संस्थळाचे दर्शनी पान
ऐसी अक्षरेवर वेगळे काय? हा प्रश्न अधूनमधून उपस्थित होतो. इतर संस्थळांप्रमाणेच हीही एक अभिव्यक्तीची जागा, इतकचं आहे का? संस्थळ सुरू केलं तेव्हापासून केवळ इतकंच राहू नये असा कायमच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. सुरूवात झाली ती मुक्त वातावरणात अभिव्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देऊन. कमीतकमी संपादन करून प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा, लेखांना तारका देऊन आत्तापर्यंत आलेलं चांगलं लेखन सांभाळून ठेवण्याची सोय केलेली आहे. त्याच मार्गाने पुढे पावलं टाकून गेले काही दिवस आम्ही ऐसी अक्षरेचा लोगो वेगवेगळ्या दिवशी बदलता ठेवला. आता सुरूवात करत आहोत ते नवीन मुखपृष्ठाची....
ऐसी अक्षरेच्या लोगोवर टिचकी मारल्यास संस्थळाचे 'होमपेज' दिसेल. विविध चित्रकार, छायाचित्रकार आणि संस्थळाच्या कलादालनातून प्रताधिकारमुक्त चित्रे प्रदर्शित केली जातील. सुरूवात करत आहोत ते प्रसिद्ध चित्रकार आणि ऐसी अक्षरेचे सदस्य श्री. जयंत जोशी यांच्या चित्रापासून.
अभिनंदन!
विविध चित्रकार, छायाचित्रकार आणि संस्थळाच्या कलादालनातून प्रताधिकारमुक्त चित्रे प्रदर्शित केली जातील. सुरूवात करत आहोत ते प्रसिद्ध चित्रकार आणि ऐसी अक्षरेचे सदस्य श्री. जयंत जोशी यांच्या चित्रापासून.
अत्यंत चांगल्या गोष्टीला सुरवात होत आहे. अभिनंदन!
प्रताधिकारमुक्त चित्रांसोबत, प्रताधिकार असलेली अन प्रताधिकारी व्यक्ती/संस्थेने प्रकाशित करण्यास अनुमती दिलेल्या कलाकृती देखील प्रकाशित होतील असे समजतो.
शिवाय चित्रावर प्रतिक्रीया देण्यासाठी एक धागा सुरू करता येईल का? असा विचार डोक्यात आला. म्हणजे त्या चित्राची वैशिष्ट्ये, त्यानिमित्ताने होणारी विविध शैलींवर चर्चा, इथल्या माहितगारांकडून मिळाणारी माहिती, (शक्य असल्यास) मुळ कलाकाराचे मनोगत वगैरे अगदीच खास होईल
कल्पना आवडली नाही
'संकेतस्थळाचा एका ग्राहक', या दृष्टिकोनातून बघितले असता, मी 'ऐसीअक्षरे'वर कशासाठी येतो? तर येथील वेगवेगळी आर्टिकले माझ्या चवीनुसार उघडून पाहण्यासाठी, झालेच तर येथील लेखांचर्चांमध्ये प्रतिसादांतून धुमाकूळ घालण्यासाठी. चित्रकलेत अजिबात रस नसल्याकारणाने, येताक्षणीच एक भले मोठे चित्र (कितीही दर्जेदार असले तरी) पाहण्यात माझ्यासारख्यास अजिबात स्वारस्य नसावे. शिवाय, त्या भल्या मोठ्या चित्राखेरीज इतर फारसा काही उपयुक्त मजकूरही दर्शनी पानावर नसल्याकारणाने, थेट लेखांचर्चांत जाऊ पाहणार्या ग्राहकाच्या दृष्टीने आपल्याला हव्या त्या मजकुरापर्यंत पोहोचण्यासाठी एक अधिकची टिचकी मारावी लागणे फारसे उत्साहवर्धक नसावे. अशा ग्राहकाच्या दृष्टिकोनातून जुनी रचनाच उपयुक्त ठरावी.
याचा अर्थ 'ऐसीअक्षरे'वर भली मोठी कलात्मक चित्रे असूच नयेत असा मुळीच नाही. फक्त, संकेतस्थळावर प्रवेश करण्यासाठी ती अपरिहार्य असू नयेत, एवढेच म्हणायचे आहे. कदाचित एखाद्या वेगळ्या विभागात अशी चित्रे प्रकाशित केल्यास, ज्यांस त्यात स्वारस्य आहे अशा ग्राहकांस तेथे जाऊन त्यांचा आस्वाद घेता यावा, परंतु ज्यांस त्यात स्वारस्य नाही, त्यांस ती प्रयत्नपूर्वक डावलण्याची गरज पडू नये.
एक समांतर उदाहरण देण्याचा मोह येथे अनावर होतो. 'ब्रह्मकुमारी' ही संस्था काही पर्यटक स्थळांजवळ मोठमोठाले सार्वजनिक बगीचे वगैरे राखते. बगीचे खूप सुंदर, प्रेक्षणीय, बघायला हवेतच असे असतात म्हणे. एका पर्यटनस्थळी अशाच एका बगीचास भेट देण्याचा मागे एकदा योग आला होता. बगीचास प्रवेशमूल्य फुकट होते, फक्त, आत जाण्यापूर्वी प्रत्येकाने ब्रह्मकुमारींच्या तत्त्वज्ञानाबद्दल अर्ध्या तासाचे एक माहितीपूर्ण प्रवचन ऐकलेच पाहिजे, अन्यथा प्रवेश नाही, अशी अट होती. अर्थातच, त्या प्रवचनात रस नसणार्या आमच्यासारख्या अनेक पर्यटकांनी ('बगीचा नको, पण प्रवचन आवर' म्हणून) त्या बगीचा पाहण्याच्या पूर्ण कल्पनेलाच चाट दिली, हे सांगणे नलगे. (अर्थात, 'ब्रह्मकुमारीं'ना त्याने बहुधा काही फरक पडला नसावा, हाही भाग आहेच. शेवटी 'ब्रह्मकुमारीं'नी आपले बगीचे पहावयास येणार्या ग्राहकांप्रति को(ण)ती वृत्ती ठेवावी, हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे, नाही का?)
सांगण्याचा मुद्दा, अशा प्रकारचे मुखपृष्ठ संकेतस्थळास असणे हे 'एलीटिस्ट' असेल, 'फ्याशनेबल' असेलही; 'फंक्षनल' खचितच नाही.
तेव्हा, 'कलात्मक' वगैरे दृष्टिकोन नसणार्या (आणि/किंवा 'आपला दृष्टिकोन कलात्मक नाही' असे चारचौघांत कबूल करू धजणार्या) बहुतांश ग्राहकांसाठी असे मुखपृष्ठ केवळ निरुपयोगीच नाही, तर (वाचनीय किंवा प्रतिसादांतून धुमाकूळ घालनीय लेखाचर्चांपर्यंत पोहोचण्याच्या) ध्येयाच्या मार्गातील अडथळा ठरावे, असे वाटते.
उलटपक्षी, कलात्मक दृष्टिकोन बाळगणार्या ग्राहकांच्या दृष्टिकोनातून पहायचे झाले, तर असे मुखपृष्ठ उत्साहवर्धक होण्याकरिता त्यावरील भले मोठे चित्र हे वारंवार - बहुधा दररोज, किंवा गेलाबाजार दर आठवड्यास - बदलते पाहिजे, अन्यथा दीर्घकाळापर्यंत तेचतेच चित्र पाहत राहणे हे कंटाळवाणे, अतएव संकेतस्थळाच्या दीर्घकालीन हितास - आणि कदाचित दीर्घायुष्यास - मारक ठरावे. (मुखपृष्ठावर महिनोन् महिने तीच ती चित्रे-छायाचित्रे राखून असणार्या एखाद्या संकेतस्थळाचा अभ्यास करणे या दृष्टीने कदाचित उद्बोधक ठरावे. फार कशाला, एखाद्या खरडवहीत डकवलेले एखाद्या सिनेअप्सरेचे बद्धकोष्ठी रेखाचित्रही दीर्घकाळानंतर वैतागवाणे होऊ शकते, हा स्वानुभव आहे. बदलाचा हव्यास हा मानवी स्वभावाचा स्थायीभाव आहे, हे लक्षात घेणे येथे आवश्यक आहे.) सुरुवातीच्या उत्साहाच्या काळात प्रतिदिनी किंवा प्रतिसप्ताहांती निरनिराळे चित्र मुखपृष्ठावर डकवणे शक्य असेलही, परंतु कालौघात - आणि बहुधा लवकरच - हे काम जाचक ठरावे. (संपादक वगैरे मंडळी आपापले उद्योग वगैरे सांभाळून हे काम करतात हेही लक्षात घेणे येथे आवश्यक आहे.) आणि एकदा का हे काम जाचक ठरू लागले, की मग महिनोन् महिने तेच ते चित्र मुखपृष्ठावर पडून राहणे हे ओघानेच आले. अशा वेळी असे मुखपृष्ठ हे 'मुखपृष्ठ' न राहता 'कलादालन' झालेलेच हितावह, नाही का?
अर्थात, हे सर्व लिहिण्यामागे या उपक्रमापासून (किंवा कशापासूनच) नाउमेद करण्याचा कोणताही हेतू नाही. केवळ या मार्गात येऊ शकणारे खड्डे (पिटफॉल्स) दाखवून वेळीच सावध करण्याचा हा प्रयत्न आहे. खड्ड्यात उडी मारण्यातही काही गैर असतेच, असे नाही. परंतु अशी उडी मारताना डोळसपणे, पाय मोडणार नाहीत, अशा बेताने मारणे बरे, नाही का?
आणि 'शेवटी ज्याचेत्याचे मत', हेही आहेच की!
बाकी, 'इतर संकेतस्थळांपेक्षा काहीतरी वेगळे' करणे हाच जर हेतू असेल, तर ही मुखपृष्ठाची कल्पना फारशी नावीन्यपूर्ण असावी, असे वाटत नाही, एवढेच मत या रँटाअखेरीस नोंदवू इच्छितो. शिवाय, मुळात 'काहीतरी वेगळे असण्यासाठी असलेच पाहिजे का?' हा प्रश्न (म्हणजे, आहे त्यात काहीही वाईट नाही, उलट छान चालले आहे, असे वाटते म्हणून.) डावलला, तरी 'केवळ वेगळे असण्यासाठी म्हणून मुद्दाम काहीतरी केलेच पाहिजे का?' हा प्रश्न पाठ सोडत नाही.
अवांतरः संकेतस्थळावर प्रवेश करण्यापूर्वी, (उदाहरणादाखल) 'हरवलेल्या जहाजाच्या कप्ताना'ची एखादी कविता वाचून मगच टिचकी मारून संकेतस्थळावर प्रवेश करावा लागणे हे किती जणांना रुचेल? (श्री. 'ह.ज.क.' यांच्या कवितांच्या दर्जाबद्दल ही टिप्पणी नाही. त्या कदाचित अत्युत्कृष्ट असतीलही, मला कळत नसल्या, किंवा मला त्यांत - किंवा एकंदरच कवितांत - स्वारस्य नसले, तरीही. तो मुद्दा नाही.)
'एखादी कविता वाचावी लागणे' आणि 'एखादे चित्र पहावे लागणे' यांत नेमका काय फरक आहे?
प्रतिसाद
सांगोपांग विचार करून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे. एखादी कल्पना राबवताना त्याबद्दल अशा स्वरूपाचा फीड्बॅक मिळणे आनंदाचे.
"आणखी एक टिचकी मारावी लागण्याची" तुमची तक्रार प्रातिनिधिक आहे. वेबसाईट्ची सवय असलेल्या सदस्याला झालेला त्रास समजण्यासारखा आहे. एखाद्या ग्राहकाला अशी जकात भरावी लागणे फारसे आनंदाचे नाही हा मुद्दाही मान्य.
मात्र "ऐसी अक्षरे"सारखे प्रकल्प राबवणार्या व्यक्तींचा दृष्टीकोन हा आपल्या प्रकल्पाच्या आजी सदस्यांना रुचेल अशा स्वरूपाची प्रकृती ठेवणे, एकंदर वाटचाल यथायोग्य चालली आहे याची दक्षता घेणे यापुरताच मर्यादित नसतो. नवनव्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करणे, गुणीजनांच्या कार्याला दालन उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कामाची ओळख संस्थळ्जगतातल्या लोकांशी करून देणे हाही भाग असतो. या दृष्टीने मुखपृष्ठावरील चित्र/छायाचित्र/प्रकाशचित्र/अन्य कलाकृती हा एक चांगला मार्ग आहे असं या संस्थेच्या चालकांना वाटत असावं.
