कोल्हापूरचे छत्रपति राजाराम ह्यांचे फ्लॉरेन्स, इटली येथील स्मारक.

कोल्हापूरचे छत्रपति राजाराम

अनेक वर्षांपूर्वी असे माझ्या वाचनात आले होते की कोल्हापूरचे छत्रपति राजाराम (राज्याचा काल १८६६-१८७०) हे इंग्लंडच्या दौर्‍यावरून हिंदुस्तानाकडे परतत असतांना वाटेमध्ये इटलीमधील फ्लॉरेन्स शहरात वयाच्या २०व्या वर्षी अचानक दिवंगत झाले.  अलीकडेच मी स्वत: फ्लॉरेन्सला जाण्याची शक्यता निर्माण झाल्यावर ही आठवण पुन: जागी झाली आणि असे का आणि कसे घडले ह्याचा शोध मी जालावर घेतला.  त्यातून असे निष्पन्न झाले की राजाराम ह्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे एक स्मारक त्यांच्या दहनस्थली उभारण्यात आले आणि अजूनहि ते तेथे उभे आहे.  हे कळताच फ्लॉरेन्सच्या मुक्कामात वेळ काढून त्या स्मारकाला भेट द्यायचे मी ठरविले.  त्या भेटीविषयी आणि त्या संदर्भात जे माझ्या वाचनात आले त्यातून हे लिखाण करीत आहे.

छत्रपति शहाजी (तिसरे) (बुवा साहेब) ह्यांचा १८३८ मध्ये मृत्यु झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवाजी (तिसरे) हे गादीवर आले.  १८६६ मध्ये आपल्या मृत्युसमयी त्यांना मुलगा नव्हता म्हणून त्यांनी आपला भाचा -  बहीण आऊबाई पाटणकर ह्यांचा मुलगा - नागोजीराव पाटणकर (जन्म एप्रिल १३, १८५०) ह्यांना ऑगस्ट १, १८६६ ह्यांना दत्तक घेतले.  दत्तक वडिलांच्या ऑगस्ट ४. १८६६ ह्या दिवशी मृत्यूनंतर ते छत्रपति राजाराम ह्या नावाने गादीवर बसले.

छत्रपति राजाराम अल्पवयीन असल्याने कोल्हापुरातील तकालीन ब्रिटिश रेसिडेंट कर्नल जी. एस. ए. ऍंडरसन ह्यांच्या सूचनेवरून कॅ. एडवर्ड वेस्ट ह्यांची असिस्टंट रेसिडेंट म्हणून नेमणूक होऊन छत्रपतींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली.  ह्याच कामासाठी मुंबईहून जमशेटजी नौरोजी उनवाला ह्या पदवीधर पारसी गृहस्थांनाहि नेमण्यात आले.

गादीवर येण्यापूर्वीच छत्रपतींचे इंग्रजी भाषेचे काही शिक्षण झालेले होते.  नवीन ज्ञान मिळवण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे दोन मार्गदर्शकांच्या साहाय्याने त्यांनी चांगली प्रगति केली.  वाचनाच्या आवडीबरोबरच बिलिअर्डज्, क्रिकेट, शिकार अशा खेळांमध्ये त्यांना रस होता.  आपली इंग्रजीमध्ये दैनंदिनी लिहिण्याची रीत त्यांनी सुरू केली होती.  त्यांच्या राज्यकालामध्ये १८६९ सालात कोल्हापुरात हायस्कूलची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा पुढाकार होता आणि १८७० मध्ये त्यांचा मृत्यु झाल्यानंतर त्या हायस्कूलला त्यांचे नाव देण्यात आले.  ह्या हायस्कूलचेच १८८० मध्ये प्रसिद्ध राजाराम कॉलेजमध्ये रूपान्तर झाले.  (ह्याचे पहिले प्रिन्सिपॉल चार्ल्स हॅरिसन कॅंडी, १८५१ - १९२५ कोल्हापूर, हे मेजर ई.टी.कॅंडी, मोल्सवर्थ ह्यांचे कोशनिर्मितीमधील सहकारी आणि पूना कॉलेजचे प्रमुख, ह्यांचे तिसरे चिरंजीव.)

