Skip to main content

अलीकडे काय पाहिलंत - १२

(जुन्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. जुन्या भागांचे दुवे इथेच देण्याची आवश्यकता नाही. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)

---

'द स्क्वेअर' नामक इजिप्शियन माहितीपट पाहिला. जानेवारी २०११ मध्ये इजिप्तच्या तहरीर चौकात क्रांती सुरू झाली. दोन महिन्यांना अध्यक्ष होस्नी मुबारक पायउतार झाले. त्याला आता तीन वर्ष उलटून गेली. या तीन वर्षांत पुढे काय झालं याचा धांडोळा तीन मित्रांच्या नजरेतून घेणारा हा माहितीपट.

मगदी हा मुस्लिम ब्रदर किंवा ब्रदरहूडचा कार्यकर्ता, दाढी वाढवलेली, घरातल्या स्त्रिया बुरखा घालणार निदान डोकं झाकणाऱ्या. अहमद हा गरीब, अनाथ, म्हणून वाढलेला, स्वतःच्या हिमतीवर शिकलेला आणि आता आधीच्या तुलनेत सुस्थित असणारा तरुण आणि खालिद अब्दल्ला हा 'द काईट रनर' चित्रपटातला मुख्य अभिनेता, उच्च मध्यमवर्गीय, घरात विचारवंताची पार्श्वभूमी, आई आणि वडलांशी या विषयासंदर्भात भरपूर वैचारिक देवाणघेवाण होते असा. माहितीपटातला 'थिंक टँक' म्हणजे खालिद. त्यांच्या सोबत त्यांची एक मैत्रीण, आईदा. ही सुद्धा सुशिक्षित, विचार करणारी तरुणी. आणि यांचे इतर काही मित्र, कोणी संगीतकार, कोणी साधी माणसं, त्यांच्यातलेच कोणी ख्रिश्चन. अहमद, खालिद, नावापुरतेच मुस्लिम, खरंतर निधर्मी किंवा सेक्युलर.

गेली तीस वर्ष होस्नी मुबारक यांच्या मनमानी राजवटीत मगदीवर बरेच अन्याय झाले आहेत. मुस्लिम म्हणून राहण्याची बरीच शिक्षा त्याने गुप्त पोलिसांकरवी भोगलेली आहे. अहमदला स्थिर अशी नोकरी, काम काहीही नाही. आणि खालिद देशातली ही अशी स्थिती पाहून अस्वस्थ आहे. (खालिदच्या इंग्लिशवरून तो ब्रिटनमध्ये वाढलेला आहे हे लक्षात येतं. त्यामुळे लोकशाहीतलं सुराज्य आणि मनमानी राजवटीतले अत्याचार यातला फरक त्याला वेगळा सांगावा लागत नाही.)

या लोकांच्या मते क्रांती सुरू झाली ती यांच्यासारख्या सामान्य लोकांनी सुरू केली. या लोकांना धर्मनिरपेक्ष, मुस्लिम-ख्रिश्चनांना समान वागणूक देणारं सरकार आणि मुळात ते सुरू करण्यासाठी भक्कम पायाची घटना हवी होती. तहरीर चौकात आंदोलन सुरू केलं तेव्हा मगदीसारखे थोडकेच मुस्लिम ब्रदर त्या आंदोलनात होते आणि ते सगळे धर्मनिरपेक्षतेसाठी तिथे ठिय्या देऊन बसले होते. "माझा धर्म माझ्या हृदयात" असं म्हणत. दोन महिन्यांत होस्नी मुबारक पायउतार झाले आणि सैन्याने ताबा घेतला. सहा महिन्यांत घटना, निवडणूका, सरकार येईल असं वचन सैन्याने पाळलं नाही. पुन्हा आंदोलन. आणि या वेळेस सैन्याने आंदोलकांबद्दल दयामाया दाखवली नाही. सैन्याकडून, काही लोक तिथेच, तहरीर चौकात मारले गेले. आणि आपल्याकडे होते तशीच सारवासारव करण्याचा प्रयत्न. त्यातल्या एकाच्या, बुरख्यातल्या आईचा शोकही मेलोड्रमाटिक (मुस्लिम स्त्रिया छाती बडवून घेताना दाखवतात) असा काही नाही, ती फक्त रडत म्हणत होती, "तू देशासाठी हुतात्मा होण्याचं दुःख नाही रे मला. पण तुझ्यापासून लांब राहणं ही शिक्षा वाटते."

पुन्हा आंदोलन चालू राहिलं. तेव्हा मुस्लिम ब्रदरहुडने आंदोलन पळवलं आणि इस्लामिक आंदोलन बनवलं. पुढे त्यांनीच सैन्याशी हातमिळवणी केली. काही प्रमाणात हिंसा आणि मग निवडणूका जाहीर झाल्या. अध्यक्षपदाचे दोन उमेेदवार - एक होस्नी मुबारक राजवटीतला पंतप्रधान, दुसरा मुस्लिम ब्रदरहूडचा नेता. खालिद अब्दल्लापुढे पेच पडला, कोणाला मत द्यावं? द्यावं का न द्यावं? दोघंही समान प्रमाणात तिरस्करणीय. एक अंदाधुंद राजवटीतलाच, आणि दुसरा कट्टर धार्मिक. प्रगतीशील, धर्मनिरपेक्ष कोणीच नाही. पण निवडणूका पार पडून मुस्लिम ब्रदरहूडचा डॉ. मोहम्मद मोरसी निवडून आला.

वर्षभरात त्याने स्वतःकडे होस्नी मुबारकांपेक्षाही जास्त सत्ता जमा केली. त्यासाठी मुस्लिम ब्रदरहुडला आवडतील असे अनेक निर्णय घेतले. इजिप्तमधल्या ख्रिश्चनांची गळचेपी सुरू झाली. मोरसींच्या राज्यकारभाराला एक वर्ष झालं तेव्हा तहरीर चौकात पुन्हा लोक निषेधासाठी जमा झाले. हे जगातलं सगळ्यात मोठं निदर्शन असेल असा अंदाज आहे. मोरसी समर्थक विरुद्ध मोरसी विरोधक असा नवा संघर्ष सुरू झाला. ते विरुद्ध आपण असं न राहता, आपण विरुद्ध आपण असा. सरकार, राजवट, सैन्य यापासून लांब राहून सामान्य लोकच एकमेकांचे वैरी झालेले आहेत. (इथे मोदी विरोधक आणि मोदी समर्थक अशी 'जगाची' विभागणी करणाऱ्यांची आठवण होणं साहजिक आहे.)

आजही इजिप्त स्थिर नाही. खालिदने शेवटी उत्तम विचार दिलेला आहे, दोन वर्षांत इजिप्त झटपट सुधारेल अशी माझी अपेक्षा नाही. आज जे काम केलंय ते पुरेसं आणि योग्य रस्त्याने जाणारं आहे का, हे अजून तीस वर्षांनी समजेल. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. म्हणून आत्ता योग्य राज्यघटना आणणं महत्त्वाचं आहे. अहमद अजूनही सुस्थित नाही. मगदी आता वयस्कर झाला आहे. स्वतः मुस्लिम ब्रदर असूनही, मोरसींच्या राज्यकारभारावर तो खूष नाही. पण मोरसींना अजून काही काळ मिळावा असं त्याचं मत. हा माहितीपटाच्या संस्थळाचा दुवा.

खालिद, आईदा यांच्यासारख्या उदारमतवादी लोकांचं पुढे काय होणार असा प्रश्न पडतो. हे लोक कोणत्याही राजवट - regime ला विरोध करणारे आहेत, मुस्लिम घरात जन्माला आले तरीही मुस्लिम नाहीत, त्यांची ओळख तेवढीच मर्यादित नाही, मुस्लिम ब्रदरहूड कधी जोशात असते, कधी नसते, या लोकांना राग आला तर हातात दगड घेऊन भिरकवावा अशी इच्छा होत नाही, तहरीर चौकात पहिला तंबू टाकला आईदाने, तिला आणि खालिदला कसली भीती असेल तर ती फक्त धर्मांध, सत्तांध लोकांच्या हातात पुन्हा सत्ता येण्याची! कॅमेरा (किंवा लेखन, कुंचला) हेच अस्त्र समजणाऱ्यांची अडचण सगळीकडे सारखीच. एकीकडे बुलेट्स आणि दुसरीकडे दगड.

माहितीपटाच्या संस्थळावर त्यांच्या ग्राफिटीचं चित्र पीडीएफ रूपात आहे. ते जरूर पहा.

