अलीकडे काय पाहिलंत - १३
(जुन्या धाग्यात १००च्या जवळपास प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)
==========
विकांताला "मिस्टर & मिसेस" नावाचं नाटक पाहिलं. मधुरा वेलणकर आणि चिन्मय मांडलेकर यांचं हे नाटक. चिन्मय मांडलेकर हा एकेकाळी प्रतिथयश मात्र आता बेकार असलेला नट आणि त्याची कमावती बँकेत काम करणारी बायको यांचे आयुष्य संघर्षमय झाले असते. त्यात चिन्मयला घटस्फोट घ्यावा वाटु लागतो. अशावेळ ईत्याचा एक जुना निर्माता मित्र त्याला त्याच्या घटस्फोटाचे छुपे चित्रीकरण करून रीअॅलिटी शो करायचे व त्या बदल्यात त्याला दिवसाला २ लाख रुपये द्यायचे कबूल करतो. हिरो ती ऑफर स्वीकारतो. मग काय होते हे सांगणारे हे नाटक आहे. नवरा बायकोचं नातं, एकुणच समाजात वाढलेली बाजारू प्रवृत्ती आणि रिअॅलिटी शो अशा तीन गोष्टींच्या आधारावर एक रोचक कथानक देण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकाच्या पुर्वार्धात कथा इतकी नेमकी फुलते, नाट्य योग्य तितके समोर येते आणि उत्कंठा वाढत जाते. एकुणच विषयाचा गुंता, वेगळा विषय, चांगला अभिनय यांची सांगड घालत पुर्वार्ध रंगतो. उत्तरार्धात मात्र लेखक भरकटत जातो. हा गुंता कसा सोडवावा हे न कळल्याने की अजून नवे काय द्यावे हे न सुचल्याने की काय कोण जाणे पण नाटक दिशाहीन होते. नुसते दिशाहीनच नाही तर भडक संवाद, प्रखर रंगयोजना वगैरेसोबत पात्रेही ओरडु लागली की अपेक्षित 'डार्कनेस' उथळ वाटत जातो.
एकुणात संगीत कर्कश्श आहे. चिन्मय मांडलेकर व मधुरा वेलणकरही बर्यापैकी नाटकी संवाद म्हणातात विशेषतः दुसर्या भागात. मात्र हा दोष त्यांच्यापेक्षा मला लेखकाचा वाटला. नेपथ्य ठिकठाक आहे. छुप्या क्यामेरांमध्ये काय दिसतेय हे स्टेजच्या दोन्ही बाजुला लावलेल्या LED टीव्हीवर दिसत रहाते. पण ते व्यावसायिक रिअॅलिटीशोच्या दर्जाच्या मानाने अगदीच 'शेडी' वाटते. (नी ती स्क्रीन बहुदा पहिल्या ८-१० रांगांनाच नीट दिसावी)
थोडक्यात अगदीच करण्यासारखे काही नसेल तर नाटक बघता येईल, अन्यथा टाळूही शकता (५/१०)
-------------
चांगल्या कवितांना विचित्र संगीत देऊन त्याची वाट लावल्याचं तुम्ही अनेकवार पाहिलं/ऐकलं असेल. मात्र आपल्या भल्या-बुर्या चाली जेव्हा संगीतकार-गायक लोकांसमोर सादर करायच्या ठरवतो - आणि तेही मुक्ता बर्वेसारख्या अभिनेत्रीच्या शेजारी उभे राहून - तो कवितांचा कार्यक्रम कंटाळवाट्या गाण्याचा ऑर्केस्ट्रॉचे स्वरूप कसे घेतो हे पहायचे असेल तर "रंग नवा" हा कार्यक्रम बघावा.
मुळात कवितावाचन हा ट्रिकी प्रकार. त्याच्या सादरीकरणाकर विविध प्रयोग होत असतात हे खरे. पण "कधीतरी वेड्यागत" सारखे उत्तम अभिनेते - व ठिकठाक गायक जेव्हा कवीच्या सोबतीने त्याचे 'नाट्यरुपांतर" सादर करतात तेव्हा ते अतिशय छान वठते. (इतके की मी तो कार्यक्रम दोनदा पाहिला आहे). दुसरीकडे एका जागी बसून "ओवी ते हायकू" सारखा कविता मोजक्या वाद्यांसकट गाऊन दाखवायचा कार्यक्रमही तुफान आवडला होता. त्यामुळे या 'रंग नवा' ला मोठ्या अपेक्षेने गेलो होतो.
मिलिंद जोशी यांनी विविध कवींना कवितांना चाली दिल्या आहेत. काही चाली चांगल्या आहेत, काही ठिक तर क्वचित काही भयंकर. मात्र सर्व चाली या एकाच साच्यातील वाटतात. बरं हे ही एकवेळ समजु शकतो (डॉ.कुलकर्णींच्या नै का सगळ्या चाली एकाच मापात असतात - सहन करतात लोकं) पण जेव्हा हा संगीतकार मुद्राभिनय - प्रसंगी कायिक अभिनय करत - कविता गायला लागतो तेव्हा पितळ उघडं पडतं.
कवितांना चाली लाऊन त्या गाउ नयेत वगैरे माझं मत नाही. मात्र चाली देताना कवितांना एक अंगभूत ताल असतो तो जपावा असे वाटते. इथे प्रत्येक कवितेला चाल लावताना आपली गायकी दिसावी अश्यापद्धतीने चाली लागल्या आहेत. मग त्या कवितेचं सौंदर्य चालींमुळे अधिक उठावदार होण्याऐवजी वाद्ये, गायक, सूर यांच्यातीलच एक भाग ते शब्द होऊन जातात. त्यात जेव्हा तोच संगीतकार मुक्ताबर्वे सोबत लाडिक वगैरे कविता सादर करतो तेव्हा ते भेसूर दिसतं, तर तोच संगीतकार जेव्हा सुत्रसंचालक म्हणून 'घुम्मड' सारख्या शब्दांवर १०-१० मिनिटे नीरस बोलतो किंवा तेच ते बोलतो तेव्हा आपल्याला जांभई आवरत नाही!
प्रत्येक दोन कवितांमध्ये किमान ३-४ मिनिटांचं संथ सूत्रसंचालन - ज्यात ही चाल मला कशी स्फुरली नी हा शब्द कसा वेधक आहे बघा वगैरेच जास्त.
मुळात कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमाला कवितांशी संबंध नसलेले लोक बहुसंख्येने येतील असा काहिसा गैरसमज करून हा कार्यक्रम बांधलेला दिसतो. (नशीब यमक म्हणजे काय पासून शिकवणी सुरू होत नाही). आम्हालाच काय ती कविता दिसते आणि आम्हीच कसे कवितेचे सौंदर्य तुमच्यापर्यंट पोचवत आहोत याचेच कवतिक - तेही स्वतःच करायचे हे काही रुचले नाही.
मुक्ता बर्वेचा चोख पर्फॉर्म्न्सही या नीरस प्रकाराला सावरू शकला नाही.
तुम्हाला कविता आवडत असतील तर-तरी- या कार्यक्रमापेक्षा त्या घरी बसून वाचा हा सल्ला! :P
काही चांगल्या आहेत हे उगाच
काही चांगल्या आहेत हे उगाच बोटचेपेपणे म्हणतोहेस.
:) खरंय
मला त्या कार्यक्रमात
'पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा
पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा'
याला दिलेली चाल/सादरीकरण जरा बरे वाटते. (सादरीकरणात या गाण्याच्यावेळी दिलेली प्रकाश योजना मात्र कल्पक होती विशेषतः मृत्यू म्हणजे जीवनाचा एक तुकडा या शेरावरची) हा नी मुक्ता 'नट' सादर करते हे दोनच काय ते अहो रुपम अहो ध्वनीम् करणारे उंट (नी गर्दभ) ज्या वाळवंटात फिरताहेत त्यातील दोन ऑअॅसिस!
बाकी वरील प्रतिसादाशी सहमत!
कट्टा ऑन दि रॉक्स
याउलट दोन आठवड्यानंतर पाहिलेला, तिशीदेखील न उलटलेल्या काही मुलांच्या ग्रुपने केलेला 'कट्टा ऑन द रॉक्स' हा त्यांच्याच कवितांचा कार्यक्रम दृष्ट लागावा असा झाला. या असल्या तथाकथित प्रोफेशनल्सच्या या 'नव्या रंगा'ला पार धुवून काढणारा.
कट्टा ऑन दि रॉक्स २२लाच परत झाला, परत होइलच, जमेल त्यांनी पहावा अशी सुचना.

अजून पाहिलेली नाही. पाहायचीय.
'ऑरेन्ज इज दी न्यू ब्लॅक' पाहतेय. अजून पहिलाच सीझन चालू आहे, पण बेहद्द आवडतेय. 'माय यीअ इन दी विमिन्स प्रिझन' हे वर्जिनल पुस्तकही उतरवून वाचायला घेतलंय. मजा येत आहे.
अमेरिकन तुरुंग, उच्चवर्णीय(आणि वर्गीय) अमेरिकन मुलीला त्यात बसणारे धक्के, येणारे अनुभव, येणारं शहाणपण - असा 'काहीसा' कमिंग ऑफ एज ऐवज आहे. रोचक भाग: तिरका विनोदी नजरिया. लैंगिकतेच्या विविध पैलूंना कसलाही बडेजाव न माजवता सहजगत्या केलेला स्पर्श. बिंज वॉचिंग न करता पुरवून पुरवून पाहतेय. :)
"हायवे" नामक चित्रपट सीडी
"हायवे" नामक चित्रपट सीडी आणून पाहिला. आलिया भट वगैरे मंडळी असल्याने फार अपेक्षा नव्हत्या. पण चित्रपट फारच चांगला निघाला. हिमाचल प्रदेश चे आणि निरमिराळ्या रस्त्यंचे चित्रिकरण अप्रतिम(पण यशराज वगैरे च्या चित्रपटात एरवी असते तसे फिल्मी नाही), लगेच उठून हिमाचलला निघावे असे वाटत होते! तेवढे ते चित्रिकरण पाहण्यासाठी तरी निदान हा थेटरात पाहायला हवा होता असे वाटले.
सोबतच टू स्टेट्स.. पण पाहिला. आलिया भट चा सलग दुसरा शिणेमा..हे राम असे म्हणण्याची वेळ येईल असे वाटले होते, पण तो ही अगदी वाईट नाही एक्दा बघणेबल निघाला.
'I will never be hungry again!'
काल 'गॉन विथ द विंड' पाहिला. अर्थातच आवडला. थोडासा ड्रामाटिक वाटला. पण तो त्या काळच्याप्रमाणे तसाच असावा. चार तास म्हणजे खूपच लांबलचक होतो पिक्चर. अगदी इंटरमिशनची पाटीसुद्धा दीड मिनिट दिसत राहाते. मी पुस्तक वाचलं नाहीय, त्यामुळं पुस्तक अधिक आवडलं की चित्रपट याबद्दल काही बोलू शकत नाही. सर्वात जास्त लक्षात राहिली ती मॅमी. एकाच घरातल्या तीन पिढ्यांची साक्षीदार आणि काहीशी फटकळ, प्रसंगी मालकिणीलाही फटकावणारी ही बया आवडली. एका प्रसंगात दारूगोळ्याने भरलेले गोदाम स्फोटात उडते ते पाहून आपल्याकडे इतक्या नीटसपणे बारकाव्यांसह प्रसंग अभावानेच चित्रित होतात असं वाटलं. आणि त्यातले ते भयानकपणे आतमध्ये बखरम घातलेले गाऊन पाहता त्यात वावरणं किती कठिण आहे!