१८७०मध्ये छत्रपतींनी इंग्लंडचा दौरा करण्याचे ठरविले.  त्याला गवर्नरकडून संमति मिळाल्यावर छत्रपति स्वत:, कॅ. वेस्ट, पारसी शिक्षक आणि अन्य ११ जण असे इंग्लंडकडे बोटीने रवाना झाले.  १४ जूनला ते लंडनला पोहोचले आणि १ नोवेंबरला इंग्लंड सोडेपर्यंत इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंडमधील अनेक गावे आणि प्रेक्षणीय स्थळांना तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ, क्यू गार्डन्स, वूलिच ऍकॅडमी, क्रिस्टल पॅलेस अशा शैक्षणिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या.  दोनतीन वेळा पार्लमेंटमध्ये कामकाज पाहिले.  स्वत: विक्टोरिया राणी, प्रिन्स ऑफ वेल्स, ग्लॅडस्टन, डिजरेली अशा महत्त्वाच्या व्यक्तींनी त्यांना भेटीसाठी वेळ दिला. त्याचबरोबर हिंदुस्तानशी संबंध असलेल्या बार्टल फ्रियरसारख्या अनेक व्यक्ति त्यांना भेटल्या. दादाभाई नौरोजी, मॅक्स मुल्लर, बुल्हर, डी लेसेप्स, महाराजा दुलीप सिंग ह्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाखती झाल्या.  अशा सर्व व्यक्तींची मैत्रीपूर्ण वागणूक आणि वागण्याबोलण्यातला साधेपणा, तसेच पौर्वात्य पद्धतीच्या डामडौलाचा अभाव ह्यामुळे छत्रपति बरेच प्रभावित झालेले दिसतात.  राजघराण्यातील स्त्रियांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी एका शिक्षिकेची नेमणूक करण्याची सोयहि आपल्या मुक्कामात त्यांनी केली असे कॅ.वेस्ट नोंदवतात. छत्रपतींनी स्वत: बॉलरूम डान्सिंगचे धडे घेतल्याचा उल्लेख मिळतो. स्टुडिओमध्ये जाऊन छायाचित्र काढून घेतल्याचाहि उल्लेख मिळतो.  हिंदुस्थानातील राजेरजवाडयांनी इंग्लंड-युरोपचे दौरे करण्याची प्रथा नंतर चांगलीच रूढ झाली पण गादीवर असतांना असा दौरा करणारे पहिले सत्ताधीश म्हणजे छत्रपति राजाराम असा उल्लेख कॅ.वेस्ट ह्यांनी केला आहे.  छत्रपतींची दैनंदिनी वाचून असे जाणवते पुष्कळ काही करण्याची क्षमता आणि इच्छा असलेला हा राजा दुर्दैवाने अल्पायुषी ठरला आणि त्यातून कोल्हापूरच्या जनतेचे मोठे नुकसान झाले.

असा हा शैक्षणिक आणि स्थलदर्शनाचा प्रवास संपवून १ नोवेंबरला सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले.  पुढचा मुक्कम ब्रुसेल्स-वॉटर्लू असा झाला.  वॉटर्लू पाहून आपल्याला अतिशय आनंद झाला असे छत्रपति नोंदवतात.  बेल्जियमच्या राजेसाहेबांशीहि भेट झाली.  तेथून कलोन-फ्रॅंकफुर्ट-म्यूनिक असे मुक्काम घेत घेत प्रवासी १३ नोवेंबरला इन्सब्रुकला पोहोचले आणि येथून छत्रपतींच्या तब्येतीस काहीतरी झाले आणि त्यांना उभे राहता वा चालता येईनासे झाले.

आजाराचे निश्चित निदान अखेरपर्यंत झाले नाही.  र्‍हुमॅटिझमचा हा त्रास आहे अशी समजूत होती आणि छत्रपतींनी बरोबर नेलेला मुस्लिम हकीम त्यांच्यवर काही उपाय करीत होता आणि त्याला काही यश येत आहे असे वाटत होते.  स्थानिक युरोपीय डॉक्टरांना दाखविण्यास छत्रपति तयार नव्हते.

अशाच परिस्थितीत प्रवासी वेनिसला पोहोचले आणि छत्रपतींनी सेडान खुर्चीतूनच तेथे डोजचा राजवाडा, सान मार्कोचा चौक अशा प्रेक्षणीय जागा पाहिल्या.  पुढचा मुक्काम फ्लॉरेन्स येथे झाला. इटलीच्या एकत्रीकरणाच्या प्रारम्भाच्या दिवसात १८६५-७१ ह्या काळात येथेच नवीन इटली देशाची राजधानी होती.

