गुलाम महम्मद शेख यांचे चित्रमय व्याख्यान

हा विकांत पुण्यात बरेच चांगले कार्यक्रम होते, आणि मर्फिजच्या नियमांनुसार (असल्या सगळ्या न-नियमांना मर्फिजचे नियम असे आम्ही संबोधतो, हे खुद्द मर्फिजनेच सांगितले असले पाहिजेत अशी अट नाही) (साल्या लै माजलेल्या - श्रेय: गुर्जी) कुटुंबसंस्थेच्या जंजाळात नेमके याच विकांताला आम्ही अडकलेलो असल्याने त्यापैकी एक तरी कार्यक्रम जमेल का या विषयी खात्री नव्हती. मग 'आवड' हा फिल्टर वापरूनही उलरलेल्या - कझाक फिल्म फेस्टिव्हल, एका मित्रवर्तुळाने आयोजित केलेला बोरकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्लाचा प्रयोग आणि चित्रकार गुलाम महम्मद शेख यांचे एक व्याख्यान या सगळ्या - गोष्टींतून माझ्या वेळेची उपलब्धता, नी ती गोष्ट पुन्हा उपलब्ध होण्याची संभाव्यता आणि माझा 'नाविन्याची हौस' हा सदरा, अशी चाळणी लाऊन; प्रख्यात चित्रकार गुलाम महम्मद शेख यांचे जे एक व्याख्यान पुण्याच्या एस्.एम्.जोशी सभागृहात शनिवारी संपन्न झाले, त्याला हजेरी लावली.

संध्याकाळी साडेपाचच्या कार्यक्रमाला मी १० मिनिटे आधी पोचलो. आत प्रवेश करताच बर्‍याचशा व्यक्ती प्रवेशद्वाराशीच उभ्या होत्या. मला वाटले झाले, बसायला मिळणार नाहीसे दिसते. २-३ तास उभं राहून ऐकण्यासारखे व्याख्यान आहे का नाही हे ही माहित नसल्याने -त्याच वेळी सुरू होणार्‍या- बोरकरांच्या कवितावाचनाला सटकावे असा मोहही झाला होता. पण जरा मान उंचावून पाहिले तर आत बसायला बरीच जागा उपलब्ध होती. अर्ध्याहून अधिक सभागृह तोवर भरले होते तरी मागे जागा शिल्लक होती. तिथे बसलो, आणि प्रवेशद्वाराशी उभे असलेल्यांकडे बघत होतो. ते तिथे असे वाटेत नक्की का उभे होते हे मला शेवटपर्यंत कळले नाही. बहुदा त्यातील काही मंडळी आयोजक वा कार्यकर्ते असावे आणि ते तसे आहेत हे लोकांना समजावे म्हणून तिथे उभे असावेत. काही जणांना त्यांच्याशी गप्पा मारायला/बोलायला नाईलाजाने तिथेच उभे रहावे लागत होते.

कार्यक्रम मात्र अगदी वेळेवर सुरू झाला. चित्रबोध म्हणा किंवा इतरही अशी कलाक्षेत्राशी निगडीत व्याख्याने म्हणा माझा अनुभव सुखद राहिला आहे. विनाकारण कालापव्यय करणारी स्वागतपर भाषणे, दीपप्रज्वलन, हार-तुरे, पाहुण्यांची ओळख वगैरे जुन्या व आताच्या काळात बरेचसे अनावश्यक कार्यक्रमांना फाटा देताना आढळला आहे. मात्र सदर कार्यक्रम त्याला अपवाद होता. एक दीपप्रज्वलन सोडल्यास इतर सगळे "प्रोटोकॉल्स" पाळले गेले. सुरूवातीला वक्त्यांच्या अर्थात गुलाम महम्मंद शेख यांच्या कार्याचा अतिशय सुरेख धांदोळा घेणारी दूरदर्शन प्रस्तूत डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात आली. एकुणच शेख साहेबांचे विचार, त्यांचे काम, त्यांनी काढलेली विविध चित्रे, त्यांचे चित्रकलेतले योगदान, प्रयोग, त्यांनी पूर्ण केलेली मोठी प्रोजेक्ट्स वगैरेची बरीच माहिती या डॉक्युमेंटरीत होती. त्यानंतर एक लहानसा ब्रेक चहापानासाठी होता. त्यात माधुरीताई पुरंदरे, सचीन कुंडलकर, गिरीश कुलकर्णी, समर नखाते ही तसेच अजूनही काही दृश्यकला-साहित्य-चित्रपट क्षेत्रातील मला नावे माहित नसलेली (विसरलेली) पण कधी ना कधी चेहरे बघितलेली मंडळी दिसली. एकुणात या व्याख्यानाला झालेली महारथी-गर्दी नी त्यांच्या सघन चर्चा वगैरे पाहता मला एकदमच 'हॅऽऽ' असल्यासारखे वाटू लागले होते, माझा न्यूनगंडही जागृत झाला होता. पण आलोच आहे तर ऐकून जाऊ समजेल तितके समजेल असा विचार करून तिथेच टिकून राहिलो.