इथे रुळलेले जे सदस्य आहेत त्यांना धाग्यांच्या यादीच्या पानावर जाण्याकरता मुखपृष्ठावर येऊन टिचकी मारायचीच आवश्यकता नाही. http://www.aisiakshare.com/tracker या दुव्यावर - जो सामान्यतः ब्राऊजरच्या हिस्टरीमधे असतो , किंवा फेवरीट्स मधे टाकता येतो- थेट जाता येते. जकात टाळण्याचा हा एक उत्तम मार्ग उपलब्ध आहेच.
यातील तांत्रिक बाबी बाजूला ठेवल्या तरी एकंदर उभयपक्षी भावनांना समजून घ्यावे असा या एकंदर विवेचनामागचा मुद्दा.
राहता राहिली गोष्ट तेच ते चित्र सतत समोर असण्यातून येणारा कंटाळ्याच्या भावनेचे. संस्थळचालक असं होऊ देणार नाहीत असं मला वाटतं. तुम्ही व्यक्त केलेली भीती अनाठायी नाही, मात्र याचा विचार करून आणि मुख्य म्हणणे त्या दृष्टीने पूर्वतयारी करूनच मग हे पाऊल उचललं असावं.
कलोअहेवि.
काय हे...
मात्र "ऐसी अक्षरे"सारखे प्रकल्प राबवणार्या व्यक्तींचा दृष्टीकोन हा आपल्या प्रकल्पाच्या आजी सदस्यांना रुचेल अशा स्वरूपाची प्रकृती ठेवणे, एकंदर वाटचाल यथायोग्य चालली आहे याची दक्षता घेणे यापुरताच मर्यादित नसतो. नवनव्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करणे, गुणीजनांच्या कार्याला दालन उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कामाची ओळख संस्थळ्जगतातल्या लोकांशी करून देणे हाही भाग असतो. या दृष्टीने मुखपृष्ठावरील चित्र/छायाचित्र/प्रकाशचित्र/अन्य कलाकृती हा एक चांगला मार्ग आहे असं या संस्थेच्या चालकांना वाटत असावं.
राहता राहिली गोष्ट तेच ते चित्र सतत समोर असण्यातून येणारा कंटाळ्याच्या भावनेचे. संस्थळचालक असं होऊ देणार नाहीत असं मला वाटतं. तुम्ही व्यक्त केलेली भीती अनाठायी नाही, मात्र याचा विचार करून आणि मुख्य म्हणणे त्या दृष्टीने पूर्वतयारी करूनच मग हे पाऊल उचललं असावं.
ताकाला जाऊन भांडं लपवू नये राव... भूमिका घ्या की, ऐसीअक्षरेच्या वतीनं. नसतो, असतो वगैरे शब्दांतून ठोस विधानं. आणि मला वाटतं, असावं यातून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न. तुमचा हा प्रयत्न फसतोय. आम्ही तुम्हाला जबाबदार धरूच. :)
हम्म
उपरोक्त विवेचनातले मुदद्द्यांमधे काही खोट असेल तर त्याचा प्रतिवाद तुमच्याकडून ऐकायला मी उत्सुक आहे. माझ्या मते मुद्दे पुरेसे स्पष्ट - तुमच्या भाषेत ठोस - आहेत. त्या मुद्द्यांद्वारे केलेली मुद्द्यांची मांडणी तुम्हाला जबाबदारी टाळण्याचीच निदर्शक वाटत असेल तर माझा नाइलाज आहे.
बाकी ठोस" गोष्टी , ठळक, ठसठशीत टाइपातल्या गोष्टींची मागणी रोचक आहे :)
दृष्टिकोन
उपरोक्त विवेचनातले मुदद्द्यांमधे काही खोट असेल तर त्याचा प्रतिवाद तुमच्याकडून ऐकायला मी उत्सुक आहे.
नाही. कारण तो दृष्टिकोनच भिन्न आहे. प्रतिवादासाठी प्रतिवाद मी करणार नाही.
माझ्या मते मुद्दे पुरेसे स्पष्ट - तुमच्या भाषेत ठोस - आहेत. त्या मुद्द्यांद्वारे केलेली मुद्द्यांची मांडणी तुम्हाला जबाबदारी टाळण्याचीच निदर्शक वाटत असेल तर माझा नाइलाज आहे.
मुद्दे ठोस असतील. त्यांची मांडणी करताना एक प्रकारचा त्रयस्थपणा दिसला मला. म्हणून, मी त्याला जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न, असे म्हटले आहे. अर्थात, ही वैयक्तिक बाब आहे. कदाचित, मी ती इथं लिहिली हे चुकीचे असू शकेल. लेट्स अॅग्री टू डिसअॅग्री... :)
मुद्दे
एखाद्या ग्राहकाला अशी जकात भरावी लागणे फारसे आनंदाचे नाही हा मुद्दाही मान्य. ... जकात टाळण्याचा हा एक उत्तम मार्ग उपलब्ध आहेच.
'जकाती'पेक्षा 'शिंगरोबा'*चा दृष्टान्त चटकन सुचला होता. असो. 'जकात'च सही.
जकात टाळण्याचा मार्ग उपलब्ध आहे, हे मान्य. पण मुळात अशी आडमार्गाने जाऊन जकात चुकवावी का लागावी, ही भावना होती. मुळात जकात का असावी, त्याऐवजी ऐच्छिक दानधर्म करता येण्यात काय अडचण असावी, असा मुद्दा होता.
अशी कला या संकेतस्थळावर असू नये, असे म्हणणे नाही. फक्त, ती दर्शनी भागी असावी का, हा प्रश्न आहे.
गुणीजनांच्या कार्याला दालन उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कामाची ओळख संस्थळजगतातल्या लोकांशी करून देणे ही उद्दिष्टे प्रशंसनीय आहेत, याबद्दल वाद नाही. परंतु त्याकरिता या संकेतस्थळावर एखादा कलाविभाग उपलब्ध असणे हे पुरेसे आहे. तो कलाविभाग मुखपृष्ठावरच असणे आवश्यक असावे, असे वाटत नाही. (मुखपृष्ठावर ठेवल्याखेरीज लोक अशा कलाकृती बघणार नाहीत, असा काही तर्क नसावा, अशी आशा आहे. त्या कलाकृती उत्तम असल्यास, ज्या रसिकांना अशा प्रकारच्या कलाकृतींत रस आहे, ते रसिक तसेही कलाविभागास भेट देत असतीलच, ते तेथे जाऊन अशा कलाकृती आवर्जून पाहतील, आणि वाहवासुद्धा करतील, असे वाटते. उलटपक्षी, ज्यांना त्यात रस नाही, असे - आमच्यासारखे - अरसिक, अशा कलाकृती आमच्या डोळ्यांसमोर नाचवल्या, तरी त्यांकडे ढुंकूनही न पाहता, 'संकेतस्थळावर प्रवेश करा'चा दुवा शोधण्याकरिता स्क्रोलडाऊन करताना दुवे खचितच देणार नाहीत, असा अंदाज आहे.)
राहता राहिला प्रश्न अशा कलाकृतींमागील कलाकारांचा. त्यांच्या कलाकृती उत्कृष्ट असतीलही, आणि म्हणूनच त्यांचे प्रदर्शन करताना त्यांना 'शिंगरोबा' व्हावयास आवडेल का, हे जाणून घेण्यास नक्की आवडेल.
असो. संकेतस्थळाचे संचालक त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीस*** अनुसरून त्यांना जो उचित वाटेल तो निर्णय घेतीलच. आम्ही आमची प्रतिक्रिया नोंदवण्याचे काम केले, इतकेच.
अवांतर: या निमित्ताने, मुळात आंतरजालीय प्रकाशनांना आणि/किंवा नियतकालिकांना मुखपृष्ठ - आणि त्यातही कलेने सुशोभित असे मुखपृष्ठ - आवश्यक आहेच काय, असाही एक प्रश्न मनात येतो. पूर्वीच्या काळी जेव्हा प्रकाशने ही मुख्यत्वेकरून छापील कागदांवर - किंवा त्याही अगोदर कदाचित भूर्जपत्रांवर वगैरे - असत, तेव्हा प्रकाशनास मुखपृष्ठ, मलपृष्ठ वगैरे असणे हे समजण्यासारखे आहे. कारण, ही माध्यमे नाशिवंत असल्याकारणाने, हाताळणीत पहिले आणि शेवटचे अशी पाने ही सहज सुटी होण्याचा अथवा फाटण्याचा संभव पुष्कळ असे. सबब, प्रकाशनाचा माहितीपूर्ण वा वाचनीय भाग नष्ट होऊ नये, याखातर नष्ट झाल्यास फारसे किंवा काहीच बिघडणार नाही, असा, फारशी कोणतीच माहिती अथवा वाचनीय भाग नसलेला एक संरक्षक थर, म्हणून मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ ठेवण्याची कल्पना उद्भवली असावी. आणि मग एवीतेवी पूर्णपणे टाकाऊ असे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ ठेवायचेच आहे, तर मग साधे ब्राऊनपेपरचे किंवा तत्सम कव्हर घालण्यापेक्षा ते सुशोभित का करू नये, म्हणून त्यावर कला वगैरे छापण्याची कल्पना आली असावी, आणि त्यातही मुखपृष्ठ हे प्रथम दर्शनी येते, उलट मलपृष्ठाकडे कोण बघतो, म्हणून केवळ मुखपृष्ठावर अशी कलाकुसर करण्याची पद्धत आली असावी, अशी आमची नम्र अटकळ**** आहे.
थोडक्यात, कुराणाच्या पानांभोवती केलेल्या कलाकुसरीने ज्याप्रमाणे कुराणाचे कोणतेही आंतरिक मूल्यवर्धन होत नाही, त्याचप्रमाणे प्रकाशनाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या कलाकृतीने प्रकाशनाचे कोणतेही आंतरिक मूल्यवर्धन होऊ नये. उलटपक्षी, 'फाटून हरवून गेले तरी चालेल' अशा ठिकाणी ठेवण्यात खरे तर तो त्या कलाकृतीचा - आणि पर्यायाने त्या कलाकाराचा - अपमानच ठरावा. (कुराणाच्या पानांभोवतीच्या कलाकुसरीमागे निदान तो तरी उद्देश बहुधा नसावा, असे वाटते - चूभूद्याघ्या.)
उलटपक्षी, छापलेली कला ही आवर्जून - आणि गांभीर्यपूर्वक - पाहिली जावी, असा उद्देश ज्या प्रकाशनांमध्ये असतो, तेथे सहसा अशी कला ही बहुधा आतल्या पानांमध्ये - क्वचित सेंटरफोल्डवरसुद्धा - छापली जाते*****, असे वाटते. कदाचित त्यायोगे प्रकाशनाचे नाव, विक्रीमूल्य, अंतरंगांची झलक वगैरे यांसारख्या कलाकृतीशी असंबद्ध अशा बाबींनी ती कलाकृती झाकोळून जाऊन रसभंगोत्पादक ठरू नये, हा अधिकचा फायदा त्यातून होत असावा.
असो. सांगण्याचा मुद्दा असा, की प्रकाशनास मुखपृष्ठ (आणि मलपृष्ठ) असणे हे कागदी प्रकाशनांची कदाचित गरज असेलही. परंतु आंतरजालीय प्रकाशनांत वाचकाच्या हलगर्जीपणामुळे पाने फाटण्याची तर भीती नसते. (प्रकाशकाने जाणूनबुजून फाडल्यास वगैरे गोष्ट वेगळी.) मग अशा परिस्थितीत मुखपृष्ठाची (आणि मलपृष्ठाची) आवश्यकता ती काय? उत्क्रांतीत माणसाची शेपूट गळून पडली, तद्वत आंतरजालीय प्रकाशनांचे मलपृष्ठ तर अगोदरच गळून पडलेले आहे. मुखपृष्ठाचे अपेंडिक्स तरी का टिकले पाहिजे?
अतिअवांतर: 'रीडर्स डायजेस्ट' या (छापील) प्रकाशनात संपादकांस उत्कृष्ट वाटलेली कलात्मक आणि/किंवा प्रसिद्ध चित्रे पुनःप्रसिद्ध करण्याची प्रथा अनेकदा पाळली जाते. परंतु तेथे अशी चित्रे ही सहसा मलपृष्ठावर छापली जातात, असे निरीक्षण आहे. यामागील तर्क कळलेला नाही. ही म्हणजे, चित्र फाटले/हरवले, तरी काही बिघडणार नाही, आणि त्यात पुन्हा शक्यतो कोणाच्या नजरेसही पडू नये, तशातली गत झाली. शिवाय, हे नेमके कोणाचे आणि कोणते चित्र आहे, तेही चित्राखाली अत्यंत बारीक टायपात छापलेले असते. म्हणजे, चुकून जर कोणी चित्र पाहिलेच, आणि त्यातून 'हे कोणाचे/कोणते चित्र असावे बरे?' असे कुतूहल त्याच्या मनात जागृत झालेच, तर डोळे बारीक करून शोधून काढताकाढता त्याचा उत्साह पार मावळावा. अशा प्रकारच्या प्रसिद्धीतून त्या कलाकाराचे नेमके काय भले होते, ते कळत नाही. असो.
