - “you guys”.) असं एकानं म्हटलं. त्यावर मी उत्तर दिलं, “ही पोरं नाहीतच आचरट आणि मूर्ख; पण मी आहे.”

त्यावर कंपनीच्या दुसऱ्या ऑफिसात काम करणाऱ्या मुलीनं दात काढले.

#५

ली, एक कॉमन मित्र आणि मी एकत्र जेवत होतो.

“याच रविवारी, मी आयुष्यात प्रथमच समलिंगी लग्नासाठी जाणार आहे. बायकोचा चुलतभाऊ. त्याच्या नातेवाईकांपैकी फक्त आम्ही दोघंच जाणार आहोत.”

मला जरा आश्चर्यच वाटलं. साधारण वर्षभरापूर्वी एका भारतीय समलैंगिक मित्रानं अमेरिकेत लग्न केलं; त्याचे आई-वडील मराठी मध्यमवर्गीय, वयस्कर लोक. ते दोघंही हौसेनं लग्नात नाचले होते.

“गे मुलामुळे समाजात आपली प्रतिष्ठा जाईल असं त्याच्या पास्तर वडलांना वाटतं. शिवाय गे पुरुषामुळे स्ट्रेट पुरुषांना वाटणारी भीती निराळीच!” लीनं स्पष्टीकरण दिलं.

मी दोन्ही मित्रांकडे बघितलं. “तुम्ही दोघं स्ट्रेट पुरुष आहात … असं माझं गृहितक. मी स्त्री आहे. पण मला नाही तुमची भीती वाटत! यात तुम्हांला तुमचा अपमान वाटत नाही ना?”

दोघंही समजून उमजून हसले.

#५

आमच्या कंपनीत, मी जे काम करते तशाच नोकरीसाठी मुलाखत देणाऱ्या एका अनोळखी मुलीनं मला लिंक्डइनवर गाठलं. मुलाखतीची प्रक्रिया, आमची कंपनी, यांबद्दल तिला प्रश्न होते. माझ्यापरीनं तिला उत्तरं दिली. शेवटी तिला म्हटलं, “नोकरी शोधासाठी शुभेच्छा. तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी मुली/स्त्रिया बघायला मला आवडेल.”

तिनं उत्तर दिलं, “Me Too.”

हल्ली लिंक्डइन, फोनवर जीमेल अशा संवादांसाठी एकोळी उत्तरं सुचवतात. मशीन लर्निंग, डेटा सायन्स वगैरे शब्द तुमच्या कानांवर पडले असतील. हा त्याचाच आविष्कार.

लिंक्डइननं मला उत्तर सुचवलं, “Sorry.”

#MeTooचा एवढा धसका लिंक्डइननं घेतला असेल असं मला वाटलं नव्हतं. त्याही पुढे #MeTooचे विनोद असे माझ्या तोंडावरच आणि एवढ्या चटकन होतील असंही मला वाटलं नव्हतं. यातल्या विनोदाची मात्रा कमी होती म्हणून का काय, मी मूळ अभ्यासक्षेत्र बदलून आता याच विषयात काम करायला सुरुवात केली आहे.

(लिंक्डइनला मी स्त्री असल्याचं आपण होऊन सांगितलेलं नाही. पण माझा फोटो, आणि माझं बोलणं वाचून लिंक्डइनला ते समजलेलं आहे; याची पावती मिळाली.)

#६

माझ्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे मी गेली बरीच वर्षं फक्त लिनक्स वापरत्ये; विंडोज आणि मॅकशी संबंध नाही. हल्ली बऱ्याच कंपन्यांनी क्लाउड कंप्यूटिंग वापरायला सुरुवात केलेली आहे. त्यात बहुतेकदा लिनक्स वापरलं जातं. मैत्र, सहकर्मचारी त्यात चाचपडत असतात; मी काही डेमो द्यायला सुरुव‌ात केली आणि भराभर कमांड्स टाईप करत गेले की हे लोक आश्चर्यचकित होतात. ते ठीकच.

एका मित्रानं मला म्हटलं, “मलाही रिमोट मशीनवर लिनक्स वापरायचं आहे. मदत करशील का?”

नाही म्हणण्याचा सवालच नव्हता. फोनवर मी त्याला शिकवणार असं सुचवलं. एकीकडे घरातली बिनडोक कामं उरकून टाकता येतील, असं माझ्या डोक्यात होतं.

“तू तुझा लॅपटॉप उघड ना… माझी स्क्रीन तुला दाखवतो, म्हणजे काय हवंय ते तुला थेट दाखवता येईल.”