अमेरिकन, कनेडीयन, आणि काही युरोपीय देशांमध्ये हा माहितीपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. (नेटफ्लिक्सची मदत या माहितीपटाला झालेली आहे ही आणखी एक समाधानाची बाब.)

---

परवा हा चित्रपट पाहिला आणि आत्ताच बातमी वाचली. Egypt court sentences hundreds of Muslim Brotherhood supporters to death

ऋता Tue, 29/04/2014 - 13:36

कटियाबाज* हा माहितीपट/चित्रपट पाहिला.माहितीपट कानपूर शहरातील वीजेची समस्या (चोरी, अनियमितता वगैरे) याविषयी आहे. सामान्य लोक, विजेवर अवलंबून व्यवसाय असलेले लोक, तसेच कटिया टाकून उपजीविका करणारा एक गरीब माणूस, राजकीय नेते आणि आयएएस अधिकारी या सर्वांची बाजू माहितीपटात मांडलेली आहे. रितू महेश्वरी या आयएएस अधिकारी जेव्हा वीज बोर्डाच्या मुख्य म्हणून रूजू होत्या त्या काळातील घटनाक्रम माहितीपटात आहे. त्यांनी वीज चोरी, थकलेली बिले याबद्द्ल कठोर भूमिका घेत काही चांगले बदल करण्याचा प्रयत्न केला. शेवटी ~११ महिन्यांमध्ये त्यांची बदली होते तिथे माहितीपट संपतो.

* कटिया म्हणजे 'आकडा', जो टाकून वीज चोरी केली जाते.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 01/05/2014 - 00:40

हा दुवा 'बातमी'मध्येही देता आला असता. पण या व्हीडीओचं विनोदमूल्य बरंच जास्त वाटलं म्हणून इथे लिहीलं आहे. जगाबद्दल माहिती नसणारे अमेरिकन, तिथली माध्यमं आणि भारतातला निवडणूक 'दंगा', अमेरिकन माध्यमांची केलेली नक्कल, आणि या सगळ्यात एकेकाळी ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नसे त्यांनी या सगळ्याचं केलेलं वर्णन, असा मजेशीर प्रकार आहे -
Watch John Oliver Call Out All Of Western Media For Ignoring The Largest Elections Ever

अनुप ढेरे Thu, 01/05/2014 - 21:50

In reply to by सानिया

मस्तं आहे व्हीडो

उसंत सखू Thu, 01/05/2014 - 18:40

तुम्ही ही फिल्म बघण्याची शक्यता नसेल तर ही अदभूत कथा जरूर वाचावी .
पिकून अगदी जर्दाळू झालेला गोड म्हातारा, गोबीच्या वाळवंटात आपल्या दोन मदारीच्या उंटीणीला घेऊन जाता जाता आपल्याला एका वीपिंग कॅमलची गोष्ट सांगू लागतो . ..............
मंगोलीयातले एक मेंढपाळ कुटुंब आणि त्यांचे मेंढ्या ,उंटासोबतचे , दुधात साखर विरघळावी तसे प्रेमळ सहजीवन . एका उंटीणीचे बाळंतपण अगदी कठीण होत .जर्दाळू म्हातारा ते अडकलेले पिलू अलगद सोडवतो आणि त्याच्या कानात हवा फुंकून फुंकून त्याला वाचवतो , उभा करतो . ते गोंडस पिलू दुर्मिळ म्हणजे पांढरं असत .पहिल्याच बाळंतपणात झालेल्या त्रासाने उंटीण पिलाला दुध पाजायला नकार देते . तिचे पाय बांधून ते कुटुंब पिलाला जगवायचा प्रयत्न सुरु ठेवत . पिलाचे पोट भरत नाही . ते करूण सूर काढत रहात . मग ते लामांना बोलावून एक विधी करतात तरीही आई अन पिलाचे जमत नाही .मग ते दूर शहरातून एका व्हायलीन वादकाला बोलावून घेतात .कुटुंबातली सून,त्या उंटीणीला थोपटत , कुरवाळत व्हायलीनच्या सुरावटी सोबत अतिशय मृदुल , लडिवाळ अंगाईगीत गाऊ लागते . हळूहळू उंटीणीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात .हळूच पिलाला तिच्या जवळ आणून सोडतात . ती प्रेमाने पिलू स्वीकारते आणि ते पोटभर दुध पिऊ लागत .
अमेझिंग !!! हे सगळे प्रत्यक्ष आपल्या समोर घडत असत आणि आपण आश्चर्यचकित होण्याच्या पलीकडे जातो .
हा जर्मन डॉक्यूड्रामा आहे . याला २००४ मध्ये बेस्ट डॉक्यूमेंट्रीच ऑस्कर आणि काही आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळाली आहेत .

बॅटमॅन Fri, 02/05/2014 - 14:10

वुल्फगांग अमादेउस मोझार्ट या जगप्रसिद्ध संगीतकाराच्या आयुष्यावर आधारित असलेला मिलोस फोरमन या दिग्दर्शकाने १९८४ साली बनवलेला 'अमादेउस' हा पिच्चर पुन्हा एकदा पाहिला आणि पुनरेकवार पिच्चरच्या प्रेमात पडलो. ८ ऑस्कर मिळालेत ते उगीच नाही!!!! तत्कालीन संगीतपंढरी व्हिएन्ना, तिथले संगीतकारांचे वर्तुळ, त्यांची आपापसातली स्पर्धा, ऑस्ट्रियाचा संगीतप्रेमी राजा जोसेफ, हे सर्व अतिशय मस्त रंगवले आहे. पण सर्वांत भाव खाऊन जातात ते म्हंजे स्वतः मोझार्ट आणि त्याचा पिच्चरमध्ये दाखवलेला प्रतिस्पर्धी आंतोनिओ सॅलिएरी हे दोघे. पिच्चरमध्ये ऐतिहासिक तथ्यापासून बरीच फारकत घेतलेली आहे हे नंतर गूगलल्यावर कळाले. पण ते एक असोच. पिच्चरच्या रम्यपणाला त्यामुळे काही बाधा येत नाही.

आणि मोझार्टच्या असामान्य सांगीतिक बुद्धिमत्तेला अधोरेखित करणारे इतके प्रसंग पिच्चरमध्ये आहेत की निव्वळ हरखायला होतं. टॉम हुल्स/हल्स याने पोरकट, हट्टी, दारुडा, व्हल्गर आणि असामान्य बुद्धिमत्तेचा मोझार्ट अगदी हुबेहूब रंगवलाय. पिच्चरमधला मोझार्ट पाहणे हा एक नितांतसुंदर अनुभव आहे. सॅलिएरीचं काम करणारा एफ. मरे अब्राहम हा अ‍ॅक्टरही लै बाप माणूस आहे.

या पिच्चरच्या निमित्ताने मोझार्टच्या बर्‍याच रचना ऐकायला मिळाल्या. पैकी २-३ उल्लेखनीय खालीलप्रमाणे.

मोझार्टची २५वी सिंफनी
दि अ‍ॅब्डक्शन फ्रॉम द सेरालिओ
क्वीन ऑफ द नाईट अरिया
रेक्विएम ऑफ अ ड्रीम

मोझार्टची सासू त्याला रागावत असते तेव्हा तिच्या बडबडीतून त्याला तो क्वीन ऑफ द नाईट अरिया सुचतो तो प्रसंग, झालंच तर मोझार्टच्या स्वागतासाठी सॅलिएरीने रचलेल्या रचनेचा पार खुर्दा करून ती ऑन द स्पॉट मॉडिफाय करतानाचा सीन, बायको झोपल्यावर हळूच चोरपावलाने इतर म्युझिशियन्स बरोबर दारू पीत पीत पियानोवरची अप्रतिम कलाकारी, अगदी सुरुवातीला आर्चबिशप ऑफ साल्झबर्गच्या कार्यक्रमात वेळेवर उपस्थित न राहून, त्याच्या भावी बायकोसोबत अश्लील चाळे करूनही आयत्या वेळेस पूर्ण म्युझिक आहे तस्से देणे, इ. सीन पुन्हापुन्हा बघण्यासारखे आहेत.

पण सर्वांत कडी करणारा सीन म्ह. सॅलिएरी त्याच्याकडून रेक्विएम लिहून घेतो तो सीन. मोझार्ट डिक्टेट करतो आणि सॅलिएरी लिहून घेतो. त्यांच्या मनात ते नोटेशनबरोबर संगीत कल्पू पाहत असतात तो सीन इतका जबरी घेतलाय की तोड नाही. तो सीन इतक्यावेळा पाहिला तरी कधीच बोअर होत नाही. त्यांच्या प्रभुत्वापुढे केवळ नतमस्तक व्हायला होतं.