काही आठवड्यांपूर्वी 'माय फेअर लेडी' पाहिला. ती फुलराणी (मी अमृता सुभाषचं पाहिलंय) त्याच्या पासंगालाही नाही असं वाटलं. आज सकाळी भक्ती बर्वेचाही 'तुला शिकविन चांगलाच धडा' चा यूटुऊबवर व्हिडिओ पाहिला, तोही तितका नाही पटला.
बाकी दोन्ही पिक्चरमधल्या हिरॉईन्स पाहून या काही खात असाव्या का असा प्रश्न पडला!
मला वाटतं मॅमीचे काम
मला वाटतं मॅमीचे काम करणार्या नटीला अॅकेडमी का कोणतं तरी अॅवर्ड मिळालं आहे. पुस्तक फारच सुंदर आहे. कुठेतरी बॅटमॅन म्हणालेला की १०० पानानंतर खरा वेग येतो. असावा, माझीही १२० च पाने वाचून झालीयेत. पण ते खेड्यातलं आयुष्य अतिशय मोहक चितारले आहे. आता अटलांटातील शहरी जीवन सुरु होते. मलाही पूर्ण वाचायचे आहेच. पण जितकं वाचलं तितकं खूप आवडलं. विशेषतः व्यक्ती-स्थलसापेक्ष बारकावे (डिटेल्स)
सिनेमा तर फार आवडला आहे. हेडस्ट्राँग स्कार्लेट. बाय द वे काही ज्योतिषविषयक फोरम्स वरती वाचले आहे की - लेखिका मार्गरेट मिशेल ला ज्योतिषाची माहीती होती अन
स्कार्लेट = हेडस्ट्राँग मेष
स्कार्लेटची आई - अथक काम करणारी बिझीबी कन्या
वडील - स्थावरजंगम मालमत्तेची उलाढाल करणारे वृषभ
अॅशले - गंभीर मकर
व र्हेट - फ्लेमबॉयंट सिंह
मेलनी - प्रेमळ कर्क
पात्रांची अशी काहीशी अॅस्ट्रॉलॉजीकल ओळख आहे.
हो मॅमी ही अॅकेडमी पुरस्कार
हो मॅमी ही अॅकेडमी पुरस्कार मिळवणारी पहिली आफ्रिकन-अमेरिकन स्त्री आहे. तिचं दुर्दैव असं की तेव्हाच्या वंशभेदाच्या कडक नियमांमुळे तिला चित्रपटाच्या प्रिमिअरला जाता आले नाही.
मी पुस्तक वाचले नाही, पण जर स्कार्लेट मेष राशीची असेल तर ते मनोमन पटावं. हवं ते करणारी आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी घेणारी अशी तिची व्यक्तीरेखा आहे. मॅमी तिला ज्याप्रकारे कोर्सेट घालायला मदत करते, त्यावरून नीधप ने मायबोलीवर लिहिलेला लेख आठवला. वर्षानुवर्षे बांधलेल्या कोर्सेट मुळे कंबरेची हाडे म्हणे वाकडी होत. तिला बाळंतपणानंतरची २०इंच झालेली मंबर १८.५ इंच काही करून करायची असते.
माझ्या माहितीप्रमाणे तिनंच
माझ्या माहितीप्रमाणे तिनंच प्रिमिअरला जाणं नाकारलं. बहुतेक विश्वास पाटील किंवा यशवंत रांजणकर यांच्या 'नॉट गॉन विथ दी विंड'मध्ये हा संदर्भ आहे. चूभूदेघे.
पुस्तकाबद्दल काय बोलावे? इतक्या पॅशनेट आणि जोरकस चितारलेल्या व्यक्तिरेखा मिळणं कठीण. मी ते पुस्तक प्रेमकथा म्हणून वाचलं. झपाटून टाकणारा अनुभव होता. तेव्हा स्कारलेटपेक्षाही तिच्या चाकोरीबाहेरच्या बंडखोर व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडलेल्या बेदरकार बटलरनं वेड लावलं होतं.
नंतर पुन्हा वाचलं, तेव्हा मात्र गुलामगिरी, तिचं तत्कालीन दक्षिणी अमेरिकेतलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान, ती जीवनपद्धती, ती उलथली जाण्यातली अपरिहार्यता आणि तरीही त्यातलं काही पिढ्यांनी होरपळून निघणं, स्त्रियांचं बंदिस्त आयुष्य - हा गोष्टीच्या मागचा विस्तीर्ण पट प्रकर्षानं जाणवला. सभ्यपणाच्या तत्कालीन कल्पनांपायी समाजानं घातलेली बंधनं उधळून देणारी बेछूट स्कारलेट तेव्हा जास्त लक्षात राहिली.
पुस्तकांवर निघालेल्या कितीतरी सिनेमांपेक्षा 'गॉन विथ दी विंड' सरस आहे. पुस्तकातलं बहुधा विलचं एक आख्खं पात्र कमी करूनही त्यांनी कथेत काहीही तडजोड केल्याचं जाणवत नाही, हे लक्षात आल्यावर मला पटकथा लिहिणार्या माणसाबद्दल आदर वाटला होता. पण आपल्या मनातली पात्रं आणि वर्णनं सगळीच्या सगळी कशी आपल्याला हवी तशी उतरणार? शेवटी आपलं कल्पनाविश्व ते आपलं कल्पनाविश्व. ते केव्हाही अधिक गडद, अद्भुत, रोमांचक, तीव्र. नाही म्हणायला एक सिनेमातल्या मेलानीचा अपवाद. तिच्यासारखी सोज्ज्वळ चेहर्याची बाई निर्मात्यांना मिळू शकेल, यावर माझा विश्वास नव्हता सिनेमा बघेस्तोवर.
'विंड' पुन्हा वाचायला हवे!
विकीवरल्या माहितीप्रमाणे
विकीवरल्या माहितीप्रमाणे जॉर्जियामध्ये तिला प्रवेश नाकारला. अॅटलांटालाही तसे होणार म्हटल्यावर क्लार्क गेबलने प्रिमिअरवर बहिष्कार टाकला पण तिने त्याची समजूत घातली. पुस्तक आणि चित्रपट्/मालिका यामध्ये पुस्तक अधिक सरस ठरतं हा माझा अनुभव आहे.
गुलामगिरी, तिचं तत्कालीन दक्षिणी अमेरिकेतलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान, ती जीवनपद्धती, ती उलथली जाण्यातली अपरिहार्यता आणि तरीही त्यातलं काही पिढ्यांनी होरपळून निघणं, स्त्रियांचं बंदिस्त आयुष्य -
हे चित्रपटात दिसतं, ते मुळातून वाचायला हवं ते पाहातानाच जाणवलं. स्कार्लेट आधी स्वार्थी आणि नंतर परिस्थितीला हार न जाणारी, प्रसंगी कष्ट करणारी कुटुंबप्रमुख आणि नंतर पैसाच सर्स्व माणून बेदरकार वागणारी अशी घडत जाते. हे तिच्या बहिणींच्या बाबतीत घडत नाही. कदाचित त्या स्कार्लेट इतक्या वाईट परिस्थितीला सामोर्या जात नाहीत म्हणूनही असेल. मेलनी ही खरोखरीच सात्विक. तो रोल करणारी स्त्री चेहर्यावरूनच सात्विक म्हणतेस ते अगदी खरं.
मी गेम ऑफ थ्रोन्स आणि संपवेन, मग 'विंड' चा विचार करेन. :-)
'रामानुजन' - झलक
श्रीनिवास रामानुजन या गणितज्ज्ञावर तमिऴ-इंग्रजी चित्रपट येत आहे. त्याची झलक - https://www.youtube.com/watch?v=mUXwGX70n4Y
'चार अध्याय'
कुमार शाहनीचा 'चार अध्याय' नावाचा सिनेमा हिंदी असल्याने सबटायटल्स वाचायची झंझट नाही पडद्यावर काय सुरु आहे ते कळेलच म्हणून पाहिला तर ताकास तूर लागली नाही . रवीन्द्रनाथ टागोरांच्या कादंबरीवर आधारित एन. एफ. डी .सी.व दूरदर्शन निर्मित १९९७ मध्ये तयार झालेल्या या सिनेमात सदोष ध्वनी , अॅबरप्ट एडिटिंग आणि काव्यमय संवादामुळे मेंदूत दलदल निर्माण झाली . अपरिचित कलाकार त्यांचे अनोळखी आवाज आणि रँडम अँगलने शूट करणारा कॅमेरा , यामुळे सतत हे वाक्य कोणी कोणाला म्हटले आहे , हे रहस्य कायम राहून एकंदरीत तात्पुरता विरक्त भाव निर्माण झाला . नायिका लहर लागली कि बंगालीत उतारे वाचायची नाहीतर अचानक ट्रामने अज्ञात स्थळी जायची .त्या प्रवासातही ती वाचनाची पराकाष्ठा करताना दिसे, नवल म्हणजे ती फक्त चढताना दिसे उतरताना आढळली असेल तर शप्पथ ! सुंदर कलकत्ता साड्या नेसून एका प्रचंड बंगल्यातल्या एका भागात , वरच्या मजल्यावर, त्या बंगल्याचे यच्चयावत दरवाजे सताड उघडे टाकून एकटीच रहायाची .तिच्या घरी कोणत्याही प्रहरी कोणीही यायची पद्धत दिसली . बंगल्याच्या लांबच लांब कॉरीडोरमधून निरुद्देश भटकून कंटाळली कि ती अप्रतिम निसर्गात बागडून यायची . ती एक स्वातंत्र्यसैनिक असल्याने मीटिंगनंतर उगाच एखाद्या बांधवाचे न दुखणारे डोके चेपून द्यायची किंवा त्यांना चषकातून काहीतरी पेय प्राशनाला द्यायची . रुचीपालट म्हणून क्वचित एखाद्या ब्रिटीशावर गोळीबार करायची, तेंव्हा तिला ५/६ लोक पकडताना दिसायचे पण नंतर तिला कधीच कसलीच शिक्षा होताना आढळले नाही . विरंगुळ्याचे प्रेमालाप करता यावे म्हणून नायकाची पण सिनेमात योजना आहे. तो केवळ नायिकेच्या आकर्षणामुळे चळवळीत भाग घेत असतो . अधून मधून लूटमार , दंगे आणि उगीच धावणारे लोक दिसले . दोन राजेशाही पोशाखातले लोक अकारण लुटुपुटीचे तलवारयुद्ध खेळून जीव रमवताना दिसले . नायक , नायिका एक/ दोन गावात लपाछपी खेळतात मग एकदाची नायिका मरून जाते आणि आपण सुटतो .
कादंबरीत सुभाषचंद्र बोस आणि टागोर यांच्यातले वैचारिक द्वंद्व आहे म्हणे . अंध देशभक्ती आणि नेत्यांवरची अंधनिष्ठा याबद्दल टागोर साशंक होते . रटाळ काव्यमय संवादातून यातले काही समजले असेल तो अंतर्ज्ञानी असेल यात काहीच शंका नाही .