“तू आधी तोंडी तर सांग, तुला काय हवंय. मला ते सहज आठवलं नाही तर गूगल आहेच.”

त्यानं हट्टच धरला. मला वाद घालायचा कंटाळा आला. लॅपटॉप उघडला. चारेक मिनीटं वाट बघितल्यावर त्याची स्क्रीन दिसायला लागली. त्या संगणकाच्या इंटरनेटचे आत जाण्याचे दरवाजे उघडे होते, बाहेर येण्याचे बंद होते. अभिमन्यू! संगणकशास्त्रातल्या पदवीशिवाय ते मला समजलं.

“या विषयातली पदवी कोणाकडे आहे; कोणी कोणावर अविश्वास दाखवला पाहिजे”, हे प्रश्न मी विचारले नाही. राजकीय भूमिका म्हणून विचारायला हवे होते का? राजकीय भूमिका आणि मैत्री या गोष्टी निराळ्या काढता येतात का?

#७

तसाच अनुभव ऑफिसात. अगदी ताजा.

“हे स्क्रिप्ट चाललं का नाही, हे कसं समजणार?” मला एकानं विचारलं.
“मी सांगते ती कमांड वापर; तुझं काम झालंय का नाही, हे लगेच समजेल.”
“पण त्यात स्टार (*) नाही का वापरावा लागणार?”
“नाही, हे वेगळं. तुझा बहुतेक दुसऱ्या कमांडमध्ये आणि यात गोंधळ होतोय.”
तरीही त्यानं स्टार टंकला; कमांड चालली नाही; लिनक्सनं पुढ्यात ‘एरर मेसेज’ टाकला. मग त्यानं माझं ऐकलं.

त्याच संध्याकाळी, ‘ऑफिसात वावर-वापराचे नियम’ या प्रकारांवरून चाबरटपणा सुरू होता.

“‘लिनक्स’ वापरता आल्याशिवाय नोकरी मिळणार नाही, असा नियम आपल्या कंपनीनं केला पाहिजे”, मी जाहीर केलं. बाकीची बहुतेकशी पोरं समजून-उमजून हसली.

#८

मायकल आणि मी ऑफिसात शेजारी-शेजारी बसतो. तो अबोल असण्याबद्दल मी त्याला थोडं चिडवलं होतं. मला नोकरीच्या सुरुवातीला बरेच छोटे प्रश्न असायचे, ते मी त्याला विचारले. त्यानं बरीच मदत केली. ‘तुझ्याकडून चिडवून घ्यायला आणि तुला मदत करायला मला नोकरी दिल्ये’, अशी त्यानं सुरुवात केली होती.

तीन दिवस तो आजारपणामुळे आला नव्हता. त्याची ख्यालीखुशाली विचारणारी इमेल्स मी रोज पाठवली. चौथ्या दिवशी तो ऑफिसात आला.

“अरे वा, बरं वाटलं तू परत आलेला बघून!”
“तुला बघून मलाही असंच म्हणता आलं असतं तर किती बरं झालं असतं!”
“आजारपणामुळे औषधं खात होतास का मेथचा ओव्हरडोस झाला होता?”
“घ्या आपापलं काय ते समजून!” मायकलनं डोळा मारला.

आता बारकंसारकं काही अडलं तर मायकलही मला प्रश्न विचारतो. विशेषतः लिनक्स आणि गणितासंदर्भात.

#९

“तू अनोळखी स्त्रियांशीही बोलताना बुजत नाहीस; स्टायलिश बूट वापरतोस. गे असशील असं मला वाटलं होतं”, मी अलेक्सला म्हटलं.
“अगं, तुला पटणार नाही हे, पण स्त्रियासुद्धा माणूसच असतात.”

आमची मैत्री फार सहजरीत्या का झाली, हे अशा वेळेस मला चटकन लक्षात येतं.

#१०

मी आणि ग्रेग जेंगा खेळत होतो. जेंगा म्हणजे विटांसारखे लाकडाचे ठोकळे असतात. तीन ठोकळे आडवे, तीन ठोकळे सरळ असे एकावर एक रचून ठेवतात. मग एकेक ठोकळा काढायचा आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा. ज्यांच्यामुळे ती रास पडेल ते हरले, असा हा खेळ.

तर मी आणि ग्रेग जेंगा खेळत होतो. ती रास एवढी उंच झाली की खुर्चीवर चढल्याशिवाय मला ठोकळे रचता येईनात. मी खुर्चीवर चढत असताना ग्रेग म्हणाला, “जपून. तुझ्या हाताच्या धक्क्यानं ती रास कोसळायला नको.”

