Skip to main content

ट्रॉलीचिकित्सा

ह्या धाग्याचा जीव तसा लहान आहे. फिलिपा फूट या तत्वज्ञानाच्या प्राध्यापिकेने १९६७ साली 'Trolley problem' या नावाने एक Gedankenexperiment (मनातल्या मनात करायचा प्रयोग) शोधून काढला. अलिकडे अनेक कारणांनी तो पुन्हा प्रसिद्धीत आलेला आहे, आणि नीतीशास्त्रामध्ये त्याबद्दल सततचा काथ्याकूट चालू असतो. ज्यांच्यासाठी तो नवा आहे, त्यांची प्रतिक्रिया काय होते हे समजून घेण्यासाठी हा खटाटोप. (अशा वाचकांनी गूगलगिरी करण्याचा मोह टाळून पुढे वाचावं ही विनंती.)

(१) अशी कल्पना करा की तुम्ही एका उंच पुलावर उभे आहात. खाली रेल्वेचे रूळ आहेत. तुमच्या असं लक्षात येतं की एका रेल्वेच्या डब्याचे ब्रेक तुटलेले आहेत आणि त्याच रुळावर पुढे ठाकठोक करत असलेल्या पाच रेल्वे कामगारांच्या दिशेने तो भरधाव चालला आहे. त्यांना सावध करण्यासाठी तुम्ही अोरडता, पण घोंघावणाऱ्या वाऱ्यामुळे काहीच ऐकू जात नाही. डबा थांबला नाही तर ते सगळे खात्रीने चेंगरून मरतील. तुमच्या शेजारी एक गलेलठ्ठ माणूस उभा आहे. त्याला जर रुळावर ढकलून दिलंत तर डबा थांबेल, पण अर्थात तो माणूस मरेल. तर अशा परिस्थितीत तुम्ही त्याला ढकलाल का? (स्वत: उडी मारून काही उपयोग नाही, कारण तुमचं वजन फार किरकोळ असल्यामुळे डबा थांबणार नाही.)

(२) तुम्ही रेल्वेयार्डमध्ये आहात आणि वरच्याप्रमाणेच एक डबा रुळावरून पाच कामगारांच्या दिशेने भरधाव चालला आहे. तुम्ही एक स्विच दाबलात तर तो डबा दिशा बदलून सायडिंगला जाईल आणि पाचही जण वाचतील. पण त्या दुसऱ्या रुळावर एकच कामगार आहे तो मात्र मरेल. तर अशा परिस्थितीत तुम्ही स्विच दाबाल का?

दोन्ही प्रश्नांना तुमची उत्तरं काय असतील? हो-नाही, नाही-हो, नाही-नाही की हो-हो? आणि का? वाचल्यानंतर तत्क्षणी मनात आलेलं उत्तर आणि अधिक विचारांती निश्चित झालेलं उत्तर ह्या दोन्हींही गोष्टी नमूद केल्यास उत्तम.

(वर म्हटल्याप्रमाणे या विषयावर आणखी खूप लिहिता येईल, पण काही प्रतिसाद येईपर्यंत थांबल्यास बिघडणार नाही.)

अरविंद कोल्हटकर Thu, 07/11/2013 - 09:06

माझी उत्तरे - तत्काल आणि विचारान्ती - हो-हो अशी आहेत.

बरेच वर्षांपूर्वी असे वाचले होते की आइन्स्टाइनच्या Special Relativity Theory च्या मुळाशी असाच काही एकमेकाविरुद्ध दिशेने प्रवास करणारे आणि आपापल्या जवळच्या घडयाळावरून दुसर्‍याच्या घडयाळामधील वेळ ताडू पहाणारे दोघे असा काही thought-experiment होता. तो तेव्हाहि मला नीट समजला नव्हता आणि आता तर मी तो विसरलोच आहे. जयदीप चिपलकट्टींसारख्या कोणी तो समजावून दिल्यास वाचायला आवडेल.

मन Thu, 07/11/2013 - 09:41

In reply to by अरविंद कोल्हटकर

तुम्ही सुचवलेल्या कृती म्हणजे "खून", जाणीवपूर्वक केलेली हत्या ठरेल.
कुणा दुसर्‍याचे जीवित संपवण्याचा हक्क इतर कुणासही कसा मिळतो?
ते पाच आहेत, अधिक आहेत केवळ म्हणून; म्हणूनच प्रसंगी इतरांचा नाहक बळी देउनही त्यांचा जीव वाचवावा असे गृहितक आहे काय?
.
मग दरवेळी जे संख्येने अधिक त्यांचेच सर्व चालणार हा पुढील टप्पा दूर नाही. ही झुंडशाहीची सुरुवात ठरेल.
.
काही असाध्या रोगांमुळे काही वर्षात मरण निश्चित असलेल्या रुग्णांचे विविध अवयव काढून त्यांचा वेळेपूर्वीच जीव घेतला, आणि त्या अवयवातून जितके मारले गेले, त्यापेक्षा अधिक लोक वाचू शकत असतील, तर तसे करावे काय? (दहा लोकांच्या किडन्या , बोन मॅरो व इतर उपयोगी घटक काढून पंधरा एक लोक वाचत असतील तर तसे करावे काय?
(वैद्यकीय माहिती जाणकार देउ शकतील, काय काय एखाद्याच्या शरीरातून काधून इतरत्र ट्रान्सप्लांट करता येइल ते.))
.
मग काय, दुष्काळ पडल्यावर मानव मांसभक्षणही निषिद्ध राहणार नाही. ( "एकास मारुन आम्ही इतर तिघे चौघे जगू. निदान पुन्हा अन्न धान्य , मांस मिळेपर्यंत" असे कोण म्हणला तर उत्तर काय द्यायचे?)
अर्थात ही टोकाची केस झाली. पण मुद्दा स्पष्ट करण्यास टोकाची उदाहरणे सोपी पडतात.
.

उपाशी बोका Thu, 07/11/2013 - 09:07

१. लठ्ठ माणसाला ढकलणार नाही.
२. स्विच दाबणार नाही.

पण डोक्यात अजून १ विचार आला: समजा, रेल्वे कामगारांऐवजी तिथे ५ लहान मुले खेळत असती, तर मी काय केले असते? तेव्हा मात्र मनात विचार आला की अश्या वेळी मी नेमके उलटे केले असते.
१. लठ्ठ माणसाला ढकलणार आणि २. स्विच दाबणार.

गूगलवर न शोधता दिलेले उत्तर आहे.

