खरडफळा
द्रुपालच्या नव्या आवृत्तीत खरडफळा नसल्याने रिकामटेकड्या गप्पा मारण्याची सुविधा नाहीशी झाली.अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आता मोडून काढण्यासाठी हा खरडफळा हा धागा म्हणून काढलाय!!
मंडळी , रिकामटेकड्या गप्पा मारायला या . खरडफळ्याचे गतवैभव परत आणा.
नबा यांच्याशी गप्पा झाल्या नाहीत बऱ्याच दिवसात ..
फक्त हत्ती क्षमस्व !!
बाकी सगळे या
चालक मालक मंडळी - एवढे चालवून घ्या आमचे !!
AGT कार्यक्रमांत आवडलेली दोन…
AGT कार्यक्रमांत आवडलेली दोन गाणी.
१. https://youtu.be/cbJ81tmFj_U?si=5V4ooq37VAdXskUJ
२.https://youtu.be/zzwraaoppt0?si=zan2C66eme0kY6ew
.
घ्या! बोले तो, परवा ते अनन्त_यात्री मला कावळा म्हणाले.१ आता इथे तुम्ही म्हणताय, की मला त्रास होईल, म्हणून. कसे व्हायचे?
आणि, व्यनि? असले काही असते काय हल्ली? की, या ‘खरडफळ्या’प्रमाणेच (जाहीर) ‘व्यनिं’चा धागा काढायचा, म्हणताय?
१ I take that as a compliment, ती गोष्ट वेगळी.१अ
१अ परंतु, त्याच्या एक्स्टेन्शनने, इथे तुम्ही मला पिंडाला शिवणारा कावळा म्हणताय, असा अर्थ निघतो, त्याचे काय करावे, असा प्रश्न (नव्याने) निर्माण होतो. पाहू.
…
फक्त हत्ती क्षमस्व !!
न्यूटनने म्हणे मांजरीसाठी नि तिच्या पिल्लासाठी अशी दोन भगदाडे पाडून ठेवली होतीनीत्, आपल्याच घराच्या दाराला. (‘तो येक मूर्ख!’)
सांगण्याचा मतलब, आता धाग्याचाच खरडफळा करण्याची जर वेळ आलेली आहे, तर मग किती ‘खरडफळे’ असावेत, याला काही मर्यादा उरलेली नाही, नाही का? (वाइटातूनही चांगले निघते, ते असे!) मग हत्तीसाठी वेगळा खरडफळा काढून दिला, तर? (‘हत्तीखाना’ असे नाव देऊ या त्याला, पाहिजे तर.)
(भल्याबुऱ्यांची तुलना हत्तीशी करणारे हत्तीचे जे धागे असतात हल्ली, तेही (त्यांवरील प्रतिसादांसहित) हलविता येतील त्याखाली, पाहिजे तर. संपादकांचे काम वाढेल — अनलेस, कोणीतरी बॉट वगैरे लिहिला त्यासाठी, तर; (ते काम माझ्या एक्स्पर्टीज़च्या बाहेरचे आहे; क्षमस्व.) — परंतु, संपादकांचा तरी तसाही नाहीतरी काय उपयोग असतो मग? उगाच काय शोभेचे संपादक ठेवले आहेत काय, आँ? असो.)
(अवांतर: ‘हत्तीखान्या’प्रमाणेच ‘पटाईतखाना’ही काढता येईल, हवे तर. कशी वाटते कल्पना?)
(आणखी एक कल्पनेची भरारी: दिवाळी अंकाचासुद्धा एक वेगळा ‘खरडफळा’ केला, तर? असो.)
…
हो, असे मीदेखील ऐकलेले आहे. शिवाय, ती चेशर१ मांजरीची (होय, तीच ती. ‘अॅलिस’-छाप.) खापरपणजी होती, अशीही एक वदंता आहे.