माधुरी मिडल क्लास उर्फ : डोक्याची भजी
साराभाय Vs साराभाय ह्या हिंदी मालिकेचा मराठी अवतार पाहिला.
आणि तिडिक मस्तकी गेली. "माsssssधुरी" असे शब्द तोंडून उमटले.
अनेक लेवल वर आणि अनेक प्रकारे ही मालिका वारली आहे. त्यापैंकी काही-
१. Mood - मूळ मालिका ही अतिशय हलकी फुलकी आणि निव्वळ विनोदी अंगाची होती. त्यातले विषय बरेचदा गंभीर असले (नातलगांचा मृत्यू, अपहरण किंवा आजार) तरीही मालिकेच्या संवादांची आणि कलाकारांच्या अभिनयाची पठडी विनोदीच होती. मा-मि-क्ला मध्ये ह्या संकल्पनेलाच सुरूंग लावला आहे. टिपिकल डेली सोप असल्यामुळे त्यात ढॅण-ढॅण-ढॅण आवाजवाले सीन, भयाकारी क्लोजअप्स इ. आयुधं बिन्दास्त वापरलेली आहेत.
२. 'खानदानी आणि उच्चभ्रू घर' ह्या संकल्पनेविषयी दरिद्रता- एका खानदानी आणि उच्चभ्रू मराठी माणूस कसा असेल, ह्याविषयी लेखक/दिग्दर्शकाला अजिबात आयडिया नाहिये. हे तथाकथित उच्चभ्रू लोक जे काही बोलतात्/करतात ते झेपत नाही. बरं, त्यांना नवश्रीमंत बनवून त्यांची टिंगल केलीये असंही नाही.
३. पात्रं = ह्यातली माया आणि तो जो कोणी रोमेश आहे, ते डोक्यात पार आतपर्यंत जातात. मूळ साराभाय मधला रोसेश जसा त्याच्या वडलांच्या डोक्यात जातो, अक्षरशा तसाच हा रोमेश आपल्याला ताप देतो.
आणि माया हे पात्र करणारी नटी ओरडते, किंचाळते पण ... जाऊ दे.
आणि अतुल परचुरे बाप? निव्व्ळ नटाची जाडी हा निकष ठेवून जर कास्टिंग करायचं होतं, तर बाकी कोणीच मि़ळालं नाही? कुच जमा नही.
नक्की ही मालिका बनवून मूळ 'साराभाय' च्या अस्तित्वाला अशा डागण्या का दिल्यात, कळत नाही.
इथे एक अतिक्रोधित स्माय्ली टाकायचा होता, असो>
ब्रॉड अँड हाय
डेनिस डी-वेंड्रा यांची ओळख करुन देणारा 'ब्रॉड अँड हाय' हा स्थानिक वाहिनीवरील कार्यक्रम पाहिला. retinitis pigmentosa या जेनेटिक आजारामुळे वयाच्या तिशीतच डेनिस यांना अंधत्व आलं. आज ते साठीचे आहेत. गेल्या तीस वर्षात नोकरीसोबत त्यांनी लाकूडकामाचाही छंद जोपासला आहे.
कार्यक्रमाचा दुवाः
http://video.wosu.org/video/2365281185/

डेनिस दोन वर्षे माझे मॅनेजर होते. ऑफिस व घर हा प्रवास बसने करणे (ऊन-पाऊस-थंडीसकट), ऑफिसात विविध मजल्यांवर जाणे येणे, ऑफिस पँट्री, रेस्टरुम वगैरे सहजपणे हाताळणे, विविध इंट्रानेट सिस्टम्स, इमेल, फोन (मोबाईल व डेस्क फोन) वापरणे, प्रेझेंटेशन्स, विविध व्हेंडर लोकांशी चर्चा व डील्स ही कामे रोज करावी लागतात. दोन वर्षांमध्ये एक-दोन आयटी सिस्ट्मस रिटायर होऊन नव्या सिस्ट्म्स आल्या, (आमच्यासारख्या तथाकथिक डोळसांना अजूनही नव्या सिस्टम्समध्ये कुठे काय शोधायचे कळत नाही!) ऑफिसच्या फ्लोअरचे रिनोवेशन झाले. या सर्व बदलांना डेनिस किती पटकन अॅडाप्ट झाले हे फारच जवळून पाहिले आहे. या सर्व कौशल्यासोबतच तीव्र स्मरणशक्ती आणि उत्तम विनोदबुद्धी हे आणखी सहज जाणवणारे गुण.
डेनिस यांच्या कामाचा दर्जा दाखवणाऱ्या वस्तूंचे नमुने
|
|
|
डेनिस यांचे संकेतस्थळः
http://blindwoodturner.com/
भाग्य
या व्यक्तीसोबत काम करायला मिळणं खरंच भाग्याचं आहे. त्यांना दररोज पाहताना आश्चर्याचे धक्के बसणे थांबत नाही. तीनचार वेळा कंपनी डिनरसाठी जेवायला बाहेर गेल्यावर माझ्या घराच्या वाटेवर त्यांचे घर असल्याने त्यांना घरी सोडायची जबाबदारी माझ्यावर होती. त्यांनी जीपीसएसप्रमाणे दिशादिग्दर्शन केले. उदा. मधल्या लेनमध्ये गाडी ठेव, चौथ्या एक्झिटनंतर तिसरा डावा घे, तिथे गेल्यावर रस्त्यांवर पाट्या नाहीत तर या अमुकतमुक फास्टफूड दुकानासमोरच्या बोळातून घे वगैरे.
जीपीएस असूनसुद्धा रस्ता चुकणाऱ्या आपल्यासारख्यांना हे चमत्कार थक्क करुन सोडतात. गेल्या अनेक वर्षात रस्त्यांवर झालेले बदल वगैरे गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे काही बोलायचे कामच नाही.
वाट पहाते सुनेची.
'वाट पहाते सुनेची' नावाचा 'माहेरची साडी' वगैरेंची आठवण करून देणारा मराठी सिनेमा योगायोगाने यूटयूबवर येथे अलीकडेच दिसला. नावावरून तो एक महान कौटुंबिक tear-jerker आहे असे वाटू शकेल पण चित्रपटाच्या दर्शनीच श्रीराम लागू, सुलभा देशपांडे, मोहन गोखले, टॉम आल्टर, मार्क झुबेर अशी नावे दिसल्याने पहाण्याचा धीर केला आणि एक सुखद धक्का बसला.
गोष्ट साधारणपणे 'संध्याछाया' प्रकारचीच आहे. १९७० च्या दशकातील सुरुवातीच्या वर्षांमध्ये हे वृद्ध दांपत्य जुन्या आठवणी काढत त्यांचे दोन्ही मुलगे केव्हा परत येतील आणि सुना-नातवंडे आणतील अशी वाट पाहात वेळ काढत आहे. थोरला ८ वर्षांपूर्वी डॉक्टर होऊन अमेरिकेस गेला आहे तेव्हापासून मधूनमधून येणार्या पत्रांखेरीज त्याच्याशी काही संपर्क नाही. धाकटा सैन्यामध्ये असून कायम कोठेतरी दूरवर असतो. दोघेहि लग्नाचे नावच काढत नाहीत. दोन्ही मुलांनी परत येऊन आईवडिलांसोबत राहावे अशी अशी वृद्ध जोडप्याची इच्छा आहे.
धाकटया मुलाच्या एका पत्रामधून त्यांना कळते की थोरल्याने अमेरिकेतच तिकडच्या मुलीशी लग्न केले आहे. पेइंग गेस्ट म्हणून जागेच्या शोधात त्यांच्याकडे आलेल्या तरुणाची - मोहन गोखले - बहीण लग्नाची आहे. वृद्ध जोडपे ठरविते की आपल्या धाकटया मुलाला ती करून घ्यावी.
एव्हढयातच पाकिस्तानशी १९७१चे युद्ध सुरू होते आणि त्यामध्ये धाकटा शहीद होतो. ह्यामुळे आईवडिलांना भेटण्यासाठी अमेरिकेतील मुलगा सपत्निक येतो खरा पण त्याच्या वर्तनाने आणि विचारांनी ते दुखावले जातात. (तो घरी न उतरता हॉटेलात उतरतो आणि आईवडिलांचे औपचारिक सांत्वन केल्यावर परत जाण्यापूर्वी भारतात sight-seeing ला निघून जातो. आपला परत येण्याचा कसलाहि विचार नाही हे तो आईवडिलांना स्पष्ट करतो.)
ह्या घटनांनी निराश झालेले आईवडील झोपेच्या गोळ्या घेऊन जगाचा निरोप घेतात.
कथानक घिसेपीटे आणि बहुचर्वित आहे हे खरे. मधूनमधून तो maudlin आणि melodramatic पातळीवरहि उतरतो पण वृद्ध जोडपे आणि अन्य सर्वांच्या अभिनयांमुळे चित्रपट निश्चित दर्शनीय झाला आहे.
हे सर्व मुद्दाम लिहिण्याचे कारण असे की १९७० च्या दशकात निर्माण झालेला आणि निश्चितपणे above average असलेला, लागू-देशपांडे-गोखले अशी नावे त्यात असलेला हा चित्रपट गेली ४० वर्षे कोठे होता? इतक्या वर्षांमध्ये त्याचे नावहि - कमीत कमी माझ्यातरी - कधी कानावर आले नाही असे कसे घडले? ह्या कोडयाचे उत्तर कोठे मिळाले तर वाचायची इच्छा आहे.
आज अचानक गाठ पडे हे गाणं मी
आज अचानक गाठ पडे हे गाणं मी चित्रपटात टीवीवर दोनदा पाहिलं आहे. (तरीही माझ्या घरी मराठी चॅनेल्स जवळजवळ लागत नाहीत असेच म्हणावे. बायको महिनाभर माहेरी गेली कि त्या काळात मी कधी कधी मराठी पाहतो.) थोडक्यात -झाकोळ (मी नाव विसरलो होतो.) आपल्याला पाहायला मिळेल, चॅनेलचे शेड्यूल पाहत राहा.
एक जबरदस्त भयपट
"आंधळी कोशिंबिर" हा एक जबरदस्त मराठी भयपट स्वखर्चाने, बाल्कनीतलं तिकीट काढून पाहिला.
मराठीमध्ये दर्जा नाही; निदान भयपट तर नाहितच नाहित ह्या समजास सणसणीत चपराक सदर चित्रपट देतो.
ओमेन, exorcist,exorcism of emily rose वगैरे आणि इतर अनेक सापडतील ते भयपट बिंधास्त पाहणे;
व एकटा रात्री घरी असलो तरी पाहण्याचा नेम न चुकवणे इतपत मस्ती मला चढली.
इथे मात्र चित्रपट पाहताना माझी दातखीळ बसली, पाचावर धारण वगैरे म्हणतात तशी अवस्था झाली.
मस्ती उतरली.घाबराघुबरा होउन मध्यंतरातच मी परतीचा रस्ता धरला. धूम्म घराकडे पळत सुटलो; चित्रपट अर्धवट सोडून.
ह्याला म्हणतात टेरर...दहशत.
चित्रपट सलग सहा सात आठवड्यांहून अधिक काळ कसा सुरु आहे ह्याचे आश्चर्य वाटले नाही.