मन Thu, 07/11/2013 - 09:32

प्रश्न १:-
व्यक्तीला चालत्या ट्रेनखाली उगीच ढकलणे हा बहुतांश प्रमुख देशात गुन्हा आहे. शिवाय x माणसाला वा व्यक्तीसमूहाला वाचवण्यासाठी y ह्या व्यक्तीला ठार मारण्याचा अधिकार जगातील कुणासही नाही.
उत्तर :- ढकलणार नाही.
.
प्रश्न२:-
वरीलप्रमाणेच. दुसर्‍या , सायडिंगवरील कामगाराची काहीही चूक नाही. त्यास मारण्याचा तुम्हांस किंवा कुणासही अधिकार नाही.
उत्तरः- ट्रेन सायडिंगला टाकणार नाही.
.
अवांतरः-
तुमच्या धाग्यांचे मथळे लैच आवडतात. अनवट शब्द जोडणी त्यात असते. म्हणजे, सुटा सुटा शब्द त्यातला ठाउक असतो; पण ते जोडून झालेला सामासिक शब्द ठाउक नसतो.
उदा:- चौसष्ट तेरा, ट्रॉली चिकित्सा. जी एं चे शब्दही असेच. सांजशकुन, काजळमाया, पिंगळावेळ्,रमलखुणा .
सुटा शब्द म्हणून काजळ थाउक, माया सुद्धा ठाउक. पण काजळ माया प्रथमच ऐकला. तद्वतच.
माझ्या शाळकरी दिवसात एकदा भाषणात ग्रेस ह्यांनी "माझ्या रसडोळस मित्रांनो..." अशी सुरुवात केल्यावर त्यावेळी ठाउक नसलेला रसडोळस हा शब्दही आवडला होता.
असो.
.
तुम्ही विचारलेले प्रश्न हे क्लासिकल सनातन समस्या मांडतात नैतिकतेमधली.
हे असेच खूप काही प्रश्न माझ्या डोक्यात होते, ते मी http://www.aisiakshare.com/node/1705 (नैतिकतेचा ब्रह्मघोटाळा) इथे मांडलेत.
त्यावरचे ऐसीवरील तसेच काही मिपावरीलही प्रतिसाद वाचण्यासारखे आहेत.
.
धाग्यात दिलेल्या केसेसचं सरळ सरळ लॉजिकल एक्स्टेंशन हे " ग्रामार्थं कुटुंबम् त्यजेत् | राष्ट्रार्थम् ग्रामम् त्यजेत ||" ह्या श्लोकात फार पूर्वी चाणक्यानं करुन ठेवलय.
कुतुंब बुडवून गावाचा उद्धार होणार असेल तर कुटुंबाची वाट लावावी.("त्याग" हा गोंडस शब्द त्यासाठी च्यामारी.)
सेम वे, देशासाठी गावाची आहुती द्यावी.
खरं तर आपल्या आसपसही हे होताना दिसतच. पण ते इतक्या खुबीनं केलं जातं की "तसं अजिबात झालेलं नाही" हे त्या त्यागातील फायद्याच्या बाजूला असणारे लोक स्वतःला आरामात सनजवू शकतात.
आपल्या आसपास हे घडत नसतं, तर (मोठ मोठे कारखाने/धरणे व इतर प्रोजेक्ट्स, पर्यावरण प्रश्न वगैरेंसंबंधित) निर्वासितांचे प्रश्न निर्माण झालेले दिसले नसते.(कबूल, निर्वासितांच्या प्रश्नाला अनेक बाजू आहेत; जसे की मोबदाला घेतलयवरही बोंब ठोकणे; अवाजवी किंमत वेळ निघून गेल्यावर मागून दडपण आणणे आणि असे अनेक; पण न्याय्य मोबदला न मिळालेले victim/बळी गेलेले निर्वासितही आहेतच, भलेही संख्येने कमी असतील.)
.
तुम्ही दिलेल्या केसेस माझ्या धाग्यावर एका प्रतिसादात आल्या होत्या.(आता कोणत्या संकेतस्थळावर आल्या ते आठवत नाही. बहुदा मीम असेल) माझी उत्तरे:-
.

वरील दोन्ही घटनांत त्या जशा आहेत तशा घडू दिल्या तर "अपघात" होतील.
त्या थांबवण्यास केलेल्या कृतीतून "खून", जाणीवपूर्वक केलेली हत्या होइल.
.
तुम्ही माझ्या धाग्यावरही प्रतिसाद दिलेत तर बरं होइल. तिथे अशाच शंका मांडल्यात.

मन Thu, 07/11/2013 - 09:44

तुम्ही स्वतःला धकलणार्याच्या जागी स्थापित करुन उत्तरे दिलीत.
आता स्वतःला जाड्या माणसाच्या किंवा त्या एकट्या माणसाच्या जागी स्थापुइत करुन उत्तरे द्या.
.
पाच लोकांना वाचवायला कुणी तुम्हाला ढकलून दिलं तर तुम्हाला चालेल का?
पाच लोकांना वाचवायला कुणी सायडिंगला घेतलेली गाडी तुमच्यावर घातली तर चालेल का?
.
ह्याचीही उत्तरे "हो " असतील तर
पाच लोकांना वाचवायला जरः-
तुमच्या अतिप्रिय, अत्यंत जवळच्या,सर्वात जवळच्या व्यक्तीला कुणी ढकलून दिलं तर चालेल का?
त्याच्या अम्गावर गाडी घातली तर चालेल का?
.
जाड्या माणूस कुणाचा "जवळचा व्यक्ती" असूच शकत नाही का?
.

मन Thu, 07/11/2013 - 09:48

या घटनेतील व्यक्तींची पार्श्वभूमी मला/ढकलणार्‍याला ठाउक नाही असे गृहित धरले आहे का?
मी तसेच समजून उत्तर दिली आहेत.(कुठल्याच गटातील लोक मला ठाउक नाहित, मी वैयक्तिक ओळखत नाही हे गृहित धरले आहे.)
पाच जण कसाब सारखे नामवंत गुन्हेगार असतील तर काय?
किंवा
पाच जण अनोळखी आहेत, पण एक जण जाड्या किम्वा सायडिंग वाल्या ट्रॅकवरील व्यक्ती ही इतरांच्या जीवितास नाहक कारण ठरली असेल तर काय ह्या शक्यतांचा विचार केलेला नाही.
.

Nile Thu, 07/11/2013 - 10:42

नाही-नाही असे उत्तर देत आहे.

(तत्क्षणी मनात आलेलं उत्तर असं म्हणवत नाही. उत्तर ठरवण्याआधीच मनात आलेल्या शक्यताशक्यतांचा विचार करूनच उत्तर ठरले. अधिक विचारांती उत्तर बदलावेसे वाटले नाही.)

या विषयी गुगलवर शोधण्याच मोह या धाग्यावरील चर्चा पूर्ण होईपर्यंत टाळण्याचे ठरवले आहे.

नितिन थत्ते Thu, 07/11/2013 - 10:45

मनोबांशी सहमत आहे, [प्रकल्पग्रस्त वगैरे एक्स्टेन्शन मार्मिक आहे].

मी ही फर्स्ट रिअ‍ॅक्शन म्हणून एकाचा बळी देऊन पाचांना वाचवावे असाच विचार केला होता.
अशा विचारप्रयोगाचा फायदा हा की जर खरोखरच अशी वेळ आली तर मी यानंतर तरी तसा वागणार नाही असे वाटते.

अवांतरः पहिली केस तांत्रिक दृष्ट्या फॉल्टी* आहे. म्हणून दुसर्‍या केसचाच विचार करणेच योग्य.

*एका जाड्याचा बळी देऊन गाडी थांबेल आणि पाचांचा 'निश्चित जाणारा' जीव वाचेल ही तांत्रिक चूक आहे.

मी Thu, 07/11/2013 - 10:53

माझी उत्तरे - तत्काल आणि विचारान्ती - हो-हो अशी आहेत.

'हो' किंवा 'नाही' दोन्ही पर्यायामधे 'निवड' आहेच, त्यामुळे ज्या निवडीने कमीत-कमी नुकसान होईल ती योग्य असे मत आहे.