ब्रेक संपल्यावर पुन्हा एकदा वक्त्याचा परिचय - डॉक्युमेंटरीत आलेली बरीचशी माहिती अधिक कोरड्या व नीरस शब्दांत-, त्यांना मिळालेले पुरस्कार वगैरे "अगदी थोडक्यात" या लेबलखाली यथासांग करून देण्यात आलं. त्य आधी या व्याख्यानमालेमागची भुमिका समजून देताना त्यांचे 'कवतिक' यात "फक्त" १५-२० मिनिटे घेतली. मग स्टेजवर श्री. शेख व श्री कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुधीर पटवर्धन यांचे पुष्पगुच्छ वगैरे देऊन स्वागत करण्यात आले. मग पुन्हा पटवर्धन भाषण ऐकायला स्टेजखाली गेले. मग पुन्हा स्टेजवरील व्यवस्था बदलण्यात आली नी एकदाचे भाषण सुरू झाले. फ्रँकली सांगायचं तर पहिल्या १५-२० मिनिटांनंतर मी निघून जायचं हे ठरवायच्या व्हर्जवर आलो होतो. कारण सुरूवातीला शेख साहेबांनी कथाचरितातील एक गोष्ट सांगायला खरंतर वाचायला सुरूवात केली होती. एकतर आधीच इंग्रजीतील व्याख्यान, त्यात हे तर छापिल इंग्रजीत वाचून दाखवलेली कथा माझ्यापर्‍यत नीट पोचलीही नाही आणि त्याचे मुळ व्याख्यानाशी असलेले नातेही माहिती नसल्याने अगदीच कंटाळा येऊ लागला होता.

मग मात्र अचानक ढग बाजुला व्हावे आणि वातावरण प्रफुल्लित व्हावे तसे काहिसे झाले. आता शेख साहेबांनी प्रोजेक्टरवर चित्रे दाखवत आपला विषय मांडायला सुरूवात केली होती. "Story of the toungue and the Text" the Narrative traditions of Indian art असे शीर्षक असलेले हे व्याख्यान आता कुठे सुरू झाल्याचे जाणवले. एकुणच भारतीय पारंपरिक कला, त्यात होत गेलेले बदल आणि त्याची खास भारतीय अशी वैशिष्ट्ये यांचे अतिशय खुमासदार आणि काहिशा मिश्किल ढंगातील हे व्याख्यान त्यानंतर माझ्यासाठी माहितीचा खजिनाच होते.

