पुणे 1790-95

Parvati Temple Vintage Photo

(ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत असलेले एक ब्रिटिश अधिकारी सर जेम्स डग्लस (1826-1904) यांनी मुंबई, जवळपासची स्थळे आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत अनेक लेख लिहिले होते. या लेखांचे संकलन करून त्यांनी आपली पुस्तकेही नंतर प्रसिद्ध केली होती. या लेखांमधील त्यांचा सर चार्लस मॅलेट यांच्याबद्दलचा लेख चाळत असताना मला त्यात 1792 मधल्या पुण्याचे हे वर्णन सापडले. संपूर्ण लेखाचा अनुवाद करण्यापेक्षा पुण्याचे वर्णन जास्त रोचक ठरेल या कल्पनेने तेव्हड्याच भागाचा अनुवाद मी केला आहे.. वाचकांना हा अनुवाद आवडेल अशी अपेक्षा आहे.)
1790-95 हा कालखंड पुण्यासाठी मोठा खळबळजनक होता असे म्हटले तरी चालेल. 1791 मध्ये घाशीराम कोतवालावर झालेल्या दगडफेकीत तो ठेचला गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. 1794 मध्ये महादजी शिंदे यांचे वानवडी येथे तापाने निधन झाले होते आणि 1795 मध्ये स्वतः श्रीमंत पेशवे यांचा शनिवारवाड्याच्या गच्चीवरून खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनांचे मधल्या तीन वर्षाच्या कालखंडाच्या पूर्व आणि पश्चात आलेली अकस्मात वादळे असे करणे योग्य ठरेल कारण मधला हा तीन वर्षांचा कालखंड पुण्यासाठी एक ऐतिहासिक आनंदपर्व होते असे म्हणणे फारसे चूक ठरणार नाही. हा आनंददायी कालखंड सुरू झाला होता जून 1792 मध्ये झालेल्या महादजी शिंदे यांच्या आगमनाबरोबर आणि संपला होता फेब्रुवारी 1794 मध्ये झालेल्या त्यांच्या निधनाबरोबर!
चर्तुदिशांहून आलेल्या अनोळखी लोकांच्या जमावांनी पुणे त्यावेळी गजबजलेले दिसत होते. या लोकांनी आपल्या थैल्या जरा जास्तच सैल सोडल्याने का होईना! बाजारांच्यात मोठे उत्सवी वातावरण होते. त्या वेळी दिल्लीमधील मुघल सम्राट हे पेशव्यांच्या हातातील एक बाहुले बनलेले होते. या मुघल सम्राटाच्या साम्राज्याचे सुभेदार म्हणून पेशव्यांना वस्त्रे प्रदान करण्याच्या समारंभासाठी महादजी शिंदे मुद्दाम पुण्याला आले होते. या समारंभाच्या दिवशी (हा समारंभ 11 जून 1792 मध्ये झाला होता.) लोकांचा उत्साह पराकोटीला पोचला होता आणि संपूर्ण शहरच हर्षमय झाले होते. जूनचा महिना असल्याने दख्खःनच्या पठारांवर निसर्गाने आपला हिरवा गालिचा उलगडला होता व पक्षांचा चिवचिवाट सर्वत्र ऐकू येत होता. महादजी शिंद्याची राहुटी जरी संगमाजवळ उभी केलेली असली तरी पार खडकीपर्यंत त्यांच्या फौजेचे तंबू सर्व उंच सखल प्रदेशामध्ये उभे राहिलेले दिसत होते. या भागात दिसणार्‍या सर्व झाडाझुडपांच्या सावलीला एकत्र बसून शिंद्याच्या फौजेतील जवान सुट्टी असल्याने मौजमजा करताना दिसत होते.
येणार्या प्रत्येक रात्री, शनिवार वाड्यातील गणेश हॉल दिव्यांच्या झगझगाटामुळे लखलखत होता. शेकडो नर्तकींचे नाच तिथे चालू असत. गणेश हॉलच्या एका बाजूला असलेले कारंजे व त्याच्या शेजारचे वाहते पाणी यांच्या आवाजाच्या साथीवर गाण्याचे कार्यक्रम होत होते. (आम्हाला हे गायन जरी एकसुरी आणि कंटाळवाणे वाटत असले तरी पौर्वात्य लोकांना ते स्वर्गसुखासमान वाटते यात शंकाच नाही.) हिराबागेचा वाडा त्याच्या वैभवात तळपत होता तर ताराबाग (Helen’s Isle, परीचे बेट) त्याच्या भोवती असलेल्या तळ्यामधे एखाद्या भिंगावर असलेल्या धुळीच्या कणाप्रमाणे दिसत होता. रस्त्याने नेले जाणारे हत्ती, वाघोबा या नावाने ओळखल्या जाणार्‍या दगडी वाघांना आमिष वाटत आहेत की काय? असे भासत होते. मुळा मुठा नद्यांवर अनेक लोक नौकांमध्ये सफर करून मौजमजा करत होते. रात्री याच नौका त्यांच्यावर केलेल्या आकाशकंदिलांच्या रोषणाईने नुसत्या झगमगत होत्या.
वस्त्रे प्रदान करण्याच्या समारंभाच्या दिवशी महादजी शिंद्यांच्या राहुटीपासून थोड्या अंतरावर उभारलेल्या राहुट्यांच्या टोकाला एक सिंहासन किंवा तख्त उभारलेले होते. हे सिंहासन म्हणजे दिल्लीच्या तख्ताची प्रतिकृती होती. अर्थात हा आनंदोत्सव साजरा करणारे पेशवे आणि दिल्ली दरबार या दोन्हींना कल्पनाही नव्हती की थोड्याच काळात ही दोन्ही साम्राज्ये धुळीस मिळणार होती.