तो खेळ फार रंगात यायला लागला. बाकी बघणारे माझी किंवा ग्रेगची बाजू घेऊन बोलत होते. ग्रेग आणि मी एकमेकांना मदत करत होतो. “इथे नको, तिथे ठेव, पुढच्या वेळसाठी ते सोयीचं होईल.”

ती रास एकदाची पडली; खेळ एकदाचा संपला; बाकीचे लोक ग्रेगचं अभिनंदन करत होते. तेव्हा ग्रेग मला म्हणाला, “गे पुरुष आणि स्त्री खेळत होते म्हणून खेळ जिंकला. तू किंवा मी हरलो नाही.”

#११

माझा आताचा बॉस साधारण ५२-५५ वर्षांचा आहे. माझ्यापेक्षा बराच जास्त अनुभव, साधारण १५-१८ वर्षांनी मोठा, ‘नासा’त दहा वर्षं नोकरी करून 'आता काही नवीन करावं' या विचारानं ते सोडून वकिली शिकणारा, आणि वकीली आपल्याला फार आवडत नाही हे लक्षात आल्यावर पुन्हा तंत्रज्ञानाकडे वळलेला.

एका सोमवारी आमची नेहमीची मिटींग सुरू होताना आणखी एका सहकर्मचाऱ्यानं विचारलं, “विकेण्ड कसा गेला?”
बॉस म्हणाला, “जरा गडबडच होती. रविवारी मोर्चाला गेलो होतो. बंदुकांनी होणाऱ्या हिंसाचाराविरोधात होता तो, ‘मार्च फॉर लाईफ’.”

लग्न केलेलं नाही; मुलं नाहीत; माझ्यापेक्षा वयानं बऱ्यापैकी मोठा मनुष्य 'फ्यामिली-फ्यामिली खेळणाऱ्या' अमेरिकेत, टीनेजर मुलांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेला होता.

माझा खवचटपणा, दोन दिवस का होईना, कमी झाला.

#१२

ऑफिसात 'diversity training' या नावाखाली एका इमामाला आणलं. ‘तो’ देव, ‘तो’ सामान्य माणूस आणि हे बोलणारा ‘तो’ इमाम आणि त्यावर ‘देव कोणता का असेना, देवावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला मूल्य मिळतात, अंगी विनम्रता येते’ असा धार्मिक माजोरीपणा ऐकून माझं डोकं फिरलं.

मी बॉससमोर चिकार तणतण केली. तो हसला. “You are preaching the choir. साठीला टेकलेल्या, म्हाताऱ्या, धार्मिक, कॅथलिकांकडून तू फार जास्त अपेक्षा ठेवत्येस. पण हरकत नाही, इमेल कर त्यांना.”

मी इमेल केलं. तेच इमेल बॉसलाही पाठवलं, “मी फार कडवटपणे बोलले नसेन, अशी आशा आहे”, असं त्यावर म्हटलं. त्याचं उत्तर आलं, “कडवट नाही, तिखट आहे. पण चांगलं लिहिलं आहेस.”

#१३

त्या इमेलनंतरही ऑफिसचा एचारवाला - म्हातारा, कॅथलिक, गोरा - आणि मी भेटून या विषयावर बोलायचं, असं ठरलं. एरवी तो आणि मी येता-जाता भेटलो की नेहमीचा बोगसपणा करत राहतो. तो म्हाताराही मला वाकुल्या काढून दाखवतो.

####

जगासाठी मी ‘स्त्री’ असेन. माझ्यासाठी मी ‘मी’ आहे; आहार-निद्रा-भय-मैथुन या मूलभूत गरजांपलीकडे माझं जग बरंच विस्तारलेलं आहे. ह्या जगातले लोक (मोजके अपवाद वगळता) स्त्री किंवा पुरुष नसतात. ते अलेक्स, ली, मायकल, जॉईस, आर्लीन, डेबी अशी निरनिराळी माणसं असतात. कधी आमची मैत्री असते; कधी निव्वळ परिचय असतो; आणि बाकी बहुसंख्य व्यक्तींशी मला काही घेणंदेणं नसतं.