डॉ.फ्रेजर नावाच्या एका इंग्लिश डॉक्टरकडून आणि त्याच्या दोन इटालियन सहकार्‍य़ांकडून छत्रपतींची येथे तपासणी झाली आणि त्यांच्या औषधांचा सुपरिणाम दिसत आहे असे वाटत असतांनाच ३० नोवेंबर १८७० ह्या दिवशी सकाळी छत्रपतींचे अचानक निधन झाले.  ’Congestion of the abdominal viscera, togethe with collapse of nervous power' असे मृत्यूचे कारण नोंदविण्यात आले.

ह्या निधनामुळे मागे उरलेल्या सहप्रवाशांपुढे नवेच संकट उभे राहिले.  ते म्हणजे मृतदेहाचे हिंदु पद्धतीने दहन कसे करायचे.  कर्मठ ख्रिश्चन देशाच्या अधिकार्‍यांना हिंदूंची अग्नि देण्याची पद्धति रानटी वाटत होती आणि तसे करायला संमति द्यायला ते तयार नव्हते.  फ्लॉरेन्समधील इंग्रज वकिलाच्या दिवसभराच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन मंत्रिमंडळ पातळीवर निर्णय होऊन गावापासून ७-८ किलोमीटर दूर असलेल्या कश्शीना(Cascine, तबेला अथवा फार्महाउस, फ्लोरेन्समधील प्रख्यात मध्ययुगीन मेदिची घराण्याचे गुरांचे गोठे येथे होते) ह्या मैदानात, आर्नो नदीच्या काठी, जेथे तिला मुन्योने नावाची छोटी नदी येऊन मिळते, दहन करण्याची परवानगी मिळाली आणि १ डिसेंबरला पहाटे असे दहन झाले.  नंतर अस्थि गोळा करून कलशात घालून त्या हिंदुस्तानात आणल्या गेल्या आणि गंगा नदीत त्यांचे विधिवत् विसर्जन करण्यात आले.

ह्या अकाली निधनानंतर छत्रपतींचे फ्लॉरेन्समध्ये स्मारक उभारण्यासाठी एक कोष निर्माण करण्यात आला आणि त्यामध्ये जमलेल्या पैशातून दहनाच्या जागी स्मारक उभारण्यात आले.  त्याचा आराखडा मे. चार्ल्स मॅंट ह्या आर्किटेक्टने तयार केला.  (कोल्हापुरातील राजाराम कॉलेज, बडोद्यातील लक्ष्मीविलास राजवाडा, अजमेरचे मेयो कॉलेज ह्या त्यांच्या कृति.) इंडो-सारासीनिक शैलीच्या छत्रीखाली अर्धपुतळा असे हे स्मारक आहे.  अर्धपुतळा चार्ल्स फ्रान्सिस फुलर ह्या फ्लॉरेन्सवासी ब्रिटिश शिल्पकाराने बनविला आहे.  तो छत्रपतींच्या इंग्लंडात काढलेल्या छायाचित्रावरूनच बनविलेला दिसतो.

प्क्लॉरेन्सच्या भेटीसाठी माझ्यापाशी दोनच दिवस होते.  पैकी पहिला दिवस पहिल्या दिवशी गावातील उफ्फिजी गॅलरी, पलाझ्झो वेक्किओ आणि अकादमी (येथेच मिकेलऍंजेलोचा प्रख्यात ’डेविड’ उभा आहे) ह्यांना भेटी देऊन दुसर्‍या दिवशी पिसा गावाचा कार्यक्रम ठरला होता.  तरीहि वेळात वेळ काढून दुसर्‍या दिवशी सकाळी मी एक कॅब ठरवून स्मारकाकडे गेलो.  चालकाबरोबर इटालियनमध्ये बोलण्याची अडचण असल्याने हॉटेलच्या कॉन्सिअर्जमार्फत आधीच चालकाला कोठे जायचे आहे त्याची चांगली कल्पना दिली होती आणि काही कळीची वाक्ये गूगलच्या मदतीने भाषान्तरित करून इटालियनमध्ये लिहूनहि बरोबर ठेवली होती.  राजाराम छत्रपतींची इटालियनांना महिती नसली तरी सुदैवाने स्मारकाची जागा त्यांना चांगली ठाऊक आहे कारण स्मारकामागचाच आर्नो नदीवरील पूल Ponte dell'indiano (इंडियन ब्रिज) ह्या नावानेच ओळखला जातो.  (पुलाचेहि स्वत:चे असे वैशिष्टय आहे.  पुलाची अधिक माहिती येथे पहा.) )  गाडीचा चालकहि भला माणूस होता.  कसलीहि अडचण न येता त्याने आम्हाला १५-२० मिनिटात  स्मारकासमोर पोहोचविले अणि अर्धा तास तेथे काढून त्याच गाडीने आम्ही माझ्या हॉटेलकडे परतलो.