बॉलीवूडातील अक्षय कुमारचे तीस मार खान , चांदनी चौक टू चायना, रामूचा "रामगोपाल वर्मा की आग" वगैरेला तोडिस तोड उत्तर माझ्या मायमराठीच्या फिल्लम इंडष्ट्रीनं दिलेलं आहे.
अर्थात ह्या भल्या प्रयत्नास चित्रपटाचे प्रमोशन्स, समीक्षण वगैरे करणार्यांनीही तितकीच चांगली साथ दिली आहे.
ते सर्व वाचून चित्रपट असा काही निघेल ह्याचा जराही अंदाज ह्या लोकांनी येउ दिला नाही. हल्का फुल्का, छान मनोरंजन करणारा, संयत, विनोदी बाजाचा वगैरे वर्णन ह्या लब्बाड्/खट्याळ्/मिश्किल लोकांनी केलं.
हे अर्थातच दर्शकांवर अनंत उपकार आहेत!
"प्रेक्षकांना हा एकदम वेगळाच,सुखद धक्का द्यायचा" अशा इराद्यात ही पत्रकार वगैरे मंडळीही सामील असावीत.
त्यांच्या ऋणाबद्दल उतराई म्हणून विशेष बक्षिसी द्यावी असे मला वाटू लागले.
पण निर्मात्यांनीच पब्लिकच्या वतीने हे ऋण व्यक्त करण्यासाठी advance मध्ये बक्षिसी पाठवून दिली असणार ह्याची खात्री आहे.
तस्मात, सर्व टीम "आंधळी कोशिंबिर" , त्यांना साथ देणारा मिडिया व चित्रपटास दाद देणारे जाणकार रसिक ह्यांना पुनश्च एकवार विनम्र अभिवादन.
अलिकडे काय पहाव लागल ... ( सिनेमासोबत )
आमच्या फिल्म क्लबमध्ये एक जर्मन भाषेतला संथ, गंभीर पण प्रेडीक्टेबल सिनेमा सुरु होता . माझ्या समोर बसलेली अंदाजे ६५ वर्षांची 'अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु ' म्हातारी मनात अनेक प्रश्नांचे वारूळ निर्माण करत होती . हिने नक्की कधी अंघोळ केली असावी ? हिच्याकडे फिल्म क्लबमध्ये स्क्रीनिंग होणाऱ्या सिनेमाबद्दल माहिती करून घ्यायला जर मोबाईल किंवा इंटरनेट आहे तर स्वच्छ धुतलेले कपडे घालायला आणि आंघोळीला साबण का नसावा ? हिने केस कुठे बर कापले असावे ? तिने सिनेमा सुरु असताना केस विंचरायला घेतल्याने तिच्याकडे कंगवा आहे हे कळले. एसी हॉलमध्ये ,वारा वादळ नसताना अचानक , सुमारे १० मिनिटे केस विंचरायचे कारण कळले नाही . तिने डोळ्यात अश्रू यावेत म्हणून ग्लिसरीन घातले कि दुसरे काही आय ड्रॉप्स घालून डोळे शक्तिशाली करून घेतले ? इतकी चुळबुळ ,वळवळ करते आहे तर हिने जंताचे औषध नक्की कधी घेतले असावे ?असे अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत .
क्लबमध्ये काही रिकाम्या खुर्च्या दिसत असूनही मी असह्य दुर्गंधी सहन करत स्वपीडनाचा त्याग करून जागा का बदलली नाही हा यक्षप्रश्न मात्र मुळीच सुटला नाही .बहुदा ऑनर किलिंग विषयी सिनेमापेक्षा हे प्रेक्षणीय निरीक्षण कुतूहलजनक असावे .
एसी हॉलमध्ये ,वारा वादळ
एसी हॉलमध्ये ,वारा वादळ नसताना अचानक , सुमारे १० मिनिटे केस विंचरायचे कारण कळले नाही . तिने डोळ्यात अश्रू यावेत म्हणून ग्लिसरीन घातले कि दुसरे काही आय ड्रॉप्स घालून डोळे शक्तिशाली करून घेतले ? इतकी चुळबुळ ,वळवळ करते आहे तर हिने जंताचे औषध नक्की कधी घेतले असावे ?
=))
एज ऑफ टुमारो
टॉम क्रूज आणि एमीली ब्लंटचा 'एज ऑफ टूमारो' नुकताच पाहिला. सिनेमाचा ट्रेलर पाहतानाचा 'ग्राऊंडहॉग डे' मीट्स सायफाय असा हा सिनेमा आहे हे तुम्हाला कळते, त्यामुळे जरा अपेक्षा कमीच होत्या. (शिवाय टॉम क्रूजच्या दहापैकी एक सायफाय बरा असतो, बाकी तेच ते!) सिनेमा सुरू होताच पाच-दहा मिनीटतच सिनेमाची कथा काय असणार आहे याचा अंदाज येतो. दोन मुख्य पात्रं सोडली तर इतर पात्र कमीतकमी वापरलेली आहेत. अशी सगळी निगेटीव्हज असूनही सिनेमा कंटाळवाणा झालेला नाही. रिपीटेटीव्ह स्टोरीचे इडीटींग छान करून इफेक्ट प्रभावी केला गेला आहे. मिमीक या एलियन स्पेसीला पृथ्वीवरील हिंस्त्र प्राण्याचे रूप देण्याचा प्रकार सोडला तर इतर कोणतीही तक्रार नाही. मुख्य कथेला कुठेही वाहवत न नेता पेरेलेले विनोद जमून गेलेले आहेत.
सायफाय आवडत असतील तर हा सिनेमा नक्कीच निराशा करत नाही. एलियन रेसची असलेली सुपरपावरही कल्पक आहे, आणि इतर सायफाय सिनेमांप्रमाणे घिसीपिटी किंवा हास्यास्पद नाही. सिनेमाचा शेवट थोडासा अपेक्षित असला तरी हिरोचे अचाट सामर्थ्य वा हॉलिवुडी रोमांसचा अतिरेक केलेला नाही.
Anthony Bourdain: Parts Unknown
नेटफ्लिक्स वर नव्या नव्या मालिका चाळ्त असताना Anthony Bourdain: Parts Unknown ही खाद्यविशेष आणि प्रवासवर्णनात्मक मालिका सापडली. Anthony Bourdain हा माणूस पूर्विचा आचारी आणि आताचा निवेदक म्हणून प्रसिद्ध आहे.
No Reservations या मालिकेनिमित्त भारतापासून विएतनाम पर्यंत देशांत जाउन हा पठ्ठ्या मस्त मस्त पदार्थ चाखून आला आहे. या नव्या मालिकेत जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्याचा चंग त्याने बांधलेला दिसला. मालिकेचा पहिला भाग "म्यानमार" उत्कृष्ट जमला आहे.
बर्मा किंवा म्यानमार या देशाबद्दल फक्त नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या गोष्टींमधून ऐकले होते. भारताप्रमाणेच बिकट काळातून गेलेला हा देश आत्ता कुठे लष्करी अंमलातून बाहेर पडून मोकळा श्वास घेत आहे. तिथली कधी संथ तर कधी भयानक आगगाडी, म्यानमारचे अचूक टिपलेले नयनरम्य देखावे, स्लो मोशन चा योग्य वापर करीत मन भारावून टाकणारी नेमकी सिनेमेटोग्राफ़ी, म्यानमारच्या चहागृहात उकळणारा लालबुंद चहा, मंद स्वरातले निवेदन या सगळ्यांचा मेळ अचूक बसला आहे. मालिका कुठेही आततायी वाटत नाही. पण त्यात दाखवलेले पदार्थ बघून पोट मात्र चांगलेच खवळते.
मला या फारिनच्या माणसांचा खूप हेवा वाटतो. खाण्यापिण्याबाबत त्यांची उदारता त्यांना चांगला प्रवासी बनवते असे माझे मत झाले आहे. अमेरिकेत राहून कुठल्याही हॉटेलात गेलो की मी आपला, "येथे व्हेज काय मिळेल हो?" हा गरीब प्रश्न टाकतो. यामुळे माझे मन मलाच खूप कोते वाटायला लागले आहे. उत्तम seafood restaurant मध्ये जाऊन मी ओळखीचा मासा दिसला तरच खातो, नाहीतर अन्य ठिकाणी लाल मांस वगळून चिकन चे पर्याय शोधतो. बाकी काही खायचे डेअरिंगच होत नाही. जातीच्या प्रवाशाला जिथे जाईल तिथला यजमान जे देईल ते आनंदाने खाता आले पाहिजे. ज्या देशात जाईल तिथली खाद्यसंस्कृतीच जर अनुभवली नाही तर तो प्रवास म्हणजे केवळ "ये-जा" एवढाच राहील.
असो. तर सांगायचा मुद्दा हा की, उपरोक्त मालिका हा प्रवासवर्णनाचा एक उत्तम नमुना आहे आणि हे वाचून बघायची इच्छा झालीच तर "म्यानमार" नक्की बघा.
फारीनची उदाहरणे सोडल्यास
फारीनची उदाहरणे सोडल्यास अगदी भारतात पण आपले नखरे असतात. माझा एक मित्र चेन्नई ला महिनाभर राहून आला तेवा तिथे खाण्याचे कसे वांधे आहेत यावरच सर्वांना प्रवचन देत सुटला होता. त्याच्या जागी मी असतो तर मी स्वत: काही वेगळे केले असते का ते सांगू नाही शकणार पण आपल्याच देशातले veg खाद्य पण आपल्याला जमत नसेल तर बाहेरची तर बातच नको.
इतका चिंधीपणा असतो, काही अर्थ
इतका चिंधीपणा असतो, काही अर्थ नाही त्याला. वायझेड जमात आहे त्याबाबतीत.
पण माझ्या मित्राने एका गोर्याचेही असेच किरकिर करणारे उदा. सांगितले होते. आम्रविकेच्या इंडियाना राज्यातून टेक्सास राज्यात तो २-३ म्हयने इंटर्नशिपला गेला. आल्यावर तिथली हवा, खाणे, भाषा, सगळ्यालाच शिव्या घालत होता. ते ऐकून मित्राची लै हहपुवा झाली आणि त्याने मला हा किस्सा सांगितला आणि माझीही हहहहहहहपुवा झाली =)) अरे भो***, भाषा वेगळी नाय, संस्कृतीपण भारतातल्या भारतात असते तितकी वेगळी नसावी बहुधा तरीही इतकी किरकीर? हैट्ट आहे =)) आम्ही काय करायचं मग ;)
अगदी!
बाहेर (पक्षी: घराबाहेर, देशाबाहेर नव्हे!) गेल्यावर खायला होणार्या अडचणी बहुतेक वेळा स्वरचित असतात.
आणि मग पुन्हा त्यावर "आम्ही कुठ्ठं कुठ्ठं खात नाही, आम्हाला बुवा मराठी पदार्थांशिवाय जेवणच जात नाही" अशी स्वकौतुकाची कवनं गायली जातात.
केसरी सारख्या टूर्स लोकांना भारताबाहेर इंडियन जेवण देतात हे एक वेळ समजू शकतो, पण भारतातही जिकडे तिकडे पोहे आणि मराठमोळं जेवण कशासाठी?