####

हा लेख काल, ५ मेला लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत प्रकाशित झाला. त्या सदराचं नावं - तिच्या नजरेतून तो. (सदराचा दुवा)

हा लेख लिहायला सांगितल्यावर काय लिहायचं हे मला नक्की समजत नव्हतं. म्हणून सदरात तोवर प्रकाशित झालेले इतर लेख वाचले. स्त्रियांनी एकेका पुरुषाबद्दल लिहिलेली मतं वाचली. मला त्यांतलं 'एकपुरुषव्रत' फारसं पटलं नाही. मला निरनिराळे पुरुष आणि स्त्रिया भेटतात; त्या निरनिराळ्या व्यक्ती असतात. ४२-४३ वर्षांची स्त्री "लाल रंग माझा फार आवडता आहे", असं म्हणते; मला ते फार बालिश वाटतं. हे मी तिला आत्तापर्यंत सांगितलेलं नाही कारण मला तिच्याबद्दल आपुलकी वाटते. आमची काहीकिंचित मैत्री आहे असं म्हणायलाही हरकत नाही. दुसऱ्या बाजूनं ३५-३७ वर्षांच्या स्त्रीशी, 'चेहऱ्यावर मेकपचे थर थापणाऱ्या स्त्रियांच्या मानसिक स्थैर्याबद्दल मला शंका असतात' असं म्हणून मी चर्चा उकरून काढते. तिच्याशीही माझी थोडीबहुत मैत्री आहे. आणि आम्ही तिघी एकत्र बसून अनेक विषयांवर थिल्लरपणा करतो; एकत्र जेवायला जाण्याचे बेत रचतो.

या लेखाबद्दल प्रतिक्रिया आल्या. त्यांतल्या काहींचं म्हणणं - "एका परिच्छेदाचा दुसऱ्याशी काही संबंध नाही." तर ते मुद्दामच तसं केलेलं आहे. फेसबुकमुळे का होईना, मोठं लेखन वाचण्याची आपली क्षमता कमी झालेली आहे; दोन-चार हजार शब्दांचे लेख कोणीही वाचत नाही असं मला वाटतं. दुसरं, मला खूप माणसं भेटतात, मला त्या लोकांमध्ये रस असतो आणि ती सगळी माणसं निराळी असतात. मी 'ती' आहे पण पुरुषांबद्दल माझं एकसलग मत नाही. त्यांचा विचार करताना ते सगळे स्वतंत्र व्यक्ती आहेत, असंच मला दिसतं. म्हणून हे तुकडे.

लेखाबद्दल काही तिखट प्रतिक्रिया आल्या; वेळ फुकट गेला वगैरे. कारण एका परिच्छेदाचा दुसऱ्याशी काही संबंध नाही. त्यांनाच खरं मला काय करायचं आहे, हे समजलं. ते मला कितपत जमलं हा प्रश्न निराळा. मात्र हा विस्कळीतपणा हेतूतः आहे.

Node read time
8 minutes

ललित लेखनाचा प्रकार

8 minutes

चिमणराव Sun, 06/05/2018 - 21:29

शेवटचं स्पष्टीकरण आवडलं. इतर कसे लिहितात त्याच छापाचे आपण का लिहायचं? आपले अनुभव आणि शैली वेगळी.
नाहीतर "फारफार वर्षांपुर्वी एक आटपाट नगर होतं. तिथे अमक्याला तमुक दु:ख होतं. *****************दु:ख निवारण ******** शेवटी सुखाने नांदू लागले." हा फारमॅट पाठवला आहे,मधल्या जागा भरून लेख पाठवा." असाही निरोप येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/05/2018 - 20:55

In reply to by खुशालचेंडु

ते आमचे लाडके आंजा भुसनळे आहेत ना, गोलगोल आणि गग्गन शिंगे, त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार लोकसत्ताच्या पुरुषवर्चस्वाला शह देण्यासाठी मूळ उच्च पातळीच्या पेप्राला भुसनळे बाँब लावून पेप्रावर कब्जा मिळवला आहे. आता पेप्राची वाट लावायला माझ्यासारख्यांना टिणपाटांना बोलावतात ते. गिरीश कुबेर आणि पंकज भोसले आमचेच पॉसी आहेत.

खुशालचेंडु Tue, 08/05/2018 - 11:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हाला प्रतिसाद फारसा जमला नाही.

बेटर लक नेक्स्ट टैम्

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/05/2018 - 22:14

In reply to by खुशालचेंडु

यापेक्षा कमी शब्दांत लिहून किमान करमणूक करून दाखवा नाही तर आंजावरच्या नेहमीच्या हेटाईकडे दुर्लक्ष करण्याची मला सवय आहेच.

तिरशिंगराव Mon, 07/05/2018 - 12:15

आधी लेखकाचे नांव न वाचताच लोकसत्तामधे, लेख वाचायला सुरवात केली. लिहिण्याच्या स्टाईलवरुन हा नक्की ३-१४ चा असणार, असे वाटून नांव बघितले. लिहिण्याच्या स्टाईलवरुन लेखिका ओळखणे, हीच खरी पावती!!!