सुमारे ५-६ फूट उंचीचा चौथरा आणि त्यावर ब्रॉंझची छत्री, छत्रीखाली संगमरवरी अर्धपुतळा, चौथर्‍याच्या सभोवती बिडाचे कुंपण असे स्मारकाचे स्वरूप आहे.  स्मारक उत्तम स्थितीत आहे. अर्धपुतळ्याखाली चार बाजूंना इटालियन, इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये चार लेख आहेत.  पैकी इंग्रजी लेखच दूरच्या अंतरावरून मला वाचता आला आणि तो असा आहे:
Erected to the memory of His Highness Rajaram Chuttraputti Maharajah of Kolhapur who died at Florence on the 30th November 1870 in his 21st year while returning to India from England.

(येथील Chuttraputti ह्या स्पेलिंगचा परिणाम असा झाला आहे की जालावर जेथे जेथे ह्या अर्धपुतळ्याविषयी काही वाचावयास मिळते तेथे व्यक्तीचे नाव Rajaram Chuttraputti असेच दर्शविले आहे!)

मी तेथे काढलेली काही छायाचित्रे येथे दाखवीत आहे.  गूगल अर्थमध्ये ४३अं. ४७.२मि. ४१से. (उ), ११अं. ११.५२मि. ३३से. (पू) येथे पुरेसा क्लोजअप घेतल्यास स्मारक दिसते आणि काही अन्य छायाचित्रेहि दिसतात.

स्मारक
एका बाजूवरील इंग्रजीतील लेख
लेख जवळून
आर्नो-मुन्योने संगम.  मागे Ponte dell'indiano
छत्रपतींचे मार्गदर्शक कॅ.वेस्ट ह्यांनी छत्रपतींची दैनंदिनी काही अन्य माहितीसह संपादित करून लंडनमध्ये छापली.  गूगलकृपेने ती येथे उपलब्ध आहे.  तिच्यावर हा लेख पुष्कळसा आधारित आहे. 
धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख रोचक. मागे कुठेतरी याबद्दल वाचले होते, पण विस्मरणात गेले होते.

बाकी वरती जो फोटो आहे ते चित्र आहे का छायाचित्र? वयाच्या मानाने थोराड दिसतात नै राजाराम? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

रोचक लेख.

वयाच्या मानाने थोराड दिसतात नै राजाराम?

सुबत्ता आणि कष्ट करायला न लागणं यामुळे होऊ शकतं. चेहेऱ्यावर तसा विशीच्या पोराचा बालिश-निरागसपणा जाणवतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्तं लेख. आवडला. हे जर २१व्या वर्षी गेले तर यांच्यानंतर कोल्हापूर गादीवर कोण बसलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फारच रोचक. फिरेन्सेत जाणे झाले होते गतवर्षी, पण अशी एका भारतीय व्यक्तीची तिथे समाधी आहे याची अजिबात कल्पना नव्हती. नाहीतर गेलो असतो बघायला. तो डेव्हिडचा पुतळा पाहात बसण्यापेक्षा हा पाहिला असता. (डेव्हिडचा पुतळा अजिबात दर्जेदार नाही असं माझं मत आहे आणि शिवाय तो ओरिजिनल नसून रिप्लिका आहे हेही तिथेच कळलं. त्यावर घाणेरडे दिसणारे ओघळ आणि रंग उडाल्याच्या विद्रूप खुणा होत्या.)

छत्रपती किंवा महाराज म्हणून नव्हे, पण इतक्या जुन्या काळात बिनविमानाने ही व्यक्ती भारतातून जाऊन इतका युरोप फिरली आणि तिथे अचानक अकाली मरण पावली ही गोष्ट नक्कीच नोंद घेण्यासारखी आहे.