मन Thu, 07/11/2013 - 11:28

In reply to by मी

प्रिय व्यक्ती, आप्त , कुटुंबीय किंवा स्वतःला जाड्या व्यक्तीच्या जागी किंवा रुळारील एकट्या व्यक्तीच्या जागी ठेवलं तरी उत्तर "हो. हो." राहिल का?
.
प्रसंग एकः-
१९८४ कादंबरीसदृश एक big brother हुकूमशहा आहे. तो तुमच्या घरात घुसलाय. त्यानं सांगितलं :-
" तुमच्या संपूर्ण कुटुंबांचे विविध अवयव काढून घ्यायचे आहेत. ह्यामुळे भविष्यात जिवंत राहिलात तरी तुम्ही भयावह जीवन जगाल. किम्वा कदाचित मरालही.
पण जाता जाता रुग्णालयातील अनेक रुग्णांचे तुम्ही प्राण वचवाल."
स्वतःच्या घराची अशी राखरांगोळी करुन घेण्यास कोण तयार आहे?
.
ह्यात आणि "ढकलून देण्यात" काय साम्य आहे?
साम्य हेच आहे की तुम्ही "धकलून देण्याची" कृती करताना "कोण जगण्यास अधिक लायक" हे टह्रवताय. त्याच्या जीवावर हक्क तुम्हाला कुणी दिला?
तुम्ही (आय मीन प्रतिसादातील कल्पनेतील पुलावर उभे असलेले तुम्ही कल्पनेत) खून करताय. वर त्याचं समर्थन करताय!
.
आपोआप घडू दिलत तर तो अपघात थरेल.
अपघात टाळण्यासाठी तुम्ही खून करताय.

मी Thu, 07/11/2013 - 12:18

In reply to by मन

प्रिय व्यक्ती, आप्त , कुटुंबीय किंवा स्वतःला जाड्या व्यक्तीच्या जागी किंवा रुळारील एकट्या व्यक्तीच्या जागी ठेवलं तरी उत्तर "हो. हो." राहिल का?

किन-सिलेक्शन थेअरीप्रमाणे तुम्ही आप्तांना वाचवण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे, पण निर्णय घेण्यापासून सुटका नाही.

१९८४ कादंबरीसदृश एक big brother हुकूमशहा आहे. तो तुमच्या घरात घुसलाय. त्यानं सांगितलं :-
" तुमच्या संपूर्ण कुटुंबांचे विविध अवयव काढून घ्यायचे आहेत. ह्यामुळे भविष्यात जिवंत राहिलात तरी तुम्ही भयावह जीवन जगाल. किम्वा कदाचित मरालही.
पण जाता जाता रुग्णालयातील अनेक रुग्णांचे तुम्ही प्राण वचवाल."
स्वतःच्या घराची अशी राखरांगोळी करुन घेण्यास कोण तयार आहे?

इतर काही पर्याय आहे काय?

ह्यात आणि "ढकलून देण्यात" काय साम्य आहे?
साम्य हेच आहे की तुम्ही "धकलून देण्याची" कृती करताना "कोण जगण्यास अधिक लायक" हे टह्रवताय. त्याच्या जीवावर हक्क तुम्हाला कुणी दिला?
तुम्ही (आय मीन प्रतिसादातील कल्पनेतील पुलावर उभे असलेले तुम्ही कल्पनेत) खून करताय. वर त्याचं समर्थन करताय!

कृती करा किंवा न करा, 'ठरवण्याचा निर्णय' अपरिहार्य आहे. तुम्ही ढकलण्याचा निर्णय न घेतल्यास, इतरांना मरु देण्याचा निर्णय घेत आहात हे लक्षात घ्या, झापडं लाउन निर्णय घेतला तरी तो निर्णयच आहे.

आपोआप घडू दिलत तर तो अपघात थरेल.
अपघात टाळण्यासाठी तुम्ही खून करताय.

अपघात आणि खून हा फक्त परिप्रेक्ष्य आहे. (तुम्ही 'निर्णयकर्ते' आहात, घडणार्‍या कुठल्याही गोष्टीला 'तुम्हीच' जबाबदार आहात हि जाणिव निर्माण होणं हे ह्या प्रयोगाचं एक फलित आहे.)

मिहिर Thu, 07/11/2013 - 11:03

नाही-नाही.
अशाच प्रकारचा एक प्रश्न एका मित्राने आधी विचारला होता, त्यामुळे थोडाफार विचार तेव्हा झाला होता, त्यामुळे तत्क्षणी कोणता विचार मनात आला ह्याला फारसा अर्थ नाही.
माझ्या मित्राने विचारलेल्या प्रश्नात दोन रूळ होते आणि त्यातील एक नेहमीच्या वापरातला होता, तर दुसरा वापरात नसलेला होता (ही बाब ज्ञात आहे). वापरातल्या रुळावर पाच मुले खेळताहेत, तर दुसऱ्या रुळावर एक जण खेळतो आहे. तर त्या पाच मुलांना वाचवण्यासाठी तुम्ही गाडीचा नेहमीचा मार्ग बदलून तुम्ही तिला वापरात नसलेल्या रुळावर न्याल का असा प्रश्न होता. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने, चूक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे (नेहमीच्या रुळावर खेळणारे) म्हणून एका चूक नसलेल्याचा बळी द्यायचा का असा विचार आला होता.
गूगलवर प्रश्नाबद्दल शोधलेले नाही.

अनिल सोनवणे Thu, 07/11/2013 - 11:13

धागा वाचल्यानंतर या चिकित्सेविषयी निगेटीव्ह मत तयार झाले हे आधी प्रांजळपणे नमूद करतो. मन यांच्या प्रतिसादातला झुंडशाहीचा उल्लेख आवडला. पण अशा प्रकारे काल्पनिक सिच्युएशन्स मधे तुम्ही काय कराल यातून खरंच काही साध्य होते किंवा मनिवैज्ञानिक चिकित्सेत त्याचं महत्व काय याबद्दल काहीच कल्पना नसल्याने सध्या तरी पास.

गवि Thu, 07/11/2013 - 12:54

In reply to by अनिल सोनवणे

सहमत. अशा शृंगापत्ती / पॅरॅडॉक्सेस उभे करायला तत्वज्ञांना फार आवडतं. वाचायलाही मजा येते. बर्‍याच थॉट एक्स्पिरिमेंट्समधे प्रत्यक्षात तसं खरोखर होईल अशी शक्यता बिंदुवत कमी असते. (ग्रँडफादर पॅरेडॉक्स - टाईम ट्रॅव्हलसंबंधित..) खरंतर टाईम ट्रॅव्हल हा एक विषय घेतला तरी दहावीस तरी वेगळाले पॅरेडॉक्स उभे करता येतात. तसेच कोणत्याही गृहीतकामधे.

पण काही शक्य कोटीतल्या शृंगापत्ती:

अपहरण करुन कंदाहारला नेलेल्या इंडियन एअरलाईन्स विमानातल्या शेकडो लोकांच्या पोटेन्शियल हत्या रोखण्यासाठी पुढे शेकडो पोटेन्शियल हत्या करु शकणार्‍या (आणि केलेल्या) अतिरेक्याला सोडावे का नाही?

