Skip to main content

लेफ्टी की रायटी?

काही माणसं डावखुरे का असतात? हा एक अती पुरातन काळापासून विचारत आलेला प्रश्न आहे. प्लॅटो, चार्ल्स डार्विन, कार्ल सॅगन, डेब्बी मिलमन, स्टीफन जे गूल्ड, नोअम चॉम्स्की, अल्बर्ट आइन्स्टाइन (आइन्स्टाइनला डावखुर्‍यांच्या कळपात ओढण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. परंतु तो काही गोष्टीसाठी उजव्या हाताचा व इतर काही गोष्टीसाठी डाव्या हाताचा वापर करत असल्यामुळे खर्‍या अर्थाने तो डावखुरा नाही!), अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर इत्यादी डावखुर्‍या सेलिब्रिटीजनी या विषयीच्या अभ्यासकांना बुचकळ्यात टाकले आहे. Wired या ई मॅगेझिनचा संपादक (जो स्वतः डावखुरा आहे!) डेव्हिड वुलमन यानी अलिकडेच A Left Handed Turn Around the World हे पुस्तक लिहिले असून त्यात डावखुरेपणाबद्दलच्या रहस्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 200 वर्षापासूनचे काही आत्मचरित्र, व मनोविश्लेषणात्मक पुस्तकं वाचून या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्यानी केला आहे. यासाठी पॅरिसच्या सायन्स म्युझियम येथील डॉ ब्रोका यांच्या मेंदूच्या संग्रहापासून डावखुर्‍यांच्या वंशक्षमतेला निर्बंध घातलेल्या स्कॉटलंड येथील किल्ला व बर्कले येथील न्यूरोसायन्स लॅबपासून जपान येथील गोल्फ क्लब पर्यंतच्या प्रवासातील अनुभवावरून त्यानी काही निष्कर्ष काढलेले असून त्यामुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झालेले आहे.

खरे पाहता डावखुरेपणा हा केवळ वैज्ञानिकांच्या औत्सुक्याचा भाग नाही. कित्येक शतकापासून त्यामागे अंधश्रद्धा, सामाजिक बहिष्कारासारख्या रूढींचा अतिरेकही आहे. व काही वेळा डावखुर्‍यांचा अहंगंड या गोष्टीमुळेसुद्धा सामाजिक वातावरण बिघडत आलेले आहे. या सगळ्या गोष्टीवर लेखकानी टिप्पणी केली आहे.

क्रिश्चन धर्माचा प्रभाव असलेल्या युरोप व उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील कित्येक राष्ट्रामध्ये डावखुरेपणाचा संबंध पापकृत्याशी, सैतानी वृत्तीशी किंवा परमेश्वराला न आवडणार्‍या गोष्टींशी जोडलेला आहे. कॅथोलिक पंथियांच्या मते डावखुरेपणा हा क्रूरतेचा कळस ठरत असतो. एखाद्यावर संकट कोसळल्यास डावखुर्‍या प्रीस्टनी बाप्तिस्मा केला असेल असे स्कॉटिश लोकांना वाटते. बायबलमध्ये अनेक ठिकाणी हाताबद्दलचे उल्लेख आहेत. विशेषकरून परमेश्वराशी जवळीक साधण्यासाठी उजव्या हाताला प्राधान्य देण्यात आले आहे. रॅबीच्या समोर जाताना ज्यू पंथियांना आपला डावा हात झाकून घ्यावा लागतो. हिदू धर्मातसुद्धा स्त्रियांचे गौण स्थान अधोरेखित करण्यासाठी बायकोला नवर्‍याच्या डावीकडे बसण्यास भाग पाडतात. इस्लाम धर्मसुद्धा डाव्या हातानी केलेल्या कृत्याला निषिद्ध मानतो. कार्ल सॅगन यांनी डावखुर्‍यांच्या हीन दर्जाबद्दल विचार करताना अविकसित देशातील शौचविधीनंतरच्या स्वच्छतेसाठी डाव्या हाताचा वापर होत असल्यामुळे या निष्कर्षाप्रत पोचतो. वुलमन याला मात्र डावखुरेपणाबद्दलच्या हेटाळणीचे मूळ फार खोलवर आहेत असे वाटते.

मुळात इंग्रजीतील left हा शब्दच तिरस्कारार्थी वापरात असलेला शब्द आहे. Left म्हणजे बिघडलेले, अधू असलेले, गुंतागुंतीचे, बरोबर नसलेले या अर्थाने वापरात आलेला शब्द आहे. लॅटिन भाषेत तर leftसाठी sinisterया अर्थाच्या जवळपासचा शब्द आहे. आजसुद्धा डावखुरेपणाबद्दल अनेक गैरसमजुती आहेत. उघडपणे नसले तरी मनातल्या मनात त्यांच्याबद्दल नाराजी आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 10 – 12 टक्के असलेले हे लेफ्टी गोंधळात भर घालत आहेत अशी रायटीजची नेहमीची तक्रार असते. कदाचित ही अफवा मुद्दामहून पसरली जात असावी असाही संशय व्यक्त केला जात आहे.

अनेकाना डावखुरा म्हणजे जो डाव्या हाताने लिहितो तो हाच अर्थ अभिप्रेत असतो. व त्यात फार वावगेही नाही. परंतु लिहिण्याची क्रिया शेवटी येते. त्या अगोदर फेकणे, खाणे, यासारख्या रोजच्या व्यवहारातील क्रिया करताना डावा हातच पुढे येत असल्यामुळे त्यांनासुद्धा लेफ्टी असेच म्हणायला हवे. आपला कुठला हात मजबूत आहे याची एकदा जाण आल्यानंतर ती व्यक्ती लेफ्टी की रायटी हे ठरविणे सोपे जाते. मुळात उजवा की डावा ही व्याख्याच वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकणारी ठरत आहे. माणूस उत्क्रांत होत असताना मानवी व्यवहारात अशा प्रकारचा अपवाद कशामुळे आला व समाज उजव्या हातालाच का म्हणून महत्व देत आहे, हा एक संशोधनाचा विषय होत आहे.

एका निरीक्षणानुसार अनेकांना नैसर्गिकरित्या डाव्या हातानी कार्य करावेसे वाटत असते. परंतु पालकांच्या धाकामुळे त्यांना आपली ही नैसर्गिक पसंती व्यक्त करता येत नाही. पाल्यांनी उजव्या हातानीच जेवण वा लेखन करण्याच्या आग्रहापायी पालक मारून मुटकून प्रयत्न करत असतात. डाव्या हाताने लिहू नये म्हणून डाव्या हाताच्या आंगठ्याला चटके देणे, वा आंगठा बांधून ठेवणे अशा गोष्टी सर्रासपणे कुठल्याही समाजात आढळतात. कित्येक बालकांच्या आंगठ्यावर या खुणा अजूनही दिसत असतील.

1970 च्या सुमारास Edinburgh Handedness Inventoryया नावाचा तक्ता भरल्यास आपण लेफ्टी की राइटी याचा अंदाज य़ेत असे. यात लिहिणे, चित्र काढणे, फेकणे, कात्री धरणे/कात्रीने कापणे टूथब्रश वापरणे, फोर्कने खाणे, केरसुणी वापरणे, काडी पेटविणे, डबा उघडणे, इत्यादी गोष्टींची यादी होती व या क्रिया डाव्या हाताने केल्या जातात की उजव्या हाताने केल्या जातात की दोन्ही हातांचा आलटून पासटून वापरला जातो यांच्या खर्‍या उत्तरावरून लेफ्टी की रायटी हे ठरविले जात होते.