मात्र, तिच्यात श्रोडिंजरच्या मांजरीचे काय, किंवा चेशर मांजरीचे काय, कोठलेच विशेष गुणधर्म नव्हते. किंबहुना, ती एक अतिशय साधीसुधी मांजर होती, खरे तर. चारचौघींसारखी, नाकीडोळी नीटस, फेंदारलेल्या मिश्या, शेपूट कायम वर, वगैरे वगैरे. मात्र, पुढे कधीतरी, काही पिढ्यांनंतर, तिच्या वंशावळीतील कोठल्यातरी एका मांजरीचा (शरीर)संबंध श्रोडिंजरच्या मांजरीची बीजे असलेल्या (रस्त्यावरच्या) कोण्या रँडम बोक्याशी आला, तर (तिच्याच वंशावळीतील) दुसऱ्या कोठल्यातरी मांजरीचा चेशायर मांजरीची बीजे असलेल्या दुसऱ्या कोठल्यातरी (रस्त्यावरच्याच) मवाली बोक्याशी. And the rest, as they say, is history. मात्र, मधल्यामध्ये हिला दोघींचेही (फुकटचे) मातामहीत्व मिळून गेले, झाले.
चालायचेच. जगाची रीत ही अशीच आहे, त्याला काय करणार?
१ ‘आमच्या’त याला ‘चेशायर’ असे (खणखणीत आवाजात नि सुस्पष्ट उच्चारांनिशी, ‘य’वर आघात देऊन) म्हणण्याची पद्धत आहे.१अ
१अ बाकी, Cholmondeley (बादवे, हेदेखील चेशरमधलेच, बरे का!) असे स्पेलिंग करून त्याचा उच्चार ‘चमली’ असे करणाऱ्या इंग्रजांना आमचा साष्टांग प्रणिपात!
.
माझा नवरा पालीला खूप घाबरतो. पाल बघितल्यावर त्याची प्रतिक्षिप्त क्रिया तिला शोधून मारून टाकणे ही असते. आमच्या फ्रिजखाली एक पाल राहायची. रात्र झाली की ती फ्रिज आणि वॉशिंगमशीनमधला रास्ता ओलांडून वॉशिंग मशीनखाली जायची. म्हणून मी आणि पोरानं तिचं नाव यामिनी ठेवलं होतं. ती पोराच्या वडिलांना दिसू नये अशी इच्छा आम्ही मनोमन बाळगून होतो. पण एक दिवस ती त्याच्यासमोर तडमडली आणि शिव्या खाऊन मेली.
यातून मला काही मानसशास्त्रीय सिद्धांत सुचले.
पहिला म्हणजे ज्याची आपल्याला भीती वाटते ते आपण संपवायचा प्रयत्न करतो.
दुसरा म्हणजे, पाल तशी निरुपद्रवी (कधीकधी उपयुक्तही) असूनही लोकांना तिची भीती वाटते. यावरही व्यापक विचार होऊ शकतो.
याउलट वाघ, जो माझ्या नवऱ्याला सहज खाऊन टाकू शकेल (मी आणि तो एकत्र असलो तर कदाचित वाघ आधी मला खाईल. पण ते एक असो) बघण्यासाठी मागच्या वर्षी माझ्या नवऱ्यानं जवळपास लाखभर रुपये टिकवले होते. आणि सकाळ दुपार संध्याकाळ अशा जवळपास ९ साफाऱ्या करून त्याला केवळ त्यातल्या २ सफारीत वाघ दिसला.
इतर काही निरीक्षणं:
काही पाली इतक्या पांढऱ्या असतात की त्यांच्या शरीरातल्या नसा स्पष्ट दिसतात. अशा पालींना मी मस्तानी म्हणते.
काही पाली दगडी हिरवट असतात. त्याही मला आवडतात.
.
मला सगळ्याच पाली आवडतात. किंबहुना, पाल हा अखिल प्राणिसृष्टीच्या सौंदर्याचा मानबिंदू आहे, यावर माझा दृढविश्वास आहे.