कानपट्टीवर पिस्तूल ठेवून अतिरेक्यांनी कमी इंधनासहित टेकऑफ करायला धमकावले असता किंवा पाकिस्तानकडे / अफगाणिस्तानकडे वळवायचा हुकूम केला असता पायलटने काय करायला हवे होते? मान्य की अमान्य इत्यादि.

अशाच एका केसमधे ओलीस असलेली व्यक्ती हे मंत्र्याचे अपत्य होते.. इ इ.

त्यामुळे तत्कालयोग्य कोणता निर्णय होईल हे सांगणं अत्यंत अवघड आहे. या अर्थाने शांत वेळेत बसून अशा थॉट एक्स्पिरिमेंट्सची उजळणी करण्याचा उपयोग कितपत आहे यावर प्रश्नचिन्ह आहेच.

मन Thu, 07/11/2013 - 13:07

In reply to by गवि

थॉट एक्स्पिरिमेंट्सने मानसिक बैठक पक्की होते. निदान आपल्या काही मूलभूत धारणा निश्चित होतात.(स्वतःपुरती मार्गदर्शक तत्वे, guidlines आपण बनवतो.)
guidelines तयार असणं पुरेसं आहे. आपण हवे त्या स्थितीला ती लावून पाहू शकतो.
कंदाहारचे ठाउक नाही पण १९८५ मध्ये भानोत नावाच्या हवाईसुम्दरीने स्वतःचे प्राण पणाला लावून्,घालवून, अनेकांचे प्राण वाचवले.
९/११ला ट्विन टोवर्स सोबत अजून एक विमान हायजॅक झाल्ते.
ते विमान व्हाइट हाउस कडे चाले होते. प्रवाशांनी प्रखर विरोध करुन पेनिसिल्वानियामधील निर्ज ठिकाणी ते पाडायला लावले.
ह्या घटना घडल्या, त्यात हवाईसुम्दरी किंवा प्रवासी ह्यांची उत्स्फुर्तता असूही शकेल.
पण मुलात त्यांना "आपण काय करायला हवं" हे स्पष्ट होतं.
सगळ्यांनाच ते स्वतःपुरतंही स्पष्ट असेल असे नाही.
थॉट एक्स्पेरिमेंट्स मधून हे स्पष्ट व्हायला मदत होते. योग्य ती कृती केली जाण्याचे चान्सेस वाढतात.

अनिल सोनवणे Fri, 08/11/2013 - 18:45

In reply to by मन

गवि, मन आभार.
@मन, तुमचा मानसिक बैठकीचा मुद्दा आवडला. पण अर्थातच गविंनी म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्षात मनुष्य काय करेल हे सांगता येत नाही. हे थोडंसं व्हिडीओ गेम सारखं नाही का ? पूर्वी व्हिडीओ पार्लर्स निघाली होती तेव्हां प्रत्यक्ष कार चालवल्याचा अनुभव देणारं एक यंत्र असायचं. त्यात अनेक सिच्युएशन्स एकामागोमाग येत असत. अचानक आडवे येणारे खेडूत, पोलिसांची कार, झटकन वळलेला रस्ता, दरी इ. अनेकदा खेळूनही प्रत्यक्षात जर असं अचानक काही घडलं तर तंतरते. कारण तो गेम खेळत असताना मनाच्या एका कोप-यात आपण आश्वस्त असतो, कि आपण सेफ आहोत. हे सर्व काल्पनिक तर आहे. हे उदाहरण आपल्या विषयापासून किंचितसं वेगळं आहे, पण जेव्हां स्पेसिफिक हेतू नसेल तेव्हां त्याबाबतीत आपण किती गंभीर असू हे पोहोचवण्यासाठी पुरेसं असावं.

याउलट, एअर होस्टेसचं दिलेलं उदाहरण हे प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिकेशन आहे. तो जॉबच असा आहे कि कुठल्याही आपत्तीला तोंड द्यायची मानसिक तयारी जॉब स्विकारतानाच झालेली असते. अशा ठिकाणी या एक्सरसाईजचा खूप उपयोग होईल. तुमचं जॉब प्रोफाईल आणि रिस्क याप्रमाणे असे सिच्युएशन बेस्ड प्रश्न उपयोगी पडतील, ज्याला आपण ड्रील म्हणतो. समुद्रावर आयुष्य घालवणा-यांनाही असे ड्रील उपयोगी पडतात.

युजर्ससाठी निश्चित उद्देशाशिवाय हा एक इंटेलेक्च्युअल टाईमपास वाटतो एखाद्या व्हिडीओ गेम सारखा. तत्वज्ञांसाठी अर्थातच तो खेळ नाही. या एक्सरसाईजमधून ते काय अर्क काढणार हे पाहणं जास्त रोचक असणार आहे. चुभूदेघे.

पूर्ण विजार Fri, 08/11/2013 - 10:19

In reply to by गवि

शृंगापत्ती या शब्दाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. शृंगापत्ती म्हणजेच पॅरेडॉक्स असं गृहीत धरतो.
ग्रँडफादर पॅरेडॉक्स वाचताना गोंधळ उडत होता. टाईम ट्रॅव्हल या कल्पनेतला फोलपणा दाखवून देण्यासाठी त्या पॅरेडॉक्सचा उपयोग होतोच. पण मुळातच टाईम ट्रॅव्हलने आपल्या पास्टमधे जाणे शक्य नाही हे समजण्यासाठी पॅरेडॉक्सची गरजच नाही. टाईम ट्रॅव्हल ही कल्पनाच प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त या शास्त्रीय संकल्पनेवर आधारीत आहे. त्यात वॉर्महोलची जोडणी दिली गेलेली आहे. पण हे सर्व केव्हां ? तर प्रकाशकिरणं, ध्वनी किंवा इतर लहरी आपल्यापर्यंत पोहोचताना होत असलेल्या टाईम डिलेमुळे. हा डेल्टा टी डिस्टन्सचं फंक्शन आहे. म्हणजेच आपलं पास्ट पहायचं तर त्याकाळी निघालेले प्रकाशकिरण अंतराळात जिथवर पोहोचले असतील तिथपर्यंतचं अंतर कापून पोहोचणे ही पहिली अट असेल. त्या बिंदूपासून (काही कारणाने शक्य झाल्यास हे आणखी एक गृहीतक) आपले बालपण आपण पाहू शकू, पण तटस्थ निरीक्षक म्हणूनच. कारण डिस्टन्स हे फंक्शन डिलीट केले कि या गणिताला अर्थच राहत नाही.

तरीदेखील ते पॅरेडॉक्स मला आवडले, कारण वैज्ञानिक कवीकल्पनेत रमलेल्यांसाठी ते रंजक उत्तर होते.

गवि Fri, 08/11/2013 - 10:39

In reply to by पूर्ण विजार

शृंगापत्ती हा "डायलेमा" याला प्रतिशब्द आहे.

डायलेमा आणि पॅरेडॉक्स हे शब्द अनेकदा एकमेकांच्या जागी वापरलेले पाहिले आहेत. डायलेमा आणि पॅरेडॉक्स या दोन शब्दांमधे अर्थच्छटेचा काही फरक असू शकेल.. पण असंख्य ठिकाणी ते समानार्थी वापरलेले, विशेषतः तात्विक थॉट एक्स्पिरिमेंट्सच्या संदर्भात पाहिले. म्हणून तो शब्द वापरला.