तेव्हा हा पिच्चर पाहिला असेल तर ठीकच, नसेल तर त्वरित्तात्काळ्ताबडतोब अवश्य पाहणेचे करावे. तीनेक तासांचा आहे, मध्ये रटाळ वाटण्याइतपत लांब वाटूही शकतो-नव्हे, तसा जरा आहेच-पण मधले मधले सीन इतके जबराट आहेत की पैशे फिटतात पूर्णपणे.

अतिशहाणा Mon, 05/05/2014 - 18:55

अमेझिङ्ग स्पायडरमॅन - 2 हा सुपरहीरोपट पाहिला. थोडा लांबलचक आहे. विशेषतः चित्रपटाच्या उपसंहारातील दृश्य वगळले असते तरी चालले असते. टोबी मॅग्वायरच्या स्पायडरमॅनपेक्षा अॅण्ड्र्यू गारफिल्डचा स्पायडरमॅन मला जास्त आवडतो. (ग्वेन स्टेसीच्या भूमिकेत कर्स्टन डन्स्ट जास्त छान होती. एमा स्टोनचे 'स'वर्गीय दन्त्य उच्चार फारच हवेशीर वाटले. तेवढा एक दोष सोडल्यास तीदेखील छानच आहे.) अॅण्ड्र्यूच्या स्पायडरमॅनच्या पहिल्या भागापेक्षाही हा भाग जास्त सरस आहे. जेमी फॉक्सने सादर केलेला इलेक्ट्रो जबरा. त्या तुलनेत ग्रीन गॉबलिन फारच फुळकवणी वाटला. सुपरहीरोचे चित्रपट निव्वळ मारधाड-हाणामारीच्या पुढे येऊन आजकाल मानवी भावभावना, नैतिक गुन्तागुन्तीन्ना जास्त चाङ्गल्या प्रकारे सादर करतात. काही दिवसान्नी मार्वलचे सुपरहीरोजचे चित्रपटही नोलानच्या बॅटमॅन सीरिजइतके चाङ्गले होतील असे वाटते.

सुपरहीरो चित्रपट आवडणाऱ्यांसाठी पैसा वसूल मनोरञ्जन आहे. शक्य झाल्यास ३-डी पाहावा.

अतिशहाणा Mon, 05/05/2014 - 19:01

एचबीओवरील 'गेम ऑफ थ्रोन्स' ही मालिका पाहण्यास सुरुवात केली. पहिल्या भागात बरीच लैंगिक दृश्ये होती. हळूहळू ती कमी होतील या अपेक्षेने पुढील भाग पाहिले तर ती दृश्ये पॉर्नसदृश अधिकाधिक बीभत्स व किळसवाणी होत आहेत. मालिकेचे सादरीकरण व कथा अप्रतिम आहे. मात्र पहिल्या भागातून एकदा लैंगिक दृश्यांची व कथेतील पात्रांच्या लैंगिक भूमिकांची कल्पना दिल्यानंतर पुनःपुन्हा इतक्या सखोलपणे ही दृश्यांच्या चित्रीकरणाची गरज समजली नाही. ऐसीवरील काहीजणांनी ही मालिका पाहिल्याचे वाचले आहे... तुम्हाला काय वाटते?

अतिशहाणा Tue, 06/05/2014 - 18:30

In reply to by Nile

धन्यवाद. मालिकाकर्त्यांचे युक्तिवाद रोचक आहेत. आश्चर्यकारक योगायोग म्हणजे मी पाहिलेल्या पाचसहा भागांमध्ये बलात्कारित स्त्रिया अत्यंत सुंदर व कमनीय आहेत.

रुची Tue, 06/05/2014 - 20:42

In reply to by अतिशहाणा

मला वाटते की 'गेम ऑफ थ्रोन्स'मधे निव्वळ लैंगिकतेचेच नव्हे तर क्रौर्य, बिभत्सता आणि इतरही अनेक मानवी व्यवहारांचे अतिशय उघडपणे (आणि त्यामुळे थोडे धक्कादायकपणे) चित्रिकरण केले गेले आहे. मग ते सशाच्या शिकारीनंतर त्याचे कातडे काढून टाकणे असो किंवा नवजात बालकांच्या वधांचे चित्रिकरण असो. या मालिकेच्या मुळाशी, या अतिशय आदीम प्रेरणांचे चित्रिकरण करत असताना त्यांना आपल्या सद्यस्थितीतल्या नीतीमत्तांच्या आणि सभ्यतेच्या चश्म्यांतून न पहाण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते. ही दृष्ये अंगावर येतात पण म्हणूनच त्यांच्यातून मांडायचा मुद्दा अधिक प्रभावी बनतो. हे सर्व जाणीवपूर्वक (डेलिबरेटली) केले आहे असे वाटते आणि त्यामुळे काय दाखविणे योग्य आहे याच्या मर्यादा नेहमीच ताणलेल्या वाटतात. अर्थात या दृष्यांच्या बाबतीत प्रत्येकाची संवेदनशीलता वेगळी असते हेही खरे असावे कारण मला स्वतःला त्यातल्या ग्राफिक चित्रिकरणाचा काही त्रास होत नाही; 'द वायर' या मालिकेबद्दलही काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आल्या होत्या पण मला त्याचाही त्रास नव्हता. मुले झोपल्यावर आणि ज्यांच्या बरोबर पाहिल्याने अवघडल्यासारखे होणार नाही अशाच व्यक्तींबरोबर पाहिले तर ठीक आहे.
या निमित्ताने एकूणच मोठ्या पडद्यावरही लैंगिकतेच्या मर्यादा ताणल्या गेल्या आहेत का या बद्दलचा एक लेख वाचण्यात आला होता ते आठवले.

उसंत सखू Mon, 05/05/2014 - 19:22

पेशन्स स्टोन (२०१२) पर्शियन , दिग्दर्शक अतिक राहिमी
पेशन्स स्टोन ही एका युद्धात होरपळणाऱ्या कट्टर मुसलमान देशातल्या स्त्रीची कथा आहे . उदास आणि विरक्त भाव असलेली नाजूक सुंदर नायिका ,गोळी लागून जखमी झालेल्या आणि कोमात असलेल्या वयस्कर पतीची कर्तव्य भावनेने सेवा करत असते . कशाचीच शाश्वती नसलेल्या वातावरणात प्रथमच तिला अंतरीच्या गूढगर्भी असलेल्या अनेक गोष्टी पतीला सांगायची संधी मिळते . तो शुद्धीवर असताना त्यांच्या १० वर्षांच्या वैवाहिक जीवनात रिवाजानुसार तिला कधीही त्याच्याशी बोलण्याची संधी मिळाली नव्हती . जसजसे तिचे मन मोकळे होत जाते तसतसे तिला अनोखे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद होतो .त्यामुळे उध्वस्त , भकास गावात सतत होणारे बॉम्बस्फोट आणि सैन्याच्या भीतीच्या सावटाखाली जगत असूनही तिला अचानक जगण्यात मौज वाटते . परावलंबन आणि दास्यत्वातून मुक्ती असलेले आयुष्य या स्त्रियांसाठी स्वप्नवत आणि अशक्य कोटीतले आहे .संथ गतीने घडणाऱ्या या घटनांमुळे विषादाचे सावट गडद होत जाते .
पेशन्स स्टोन या मिथकात तुम्हाला तो सापडला की त्याला आपली दुख्खे , गुपिते अगदी सर्वकाही सांगायचे . तो ऐकतो आणि मग एक दिवस त्याचा स्फोट होतो आणि आपण मुक्त होतो . मिथकाचा उपयोग एखाद्या समुपदेशकाशी होणाऱ्या कन्फेशन सदृश चर्चेप्रमाणे होत असावा . एक अप्रतिम चित्रपट .

चिंतातुर जंतू Tue, 06/05/2014 - 22:31

In reply to by उसंत सखू

आतिक राहिमीच्याच दीर्घकथेवर त्यानंच दिग्दर्शित केलेला 'अर्थ अ‍ॅन्ड अ‍ॅशेस'सुद्धा पाहा अशी शिफारस करेन.