त्यांना झालेला आजार हा गीयां बारे सिंड्रोम असावा असं वाटतं. पोटातल्या किंवा फुप्फुसाच्या इन्फेक्षननंतर काही काळात शरीराची स्वतःच्याच मायलिन पेशींवर हल्लाबोल रिअ‍ॅक्शन होऊन नर्व्ह कंडक्शन बंद पडत जाऊन उठता / चालता / हलता न येणे आणि शेवटी काहीवेळा श्वासाचे स्नायूही निष्क्रीय होणे असा प्रोग्रेस होणारा हा आजार आहे. आता आयसीयूमधे कृत्रिम श्वास देऊन अश्या व्यक्तीला रिकव्हर होईपर्यंत जिवंत ठेवता येतं आणि प्राण वाचतात, पण त्यावेळी हे अर्थात शक्य नसणार.

या फिरेन्सेत आणि पुण्यात नदीवरच्या एकापुढे एक दिसत जाणार्‍या पुलांबाबत साम्य आहे असं वाटलं.. नदीची क्वालिटी वगळता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे शरीकरण, औद्योगीकरण्/उद्योगीकरण वगैरे मुळे भारताचीच वाट का लागते आहे?
युरोप अमेरिकेत सारे स्वच्छ स्वच्छ , छान छान कसे ?
त्यांचे औद्योगीकरण व शहरीकरण तर आपल्या शतपट झालेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

युरोप अमेरिकेत सारे स्वच्छ स्वच्छ , छान छान कसे ?

णाSSही..

युरोप असा घाऊक शब्द इथे वापरता येणार नाही. मी याविषयी लिहायचे ठरवत होतो, पण राहून गेलं.

युरोपातही असंख्य ठिकाणी पुरेशी अस्वच्छता, कचरा, रस्त्यात वाहणारे ओघळ आदि पाहण्यात आले आणि मन प्रसन्न झाले..!!

लोकसंख्या कमी असल्याने आणि असलेल्या स्वच्छतायंत्रणेला किमान निपटारा करता येईल इतकीच घाण लोक करु शकत असल्याने मुख्यतः तुलनेत हे सर्व चांगलं दिसत असावं. बाकी सर्व स्थिती आहे तशी ठेवून लोकसंख्या वाढवली तर तुरंत भारत होईल तिथेही असं व्यक्तिगत मत आहे. अर्थात तिथले रहिवासी खरं काय ते सांगतील. मी आपलं निरीक्षण नोंदवलं.

पूर्ण युरोप एकत्र मोजता येणार नाही हे मुख्य. स्वित्झर्लंडमधे बहुतांश ठिकाणी व्यवस्थित स्वच्छता मेन्टेन झालेली होती (पुन्हा अल्प लोकसंख्या).

फ्रान्सात खेडेगावे स्वच्छ वाटत असली तरी प्रमुखनगरी प्यारीसात रस्तोरस्ती फुटलेले पाईप, वाहणारे ओहोळ, कागदबोळे अन टिनांचा कचरा असे दिसत होते, अगदी मुख्य रस्त्यांतही.

इटलीमधे तर काही ठिकाणी भारत बरा असे म्हणण्याची वेळ. बजबजपुरी हा शब्द शोभेल. पब्लिक टॉयलेटला पैसे मोजून घेतात पण आतली अवस्था आपल्या एस्टीस्टँडांहून कणभरही वेगळी नाही. अगदी विंची एअरपोर्टापासून तिथल्या सुलभ संकुलांपर्यंत कमोडला सीटच नसणे, फ्लश केलेला नसणे, अनेक दिवस त्यात काही फिनेलबिनेल टाकलेले नसल्यासारखी अवस्था हे अगदी कॉमन होतं.

या उपरोक्त डेव्हिडच्या पुतळ्याच्या नयनरम्य परिसरात मूत्रविसर्जनाची निकड निर्माण झाल्यास जवळ टॉयलेट नव्हते. नुसतीच आशा दाखवणार्‍या स्त्रीपुरुष चित्राच्या दिशादर्शक पाट्या दिसायच्या. मी आणि सुपुत्र मैलभर तंगडतोड करुनही ते गृह न गावल्याने परत आलो तेव्हा तेथील लोकांनी मला असेच झुडुपाआड जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तर मी क्षणभरात मनाने मायदेशीच पोचलो.

यक्क.. जाऊदे.. पुढीलवेळी स्वित्झर्लंडपर्यंत पर्यटन मर्यादित ठेवले म्हणजे झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युरोपातही असंख्य ठिकाणी पुरेशी अस्वच्छता, कचरा, रस्त्यात वाहणारे ओघळ आदि पाहण्यात आले आणि मन प्रसन्न झाले..!!

हुर्रे!