या उदाहरणात तर डायलेमा हा शब्दही पर्फेक्ट बसतो आहे. पॅरेडॉक्स म्हणजे विरोधाभास आणि डायलेमा म्हणजे द्विधा असं आहे का?

पूर्ण विजार Fri, 08/11/2013 - 12:38

In reply to by गवि

बाप्रे ! गवि चांगली दिशा देत आहात माझ्यासारख्याला. मी प्रयत्न करतो. चूक कि बरोबर ते सांगा.
पॅरॅडॉक्स हा बहुधा माहितीच्या अभावी वाटणारा अंतर्गत विरोधाभास असावा जो चुकीचा सिद्ध होऊ शकतो. तर डायलेमा जनरली दुविधा (हाच शब्द सुचला. तुम्ही द्विधा हा शब्द वापरलाय) या अर्थी वापरलेला पाहण्यात आला. एखाद्या परिस्थितीमुळे बुचकळ्यात पडणे वगैरे.. या धाग्याचा विषय "डायलेमा" मधे मोडत असावा.
http://perspicuity.net/paradox/paradox.html

ऋषिकेश Thu, 07/11/2013 - 11:24

अधिक विचाराअंती बहुतांश केसेसमध्ये अजूनही उत्तर हो-हो असेच आहे.

ज्या केसेसमध्ये नाहीकडे मत झुकते ते म्हणजे ती जाडी व्यक्ती किंवा एकटा कामगार माझा परिचित असेल तर बहुदा द्वीधा मनस्थितीत काहीच कृती करणार नाही. किंवा काम करणारे पाच जण जर प्रसिद्ध गुन्हेगार असतील (व मला त्याची कल्पना असेल) तरी कदाचित मी द्वीधेमुळे ती कृती करणार नाही.

अपघात असो वा खून इच्छे विरुद्धच एखाद्याचा जीव जातो आहे. तो कमीतकमी लोकांचा जावा असे वाटते.
या केसमध्ये हो म्हटले तरी खून होत नाही कारण खून आहे हे सिद्ध करायला 'मोटिव्ह' सिद्ध व्हावा लागतो. माझा वैयक्तिक, स्वार्थी मोटिव्ह इथे नाही, उलट नाईलाज आहे.

ऋषिकेश Thu, 07/11/2013 - 11:36

In reply to by मन

यावरून असेच एक कोडे सुचले (नुस्ती कोडी घालायला काय जाते?)

तुमच्या प्रियजनावर वाघ चालुन येताना तुम्हाला दिसतो आहे तुमच्याकडे शेळी आहे. त्या प्रियजनाला त्याची (वाघाची) कल्पना नाही. तुम्ही वाघाचे लक्ष वेधण्यासाठी (त्याला न दिसेल अशा बेताने स्वतः लपता आणि) आवाज करता व शेळीला त्या दिशेला बांधून ठेवता. तुमच्या प्रियजनाचा प्राण वाचतो.

१. आता तुम्ही शेळीचा खून केलात का?
२. उत्तर हो असल्यास, असा खून करणे योग्य वाटते का?
३. प्रश्न#२ चे उत्तर हो असल्यास (किंवा प्रश्न# १ चे उत्तर नाही असल्यास), अपरिचित जाडा माणूस आणि शेळी मध्ये काय फरक आहे?

मन Thu, 07/11/2013 - 13:00

In reply to by ऋषिकेश

ही तर सर्रास सर्वमान्य पद्दहत आहे. काही हिंस्त्र झालेले वन्य जीव, वाघ वगैरे ह्यांना धरण्यासाठी असा बकरा/शेळी ह्यांना सापळ्याजवळ बांधून ठेवणे ही सर्वमान्य, प्रचलित पद्धत आहे.
अशा प्रसंगी शेळीऐवजी एखाद्या माणसाला बांधून ठेवल्याचे कधी ऐकले नाही.
काहीही झाले तरी माणसाला बांधून ठेवू नये असे वाटते.
"अन्न" म्हणून किंवा इतर कशाहीसाठी बकरीचा खून करण्यात वाईट काहीही नाही हे established नीतीमूल्य आहे.
निरपराध माणसाला हकनाक मारणे गुन्हा आहे. मानवेतर प्राण्यांस नाही.
एक अवांतर कथा आठवली (सत्यासत्यतेबद्दल खात्री नाही) :-
current कोणते वापरावे, AC की DC? ह्यावर एकोणीसाव्या शतकात आघाडीच्या शास्त्रज्ञांत जबरदस्त वाद सुरु होता.
एडिसन हा बहुसंख्य लोकांना विरोध करत DC च कसे सुरक्षित आहे, त्यावरच संशोधनात कसे अधिकाधिक पैसे ओतले पाहिजेत हे पटवून देत होता.
लोक काही ऐकेनात म्हटल्यावर त्यानं AC किती वाईट आहे हे दाखवायला आख्खा हत्ती AC करंटचे झटके देउन मारला!!
PETA नसावी बहुतेक त्याच्या काळात.
असो.
१. आता तुम्ही शेळीचा खून केलात का? :- खून माणसाचा होतो. प्राण्याची शिकार होते.
२. उत्तर हो असल्यास, असा खून करणे योग्य वाटते का? :- कृती योग्य वाटते.(खून म्हणा अथवा न म्हणा. योग्य वाटते,)
३. प्रश्न#२ चे उत्तर हो असल्यास (किंवा प्रश्न# १ चे उत्तर नाही असल्यास), अपरिचित जाडा माणूस आणि शेळी मध्ये काय फरक आहे?
:- जाडा माणूस हा माणूस आहे आणि शेळी हा माणूस नसून जनावर आहे हा फरक आहे.
मी घरच्यांना वाचवण्यासाठी जाड्या माणसाला बांधून टेह्वणार नाही.
माझे आप्त रुळावर उभ्या असलेल्या पाच जणांत आहेत, हे ठाउक असले तरी मी ढकलणार नाही.
भले नंतर मी आप्तांना घालवल्याबद्दल धाय मोकलून रडेन किंवा सकारात्मक प्रायश्चित्त** घेइन. पण जाड्याला ढकलणार नाही.
.
वर सांगितल्याप्रमाणे नरभक्षक* वाघाला पकडण्यासाठी शेळी वगैरे जनावर बांधून ठेवत. जाडा माणूस कुणी बांधून ठेवल्याचे ऐकिवात नाही.
.
गुरे म्हातारी झाल्यावर कत्तलखान्यात पाठवतात. माणसांना पाथवता येत नाही. हाच फरक आहे.
.
*नरभक्षक वाघ माणसाच्या मिषाने येइल, शेळीच्या लोभाने कशाल अयेइल असे तर्कट मांडल्यास साश्टांग दंडवत.
**इथून पुढे कुणासोबत असे होउ नये, ह्यासाठी जागरुकता वाढवणे वगैरे. थोडक्यात, मी इतरांच्या आप्तांवर अशी वेळ येउ नये ह्याचे प्रयत्न करेन.