सुरवात म्हणून त्यांनी अजंठालेण्यांवरील भित्तीचित्रांनी केली. त्या चित्रांमधील कथा, त्यातील पात्र योजना, चितारण्याची पद्धत, रंगपद्धती, कथेच्या प्रवासाची दिशा याबद्दल ते बरेच बोलले. त्यातच त्यांनी हळूहळू ही चित्रे आणि तत्कालीन समाजव्यवस्था, त्याचे चित्रांमध्ये पडणारे प्रतिबिंब, वापरले जाणारे रंग वगैरेबद्दल आपली मते दिली. एकुणच "चित्रकला ही अत्यंत स्थानिक अविष्कार असते, स्थानिकांची सर्वात प्रभावी भाषा असते" असे त्यांचे मत हा त्या भाषणाचा गाभा म्हणता येईल. आणि ही चित्रांची भाषा उलगडायला त्यांनी जी उत्तमोत्तम ६०-७० चित्रे दाखवली त्यातील प्रत्येक चित्र काही ना काही अंगाने वेगळे नी विशेष होते. या व्याख्यानादरम्यान दाखवलेली बहुतांश चित्रे ही रामायणावर आधारीत होती. मग तो १२-१३व्या शतकांतील चित्रांचा काळ असो, मुघल / अकबरी काळ असो की अर्वाचीन कालखंड असो. अकबरी चित्रपद्धतीत सचित्र रामायण तीन वेळा लिहिले गेले. त्यातील चित्रे त्यांनी दाखवली. मुघल पद्धतीचे पोशाख, जिरेटोप घातलेला राम वगैरे चित्रे अतिशय रोचक होती व माझ्यासारख्याला लगेच लक्षात येणारी होती. मात्र जेव्हा शेखसाहेबांनी वृक्ष चितारण्याची पद्धत, हळू हळु समाविष्ट होत गेलेला नॅचरलिझम, काही पौराणिक चित्रांतील यथार्थचित्रण(जसे एका चित्रात दशरथ राजाला पायस देणारा अग्निपुरूष इतका वेगळा - यथार्थ- आहे तर त्याच काळात नेहमीच्या अकबरी शैलीतील अग्निपुरूष बर्‍यापैकी साच्यातील आहे) आदी बारकावे दाखून द्यायला सुरूवात केली तसतसे अनेक फरक लक्षात येऊ लागले. केरळातील एका मंदीरातील रामजन्माचे मोठ्ठे भित्तीचित्र त्यांनी दाखवले. या चित्रात कौसल्या रामाला जन्म देताना व्यवस्थित दाखवली आहे. पाय फाकवून ती बसली आहे व तिच्या योनीमार्गातून रामाला बाहेर काढले जात आहे असे ते राजजन्माचे चित्रण. ना तत्कालीन ना सद्यकालीन सामान्य प्रजेला त्या चित्रणात काही विकृत दिसले ना त्यांच्या भावना वगैरे काही दुखावला. किंबहुना आपल्या दैवताच्या जन्माचे इतके "स्वच्छ व स्पष्ट" चित्रण करणारे हे जगातील एकमेव चित्र असावे असा दावा शेख करतात. बाकी एका शैलीत रामाला नेहमी मिशा व डोक्यावर जटा दाखवल्या असत हे दाखवून देत रानातल्या रामाला दाढी करायला रेझर कुठून मिळाणार अशी ग्राह्य शंका तत्कालीन चित्रकाराला आली असेल (हे मेवाड रामायण इथे बघता येईल. शेवटच्या रावण वधाचे - रावणाच्या उडत्या मुंडक्याचे - "अ‍ॅनिमेशनयुक्त'' चित्रण नक्की बघा, शिवाय शेवटून चौथेही. त्या कलेक्शन विषयी एक लेख इथे गार्डिअयनमध्ये) किंवा एका चित्रात रावणाचा घरातील पोशाख व सीतेसमोर जातानाचा चकाचक पोशाख फाखवणारे तत्कालीन चित्रकार यांच्यावर मिश्मिल टिपण्यासह हे व्याख्यान फुलले होते. त्यांनी एका उदाहरणात नल-दमयंतीमधील नल हा अदृश्य असतो त्याचे चित्र दाखवले. रेशांच्या वापराशीवाय केवळ पोत बदलून तो अदृश्य नल चितारला आहे. तर एका चित्रातला हरिणाचे रूप घेतलेला मारिच बघण्याचा अ‍ॅगल बदलला की खरोखर बॅगग्राऊंडमध्ये मिसळून जातो आदी प्राचिन चित्रकारांच्या प्रतिभेचे रूपही दाखवले.