तळटीपा:
* अनभिज्ञांसाठी: पूर्वीच्या काळी** पुण्याहून मुंबईस रस्त्याने जाताना घाटात मोक्याच्या ठिकाणी एक शिंगरोबाचे मंदिर होते, त्यास दहा पैसे टाकूनच पुढील मार्गक्रमणा करावी लागे. बहुधा 'शिंगरोबास दहा पैसे न टाकल्यास पुढे घाटात काहीतरी अपघात नक्की होतो' अशी काहीतरी अंधश्रद्धा बहुतांश वाहनचालकांत - विशेषतः ट्रकवाल्यांत - होती, असे वाटते.
** नवीन द्रुतगती महामार्ग झाल्यापासून या परिस्थितीत काही फरक पडला असल्यास कल्पना नाही.
*** (संकेतस्थळाकरिता) चांगले काय, नि वाईट काय, यांत फरक करण्याची बुद्धी.
**** कोणताही आगापीछा, संदर्भ अथवा पुरावा नसताना, जे मनात आले, ते लिहून ठोकून दिलेल्याला आमच्यात 'अटकळ' असे संबोधण्याची प्रथा आहे.
***** या प्रतिपादनापुष्ट्यर्थ समर्पक असे उदाहरण तूर्तास आमच्याकडे नाही, सबब हीदेखील तूर्तास आमची अटकळ म्हणून खपवून घ्यावी. नाही म्हणायला, 'डेबोनेअर'सारखी किंवा तत्सम उदाहरणे चटकन सुचतात, परंतु कदाचित ती येथे अस्थानी ठरावीत, अशी भीती आहे.
प्रतिसाद
>>>>मुळात जकात का असावी, त्याऐवजी ऐच्छिक दानधर्म करता येण्यात काय अडचण असावी, असा मुद्दा होता.
जकातही ऐच्छिकच आहे. ती टाळण्याचा मार्ग अनेकानी सांगितलेला आहे.
>>कलाविभाग मुखपृष्ठावरच असणे आवश्यक असावे, असे वाटत नाही. (मुखपृष्ठावर ठेवल्याखेरीज लोक अशा कलाकृती बघणार नाहीत, असा काही तर्क नसावा, अशी आशा आहे
तुमची आशा यथायोग्य आहे. तसा तर्क नाही. कुणालाही या कृती पहायची सक्ती केलेली नाही. ते टाळण्याचे सोपे उपाय सुचवले गेलेले आहेत.
>>राहता राहिला प्रश्न अशा कलाकृतींमागील कलाकारांचा. त्यांच्या कलाकृती उत्कृष्ट असतीलही, आणि म्हणूनच त्यांचे प्रदर्शन करताना त्यांना 'शिंगरोबा' व्हावयास आवडेल का, हे जाणून घेण्यास नक्की आवडेल.
यापैकी काही कलाकार या स्थळावर असणारे आहेत. याचे उत्तर तुम्हाला त्यांच्याद्वारे मिळो ही आशा.
धन्यवाद.
असहमत
सांगण्याचा मुद्दा, अशा प्रकारचे मुखपृष्ठ संकेतस्थळास असणे हे 'एलीटिस्ट' असेल, 'फ्याशनेबल' असेलही; 'फंक्षनल' खचितच नाही.
या सारांशाशी पूर्णपणे असहमत. आत्तापर्यंतचा छापील प्रकाशनाचा इतिहास सांगतो की एकजात सर्व मासिकांनी मुखपृष्ठ उत्तम व्हावे, आकर्षक व्हावे असा प्रयत्न केलेला आहे. प्रभावी मुखपृष्ठाचा उपयोग मासिक, पुस्तक नुसतंच नजरखेचक व आकर्षक नसून आतल्या लेखनाच्या व्यक्तिमत्वाचं देखील प्रतिनिधित्व करतो. 'मेनका'चं मुखपृष्ठ आणि 'अक्षर'चं मुखपृष्ठ यात अपेक्षित फरक दिसतो. नवीन येणाऱ्या वाचकाला 'ऐसी अक्षरे' वर येणाऱ्या लेखनातून काय दर्जाच्या अपेक्षा ठेवायच्या हे सांगायला एक चित्र हा हजार शब्दांचा सारांश व्हावा ही आमची इच्छा आहे. तसंच हे मुखपृष्ठ अजून आकार घेत आहे. त्याची रचना पूर्ण व्हायची आहे. वरतीच गेल्या काही अंकांच्या आर्काइव्ह्जचे आयकॉन्स ठेवण्याचा विचार आहे. म्हणजे इथे येणाऱ्याला साइटवर नक्की कुठे जायचं, काय करायचं हे ठरवता यावं असाही प्रयत्न आहे. त्यामुळे ते फंक्शनल निश्चितच ठरेल.
ब्रह्मकुमारीच्या उदाहरणाच्या खरं तर विरुद्ध उदाहरण इथे लागू आहे. इथे 'ही बघा बाग, बघून झाली की वाटलं तर या आत काय लिहिलंय ते वाचायला' असा संदेश इथे आहे. राहता राहिला मुद्दा ते मुखपृष्ठ उलटल्याशिवाय आतलं वाचायला मिळणार नाही या जबरदस्तीचा - त्याचं उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे. या घरी नवीन येणारे, पाहुणे किंवा रस्त्यावरून नजर टाकणारे यांसाठी मुखपृष्ठ आहे. घरगुती, नेहमीच्या लोकांसाठी सरळ बैठकीच्या खोलीत घुसण्यासाठी दार उघडं आहेच. अशा आत शिरणाऱ्यांना इच्छा होईल तेव्हा त्यांनी मुख्य दारातून यावं, हीही सोय आहे.
उत्तर
आत्तापर्यंतचा छापील प्रकाशनाचा इतिहास सांगतो की एकजात सर्व मासिकांनी मुखपृष्ठ उत्तम व्हावे, आकर्षक व्हावे असा प्रयत्न केलेला आहे.
छापील प्रकाशने आणि आंतरजालीय प्रकाशने यांच्यातील (मुखपृष्ठाच्या आवश्यकतेच्या दृष्टीने) मुख्य फरकाचा ऊहापोह याच धाग्यात अन्य एका प्रतिसादात केलेलाच आहे. तरीही, 'आंतरजालीय प्रकाशनास मुखपृष्ठ असणे' हीच मुळात (आवश्यक नसली तरी) त्याज्य बाब आहे, असा दावा नाही.
मुद्दा आहे, तो मुखपृष्ठाच्या सद्यस्वरूपाचा. नि विशेष करून त्यावरील कलेचा. त्या कलेलाही कला म्हणून असण्यास विरोध नाही; फक्त ती मुखपृष्ठावर ठेवण्यामागील औचित्याबद्दल, त्यातून नेमके काय साधत आहे, त्यातून नेमका कोणता संदेश जात आहे, याबद्दल प्रश्न आहे.
नवीन येणाऱ्या वाचकाला 'ऐसी अक्षरे' वर येणाऱ्या लेखनातून काय दर्जाच्या अपेक्षा ठेवायच्या हे सांगायला एक चित्र हा हजार शब्दांचा सारांश व्हावा ही आमची इच्छा आहे.
चित्रातून अनेकदा सादरकर्त्यास अपेक्षित असलेल्या हजार शब्दांहून वेगळेच, भलतेच कोणतेतरी हजार शब्द (आस्वादकाच्या दृष्टिकोनाप्रमाणे) आस्वादकास प्रतीत होऊ शकतात, जेणेकरून चित्रामागील संदेश हा अपभ्रष्ट होण्याची भीती असते, अत एव आपला संदेश इष्टसंदेशग्राहकाकडे नि:संदिग्धरीत्या पोहोचवण्याकरिता चित्र हे सर्वोत्कृष्ट प्रभावी माध्यम नाही, असे निरीक्षण आहे. (अन्यथा, कला म्हणून ठीकच आहे.) असो. याबद्दल पुन्हा कधीतरी.
तसंच हे मुखपृष्ठ अजून आकार घेत आहे.
हे ठीकच. परंतु इष्ट आकार घेण्याच्या दृष्टीने जे काही वाटले, ते सांगितले.
वरतीच गेल्या काही अंकांच्या आर्काइव्ह्जचे आयकॉन्स ठेवण्याचा विचार आहे. म्हणजे इथे येणाऱ्याला साइटवर नक्की कुठे जायचं, काय करायचं हे ठरवता यावं असाही प्रयत्न आहे. त्यामुळे ते फंक्शनल निश्चितच ठरेल.
हेही ठीकच. परंतु तसे होईपर्यंत, सद्यस्थितीत ते फंक्षनल खचितच नाही, एवढेच म्हणणे आहे. त्याहीवर, त्या कलाकृतीच्या प्रदर्शनाने फंक्षनालिटीत कोणतीही मूल्यवृद्धी होत नाही, हा मुद्दा आहे. आपण उल्लेखिलेले अन्य उपक्रम जेव्हा केव्हा प्रत्यक्षात येतील, तेव्हा कदाचित ते फंक्षनालिटीत भर पाडण्यास उपयुक्त ठरू शकतीलही. परंतु तूर्तास फंक्षनालिटीत योगदान करणारा कोणताच भाग या पानावर अस्तित्वात नाही, असे प्रतिपादन आहे.
चित्राच्या आकाराबद्दल जे काही अभिप्राय येत आहेत, ते कदाचित माझ्या एकंदर म्हणण्याच्या अनुषंगाने बोलके आहेत.
ब्रह्मकुमारीच्या उदाहरणाच्या खरं तर विरुद्ध उदाहरण इथे लागू आहे. इथे 'ही बघा बाग, बघून झाली की वाटलं तर या आत काय लिहिलंय ते वाचायला' असा संदेश इथे आहे.
मुळात 'बाग' कोणती, आणि 'बाग' हे नेमके कशाचे रूपक आहे, याबद्दल आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहत आहोत, असे वाटते. सबब, एकवाक्यता असंभव. हरकत नाही.
माझ्य लेखी, 'ऐसीअक्षरे'वरील लेख-चर्चा ही 'बाग' आहे, जिच्यात मनसोक्त 'बाग'डायला मी येथे येतो. उलटपक्षी, मुखपृष्ठ - किंवा त्याहीपेक्षा त्यावरची ती कलाकृती - ही त्या 'बागे'त प्रवेश करण्याकरिता एक (माझ्या लेखी जाचकपेक्षासुद्धा अनावश्यक अशी) 'फॉर्म्यालिटी' आहे. (तितकीही जाचक आहे, असा दावा नाही. दुर्लक्ष तर करू शकतोच. तो प्रश्न नाही. पण अनावश्यक निश्चित आहे.)
उलटपक्षी, आपल्या दृष्टिकोनातून पहायचा प्रयत्न केला असता, आपण ज्याला 'बाग' म्हणत आहात, तो माझ्या लेखी 'ऐसीअक्षरे'च्या मूळ गाभ्यापेक्षा वेगळाच आणि पूर्णपणे असंबद्ध असा काही साइडशो आहे. तो साइडशो असायलाही हरकत नाही (उलट अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साइडशो असणे हे तर्हेतर्हेचे सदस्य आकर्षित करण्याच्या दृष्टीने चांगलेच), पण तो मुख्य दारावरचा नंदी होण्याचे काही कारण नाही, आणि त्याकरिता ज्यांना त्या नंदीच्या शेपटाला हात लावण्याची इच्छा नाही, त्यांना (विशेषतः नेहमीच्या सदस्यांना) मागील दाराने अथवा चोरदाराने शिरावे लागण्याचे काही कारण नाही, एवढेच सुचवण्याचा हा प्रयत्न आहे.
असो.
वेगळे काय?
ऐसीअक्षरेवर वेगळे काय? ह्याचे उत्तर म्हणून जुन्याच साइट्चीच कॉपी करण्याचा उपक्रम आवडला नाही. एखाद्या दिवसाचे महत्व म्हणून लोगो बदलणे ह्यातही काही नाविन्य नाही. ('सर्वव्यापी गुगल' हाच प्रकार गेली कित्येक वर्षे करत आहे) ह्याचा अर्थ हे उपक्रम करू नयेत असा नाही. पण त्याला वेगळे काही देण्याचा प्रयत्न असे म्हणू नये इतकेच. आहे ते उत्तम आहे.
संकेतस्थळचालकांनीच संकेतस्थळचालकांना कसे वाटत असावे ह्याचे आडाखे मांडणे म्हणजे (जर)जवाबदारी झटकणे नसले तरी कृत्रिम नक्कीच वाटावे. असो.
मला प्रयोग आवडला
मला प्रयोग आवडला आहे. चित्राचा आकार कमी करावा, स्क्रोल करावे लागू नये : सहमत.