ऋषिकेश Thu, 07/11/2013 - 13:35

In reply to by मन

ओके. स्वतःचे आप्त/जीवश्च वाचवण्यासाठी माणसाचा जीव घेणे व प्राण्यांचा जीव घेणे हे वेगळे आहे असे मत असल्यास काहीच म्हणणे नाही.
माझ्यासाठी माझे सुहृद वाचणे शक्य असल्यास एखादा अनोळखी माणूस आणि शेळी एकच आहेत. (कारण तो/ती सुहृद वाचल्याने/गेल्याने माझ्या आयुष्यात तुलनेने बराच मोठा फरक पडणार आहे)

मात्र वरील उदा. परिचिताऐवजी तुमच्या घरच्या - तुम्हाला आवडत्या अशा- गायी आहे असे समजा हवं तर. (आणि शेळी सहजच बाजुला आली आहे. कुठून/कोणाची कल्पना नाही) आणि मग ठरवा तुम्ही गायी वाचवाल का शेळी?

उपाशी बोका Fri, 08/11/2013 - 07:22

In reply to by ऋषिकेश

२ मित्र असतात. अगदी जिवाभावाचे मित्र. एकदा ते दोघे जंगलातून गप्पा मारत जात असतात. अचानक त्यांना समोरून येणारा वाघ दिसतो. त्याला बघितल्यावर दोघे घाबरतात, कारण वाघ तर समोरच असतो आणि विचार करायला पण फारसा वेळ नसतो. इतक्यात पहिला मित्र फटकन त्याच्या बॅगेतून त्याचे रनिंग शूज काढतो आणि पायात घालायला लागतो. ते बघून दुसरा त्याला म्हणतो "अरे, तू काय फार शहाणा समजतोस काय स्वतःला? तुला काय वाटतंय की हे शूज घातल्याने तुला वाघाच्याही पुढे पळून जाता येईल काय?"

दुसरा शांतपणे त्याला म्हणतो "अरे, मला कुठे वाघाच्या पुढे पळायचं आहे? मला तर फक्त तुझ्यापुढे पळायचं आहे."

गवि Thu, 07/11/2013 - 13:19

वर एक प्रतिसाद दिलाच आहे, तरीही काही अधिकचे मुद्दे:

अशा सिच्युएशन्स एक वैचारिक प्रयोग म्हणून समोर ठेवताना त्यात दोन किंवा फायनाईट नंबर ऑफ ऑप्शन्स देऊन टाकलेले असतात. त्यापैकी काय योग्य इतकाच मुद्दा सोडलेला असतो. दोन्ही बाजूंना प्रोज आणि कॉन्स असतात. त्यामुळे कोणतीही बाजू निवडावी तरी पेच, आणि एक सोल्युशन कधीच नाही असा चर्चेला भरपूर वाव देणारा माहोल होतो.

इथे दिलेल्या केसमधे:

१. ट्रॉली जाऊ दिली तर ते खात्रीने चेंगरुन मरतील
२. जाड्याला ढकललं तर खात्रीने ट्रॉली थांबेल.
३. तुमच्या वजनाने मात्र ट्रॉली खात्रीने थांबणार नाही.
४. वारा घोंघावतो आहे त्यामुळे आवाज जाणार नाही.
५. अन्य कोणत्याही मार्गाने ट्रॉली थांबवणं शक्य नाही.
६. इतर कोणतीही कृती करायला वाव अथवा वेळ शिल्लक नाही

अशी कॅल्क्युलेटेड ठाम परिस्थिती ठेवली आहे.

प्रत्यक्षात अशा सिच्युएशन्समधे अनेकदा निर्णय घेण्याची संधीच मिळत नाही किंवा परिस्थिती न्याहाळून अनालाईझ करायला थोडीतरी फुरसत मिळते.

-ट्रॉली आदळण्यापूर्वी शेवटच्या क्षणीही ती पाच माणसे सावध होऊन बाजूला उडी टाकून बचावण्याची अशी शक्यता कितपत आहे हे पाहता येतं. अशा वेळी इतर कोणाचा बळी देण्याची निकड कमी होते.

-जाड्याला ढकलण्याखेरीज त्याचा अन्य मार्गाने सहभाग मिळवता येईल का हे पाहता येतं.

-जाड्याला मधे ढकलून थांबण्याइतपत बेताची ट्रॉली असेल तर आपण आणि जाड्या मिळून एकत्र बळाने ती रोखता येण्याची शक्यता आजमावता येते.
- त्या ट्रॉलीच्या मधे मनुष्य ढकलण्याइतपत अवसर शिल्लक असेल आणि मी की जाड्या असा चॉईसही असेल तर खुद्द थेट मरण्याऐवजी स्वतः त्या ट्रॉलीत स्वार होऊन ती जवळ पोचल्यावर तरी आरडाओरडा त्या लोकांना ऐकू जाईल अशी शक्यता उरु शकते. (पुढे त्या ट्रॉलीचं भवितव्य काय हे माहीत नाही ;) )

- स्विच दाबून अन्य ट्रॅकवर वळवली तर त्या ट्रॅकवरच्या मनुष्यालाही सावध करता येणार नाही का हे पहावे लागेल.

प्रत्यक्ष परिस्थितीत निगोशिएशन / बळाचा वापर / आल्टर्नेट स्ट्रेटेजीजना वाव/ क्षणाक्षणाला बदलती परिस्थिती असे अनेक मार्ग आणि वेळ हाताशी मिळवता येतो हे अनेक अपहरणे / ओलीस प्रकरणे पाहून लक्षात येईल.

त्यामुळे निव्वळ तात्विक प्रयोगांचा प्रत्यक्ष उपयोग कमीच.

सहज Thu, 07/11/2013 - 14:01

इतकेच समजतय उद्या ऐसीचा कट्टा झाला व समोर काहीतरी बिकट प्रसंग आला तर तुमच्या बाजुला विसुनाना, कोल्हटकर, ऋषिकेश, (सदस्य क्रमांक १३० ) मी, ही लोक नाहीत याची दक्षता घ्या. त्यांना एकमेकांच्या शेजारी असु दे. तसेच ऑफेन्स इज बेस्ट डिफेन्स लक्षात ठेवा.

आपण आपले मन, मिहिर, गोगोल, अस्मी यांच्या मधोमध थांबावे.

विशेषसूचना : गवि यांनी तर चिपलपट्टी यांचे नावच टाकावे! :P
नोट टू सेल्फ: जिम जोमाने .. होऊ दे खर्च!

अनामिक Thu, 07/11/2013 - 15:36

वरचे कुठलेही प्रतिसाद न वाचता उत्तर देत आहे.
दोन्हींकरता - नाही - नाही.
मनात आलेले विचार - मी स्वतः स्वतःचा सोडून दुसर्‍या कुणाचा बळी देण्यास धजावणार नाही. आणि गरज पडल्यास स्वतःचाही बळी देईलच असे वाटत नाही.

बॅटमॅन Thu, 07/11/2013 - 16:08

तूर्तास तरी ऑन द फेस ऑफ इट- हो & हो. अन्य पॅरामीटर्स आल्यास निर्णय बदलतील, पण ज्या स्वरूपात प्रश्न समोर आलाय त्याचे तत्काल उत्तर माझ्या लेखी हो आहे. बाकी अधिक विचार करायचा तर अनेक फाटे फुटतील म्हणून तिथे विचारांची दिशा निश्चित असल्याशिवाय सांगता येत नाही.