जरी तक्ता भरून आपण डावखुरे आहोत की नाही हे कळत असले तरी अशा प्रश्नांच्या उत्तरामध्ये काही अंशी शंकेला जागा असते. नेमके कसे मांडावे हेच कळत नसते. यापेक्षा या संबंधात आपला मेंदू कसा काम करतो हे समजून घेणे कदाचित योग्य ठरेल.

आपला मेंदू हा आपल्या शारीरिक अवयवांचे नियंत्रण करतो, हे सर्वमान्य विधान आहे. गुणगुणत हल्ला करणार्‍या डासांना मारण्यासाठी आपल्या मेंदूचा डावा भाग उजव्या हाताला हालचाल करण्याची आज्ञा देतो. मेंदूतील Left motor cortex उजव्या हाताच्या स्नायूंचे नियंत्रण करतो. डाव्या हातासाठीच्या सूचना मेंदूच्या उजव्या भागातील Right motor cortex कडून दिल्या जातात. परंतु हे होत असताना मेंदूच्या दोन्ही गोलार्धातील इतर भागातही हालचाली होतच असतात. या गोलार्धांचा फक्त हाताच्या नियंत्रणाशी संबंध नसून डोळे, कान, पाय अशा, जेथे जेथे स्नायूंची पोच आहे तेथील सर्व अवयवांचे नियंत्रण प्रमस्तिष्क गोलार्ध करत आसतात. त्यामुळे heart stroke नंतर जेव्हा शरीराची एक बाजू लुळी पडते, तेव्हा त्यावरील उपचारासाठी विरुद्ध बाजूच्या प्रमस्तिष्क गोलार्धाची चाचणी घेतली जाते.

मेंदूतील डाव्या व उजव्या गोलार्धांच्या रचनेत भरपूर फरक आहे. मेंदूच्या या दोन गोलार्धात करोडोनी neuralच्या जोडण्या आहेत. हे जरी खरे असले तरी लेफ्टी फक्त उजव्या भागातील मेंदूद्वारे किंवा रायटी फक्त डाव्या भागातील मेंदूद्वारेच विचार करत असतात, ही चुकीची समजूत आहे. प्रत्येक गोलार्धात विरुद्ध बाजूच्या अवयवांचे नियंत्रण करणार्‍या motor cortexचे क्रॉस वायरिंगच्या असंख्य जोडण्या असून मेंदूतील ही क्लिष्ट रचना माणसाच्या व्यक्तिमत्वाबद्दल वा तो करत असलेल्या विचाराबद्दल काहीही सांगू शकत नाही हेही तितकेच खरे आहे.

आपला मेंदू कुठल्या हाताला जास्त पसंत करतो हे सांगता येईल का – या प्रश्नाबद्दल जास्तीत जास्त खोलात जाऊन विचार करणार्‍यात पॉल ब्रोका या फ्रेच सर्जनचा सगळ्यात वरचा क्रमांक असेल. 1861 साली – म्हणजे डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताच्या प्रसिद्धीनंतरच्या दोन वर्षानी – डॉ. ब्रोका यांच्याकडे दोन विचित्र केसेस आल्या. अपस्मारामुळे फक्त टॅन हा एकच शब्द उच्चारणार्‍या लॅबोर्नला आपण जे बोलतो ते कळत होते परंतु बोललेल्या गोष्टीवरील त्याचे विचार तो शब्दात मांडू शकत नव्हता. ब्रोकाला याचे आश्चर्य वाटले. त्याच्या मते लॅबोर्नच्या मेंदूचा उजवा भाग क्षीण झाल्यामुळे मोटरच्या नियंत्रणात काही त्रुटी राहिल्या असतील. व त्यामुळेच शब्दोच्चार, दृष्टिदोष वा इतर काही मेंदूशी संबंधित छोट्या मोठ्या गोष्टीत उणीवा राहिल्याची शक्यता असेल.

लॅबोर्नचा काही दिवसात मृत्यु झाला. डॉ. ब्रोका यानी लॅबोर्नच्या मेंदूचे गूढ उकलण्यासाठी त्याच्या मेंदूचे विच्छेदन केले. मेंदूच्या left frontal cortex च्या येथे एक गाठ होती. कदाचित त्या गाठीमुळेच त्याला बोलता येत नसावे. परंतु हा निष्कर्षही त्याला पुरेसा वाटत नव्हता.

याच सुमारास ब्रोकाकडे अजून एक वृद्ध पेशंट आला होता. लेलॉगसुद्धा काही मोजकेच शब्द उच्चारू शकत होता. पुढील दोन आठवड्यात त्याचा मृत्यु झाला. त्याच्याही मेंदूचे विच्छेदन करण्यात आले. left frontal cortex जवळ कॅन्सरसदृश गाठ होती. हे दोन्ही मेंदू पॅरिसच्या मेंदू संग्रहालयात प्रदर्शनासाठी संभाळून ठेवलेल्या आहेत.

परंतु काही रुग्णांच्याबाबतीत अभ्यास करताना काही विचित्र गोष्टी लक्षात आल्या. डाव्या मस्तिष्काला इजा असलेल्यांची वाचा व्यवस्थित होती. व काहींच्या बाबतीत उजव्या मस्तिष्काला इजा झाल्यामुळे बोलता येत नव्हते. यावरून नीट बोलता न येणे किंवा उच्चारातील त्रुटी आणि मेंदूच्या कुठल्या भागाला इजा आहे याचा एकमेकाशी संबंध नाही, असेच म्हणावे लागेल. तरीसुद्धा डॉ. ब्रोकांच्या या अभ्यासामुळे हाताच्या नियंत्रणाविषयी वैज्ञानिकांच्यात कुतूहल निर्माण झाले व वैज्ञानिक निष्कर्ष व सामान्याच्यांतील समज हा पुन्हा एकदा वादाचा विषय झाला.

19व्या शतकातील युरोपियन्सना आपण डावखुरे आहोत यात काही तरी अपराध आहे असे वाटत होते. डावखुर्‍यांच्यात एका प्रकारचा न्यूनगंड होता. ही गोष्ट उघडपणे सांगण्यास संकोच वाटत होता. परंतु कितीही प्रयत्न केले तरी खाणे, पिणे, लिहिणे, पुस्तकाचे पान उलटणे, इत्यादी गोष्टी करताना ते उघडे पडत होते. कारण त्यांचा डावा हातच नेहमी पुढे येत असे. गंमत अशी आहे की उजव्या हाताचा वापर करणार्‍यांपैकी 99 टक्के लोकांच्या भाषेचे नियंत्रण डावे मस्तिष्क व 70 टक्के डावखुर्‍यांच्या भाषेचे नियंत्रण उजवे मस्तिष्क करत आहे. जरी हे proportion विचित्र वाटत असले तरी ते वास्तव आहे. याच्यावरून डाव्या मेंदूत व उजव्या मेंदूत – किमान भाषेच्या बाबतीत तरी – फार मोठा फरक नसावा. किंवा भाषेचे नियंत्रण कमी अधिक प्रमाणात दोन्ही मेंदूच्या नियंत्रणाखाली असावेत.