पंजाबला जाऊन जर पराठे लस्सी हाणण्याऐवजी तुम्ही शिक्रण-बटाटा भाजी खायला घालत असाल तर मग तुम्हाला सिद्धू माफ करणार नाही.
...
बाकी सर्व ठीक, पण...
पंजाबला जाऊन जर पराठे लस्सी हाणण्याऐवजी तुम्ही शिक्रण-बटाटा भाजी खायला घालत असाल तर मग तुम्हाला सिद्धू माफ करणार नाही.
सिद्दू सदाशिव पेठेत जर कडमडला, तर शिक्रण-बटाटा भाजी-मुरंबा खाईल काय?
केसरी सारख्या टूर्स लोकांना भारताबाहेर इंडियन जेवण देतात हे एक वेळ समजू शकतो, पण भारतातही जिकडे तिकडे पोहे आणि मराठमोळं जेवण कशासाठी?
उत्तरार्धाशी सहमत आहे, पण मग त्याच न्यायाने केसरीसारख्या टूर्सनी तरी भारताबाहेर इंडियन जेवण काय म्हणून द्यावे?
(भारताबाहेर शाकाहारी/गोमांसविरहित पर्याय मिळत नाहीत, असे सांगू नका. इण्डियन्स - त्यातही टिपिकली केसरीसारख्या टूर्सबरोबर जाणार्या क्याटेगरीतले इण्डियन्स - त्यांना नाके मुरडतात, हा भाग वेगळा.)
स्वानुभव
त्याच्या जागी मी असतो तर मी स्वत: काही वेगळे केले असते का ते सांगू नाही शकणार
मला कामानिमित्त बंगळूरला काही महिने राहावे लागले होते. सुरुवातीला दोन आठवडे नावीन्य म्हणून वडे, डोसे, इडल्या, भाताचे प्रकार खायला मजा वाटली. पण हे प्रकार कायम खाणे आपले काम नाही हे कळले. नंतर तर निव्वळ पोहे-मिसळ-भाजीपोळीची आठवण येऊन होमसिक व्हायला झाले होते. (मजा म्हणजे परत पुण्यात आल्यावर नाष्त्याला इडल्याच खाऊ लागलो. आणि साऊथच्या इडल्यांची सर आपल्याकडे नाही हे प्रवचनही दिले ;))
मी सुद्धा कॉलेजला असतांना
मी सुद्धा कॉलेजला असतांना आठवड्याभरा साठी चेन्नई ला गेलो होतो, प्लेसमेंट कमीटी मधे असल्याने चेन्नई च्या आय.टी. कंपनी मधे ब्रोशर आणि कॉलेज माहिती द्यायला. तर कॉलेज ने रहायची व्यवस्था 'महाराष्ट्र मंडळ' (म.मं) मधे केलेली, जेवणाचे हाल होउ नयेत आमचे म्हणून. माझ्या बरोबर असलेल्या तिघांनी एकदाच ती टिपीकल साउथ इंडीयन थाळी खाल्ली आणि कसे काय नुसता भात खाऊ शकतात अश्या चर्चा, त्यांना लगेच पुण्याची आठवण यायला लागली. चेन्नईची फिल्टर कॉफी पिऊनही मग त्याला कशी दुर्गा किंवा जायकाच्या 'एस्स्प्रेसो कॉफी' सारखी चव नाही वगैरे वगैरे चालूच होतं आठवडाभर. नंतरचे सगळे दिवस ते तिघे महाराष्ट्र मंडळातच जेवत होते (अगदी दुपारसाठीचा डबा घ्यायचे भरून म.मं मधून) शिवाय आणि रात्री फोन करून कौतुकाने आज कसं आळूच फदफद खाल्लं नी कशी पुरणपोळी, मोदक, पोहे खाल्ले असं कायकाय घरी सांगायचे, चेन्नईतही कसं मराठी पदार्थ खातोय ह्याचं कौतुक (वायझेड साले). आपण तर आठवडाभर भातावर मस्त ताव मारला, अगदी त्यांच्या सारखं भाताचे गोळे करुन तोंडात बोकणे भरले नी रोज जेवणानंतर फिल्टर कॉफी - मजा यायची :)
+१
आपणही चार म्हयने बंगळुरास असताना लय मजा केली राव. सौदिंडियन थाळी मस्त बोकाणे भरभरून हादडली तेच्यायला. तरी लै भरता आलं नै कारण सोबत दोन बंगाली होते, तस्मात णॉण व्हेजवर त्यांचा भर जास्ती. पण तेवढ्यातही मी मस्त मज्जा केलो. गरमागरम भाताचा ढिगारा, वाफाळते सांबार, एकसे एक चटकदार चटण्या, खोबरे घातलेली ती कोबीची भाजी, जिभेला एकदम चव आणणारे ऑस्सम रस्सम, झालंच तर लुसलुशीत इडल्या आणि जगातभारी डोसे. अगर फिरदौस बर्रुए जमीं अस्त.. वगैरे.
पहिला भात, मधला भात नी शेवटी
पहिला भात, मधला भात नी शेवटी भात!
अहाहा!
तमिळ थाळीची मजा काय वर्णावी! अगदी वाफाळाता भात, त्यावर अधी अति म्हंजे अति रुचकर सांभार, कधी दहि, सोबतीला ओल्या खोबर्यात न्हाऊन माखून आलेल्या व/वा भिजवलेल्या डाळीच्यासकट येणार्या भाज्या, सोबत पायसम किंवा असलाच एखादा खीरीचा किंवा शिर्याचा प्रकार, एक/दोन कसल्यानती नवख्या कोशिंबीरी लाजवाब!
केळीच्या हिरव्यागार पानावर जेवताना हातावर आलेला ओघळही चाटावासा वाटावा इतके रुचकर!
======
आणि तमिळ नॉनव्हेज जेवणही तितकेच रुचकर! त्यांचा मत्स्याहार करण्याची तर्हाच वेगळी, कडीपत्ताच्या पावडरीच्या मॅरिनेशनने येणारा खतरनाक ट्विस्ट छ्या रे! जाऊ दे. जेवण झालं तरी बादलीभर लाळ टपकेल :P
बंगळुरी असताना खाल्लेले सेट
बंगळुरी असताना खाल्लेले सेट डोसे, पोंगल, इडल्या-वडे, नाना तर्हांचे भात, आंध्र थाळ्यांमधले मसालेदार प्रकार आणि तुपाची धार धरलेला भात, सणसणीत वैशिष्ट्यपूर्ण आंध्र बिर्याणी, कढीपत्त्यानं पुनित झालेला लालभडक कालवणातला मासा, नीरडोसे...
झालंच तर खोबरं, हिरवी मिरची, भिजवलेली मूगडाळ घातलेली काकडीची कोशिंबीर, केळीच्या पानाचा गरम तूपभाताला येणारा वास, लोणची आणि चटण्यांचे अनोखे प्रकार...
अहाहा!
मला तर बॉ आवडतं सौंदिंडियन जेवण. फक्त चांगला वडापाव आणि भेळ मिळत नसल्याचं दु:ख होत असे. पण आता तितपत चालायचंच.
ए ऋ गपे *&^%$$^&*((०
ए ऋ गपे *&^%$$^&*((० च्यायला!!!!!!!! उगा त्रास नको देऊ.
बाकी त्यांचा मांसाहारही लय जबराट असतो. घस्सी नामक थिक ग्रेव्हीवाली माशाची डिश आणि त्यात परत कडीपत्ता म्हंजे मुगुद होत् बिडी. चेट्टिनाड चिकनही लय खंग्री असते.
(दाक्षिणात्य) डब्ल्यू. बी. बट्टमण्णन.
खाण्यापिण्याबाबत त्यांची
खाण्यापिण्याबाबत त्यांची उदारता त्यांना चांगला प्रवासी बनवते असे माझे मत झाले आहे.
अगदी लाख मोलाचे बोललात.
फारिनरांचे(आणि माद्यांचेही ;) )माहिती नाही पण माझ्याही फिरण्याच्या आवडीमागे खाण्यापिण्याबाबत उदारता आहेच. अनेक प्राणी, पक्षी, मासे, इतर काही कणाहीन जीव, प्रसंगी काहि किडे रिचवले आहेत. कोणाही नवख्याशी बोलताना आवडते खाणे, खाण्याच्या जागा वगैरे विषय हमखास यश्स्वी होतो याचा प्रत्यय दर ट्रीपमध्ये येतो (चांगल्या (असणार्या/दिसणार्या) मुलीसुद्धा एरवी कितीही भाव खाऊदेत, घर्गुती सांदण ते बरिस्ताची ठराविक फ्लेवरचीच कॉफी इथपर्यंतच्या स्पेक्स्ट्रममध्ये कुठेतरी मिळणार्या कुठल्यातरी पदार्थावर त्यांच्याही अंतरीची तार छेडली जातेच, नी मग संभाषण सुलभ होते याची नवागतांनी नोंद घ्यावी ;) )
बाकी हल्लीच्या जमान्यात भारतात बर्गर, पिझ्झा नी पास्तासाठी शहरे पालथी घालणारी जन्ता फारीनला जाताना घर्ची भाजणी, इथे दळलेली कणीक वगैरे घेऊन जाऊ लागली की मी मनातल्यामनात निव्वळ नमस्कार करतो!
...
बाकी हल्लीच्या जमान्यात भारतात बर्गर, पिझ्झा नी पास्तासाठी शहरे पालथी घालणारी जन्ता फारीनला जाताना घर्ची भाजणी, इथे दळलेली कणीक वगैरे घेऊन जाऊ लागली की मी मनातल्यामनात निव्वळ नमस्कार करतो!
अवो, भारतातल्या पिझ्झा-बर्गरची चव वायली, फारीनची वायली. भायेरचे पिझ्झा-बर्गर झेपत नसतील त्यास्नी.
(विनोद नाही. भारताबाहेर घरच्या भाजणीच्या हव्यासाचा भाग सोडा, पण गंभीरपणे, यात तथ्य आहे.)
भारतातील काही स्थळांचे
भारतातील काही स्थळांचे ड्रोनचा उपयोग करून काढलेले हावाई फोटोज गार्डियनच्या साईटवर इथे बघता येतील.
हार्टलँड्स (२००२)
काल रात्री हार्टलँड्स (२००२) हा चित्रपट घरी डीव्हीडीवर पाहिला. मला आवडला.
रोड मुव्ही हा जॉनरच तसा माझा आवडता. नी त्यात रोड मुव्हीत इतकी छान नी विषयाशी समर्पक सिनेमॅटोग्राफी, संवाद, ध्वनी, रंगयोजना, प्रकाश वगैरे असेल तर चित्रपटाची कथा, मेसेज सगळेच काहिसे दुय्यम होते.
कथेचा नायक "डार्ट गेम्स"चा चाहता असतो. स्वभावाने अगदी साधा, त्याच्या पत्नीशी त्याचे ठिक चालले आहे असा त्याचा समज चित्रपटाच्या सुरूवातीलाच तुटतो, जेव्हा त्याची पत्नी त्याच्या डार्ट गेमच्या टिमच्या म्होरक्याबरोबर चाळे करताना त्याला दिसते. तो तिला ऑलमोस्ट रंगेहात पकडल्यावर ती त्याला सोडून म्होरक्यासोबत ब्लॅकपूलला डार्टच्या खेळासाठी निघून जाते. नी हा नायक तिथपर्यंत आपल्या होंन्डा-५० (आपल्या M-80 ची आठवण करून देणारी) ने प्रवास करतो. त्या प्रवासात त्याला भेटणारी माणसे, प्रसंग, वगैरे मुळे प्रवासानंतरचा तो यातील तफावत वगैरे कोणत्याही नॉर्मल रोड मुव्ही सारखे.