आबा Fri, 08/11/2013 - 01:17

या प्रश्नावलीवरून एखाद्याच्या निर्णयप्रक्रियेवर भाष्य करायचे असेल तर उत्तरे देताना खालील नियम पाळावे लागतात

१) प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे द्यावीत
२) यातील काही प्रसंग अवास्तव वाटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, सर्व शंका-कुशंका दूर करून एखाद्या चित्रपटाप्रमाणे परिस्थिती समजाऊन घेण्याचा प्रयत्न करा.
३) काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अधिक माहितीची गरज भासण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही गृहितकांशिवाय, तो प्रसंग अंदाजे समजाऊन घेण्याचा प्रयत्न करा. हे अंदाज दिलेल्या माहितीवरच जस्तित जास्त अधारित असतिल याची काळजी घ्या, आणि स्वत:तर्फ़े कोणतीही जस्तिची माहिती वापरू नका (ऊदाहरणार्थ : " ... या प्रसंगामध्ये तुम्ही ठराविक कृती कराल काय?" असा प्रश्न असेल, तर ती कृती कायदेशिर आहे काय?* असा विचार करू नका.)

*हे मन यांच्या साठी आहे

अस्वल Fri, 08/11/2013 - 06:22

जास्त विचार न करता = हो.
पण थोडा विचार करून = नाही.
कारण : कुणाचाही सहेतुक जीव घेणे हा खूनच, मग त्यामागे कितीही उदात्त हेतू असला तरीही.
गाविंशी सहमत - प्रत्यक्ष परिस्थिती उद्भवली असता इतर काहीही पद्धतीने ५ जणांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल, आणि ते अशक्य असल्यास दुर्दैव म्हणून आपण तिथेच थांबू.

राजेश घासकडवी Fri, 08/11/2013 - 07:07

तत्काल - नाही, हो
विचारांती - कल्पना नाही, हो

प्रत्यक्ष कोणाला तरी मृत्यूच्या मुखात ढकलण्याची कृती करणं आणि पाच किंवा एक यांच्यामधला तात्विक निर्णय करणं यात फरक आहे म्हणून तत्काल विचारात नाही, हो आलं आहे. त्यात अशी मृत्युमुखी ढकलण्यामागे ती ट्रेन थांबेल याची खात्री कितपत आहे, त्या पाच कामगारांपैकी मी न सांगताच किती जण जीव वाचवण्याची शक्यता आहे याचा अंदाज तत्काल घेणं शक्य नसल्याने कोणालातरी ढकलण्याचा अपराध आपल्या डोक्यावर येऊ नये ही भावना महत्त्वाची ठरते.
विचारांती, दुसरा पर्याय अधिक सुसह्य वाटतो. पण पहिल्या बाबतीत अजून खात्री नाही. पण कदाचित हा कल्पनाप्रयोग अधिक खात्रीलायक केला तर दुसऱ्याच्या जवळ जातो हेही खरंच. म्हणून तो नाही वरून कदाचित हो, कदाचित नाही पर्यंत येतो.

विचारप्रयोगांमध्ये दुर्दैवाने हे अनिश्चिततेचे अडथळे असतात. एखाद्या व्यक्तीला ढकलून ट्रेन थांबेल असं म्हटलं, तरी इतर पर्याय नाहीतच यावर आपल्याला विश्वास बसायला कठीण पडतं. त्यामुळे असे विचारप्रयोग मला आवडत नाहीत.

मला माझ्या एका मित्राने विचारलं होतं 'समजा, कोणीतरी माझ्या डोक्यावर बंदुक ठेवली आणि तुझ्या डोक्यावर बंदुक ठेवली आणि दोघांपैकी कोण मरणार याचा निर्णय तुझ्यावर सोपवला तर तू काय निवडशील?' मी म्हटलं मी जगण्याचा पर्याय निवडेन. त्यावर तो दुःखी झाला. का कोण जाणे. असे प्रश्न विचारण्यात मुळात काय पॉइंट होता ते मला कळलं नाही.

बॅटमॅन Tue, 12/11/2013 - 16:36

In reply to by अजो१२३

अंहं. ती नैसर्गिक मानसिकता आहे. अन्य प्राणिमात्रांचा कैवारही आपणच घेणे म्हणजे बायटिङ्ग आफ मोर द्यान यू क्यान च्यू (ऑलदो मोरली) असा प्रकार आहे.

मन Tue, 12/11/2013 - 17:00

In reply to by अजो१२३

कॅनिबालिझ्म किंवा मानवमांसभक्षणच तेवढे का वाईट आहे? सरसकट जीवहत्या वाईट का नाही?
ह्या प्रश्नाच्या उत्तरात तुमच्या शंकेचे उत्तर सापडेल.

>>कॅनिबालिझ्म किंवा मानवमांसभक्षणच तेवढे का वाईट आहे? सरसकट जीवहत्या वाईट का नाही?
प्रश्न जबरदस्त(सिरिअसली)आहे पण ते जनुकीय-रक्षण वगैरे उत्तरे असल्यामुळे तो मार्ग पटकन बंद होतो.

आडकित्ता Thu, 14/11/2013 - 00:46

या धाग्याचा जीव लहान आहे????

असो.

मी डिस्कवरी च्यानेलाचा फोटोग्राफर असल्याने जे होते आहे ते फ़क्त पहाणार कारण माझ्या जिवाला धोका नाही.

जयदीप चिपलकट्टी Fri, 22/11/2013 - 10:49

या उदाहरणाची आठवण होण्याचं कारण असं की जोशुआ ग्रीन या हार्वर्डमधल्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या Moral Tribes या पुस्तकात या विचारप्रयोगाचा (Gedankenexperiment) बराच उहापोह केलेला आहे. थोडी पार्श्वभूमी देतो:

'ऐअ' च्या अनेक सदस्यांनी दोन्ही प्रश्नांची जी उत्तरं दिली ती बहुतेक एकतर हो-हो अशी किंवा नाही-नाही अशी होती. याउलट सार्वत्रिक अनुभव असा की कितीतरी लोक या दोन प्रश्नांना अनुक्रमे नाही-हो (किंवा खरंतर मुळीच नाही-नाखुषीने हो) अशी उत्तरं देतात. असा फरक लोक का करत असावेत याचा अनेक अंगांनी (आणि विशेषकरून evolutionary psychology च्या अंगाने) विचार झालेला आहे. अलिकडे जोशुआ ग्रीनने असे प्रयोग करून पाहिलेले आहेत की माणसांना fMRI या यंत्रात घालून असे प्रश्न विचारायचे, जेणेकरून त्यांची उत्तरं व त्यांच्या मेंदूमधल्या घडामोडी याचा काही परस्परसंबंध सापडतो का हे पाहता यावं.