डॉ. ब्रोका यांनी या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या नसल्यामुळे डावखुर्‍यांचा उजवा मेंदूच भाषेचे नियंत्रण करतो हा समज पुढील 50 -60 वर्षे – अगदी पहिल्या महायुद्धाच्या काळापर्यंत – प्रचलित होता. पहिल्या महायुद्धातील वैद्यकीय उपचाराच्या वेळी लेफ्टींच्या भाषेचे नियंत्रण उजव्या मेंदूकडेच आहे असे निर्विवादपणे सिद्ध करता आले नाही. त्यामुळे हा समज हळू हळू नाहिसा होत गेला.

परंतु लेफ्टींच्या बाबतीत अनेक व अनेक प्रकारचे सिद्धांत मांडलेले आहेत. काही सिद्धांतांना ठोस वैज्ञानिक आधार नसला तरी त्या अजूनही न उलगडलेल्या कोड्यांच्या स्वरूपात circulationमध्ये आहेत. एका गृहितकानुसार फार फार वर्षापूर्वी माणसामध्ये उजव्या हाताचा व डाव्या हाताचा वापर करणार्‍यांची संख्या समसमान होती. परंतु काही काळानंतर डाव्या हाताचा वापर करणार्‍यांची संख्या हळू हळू कमी होत गेली. कारण एकमेकासमोरच्या लढाईत उजव्या हातात तलवार/आयुध धरणार्‍यांची सरशी होत होती. व मेलेल्यांच्यात डावखुर्‍यांची संख्या जास्त होती. शिवाय आपले हृदय डाव्या बाजूला असल्यामुळे उजव्या हातात तलवार धरणारे जास्त सुरक्षित राहिले. हळू हळू या गुणवैशिष्ट्यांच्या जनुकात वाढ होत गेली व डावखुर्‍यांची संख्या 10 -12 टक्क्यावर आली.

या गृहितकाला तसा कुठलाच आधार नाही. कारण तलवार वा आयुधांचा शोध अलिकडचा आहे. व जनुकीय उत्क्रांती व बदल इतक्या साध्या कारणावरून व इतक्या सहजासहजी होत नाहीत.

याच्या अगदी तद्विरुद्ध लेफ्टींच्या श्रेष्ठत्वाबद्दल विधान केले जात असते. टेनिस, क्रिकेट, बॉक्सिंग इत्यादी क्रीडा प्रकारात रायटींच्यापेक्षा लेफ्टीच जास्त चमकतात, व वरचढ ठरतात, असा अनुभव आहे. डाव्या हातानी टेनिसचे फटके मारणार्‍या जॉन मॅकेन्रोचा टेनिसचा खेळ ज्यानी पाहिला असेल त्यांना हे विधान नक्कीच पटेल. परंतु डाव्या हातात टेनिसची रॅकेट व डाव्या हातात तलवारीसारखे आयुध यात फार मोठा फरक आहे – तलवार जीवन मरणाचा निर्णय घेतो, रॅकेट नाही.

काही फ्रेंच वैज्ञानिकांच्या मते इतिहासपूर्व काळातील समाजात डावखुर्‍यांना पुनरुत्पादन प्रक्रियेसाठी काही विशेष संधी प्राप्त झाले असतील. त्या समाजातील खून, मारामारी, हत्या अपंगत्व इत्यादींच्या आकड्यावरून कदाचित या निष्कर्षाप्रत ते पोचले असतील. तरीसुद्धा उजव्यांच्या प्रभाव असलेल्या समाजात डावखुरे आक्रमक नसतानासुद्धा अजूनपर्यंत कसे काय तगून राहिले आहेत, हे एक न सुटणारे कोडे ठरत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गृहितकांमध्ये काही दम नाही असेच म्हणावे लागेल.

1970 च्या सुमारास हार्वर्ड विद्यापीठातील एका नसतज्ञाने केलेल्या विधानाला कित्येक वर्षे कुणीही विरोध केला नाही. त्याच्या मते काही पुरुषांच्यातील टेस्टोस्टेरोनच्या वाढत्या ग्रंथस्रावामुळे गर्भातील बाळाच्या मेंदूत जनुकीय बदल होण्याची शक्यता असून जन्मलेले मूल लेफ्ट ओरियंटेड होऊ शकेल. या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यानी स्त्रियांपेक्षा पुरुषामध्येच जास्त संख्येने डावखुरे आहेत हा पुरावा सादर केला. मुळात आईच्या पोटात गर्भ वाढत असताना बॅलन्स संभाळण्यासाठी कुठल्या बाजूने हात टेकवत असतो यावर लेफेटी की रायटी हे ठरत असावे. बहुतेक मुलं उजव्या कुशीचाच वापर करत असल्यामुळे, रायटींचा संख्या आपोआपच जास्त असू शकते.

पुन्हा एकदा या विधानालासुद्दा ठोस वैज्ञानिक पुरावा नव्हता. त्यामुळे मेंदू व जनुकीय स्थित्यंतर यांचा वैज्ञानिक विचार करू लागले. 1985च्या दशकात मॅरियन ऍनेट या संशोधिकेने लेफ्टी – रायटींच्याबद्दल अभ्यास करून Right Shift Theory हा प्रबंध सादर केला. तिच्या मते माणूस सोडून इतर प्राण्यामध्ये डावे – उजवे यांचे प्रमाण 50 -50 टक्के असे प्रमाण असते व मनुष्य प्राण्यात हेच प्रमाण 10 – 90 टक्के असते. माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रारंभीच्या कालखंडात लेफ्टीचे प्रमाण जास्त, नंतर त्याचा प्रभाव कमी होत होत 50 – 50 व नंतरच्या कालखंडात 10 – 90 टक्के असे घसरला असे एक ढोबळ विधान तिने केला आहे. आणि याचे मूळ मेंदूतील जाणिवेच्या (cognitive) प्रक्रियेत – ज्यात भाषासुद्धा आलेली आहे – शोधता येते. कदाचित हा शिफ्ट एखद्या विशिष्ट जनुकामुळेसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा प्रभाव टेस्टोस्टेरोनश्रावामुळे, की जनुकीय बदलामुळे की भोवतालच्या परिस्थितीमुळे हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. बाळ गर्भात असताना पेशीतील माहितीचे देवाण घेवाण होत असते हे खरे असले तरी डावखुरेपणा हा आनुवंशिक गुण आहे, हे विधान धार्ष्ट्याचे ठरेल. ऍनेटच्या गृहितकात जनुकच डावखरेपणाला सर्वश्री जवाबदार आहेत असे सुचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे Right Shift Theoryला कितपत महत्व द्यायचे हे ठरवावे लागेल.

डावखुरेपणाविषयी इतक्या मोठ्या प्रमाणात लिखित साहित्य असूनसुद्धा आपल्या शरीरातील या गुण विशेषाबद्दल फारच कमी माहिती आहे. संपूर्ण मानवी शरीराचा जनुकीय नकाशा आपल्या डोळ्यासमोर उपलब्ध असूनसुद्धा अजूनही हे कोडे उकलण्याचे प्रयत्न करतच आहोत. त्यातल्या त्यात ऍनेटचे गृहितक विज्ञानाच्या जवळपास आहे. त्यामुळे व्यक्तीचा उल्लेख करताना लेफ्टी की रायटी असे न करता रायटी की नॉन रायटी असे करायला हवे.