थोडक्यात सांगायचं तर समाजातील घटना, तत्कालीन रूढी, सामान्य जन यांचा आणि चित्र-भाषेचा संबंध त्यांनी या व्याख्यानात दाखवला (असे मला वाटते). त्याच बरोबर विविध शैलींचा एकमेकांवरील प्र॑भाव, सामाजिक व राजकीय बदलांबरोबर शैलींतील बदलांचा प्रवास, संतसाहित्य, सुफीसाहित्य आदिंचा चित्रभाषेवरील प्रभाव आणि एकूणच "व्यक्त होण्यासाठी" चित्रभाषेचे पारंपरिक भारतातील महत्त्व व भुमिका याभोवती फिरणारे हे व्याख्यान माझ्यासारख्या नवख्या साठी माहिती + कुतुहलाचे भले मोठे दालन उघडून गेले हे नक्की!

(ही समीक्षा नाही. या प्रतिसादातील मते ही अर्थातच मला समजलेल्या भाषणावर आधारीत आहेत. माझी अगाध चित्रमर्यादा आणि ते मांडायची मर्यादा या चाळण्या या लेखनाला आहेतच. एकुणच विषयाचा नी मिळालेल्या माहितीचा प्रचंड आवाका नी समोर माझे फुटके भांडे यांचा अल्पसा मेळ होऊन उरलेली ही गोळाबेरीज. पिटातील शेवटाच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकापर्यंत पोचलेले काही, इतपतच मर्यादीत महत्त्व या प्रतिसादाला द्यावे ही विनंती.)

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

अतिशय रोचक माहितीबद्दल अनेकानेक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सविस्तर वृत्तांताबद्दल धन्यवाद. व्याख्यानाची सुरुवात अनेकांना कंटाळवाणी वाटली म्हणून कळलं. खरं तर व्याख्यानाचा गाभा त्यात होता. 'कथासरित्सागर' आणि 'बृहत्कथा'विषयीचे अनेक तपशील नेटवर मिळतील. व्याख्यानातल्या मुद्द्यांनुसार शेखांना अधोरेखित करायचे होते ते असे काही तपशील होते -

  1. संस्कृताऐवजी पैशाची म्हणजे पिशाच्चांच्या भाषेत लिहिल्यामुळे राजानं कथा नाकारली, पण सर्वसामान्यांपर्यंत (अगदी प्राण्यांपर्यंत) ती पोहोचली. मग राजाला दखल घ्यावीच लागली.
  2. अनेक निवेदकांनी एकच गोष्ट आपापल्या पद्धतींनी सांगितली.
  3. निवेदक शापित होते. गोष्ट लोकांना सांगितली तरच त्यांना सुटका मिळणार होती.
  4. कथेतले अनेक तपशील आज अशिष्ट/अश्लील मानले जातील असे आहेत.
  5. कथेला शैव परंपरा आहे (मूळ निवेदक शंकरच आहे) पण नंतर वैष्णवांनीही ती आपली मानली. नंतरच्या व्याख्यानातले पर्शियन चित्रकार -> अकबर -> भारतीय चित्रकार -> त्यांनी शैलींचा मेळ घालून नव्या उपशैलींना जन्म देणं वगैरे मुद्दे हे ह्या परंपरावैविध्य आणि परक्या गोष्टींना आपलं करण्याशी संबंधित होते.
  6. मूळ कथा पूर्ण स्वरूपात काय आहे हे कुणीच सांगू शकत नाही; वेगवेगळ्या अर्थनिर्णयनांमधूनच अंदाज बांधावे लागतात.

वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खरं तर व्याख्यानाचा गाभा त्यात होता

Sad

मला मुळात छापिल इंग्रजीतून लिहिलेले वाचून दाखवताना होणारे कृत्रिम चढउतार ऐकताना त्रासही होत होता आणि नीटसे कळातही नव्हते. तो भाग कंटाळवाणा असण्यापेक्षा अश्या (काहिशा नीरस) अभिवाचनाने क्लीष्ट झाला होता. त्यापेक्षा तो सारांश आपल्या नैसर्गिक भाषणात त्यांनी सांगितला असता तर आवडले असते असे आता पश्चातबुद्धीने वाटते. त्यांची नॉर्मल भाषण शैली रंजक आहे.

असो.