उसंत सखू Mon, 12/05/2014 - 09:04

In reply to by चिंतातुर जंतू

चिं. जं. च्या शिफारसीनुसार त्वरित आतिक राहीमीची फिल्म 'अर्थ अँड अॅशेस ', अस्मादिक तांत्रिक दृष्ट्या ढ असल्याने खटाटोपाने डाऊनलोडवून पाहिली . अप्रतिम फिल्म पाहून शनिवारच्या सुट्टीचे तात्काळ सार्थक झाले . अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटात उध्वस्त झालेल्या एका गावातून वाचलेले आजोबा आणि त्यात बहिरा झालेला त्यांचा नातू , दूर खाणीत काम करणाऱ्या त्यांच्या मुलाला भेटायला आणि बातमी सांगायला जातात . मैलोनमैल वैराण डोंगराळ प्रदेश आणि धूळ उडवत जाणारे दिवसातून एखादेच वाहन आणि एका चौकीवर दुकान थाटून बसलेला एक अफगाणी ,एक चौकीदार याशिवाय तिथे वाहनाची अंतहीन वाट बघणारे आजोबा - नातू . मृत्यूच्या तांडवातून वाचलेल्या दुर्दैवी जीवांचे अर्थहीन आयुष्य पाहून काळजाचा थरकाप होतो .युद्धामुळे निष्पाप सामन्य नागरिकांची होणारी वाताहत पाहून अपार दुख्ख होते .

चिंतातुर जंतू Tue, 06/05/2014 - 22:40

किरण यज्ञोपवीत दिग्दर्शित 'सलाम' पाहिला. लहान मुलांचा सहजसुंदर अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यांच्या तोंडची खटकेदार, प्रसंगी शिवराळ पण गोड भाषा, पटकथेतले छोटे छोटे घटक आपापलं वजन राखून कथानकाशी संबंध राखून असणं ह्यातही कौशल्य आणि कष्ट दिसतात. किंचित नाट्य आणि बरंचसं निओ-रिअलिझम असलेल्या शैलीतल्या ह्या चित्रपटाचा बाज इराणी चित्रपटांप्रमाणे गोड आहे. संगीत कथानकाला साजेसं वाटलं नाही.

ऋता Sat, 10/05/2014 - 18:53

आमीर खानच्या 'सत्यमेव जयते' ह्या कार्यक्रमाचा 'क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स' हा भाग पाहिला. ह्या भागात सर्वच मुद्द्यांचे सादरीकरण अतिशय आवडले. नक्कीच पहावा असा भाग.

मन Mon, 12/05/2014 - 09:48

that day after everyday हा फक्त वीसेक मिनिटांचा बराच चर्चित लघुपट पाहिला.
प्रदर्शित/निर्मित झाल्यानंतर कैक वर्षांनी म्हणजे बराच उशीराने पहात होतो.

काल पाहिला तेव्हा शेवटची काही मिनिटे समजली नाहित.
मुली त्या टारगट मुलांशी मुकाबला करताना इतर सगळे थंडपणे ते बघत उभे आहेत असे दाखवले आहे.
प्रत्यक्षात काही मुले व काही मुली अशी झटापट आसपास सुरु असेल तर बघे नुसतेच उभे रहात नसावेत असे वाटते.
(बघे नुसतेच उभे राहून मजा पाहतात, हे दृश्य अपघाताच्यावेळी लै कॉमन ठरावे. पण मुलींची छेड काढली जात असेल, तर पब्लिक मध्ये पडते असे पाहण्यात आले आहे.(म्हणजे मुलीने बोंबाबोंब केली तर लोक मध्ये पडतात असे म्हणायचे आहे.)
माझ्या पाहण्यात आलेल्या गोष्टी प्रातिनिधिक नसू शकतात हे मान्य.
)

लघुपटाचा किचनमधील शेवटचा आणि किचनमधीलच पहिला सीन फारच आवडला.

मन Mon, 12/05/2014 - 21:20

पुन्हा एकदा इंग्लिश विंग्लिश पाहिला. ह्यावेळी टीव्हीवर.
ह्यावेळी जरा जास्तच आवडला.
श्रीदेवी शिकण्याचे टप्पे मस्तच टिपलेत.
सुरुवातीला ती एकदम बुजल्यासारखी, दडपणात असते.
नंतर हळूहळू कम्फर्टेबल होत जाते; हे लहान लहान प्रसंगातून दाखवलय.
मस्त.

ऋषिकेश Wed, 14/05/2014 - 16:10

गेल्या काही दिवसांत बरेच चित्रपट पाहिले, पैकी काही रोचक वाटलेल्या चित्रपटांबद्दल वेळ मिळेल तसे एकेकाबद्दल लिहिन. तुर्तास बोरात या (वि)चित्रपटाबद्दल
===
बोरात हा चित्रपट पहायचा योग आला. याला नक्की काय म्हणावे समजले नाही. विनोदाच्या या जातकुळीला एखादा जॉनर म्हणतात का माहिती नाही. बोराट या नावाचा नायक, हा एका 'रेपर'चा मित्र, अनाकर्षक स्त्रीचा पती, 'सेक्स' प्रचंड आवडणारा, व कजाकिस्तानातील नं४ वेश्येचा भाऊ अशी तो स्वतःची ओळख चित्रपटाच्या पहिल्या २ मिनिटात करून देतो. कजाकस्थान मधील या रिपोर्टरला आम्रिकेत डॉक्युमेंटरी बनवायला पाठवतात. तिथे जाऊन तो पामेला अ‍ॅडरसनबैंचा बेवॉच बघुन तिच्या प्रेमात पडतो. व तिच्याशी लग्न करायचे ठरवून न्युयॉर्क टु कॅलिफोर्नियाच्या रोड ट्रीपला जायला निघतो. त्या वेळी अमेरीकेतील विविध घटकांशी साधलेल्या संवादातुन बन(व)लेला हा चित्रपट आहे.

यात एकीकडे अमेरिकेचे बरेच वास्तव चित्रण आहे. मात्र संवाद, प्रसंग कृत्रिम आहेत. एकीकडे विनोद प्रासंगिक असताना काही वेळा विनोदासाठी अशी नाही पण हस्तमैथुनाचे एखाद-दोन प्रसंगही खुलेआम टाकुन बिभत्सरसही दिसतो. म्हटले तर रोड मुव्ही पण विनोदाच्या या प्रकारात त्याला तेही म्हणवत नाही.

चिंजं वा इतर कोणी हा चित्रपट पाहिला असल्यास या प्रकाराला काय म्हणतात ते सांगावे.

बॅटमॅन Wed, 14/05/2014 - 16:16

In reply to by ऋषिकेश

पाहिलाच का शेवटी? आमच्या ग्याङ्गचा कॉलेजजीवनात फेव्हरीट पिच्चर होता. देल्ही बेली म्ह. यापुढे श्यामची आई आहे असे एकाने मांडलेले मत चिंत्य आहे खास.

ऋषिकेश Wed, 14/05/2014 - 16:55

In reply to by बॅटमॅन

देल्हीबेली या चित्रपटाच्या जवळही जाणार नाही याबद्दल +१
पण तरी दोन्हीचा प्रकार वेगळा वाटला. बोराट इतक्या भन्नाट प्रकारात खोलवर काहीतरी खास चिंत्य असं वास्तव मांडतो. एक वेगळा दृष्टिकोन देतो. देल्हीबेली म्हणजे त्यातील विनोदापुरता जवळचा प्रयोग वाटला. त्यातील मेसेज असा 'आवडून जाण्यासारखा' पटत नाही नी बोराट इतका तो चित्रपट आवडतही नाही.

अनुप ढेरे Wed, 14/05/2014 - 17:06

In reply to by ऋषिकेश

बोराटचा पहिला हाफ नक्कीच हसायला लावतो. पण शेवटी शेवटी मला तरी किळसवाणा वाटला. विशेषतः त्याच्या प्रोडूसर्ची आणि त्याची मारामारी. त्या साशा कोएन बान वर २०-२५ केसीस झाल्या होत्या म्हणे हा पिच्चर रीलीज झाल्यावर.

ऋषिकेश Wed, 14/05/2014 - 17:13

In reply to by अनुप ढेरे

+१
म्हणुनच म्हटले. विनोदपट म्हणवत नाही, रोड मुव्ही म्हणवत नाही, ब्लॅक कॉमेडी वगैरे नाहीच नाही, किसळ येत राहिल असा बीभत्सपटही वाटत नाही. मात्र असं असुनही एक विचारपूर्वक केलेले दिग्दर्शन आहे, काहितरी विचार आहे हे जाणवत राहतं.

उदा:

विशेषतः त्याच्या प्रोडूसर्ची आणि त्याची मारामारी.