मला खुद्द प्रतिसादाच्या नाविन्यक्रमाचे मुखपृष्ठ फारसे आवडत नाही. तरी ते मी चालवून घेतो.
'न'वी बाजू, शावण मोडक, वगैरे यांच्या मुद्द्यांबाबत. जर तांत्रिकदृष्ट्या शक्य असेल, तर सदस्याला स्वतःसाठी कुठले पान मुखपृष्ठ असेल, ते ठरवण्याची मुभा असावी. सध्याकरिता कामचलाऊ उपाय सुचवतो : "www.aisiakshare.com" अशी वाचनखूण न साठवता "www.aisiakshare.com/tracker" ही वाचनखूण साठवावी. अशा रीतीने सध्याच्या सवयीपेक्षा एकही टिचकी वाढवावी लागणार नाही. शिवाय नावडते असे कुठलेही चित्र डोळ्यासमोर यायची सक्ती होणार नाही. अर्थात हा उपाय कामचलाऊ आहे, आणि तात्पुरता असावा, हे समजू शकतो.
विनोदच होत आहेत तर...
या निमित्ताने इतकी रंजक चर्चा वाचायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. चित्रे पाहण्यात अजिबात स्वारस्य नसणारे काही सदस्य असणार यात काही नवल नाही. त्याप्रमाणे कवितांत, पाककृतींत, समीक्षेत वगैरे स्वारस्य नसणारे सदस्यदेखील असणार. 'प्रकाशनाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या कलाकृतीने प्रकाशनाचे कोणतेही आंतरिक मूल्यवर्धन होऊ नये'सारखी मते वाचून मला मात्र ज्यू, ख्रिस्ती आणि विशेषतः इस्लाम या (म्हणजे अब्राहमिक) धर्मांत असलेली प्रतिमांविरोधातली टोकाची मते आठवली. अधिक माहितीसाठी:
http://en.wikipedia.org/wiki/Idolatry_in_Judaism
http://en.wikipedia.org/wiki/Aniconism_in_Christianity
http://en.wikipedia.org/wiki/Aniconism_in_Islam
जाताजाता: 'हुकूमशहांना विनोदाचं वावडं का असतं?' या धर्तीवर 'कट्टरपंथीयांना कलात्मकतेचं वावडं असतं का?' असा लेख या संस्थळावर यावा असंही वाटू लागलं आहे :-)
प्रश्नार्थक
मी प्रश्नार्थक मुद्दा मांडला आहे. तुम्ही सुलभ कला सांगितली. कलात्मकतेत आणखी बरंच काही असावं असा आमचा आपला ग्रह आहे. तुम्ही इथं ही कला मांडताना त्याच्या तपशिलात शिरला नाहीत. (आता हे बरं झालं की नाही, यावर आम्ही इतरांच्या प्रतिक्रिया वाचू इच्छितो). आमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर तुमच्या दृष्टीकोनातून नाही, असं आहे हे कळलं. ;) आता इथल्या इतरांनाही काय वाटतं ते जाणून घ्यावं म्हणतो...
'वावडे' नव्हे. 'स्थानौचित्य'.
या धर्तीवर 'कट्टरपंथीयांना कलात्मकतेचं वावडं असतं का?' असा लेख या संस्थळावर यावा असंही वाटू लागलं आहे (स्माईल)
वावड्याचा प्रश्न नाही. ज्यालाजिला जेजे उपभोगावेसे वाटेल, तोती तेते उपभोगण्यास स्वतंत्र आहे. प्रश्न इतरांच्या उपभोगस्वातंत्र्याचा आहे.
'टेन कमांडमेंट्स' हे चर्चमध्ये जरूर लावावेत. न्यायालयांत / सरकारी कार्यालयांत त्यांचे काम नसावे, एवढेच.
प्रयोग म्हणून चांगला प्रकार
प्रयोग म्हणून चांगला प्रकार आहे, पण......!
जुन्या लोकांना तुम्ही सर्व लेखनाचा दुवा बुकमार्क म्हणून ठेवा इत्यादी सांगू शकता, पण जस जसे नवीन सदस्य, वाचक येतील तेव्हा? त्यांच्यासाठी मुख्य पान अद्यावत होत नाही असेच राहील, एखादा बदलता फोटो व थोडीफार माहीती असलेली अक्षरे म्हणजे ऐसी अक्षरे संकेतस्थळ नाही ना? ऐअ चे वैशिष्ट (शब्द बरोबर लिहला नाही की काय?) म्हणजे नवीन येत असलेले लेखन व आलेल्या लेखनावरील प्रतिसाद असावे, एखादे चित्र असून नये. संकेतस्थळाचा हलता बोर्ड म्हणजे संकेतस्थळाचे दर्शनी भाग. काय नवीन आले ते साईट उघडल्या उघडल्या दिसणे महत्त्वाचे. साईट जिवंत वाटणं महत्त्वाचे!
बाकी तुमची मर्जी..
* अजून एक अनाहुत सल्ला- केलेला प्रयोग चूकला म्हणून लाजण्याचे काही कारण नाही, चूकला तर चूकला! परत दुसरा प्रयोग! हा विचार व्यवस्थापनाने आपल्या मनात पक्का रुजवून घ्या. व इतरांना काय पाहीजे याचा विचार थोडा कमी करा हे उत्तम राहील... बाकी तुम्ही जाणकार आहातच!
दिली गेलेली सुविधा नक्कीच
दिली गेलेली सुविधा नक्कीच चांगली आहे, पण नावीन्यपूर्ण म्हणता येणार नाही. संकेतस्थळाच्या प्रवेशदाराशी एखादं कलात्मक / छान चित्रं लटकलेलं काही जणांना एवढं का खटकावं ते कळत नाही. शिवाय ज्यांना ते खटकलं त्यांच्यापाशी पानभर प्रतिसाद द्यायला / कळफलक बडवायला वेळ आहे, पण एक अगाऊ टिचकी मारायला नाही ह्याचं नवल वाटलं.
अवांतर - मिपावरच्या 'आजची खादाडी'ची आठवण झाल्याशिवाय रहावलं नाही!
निषेध निषेध निषेध
खरंतर पानभर प्रतिसाद देण्याचा चित्र आवडण्याशी काहीही संबंध नाही. असतो एखादा माणूस गद्य, चारशे समीकरणं असणारा चार पानांचा पेपर वाचणार्याला चार ओळींच्या कविता का वाचता येऊ नयेत असा तर्क मला अयोग्य वाटतो.
पण
अवांतर - मिपावरच्या 'आजची खादाडी'ची आठवण झाल्याशिवाय रहावलं नाही!
यक! महिला दिनालाच ही तुलना!
(अवांतर)
खरंतर पानभर प्रतिसाद देण्याचा चित्र आवडण्याशी काहीही संबंध नाही. असतो एखादा माणूस गद्य
तसेच पहावयास गेले, तर पानभर प्रतिसाद देण्याचा गद्य आवडण्याशी काही संबंध असतोच, असेही निश्चितपणे सांगता येत नाही. (किंवा, फॉर द्याट म्याटर, पानभर कविता लिहिण्याचा पद्य आवडण्याशी.)
आमचे थोरले मानसबंधू श्री. रॅक्टर यांच्या सुप्रसिद्ध गद्य-पद्यसंग्रहाचा दृष्टान्त देण्याचा मोह येथे टाळता येत नाही*.
श्री. रॅक्टर यांना आम्ही मानतो. किंबहुना, त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनच आम्ही आजवर आमचे प्रतिसादलेखन करत आलेलो आहोत, हा गौप्यस्फोट येथे करणे अस्थानी ठरणार नाही.
('अनंत-मर्कट-अनंत-कळफलक-प्रमेया'चा उल्लेखही येथे कदाचित उचित ठरावा.)
अतिअवांतरः
श्री. राजेश घासकडवी यांचा पूर्वाभ्यास आणि/किंवा पूर्वानुभव** लक्षात घेता, श्री. रॅक्टर यांची लेखनपद्धती त्यांच्याकरिता रोचक ठरावी, असा अंदाज आहे. किंबहुना, श्री. रॅक्टर यांच्या निवडक साहित्यकृतींचे रसग्रहण हे श्री. घासकडवी यांच्या आळीतले असावे (up his alley अशा अर्थाने), असे वाटते. सबब, असे रसग्रहण त्यांनी जरूर करावे, अशी सुचवणवजा आग्रहवजा विनंती आम्ही त्यांना या निमित्ताने करू इच्छितो. धन्यवाद.
तळटीपा:
* प्रस्तुत मोह टाळता न येणे ही वस्तुतः आमची कच्ची बाजू (बोले तो वीक पॉइंट) आहे, हे कबूल करण्यास येथे अजिबात लाज वाटत नाही. किंबहुना, इतका वारंवार उल्लेख नि प्रचार या मराठी आंतरजालावर कोणाचा अथवा कशाचा होत असलाच, तर तो केवळ त्या कोण्या प्रा. गळतग्यांच्या अजरामर साहित्यकृतीचाच होत असणे शक्य आहे.
** 'कवितक' आदि.
खरंतर पानभर प्रतिसाद देण्याचा
खरंतर पानभर प्रतिसाद देण्याचा चित्र आवडण्याशी काहीही संबंध नाही.
आक्षेप आवडीविषयी नाहीच आहे; आहे तो एक अगाऊ टिचकी मारणे हा अडथळा वाटावा या विषयी. जे लोक पानभर प्रतिसादासाठी कळफलक बडवू शकतात, ते मुखपृष्ठावर एक अगाऊ टिचकी मारू शकत नाही ह्याचं नवल वाटतं असं म्हणायचं होतं.
आणि, इथल्या मुखपृष्ठाची मिपाच्या 'आजच्या खादाडी'शी तुलना केलेली नाही. पण तिथेही असा प्रकार सुरवातीला होता असं सुचवायचं होतं, आणि त्यामुळे इथे चालू केलेला प्रकार नाविन्यपूर्ण होत नाही असंही म्हणायचं होतं.
उपाय
एकुणच यावर इतकी चर्चा होईल असे वाटले नव्हते. :)
असो दोन्ही भुमिका समजल्या (असे वाटते). माझ्यामते याचे कारण अनेक संस्थळांवर लोगो वर क्लिक केल्यानंतर ट्रॅकर दिसत असल्याने सदस्यांनी ती सवय झाली आहे. व प्रत्येकवेळी लोगोवर क्लीक केल्यावर पुन्हा मुखपृष्ठावर जावे लागत असल्याने ही तक्रार आहे.
ती सवय बदलायची असल्यास / हा प्रश्न नसल्यास पुढे देतोय तो उपाय गैरलागू आहे - दुर्लक्ष करावे
उपायः
-- साईट उघडल्यावर सध्या आहे ते मुखपृष्ठच दिसावे
-- मात्र लोगोवर टिचकी मारल्यावर ट्रॅकर दिसावा
-- एकदा ट्रॅकर उघडल्यावर पुन्हा मुखपृष्ठ बघायचे असल्यास मुखपृष्ठ म्हणून एक मेन्यू 'नवीन लेखन' च्या आधी द्यावा.
यामुळे प्रवेश करतेवेळी मुखपृष्ठ बघता येईल, अन नंतर ते बघायचे असल्यास कुठे क्लीक करावे तेही कळेल व लोगोवर क्लीक केल्यास ट्रॅकरच अद्ययावत होईल
आता सुरूवात करत आहोत ते नवीन
आता सुरूवात करत आहोत ते नवीन मुखपृष्ठाची....
स्वत:कडे विनयशीलता घेऊन इतकेच म्हणू इच्छितो की मराठी संकेतस्थळांवर मुखपृष्ठाची कल्पना सर्वप्रथम मिपाने सुरू केली व काही काळ रावविली. आता 'ऐसी अक्षरे..' देखील हा मुखपृष्ठाचा पायंडा पाडत आहे याचा मला आनंद होत आहे.. मनापासून शुभेच्छा..!
मुखपृष्ठावर 'आजच्या खादाडी'चाही विचार व्हावा असे सुचवतो....! :)
ता क - आजचे जयंत जोशींचे चित्र असलेले मुखपृष्ठ विशेष रुचले नाही. काळ्या रेघोट्यांनी काढलेले एक भडक व अंमळ भयाण मानवी आकृती असलेल्या चित्राचे प्रयोजन कळले नाही. कदाचित चित्रकला ह्या विषयात काहीच गती नसल्याने चित्रातील कला मला समजली नसेल..
असो.. मुखपृष्ठाच्या प्रयोगाकरता पुनश्च एकवार शुभकामना..
तात्या.
चांगले बदल
संस्थळासाठी मुखपृष्ठ ही कल्पना आवडली. चित्र यूट्युब्च्या स्क्रीन एवढं दिसलं तरी भागेल.ज्यांना ते आवडेल त्यांना ते मोठं करून बघण्याची सोय बरी पडेल.