माझा नवरा पालीला खूप घाबरतो. पाल बघितल्यावर त्याची प्रतिक्षिप्त क्रिया तिला शोधून मारून टाकणे ही असते.
पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना… चालायचेच.
माझ्या बाबतीत उलटा प्रकार आहे. काय आहे, की (इथेच अगोदर ‘य’ वेळा ज़िक्र केल्याप्रमाणे) मी पालींबरोबरच लहानाचा मोठा झालो. (म्हणजे, मी मोठा झालो, हे माझ्यासहित अनेकांना मान्य नाही, ही बाब अलाहिदा.) मी ज्या घरात वाढलो, त्या घरात पालींना मुक्तसंचार होता. माझ्या बालपणीच्या सख्यासोबत्या होत्या त्या. त्यामुळे, पाल बघितली, की अतीव प्रेम याव्यतिरिक्त दुसरी कोठलीही भावना माझ्या मनात उमटूच शकत नाही. (Unless you count आत्मीयता and everything in that genre.)
बाकी, पालीकरिता ‘यामिनी’ हे नाव आवडले. ‘मस्तानी’ची कल्पनाही मस्त आहे.
पाल तशी निरुपद्रवी (कधीकधी उपयुक्तही) असूनही लोकांना तिची भीती वाटते.
कधीकधी?
आत्यंतिक स्वयंसेवी वृत्तीने (तथा पर्यावरणाला अजिबात धक्का न लावता) घरात कीटकांवर नियंत्रण ठेवण्याकरिता पाल जो हातभार लावते, त्यास त्रिभुवनात तोड नाही!
आणि तरीही, पालींना घरात येण्यापासून परावृत्त करण्यासाठी काही लोक म्हणे अंड्यांच्या टरफलांना भोके पाडून त्यांना छपराला टांगून ठेवतात. (असल्या रानटी प्रथांवर आमचा मुळीच विश्वास नाही. तसेही, पाली असल्या मूर्ख उपायांना भीक घालीत नसाव्यात. Extremely smart creature!) असल्या लोकांच्या टरफलांना भोके पाडून त्यांना छपराला उलटे टांगून खालून मिरच्यांची धुरी दिली पाहिजे, असे आमचे प्रांजळ मत आहे. परंतु, आमच्या मताला विचारतो कोण? (What a colossal waste of eggshells!) चालायचेच.
बाकी, पालींबद्दल भीतीचे म्हणाल, तर, it is cultivated, manufactured. बोले तो, लहानपणापासून अनेकांच्या मनांवर ‘पालींना घाबरायचे असते’ या संस्काराचा भडिमार होतो, त्याचा हा परिपाक आहे. (लोक काय, मुसलमानांनासुद्धा घाबरतात. बहुतांश लोकांच्या उभ्या आयुष्यांत त्यांच्या वाट्यास येण्याची यत्किंचितही शक्यता असणाऱ्या बहुतांश मुसलमानांत घाबरण्यासारखे काहीही जरी नसले, तरीही. परंतु, लहानपणापासूनचे दृढसंस्कार असतात ते. त्याला काय करणार?)
याला एकच उपाय आहे. हिंदूंच्या तमाम भावी पिढ्या पालींबरोबर लहानाच्या मोठ्या झाल्या पाहिजेत. तरच या बागुलबोवाचा नायनाट होऊ शकेल. अन्यथा, दुसरा तरणोपाय नाही.
याउलट वाघ, जो माझ्या नवऱ्याला सहज खाऊन टाकू शकेल (मी आणि तो एकत्र असलो तर कदाचित वाघ आधी मला खाईल. पण ते एक असो) बघण्यासाठी मागच्या वर्षी माझ्या नवऱ्यानं जवळपास लाखभर रुपये टिकवले होते. आणि सकाळ दुपार संध्याकाळ अशा जवळपास ९ साफाऱ्या करून त्याला केवळ त्यातल्या २ सफारीत वाघ दिसला.