तफावत आहे सिनेमॅटोग्राफीत, प्रकाशयोजनेत आणि नायकाच्या छान अभिनयात. शिवाय यातील अतिशय तरल विनोद एकुणच चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेतो.
मला एकुणात चित्रपट आवडला. सहज मिळाला तर सोडू नका. ७/१०
जनरेशन कील
द वायर पाहिल्यानंतर डेव्हीड सायमनचे अजून काय बघायला मिळते याचा शोध घेता 'जनरेशन कील' नावाची एक मिनीसिरीज मिळाली. एव्हीन राईट हा रोलींग स्टोन्सचा पत्रकार अमेरीकेच्या मरीन बटालियनबरोबर इराक युद्धात गेला तेव्हाच्या त्याच्या अनुभवांवर त्याने जनरेशन कील हे पुस्तक लिहले. त्या पुस्तकावर आधारीत ही मालिका सायमन आणि एड बर्न्स या दोघांनी बनवली. वायर प्रमाणेच यातही वास्तवातील पात्रं, कथानक असल्याने मालिकेबाबत उत्सुकत होती.
वेगवेगळ्या पार्श्वभुमीतून आलेले मरीन्स. युद्ध सुरू होण्यापूर्वी असलेली त्यांची युद्धासाठीची आतुरता, शत्रुच्या रक्तासाठीचं आसुसलेपण. युद्ध, राजकारणावगैरे बद्दलची यांची मतं यातून उभी केलेली पात्रं प्रभावी पण त्याच वेळी वास्तव वाटतात. चेन ऑफ कमांड, युद्धातील गोंधळ, इनकंपीटंट ऑफिसर्स. त्यातून होणार्या युद्धातील चुका, निरपराध इराकी नागरीकांची हत्या आणि एकंदरीत या सर्व अनूभवातून जाताना युद्धाच्या अंताला या सैनिकांच्या वृत्तीत , आपापल्या स्वाभावानूसार, झालेला बदल या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. एरवी दिसणार्या युद्धाच्या मालिका वगैरेंमध्ये केले जाते तसे युद्धाचे वा सैनिकांचे अवास्तव ग्लोरीफिकेशन केलेले नसल्याने मालिकेची उंची वाढली आहे.
बॉयहूड
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रवास आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाहणे, हे चित्रपटांपेक्षा Bildungsroman प्रकारच्या कादंबर्यांत अधिक पहायला मिळतं. रिचर्ड लिंकलेटरचा सलग १२ वर्षं टप्प्याटप्प्याने चित्रित होत आलेला 'बॉयहूड' हा चित्रपट मात्र याला अपवाद. या चित्रपटाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख भूमिकेतले सगळेच कलाकार २००२ ते २०१४ या काळात कायम राहिले.
एका ६-७ वर्षाच्या सर्वसामान्य मुलाचा त्याच्या अठराव्या वर्षापर्यंतचा प्रवास हा मुख्य विषय. प्रेमभंग, गुन्हे, मृत्यू इत्यादी ठळक गोष्टी जवळजवळ नसणारा. या प्रवासाच्या अनुषंगाने बदलत जाणारी राजकीय परिस्थिती (११ सप्टेंबर, टेक्सस प्लेज, इराक युद्ध, ओबामा), हॅरी पॉटरची मालिका, अॅपल कंपनीची निरनिराळी प्रॉडक्ट्स, ब्रिटनी स्पिअर्स ते कंट्री संगीत, फेसबुक/ NSA, कट्टर उजव्या आणि पारंपरिक टेक्ससशी पूर्ण विसंगत असणारं ऑस्टिन शहर आणि समाजाच्या मुख्य धारेत येत चाललेली हिस्पॅनिक लोकसंख्या अशी एकंदरीत तत्कालीन (आणि सद्य) समाजाची सांस्कृतिक-राजकीय-सामाजिक-धार्मिक पार्श्वभूमीही उभी राहते. एका अर्थी, हे प्रेझेंट कन्टिन्युअस टेन्समध्ये केलेलं आतापर्यंतच्या एकविसाव्या शतकाचं किंचित मानववंशशास्त्रीय दस्तऐवजीकरणच.
काही ठिकाणी मात्र हे तपशील अधिक साटल्याने यायला हवे होते, असं वाटून गेलं. पण इतक्या मोठ्या कालपटावर राखलेली कंटिन्युइटी, लिंकलेटरच्या बिफोर सनराईज/सनसेट/मिडनाईट प्रमाणे नैसर्गिक अभिनय करणार्या मोजक्या कलाकारांचा संच, अॅटॅचमेंट थिअरीसारखे नेमके संदर्भ आणि अधूनमधून येणारे नर्मविनोदी संवाद यामुळे चित्रपट पावणेतीन तासांचा असूनही कुठे कंटाळवाणा होत नाही. संधी मिळाल्यास अवश्य पाहण्याजोगा.
सा(ल्)मन फिशिंग इन यमेन
'सा(ल्)मन फिशिंग इन यमेन' नावाचा एक अतिशय कंटाळवाणा आणि संपता न संपणारा सिनेमा चिकाटीने पाहिला. नावातल्या नाविन्याने, दोन वाक्यांच्या माहितीने (नर्म विनोदी वगैरे) आणि एमली ब्लंट, इव्हान मॅकग्रॅगोर इत्यादी नावे पाहून पहायला घेतला आणि सुरुवातीला थोडा बरा वाटला पण शेवटीशेवटी अगदी पीळ पडला. रिवाजाप्रमाणे पहिल्या अर्ध्या तासानंतर निद्राधीन झालेला 'बरा अर्धा' दर अर्ध्या तासांनी जागा होऊन "अजून संपला नाही?" अशी टिप्पणी करत अखेरीस सिनेमा संपला तेंव्हा "काय पीळ सिनेमे पहात बसतेस" असे पुटपुटला तेंव्हा सुरू केलेला सिनेमा पूर्ण होईपर्यंत पाहिलाच पाहिजे अशी मानसिकता का होत असावी याबाद्दल बरेच चिंतन करता आले. "कुठेतरी अचानक रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येईल असा आशावाद" पसून ते "इतका वेळ वाया गेलाच आहे तर अजून थोडा गेल्याने निदान 'क्लोजर' मिळेल" पर्यंत अनेक तर्क सुचले शिवाय आजपर्यंत आपण एकही भिकार चित्रपट (स्वपीडन करून घेत)अर्ध्यावर सोडलेला नाही हेही लक्षात आले. हा सिनेमा उसंत सखूंसोबत पाहिला असता तर जाम मजा आली असती असाही विचार मनात डोकावून गेला. असो.
रशियन लोकांचे उद्योग!
रशियात गाड्यांच्या पुढे कॅमेरे बसवलेयेत म्हणे. हा शोध (म्हणजे मला ) लागला तो अलिकडेच एक उल्का कोसळली त्याचे रशियन विडियो बघून.
मग हे पाहिलं - रशियात काहीही होउ शकतं. चित्रविचित्र लोक आणि त्यांचे उद्योग बाकी कुठेही बघायला मिळतील पण रस्त्याच्या मधोमध अचानक येणारा रणगाडा, ak-47 सदृश बंदूक हातात घेऊन बस पकडणारा प्रवासी वगैरे खास रशियन.
तेव्हा बघाच!
.
.
अस्तु
वाचकाला/ प्रेक्षकाला अस्वस्थ करणे / विचार करायला लावणे हे कलाकृतीचे यश समजण्याचा एक काळ होता. होता म्हणण्याचे कारण असे की 'हंड्रेड क्रोर क्लब' हा एकच निकष लावून चित्रपटाचे यशापयश मोजले जाण्याच्या जमान्यात हा विचार कालबाह्य वाटू शकतो. अल्झायमर्स डिसीज या विषयावरचा 'धूसर' नावाचा चित्रपट बघून माती खाल्ली असल्याने, तथापि भावे-सुखटणकर जोडीचा चित्रपट असल्याने 'अस्तु' ला गेलो. नकारात्मकच लिहायचे तर संकलक मोहित टाकळकराची कात्री अजून थोडी धारदार व्हायला हवी होती. काही प्रसंगांत चित्रपटाची गती मंदावते, तो रेंगाळतो. संवाद अगदी 'समांतर' इतके कृत्रीम नसले तरी बर्यापैकी पुस्तकी वाटतात. इंग्रजी धर्तीचे मराठी बोलणार्या मिलिंद सोमणला का घेतले (आणि त्या जागी अतुल कुलकर्णीला का घेतले नाही) आणि देविका दफ्तरदारला इतकी नगण्य भूमिका देऊन वाया का घालवले हे आणखी काही नकारात्मक प्रश्न. सकारात्मक लिहिण्यासारखे बरेच आहे. मोहन आगाशेंच्या अभिनयाबद्दल बरेच लिहिले गेले आहे. आणि तो तसा अप्रतिम आहेच. (त्यांच्या धारदार नजरेत कधीकधी 'नाना' डोकावतो हा त्या संचातला प्रयोग बघीतल्याचा दुष्परिणाम असावा!) बाकी अल्झायमर्सने त्रस्त असलेले लोक विस्मरणाबरोबर 'मूड स्विंग्ज' चेही बळी असतात का यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा. पण अभिनयाच्या बाबतीत इरावती हर्षे नंबर एक. वडीलांबद्दलची काळजी, त्यांच्या दुखण्याने आलेला वैताग, त्या वैतागाची वाटणारी खंत हे सगळे इरावती हर्षेने अगदी नेमके साकारले आहे. ('देवराई' मधल्या सोनाली कुलकर्णीची आठवण यावी असे). अमृता सुभाषचाही उत्तम अभिनय.(अशा पद्धतीच्या मायाळू, जुनाट संस्कारांच्या, कुणीही वडील माणूस भेटला की त्याला वाकून नमस्कार करणार्या, कानडी बायका ज्यांनी बघीतल्या आहेत अशांना अमृताच्या अभिनयाचे कंगोरे अधिक नीट कळू शकतील.'आमचं ताई म्हणजे आमचं आईच आहे बघा' असे (सुनीता देशपांडेंबद्दल) बोलणारे मन्सूर आठवतात!). चित्रपटाच्या तांत्रिक बाजूही उत्तम. (बाकी पुण्यात चित्रपट बघण्याचा हा एक ताप असतो. चित्रीकरणाच्या परिचित जागा दिसल्या की पब्लीक 'ही पर्वती, हा लक्ष्मी रोड' असे चार रांगांना ऐकू येईल इतपत 'कुजबुजत' असते. रायटिंग, नॉट दी रायटर!) अमृताच्या तोंडची कानडी गाणी कानाला लई ग्वाड लागतात.एकूण एक समाधानकारक अनुभव.गेल्या कित्येक दिवसांत थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिला नव्हता आणि हा उपास 'किक' किंवा 'लई भारी' ने सोडण्याची इच्छा नव्हती. त्या दरम्यानच हा चित्रपट लागला (पुण्यात फक्त दोन ठिकाणी - प्रत्येकी दिवसाला एक शो! 'किक' चे दिवसाला शंभर शोज तरी असतील. अस्तु.) हे (दाभोळकरांच्या भाषेत) 'नशीब न मानणार्याचे नशीब' अस्तु. अस्तु.