"चुकवु नये असं.." हे फारसं आवडलं नाही.त्यापेक्षा "नवीन धागे" दिले तर चांगलं वाटेल.."नवीन लेखन" या खाली सगळ्यात नवीन प्रतिसाद असलेले धागे दिसतात पण त्यातून प्रतिसाद न मिळालेले पण नवीन धागे शोधावे लागतात.
एक प्रयत्न
चित्रकलेतले कधी काही कळेल असे वाटले नव्हते, पण यातील काही प्राथमिक प्रश्नांची उत्तरे देण्याइतपत कळले आहे, असे वाटते.
मुळात ते निळेनिळे जे दिसते आहे ना, ते आकाश नसून समुद्र असावा. त्यासमोर जे ब्राऊनब्राऊन दिसते आहे, ती किनार्यावरची (उदा., चौपाटी किंवा जुहू बीच. तुमच्या ष्ट्यांडर्डाप्रमाणे हवी ती निवडा. आम्ही आपले गिरगांवचौपाटीवाले.) वाळू असावी. आणि ते जे काही पांढरेपांढरे दिसत आहे ना, ज्याला तुम्ही भरपूर चंद्र म्हणालात ते, ते बहुधा समुद्रपक्षी असावेत. (चौपाटीवरच्या त्या गर्दीत समुद्रपक्षी कुठे मरायला येतात, आणि मुळात चित्रात गर्दी कुठ्ठाय, हे प्रश्न 'फाऊल' आहेत. थोडे ष्ट्यांडर्ड वाढवा, आणि कुठलातरी प्रायवेट बीच निवडा. चित्रकाराचा - या ठिकाणी चित्रकारणीचा - तो प्रश्न नाही.)
बाकी याहून यात काही अर्थ / रसग्रहण वगैरे करण्याची गरज भासत नाही. लहानपणी नाही का आपण मेणाच्या खडूंनी (मराठीत 'वॅक्स क्रेयॉन'. ते नाही का 'क्याम्लिन' नावाची उंटछाप कंपनी बनवत असे, ते.) वरखाली जाणार्या रेघांचे दोनतीन डोंगर, त्यात मधल्याच कुठल्यातरी दोन डोंगरांमध्ये एक सूर्य, दुसर्या कुठल्यातरी डोंगरावरून खाली येणारी एक निळी नदी, त्या डोंगरावर एक नुसतीच दाराची चौकट आणि एक उभा आणि एक आडवा गज असलेली एक खिडकी आणि उतरती छपरे असलेले घर, घराच्या बाजूला एक झाड, घराशेजारी डोक्यासाठी प्रत्येकी एक वर्तुळ, डोळ्यांसाठी प्रत्येकी दोन ठिपके, नाकासाठी प्रत्येकी एक उभी रेघ, तोंडासाठी प्रत्येकी एक वाकडी रेघ, शरीरासाठी प्रत्येकी एक उभी रेघ, हातापायांसाठी प्रत्येकी तिरक्या रेघांच्या दोन जोड्या अशी एक मुलगा आणि मुलगी, पैकी मुलीच्या केसांसाठी दोन वाकड्या रेघा अधिक मुलीच्या कपाळावरील कुंकवासाठी एक ठिपका एवढी इन्वेंटरीत भर, आणि वरती आकाशात '४'च्या आकड्यांनी दाखवलेले असंख्य कावळे, असले काहीतरी काढून त्याखाली 'मी पाहीलेला सूरयोदय' असे काहीबाही लिहीत असू? त्यात कधी याहून काही गहन अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला होता काय? किंवा त्याचे कधी रसग्रहण करायला कोणा जाणकाराला बोलवले होतेत काय?
मग आताच का अशी उबळ यावी?
ज्याचात्याचा प्रश्न आहे
उबळ/इच्छा कधी आणि कशी यावी असे तुम्हाला वाटते?
उबळ वस्तुतः कधीही येऊ शकते*, आणि ती कोणाला, कोठे आणि कधी यावी, हे आम्ही कसे बरे ठरवावे?
मात्र, उबळजनक तत्त्वे प्राचुर्यात असतना कधी आली नाही ती आजच नेमकी का यावी, असे कुतूहल वाटते खरे.
* 'मौत और टट्टी, किसी को भी, कहीं भी और कभी भी आ सकती है' असे एक सुभाषित कधी काळी वाचनात आले होते. त्या यादीत आता आणखी एकाची भर. त्रयी पूर्ण झाली, हा अधिकचा फायदा आहेच.
खुलासा
>>मात्र, उबळजनक तत्त्वे प्राचुर्यात असतना कधी आली नाही ती आजच नेमकी का यावी, असे कुतूहल वाटते खरे.
जाणिव१ (समृद्ध झाल्यानंतर)/(खालावल्यानंतर)२ असे होताना अढळते.
१ - जाणिव म्हणजे "टट्टी" किंवा "विचार करण्याची क्षमता". जे हवे ते.
२ - समृद्ध किंवा खालावणे हे सापेक्ष ठेवतो, सर्वांच्या सोयीसाठी.
या निमित्ताने एक मूलभूत प्रश्न
'जे व्यक्त करण्यासाठी हजार शब्द लागावेत, ते एका चित्राने साध्य होते,' अशी किंवदंता आहे. हजार शब्दांची बचत हेच जर चित्र काढण्यामागील उद्दिष्ट असले, तर असे चित्र समजण्याकरिता गेला बाजार काही शे* शब्दांच्या स्पष्टीकरणाच्या अथवा रसग्रहणाच्या मागणीचे प्रयोजन कळत नाही.
बरे, असे स्पष्टीकरण दिले नाही अथवा रसग्रहण केले नाही, तर पाहणारास चित्रातून काही अर्थबोध होत नाही, इतकेच नव्हे, तर समुद्राच्या जागी आकाश दिसू लागते आणि समुद्रपक्ष्यांच्या जागी अनेक चंद्र दिसू लागतात. थोडक्यात, झालाच तर अनर्थबोध होतो. तस्मात्, रसग्रहण नाही तरी किमानपक्षी स्पष्टीकरण आवश्यक.
त्याउपर रसग्रहणही करायचे म्हणजे आणखी शब्दांचा भरणा. म्हणजे एकूण शब्दसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडायला फार वेळ लागू नये.
मग प्रश्न असा पडतो, की हे चित्र काढून नेमके काय साधले? शब्दांची अशी नेमकी कोणती बचत साधली गेली?
प्रस्तुत पुराव्याच्या प्रकाशात, 'जे व्यक्त करण्यासाठी हजार शब्द लागावेत, ते एका चित्राने साध्य होते' ही केवळ एक 'अर्बन लीजेंड' असावी, असे खेदाने म्हणावे लागते.
Quod Erat Demonstrandum. (किंवा, Quite Easily Done.)
* या निमित्ताने वर मीच केलेल्या स्पष्टीकरणाच्या प्रयत्नातील शब्दसंख्या मोजली. दोनशे बहात्तर भरली. (चूभूद्याघ्या. गरजूंनी पुन्हा एकदा मोजून पहावी.) पैकी अवांतर मजकूर वगळायचा म्हटला, तरीही बहुधा शंभरच्या जवळपास जावी.
ज्याचेत्याचे 'पर्स्पेक्टिव'
बाकी, ते असंख्य चंद्र वगैरे वाटणे बर्यापैकी साहजिक असावे. मला सुरुवातीला ती कोणाचीतरी कापून ठेवलेली (हातांची) नखे वाटली. म्हटले असेल बॉ, हल्लीच्या 'मॉडर्न आर्ट'चे कोणी काय सांगावे? पण मग मोजून पाहिली, तर नऊच भरली. मग दहावे कुठे गेले, याचा विचार करू लागलो नि मग लक्षात आले, की प्रकरण वाटते तितके किचकट नाही, उलट भलतेच सोपे आहे, बाळबोध आहे.
असो.
कल्पना आवडली आहे आणि कल्पनेचे
कल्पना आवडली आहे आणि कल्पनेचे स्वागत आहे.
एकच अडचण आहे की चित्र हापिसातून इंटरनेट वापरणार्या अनेकांना न दिसण्याची शक्यता आहे. त्याला काही उपाय असेल काय?
बाकी ज्यांना हे आवडलं नाही आणि अधिकाची टिचकी मारायचा कंटाळा आहे त्या रेग्युलरांनी ट्रॅकरचा दुवा बुकमार्क करून ठेवला की झालं.
कविता वाचून चित्र सुचणे हा
कविता वाचून चित्र सुचणे हा अतिशय आनंदाचा भाग असतो. हे चित्र खालील कविता वाचून सुचले आहे.
थंड निळा ओस एकान्त
आसमंतात
ना छाया ना कुठे पंख
थंड निळाओस एकान्त
सगळ्या चंद्रनजरा कोमजलेल्या
अंतरिक्षात
ना वास्त न कुठे पुस्त
थंळ निळा ओस फुलत गारवा
रिक्त सभोत.
-मनोहर
या पलीकडे कोणतेही स्पष्टीकरण देण्यास मी असमर्थ आहे.धन्यवाद .
धन्यवाद
असे मोजक्या शब्दात चित्रकाराचे मनोगत / चित्रा विषयी माहिती वाचून चित्राचा आनंद घ्यायला सामान्य प्रेक्षकाला मदत होते.
चिंजं यांचा प्रतिसादही उपयुक्तच आहेच पण सामान्य प्रेक्षकांचे समाधान वर चित्रकर्तीने दिलेल्या चार शब्दाच्या स्पष्टीकरणाने ही होते हा मुद्दा स्पष्ट होतो.
त्यामुळे चित्रासमावेत जराशी माहिती देण्यास आता यापुढे चित्रकार स्वताहून पुढाकार घेतील अशी अपेक्षा.
मागणे लै नाही!
अपेक्षा रास्त आहे...
... पण मग त्याकरिता मुखपृष्ठ ही योग्य जागा वाटत नाही. 'रियल इस्टेट'ची अडचण होईल हा एक भाग आहेच, शिवाय इतरही अळ्यांचे डबे उघडतील.
म्हणजे असे, की:
- मुखपृष्ठावर आधी एक चित्र आणि मग त्याखाली पानभर स्पष्टीकरण, हे अतिशय अग्ली दिसेल. आकर्षक दिसणार नाही.
- मुखपृष्ठावर चित्र आणि मग त्याखाली स्पष्टीकरणाच्या पानाचा दुवा, असे करता येईल, आणि त्या स्पष्टीकरणाच्या पानावरच अभिप्रायांची व्यवस्था, असे करता येईल. पण मग:
- चित्र, स्पष्टीकरणाच्या पानाचा दुवा, आणि मुख्य संकेतस्थळाचा दुवा, अशी व्यवस्था कदाचित थोडी चमत्कारिक वाटावी. म्हणजे, चित्राच्या स्पष्टीकरणाचा दुवा आणि उर्वरित संकेतस्थळाचा दुवा यांत क्वालिटेटिवदृष्ट्या नेमका काय फरक आहे?
- एवीतेवी चित्र पाहण्याबरोबर स्पष्टीकरण / माहितीही पहायचीच आहे, तर मग चित्र आणि माहिती दोन्ही (वन स्टॉप शॉपसारखी) एकत्रितच ठेवलेली काय वाईट? चित्रात रस असणारास माहिती पाहण्यासाठी आणखी एक क्लिकची आवश्यकता का पडावी?
- इन विच केस, चित्र आणि संबंधित माहिती यांना मुखपृष्ठावरून हलवून त्यांचेसाठी स्वतंत्र सदरच का करू नये? जेणेंकरून ज्यांना त्या चित्रात रस आहे, त्यांना ते चित्र, ती माहिती आणि त्यावरील प्रतिक्रिया यांचा एकाच ठिकाणी मनसोक्त आणि मुख्य म्हणजे निर्वेधपणे आस्वाद घेता येईल.
- वरील 'निर्वेधपणा'चा मुद्दा अधिक विस्तार करण्यायोग्य आहे, असे वाटते. सामान्यतः मनुष्याचे ढोबळमानाने दोन गटांत वर्गीकरण करता यावे: ज्यांना चित्रकला कशाशी खातात याचे ज्ञान आहे असे मनुष्य, आणि ज्यांना चित्रकलेतले ओ की ठो कळत नाही असे मनुष्य. (चित्रकलेतले ओ की ठो कळत नाही, परंतु आपल्याला चित्रकलेची आवड अथवा आकर्षण आहे असे वाटते - यात काही गैर आहे, असा दावा नाही - अशा वॉनाबी मनुष्यांचे वर्गीकरण सोयीकरिता दुसर्या गटात केलेले आहे.) पैकी, पहिल्या गटाला एखादे चांगले चित्र डोळ्यांसमोर नाचवण्याची आवश्यकता नसावी. एखाद्या हीट-सीकिंग मिसाइलप्रमाणे ते चांगल्या चित्राचा वेध घेत इष्टस्थळी थडकावेतच. अडचण आहे, ती दुसर्या गटाची. (आणि त्यातही, विशेष करून उपरनिर्दिष्ट वॉनाबी उपगटाची.)