बाकी एकुणात लागलेला अर्थ ठीके की नैच? त्यावरही वेळ होईल तसा प्रकाश टाकावा ही विनंती

बाकी काही प्रतिथयश चेहरे या पहिल्या वाचनाच्या वेळी फोन आला असे निमित्त करून एकेक करून बाहेर जाताना दिसल्यानंतरही थांबल्याचं सार्थक झालं हे मात्र खरं! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोचक माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषणात आलेले आणखी काही मुद्दे -

  1. अजिंठ्यासारख्या ठिकाणी एकाच चित्रात किंवा जवळपासच्या चित्रांत अनेक कथनं आहेत. चित्रं चांगल्या स्थितीत असताना जातककथांशी परिचित समाजाला ती पाहून समजत. त्यामुळे स्थिर चित्रांमध्येही गुंतागुंतीची कथनं गुंफलेली असण्याची लोकांना तेव्हा सवय होती.
  2. एकाच चित्रात एकच व्यक्तिरेखा अनेकदा दाखवण्याची पद्धत होती. त्याद्वारे चित्राच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे प्रसंग चितारले जात आणि त्यातून गोष्ट तयार होई. ह्यात रेखाटलेली व्यक्ती यथार्थ शैलीत असली तरीही कथनशैली अर्थातच यथार्थ नसे, कारण एकाच ठिकाणी (चित्रात) अनेक काळ आणि त्या काळात घडणारे प्रसंग दिसत. म्हणजे अभिजात पाश्चात्य कथनशैलीतली युनिटी पाळली जात नसे.
  3. पाश्चात्य परस्पेक्टिव्हचे नियम पाळले जात नसत. त्याउलट, चित्रातल्या कमी महत्त्वाच्या घटकांविषयीचं प्रेम इतकं असे की त्यांचं चित्रणदेखील अतिशय बारकाव्यानं केलं जाई.
  4. तसाच मुद्दा राक्षस किंवा खलनायकांविषयीचा होता - त्यांचंही चित्रण प्रेमानं केलं जाई. त्यामुळे ते भयंकर वगैरे वाटत नसत तर उलट गोड किंवा आकर्षक वाटत असत. हा धागा त्यांनी सहिष्णुतेशी जोडला. (असाच काहीसा मुद्दा भरताच्या नाट्यशास्त्रातही आहे.)
  5. अदृश्य नल - ह्याच्या चित्रणासाठी रेखाटन (ड्रॉइंग) वापरलं होतं. साधारणतः चित्राला (पेंटिंग) जो उच्च दर्जा असतो तो ड्रॉइंगला नसतो. इथे हा एक प्रकारचा जातिभेद बाजूला ठेवून चित्रातल्या नलाला रेखाटनातून दाखवण्यामध्ये कल्पकता आणि चित्रसहिष्णुता दोन्ही दिसतात.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गुलाम महम्मद शेख ह्यांची काही चित्रे निदान आंतरजालावर सुधीर पटवर्धन शैलीतली दिसत आहेत, नल-दमयंतीच्या ज्या चित्राबद्दल चर्चा चालू आहे त्याचा दुवा मिळेल काय?

एकाच चित्रात एकच व्यक्तिरेखा अनेकदा दाखवण्याची पद्धत होती. त्याद्वारे चित्राच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे प्रसंग चितारले जात आणि त्यातून गोष्ट तयार होई. ह्यात रेखाटलेली व्यक्ती यथार्थ शैलीत असली तरीही कथनशैली अर्थातच यथार्थ नसे, कारण एकाच ठिकाणी (चित्रात) अनेक काळ आणि त्या काळात घडणारे प्रसंग दिसत. म्हणजे अभिजात पाश्चात्य कथनशैलीतली युनिटी पाळली जात नसे.

कंटिन्युअस नॅरेटिव्ह ह्या शैलीशी हे थोडेफार जुळते मिळते असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्याच्या निमित्ताने आणखी काही चित्रं, गूगल करून पाहिली. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुलाम महम्मद शेख ह्यांच्या बद्दल काहीच माहिती नव्हती, ह्या लेखाच्या निमित्ताने आणि त्यामुळे अंतरजालावर केलेल्या शोधात त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली त्या साठी धन्यवाद ऋषिकेश.

(कार्यक्रमाला माधुरी पुरंदरे आल्या होत्या हे ऐकून खूप छान वाटलं, अर्थात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी हुकली ह्याचं वाईटही वाटलं. पण असो, पुन्हा कधीतरी!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! सुरेख वृत्तांत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0