आमच्याकडे, रिपब्लिकन ज्यांना सहज खाऊन टाकू शकतील, असलेच लोक रिपब्लिकनांना मते द्यायला आतुरतेने रांगा कसे लावू शकतात, हेदेखील मला पडलेले असेच एक कोडे आहे.
Hype हो, hype!
(शिवाय, typical रिपब्लिकन मतदार रिपब्लिकनांना मते द्यायला आतुर का असतात, याला दुसरेही एक कारण आहे, जे वरील वाघाच्या उदाहरणाच्या बाबतीत कदाचित लागू नसावे. आमचे जॉन्सनसाहेब (भूतपूर्व अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन) पूर्वी एकदा म्हणून गेले, त्याप्रमाणे: If you can convince the lowest white man he's better than the best colored man, he won't notice you're picking his pocket. Hell, give him somebody to look down on, and he'll empty his pockets for you. रिपब्लिकन भले तुम्हाला लुटत असोत; नव्हे, तुमच्या अन्नाचा पुढचा घास, झालेच तर तुम्ही आजारी पडलात तर तुम्हाला लागणारे औषध, असल्या गोष्टी अतिश्रीमंतांव्यतिरिक्त इतर कोणालाही परवडणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण करीत असोत (आणि वर अतिश्रीमंतांना अधिकाधिक करसवलती देऊन इतरांना असलेल्या सवलती बचतीच्या नावाखाली रद्द करीत असोत). परंतु, इमिग्रंट, काळे (किंवा खरे तर बिगरपांढरे) लोक, बिगरख्रिस्ती लोक, एलजीबीटीक्यूआदि मंडळी, आदि लोकांची आणि त्यांना डोक्यावर चढवून, लाडावून ठेवणाऱ्या ‘ लिब्रल’ मा***द राजकारण्यांची चांगलीच (आणि कायमची) खोड मोडली पाहिजे (मग मी, माझ्या पुढच्या दहा पिढ्या, आणि माझा देश, सगळे जरी रसातळाला गेले, तरी बेहत्तर), अशी ही मानसिकता आहे. As has often been pointed out, the point is cruelty, and not necessarily (if at all) self-interest. परंतु, प्रस्तुत संदर्भात हे सगळे अवांतर झाले. असो.)
काही पाली दगडी हिरवट असतात.
आमच्या येथे (दक्षिण संयुक्त संस्थानांत) घरात भारतातल्यासारख्या पांढऱ्याफटक/पिवळसर पाली पाहायला मिळत नाहीत. (मी त्यांना प्रचंड मिस करतो.) मात्र, घराबाहेर अंगणात क्वचित्प्रसंगी हिरव्या (पोपटी), झालेच तर चमकदार जांभळ्या वगैरे रंगांच्या पाली पाहिलेल्या आहेत. (मात्र, त्या कधी घरात येत नाहीत.)
दगडी हिरवट रंगाच्या पाली मात्र कधी पाहण्यात आलेल्या नाहीत.
असो चालायचेच.
ओह!
ही काय? (गूगलशोधाअंती सापडली.)
ती पाल (निळ्या जिभेनिशी) लोकांना वेडावून दाखवीत आहे, असा भास होतो.
त्यांनाही पालीची भीती वाटत असेल.
याबद्दल साशंक आहे.
मात्र, तुमची मॅस्कॉट तुमच्या गिऱ्हाइकांना जर वेडावून दाखवणार असेल, तर कोण कशाला झक मारायला तुमची बियर विकत घेईल? आँ?
हो हीच!