- कलाकृती मुखपृष्ठावर ठेवल्याने सामान्यतः दोन्ही वर्गांची मनुष्ये त्याकडे आकर्षित होणार, हे उघड आहे. ही दुधारी तलवार आहे. येणेंकरून कलाकृतीकडील रहदारी जरूर वाढावी. परंतु पहिल्या वर्गातील रहदारीकरिता, वर म्हटल्याप्रमाणे, याची आवश्यकता नसावी. उलटपक्षी, दुसर्या प्रकारच्या - पक्षी, चंद्रबकविवेक अथवा नखबकविवेक नसणार्या - रहदारीकडून, (प्रामाणिक परंतु गैरसमजुतीवर आधारित प्रकट रसास्वादामुळे) झाला तर रसभंगच होण्याचा धोका निर्माण व्हावा.
- कलादालन स्वतंत्र ठेवल्याने ही दुसर्या प्रकारची रहदारी कलादालनाकडे सामान्यतः वळू नये. (उदाहरणच द्यायचे झाले, तर कवितांत मला रस नाही, त्याकारणें मी श्री. 'हरवलेल्या जहाजाचा कप्तान' यांच्या कवितांकडे, अथवा त्या 'व्हॉट द फक' वगैरे वाक्प्रचारांनी अलंकृत कवितांकडे* ढुंकूनही** पाहत नाही. किंवा चुकून तेथे शिरलोच, तर वरवर पाहून, 'हे काही आपल्याला झेपण्यासारखे प्रकरण नाही, इदं न मम' म्हणून न पाहिल्यासारखे करतो, आणि सोडून देतो. त्यावर बर्यावाईट प्रतिक्रिया वगैरे लिहिण्याची इच्छा सहसा होत नाही, आणि म्हणून सहसा त्या फंदात पडतही नाही. मात्र, समजा अशी कविता मुखपृष्ठावर छापली, तर ही केवळ काही 'स्पेशल इंटरेस्ट्स'करिता नसून, आम जनतेकरिता (पक्षी, माझ्याकरितासुद्धा) आहे, इतकेच नव्हे, तर (माझ्यासारख्या) आम जनतेनेसुद्धा ती आवर्जून पहावी, याच कारणाकरिता ती तेथे ठेवलेली आहे, असा संदेश मला जातो. आणि मग ती मला समजो वा ना समजो, तेथे जाऊन त्यावर माझ्या मगदुराप्रमाणे काही बरीवाईट प्रतिक्रिया आवर्जून लिहिण्यापासून माझ्यासारख्या सदस्यांना (येथून त्यांना हाकलून दिल्याखेरीज) वंचित करता येत नाही. आणि माझ्यासारख्या सदस्यांच्या (प्रामाणिक परंतु अनभिज्ञ) प्रतिक्रियांतून त्या कवितेचा (अथवा कलाकृतीचा) गांभीर्याने रसास्वाद घेणार्यांचा रसभंग होण्याचा धोका उत्पन्न होतो.
- 'कवितेवर अथवा कलाकृतीवर प्रतिक्रिया देण्याअगोदर मुळात कविता अथवा कलाकृती कशाशी खातात, ते समजून घ्यावे' अशी अपेक्षा करता येणे हे शक्य असले, तरी रास्त वाटत नाही. मुळात 'कविता अथवा कलाकृती कशाशी खातात, ते आपल्याला कळते' हा गैरसमज अनेकदा बरीवाईट प्रतिक्रिया अगोदर दिल्याशिवाय दूर होत नाही, हा एक भाग आहे.*** दुसरे म्हणजे, असे समजून घेणे-न घेणे हा ज्याच्यात्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग आहे; ते कोणावर लादणे योग्य वाटत नाही. याशिवाय, 'काय कशाशी खातात, ते कळणारे, पक्षी उच्च अभिरुचीचे, अभिजन' विरुद्ध 'कशाबरोबर काहीही खाणारे, नीच अभिरुचीचे, बहुजन' अशी विभागणी यातून अजाणतेपणी होते, हाही आणखी एक भाग आहे.
- किंवा मग, ही 'अभिजन-बहुजन' अथवा 'उच्च-नीच' प्रकारची विभागणी कदाचित नैसर्गिक असावी, म्हणून स्वीकारायचीच झाली, तर मग ती पूर्णतया का स्वीकारू नये? त्यात 'हाफ़-मेझर्स' का ठेवावीत? म्हणजे, कलादालन हे अशा प्रकारे मुखपृष्ठावर ठेवून सर्वच प्रकारची रहदारी त्याकडे आकर्षित करण्याऐवजी, ते (कवितादि इतर विभागांप्रमाणेच) वेगळे ठेवून, केवळ तत्संबंधी इष्ट पातळीचीच अभिरुची असणार्यांनाच आकृष्ट करेल, अशा प्रकारे का ठेवू नये? जेणेंकरून (प्रामाणिक परंतु) अस्थानी प्रतिक्रियांनी रसिकांचा - आणि कदाचित कलाकाराचासुद्धा - रसभंग होऊ नये?
- कलादालन अशा प्रकारे वेगळे ठेवल्याने उपरनिर्दिष्ट दुसर्या वर्गाची रहदारी त्यापासून टळून रसिकांची मोठी सोय होईल, असे वाटते. दुसर्या वर्गातील उपरनिर्दिष्ट वॉनाबी उपवर्गाची रहदारी तरीही बहुधा चालू राहण्याची शक्यता आहे, त्याला नाइलाज आहे; परंतु मग कलादालनाच्या पानावरील स्पष्टीकरणामुळे अशा उपवर्गास नेमक्या कशा प्रकारच्या प्रतिक्रिया द्याव्यात, याचा बोध होऊन अपघात टळतील, असे वाटते.
- आणखी एक मुद्दा या निमित्ताने उपस्थित करावासा वाटतो. अशा प्रकारे कलाकृती मुखपृष्ठावर ठेवल्याने, त्यात रस असो वा नसो, ती अनायासे पाहिली गेल्याने उपरोल्लेखित दुसर्या गटातील सदस्यांचे अश्व गंगास्नात होऊन त्यांचे (पक्षी: सदस्यांचे. अश्वांचे नव्हे.) आभिरुचिक उन्नयन आपोआपच व्हावे, असा काही सद्हेतू यामागे असल्यास तो अस्थानी वाटतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाप्रमाणेच उच्च अभिरुची ही बाहेरून आरोपित करता येऊ नये, ती आतूनच रुजलेली श्रेयस्कर असते, असे या निमित्ताने सर्व संबंधितांस सुचवावेसे वाटते.
असो.
तळटीपा:
* पुन्हा स्पष्ट करतो: श्री. 'ह.ज.क.' अथवा उपरनिर्दिष्ट 'व्हॉदफा'लंकृत कवितेचे कर्ते यांच्याशी माझे व्यक्तिशः काहीही वाकडे नाही. (मी त्यांना ओळखतही नाही. व्यक्तिगत वाकडे काय असणार?) त्यांच्या कविता मला (बर्यावाईट प्रतिक्रिया लिहिण्याइतपतसुद्धा) आकर्षित करीत नाहीत, एवढाच मुद्दा अधोरेखित करण्याकरिता, केवळ प्रातिनिधिक तत्त्वावर त्यांचा उल्लेख केला आहे. अन्यथा, त्यांनी कोणत्या प्रकारच्या कविता प्रकाशित कराव्यात किंवा करू नयेत हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, त्याबाबत माझे काहीही म्हणणे नाही, म्हणणे असायचे कारणही नसावे, आणि त्याबाबत माझे काही म्हणणे असल्यास त्यास काही महत्त्व असूही नये. मुद्दा समाप्त.
** 'ढुंकणे' म्हणजे नेमके काय, हे मला आजतागायत नीटसे समजू शकलेले नाही. कोणी यावर प्रकाश पाडल्यास उपकृत राहीन.
*** मुळात कविता अथवा कलाकृती 'कळणे' म्हणजे काय, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. त्यावर श्री. चिंतातुर जंतू यांचे अंशतः विवेचन सुंदरच आहे, पण येथे तो मुद्दा नाही.
आपले म्हणणे समजत आहे
पण एकंदर याविषयी माझे मत असे आहे की मुखपृष्ठावर काय असावे अथवा नसावे हा प्रश्न / अंतिम अधिकार संस्थळ अधिकार्यांचा आहे.
आपल्या प्रतिसादावरून व एकंदर पहाता बर्याच जणांना कविता, चित्र व अन्य तत्सम कला (शिल्पकला, शास्त्रीय संगीत) इ मधील समज / रस कमीच असावा असे वाटते. याचे कारण काय असावे? लहानपणापासून गणित, विज्ञान, भाषा हेच शिकणे महत्त्वाचे बाकी छंद बिंद नंतर आयुष्य पडले आहे असे लहानपणी होत असलेले सामाजिक संस्कार असावे का? असो हा स्वतंत्र चर्चेचा विषय.. मुद्दा हा आहे की असे या विषयांना दूर ठेवले गेल्याने असे झाले असावे का? जर असेल तर ह्या विषयांना सर्वांसमोर माहितीपूर्ण पद्धतीने आणले गेले तर उत्तमच. त्यामुळे तुमच्या स्वतंत्र दालन असावे याविषयी सहमत आहेच. पण अन्य घडामोडींप्रमाणे मुखपृष्ठावर चित्रकला विषय / छोटे चित्र व क्लीक केल्यावर मुख्य धागा. व मुख्य धाग्यावर साधकबाधक चर्चा शक्यतो त्या त्या चित्रकाराने दिलेली माहीती. निदान चित्र व माहिती असलेला वाचनमात्र धागा [जर त्या धाग्यात वरचेवर "दंगा" होत असेल तर. पण मग इथे कवितांवर वाट्टेल ते मत प्रदर्शन करायची मुभा व चित्रकारांना संरक्षण/झुकते माप असेही वाटू शकते.] पुन्हा हा संस्थळ चालकांचा प्रश्न आहे. जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच अभिरूचीसंपन्न विषय / धागे हाताळायचे असतील तर जरा कसरत करावी लागेल. शेवटी आम्ही चित्रही द्यायचे, स्पष्टीकरणही द्यायचे व खिल्ली उडवून घ्यायची याला किती चित्रकार तयार होतील? अशी गुंतागुंत होउ शकते.
सार्वजनिक फोरम मधे कोणत्याही विषयावर कसलाही दंगा होउ शकतो व अश्या दंग्यामुळे संस्थळावर रहावे की न रहावे असा प्रश्न नव्या वाचकांच्या मनात येउ शकतो म्हणून सहसा ट्रॅकरसारखे (ताजा दंगा सर्वात वर) पान मुखपृष्ठ नसावे व मुखपृष्ठाचा वापर संस्थळाचा गाभा माहीती व्हावा, चालकांची संस्थळामागची भूमीका समजावी याकरता व्हावा असे माझे मत.
ढुंकणे ह्या क्रियापदाविषयी...
ढुंकणे हे जरी क्रियापद असले तरी त्याचा उपयोग केवळ तेवढ्याच शब्दाने फारच क्वचित केलेला आढळतो. ढुंकून पाहणे अशा अर्थी वापरल्या जाणार्या क्रियापदाचा सरळ अर्थ डोकावून पाहणे असाच आहे. कृ०पां० कुलकर्णी ह्यांच्या व्युत्पत्तिकोशात त्याचे मूळ संस्कृतमधल्या ढौक् मध्ये असल्याचं नमूद केलं आहे, परंतु त्या शब्दाचा अर्थ तर जाणे, जवळ जाणे, आणणे असा आपट्यांच्या कोशात दिसतो.
चार शब्द
या निमित्ताने काही सदस्यांच्या वेगळ्या बाजू दृष्टिपथास पडल्याने आम्हांस संतोष झाला आहे. त्यातून किरकोळ विनोदनिर्मिती होते आहे हे ठीकच, पण ज्यांची अपेक्षा त्याहून अधिक काहीतरी मिळावे अशी आहे त्यांच्यासाठी चार शब्द*.
>>रसग्रहणही करायचे म्हणजे शब्दांचा भरणा
या भावनेशी सहमत आहे. द्रुश्यकलेचा आस्वाद शक्यतो डोळ्यांनी घ्यावा हे खरेच, पण वर हेही म्हटले आहेच, की -
>>तस्मात्, रसग्रहण नाही तरी किमानपक्षी स्पष्टीकरण आवश्यक.
अशी गरज भासल्यास सर्वात प्रथम हे सांगावेसे वाटते की, चित्रातले पांढरे आकार म्हणजे पक्षी की चंद्र, निळा अवकाश म्हणजे समुद्र की आकाश असे अर्थबोधन करणे सर्व चित्रांस गरजेचे असतेच असे नाही. किंबहुना हे कळले म्हणजे चित्र कळले असे समजण्यात फार शहाणपण आहे असे मानणेदेखील गरजेचे नाही.