किसळवाणी आहेच मात्र ती तशीच असावी अशीख मुद्दाम केलेली योजना आहे हे स्पष्ट आहे. किळस वाटतानाही कुठेही बिभत्सतेचे पॉर्नीकरण - भडक रंगात रंगवणे - होत नाही असे मला वाटले.

मी असा प्रकार पहिल्यांदाच पाहिला. (म्हणूनच हा अमंजस/कवतिक/गोंधळलेपण/एक्साईटमेंट काय म्हणाल ते)

चिंतातुर जंतू Wed, 14/05/2014 - 17:38

In reply to by ऋषिकेश

>> चिंजं वा इतर कोणी हा चित्रपट पाहिला असल्यास या प्रकाराला काय म्हणतात ते सांगावे.

साशा बॅरन कोहेनच्या विनोदाचं वर्गीकरण करणं जरा अवघड आहे. खास ज्यूईश पद्धतीनं सगळ्याला फाट्यावर मारत जगाची खिल्ली उडवणं + पॉप-आर्टसारखं हीन अभिरुचीयुक्त शैली वापरणं, ज्यायोगे तथाकथित हुच्चभ्रूंना किळस वगैरे वाटेल + टोकाच्या अब्सर्ड प्रसंगांत समोरच्या माणसाला अडकवून वास्तवाशी नाळ तोडणं (कारण प्रत्यक्षात असं कुणी वागत नाही) आणि त्याद्वारे वास्तवावर विखारी प्रहार करणं. माझ्या मते ही शैली पूर्ण वेळ लांबीच्या चित्रपटापेक्षा लहान डोसमध्ये अधिक परिणामकारक ठरते. बोरात आवडला असेल तर त्याची 'अली जी' मालिका पाहावी.

मी Wed, 14/05/2014 - 19:33

In reply to by ऋषिकेश

बोरातचे एक बलस्थान म्हणजे बोरातला जमलेली कझकस्तानी हेलमधली संवादफेक, त्या हेलशिवाय त्याला झेलणं थोडं अवघड होतं हे नंतरच्या 'ग्रेट डिक्टेटर'वरुन लक्षात येतं.

बॅटमॅन Wed, 14/05/2014 - 18:01

In reply to by चिंतातुर जंतू

माझे अज्ञान म्हणा नैतर पूर्वग्रह.

पण बोरातमध्ये नक्की काय टिप्पणी केलीये वास्तवावर? ते कै झेपलं नै म्हणून इच्यारतो.

चिंतातुर जंतू Wed, 14/05/2014 - 18:36

In reply to by बॅटमॅन

>> बोरातमध्ये नक्की काय टिप्पणी केलीये वास्तवावर?

  • अमेरिकेचा जगाकडे (विशेषतः २००१नंतर मुस्लिम जगाकडे) पाहण्याचा दृष्टिकोन
  • समलिंगी, फेमिनिस्ट, वेश्या, वर्णद्वेष (उत्तर वि. दक्षिण वादातला सिव्हिल वॉर किंवा त्याआधीपासून चिघळलेला विषय) ह्यांच्याविषयीचे दृष्टिकोन
  • ११ सप्टेंबरचा हल्ला ज्यूंमुळे झाला होता असा मुस्लिम जगात असलेला प्रवाद आणि एकंदर ज्यूद्वेष, आणि त्याबद्दल अमेरिकेत असलेले प्रवाद आणि मतमतांतरं

वगैरे गोष्टी आणि त्यातले पूर्वग्रह हे ज्यांचं दैनंदिन वास्तव होतं त्यांची खिल्ली त्यात उडवली आहे.

बॅटमॅन Wed, 14/05/2014 - 19:36

In reply to by चिंतातुर जंतू

अच्छा, धन्यवाद. वरील गोष्टी अंमळ लक्षात आल्या खर्‍या पण पुनरेकवार पिच्चर पाहिला पाहिजे नीट कळायला.

फारएण्ड Wed, 14/05/2014 - 23:19

In reply to by चिंतातुर जंतू

अली जी बद्दल सहमत. साशा बॅरन कोहेन हा एक भन्नाट विनोदी अभिनेता आहे. वेगवेगळी बेअरिंग घेऊन भूमिका करण्याचे त्याचे कौशल्य अफाट आहे. बोरात, अली जी व ब्रूनो या तीन व्यक्तिरेखा धमाल करतो तो. हा बोरात बहुधा पूर्वी त्याच्या "डा अली जी शो" मधे एका क्लिप मधे यायचा. नंतर त्यावरून पूर्ण पिक्चर केला त्याने. वरती कोणीतरी लिहील्याप्रमाणे पहिला हाफ धमाल आहे. नंतर जरा कंटाळा येतो. "लोकांकडून पॉलिटिकली इन्करेक्ट असलेले व त्यामुळे एरव्ही जाहीरपणे न मांडले जाणारे विचार बाहेर काढण्यासाठी 'काडी' असलेले प्रश्न विचारणे" ही त्याची खासियत असावी. अमेरिकेतील बायबल बेल्ट मधल्या कॉन्झर्वेटिव्ह लोकांना ज्यू विरोधी प्रश्न विचारणे हे एक उदाहरण. त्यात तो स्वतः ज्यू आहे हा एक वेगळच अ‍ॅन्गल.

अली जी ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांनी इतर कोणतेही विनोदी काहीही पाहण्याआधी त्याच्या क्लिप्स पाहाव्यात. यू ट्यूब वर भरपूर आहेत.

अंतराआनंद Wed, 14/05/2014 - 19:50

(ही काही समीक्षा म्हणता येणार नाही. पाहुन वाटलं ते लिहिलं.)

माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचं नातं असतं फक्त स्वत:शी. मोठ होताना , स्वत:तला ’मी’ वेगवेगळ्या नात्यात विखुरला जातो. ही नाती अंतर्गोल , बहिर्गोल आरश्यांसारखी. ती आपल्याला खरा ’मी’ दाखवतंच नाहीत. यामुळे आपण कसे आहोत, काय करायला हवंय याची उत्तरं शोधणं कठीण जातं. अश्यावेळेस आपल्याला आपण शोधून देणारं नवं नातं - तात्पुरत आणि बिननावाचं का असेना - मिळालं तर? . अश्या नात्याची गोष्ट म्हणजे ’लंचबॉक्स’
ईला ही साधी ग्रुहिणी. तिने मनापासून केलेला डबा नवर्‍याने नावाजावा ; असं तिला वाटतं. पण तो त्याच्या दिनक्रमात व्यस्त. एके दिवशी चूकून ड्बा साजन फर्नांडीसकडे जातो. रोज हॉटेलमधून येणारा डबा खायची सवय असणार्‍या त्याला ती चव आवडते. तिलाही कळतं हा डबा आपल्या नवर्‍याकडे न जाता दुसर्‍याकडेच पोचतोय. मग दोघांचं एक वेगळंच नातं आकाराला येऊ लागतं. ड्ब्याबरोबर पास होण्यार्‍या चिठ्ठीतून ती आपल्या छोट्याश्या विश्वातल्या छोट्याच , पण मनाजवळच्या आठवणी , गोष्टी त्याच्या बरोबर शेअर करू लागते. तर विधूर, मूलबाळ नसलेल्या, तिरसट साजनला तिच्या त्या गोष्टीत जूनं, हरवलेलं त्याचं विश्व सापडू लागतं. दोघांच्याही रूटीन, नीरस दिनक्रमात काहीतरी वेगळं घडायला लागतं. या नात्यात एक लोभस निरागसपणा आहे. त्यामुळे ईलाला वेगवेगळ्या रेसिपीज मनापासून कराव्याश्या वाटायला लागतात, साजनला त्याच्या तिरसटपणा लांब ठेवावासा वाट्तो. चेहरे माहित नसलेल्या मैत्रीत दोघेही स्वत:चा दुसरा चेहरा पहायला लागतात. दोघं भेटायचंही ठरवतात. पण तिथे पोचूनही साजन भेटायचं टाळतो. वयानं , अनुभवानं मोठ्या असलेल्या साजनला हे उमगतं की प्रत्येकाने स्वत:चं जगणं स्वत:च जगायचं असतं. आपल्या आयुष्यातला "सुखाची GDP" असणारा भुतान स्वत:च शोधायचा असतो. अशी अल्पकाळ लाभलेली चेहरा नसलेली मैत्री ईलाला स्वत:साठी स्वत:तला चेहरा शोधून द्यायचं काम करते.
थोडक्या व्यक्तीरेखा, साधी पटणारी कथा, योग्य कलाकार याचा मेळ साधणारा उत्तम चित्रपट.