पण मी ऑस्ट्रेलिया सोडल्यावर त्यांनी तिला अधिक प्रक्षोभक केलं आहे. आधी हा लोगो साधा होता. मला उंदरांचे डोळे बघायलाही फार आवडतं. अतिशय बोलके डोळे असतात. पण उंदीर बघायला एकतर पुणे स्टेशनवर जावं लागतं किंवा मग आमच्या ऑफिसच्या मागे खडकवासल्यातून एक पाइपलाइन जाते (बंद) तिथे जावं लागतं. पण तिथे उंदीर असल्याने घोणसही असते. साप या प्राण्याबद्दलही मला आदरमिश्रीत आकर्षण आहे. आमच्या ऑफिसच्या एका खिडकीत सध्या मधमाशांनी पोळं केलं आहे. त्या पोळ्याच्या आणि आमच्या केबिनच्यामध्ये एक जाळी असल्याकारणाने अगदी डोळ्याच्या रेषेत त्यांची हालचाल बघता येते. कितीही तास घालवता येतील बघत अशी ती हालचाल असते. पण कामही करावं लागतं.
…
मला उंदरांचे डोळे बघायलाही फार आवडतं. अतिशय बोलके डोळे असतात.
उंदरांचे डोळे बोलके (आणि/किंवा महाबिलंदर) असतात, याच्याशी सहमत आहे. मात्र,
पण उंदीर बघायला एकतर पुणे स्टेशनवर जावं लागतं किंवा मग आमच्या ऑफिसच्या मागे खडकवासल्यातून एक पाइपलाइन जाते (बंद) तिथे जावं लागतं.
सुदैवी आहात! तुमच्या भाग्याचा मला हेवा वाटतो.
दुर्दैवाने, पुण्यात राहात असताना आमच्या घरात अनेकदा उंदरांचाही सुळसुळाट असे. त्यामुळे, याही श्वापदाच्या दर्शनाचा उपभोग लहानपणी भरपूर घेतलेला आहे. (तिसऱ्या (मुंबईच्या भाषेत दुसऱ्या) मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीसमोरील झाडावर चढून, तेथून टेलिफोनखात्याने “तात्पुरत्या” म्हणून टांगून ठेवलेल्या तारेवरची कसरत करीत, उपरोक्त खिडकीतून घरात प्रवेश करू पाहणारा — नि तसे करीत असताना त्याच्या त्या पूर्वोक्त बोलक्या डोळ्यांनी तुमच्याकडे टुकूटुकू पाहात तुम्हाला वेडावून दाखवणारा — उंदीर कधी पाहिला आहेत काय? मी पाहिला आहे!) एरवी यांचे (पालींप्रमाणे) शांततापूर्ण सहजीवन जर असते, तर कदाचित त्यांच्याविषयी प्रेमही निर्माण होऊ शकले असते. मात्र, घरातील कागद(पत्रे) किंवा तत्सम वस्तूंचा फडशा पाडून नासधूस करीत. त्यामुळे, नाइलाजाने त्यांच्या नायनाटाचे उपाय योजावे लागत. पिंजरे झाले, सापळे झाले, विषप्रयोग झाले… त्यातून त्यांच्या लोकसंख्येला तात्पुरता आळा बसत असे, नाही असे नाही. परंतु, काही दिवसांनंतर स्थिती पूर्ववत होई. तर ते एक असो.
विषप्रयोगावरून आठवले. उंदरांची या विषप्रयोगांच्या बाबतीत एक अत्यंत रोचक तथा त्याच वेळी (मानवी दृष्टिकोनातून) अत्यंत त्रासदायक सवय आहे. बोले तो, विषप्रयोगानंतर ते तडकाफडकी, जागच्या जागी मरून पडत नाहीत. तर, सर्वप्रथम, घरातली एखादी अत्यंत दुर्गम अशी (आणि सहजासहजी लक्षात न येणारी) जागा शोधून काढतात, नि मग तेथे जाऊन फुरसतीने प्राण सोडतात. त्यामुळे, घरात दिवसेंदिवस उंदीर मरून पडलेला असतो, नि आपल्याला पत्तासुद्धा नसतो. अनेक दिवसांनंतर जेव्हा घमघमाट येऊ लागतो, तेव्हा ढोबळमानाने लक्षात येते, परंतु घटनास्थळ लक्षात येऊन तेथून मृतदेह मिळविणे हे जवळजवळ अशक्यकोटीतील काम होऊन बसते. तर तेही असो.