जर वैज्ञानिकरित्या सिद्धांतात सुसंगती नसल्यास लेफ्टीची कारणं आणखी कुठेतरी शोधावे लागतील. कदाचित डावखुरेपणा हे दैवी प्रकोप वा दैवी चमत्कार असू शकेल. किंवा एखादी अतींद्रीय शक्ती त्यामागे असू शकेल. परंतु अशा प्रकारचे अवैज्ञानिक स्पष्टीकरणं कार्ल सॅगनच्या Baloney Kitच्या जवळपाससुद्धा येऊ शकणार नाहीत.

याच संदर्भात मायकेल कोर्बालिया या न्यूझिलंड येथील संशोधकाने मेंदूच्या दोन्ही गोलार्धातील asymmetry याला कारणीभूत आहे, असे विधान केले आहे. गंमत म्हणजे ज्यांच्या मेंदूच्या दोन्ही भागात asymmetry असते, ते चमत्कार, अतींद्रिय शक्ती अशा गोष्टीवर विश्वास ठेवत असतात. व काही वेळा ते अत्यंत सर्जनशील असू शकतात. परंतु अशा प्रकारचे बिनबुडाचे विधानं वा ऐकीव माहिती ग्राह्य धरता येत नाहीत.

सर्जनशीलतेचा व मेंदूच्या asymmetryचा काही संबंध असल्यास अल्बर्ट आइन्स्टाइनच्या मेंदूचा अभ्यास करणे योग्य ठरू शकेल. त्याच्या मेंदूच्या अभ्यासावरून सर्जनशीलतेविषयी जास्त माहिती मिळू शकेल. एका संशोधकांच्या मते अशा प्रकारे asymmetry मेंदू असलेले सर्जनशील तरी असतील किंवा मनोरुग्ण तरी असतील. काही योगायोगामुळे आइन्स्टाइनचे नाव सर्जनशील व्यक्तींच्या यादीत आहे . नाही तर.....

हाच प्रकार डावखुर्‍यांच्या बाबतीतही होत असावे... संशोधनाचे दरवाजे उघडे आहेत... वाट पहावे...

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 15:32

लेखातली शास्त्रीय माहिती थोडीफार आधी वाचली होती, पण बरीच माहिती नवी होती. धन्यवाद!

मीही डावराच आहे. (सांगली-मिरज-कोल्हापुरात डावखुरा-डावखोरा न म्हणता डावरा म्हणतात.) लहानपणी लिहायचो देखील डाव्या हाताने. पण आजोबांच्या मताप्रमाणे माझे 'हस्तांतर' करण्यात आले. तरी यत्ता पैली-दुस्रीपरेंत डाव्या हाताने मोडक्यातोडक्या अक्षरांत का होईना, लिहू शकत असे. पुढे मात्र सवय अज्जीच मोडली. त्यामुळे अशी जबरदस्ती केली जाते हे पाहिले आहे. पण घरी शक्यतोवर प्रसाद घेणे इ. प्रसंग सोडले तर बाकी काही त्रास नसे. क्रिकेट, ब्याडमिंटनादि खेळांत मात्र डावरेपण टिकून राहिले. बोलिंग डावरी तर ब्याटिंग उजवी. ब्याडमिंटनादि खेळांतही रॅकेट डाव्या हातातच घ्यायचो, अजूनही घेतो. काही जड वस्तू उचलायची असल्यास डावा हातच पुढे येतो.

पुढे पुढे असे कैक डावरे लोक भेटले ज्यांचे माझ्याप्रमाणेच हस्तांतर करण्यात आलेले होते. त्यामुळे असे करू नये हे मत अजून दृढ झाले आहे.

'न'वी बाजू Tue, 09/09/2014 - 16:39

In reply to by बॅटमॅन

मीही डावराच आहे.

काय सांगता काय? बॅटमॅन आणि लेफ्टिष्ट? अहो आश्चर्यम्!

माझे 'हस्तांतर' करण्यात आले.

अरेरे.

पुढे पुढे असे कैक डावरे लोक भेटले ज्यांचे माझ्याप्रमाणेच हस्तांतर करण्यात आलेले होते. त्यामुळे असे करू नये हे मत अजून दृढ झाले आहे.

सहमत!

सविता Tue, 09/09/2014 - 15:44

मी पण डावरीच!

लहानपणी मार देऊन जेवणे, प्रसाद घेणे इत्यादीसाठी उजवा हात वापरायची सक्ती करण्यात आली. सुदैवाने प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी डाव्या हाताने लिहीत असेल तर उजव्याची सक्ती करू नका असे समजावल्याने तिथे जबरदस्ती झाली नाही.

तरी भाजी वगैरे करताना मी डाव्या हाताने ढवळते तेव्हा आई दर वेळी वैतागते. उजव्या हाताने जास्त चांगले ढवळता येते शिवाय सांडलवंड होत नाही ही तिची थियरी आहे (जी चूक आहे हे मी तिला पुराव्यानिशी पटवून दिले तरी ती दर वेळी तेच टुमणं लावते)

उजव्या हाताने स्वतःचे नाव इत्यादी लिहीता येण्याइतपत प्रगती आहे. उजव्या हाताने डाररेक्ट जेवता येते पण जर मी खाताना उजव्या हातात चमचा धरला तर हात प्रचंड थरथरतो आणि तोंडाशी येईस्तोवर निम्म्याहून अधिक पदार्थ सांडलेले असतात.

बाकी माझ्या डेस्कावर "Everyone is born right handed, only the greatest can overcome it!" ही अत्यंत आवडती लाइन कायम लावलेली असते.

पोरगी उज्व्या हाताने सगळे करायला लागली तेव्हा ती माझ्यासारखी डावरी ( आणि स्पेषल ;) ) नाही ह्यामुळे थोडा विरस झाला!

'न'वी बाजू Tue, 09/09/2014 - 17:07

In reply to by सविता

सुदैवाने प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी डाव्या हाताने लिहीत असेल तर उजव्याची सक्ती करू नका असे समजावल्याने तिथे जबरदस्ती झाली नाही.

थोडक्यात, मुख्याध्यापक अ‍ॅण्टाय-डावरी नव्हते तर!

विनोदाचा भाग सोडा, पण पंगतीत / बाकावर समूहाने जेवायला बसताना डावर्‍यांना शक्य तोवर एका टोकाला बसावे लागते (नाहीतर, बाकीचेही डावरे नसल्यास म्यूच्युअल कोपरखळ्यांचा सुकाळ असतो), याव्यतिरिक्त डावरेपणातल्या ऑबव्हियस अशा कोणत्याही 'अडचणी' निदान माझ्या तरी दृष्टिक्षेपात येत नाहीत.

- (डावरा नाही डावर्‍याचा बाप, कोपरखळ्याग्रस्त) 'न'वी बाजू.