ऋषिकेश Wed, 14/05/2014 - 17:22

In reply to by अंतराआनंद

आपल्याबद्दल इतरांशी बोलताना नी इतरांचे त्यांच्याबद्दलचे ऐकताना आपल्याच समोर आपली एक नवी ओळख घडत असते, आपण आपल्याला नव्याने निरखत असतो याचा पुनःप्रत्यय देणारा चित्रपट होता तो. आवडला होताच. या लेखनाने पुन्हा आठवून गेला.

छान

चित्रा राजेन्द… Wed, 14/05/2014 - 19:34

In reply to by अंतराआनंद

ही काही परीकथेतील गोष्ट नव्हे--- की शेवट 'त्यानंतर ते सुखाने जगू लागले' अशा टाईपची! ही आज जगणार्या माणसांची गोष्ट आहे. मला कुतूहल वाटतं की अशी माणसं नंतर कशी जगतात? कारण साजन तिला न भेटण्याचं ठरवतो.

ॲमी Sun, 18/05/2014 - 09:28

लंचबॉक्स पाहिला. फारसा भावला नाही. अधेमधेतर चमनबहार वाटला. साजन फर्नांडीस काय साजन चित्रपटाची गाणी काय =)) असो. सुरुवातीचा 'हेलो सर. कैसे हो आप?' म्हणणार अनॉयिंग नवाझुद्दीन मात्र आवडला. शेवटी साजन तिला भेटायलाच चाललेला असतो ना? भूतानला कशाला जाताय आणिक? तिथला ह्यापिनेस इंडेक्स कमी करायचाय का? त्यापेक्षा रहा इथेच तसंही आता 'अच्छे दिन' आलेच आहेत.
आणि हो वयात फार फरक असलेली नाती चीनी कम, निशांत मधे आहेत. ५० ६०वयाच्या स्त्रीच्या प्रेमात पडलेला तरुण आहे का कुठे? ज्यात त्या स्त्रीला निगेटीव्ह दाखवल नाहीय...

ऋषिकेश Sun, 18/05/2014 - 09:29

In reply to by ॲमी

गाणी आठवतही नाहियेत. पण संगीत एकुणातच नव्हते आवडले. डब्यातील भजने तर अगदीच अनैसर्गिक होती.
मी भजनाच्या डब्यातून कैकवेळा प्रवास केला आहे. मराठी भजने असली तर वेळ बरा जात असे, शिवाय शेवटी काहितरी प्रसाद (फुटाणे, चणे, शिरा एखाद दिवशी काजु कतलीसुद्धा) मिळे

ॲमी Sun, 18/05/2014 - 11:22

In reply to by ऋषिकेश

गाणी नाहीतच चित्रपटात. भजन, भिकारी मुले, आँटीचा टेप बस्स एवढच.
बादवे वर चुकून निशांत लिहील निशब्द ऐवजी. आणि एक आठवला जॉगर्स पार्क.

५०-६०वयाच्या स्त्रीच्या प्रेमात पडलेला तरुण आहे का कुठे? ज्यात त्या स्त्रीला निगेटीव्ह दाखवल नाही. > दिल चाहता है, लीला मधली डिंपल ४०च्या आसपास असते वाटत. आणि बिइंग सायरसमधेपण...

मन Sun, 18/05/2014 - 17:18

In reply to by ॲमी

खरमरीत आवाजाचा राजकुमार, त्याचा तरुण मुलगा असतो कमल हसन.
कमल हसन पडतो एका वयस्कर्/प्रौढ स्त्रीच्या हेमामालिनीच्या प्रेमात.
नंतर समजतं की हेमामालिनी मुलगी तरुण पद्मिनी कोल्हापुरे वयस्कर्/प्रौढ राजकुमारच्या प्रेमात वगैरे आहे.
चित्रपटाचे नाव :- एक नई पहेली.
मी पूर्ण पाहिलेला नाही.

हिटलरच्या पप्पाची पहिली पत्नी हिटलरच्या पप्पापेक्षा १४ की १६ वर्षे मोठी होती असे ऐकले आहे.
सध्या फरहा खान (किंवा अजून कोणीए फिल्मी सेलिब्रिटी ) आपल्याहून पंधरा की वीस वर्षे लहान तरुणाशी विवाहित आहे असे ऐकले.
पण प्रत्यक्षात एकूणात अशा जोड्या खूपच कमी.
प्रगत म्हणवल्या जानार्‍या युरोपातही एकूण समाज जीवनात वृद्ध पुरुषाशी तरुण स्त्रीने लग्न केल्याची उदाहरणे कैक ऐकलित.
उलट उदाहरणे त्या प्रमाणात अजिबातच नाहित.
कारणे ठाउक नाहित.

ॲमी Sun, 18/05/2014 - 17:28

In reply to by मन

आभार :-) या चित्रपटाबद्दल कधी ऐकलं नव्हतं. पहायला हवा.
अमृता सिंग-सैफ अली खान, डेमी मूर-अॅशटन, म्याडोना आणि तिचा एक बॉयफ्रेंड या जोड्यांच्या वयातपण तसा बराच फरक आहे.

बॅटमॅन Mon, 19/05/2014 - 01:33

हे रत्न पाहण्यात आले. काही काही इन्सल्ट्स अगदीच रोचक आहेत. वानगीदाखल पाहण्यात आलेले नमुने:

"You jhola-wearing, naive anti-Indian sedentary agitationist."

"You paki-loving, contrarian anti-Modi Arundhati apologist."

"You sanctimonious, hippocrate anti-development hidden agenda axegrinder."

"You pseudo-secular, fake-liberal anti-national sedentary agitationist."

नंदन Sat, 24/05/2014 - 22:51

X-Men मालिकेतला हा नवीन चित्रपट कालच पाहिला. शीर्षक निर्देश करतं त्याप्रमाणे 'टाईम ट्रॅव्हल' ही मुख्य थीम. या मालिकेतले चित्रपट आवडत असतील, तर नक्कीच पाहण्यासारखा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 27/05/2014 - 22:04

In reply to by मेघना भुस्कुटे

पहिल्या वर्गातल्या म्युटंटाचा लेख आवडला.

(फारएण्ड हा तुलनेत साडेतिसऱ्या वर्गातला म्यूटंट वाटतो. याची एक स्वतंत्र, स्वतःची मिती आहे.)

मंदार कात्रे Tue, 27/05/2014 - 03:23

कालच ३ निरनिराळ्या कथांची गुंफण असलेला "गंध " हा मराठी सिनेमा तूनळी वर पाहिला .आवडला ....

तिसर्या कथेत पावसाळ्यातील कोकणातील ग्रामीण जीवनाचे अतिशय प्रत्ययकारी चित्रण !मला अगदी बालपण आठवले!

घनु Wed, 28/05/2014 - 10:23

In reply to by मंदार कात्रे

गंध - वा मलाही हा सिनेमा अतिशय अवडलेला (त्यातल्या त्यात तो सोनाली कुलकर्णी आणि मिलींद सोमण चा भाग विशेष आवडला नाही). तिसरा भाग खूप आवडला - नीना कुलकर्णीने अप्रतिम काम केलय - नेहमीप्रमाणेच. अगदी आपल्या घरात जश्या मोठ्या बाया असतात ज्या कधी कधी लहान मुलांशी बोलत असतात पण खरं स्वतःच्याच विचारांमधे, चिंता मधे गुंतलेल्या असतात, ते चित्र अगदी हुबेहुब निना कुलकर्णीने उरतवलं आहे. बाकी पावसाळ्यातला कोकण लाजवाब, विशेष म्हणजे झाडं, नद्या, समुद्र, सारखा धो-धो पाऊस न दाखवता त्या पावसाची/कोकणाची जाणीव प्रेक्षकांना करुन देणं ही कलाच म्हणावी.

अवांतर - त्याच दिग्दर्शकाने जेव्हा गंध च्या पहिल्या भागाचा (अमृता सुभाष चा) हिंदी सिनेमा बनवला 'अय्या' नावाचा तेव्हा विश्वासच बसला नाही की कोणी दिग्दर्शक आपल्याच कलाकृतीची अशी थट्टा कसं करू शकतं.