प्रमुखनगरी प्यारीसात रस्तोरस्ती फुटलेले पाईप, वाहणारे ओहोळ, कागदबोळे अन टिनांचा कचरा असे दिसत होते, अगदी मुख्य रस्त्यांतही.
यस्स्स

इटलीमधे तर काही ठिकाणी भारत बरा असे म्हणण्याची वेळ. बजबजपुरी हा शब्द शोभेल. पब्लिक टॉयलेटला पैसे मोजून घेतात पण आतली अवस्था आपल्या एस्टीस्टँडांहून कणभरही वेगळी नाही. अगदी विंची एअरपोर्टापासून तिथल्या सुलभ संकुलांपर्यंत कमोडला सीटच नसणे, फ्लश केलेला नसणे, अनेक दिवस त्यात काही फिनेलबिनेल टाकलेले नसल्यासारखी अवस्था हे अगदी कॉमन होतं.
.
.
तेथील लोकांनी मला असेच झुडुपाआड जाण्याचा सल्ला दिला.
यस्स. मायदेश.
थोर्थोर तो माझा देश.

बेशिस्त तितुका मेळवावा गलिच्छता धर्म वाढवावा!

बादवे, पण मग स्लमडॉग मिलिनेअर वगैरे बनवायला ह्यांच्याही देशात फुल्ल स्कोप होता की.
आमचीच दारिद्य्रं आणि अस्वच्छता दिसते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख बहुत रोचक अन माहितीपूर्ण, नेहमीप्रमाणेच.

मनोबाची शंकाही रास्त अन गविंचा रिप्लाय तर एकदम आय ओपनर वैग्रे वैग्रे. मजा आली वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@अनुप ढेरे: राजारामांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या थोरल्या राणीसाहेबांनी सावर्डेकर भोसले घराण्यातील नारायणराव नावाच्या अल्पवयीन मुलास दत्तक घेऊन त्याचे नाव शिवाजी चौथे असे ठेवले. ह्याचे सर्व तपशील कॅ.वेस्ट ह्यांच्या पुस्तकात परिशिष्ट ७ मध्ये आहेत. ते पहा.

@गवि: तुम्ही पाहिलेला डेविड पलाझ्झो वेक्कियोच्या बाहेर उघड्यावर आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती एक अलीकडीलच, तेथे १९१० सालात ठेवलेली कॉपी आहे. मूळ मिकेलअँजेलोचा डेविड तेथून जवळच चालत १० मिनिटांच्या अंतरावर अकादमी गॅलरीत आहे आणि मी तो पाहून आलो. अधिक माहिती येथे पहा.

इटलीमध्ये जिकडेतिकडे बर्‍यापैकी अस्वच्छता आणि गदळ दिसते - अर्थात भारताहून खूपच कमी. रोमच्या मेट्रोच्या प्रत्येक डब्याच्या काचांवर ग्राफिटी खरडलेल्या असतात. त्यातील पीकटाईम गर्दीहि मुंबईशी तुलनीय असते. ह्याचे एक कारण असे असावे की सर्व शहरे जुनी असून त्यांच्या मुख्य जुन्या भागांमध्ये पुण्याच्या कसबापेठेसारखेच अरुंद आणि वेडेवाकडे रस्ते आहेत. ह्याचा फायदाहि होतो. सर्वसामान्य प्रवाशाला बघायची असतात अशी सर्व आ़कर्षणे सहज चालण्याच्या अंतरावर असतात. उदा. रोममध्ये कोलोसिअम-फोरम-ट्रेजनचे मार्केट आणि कॉलम-विक्टर इमान्युएल मेमोरिअल-मुसोलिनी खिडकी-पँथेऑन-त्रेवि कारंजे-पिआझ्झा नवोन्ना-स्पॅनिश स्टेप्स आणि वाटेतील डझनावारी कारंजी, शिल्पकृति, जुने वाडे हे सर्व एक-दीड किमीच्या परिघात आहे. थोडे अधिक चालले तर टायबरच्या पलीकडील बाजूस असलेले वॅटिकनहि सहज चालत जाण्याजोगे वा मेट्रो स्टेशनाजवळ आहे.

(इटलीचा दौरा कोणास करायचा असेल तर माझा असा सल्ला आहे की प्रवासी कंपन्यांच्या मागे न लागता सर्व बुकिंग्ज जालावरून स्वतः करावीत आणि जालावरून पूर्वाभ्यास करून आणि एक चांगले गाईड बरोबर ठेवून फिरावे. जरूर पडेल तेथे सार्वजनिक वाहनांचा उपयोग करावा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0