अनुप ढेरे Tue, 09/09/2014 - 17:11

In reply to by 'न'वी बाजू

देवनागरी, विंग्रजी लिहिताना त्रास होतो का डाव्या लोकांना? आपल्याच लिहित्या हाताने आधी काय लिहिलय ते न दिसणं वगैरे?
ओबामा थोडा विचित्रं लिहितो.

पण सगळे डावे असं लिहित नाहीत. ते काय उपाय करतात?

अतिशहाणा Tue, 09/09/2014 - 17:14

In reply to by अनुप ढेरे

मी अमेरिकेत बऱ्याच लोकांना आपल्याला विचित्र वाटेल अशा पद्धतीने पेन धरुन लिहीत असल्याचे पाहिले आहे. ही विवक्षित पद्धत शाळेतच शिकवली जाते काय?

अनुप ढेरे Tue, 09/09/2014 - 17:17

In reply to by अतिशहाणा

पेन धरण्याबद्दल नाही बोलत मी. त्याचा पंजा उलटा आहे त्या बद्दल बोलतोय. पण उमेरिकन लोकांच्या पेन धरण्याच्या पद्धतीच्या निरिक्षणाशी सहमत.

सविता Tue, 09/09/2014 - 17:28

In reply to by अनुप ढेरे

आपल्याच लिहित्या हाताने आधी काय लिहिलय ते न दिसणं वगैरे?

भारतात आपण ज्या पद्धतीने पेन पकडतो, त्यात हा त्रास होत नाही. मला कधी झाला नाही. पण आम्रविकेतल्या लोकांना (आपल्याला) विचित्र वाटू शकेल अशा पद्धतीने पेन पकडून लिहीताना पाहिले आहे.

अपण इकडे (भारतात) सहसा असे लिहीतो.

तर तिकडे


असे किंवा याची व्हॅरिएशन्स पाहिली आहेत. या पद्धतीत नक्कीच तुम्ही म्हणता तसा त्रास होऊ शकतो.

अनुप ढेरे Tue, 09/09/2014 - 17:33

In reply to by सविता

एकच चित्र दिस्तय मला ज्या ओबामा स्टाईल पेन पकडलं आहे. मला वाटत होत की

असं पकडताना त्रास होत असेल व त्यामुळे उलटा हात/ वाकडी वही असे उपाय करायला लागत असतील.
अपसव्य लिप्यांसाठी हाच प्राब्लेम उजव्या लोकांना होइल. (तेही खरच म्हणा, अपसव्य लिप्या आणि उजवी लोकं यांच वाकड असणारच ;))

सुनील Tue, 09/09/2014 - 16:07

छान माहिती.

भारतीयांत अन्य प्रांतांपेक्षा गुजरातेत डावर्‍यांचे प्रमाण अन्य प्रांतीयांपेक्षा अंमळ जास्त आहे, असे माझे निरीक्षण आहे. हे खरे आहे काय? असल्यास त्याचे कारण काय असावे?

मन Tue, 09/09/2014 - 16:12

In reply to by सुनील

डाव्यांचे प्राबल्य आहे ते बंगालमधेच आणि काही अंशी केरळात.
बाकी सगळे अगदि ह्ह्यॅ:

उदय नागांवकर Tue, 09/09/2014 - 16:52

In reply to by सुनील

माझ्या आजपर्यंतच्या ढोबळ निरीक्षणानुसार भारतीयांमध्ये गुजराथी माणसे जास्त डावरी दिसून येतात. आणि ते डावऱ्यापणाला कमी मानत नाहीत. फक्त देवांच्या विधी मध्ये जाणीवपूर्वक उजवा हात वापरत असावेत. मात्र गरबा डाव्या हाताच्या टाळीनुसारच खेळतात. कलाकुसर-कारीगिरी ह्याची आवड ह्या समाजाचे वैशिष्ठय आहे. बाकी मला डावखुरेपणाचा वेगळा विशेष प्रभाव ह्या समाजाकडे बघून येत नाही.

उदय नागांवकर

वामन देशमुख Fri, 12/09/2014 - 11:59

In reply to by सुनील

भारतीयांत अन्य प्रांतांपेक्षा गुजरातेत डावर्‍यांचे प्रमाण अन्य प्रांतीयांपेक्षा अंमळ जास्त आहे, असे माझे निरीक्षण आहे. हे खरे आहे काय? असल्यास त्याचे कारण काय असावे?

भारताच्या नकाशात गुजरात डाव्या बाजूला असतो/ दिसतो म्हणून असेल कदाचित! :)

ऋषिकेश Tue, 09/09/2014 - 16:10

डावर्‍यांना उजवे केले तर इतरही अनेक ठिकाणी त्याचा परिणाम जाणवतो असे लक्षात आले आहे. उदा. अनेकांना लहानणणी अशी जबरदस्ती झाली असता पुढे तोतरेपणा/ जड जीभ / काही ठराविक मुळाक्षरांचा उच्चार न जमणे अशा तक्रारी उद्भवलेल्या दिसतात. तर काही व्यक्तींना यातून काही मानसिक गंडांचे आरोपण होते असेही काहि ठिकाणी वाचले आहे.

माझी मुलगी तुर्तास लेखनाच्या बाबतीत (रेघोट्या मारण्याच्या बाबतीत), खाण्याच्या बाबतीत अँबिडेक्सट्रस आहे - मात्र कोणतीही क्रिया करायला डावा हात आधी सहज पुढे करते त्यावरून डावरी होईल असे वाटते. त्यामुळे (उगाच) आनंद झाला आहे. तसे झाले तर ती सध्या आमच्या घरातील पहिली डावरी व्यक्ती असेल :)

प्रकाश घाटपांडे Tue, 09/09/2014 - 16:39

उजवेखोर लोकांनी अधुन मधुन डाव्या हाताने गोष्टी करण्याचा व्यायाम करावा. उदा. डाव्या हाताने टुथब्रशने दात घासणे, डाव्या हाताने लिहिणे. मेंदुला चालना मिळते.

प्रकाश घाटपांडे Tue, 09/09/2014 - 16:59

सकाळी फिरताना एक गृहस्थ रामाचा प्रसाद द्यायचे त्यावेळी माझा डावा हात पुढे यायचा. मग ते म्हणायचे उजवा हात. मी म्हणायचो तो भुभु लोकांना लावल्याने खराब झाला आहे म्हणुन डावा. मग तेच म्हणायचे डावा काय अन उजवा काय आपल्याच शरीराचे भाग. मग मी प्रसाद खायचो.

मी Tue, 09/09/2014 - 23:24

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुण्यातल्या एका प्रसिद्ध पंचेवाल्यांच्याकडे पंच्याची खरेदी केल्यावर पैसे दिले, पंचेवाले १ रुपया सुट्टे देणे लागत होते, माझ्या उजव्या हातात पिशव्या असल्याने सहज डावा पुढे केला तर आजोबांनी पैसे देण्यास नकार दिला, शेवटी सव्यापसव्य केल्यावर उजव्या हतावर एक रु. टिकवला.

सगळ्या सोयी बहुदा उजव्या लोकांच्या सोयीच्या असतात, हॅंडल, किबोर्ड, फोन्स, कमोडचे पेपर नॅपकिन्स, जेट स्प्रेची जागा, नळ, निदान भारतात ड्रायव्हरची जागा.

डावखुरे लोकं शर्टाच्या उजव्या आणि पँटच्या डाव्या खिशात गोष्टी ठेवतात काय?