ॲमी Wed, 28/05/2014 - 16:28

In reply to by घनु

बघीतला एकदाचा :-)
तिसरी कथा छान आहे. पण त्यात 'गंध' असा फारसा नाही; कडीपत्ता, पापड तळणे वगैरेशिवाय.
अय्या आधीच पाहीला असल्याने पहिला भागदेखील ठीक वाटला. पण कुठे तो पृथ्वीराज आणि कुठे हा मंगेश नाडकर्णी!
मिलींद-सोनालीचा भाग जरा जास्तच ग्ल्यामरस आहे. गाणं, डान्स वगैरेमुळे तसं वाटलं बहुतेक. घर कसलं छान दाखवलय त्याच. पण काचेच्या दाराची घरं असतात का भारतात?

घनु Wed, 28/05/2014 - 18:17

In reply to by ॲमी

तिसरी कथा छान आहे. पण त्यात 'गंध' असा फारसा नाही; कडीपत्ता, पापड तळणे वगैरेशिवाय.

एवढंच नाही काय - घरात बाळंतीण असली की शेक-शेगडी असते घरात आणि त्याचा वास घरभर असतो - त्यातल्या त्यात अश्या जुन्या मातीच्या घरांत तर तो घट्ट बसून असतो, पावसाळ्यात तर त्या वासाला एक वेगळीच उब असते. त्यात नीना कुलकर्णीला मुल-बाळ नसतं (होत नसतं) त्यामूळे त्या वासाशी तिचं एक वेगळच नातं (दुखरं कादाचित) असतं. अर्थात हा माझा अंदाज - निरीक्षण.

@मंगेश नाडकर्णी - नक्कीच पृथ्वीराज च्या पुढे तो तितका 'ग्लॅमरस'(?) नाहीये पण वास्तविकतेच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास मंगेश नाडकर्णी उर्फ उमेश कुलकर्णी जास्त भावतो/पटतो त्या पात्रात.

ॲमी Wed, 28/05/2014 - 19:23

In reply to by घनु

हम्म ते बाळंतीण, शेक, शेगडी मी गंधाशी रिलेट करू शकले नव्हते.
या दृष्टीने विचार केल्यावर घरभर उद(?) घेऊन फिरणार्या बायकापण दोनतीनदा दाखवल्या आहेत.

Nile Wed, 28/05/2014 - 20:52

अमेझॉनच्या कृपेने सोप्रानोज् एकदाचे उपलब्ध झाले. पहिले तीन सीझन्स नुकतेच पाह्यले. गॉडफादर, कसिनो, गूडफेलास इ. चे फॅन असाल तर ही मालिका जरूर पहा. माफिया आयुष्याशिवायही अनेक गोष्टींचे चित्रण प्रभावी वाटले. पात्रं मनात पक्की बसतील अशी बसवली आहेत.

नंदन Thu, 29/05/2014 - 00:36

In reply to by Nile

माफिया आयुष्याशिवायही अनेक गोष्टींचे चित्रण प्रभावी वाटले. पात्रं मनात पक्की बसतील अशी बसवली आहेत.

सहमत.

बाकी 'द वायर'देखील अमेझॉनवर आता उपलब्ध आहे.

Nile Tue, 17/06/2014 - 10:45

In reply to by नंदन

फायर टीव्हीचा पायगूण वाटतं! चांगलं आहे. :)

बॅटमॅन Mon, 09/06/2014 - 22:44

चेंगीझखानाच्या आयुष्यावर आधारित मंगोल नामक रशियन पिच्चर पाहिला.

https://www.youtube.com/watch?v=rWt-FXJhLdI

सिनेमॅटोग्राफी अतिशय सुंदर आहे. बाकी चित्रणही मस्तच जमले आहे. एकदा तरी अवश्य पहावासे सुचवतो.

मन Tue, 10/06/2014 - 09:09

In reply to by बॅटमॅन

पाहिलाय बहुतेक मीही. (हा तोच आहे का खात्री नाही.)
चंगीझ बद्दलचे तपशील मिळतील असे समजून चित्रपट पाहणार्‍यांसाठी :-
चेंगीझचं पूर्ण आयुष्य दाखवलेलं नाहिये. फक्त त्याचा "तिमुजिन" पासून ते "द चेंगीझ खान", "खानोंका खान"
होण्यापर्यंतचा प्रवास दाखवलाय. म्हणजे त्याच्या मंगोलियामधील आयुश्याबद्दलच चित्रपट अधिक आहे.
त्याने बाहेर जे काही जग पादाक्रांत केलं; ते दाखवण्यापूर्वीच तो संपतो.
जेवढा भाग दाखवलाय तो मात्र चांगला घेतला आहे.

बॅटमॅन Tue, 10/06/2014 - 11:02

In reply to by मन

म्हणजे त्याच्या मंगोलियामधील आयुश्याबद्दलच चित्रपट अधिक आहे.
त्याने बाहेर जे काही जग पादाक्रांत केलं; ते दाखवण्यापूर्वीच तो संपतो.

हे बाकी खरंय. आणि जो भाग दाखवलाय तो एकदम ऑथेंटिक इ. वाटतो. तत्कालीन मंगोलियाचा फील येईलसे अत्युत्तम प्रकारे दाखवले आहे.

अनुप ढेरे Wed, 11/06/2014 - 17:49

In reply to by बॅटमॅन

पाहिला आजच! मस्त आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे छायाचित्रण भारी आहे. ब्यागराउंड संगीत पण मस्तं आहे.

घनु Thu, 12/06/2014 - 10:09

In reply to by बॅटमॅन

ह्या विकांताला आवर्जून सगळ्यात आधी हाच सिनेमा बघणार :)

(विकांता शिवायही रात्र रात्र जागून सिनेमे बघण्याचे दिवस आठवून डोळे पाणावले, गेले ते दिन गेले :( )

उसंत सखू Tue, 10/06/2014 - 06:40

क्लायमेट या २००६ मधल्या तुर्की सिनेमात तासंतास निश्चल नजरेने शून्याचा शोध घेण्यात आला आहे . नायिकेचे मंदपणे भुरुभुरु उडणारे केस पाहून फिल्म चालू असल्याचे आकलन व्हायचे . सुरुवातीला बराचवेळ केसही हलले नाही तेंव्हा ती बापडी सिनेमा सुरु झाल्याझाल्या मरून गेली कि काय असे वाटले . कर्सर सुद्धा निराश होऊन पॉज येउन थबकला होता असे लक्षात आल्यावर आयोजकाने प्ले वर क्लीकून पुनश्च केसांची हालचाल घडवून आणली . नायक , नायिका काहीच करत नाही म्हणून पटकथेत नसलेली एक माशी येते आणि माफक हालचाली करते . पण तिलाही बहुदा त्यांच्या चेहेऱ्यावर बसवत नाही . शेवटी त्यांच्या रक्तवाहिन्यातील रुधिराभिसरण पाहून त्यांच्या जिवंत असण्याला पुष्टी मिळू लागली . अखेर पुढचा काही काळ नायक नायिकेत दुरावा निर्माण झाला असून ती त्याला सोडून जाते वगैरे घटना घडतात . एकंदरीत या सिरीयस सिनेमात क्लायमेटचा मुख्य रोल असावा . लहरी हवामानासारखे जोडप्याचे एकत्र येणे अनिश्चित दिसून येते . सिनेमाला १२ अवार्ड्स मिळाली आहेत तेंव्हा कदाचित माझ्या आकलना पलीकडचा असावा . छायाचित्रण स्टील फोटोग्राफी सारखे असून अप्रतिम आहे .

उसंत सखू Tue, 10/06/2014 - 18:12

In reply to by ऋषिकेश

आमच्या फिल्म क्लब मधे दर रविवारी स्क्रीनिन्ग असत. डाउन्लोड केलेले किन्वा डीवीडीने सिनेमे प्रोजेक्टरवरुन दखवतात .

चिंतातुर जंतू Wed, 11/06/2014 - 17:39

In reply to by उसंत सखू

नूरी बिल्ज सेलान माझ्या मते सध्याच्या अतिशय महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. 'क्लायमेट्स' फार अमूर्त वाटला असला तर त्याचा 'थ्री मंकीज' पाहावा असं सुचवेन.
(जाता जाता : त्याच्या ताज्या चित्रपटाला ह्या वर्षी कान महोत्सवामध्ये प्रतिष्ठेचं गोल्डन पाम पारितोषिक मिळालं आहे. ह्याआधी २००३, २००६, २००८ आणि २०११ साली त्याला कान महोत्सवात वेगवेगळी पारितोषिकं मिळाली होती.)

मन Thu, 12/06/2014 - 14:26

लो बजेट वाटणारा " फिल्मिस्तान " थेट्रात पाहिला.
चांगलाय, निदान एकदा बघता यावा.