इथे fMRI हा प्रकार कसा काम करतो ते थोडक्यात लिहितो. मेंदूमध्ये न्यूरॉन नावाच्या पेशी असतात, आणि मेंदूचं काम या पेशींकरवी अायन्सची देवाणघेवाण केल्याने चालतं. जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागातले न्यूरॉन जास्त कार्यरत असतात, तेव्हा तिथे जास्त अॉक्सिजनची गरज पडते आणि त्यामुळे त्या भागाला 'शुद्ध' रक्ताचा जास्त पुरवठा होतो. ज्याचा fMRI करायचा तो माणूस (किंवा निदान त्याचं डोकं) चुंबकीय क्षेत्रात ठेवतात. 'शुद्ध' आणि 'अशुद्ध' रक्त हे चुंबकीय क्षेत्राला वेगवेगळा प्रतिसाद देत असल्यामुळे हा पुरवठा मेंदूच्या कुठल्या भागात वाढतो आहे आणि कुठे नाही हे शोधून काढता येतं. (प्रत्यक्षात हे सगळं बऱ्यापैकी किचकट आहे, आणि अनिश्चिततेला इथेतिथे जागा राहतेच.)

ग्रीनचा ढोबळ निष्कर्ष असा की लठ्ठ माणसाला आपल्या हातांनी ढकलणं यामुळे उद्भवणारी जी भावनिक अस्वस्थता (emotional charge) आहे यामुळे तसं करायला लोक नकार देतात. याउलट दाबलेला स्विच आणि रूळ बदलून सायडिंगला गेलेल्या डब्याखाली मेलेला माणूस यांच्या मध्ये खूप गोष्टी (म्हणजे रेल्वेची जगड्व्याळ यंत्रणा) येत असल्यामुळे ही अस्वस्थता खूपच कमी होते (कारण आपण व्यक्तिश: त्याच्या मरणाला जबाबदार आहोत ही जाणीव कमी होते), अाणि परिणामी तुलनेने जास्त लोक तसा निर्णय घ्यायला तयार होतात. त्याचा कयास असा की ही अस्वस्थता हा आपल्या उत्क्रांतीचा ठेवा आहे, आणि प्लॅस्टोसीन कालखंडामध्ये (म्हणजे वीसेक लाख वर्षांपूर्वी) तत्कालीन मानवी समाजांना अकारण हिंसा टाळण्यासाठी याचा उपयोग झाला असावा. त्याचं स्वत:चं मत असं की उत्क्रांतीमधून आलेली आपल्या मेंदूमधली अशाप्रकारची काही भावनिक अंगं आजच्या काळात आपल्याला नडतात अशा अर्थाने, की अधिक बुद्धिगम्य निर्णय घ्यायला त्यांमुळे प्रतिबंध होतो.

पुस्तकात बाकी अनेक गोष्टी आहेत; आणि नैतिक प्रश्न सोडवण्यासाठी deep pragmatism किंवा utilitarianism या तत्त्वप्रणालीचा त्याने पुरस्कार केलेला आहे. पण तो बराच गुंतागुंतीचा विषय असल्यामुळे इथे त्यात न शिरणंच श्रेयस्कर…

नितिन थत्ते Fri, 22/11/2013 - 10:56

In reply to by मन

सहमत आहे.

सिगरेटच्या, दारूच्या कंपनीचे शेअर घेणार्‍यांना अशी बोच लागत नाही असे धनंजय यांनी कुठेतरी म्हटले होते.

Nile Fri, 22/11/2013 - 13:19

In reply to by जयदीप चिपलकट्टी

'ऐअ' च्या अनेक सदस्यांनी दोन्ही प्रश्नांची जी उत्तरं दिली ती बहुतेक एकतर हो-हो अशी किंवा नाही-नाही अशी होती. याउलट सार्वत्रिक अनुभव असा की कितीतरी लोक या दोन प्रश्नांना अनुक्रमे नाही-हो (किंवा खरंतर मुळीच नाही-नाखुषीने हो) अशी उत्तरं देतात.

ऐसीवरच्या सभासदांविषयीची ही टिप्पणी रोचक आहे. ;-)

अजो१२३ Mon, 25/11/2013 - 23:41

लेखाचे प्रश्न अतिच सोपे केले तर असे दिसतात -
तुम्हाला स्वतःला काही फरक पडणार नसेल (केवळ वैचारिक्/मानसिक फरक पडणार असेल) तर तुम्ही तुम्हाला जे इतराइतरांमधे तुम्हाला न्याय्य वाटते ते घडू देण्यासाठी कोणती (कायद्याची/ नैतिकतेची/ विवेकाची/ योग्यायोग्यतेची) कृती-आत्मक हद्द पार कराल?

आता लोक 'जगातल्या १००% लोकांना १००% माझ्यामते योग्य वाटतो तो न्याय मिळवून दिल्याशिवाय बसणार नाही' ते ' दुनिया को आग लगे, मला काहीच देणेघेणे नाही' इतक्या रेंजमधे असतात. इथे 'इतरांचा मृत्यू' हा न्यायाचा मानक ठरवून ऐसीकरांच्या भावना चाळवल्या आहेत.

मन Tue, 26/11/2013 - 09:10

In reply to by अजो१२३

थॉट एक्स्परिमेंट्स मध्ये हे सर्वत्रच दिसत असावे.
खुद्द ट्युरिम्ग मशिन ही संकल्पना मला एक प्रकारचा थॉट एक्स्परिमेंटच वाटतो.
तो नसता अर आजची डिजितल क्राम्ती इतकी बेफाम घडली असती का?

मन Mon, 06/01/2014 - 10:21

http://www.loksatta.com/pune-news/pmp-accident-break-fail-injured-laxmi…

बस चालकाचे प्रसंगावधान

लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात रविवारी सकाळी साडेदहा वाजता ब्रेक निकामी झालेल्या पीएमपी बसने पादचारी आणि एका रिक्षाला धडक दिली. त्यामुळे रस्त्यावर घबराट निर्माण झाली होती. मात्र, बस चालकाने प्रसंगावधान राखत बस सिग्नलच्या खांबावर धडकविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातामध्ये पाच पादचाऱ्यांसह सहा जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमृता प्रसाद पाध्ये (वय ३४), त्यांची मुलगी राधा (वय ७, रा. दोघीही- रेणुकानगरी, शंकरमहाराज मठासमोर, पुणे सातारा रस्ता), रिक्षा चालक आस महंमद कलवा कुरेशी (वय ४५, रा. कासेवाडी), रिक्षातील प्रवाशी अनिल भीमराव डोमाले (वय ४५, रा. पौड रस्ता, कोथरुड), पादचारी करण राठोड (वय २२), परशे गोडसे (वय ४१) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर ते वारजे माळवाडी या मार्गावरील पीएमपी बस लक्ष्मी रस्त्यावरून सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाली होती. शगुन चौकाच्या अलीकडे बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी शगुन चौकातील सिग्नल सुटला होता. रविवार असल्यामुळे लक्ष्मी रस्त्यावर गर्दी होती. एलआयसी इमारतीच्या कोपऱ्यावरून अमृता पाध्ये व त्यांची मुलगी, रिक्षावाला हे निघाले होते. ब्रेक निकामी झालेली बस पुढे घेऊन जाणे धोक्याचे असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान दाखवून शगुन चौकाच्या कोपऱ्यात असलेल्या सिग्नलच्या खांबाला बस धडकविली. त्यावेळी बसची पादचारी आणि रिक्षाला धडक बसली.
गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात अपघात झाल्याचे पाहून घबराट निर्माण झाली. बस सिग्नलच्या खांबाला धडकविल्यामुळे तो खाली पडला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत, उपनिरीक्षक ए. सी. मनोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना पोलीस व नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल केले. जखमींपैकी रिक्षाचालक कुरेशी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.