बॅटमॅन Wed, 10/09/2014 - 01:54

In reply to by मी

डावखुरे लोकं शर्टाच्या उजव्या आणि पँटच्या डाव्या खिशात गोष्टी ठेवतात काय?

शर्टाच्या उजव्या बाजूस खिसा करून घेतला नाय. आणि पँटच्या दोन्ही खिशांत गोष्टी ठेवतो.

'न'वी बाजू Wed, 10/09/2014 - 06:55

In reply to by लॉरी टांगटूंगकर

(गाडीचा 'कान' बोले तो, इग्निशनच ना?)

उंदराच्या सेटिंगबद्दल समजू शकतो, पण गाडीचा कान (उजव्या हाताने) पिळणे हे डावखुर्‍या माणसास (कदाचित किञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्चित कष्टप्रद असू शकले, तरीही) अशक्यप्राय नसावे. (आय मीन, एका प्रवासात अशी कितीदा चावी पिरगळावी लागते?)

(बादवे, राइट-ह्याण्ड-ड्राइव्हवाल्या गाड्यांत इग्निशन स्टिअरिंग व्हीलच्या कुठल्या बाजूला असते? उजव्या, की डाव्या?)

'न'वी बाजू Wed, 10/09/2014 - 08:20

In reply to by लॉरी टांगटूंगकर

आणि क्लचचे काय? त्याला जोर लावावा लागत नाही काय? आणि (स्कूटरीत) तो तर डाव्या हाताशी असतो ना? (स्कूटरीत गियर बदलायला चांगला कंट्रोल लागत नाही काय? आणि मग तमाम उजवखुरे आजतागायत डाव्या हातानेच गियर बदलत स्कूटरी चालवत आले ना? आली त्यांना कधी अडचण?)

नितिन थत्ते Wed, 10/09/2014 - 08:24

In reply to by 'न'वी बाजू

लेफ्टिष्ट अर्थव्यवस्थेत ज्या गाड्या (अंबाशिटर व फ्याट) भारतात मिळत असत त्यांची इग्निशन की डायवरच्या डाव्या बाजूस डॅशबोर्डावर असे.

'न'वी बाजू Wed, 10/09/2014 - 08:31

In reply to by नितिन थत्ते

माहितीबद्दल धन्यवाद.

आणि आता नव्या अर्थव्यवस्थेतल्या गाड्यांचे काय?

बॅटमॅन Wed, 10/09/2014 - 11:52

In reply to by लॉरी टांगटूंगकर

फोरव्हीलर चालवली नाय. टूव्हीलरमध्ये काय ऑप्षनच नस्तो.

बाकी उंदराचे म्हणाल तर उजव्या हातानेच ऑपरेटवतो. समहौ पूर्ण डावरेपण नसेलही.

अतिशहाणा Tue, 09/09/2014 - 17:08

माझे वडील, भाऊ, पुतणी आणि बायको अशा चार डावखुऱ्या व्यक्ती आमच्या घरात आहेत. बहुदा माझ्या वडिलांना मारुनमुटकून उजव्या हाताचा वापर करायला सांगितले असावे त्यामुळे त्यांचे हस्ताक्षर फारच दिव्य झाले. सुदैवाने त्यांच्या अनुभवावरुन माझ्या भावाला आणि आता माझ्या पुतणीला तशी बळजबरी केलेली नाही.

मिहिर Tue, 09/09/2014 - 17:31

माहितीपूर्ण लेख.
अवांतरः घरी डावखुरा हा शब्द डावरा ह्या रूपातच वापरला जातो. लहानपणी डावखुरा हा शब्द केवळ क्रिकेटच्या संदर्भात वाचला होता, लारा, गिलख्रिस्ट, गांगुली, युवराज सिंग इ. खेळाडू डावखुरे आहेत इ.इ. त्यामुळे डावखुरे म्हणजे जे अचानक डाव पलटवून टाकू शकतात ते असा अर्थ मी बालबुद्धीने लावला होता आणि आईला एकदा 'सगळे डावखुरे डावरेच का असतात' असे विचारून गोंधळून टाकले होते. :ड

'न'वी बाजू Wed, 10/09/2014 - 08:29

In reply to by मिहिर

'साऊथपॉ'मधल्या 'पॉ'चा 'डावखुर्‍या'तल्या 'खुरा'शी (बादरायण)संबंध जोडता यावा काय?

(पण मग 'साऊथ' बोले तो 'दक्षिण' म्हणजे तर 'उजवा'... बात कुछ बनती नहीं|)

अस्वल Tue, 09/09/2014 - 22:49

डावखुर्यांबद्दल लेख वाचून बरं वाटलं!
जवळपास १००% डावखुरा आहे, लहानपणी एक काकू (म्हणजे माझ्या लहानपणी) मला जाम चिडवत- काय रे तू डाव्या हाताने जेवतोस? मग पुढे दात काढून हसत त्या>
पण घरी सुदैवाने काही उजवेपणाचे प्रयोग झालेले आठवत नाहीत.
मुख्य वादाचा मुद्दा एकच - देवापुढे प्रसाद उजव्या हातानेच घेतला पाहिजे. माझ्या अनुभवातून डावखुर्यांचे मेजर त्रास म्हणजे-
-डावा उजवा सांगताना बरेचदा गोंधळ होतो: पण हे कदाचित जन्रल आहे!
-हँडल बिंड्ल फिरवताना नेहमी डाउट येतो बरोबर दिशेने केलंय का?
-लिहिताना आपलाच हात मधे येतो. उर्दू किती बेष्ट असेल? उर्दूचा जनक बहुतेक डावरा असावा.
-जेवताना हात आपटतात. म्हणून मी बहुतेक वेळा शेवटची खुर्ची घेतो, डाव्या बाजूची. नाहितर मग लोक जेवताना आपल्याकडे त्रस्त चेहेर्याने बघतात.
-शाळेत बेंचवरही डिट्टो. लिहिताना शेजार्याशी हात आपटतो.

ह्याउप्पर बरेचदा माझ्या हातून काही झोल झाला तर मी "सॉरी, मी लेफ्टी आहे ना".. असं ठोकून देतो :)

अरविंद कोल्हटकर Wed, 10/09/2014 - 04:19

सर्वसाधारपणे जगात उजवे लोक बहुसंख्य असतात आणि डावरे खूपच अल्पमतात असतात ह्याचे परिणाम अनपेक्षित ठिकाणीहि दिसून येतात.

संस्कृतमध्ये 'दक्ष्' हा धातु आणि त्यावरून बनलेले 'दक्ष' हे विशेषण ह्या दोन्हींचा अर्थ वाढणे, सामर्थ्यवान होणे अशा प्रकारच आहे. बहुतेकांच्या दोन हातांपैकी उजवा अधिक सामर्थ्यवान, त्यामुळे त्या हाताला 'दक्षिण'अस्रे नाव मिळाले. त्या हाताने देतात ती दक्षिणा, पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले की त्या हाताच्या बाजूस येणारी दिशा ती दक्षिण दिशा. बहुसंख्य लोकांना उजव्या हाताने गोष्टी अधिक कौशल्याने करता येतात म्हणून dexterous/dextrous म्हणजे कौशल्यपूर्ण. ह्यातील dext हा भाग 'दक्षिण'शीच नाते सांगतो. इंग्रजीमध्ये 'right' चा संबंध 'योग्य, हक्क, नियमाला धरून' ह्याच्याशीहि आहे आणि उजव्या हातालाहि तेच नाव आहे. रशियनमध्ये правый म्हणजे उजवा आणि право म्हणजे 'पद्धत, नियम'.