१४टॅन Tue, 08/05/2018 - 09:06

मुंबईच्या भाषेत रावडी बैडैस मुलींना ब्रो संबोधायची पद्धत आहे. अदितीने तिचं रावड्य बैडैस्य वेळोवेळी सिद्ध केलेलं आहेच, पण तरीही हा लेख बाऊन्सर गेला. मला जमतील तसे अर्थ खाली लावलेले आहेत.
१- मी लावलेला अर्थ: तुला उगीच तक्रारी करण्यात(सहानुभूती मिळवण्यात? पळा-) रस नाही, किंबहुना तुच्छतावाद ही तुझी स्टाईल आहे. आवल्डं. जाम आवल्डं.
२- समविचारी पुरुष मित्र मिळण्याचा आनंद? आणि भाग १ मधल्या पुरुषाबरोबर त्याचा जाणवणरा कॉन्ट्रास्ट.
३- हा माणूस खरंच चांगला आहे.
४- पार बाऊन्सर.
५- नॉर्मल भाग. कळ्ळा. त्या पुरुषांचा आडून केलेला गौरव. (देवा, काय काय पहायला लावणारेस अदितीकडून)
६- ब्रो, कहना क्या चाहती हो? राजकारण किऽद्रसे आया?
७- उगीच. तुझ्यावर अविश्वास वगैरे अभिप्रेत असेल तर अगदीच म्हंजे पराचा कावळा ब्वॉ.
८- पहा ४.
९- ज्यामच गौरी देशपांडे स्टाईल. बोऽरींग! (कारण तू लिहीलंहेस. आय एक्स्पेक्ट मोअर.) (पहा १.)
१०- कळ्ळं. पहा ९.
११- कळ्ळं. जाम आवल्डं.
१२- पहा ९.
१३- नाईस. :D
अंतिम- छान. थोडक्यात, जरा प्रस्तावना दिली असतीस तर चतुरंगच्या सरासरी वाचकाला (म्हणजे मी) ते नीट कळलं असतं, "माझ्या आयुष्याच्या राखाडी (इथे ऑलिव्ह ग्रीन/बर्न्ट सिएन्ना चालेल, तुझं अमेरिकन्य ठसवून आम्हावर अजून इंप्रेशन पाडायला :P) सतरंजीवरचे हे मला भेटलेले रंगीत धागे..." इत्यादी इत्यादी.
पळा!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/05/2018 - 00:14

In reply to by १४टॅन

राजकारण निराळं आणि राजकीय भूमिका निराळी. उदाहरणार्थ नास्तिकता, उदारमतवाद, स्त्रीवाद या माझ्या राजकीय भूमिका आहेत. The personal is political या अर्थानं.

माझ्या मते आणखी गोंधळ असा की या एकेका गोष्टीला फार अर्थ नाहीये. व्हॉट्सॅपवर येणारे चुटकुले आहेत. मात्र ते एकत्र जोडून त्यातून 'एकूण पुरुषजाती'कडे बघण्याची माझी भूमिका मांडलेली आहे. कोणाला त्यांतल्या काही गोष्टी रटाळ वाटल्या, लेखाची मांडणी गोंधळवणारी वाटली तर त्याला इलाज नाही; कारण माझं आयुष्य रोलर-कोस्टरवर नाचणारं किंवा गोडगुलाबी डिस्नीफाईड अमेरिकी/चंगळवादी/pre-digested नाही आणि त्याबद्दल मला खंतखेद नाही.

चिमणराव Tue, 08/05/2018 - 09:31

तिकडे लेखाला प्रतिक्रिया देणे अपेक्षित होतं पण ती मॅडरेटिंगमध्ये जाते आणि नंतर दिसत नाही,लेखकाच्या मेल अकाउंटला प्रतिसाद दिल्यास मात्र लगेच त्यादिवशीच उत्तर येतं. असं नेहमीच होतं. मटा पेपरात ती प्रतिक्रिया फक्त मटा अकाउंटलाच जाते.

नीधप Sat, 26/05/2018 - 16:40

लेख आवडला.
काही कन्फूजने आहेत. ती मेसेंजरावर चर्चिण्यात येतील.

'न'वी बाजू Sat, 26/05/2018 - 17:25

In reply to by नीधप

काही कन्फूजने आहेत. ती मेसेंजरावर चर्चिण्यात येतील.

Public declaration of a private intention?