आणखी एक अडचण होती. मृतदेह उपसून बाहेर काढल्यानंतर त्याची तातडीने विल्हेवाट लावावी लागे. या तातडीमागे दुर्गंधीबरोबरच आणखीही एक कारण होते. अर्धे आयुष्य गिरगावातल्या चाळीत काढलेली आमची (म्याटर्नल) आजी नंतरनंतर आमच्याकडे कायमची राहायला आली होती. घरातला (कागदाच्या कपट्यांपासून ते केसांच्या गुंत्यापर्यंत) काय वाटेल तो कचरा चाळीच्या ग्यालरीतून थेट खालच्या अंगणात टाकण्याच्या गिरगावातल्या जुन्या सवयीस अनुसरून, ती तो मेलेला उंदीर मागच्या खिडकीतून थेट खाली फेकेल, नि तो उंदीर मग तळमजल्यावरील (पुण्याच्या भाषेत पहिल्या मजल्यावरील) बिऱ्हाडकरूंच्या मागच्या अंगणात पडून ते मग बोंबलत येतील, ही एक भीती असे. त्यामुळे, तिला तशी संधी मिळण्यापूर्वी तो उंदीर घरापासून जवळात जवळच्या उकिरड्यावर फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावावी लागे. घरातील वयाने सर्वात कनिष्ठ सदस्य या नात्याने ती कामगिरी तथा जबाबदारी सहसा माझ्या खांद्यांवर येऊन पडे. आणि मग, चहाच्या कपातून बाहेर काढलेली टीबॅग आपण जेणेकरून दोरास धरून उचलून फेकून देतो, तद्वत, मेलेल्या उंदरास शेपटीने (हाताच्या अंतरावर) धरून त्यास फेकून देण्याकरिता आमची (उंदरासहित) मिरवणूक शेजारच्या उकिरड्याप्रत निघे.
उंदराची अंत्ययात्रा स्वहस्ते काढण्याचा योग बालपणीच जर तुम्हांस वारंवार आला असेल, तर, शपथेवर सांगतो, उंदराचे डोळे भले कितीही बोलके असोत (आणि, I daresay ते प्रचंड बोलके असतात!), परंतु, तेवढ्या भांडवलावरून त्याच्याविषयी तुमच्या मनात प्रीती निर्माण होणे कदापि शक्य नाही.
उंदरांच्या (बोलक्या) डोळ्यांबद्दल आकर्षण निर्माण व्हायला उंदीर हे (शिवाजीप्रमाणेच) शेजारच्या घरी व्हावे लागतात. (उगाच नव्हे औरंगजेब महाराजांस ‘पहाड़ का चूहा’ म्हणून संबोधीत असे!)
पण तिथे उंदीर असल्याने घोणसही असते.
घोणस… हम्म्म्म्… डेडली प्रकार!
साप या प्राण्याबद्दलही मला आदरमिश्रीत आकर्षण आहे.
मलाही, परंतु काहीसेच.
तसे आमच्या बायकोने बॅक्यार्डात बागकाम करताकरता अनवधानाने साप हाताळण्याचे प्रकार घडलेले आहेत, नाही असे नाही. (आणि, प्रत्येक वेळेस मी त्या सापाचे फोटू काढून, ‘आमचा साप’ (किंवा, एकाहून अधिक असतील, तर, ‘आमचे पाळीव प्राणी’) अशा शीर्षकाखाली ते जेथेतेथे डकवून, भावही खाल्लेला आहे, नाही असे नाही.) परंतु, सुदैवाने, प्रत्येक वेळेस ते साप Storeria DeKayi DeKayi उपाख्य DeKay’s (किंवा Northern) brown snake या बिनविषारी तथा निरुपद्रवी जातीचे निघाल्याकारणाने, चिंता नव्हती. (अवांतर: आमच्याकडे, एक अॅप आहे. वर्षाकाठी दहा डॉलर भरायचे. साप दिसला, की फोटो काढून तो फोटो, तथा कोठल्या झिपकोडात सापडला, वगैरे माहिती (अॅपद्वारे) त्यांना पाठवायची. (किंबहुना, फोटो काढण्यामागील प्राथमिक प्रयोजन तेच होते. भाव खाणे वगैरे नंतरच्या गोष्टी.) उत्तर अमेरिकेतील कोठलाही साप असो, त्याची जातकुळी, विषारी आहे की बिनविषारी, वगैरे इत्थंभूत माहिती (ईमेलने) कळवितात.) (अतिअवांतर: ऑस्ट्रेलियातला Northern brown snake निराळा. तो आत्यंतिक जहाल विषारी असतो, म्हणे.)