'दक्षिण'च्या उलट म्हणजे वाम. नकारार्थी छटा असलेले अनेक संदर्भ ह्या शब्दाला चिकटले आहेत. वाममार्ग, वामपंथी. स्त्री पुरुषाला चळवते म्हणून ती 'वामा'. शाकुन्तलामध्ये चौथ्या अंकात कण्वमुनि शकुन्तलेने सासरी कशी वर्तणूक ठेवावी ह्याचा उपदेश देऊन म्हणतात, 'यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामा: कुलस्याधयः' - ह्या पद्धतीने वागणार्‍या युवती गृहिणीपदाला पोहोचतात, उलट वागणार्‍या कुळाचा अधःपात घडवतात.

स्क्रू, बूच इत्यादि बंद करतांना ते घडयाळाच्या काटयांच्या दिशेने (वरून पाहिल्यास) फिरवले जातात ह्याचे कारण असे की हातांची supination (मराठी शब्द?) (दोन्ही मनगटे जवळ धरून बोटे विरुद्ध दिशेने वळविणे) ह्याची शक्ति pronation (त्याच्या उलट) ह्याच्या शक्तीहून अधिक असते. त्यामुळे उजव्या हाताच्या व्यक्तींना घडयाळच्या काटयाच्या दिशेने स्क्रू पिळणे अधिक सुकर जाते. जगाचे नियम बहुशः उजव्यांचे असल्याने स्क्रू पिळण्यासाठी त्यांना जे सोयीस्कर तोच नियम झाला.

(मात्र घडयाळचे काटे clockwise फिरतात ह्याचा संबंध मात्र 'उजवे विरुद्ध डावे' ह्यांच्या संघर्षाशी नाही. जुन्या जमान्यातील sun dial मधल्या मध्यस्थ शंकूची सावली उत्तर गोलार्धामध्ये जशी फिरते त्याचेच अनुकरण घडयाळामध्ये केलेले आहे. त्या काळात सर्व ज्ञात जग उत्तर गोलार्धातच होते. उत्तरेने आपले standard दक्षिणेवर लादण्याचा हा अन्याय आहे. येथे डाव्यांनी उजव्यांवर सरशी केली आहे असे म्हणता येईल.

ह्या अन्यायाविरुद्ध आवाजहि उठू लागले आहेत. बोलिवियाने अधिकृत रीत्या त्या देशात घडयाळाचे काटे उत्तर गोलार्धामध्ये फिरतात त्याच्या विरुद्ध बाजूने फिरतील अशी सोय केली आहे. पहा:

गणितामध्ये मात्र clockwise वाल्यांची ही दादागिरी मोडून काढण्यात आली आहे. तेथे ० ते ३६० अंश दाखविण्यासाठी क्ष अक्ष घडञाळाच्या उलट दिशेने फिरवावा लागतो.)

हे सर्व पाहता अशी शंका येते की मग हिब्रू, अरेबिक, पर्शियन ह्या लिप्या उजवीकडून डावीकडे जातातच कशा. उजव्यांना तसे लिहिणे गैरसोयीचे आहे कारण लिहिणारा उजवा हात नुकताच लिहिलेला मजकूर झाकत असतो.

५व्या-६व्या शताकाच्या पुढेमागे, जेव्हा संख्या कोठल्या स्थानावर आहे ह्यावरून तिचे मूल्य बदलते (पहिल्या स्थानावरचा २ = २, दुसर्‍या स्थानावरचा २ = २०) ही पद्धति येऊ घातली होती तेव्हा ज्या संख्यालेखनाच्या अन्य पद्धति उपलब्ध होत्या त्यांपैकी एक म्हणजे संख्यांना सांकेतिक नावे देणे. उदा. ० म्हणजे ख किंवा आकाश, १२ म्हणजे सूर्य, ५ म्हणजे बाण (पंचसायक मदनाचे पाच बाण असतात.) शिलालेखांमधून, राजप्रशस्तिपर काव्यांमधून, ताम्रपटांमधून इत्यादि जागी ही प्रथा बरीच वापरली जायची कारण एकाच अंकाला अनेक पर्यायी शब्द वापरता यायचे ( १२ = सूर्य, आदित्य, रवि इ.) आणि सर्व लेखन श्लोकबद्ध असल्याने अशी शब्दांची निवड श्लोकरचनेला उपयुक्त ठरे. भास्कराचार्यांच्या लीलावतीमध्ये वर्तुळाचा व्यास आणि परिधि ह्यांचा संबंध असा दाखविला आहे:

व्यासे भनन्दाग्निहते विभक्ते खबाणसूर्यै: परिधि: सुसूक्ष्म:।
द्वाविंशतिघ्ने विहृतेऽथ शैलै: स्थूलोऽथवा स्याद्व्यवहारयोग्य:॥

व्यासाला भ, नंद आणि अग्नि (२७, ९ आणि ३) ह्यांनी गुणले आणि ख बाण आणि सूर्य (०, ५ आणि १२) ह्यांनी भागले तर परिधीचे सूक्ष्म मूल्य मिळते. त्यालाच २२ ने गुणले आणि शैल ह्यांनी भागले तर (परिधि) नित्याच्या कार्यास पुरेसा असा मिळतो. (व्यासाला ३९२७ ने गुणले आणि १२५० ने भागले तर परिधीचे सूक्ष्म मूल्य मिळते. त्यालाच २२ ने गुणले आणि ७ ने भागले (कारण ७ कुलपर्वत मानले आहेत - महेन्द्रो मलयः सह्यः शुक्तिमान् ऋक्षपर्वत:| विन्ध्यश्च पारियात्रश्च सप्तैते कुलपर्वता:) तर (परिधि) नित्याच्या कार्यास पुरेसा असा मिळतो.

येथे भनन्दाग्नि आणि खबाणसूर्य ह्या संख्या दशमान पद्धतीने लिहायच्या तर अग्नि, नन्द, भ आणि सूर्य, बाण, ख ह्या क्रमाने वाचावे लागतील, म्हणजेच अग्निकडून भ कडे असे उजवीकडून डावीकडे वाचावे लागेल. हे स्पष्ट करण्यासाठी नियम घालावा लागला 'अङ्कानां वामतो गति:' 'अंक डावीकडे जातात.