समरंभाच्या दिवशी पेशवे मिरवणुकीने येथपर्यंत आले होते व नंतर रिकाम्या तख्तापर्यंत पायी चालत आले होते. तीन वेळा तख्ताला कुर्निसात केल्यानंतर त्यांनी सिंहासनासमोर 101 सुवर्ण मोहोरा भरलेली थैली नझर म्हणून ठेवली होती. मुघल बादशहाच्या इराणी वझिराने मग पेशव्यांना खिलत (राजाचा अंगरखा), रत्नजडित शिरपेच, तुरा, ढाल-तलवार, दोन मोरपिसे आणि “दोन चंद्रकोरी, दोन तारे, सूर्य आणि मासा यांची चित्रे असलेला” ध्वज हे सगळे प्रदान केले होते. हे सगळे घेऊन पेशवे जवळच्या राहुटीत गेले होते व थोड्याच वेळात बादशहाने पाठवलेले हे सर्व वस्त्रालंकार परिधान करून बाहेर आले होते. एका पालखीत बसलेले महादजी शिंदे आणि पेशव्यांचे इतर सर्व सरदार पेशव्यांचे, एकनिष्ठ सेवक असल्याचे दर्शवित त्यांच्या समोर एखद्या पंख्याप्रमाणे पसरलेले होते. नंतर तेथे जमलेल्या सर्व लोकांनी केलेल्या जयजयकाराच्या आवाजात, तोफांच्या गडगडाटात अणि तुतार्‍यांच्या ललकारींत, सातार्‍याच्या भोसल्यांनी पेशवे म्हणून घोषित केलेल्या, आणि स्वतःला तैमुरचे वंशज म्हणवणार्‍या मुघल बादशहाने सुभेदारकी दिलेल्या, या राजाने मराठी साम्राज्याची राजधानी असलेल्या व शिवाजीने स्थापना केलेल्या पुणे शहरात प्रवेश केला होता. ब्रिटिश रेसिडेन्सी शिंद्यांच्या तळाच्या अगदी जवळच असल्याने तेथे असलेल्या सर्व लोकांना या संपूर्ण उत्सवात भाग घेण्यासाठी आमंत्रण होते. नद्यांचा कोणताही संगम खरे म्हणजे एक पवित्र जागा समजली जाते. परंतु ब्रिटिश रेसिडेन्सी ज्या ठिकाणी होती तो मुळा-मुठांचा संगम ही किती रम्य आणि सुंदर जागा आहे याची आज सुद्धा उत्तम कल्पना येऊ शकते.
1792 मधे असलेले पुणे कसे होते याची कल्पना आजमितीला करणे अतिशय सोपे आहे. परंतु यासाठी तुम्हाला काल्पनिक विध्वंसाचा मार्ग अनुसरणे आवश्यक आहे. प्रथम सर्व चर्चेस आणि कबरस्ताने तुमच्या नकाशातून काढून टाका. सर्व सैनिक छावण्या आणि इस्पितळे यांचीही वासलात लावा. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ, तारेचे संदेशवाहक खांब, सुस्थितीतील रस्ते आणि पूल यांचीही तीच गत करा. 1792 मध्ये अर्थवट कुजलेला आणि धोकादायक असा एकच लाकडी पूल होता. तुमच्या मनातून असेम्ब्ली, कौन्सिल हॉल, गव्हर्नर आणि त्याच्याबरोबर बसणारे इतर सर्व अधिकारी काढून टाकून त्यांच्या जागी पेशव्यांहून सुद्धा जास्त सर्वशक्तीमान असलेले नाना फडणवीस यांची स्थापना करा. सर्व शाळा, कॉलेजे काढून टाका. ख्रिस्ती धार्मिक शिकवण देणारे पाद्री आणि इतर यांना वार्‍यावर उडवून द्या. पत्रकारांना फुंकर मारून उडवा. कोणालाही स्वत:चे असे म्हणता येईल असे काही देऊ नका व एखाद्याने कष्ट करून जमवलेले धन त्याच्याकडून काढून घ्या, कारण पेशव्यांच्या काळात हीच रीत बनली होती. संगमावरची रेसिडेन्सी सोडली तर उरलेला बाकी प्रत्येक इंग्लिश बंगला नष्ट करा. हे सगळे केल्यावर तुमच्या मनात दीड चौरस मैल (अंदाजे चार चौरस किमी) आकारमानाची एक जागा राहील. 1792 मधल्या पुण्याचे चित्र पूर्ण करण्यासाठी या जागेत सध्याच्या बाजारपेठा, त्यातली उत्कृष्ट कारागिरीची घरे, बड्या आणि धनवान व्यापार्‍यांच्या टोलेजंग हवेल्या हे सर्व बसवा. संगमाजवळची सर्व मंदिरे, तेंव्हाची बांधकाम झालेली पर्वतीची टेकडी ही सुद्धा या चित्रासाठी निवडा. हे सगळे झाल्यावर त्या चित्रात सतत खरेदी विक्री करणारी, ओरडणारी आणि किंचाळणारी एक लाख वीस हजार ही लोकसंख्या बसवा म्हणजे तुमचे पुण्याचे चित्र पूर्ण होईल. एडवर्ड मूर आपल्या “सर्व देव सभा” (Hindu Pantheon) या पुस्तकात पुण्याचे वर्णन करताना म्हणतो. “पुणे शहर शोभिवंत किंवा देखणे दिसेल असे बांधलेलेच नाही.” पुण्याच्या आसमंताबद्दल बोलायचे तर तो आता जसा आहे तसाच तेंव्हाही होता. लकडी पुलावरून दिसणारा देखावा आतासारखाच तेंव्हाही भव्य दिसत होता. आतासारखेच पांढर्‍या ठिपक्यांसारख्या ढगांनी व्यापलेले निळेभोर आकाश तेंव्हाही दिसत होते. त्या पार्श्वभूमीवर दिसणारा पर्वतीचा डोंगर आतासारखाच तेंव्हाही कपाळावर एक हलकी आठी उमटवत होता. सिंगगडाला न ओळखणारा पुण्यात कोण असणार? तो आणि त्याच्या पलीकडचा निळ्या सुळक्यासारखा दिसणारा तोरणा हे तेंव्हाही दिसत होते. तोरणा शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला असल्याने त्यांचा आत्मा त्याच्या शिखरावर नक्कीच रेंगाळत असणार. गणेशखिंडीच्या बाजूला एकुलते एक असणारे देऊळ आतासारखे तेंव्हाही दिसत होते. भारतीय वास्तुकलेचे वैशिष्ट्य दर्शविणारे व दिल्ली ते कन्याकुमारी यामध्ये दिसणार्‍या प्रत्येक देवळाप्रमाणे असलेले हे देऊळ सुद्धा फुलात कधीच रुपांतर न होणार्‍या कळीप्रमाणेच तेंव्हाही दिसत होते. थोडीफार सुरूची झाडे वगळली तर पुण्याचा सर्वच आसमंत तेंव्हा जरासा उघडा बोडका व वृक्षहीन दिसत होता. आता दिसणारी लाखो आंब्याची झाडे तेंव्हा बाजीरावाने (दुसर्‍या) लावलेली नव्हती. 1792 मधले पुणे हे असे होते.
16 ऑगस्ट 2018