भावे-सुखटणकर जोडीचा चित्रपट
भावे-सुखटणकर जोडीचा चित्रपट म्हटलं की मला फक्त "वास्तुपुरुष" आठवतो. जवळपास सगळ्याच कलाकारांनी त्यात एकदम "सहज" अभिनय केलाय. अतुल कुलकर्णी यांचा अभिनय मला बऱ्याच चित्रपटांमध्ये नाटकी वाटतो (उदा. देवराई आणि वळु) तसा या चित्रपटात वाटत नाही. सदाशिव अमरापूरकर नावाचा नट हिंदी मध्ये फक्त टुकार व्हिलन असू शकतो असंच वाटायचं मला, पण या चित्रपटाने मी त्यांच्या अभिनयाच्या खूप प्रेमात पडलो. गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीचा खंदा कार्यकर्ता आणि गांधीजींनी दाखवलेल्या मार्गदर्शक तत्वांवर वास्तवाचं आणि जबाबदारीचं भान विसरून चालणारा माणूस या त्यांच्या भूमिकेच्या दोन्ही बाजू त्यांनी खूप सुंदर उभ्या केल्या. उत्तरा बावकर, सिद्धार्थ आणि रेणुका दफ्तरदार यांनी पण अप्रतिम अभिनय केलाय. एकूणच, एखादी उत्तम कादंबरी वाचल्यासारखं वाटावं इतकी खोलवर घुसली आहेत सगळी पात्रं. माझ्यासाठी तरी, वास्तुपुरुष सारखा मास्टरपीस पुन्हा होणे नाही.
बादवे, हे दफ्तरदार लोक कोण आहेत? आणि ते फक्त भावे-सुखटणकरांच्या चित्रपटांमध्येच का काम करतात?
वास्तुपुरूषचे छायालेखन,
वास्तुपुरूषचे छायालेखन, प्रकाशयोजना हा अनेकांना आवडणारा भाग मला तितकासा आवडत नाही. पूर्ण चित्रपटभर एक कसलासा पांढरा पडदा आहे असा भास होत असतो.
गोषाधीन स्त्रियांना काय वाटत असावा याचा अंदाज येतो म्हणा त्यामुळे ;)
हा माझ्या प्रिंटचा दोष की काय माहिती नाही.
त्यामुळे बाकी अभिनय, संवाद, पटकथा, चित्रण वगैरे सगळेच आवडते, पण या पडद्यामुळे चित्रपट बघताना त्रास होतो.
अतुल कुलकर्णी यांचा अभिनय मला बऱ्याच चित्रपटांमध्ये नाटकी वाटतो (उदा. देवराई आणि वळु)
काय बोललात! द्या टाळी! मलाही असंच वाट्टं :)
ठरवून नैसर्गिक अभिनय करायला गेलं की कसं होतं याचं तो उदाहरण आहे.
हीट
लोकहो 'हीट' बघाच. सॅण्ड्रा बुलक व मेलिसा मॅकार्थी. धमाल पिक्चर. दोघींचीही कामे जबरी. संवाद अक्षरशः 'फटाका' आहेत आणि मे.मॅ ला वाव जास्त असला, आणि तिने पिक्चर खतरनाक करून टाकला असला तरी सॅ.बु. चे ही काम चांगले झाले आहे. प्रत्येक शॉट मधे स्वतःचा पोपट करणारा रोल करणे सोपे नाही. मेलिसा मॅकार्थी बद्दल फारशी माहिती नव्हती. खतर्नाक काम केले आहे तिने यात. तिला संवादही चपखल दिले आहेत.
+१
सहमत, मस्त कॉप मुव्ही आहे, सॅण्ड्रा बुलक व मेलिसा मॅकार्थी दोघांचा सेन्स ऑफ ह्युमर एकमेकांना पुरक असा आहे, काही गोष्टी अर्थात ओव्हर दि टॉप आहेत पण तरी बर्यापैकी मनोरंजन होते. त्याच लाईन वर सिमॉन(सायमन?) पेग आणि निक फ्रॉस्टचा 'हॉट फज' नामक ब्रिटीश सिनेमा फारच विनोदी आहे.
काल 'ऑंखो देखी' पाहिला.
काल 'ऑंखो देखी' पाहिला. प्रचंड आवडला.
संसाराने गांजलेला एक सामान्य माणूस अचानक ठरवतो 'जे मी प्रत्यक्ष पाहिलं नाही, ऐकलं नाही, अनुभवलं नाही त्यावर विश्वास ठेवणार नाही' आणि त्याचं आयुष्य बदलून जातं. पुढे काय होतं त्याची काही वेळा हसवणारी, काही वेळा अंतर्मुख करणारी कहाणी हळुवारपणे उलगडते. 'प्रत्यक्ष प्रमाण, प्रत्यक्षावर आधारित अनुमान प्रमाण मानणं पण शब्दप्रमाण न मानणं' हे जीवनात खरोखरच अवलंबलं तर काय चांगलं होऊ शकेल, काय घोटाळे होऊ शकतील यावर हलक्याफुलक्या, हृद्य शैलीत गंभीर टिप्पणी आहे.
सिनेमाचं बलस्थान म्हणजे प्रमुख कलाकारांनी केलेली कामं, आणि मध्यमवर्गीय जीवनाचं उभं केलेलं सुंदर चित्र. त्यांचं घर भिंतींच्या पोपड्यांतून, अस्ताव्यस्त वावराच्या गाद्या-पांघरुणांतून अतिशय रेखीवपणे उभं केलेलं आहे. पात्रांचा मेकप, बोलण्या वागण्याची पद्धत, आसपासचा परिसर यातून एक सुसंबद्ध जीवनशैली दिसून येते. (या जीवनशैलीच्या चित्रणावर भर देणारा एक रिव्ह्यू)
सिनेमाचं आणखीन एक बलस्थान म्हणजे यात वापरलेलं संगीत. शास्त्रीय संगीत आणि लोकगीतं या दोहोंचा वापर चपखल आहे (फ्यूजन वगैरे नाही). बहार आणि ललत राग इतक्या सुंदर ठिकाणी वापरले आहेत की त्यामुळे मला रागांवर आधारित फोटोस्पर्धेची आठवण झाली. या प्रसंगाला, या चित्राला, या मूडला हेच स्वर हवे - का ते सांगता येत नाही - असं हा सिनेमा पाहताना अनेक वेळा वाटतं.
खोडच काढायची झाली तर कथावस्तू काहीशी वेडीवाकडी आहे. म्हणजे काही वळणं, काही नाट्यं, काही संघर्ष परिणामकारक आहेत, पण ते का आले आहेत हे लक्षात येत नाही. मूळ ऑंखो देखीच्या सूत्राशी त्यांचा संबंध नाही.
अर्थातच ही तक्रार किंचित गौण म्हणावी अशीच आहे. हा सिनेमा मी या वर्षात पाहिलेल्या काही उत्तम सिनेमांपैकीच आहे. तेव्हा सगळ्यांनी जरूर तो पहावा असा आग्रह धरेन.
या सिनेमाचं कौतुक करणारा अजून एक रिव्ह्यू.
पांढऱ्या अक्षरात लिहितो
पांढऱ्या अक्षरात लिहितो आहे...
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं जुगार खेळायला लागणं. नोकरी जाणं जसं अपरिहार्य आहे, तसं जुगारात पडणं नाही. प्रत्यक्ष प्रमाण मानल्यामुळे तो अधिक चांगला जुगारी बनतो का? तर नाही. (एक किंचित उल्लेख आलेला आहे - की मी ब्लाइंड कधीच खेळत नाही. पण तरीही तो प्रतिस्पर्ध्यांच्या न पाहिलेल्या पानांविरुद्ध खेळणं आणि जिंकणंही पटत नाही.) पण नोकरी गेल्यावर उत्पन्नाचं साधन मिळण्यासाठी आणि भावाबरोबरच्या भांडणाला थोडंसं खतपाणी पुरवण्यासाठी या त्याच्या व्यवसायाचं लोढणं कथेवर टाकल्यासारखं वाटतं.
दुसरं म्हणजे भावाबरोबरचं भांडण. ते विकोपाला जाण्याचं काहीच कारण दिसत नाही. त्याला ऑंखो देखीचा साक्षात्कार होण्याआधीच तो पुरेसा समजुतदार दाखवलेला आहे. त्याचा भाऊदेखील आपल्या पुतणीच्या लग्नाला जायचं की नाही इतका प्रश्न निर्माण होईपर्यंत ताणून का धरतो याचंही कारण नीट आलेलं नाही.
आता प्रत्येक घटनेत कथावस्तूची अपरिहार्यता आवश्यक आहे का, असा प्रश्न विचारता येईल. काही कथांसाठी विसंगती हाच आत्मा असतो. या कथेचं तसं दिसत नाही. एक निश्चित प्रवास आहे. त्या प्रवासात अडखळणं ठीक, वाट चुकणंही ठीकच. पण इथे वेगळ्याच वाटा मांडलेल्या दिसतात, आणि एकमेकांशी त्यांचा काही संबंध नाही. त्यामुळे ताजमहालाची एक भिंत सुंदर लाल दगडाने केल्यासारखी वाटते.
माझं मत
सूचना : ह्या प्रतिसादात चित्रपटातल्या काही घटना आणि त्याविषयी माझं अर्थनिर्णयन आहे. ज्यांना चित्रपट पाहण्याआधी हे वाचायचं नाही त्यांनी प्रतिसाद वाचू नये.
>> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं जुगार खेळायला लागणं. नोकरी जाणं जसं अपरिहार्य आहे, तसं जुगारात पडणं नाही. प्रत्यक्ष प्रमाण मानल्यामुळे तो अधिक चांगला जुगारी बनतो का? तर नाही. (एक किंचित उल्लेख आलेला आहे - की मी ब्लाइंड कधीच खेळत नाही. पण तरीही तो प्रतिस्पर्ध्यांच्या न पाहिलेल्या पानांविरुद्ध खेळणं आणि जिंकणंही पटत नाही.) पण नोकरी गेल्यावर उत्पन्नाचं साधन मिळण्यासाठी आणि भावाबरोबरच्या भांडणाला थोडंसं खतपाणी पुरवण्यासाठी या त्याच्या व्यवसायाचं लोढणं कथेवर टाकल्यासारखं वाटतं.
दुसरं म्हणजे भावाबरोबरचं भांडण. ते विकोपाला जाण्याचं काहीच कारण दिसत नाही. त्याला ऑंखो देखीचा साक्षात्कार होण्याआधीच तो पुरेसा समजुतदार दाखवलेला आहे. त्याचा भाऊदेखील आपल्या पुतणीच्या लग्नाला जायचं की नाही इतका प्रश्न निर्माण होईपर्यंत ताणून का धरतो याचंही कारण नीट आलेलं नाही.