मन Wed, 10/09/2014 - 09:44

डावखुरे - उजवेखुरे समजू शकतो. पण हातसफाईतही मिश्र प्रकार पाहतो तेव्हा आश्चर्य वाटते.
हे मिश्र लोक म्हणजेच ambidextrous किम्वा अर्जुनासारखे सव्यसाचि काय?
.
.
माझा उपक्रमवरील जुना प्रतिसादः-
.
.
लोकांचेही काय काय प्रकार असतात. काही जण सगळिच कामं उलटी करतात(सर्वत्र उजव्या ऐवजी डावा हात वापरणे).
तर काही जण काही विशिष्ट कामांसाठिच हातांची अदलाबदल करतात (अर्धवट डावरे)
उदा:- खालिल् प्रसिद्ध व्यक्तिमत्वे बघा:-
१.सौरव गांगुली :- डाव्यानं ब्याटिंग उजव्यानं गोलंदाजी
२.आपला सचिन ब्याटिंग बोलिंग उजव्यानं, पण इतरत्र डावरं व्यक्तिमत्व(लेखन,भोजन,टाळी देतानाही त्याचा डावा हात उत्स्फुर्तपणे वर जाताना पाहिलाय म्याचमध्ये. वगैरे.)
३.झहीर खानः- अगदि सौरव च्या उलट.
४.झिंबाब्वे चा १९९९ विश्वचषकाचा स्टार नील जॉन्सन सौरव प्रमाणेच.
५.आशिष नेहरा, कर्टली आंब्रोस, अर्जुना रणतुंगाही शेम टु शेम (डाव्याने बोलिंग, उजव्याने बॅटिंग किंवा उलट.)
६.आफ्रिकेचा लान्स क्लुजनर सौरव सारखाच.
७.महाभारत ह्या ग्रंथातील श्री अर्जुन पांडु कुरुवंशी (भगवान श्रीकृष्णाचा आते भाउ) हा दोन्ही हातांनी बाण मारण्यास सक्षम् होता म्हणे.(सव्यसाची)
८.महाभारत सिरियल मध्ये दुर्योधन आणि कर्ण डावरे दाखवलेत.

काही डावरे सर्वत्र डावा हातच प्राधान्यानं वापरतात (फुल फ्लेज्ड डावरे)
१.सनथ जयसुर्या
२.वासिम अक्रम
३.युवराज सिंग(की सिंघ??)
४.विनोद कांबळी,ब्रायन लारा
५.वन-डे स्पेशालिस्ट मायकल बेव्हन

अजुन एक केसः-
सुनील गावसकर जशी नेहमी उजव्या हातानं अप्रतिम फलंदाजी करायचे, जवळ जवळ तशीच त्यांनी डाव्या हातानही रणजीमध्ये वगैरे केल्याचं ऐकलय.(ह्यालाच सव्यसाचि म्हणतात काय् ? )

क्रिकेट मधले डावरे शैलीदार वाटतात, हे खरच.

अभिनेत्यांपैकी केवळ दोन जण माहित् आहेत् डावरे:-
बच्चन् पिता -पुत्र.

डावखुर्‍या मुलीशी तणातणी होणं महागात पडू शकतं. भडकली की थेट डाव्या सटकन् थोबाडित बसते उजव्या गालावर.
थोबाडित कधी खाल्लीच तर लहानपणापासून डाव्या गालावर अधिक खायचा अनुभव असल्याने सटकन् अनपेक्षित थोबाडित उजव्या गालावर बसणे काही क्षण गुंग करते.

ऋषिकेश Wed, 10/09/2014 - 09:50

In reply to by मन

डावखुर्‍या मुलीशी तणातणी होणं महागात पडू शकतं. भडकली की थेट डाव्या सटकन् थोबाडित बसते उजव्या गालावर.

गविंनी काल विचारलेल्या प्रश्नांवर तु अधिक अनुभवपूर्ण उत्तरे देऊ शकशील असे वाटते ;)

सिफ़र Wed, 10/09/2014 - 14:09

In reply to by मन

डावखुरे - उजवेखुरे समजू शकतो. पण हातसफाईतही मिश्र प्रकार पाहतो तेव्हा आश्चर्य वाटते.

काय रे मनोबा हे तुझं नेहमीचच?
डावे आणि उजवे दोघेही खरेच का?

नाही बॉ! डावखुरे-उजवखोटे असं लिहायच ;)

चल आता "ओके" अशी प्रतिक्रिया दे बर्र या प्रतिसादावर ;)

तिरशिंगराव Wed, 10/09/2014 - 11:09

मुळात इंग्रजीतील left हा शब्दच तिरस्कारार्थी वापरात असलेला शब्द आहे. Left म्हणजे बिघडलेले, अधू असलेले, गुंतागुंतीचे, बरोबर नसलेले या अर्थाने

म्हणून, शिळ्या अन्नाला 'लेफ्ट ओव्हर' म्हणतात का हो ?

मीही बॅटमन सारखाच मारुन मुटकून बनवलेला रायटी आहे. पण स्क्रु ड्रायव्हर डाव्या हातातच धरतो.

सुनील Fri, 12/09/2014 - 13:51

१. डावरा अथवा उजवा हे जन्रली हातांच्या वापरावरून ठरवले जाते. हेच पायांच्या वापरावरदेखिल अवलंबून असते काय?
थोडक्यात, एखाद्या डावर्‍याचा डावा पाय उजव्यापेक्षा अधिक सशक्त असतो काय?

२. एखादा चतुष्पाद प्राणी डावरा आहे किंवा कसे हे कसे ओळखायचे?

वरील दोन भाप्रंचा उद्देश -
पुढेमागे जर एखाद्या गाढवाच्या मागे उभे राहण्याचा प्रसंग आलाच तर त्याच्या डावीकडे उभे रहावे की उजवीकडे हे ठरवणे सोपे जावे!

टीप - कै नै. शुक्रवारी जेवणानंतर (बोले तो, बिर्याणी चापल्यानंतर) काम करायचा मूड तसाही नसतोच. त्यातून विकांताला इगतपुरीला चाल्लोय. तेव्हा टीपी करतोय!! ;)

यसवायजी Fri, 12/09/2014 - 14:49

अवांतर-
उजवा हात क्लॉकवाइज फिरवा. आता उजवा पाय अ‍ॅन्टी-क्लॉकवाइज-फिरवा.
---------
हे असं का होतं? (ऐकीव माहिती खालीलप्रमाणे-)
मेंदूचा डावा भाग शरिराच्या उजव्या भागावर नियंत्रण ठेवतो, व मेंदूचा उजवा भाग शरिराच्या डाव्या भागावर.
मेंदूच्या एकाच भागाला अशा हालचालींची २ वेगळी कामे दिली की, मग तो हॅन्गतो, आणी हे असं होतं.

आदूबाळ Fri, 12/09/2014 - 20:11

In reply to by वामा१००-वाचनमा…

मनगटाच्या सांध्यातून हात क्लॉकवाईज आणि पावलाच्या सांध्यातून पाऊल अँटीक्लॉकवाईज हे जमतंय की. का काही वेगळ्या प्रकारे करणं अपेक्षित आहे?

(दुसरी शक्यता: अल्फा सेंटारी दोन तार्‍याच्या मालेतील एका ग्रहावरच्या नष्ट होऊ घातलेल्या संस्कृतीचा मी शेवटचा वारस आहे.)

अरविंद कोल्हटकर Fri, 12/09/2014 - 21:08

ह्या खेळाचा मला माहीत असलेला प्रकार असा आहे.

खालील आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे उजवा हात anticlockwise आणि त्याच वेळी डावा हात clockwise फिरविता येतो का पहा. (anticlockwise आणि clockwise एकाच दिशेतून पहात असतांना.)

वामा१००-वाचनमा… Sun, 14/09/2014 - 22:38

In reply to by बॅटमॅन

+१