सध्या दर्शनी पानावर दिसणार्या चित्राचे लहानपणीच्या ठोकळेबाज निसर्गचित्रांशी जे नाते काहींना जाणवले आहे त्यात अजिबात विसंगती नाही. वर निळा अवकाश आणि खाली मातकट अवकाश दिसला की त्याचा संबंध निसर्गचित्राशी लागणे साहजिक मानवी प्रवृत्ती म्हणता येईल. पण यापलीकडे जाऊन काही विचार केला जाऊ शकतो. जसे:
० रंग, आकार, रेषा या चित्राच्या मूलभूत घटकांपैकी कोणते घटक या चित्रात अधिक लक्षात येण्याजोगे वापरले आहेत?
चित्राचा अवकाश हा मुख्यत: दोन रंगांच्या चौकोनांनी व्यापला आहे. दोन चौकोनांनी व्यापलेले क्षेत्रफळ समान नाही; ते बहुधा 'गोल्डन रेशो'नुसार असावे.
० ते दोन रंग एकमेकांशेजारी बरे दिसतात का?
हे व्यक्तिसापेक्ष म्हणता येईल. स्वतःचे स्वतःला विचारून पाहावे. सध्या दर्शनी असलेल्या चित्रातले दोन रंगांचे पट्टे हे नेत्रसुखद (मला) वाटतात. वर उल्लेखलेल्या निळ्या-मातकट रंगांच्या नैसर्गिक संदर्भामुळे कदाचित ते अनेकांना नेत्रसुखद वाटत असतील. मार्क रॉथ्को या अमेरिकन चित्रकाराच्या शैलीची थोडी आठवण होते
० त्याशिवाय इतर काही उठून दिसते का?
पांढरे आकार.
० पांढर्या आकारांचा दृश्यपरिणाम काय होतो?
निव्वळ दोन रंगीत पट्ट्यांपेक्षा चौकटीत थोडे वैविध्य निर्माण होते, पण गिचमिडगर्दी होत नाही. त्यामुळे ते आकार दोन रंगीत पट्ट्यांना पूरक होतात. आकार लालित्यपूर्ण वाटतात. (चंद्रकोरीसारखे आकार लालित्यपूर्ण वाटणे हेदेखील कदाचित अनेक माणसांच्या मनात सहज होत असावे.)
० आणखी काय दिसते?
रंग लावण्याची पद्धत ही हलक्या हाताने पातळ थर देत जाणारी असावी. त्यामुळे रंगाचा एकच एक सलग पट्टा दिसण्यापेक्षा त्यात कमी जास्त जाडीचे लेप दिसतात. यामुळेसुद्धा थोडे वैविध्य निर्माण होते. अशा छोट्या फरकांमुळे नाजुक किंवा तलम असा एकंदर दृश्यपरिणाम होतो.
* - 'चार शब्द' असे वाचताच खालील शब्द मोजण्याची इच्छा होत असेल तर मराठी भाषेचा अभ्यास वाढवा ही नम्र विनंती.
२० मार्च - वर्ल्ड स्पॅरो डे
दिन विशेष मधे " २० मार्च - वर्ल्ड स्पॅरो डे "(http://www.worldsparrowday.org/how.html) चाही समावेश केला जावा.
आठवड्याभरात मी रोज निदान एकदा तरी ..
.. ऐसी वर डोकाऊन जातो. अगदी चांगलं चित्र जरी असलं (चित्र का लावलंय समजाऊन सांगायला लागतंय यातच सगळं आलं) तरी सातातल्या पाच वेळा (मी दुसर्यांदा चित्र बघायचा प्रयत्न करीन म्हणून पाच वेळा) एक क्लिक निष्कारण वाढतो. आठवड्याभरापेक्षा जास्त वेळ चित्र+मजकूर बदलला नाहि तर हि निव्वळ गैरसोय न राहता त्रासदायक, कटकटीची बाब होते.
मुळातली संकल्पना - काहितरी नवं, वेगळं लोकांपुढे मांडावं - स्तुत्य आहे. मात्र ज्या पद्धतीने ती करून बघितली जातेय त्यामुळे त्या संकल्पनेलाच धोका पोचतोय. कितीहि चांगली कल्पना असली तरी ती लोकांवर लादण्याऐवजी लोकाना 'सादर केली' गेली, तर ती यशस्वी व्हायची शक्यता जास्त असते. जुईचं चित्र जरी मला व्यक्तिशः आवडलं नाहि, तरी कविता वाचून चित्र काढलं हि कल्पना मला नवीच आहे. आठवड्यातनं एकदा अशा मजकूराच्या वेगळ्या पानावर मी नक्किच नजर टाकून येईन. आणि "च्यामारी, रोज ते चित्र बघा नी अजून एक क्लिक लेख वाचायला" ऐवजी " कवितेवरनं चित्र प्रकार ऐकला होतास?" याबद्दल मित्राना सांगेन !!
हम्म
एकुण संस्थळांबाबत आपले हाटेलसारखे असते. आवडले तर परत जायचे नायतर दुसरे शोधायचे. उगाच हा वेटर बदलून पहा, वेटरच्या ड्रेसचा रंग जरा फिका हवा, कॅश काउंटर नैऋत्येऐवजी ईशान्येला हवे, दर्शनी भागात माशांच्या पेटीऐवजी एखादे म्यूरल असावे असले फालतू सल्ले देणे हा आमच्यापुरता अगोचरपणा समजतो आपण. तोच न्याय संस्थळाला, सदस्यांनी काय करावे, कसे लिहावे कसे लिहू नये, कंपूबाजी करावी का नाही, संपादकांच्या नावे पृथक पृथक करावे की नाही, संपादनाचे निकष काय असावेत इ.इ. गोष्टी निरर्थक मानतो आम्ही. फीडबॅक थेट व्यवस्थापन अथवा संचालकांना द्यावा, जाहीर नव्हे या मताचे आम्ही. कारण सोपे आहे, अनेकदा 'संस्थळावरच्या' लिखाणाऐवजी 'संस्थळाबद्दलच्या' लिखाणाचा धुरळाच अधिक उडत असतो. एकाने पंखा चालू केला की दुसरा विंड टर्बाईनच आणून लावतो (ओके, ओक्केऽऽ, ते स्वतः फिरत नाही ठौक आहे, लगेच चुका काढायला धावायची गरज नाही.) तेव्हा आम्हाला आपले मिपावरचे तात्यांचे धोरण शंभर टक्के पटते 'आहे हे असं आहे. पटलं तर र्हावा....' (हे विधान अर्थातच तिरकस नाही, आय रिअली मीन इट.) प्रत्येक संस्थळावर आमच्या चपला नेहमीच तयार असतात. :)
ता.क. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' ही म्हण मात्र अजिबात विसरू नये एवढा एकच अनाहुत अगोचरपणाचा सल्ला.
विशेष उल्लेखनीय
"ऐसी अक्षरे"च्या मुख्यपृष्ठावरील "आंतरजालावरून" या सदरात राज क्षीरसागर यांच्या "ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट" बद्दलच्या उत्कृष्ट लिखाणाची दखल घेतल्याबद्दल अतिशय आनंद झाला. त्यांच्या लेखाचा दुवा : http://rbk137.blogspot.in/2012/08/blog-post_14.html
महात्म्य?
दर्शनी पानावर जे 'दिनमहात्म्य' असतं, ते माझ्या समजुतीप्रमाणे 'दिनमाहात्म्य' असं हवं. (मी मोल्सवर्थमधून खात्री करून घेतलेली अाहे.) पण खरं तर 'माहात्म्य' याचा अर्थ मोल्सवर्थने greatness किंवा majesty असा दिलेला अाहे, त्या अर्थाने तो शब्द अतिशयोक्तच वाटतो. प्रत्येकच दिवस great किंवा majestic कसा असेल? त्यापेक्षा 'दिनवैशिष्ट्य' हे जास्त बरं वाटतं.
'दिनवैशिष्ट्य'
'दिनवैशिष्ट्य' हे आता अधिकाधिक ताजे ठेवण्याचा प्रयत्न असेल. महाराष्ट्राशी संबंधित तसेच कला-साहित्याशी संबंधित घटना 'दिनवैशिष्ट्य' या सदरात अधिकाधिक देता येतील याचाही प्रयत्न केला जाईल.
एखाद्या दिवसाची एखादी घटना दिनवैशिष्ट्यात येणे अगत्याचे वाटत असेल मात्र ते 'दिनवैशिष्ट्य' या सदरात दिसले नाहि तर मला अथवा इतर कोणत्याही संपादकांना जरूर व्यनी करावा. तसेच येत्या काहि दिवसांत एखादी विशेष घटना अभिप्रेत असेल तरीही मला जरूर व्यनी करावा. योग्य ती माहित सतत अपडेटवली जाईल
हॅ:! काहीतरीच!
सध्या वैशाख चालू आहे, तेंव्हा दर्शनी पानावरची फाल्गुनातली केळी आता खाऊन टाकावीत ही नम्र विनंती.
अहो, ती सडली! (नाहीतर मग काय फाल्गुनातली केळी आतापर्यंत टिकणार आहेत काय? त्यांचा शेल्फ लाईफ जास्तीत जास्त एखादा आठवडा!) सबब, आता ती खाण्यालायक राहिलेली नाहीत.
तुमचे आपले काहीतरीच!
एक विनंती
> अपग्रेडमुळे सध्यातरी संस्थळाला धोका नसल्याचं इमेल अजितदादा पवार यांनी पाठवलेलं आहे.
अशी कोरडी इमेल पाठवून आपल्या समस्या सुटणाऱ्या नाहीत. उदाहरणार्थ, दर्शनी पानावर 'ऐसी अक्षरे' असं कुणीतरी हाताने लिहून शेजारी पेनचं नीब रेखाटलेलं आहे, शिवाय दोन फाटके म्हातारे 'वेळ घालवायला' कुठल्यातरी भंगड मोहल्ल्यात पगडी खेळताना दाखवले आहेत. आपला निष्कांचनपणा असा वेशीवर टांगल्यामुळे लोकांचा आपल्याविषयीचा आदर कमी होतो, ही वस्तुस्थिती आहे.
जर अजितदादांकडून काही देणगी मिळवता आली, तर यात पुष्कळ सुधारणा करता येतील. संस्थळाचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिता येईल, आणि शेजारी प्लॅटिनमचं नीब असलेलं मॉन्त ब्लांक दाखवता येईल. शिवाय हॅँडस्टिच्ड सूट घातलेले दोन रुपेरी केसांचे म्हातारे मॉँटे कार्लोमध्ये पोकर खेळताहेत असा फोटो टाकता येईल. पुण्यात राहणाऱ्या आपल्या सदस्यांनी त्यांच्याकडे या दृष्टीने खडा टाकून पाहायला काय हरकत आहे? मला वैयक्तिक अपेक्षा नाहीत; मी संस्थळाच्या हितासाठीच हे सुचवतो आहे.
'आज ४ सप्टेंबरच्या
'आज ४ सप्टेंबरच्या सूर्यास्तापासून रोश हशाना अर्थात ज्यू नववर्षाला प्रारंभ होईल. नववर्षोत्सव ६ सप्टेंबरच्या सूर्यास्तापर्यंत चालेल.
ऐसीअक्षरेच्या ज्यू धर्माचे पालन करणार्या सदस्यांना नववर्षोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!'
पहिल्यांदाच संस्थळावर शुभेच्छांच्या मजकूराकडे लक्ष गेलं...आणि हे रोचक वाटलं. दिनवैशिष्ट्य मध्ये सण असल्याचं लिहिणं वेगळं आणि अशा स्पेशल शुभेच्छा वेगळ्या.
याआधी कोणकोणत्या धर्मांच्या सणांच्या शुभेच्छा ऐसीकडून दिल्या गेल्या ते पहायची इच्छा झाली. तशी सोय आहे काय?
आभार
१. नाही. तशी सोय उपलब्ध नाही. मात्र याआधी विविध व्यक्तींचे जन्मदिवस, श्रद्धांजली, स्मरणदिवस, विशेष घटना यांना या सदरात प्रसिद्धी दिलेली आहे.
२. सदर प्रकार सुरू झाल्यानंतर पहिलाच नववर्षोत्सव आला होता. त्याची नोंद घेतली गेली. यापुढेही इतर नववर्षोत्सवांच्या शुभेच्छाही देण्याचा प्रयत्न होईलच.
३. एखाद्या दिवसाचे वैशिष्ट्य / शुभेच्छा देण्याची अपेक्षा असल्यास मला व्यनी केल्यास योग्य त्या तपशीलांचा अंतर्भाव केला जाईल .
माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद.
माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद.