आता प्रत्येक घटनेत कथावस्तूची अपरिहार्यता आवश्यक आहे का, असा प्रश्न विचारता येईल. काही कथांसाठी विसंगती हाच आत्मा असतो. या कथेचं तसं दिसत नाही. एक निश्चित प्रवास आहे. त्या प्रवासात अडखळणं ठीक, वाट चुकणंही ठीकच. पण इथे वेगळ्याच वाटा मांडलेल्या दिसतात, आणि एकमेकांशी त्यांचा काही संबंध नाही. त्यामुळे ताजमहालाची एक भिंत सुंदर लाल दगडाने केल्यासारखी वाटते.
जुगार - दोन कारणं संभवतात आणि ती एकाच वेळी ग्राह्य असू शकतात.
१. हा आयुष्यातली विसंगती दाखवण्याचा एक मार्ग आहे. मला काही तरी विशेष कळतं आहे म्हणून मी जुगारात जिंकेन असा आवेश त्यामागे नाही, तर आयुष्यात दिसेल तेच सत्य मानताना ह्यातून (जुगाराच्या किंवा पैशाच्या किंवा त्यातल्या अनिश्चिततेच्या / एक्साइटमेंटच्या मागे लागण्यातून) काही जगण्याचा कार्यकारणभाव किंवा समाधान सापडतं का असा तो शोध आहे. त्या शोधात काही सापडलं असतं तर नायकाची दिशा बदलली असती, पण सापडत नाही.
२. सिनेमात एक प्रकारचं तत्त्वचिंतन आहे. ह्या मार्गावरचा शोध घेणारा नायक दाखवताना त्याचा तुकाराम होताना दाखवणं हा एक उघड मार्ग आहे. आणि चित्रपट त्या वळणानं जातोदेखील. पैशाची हाव नसताना जुगार खेळणं हा त्यातल्या विरक्तीमार्गावरचा एक भाग म्हणून पाहता येतो.
भावाबरोबरचं भांडण – हे माझ्या मते अत्यंत कळीचं आहे, कारण अनेक रॅशनल माणसं प्रेम आणि इगो ह्या बाबतींत इररॅशनल होतात. इथे भावावर प्रेम आहे म्हणूनही त्याचं विभक्त होणं त्रासदायक आहे, आणि तो आपल्यामुळे सगळ्या कुटुंबापासून विभक्त होतो आहे ह्या जाणिवेत इगोही दुखावतोय. ह्या गोष्टींशी नायकाचा झगडा सगळ्यात अधिक वेळ चालतो आणि त्यात तो जवळपास नामोहरम होतो. पण – ऐन लग्नाच्या वेळी तो अखेर जेव्हा भावाकडे आमंत्रण द्यायला जातो तेव्हा त्याच्या इगोवर त्याच्या प्रेमानं मात केली आहे हे दिसतं. इथे तो खरा तुकारामाच्या मार्गाला जाऊ लागलेला दिसतं. ह्या कथाभागाविना नायक निव्वळ एक कोरडा विवेकवादी व्हायची शक्यता होती. पण ह्या कथाभागामुळे नायक अधिक व्यापक आणि सिनेमा अधिक परिणामकारक होतो.
ब्रोकन सिटी, व्हाईट हाउस डाउन
ब्रोकन सिटी - रसेल क्रो आणि मार्क वाह्ल्बर्ग. चांगला आहे एकदा बघायला.
व्हाईट हाउस डाउन - थ्रिलर म्हणून चांगला आहे. डिस्ने ने अॅक्शन थ्रिलर बनवला तर जसा होईल तसा आहे. प्रेसिडेण्ट, व्हाईट हाउस संबंधित प्रोटोकॉल वगैरे बरोबर घेतल्यासारखा वाटत नाही. वेस्ट विंग सारख्या सिरीज मधे जसे सगळे वातावरण "प्रेसिडेन्शियल" वाटते तेवढे येथे वाटत नाही. पण तेवढे दुर्लक्ष केले तर पाहण्यासारखा आहे.
संभाजी भगत यांचं 'बॉम्बे १७'
संभाजी भगत यांचं 'बॉम्बे १७' हे नाटक सहन केलं. (या नाटकाला सेन्सॉरनं खूप कट्स सुचवले आहेत आणि लेखकाला ते अमान्य आहेत म्हणून फक्त २ प्रयोगांना परवानगी देण्यात आली आहे.) मी पाहिला तो पहिलाच प्रयोग.
याआधी 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' हे भगतांचं नाटक पाहिल्यामुळे आणि सेन्सॉरबोर्डाची सोकॉल्ड सनसनाटी फोडणी असल्यामुळे नाटकाबद्दल जाम उत्सुकता होती. पावणेतीन तास अखंड चालवलेला एकसुरी, कल्पनादरिद्री, सवंग छळ ('प्रयोग' हा शब्द वापरायला जीभ रेटत नाहीय) सोसताना मध्यांतराच्या सुमारास या उत्सुकतेचं रूपांतर सेन्सॉरबोर्डाबद्दलच्या 'न भूतो न भविष्यति' अशा आदरात झालं. प्रयोग एकदाचा संपला तेव्हा या छळाला चकटफू प्रसिद्धी पुरवण्याचा निर्बुद्ध उपक्रम करणार्या सेन्सॉरबोर्डाच्या अकलेबद्दलचा माझा अदमास पुन्हा एकदा 'जैसे थे' झाला.
एखाद्या कॉलेजवयीन शब्दबंबाळ कवड्यानं 'झोपडपट्टीत एक रात्र' अशा शीर्षकाचा निबंध लिहिला आणि एखाद्या हौशी नटानं त्याचं एकपात्री सादरीकरण करायचं ठरवलं तर जे होईल, ते यात आहे. जिभल्या चाटत सेक्सबद्दल आंबटशौकीन बडबड करणे; मुतणे, हगणे, संडास, मुठा (हे अनेकवचन मला अनाकलनीय आहे, तसाच उच्चारही) मारणे, या शब्दांचा होता होईल तेवढा कंटाळवाणा वापर करणे; प्रचंड मार्मिक काहीतरी बोलल्याच्या थाटात अनावश्यक शिव्या देणे - यांची भर. क्रांती, जयभीम, कॉम्रेड, समाजाचा उद्धार, परिवर्तन इत्यादी शब्दांचा केलेला हास्यास्पद तमाशा. स्टेजचा फक्त एक सप्तमांश भाग वापरणे, उरलेल्या जागेत तीन पात्रं तीन तास फक्त झोपलेली दाखवणे, या काही तांत्रिक लीळा.
मध्ये थोडी मिनिटं नायकाचं प्रेमप्रकरण दाखवताना हिंदी गाणी पार्श्वभूमीवर वाजली, तेव्हा त्या गाण्यांच्या एरवी दुर्लक्षित राहणार्या प्रचंड रंजनमूल्याची जाणीव होऊन मला गहिवरून आलं.
या नाटकाचे दोनाहून जास्त प्रयोग झाले असते, तर नायकाचं काम करणार्या नटाचं नक्की काय झालं असतं, असा भुंगा डोक्यात घेऊन नाट्यगृहाबाहेर पडले. भगत या लेखकाच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो.
(अवांतर शंका/कुतूहल)
'भूक'चे अनेकवचन मग नेमके काय असावे?
(समांतर:
- इंग्रजीत Fishचे अनेकवचन fish कधी होते, आणि fishes कधी होते?
- Waterला अनेकवचन कोणत्या परिस्थितीत नसते, आणि ते waters कधी होते?
- तद्वत, 'भूक'ला अनेकवचन सदासर्वकाळ नि सर्व परिस्थितींत नसावेच का? आणि जेव्हा असावे, तेव्हा ते काय असावे?
समांतर समाप्त.)
मोहन भागवतांचे भाषण..
मोहन भागवतांचे भाषण युट्यूबवर पाहिले. बरेचसे मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.
लिंक : http://www.youtube.com/watch?v=xm1Dz0MRo0E






ब्रावो
मिलिंद जोशी यांनी विविध कवींना कवितांना चाली दिल्या आहेत. काही चाली चांगल्या आहेत, काही ठिक तर क्वचित काही भयंकर. >> काही चांगल्या आहेत हे उगाच बोटचेपेपणे म्हणतोहेस. सार्या भिकार. या माणसाला कवितेतले भाव वगैरे कळतात का याची मला फार मोठी शंका आहेच पण उच्चाराची समजही सुमारच असावी. खडखडाट झाल्यासारख्य, सांधे बदलताना कर्कशता ऐकू यावी अशा चाली आहेत.
हा माणूस प्रचंड नार्सिसिस्ट आहे. समज अतिशय कमी. (सॉरी, कवितांची वाट लावणार्याला 'देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही' हा माझा रामशास्त्री बाणा जागृत झाला आहे) याचे एक विधान ऐका 'मी आणि माझी बायको एकाच वेळी एकच कविता दोन चालीत म्हणणार आहोत'. मला उत्सुकता की हे कसे साधणार. मग गाणे सुरू झाले नि याला नक्की कशाने बडवावे असा प्रश्न ताबडतोब माझ्या मनात उमटला. दोन वेगळ्या पट्टीत पण एकच स्वरावली गाणे म्हणजे वेगळी चाल? (याला कुणी 'मूर्च्छना भेद' वगैरे सांगितले नाही का, गुरु म्हणून यशवंत देवांचे नाव सांगतो आणि.) एका कवितेला म्हणे मला जरा अरेबियन धाटणीची चाल द्यायची इच्छा झाली (का ते विचारायचं नाही, माझी लहर) असं म्हणत सुरुवातीला चार कॉर्डस दिलरुबा किंवा तत्सम वाद्याच्या वाजवून पुढे चक्क जॅझची चाल होती. याला उलटा टांगून... जाऊ दे.
बरं कार्यक्रमाला काही संहिता असेल तर शपथ. मुक्ता नि मिलिंद आपले एकमेकाला 'वा: काय चाल, वा: काय कविता, वा: काय गाणं' म्हणत 'अहो रूपम अहो ध्वनिम' चालू होते. मला आपण चुकून सारेगमप च्या कार्यक्रमाला तर येऊन बसलो नाही ना याची शंका येऊ लागली होती. पुन्हा अधेमधे 'हे आमचे अरेंजर, हा आमचा गिटारिस्ट थोडे वाजवून दाखवतील' वगैरे चालू होते. (यालाच कुणीतरी वाजवायला हवी असे राहून राहून वाटत होते.) म्हणजे हा कवितांचा कार्यक्रम आहे की 'मिलिंद जोशी आणि मंडळी' (हो, गायिका त्यांच्या 'मंडळी'च आहेत) यांना प्रमोट करण्याचा इवेंट होता (करा हो, च्यायला आमच्या खिशातून पैसे काढून? ते ही तब्बल तीनशे रुपये! हिंदी/इंग्रजी चित्रपटांना इतके तिकीट नसते.) हेच कळेनासे झाले होते.
याउलट दोन आठवड्यानंतर पाहिलेला, तिशीदेखील न उलटलेल्या काही मुलांच्या ग्रुपने केलेला 'कट्टा ऑन द रॉक्स' हा त्यांच्याच कवितांचा कार्यक्रम दृष्ट लागावा असा झाला. या असल्या तथाकथित प्रोफेशनल्सच्या या 'नव्या रंगा'ला पार धुवून काढणारा.