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुण्याबद्दल समयोचित लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुण्याचा भूगोल आणि जडणघडणीचा इतिहास माहीत नसल्यामुळे 'लेख छान आहे' एवढंच म्हणता येतं. बाकी सव्वादोनशे वर्षात काय बदललं, काय बाकी राहिलं हे पुणेकरांनाच सांगू देत.

(शेवटच्या वाक्यात तज्ञ म्हणावं की पुणेकर असा क्षणभर प्रश्न पडला, पण पुणेकर म्हटल्यावर दोन्ही अर्थ आपसूक येतातच हे लक्षात आलं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९६० सालच्या आसपास १५-२० वर्षांच्या असलेल्या पुणेकरास, सध्या डोकी-कानी व्यवस्थित असल्यास, निदान ६० चे पुणे कसे होते, याबाबत विचारावे आणि लिहून काढावे. तेही मनोरंजक होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे माझ्या काही लेखांचे दुवे देत आहे. यात तुम्हाला जुन्या पुण्याची वर्णने सापडतील.
https://chandrashekhara.wordpress.com/2009/07/12/पानशेत-1961/
https://chandrashekhara.wordpress.com/2009/08/16/शनिवारवाडा/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरदार पुराच्या पाण्यात वाहून जाण्यात मनोरंजक असे नक्की काय असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

८०-८५ वयाचे चालते बोलते पुणेकर बरेच सापडतील पण त्यांनी मनावर घेऊन लिहायला हवे. ( ऐसीवरच म्हणत नाही, कुठेही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संगमावरच्या रेसिडेन्सीमध्ये काम करणाऱ्या एका इंग्रजाने संगमावरून काढलेले पुण्याचे तैलचित्र. चित्रात पुण्याची वस्ती, मागे पर्वती, त्यामागे सिंहगड आणि क्षितिजावर तोरणा किल्ला दिसत आहे. मंगेशकर रुग्णालयाने झाकेपर्यंत तोरणा लकडी पुलावरून असाच दिसत असे. जवळून नीट पाहिल्यास रेसिडेन्सीचे युनियन जॅकहि दिसत आहे.

संगमावरून दिसणारे पुणे - १८०४
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0