"मात्र याआधी विविध व्यक्तींचे जन्मदिवस, श्रद्धांजली, स्मरणदिवस, विशेष घटना यांना या सदरात प्रसिद्धी दिलेली आहे."...धार्मिक सणांबद्द्ल उत्सुकता जागृत झाली होती.असो.
ऐसी हे एक सुंदर संस्थळ आहे. पानांची सजावट बटबटीत नसणे, रंगसंगती भडक नसणे हे एक कारण आहे मला हे संस्थळ आवडण्याचं. तसंच मराठी आहोत म्हणून शिवाजी, ज्ञानेश्वर..झालंच तर गणपती, एखादं देऊळ, भगवा झेंडा वगैरे...इत्यादींचे फोटो संस्थळ उघडताच नजरेस न पडणं हे ही माझ्या मते संस्थळाचं एक बलस्थान आहे. धार्मिक घडामोडींना (दंगली वगैरे नव्हे, सणवार वगैरे म्हणत्ये) सार्वजनिक रितीने अग्रगण्य न धरता त्याची नोंद घेऊन संस्थळ नेहमीप्रमाणे कार्यरत असणं हे ही ऐसीवर पहायची सवय आहे. त्यामुळे ज्यू धर्मिय सभासदांची विशेष दखल जरा लक्षवेधी वाटली(दिनवैशिष्ट्य मध्ये असती तर काही वेगळं वाटलं नसतं). ही माझी व्यक्तिगत मतं आहेत.संस्थळ चालवणार्यांची भूमिका समजून घ्यावी म्हणून विचापूस केली.प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
संस्थळ आवडतं आहे हे आवर्जून
संस्थळ आवडतं आहे हे आवर्जून सांगितल्याबद्दल आभार. :)
ऐसीवर धार्मिक सणांची दखल दरवेळी अशा/इतक्या ठळकपणे घेतली जातेच असे नव्हे हे मान्य. मात्र ही दखल विविध रुपांत घेतली गेली आहे. कधी त्या विषयी लेख लिहिले जातात तर कधी त्या सणाशी संबंधित विषयांवर/बातम्यांवर चर्चा सुरू असतात. दिनवैशिष्ट्य आहेच, शिवाय सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेला 'लोगो'मधील बदल तुम्ही बघितला असेलच.
तरी या पुढे विशेष नोंद घेताना आवश्यकता नसल्यास धार्मिक उल्लेख करण्याचे टाळण्याचा प्रयत्न राहिल.
बाकी,
वैयक्तिक मतः बहुसंख्य व्यक्ती जे सण साजरे करतात ते सर्वांना माहित असतातच पण मराठी समाजात मिसळलेल्या ज्युंच्या नववर्षाबद्दल कोणाला फारशी माहिती दिसत नाही. किंबहुना मराठी भाषक व्यक्ती म्हणजे हिंदु अथवा मुसलमानच असेल असे अनेकदा गृहित धरले जाते. प्रत्यक्षात ते तितकेसे खरे नाही हे आपण जाणतोच हे काही प्रमुख कारण नाही पण या धर्माचा उल्लेख आवर्जून करताना माझ्यापुरता तरी हा ही एक विचार होताच (असे पश्चातबुद्धीने अधिक प्रकर्षाने जाणवते आहे).
अगदी नेमकं काय या ज्यू-धर्मिय
अगदी नेमकं काय या ज्यू-धर्मिय शुभेच्छांबाबत मला खटकलं ते तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास हे वाचा: 'गणेश चतुर्थी/ दिवाळी हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण. हिंदू धर्माचे पालन करणार्या सदस्यांना शुभेच्छा', '१ जानेवारी हे ख्रिश्चन नववर्ष. ख्रिश्चन धर्माचे पालन करणार्यांना शुभेच्छा'...या शुभेच्छा सामान्यपणे जशा द्यायची घ्यायची सवय आहे तशा वाटत आहेत का ?
बाकी माहिती देण्याच्या उद्देशाबद्दल, शुभेच्छांबद्द्लही काहीच हरकत/मत नाही...ते चालू दे.
ऐसी हे एक सुंदर संस्थळ आहे.
ऐसी हे एक सुंदर संस्थळ आहे. पानांची सजावट बटबटीत नसणे, रंगसंगती भडक नसणे हे एक कारण आहे मला हे संस्थळ आवडण्याचं. तसंच मराठी आहोत म्हणून शिवाजी, ज्ञानेश्वर..झालंच तर गणपती, एखादं देऊळ, भगवा झेंडा वगैरे...इत्यादींचे फोटो संस्थळ उघडताच नजरेस न पडणं हे ही माझ्या मते संस्थळाचं एक बलस्थान आहे.
धन्यवाद. एकंदरीतच बटबटीतपणावर व्यवस्थापनाचा विशेष प्रेम नाही. त्यामुळे विशिष्ट अस्मितांचा उदोउदो करणंही प्रयत्नपूर्वक टाळलेलं आहे. रंगसंगतीचा साधेपणा, विशिष्ट पूजनीय व्यक्तींची चित्रं टाळणं किंवा इतर अस्मितादर्शक चिह्नं टाळणंही त्यातूनच आलेलं आहे. बऱ्याच वेळा एखादी गोष्ट पूज्य जाहीर केली की तिच्याविरुद्ध काही बोलणंही त्याज्य मानलं जातं. याचा अर्थ ऐसीच्या निष्ठा कुठेच नाहीत असं नाही. शुद्ध विचार, उत्तम साहित्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, आसपास घडणाऱ्या घटनांविषयी जागरुकता या गोष्टींना ऐसीवर नेहमीच उत्तेजन दिलं जातं. या प्रकारच्या गोष्टींकडे विशेषकरून आकर्षित होणारा, याला बलस्थान मानणारा वाचकवर्ग आहे हे वाचून बरं वाटलं.
मुखपृष्ठावरचे चित्र
आजचे चित्र सुरेख. मोठ्या आकारात पाहता आल्याने (कॅनवासच्या भेगांसकट) अधिक मजा आली.
या चित्रकाराची इतर चित्रेही पाहिली. Hunting Birds at Night विशेष आवडले. या उपक्रमाबद्दल धन्यवाद.
(अवांतर :
१. चित्रातील बायकांच्या हातांचे आकार घट्टमुट्ट वाटले. लहान मुले जसे हातापायाची बोटे नीट न काढता आल्याने युक्ती करून ते आकार गंडाळून टाकतात तसे काहिसे मध्यभागी असलेल्या स्त्रीच्या मुठीबाबत वाटले. चिंजंची लेखमालिका वाचायला हवी आता :).
२. Vincent van Gogh चे उच्चारण - १, २ :))
आणि हो...
थोर बस्टर कीटनची आठवण ठेवल्याबद्दल आभार -
दुवा १ - यातून 'बर्फी' चित्रपटात ढापलेले काही प्रसंग ओळखा :).
जपानी चित्रशैलीतले डोळे
आजचे मकाकचे चित्र पाहून एक कुतुहल चाळवले.
सामान्यतः जपानी अभिजात व्यक्तीचित्रांमध्ये डोळ्यांची दोनही टोके लांबवून अधिक टोकदार केलेली दिसतात. पण येथे माकडाचे डोळे गोलाकार आणि थोडे बाहेर आलेले असे चितारण्याची शैली दिसली. थोडी इतर चित्रे शोधली असला, सामान्यत: प्राण्यांना किंवा राक्षसी/अमानवी गुण दाखविण्याकरिता असे डोळे बहाल करणे ही खासियत दिसते (भय रस ?). उदा. १, २, ३, ४.
परंतु इथे, इथे आणि इथे व्यक्तीलाही असे डोळे पाहून थोडे आश्चर्य वाटले. तरी चित्रांच्या विषयाबद्दल फार माहिती न मिळाल्याने टिप्पणी करू शकत नाही. काही जपानी लढवय्यांच्या पितळी मूर्तींमध्ये असे डोळे पाहिल्याचे आठवते. पण तेथेही ती अमानवी व्यक्तीमत्वेच होती.
ही मानव-मानवेतर डोळे चितारण्याची शैली त्या काळी एखादा नियम होता की काय असे वाटून गेले.
एक अंदाज
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. जपानी कलेचा माझा अभ्यास नाही, पण एक अंदाज - वसाहतवादाच्या काळात जपान आणि युरोपची एकमेकांच्या कलेशी ओळख झाली. अठराव्या शतकापासून युरोपिअन कलेवर जपानी किंवा पौर्वात्य प्रभाव दिसू लागला आणि एकोणिसाव्या शतकात त्याचा कळस गाठला गेला. एका काळापर्यंत जपानची कला पाश्चात्य प्रभावाहून चांगलीच स्वतंत्र होती, पण हळूहळू पाश्चात्य वास्तववादी शैलीचा जपानी शैलीशी मिलाफ घडवण्याचे प्रयत्न झाले. ह्या चित्रात तसंच काहीसं जाणवतं - म्हणजे शरीराची घनता उभी करण्यासाठी जे हलकं रंगलेपन आणि कुंचल्याचे फटकारे वापरले आहेत ते पौर्वात्य पद्धतीचे आहेत, पण चेहरा परिणामकारक करण्यासाठी पाश्चात्य वास्तववादी शैलीचा वापर केला आहे.
चारुता सागर
'चारुता सागर' (दिनकर दत्तात्रय भोसले) यांचा आज जन्मदिवस.
त्यांच्या निधनानंतर (मे २०११) त्यांच्याबद्दल आलेले वृत्तपत्रांतले लेख.
१. सकाळ - 'मायमराठीचा शरच्चंद्र !' लेखक - विश्वास पाटील
२. महाराष्ट्र टाईम्स् - 'अबोल कथेच्या मागावर' लेखक - जी. के. ऐनापुरे
मोत्सार्ट् - लाक्रिमोज़ा
भेदून टाकणारे समूहशोकगीत आहे.
'मिलॉस् फोरमन्'चा 'आमादेऊस' पाहताना मोत्सार्टच्या मृत्यूचा हा प्रसंग आणि त्याला वापरलेले 'रेक्वियम् लाक्रिमोज़ा'चे पार्श्वसंगीत अंगावर येते.
(इंग्रजी रुपांतर)
Full of tears shall be that day
On which from ashes shall arise
The guilty man to be judged;
Therefore, O God, have mercy on him.
Gentle Lord Jesus,
grant them eternal rest. Amen.
'लाक्रिमोज़ा' दर्शनी पानावर आणल्याबद्दल धन्यवाद.
प्रतिसाद किंवा नितळ अवलोकनार्थ - दोनातेल्लोचा डेव्हिड
प्रख्यात शिल्पकार दोनातेल्लो ह्याचा १३ डिसेंबर हा स्मृतिदिन आहे. त्या निमित्तानं त्याच्या 'डेव्हिड' ह्या अजरामर रचनेतला एक विशिष्ट तपशील 'ऐसीअक्षरे'च्या मुखपृष्ठावर दिला आहे. ३७७ कलमाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालासंबंधी एक प्रतिक्रिया म्हणूनही त्याच्याकडे पाहता येईल, किंवा पुरुषाचं सौंदर्य म्हणून निरखायला 'ऐसी'च्या काही रसिक वाचकांना तो तपशील आवडेल अशी आशा आहे.
विकीवरुन साभार
खालील उतारा वाचता, काहीतरी समलैंगिकतेशी निगडीत आहे खरे या पुतळ्यात -
The strangeness of the figure has been interpreted in a variety of ways. One has been to suggest that Donatello was homosexual and that he was expressing that sexual attitude through this statue.[16][17] A second is to suggest that the work refers to homosocial values in Florentine society without expressing Donatello's personal tendencies.[18][19] During Classical antiquity, homosexuality had been something that was practiced regularly, and men believed that they could only achieve great love with other men.
दोनातेल्लोचा डेव्हिड हे चित्र
दोनातेल्लोचा डेव्हिड हे चित्र नेमके आणि पुरक आहे, हे चित्र सुचण्याबद्दल सुचणार्याचे कौतुक आहे. डेव्हिडबद्दल अधिक माहिती.
आत्महत्या?
२२ किंवा २३ एप्रिल १९४२ : हिटलरपासून सुटका मिळवण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेला ज्यूवंशी लेखक श्टेफान झ्वाईग आणि त्याची पत्नी यांनी आत्महत्या केली. वाढती असहिष्णुता, वर्चस्ववाद आणि नाझी विचार यांमुळे मानवजातीच्या भविष्याविषयी सर्व आशा संपुष्टात आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. "I think it better to conclude in good time and in erect bearing a life in which intellectual labour meant the purest joy and personal freedom the highest good on Earth"
I doubt if they were actually 'intellectuals'.
मस्त आहे प्रयोग. सातत्यानं
मस्त आहे प्रयोग. सातत्यानं चालू राहो आणि यशस्वी होवो अशा शुभेच्छा.