फार मोठी तगडी स्टारकास्ट , मोठे ग्लॅमरस स्टारडम असणारे तारे तारके नसल्यानेच तो पहावासा वाटला.
निर्णय योग्य ठरला.

बादवे, मी ऐसीवरील थोरांची भाषा योग्य अशी शिकलो/समजलो असेन तर :-
फिल्मिस्तान हे भारत - पाक मधील समान पॉप्युलर कल्चरवर प्रकाशजोत टाकते.

"पॉप्युलर कल्चर " हा शब्द ह्यापूर्वी इथे वापरलेल्यांना नम्र विनंती करतो आहे :-
त्या शब्दाचा वाक्यात उपयोग आम्हांस जमला आहे की नाही ते सांगावे .

मिलिंद Sun, 15/06/2014 - 21:57

ले डायाबॉलिक्स (१९५५) हा फ्रेंच रहस्यपट नुकताच पाहिला. लेखक पिएर बोइलो ह्याच्याशी संपर्क साधायला किंचित उशीर झाल्यामुळे अ‍ॅल्फ्रेड हिचकॉकच्या हातून निसटलेल्या ह्या गोष्टीला स्वतः हिचकॉकही इतक्या चांगल्याप्रकारे सादर करू शकला नसता असे दिग्दर्शक एच. जी. क्लूझोचा हा चित्रपट पाहिल्यानंतर वाटत राहते. आपली पत्नी, व रखेल, दोघींचा मानसिक छळ करणारा एक बोर्डिंग शाळेचा मुख्याध्यापक. त्याच्या जाचास कंटाळून दोघी मिळून त्याचा खूनाचा कट रचतात. त्यानुसार त्याला बाथटबमध्ये बुडवून मारतात, व नंतर त्याचे प्रेत शाळेच्या गढूळ तरणतलावात फेकून देतात. दोन दिवस उलटून गेल्यानंतरही प्रेत वर न आल्यामुळे गोंधळलेल्या त्या दोघी काही तरी सबब सांगून तरणतलाव रिकामा करवतात. पण प्रेत गायब झालेले असते... तशात मुख्याध्यापक कुठे कुठे दिसल्याच्या बातम्या येत असतात. त्यामुळे दोघींच्या मनावरील ताण वाढत जातो. गूढ वाढत जाते... स्पॉयलर अलर्ट देऊनही ह्याहून अधिक सांगणे म्हणजे चित्रपटाची गंमत घालवणे. अधिक माहिती इथे.

फ्रेंच नावांच्या उच्चारचुका दे.घे.

गब्बर सिंग Tue, 17/06/2014 - 00:19

In reply to by मिलिंद

पिक्चर बघितला सल्याचे अंधुकसे स्मरते आहे. :-)

पण तुमची सही सही है.

तुमसे गिला नहीं है, पत्थर उठानेवालों
तुम पर कभी जुनूँ का आलम हुआ न होगा

क्या बात है !!!

उसंत सखू Mon, 16/06/2014 - 08:08

कृष्णमेघांनी दाटलेल्या , थंडगार बोचरे वारे वहात असलेल्या एका पौर्णिमेच्या रात्री , अनातोलियातल्या टेकड्यांमधून प्रखर प्रकाश झोत सोडत, तीन गाड्या भरून तपास अधिकारी , डॉक्टर आणि आरोपींचा ताफा, हत्या झालेल्याचा मृतदेह शोधायला जात असतात . अप्रतिम देखणी तैलचित्रे भासतील असे रात्रीचे धूसर प्रकाशातले अदभुत चित्रिकरण चकव्यात गुरफटून टाकणारे आहे . डॉक्टर आणि प्रॉसिक्युटरच्या देखण्या चेहेऱ्यावर सुरु असलेला सावली , प्रकाश आणि भावनांचा अनोखा खेळ अवाक करणारा आहे .एक लहानसे गाव तिथले त्यांचे जेवण , त्यावेळी वीज जाणे आणि यजमानाच्या अलौकिक सुंदर मुलीने दिव्याच्या मंद प्रकाशात या पाहुण्यांना पेय सादर करणे , हे स्वप्नवत आणि तरल अनुभूती देते .
दिवसा सत्याच्या प्रकाशात सगळे कसे वेगळे दिसू लागते . अडीच तास सावकाश चाललेल्या या रहस्यमय सिनेमात नाट्य , हिंसा , कोर्ट कचेऱ्या असले काही नसूनही हा दिग्दर्शक मोहिनीमंत्राने घट्ट बांधून ठेवतो . प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आधारित असलेली कथा , सशक्त अभिनय आणि अनोख्या सादरीकरमुळे गुंतवून ठेवते . नूरी बिल्ज सेलान या दिग्दर्शकाला सलाम !
आता चिंतातूर जंतूंच्या सल्ल्यानुसार आमच्या फिल्म क्लब गुर्जींच्या संग्रहातला थ्री मंकीज निकट भविष्यात पहायचा आहे .

थ्री मंकीज निकट भविष्यात पहायचा आहे

उसंत सखू यांना जळवल्याच्या आरोपाखाली कोणती शिक्षा द्यावी? :)

बादवे, असे एकत्र जमून विविध चित्रपट बघणारे क्लब/सर्कल्स पुण्यात कोणते आहेत? आहेत का?
(अर्काईव्ह्जचे सर्कल माहिती आहे. तिथे जुने चित्रपट दाखवतात. )

चिंतातुर जंतू Mon, 16/06/2014 - 13:37

In reply to by ऋषिकेश

>> असे एकत्र जमून विविध चित्रपट बघणारे क्लब/सर्कल्स पुण्यात कोणते आहेत? आहेत का?

खरं तर छोट्या वर्तुळात हे करणं खूप सोपं आहे. चित्रपटांच्या उत्कृष्ट प्रती आता मिळतात. लॅपटॉपला चांगला एलसीडी टीव्ही किंवा प्रोजेक्टर जोडून ते घरच्याघरी गटानं पाहता येतात. खोलीच्या आकारानुसार ८-१० माणसांत असं करणं शक्य होतं. त्याहून मोठा गट असला आणि तेवढी जागा उपलब्ध नसली, तर मात्र हॉल आणि प्रोजेक्टर वगैरे भाड्यानं घ्यावा लागतो आणि खर्च वाढतो. समविचारी मित्र असले, तर ती अशक्य बाब नाही. अनेक वर्षं काही समविचारी मित्रांच्या संगतीत मी अशी वर्तुळं चालवली आहेत.

ऋषिकेश Mon, 16/06/2014 - 13:46

In reply to by चिंतातुर जंतू

चित्रपटांच्या उत्कृष्ट प्रती आता मिळतात.

आमचं घोडं इथे अडतं. व्यावसायिकदृष्ट्या गाजलेले भारतीय व इंग्रजी चित्रपट सोडल्यास, देशी-विदेशी भाषांमधील नव्या चित्रपटांच्या या प्रती कशा मिळवाव्यात? अनेकदा यांच्या डिव्हिडीजही उपलब्ध नसतात की टोरेंटवरही मिळत नाहीत

चिंतातुर जंतू Mon, 16/06/2014 - 14:14

In reply to by ऋषिकेश

>> नव्या चित्रपटांच्या या प्रती कशा मिळवाव्यात?

महोत्सवांमध्ये फिरणारे चित्रपट साधारण वर्षभर फिरतात. फेस्टिव्हल सर्किटमध्ये दाखवून झाल्यानंतर आणि निवडक देशांत प्रदर्शित होऊन गेल्यानंतर काही काळानं चित्रपट डीव्हीडी / ब्लू-रे वगैरेंवर (पाश्चात्य देशांत) अधिकृतरीत्या उपलब्ध होतो. त्यानंतर त्याची चांगली प्रत (अधिकृत / अनधिकृत मार्गानं) उपलब्ध होऊ शकते. पण हा माझा प्रांत नाही. रमताराम वगैरेंकडून अधिक माहिती मिळू शकेल.

ॲमी Tue, 24/06/2014 - 08:39

क्विन. चांगला आहे. पण फार्फार आवडला असे नाही म्हणणार. अभिनय मस्त केलाय सर्वांनी. हंगामा हो गया गाण्याच्या शेवटी कंगनाचा नाच बघताना लय हसू आलं. तो कारवाला बिचारा दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतोय आणि ही येड्यागत नाचतेय =)). राजकुमार यादव राव नाटकांमधून चित्रपटात आलाय वाटत. शाहीद बघावा म्हणतेय युट्युबवर मिळाल्यास.