मात्र, आमच्या इलाख्यात Copperhead, झालेच तर Cottonmouth (उपाख्य Water moccasin), यांजसारखे जहाल विषारी सापसुद्धा राहतात. आजवर ईश्वरकृपेने त्यांच्याशी कधी संबंध आलेला नसला, तरी, घरामागेच एक मोठे तळे असल्याकारणाने, भविष्यात ते सापडण्याची भीती अगदीच नगण्य नाही. असो.
पण कामही करावं लागतं.
आयुष्याची तीच तर एक मोठी शोकांतिका आहे! (अतिअवांतर: (काहीश्या वेगळ्या संदर्भात) कोणीसे म्हटलेलेच आहे: Work is the curse of the drinking classes. चालायचेच.)
इकडच्या पाली ...... >> काही…
इकडच्या पाली ......
>> काही पाली इतक्या पांढऱ्या असतात की त्यांच्या शरीरातल्या नसा स्पष्ट दिसतात. >>>
पाली पांढऱ्याच ( मस्तानीच )असतात. पण ते ज्या रंगाचे किटक खातात ते पूर्ण पचेपर्यंत ( पाल भराभर किटक गिळत जाते) ते पोटात असतात आणि पाल त्या रंगाची वाटू लागते.
एक फिल्मी वदंता (अवांतर)
>> काही पाली इतक्या पांढऱ्या असतात की त्यांच्या शरीरातल्या नसा स्पष्ट दिसतात. >>>
पाली पांढऱ्याच ( मस्तानीच )असतात.
अशाच एका यौवनाने मुसमुसलेल्या१ पांढऱ्याफटक, पारदर्शक पालीस भिंतीवरून सरसर चढून जाताना पाहूनच तर कवीला “चढ़ती जवानी तेरी, पाल मस्तानी” ही गीतपंक्ती सुचली होती.
मात्र, पालीवरून एखादे गीत आपल्या चित्रपटात असावे, ही कल्पना काही निर्मात्यास रुचेना; नव्हे, सहन होईना! त्यामुळे, त्याने ते जबरदस्तीने बदलून (आणि, अगोदरचा स्वल्पविराम स्थलांतरित करून) “चाल मस्तानी” असे करावयास भाग पाडले.
चालायचेच.
१ हा वाक्प्रचार कोल्डप्रिंटात कधीतरी वापरून पाहायचाच होता. बरी संधी मिळाली.
परांजपे
माझे आईबाबा तसे काही फार पॉलिटिकली करेक्ट वगैरे नव्हते हे आधी नमूद करून पुढील गोष्ट सांगते. मला लहानपणी रस्त्यातली मांजरं उचलून घरी आणण्याचा फार नाद होता. ती यथावकाश गायब केली जायची. पण एकदा कुणीतरी माझी ही आवड लक्षात घेऊन माझ्या बाबांना एक पांढरं शुभ्र आणि निळ्याशार डोळ्याचं मांजर आणून दिलं. त्याचं नाव माझ्या आई बाबांनी "परांजपे" ठेवलं. आणि आपण फिस्फिस करून मांजराला बोलावतो तेव्हाही ते "परांजपे फिस्फिस. इकडे या" असं म्हणू लागले. अर्थात आदरार्थी एकवचन सोडलं नाही. मग सोसायटीतले सगळे येता जाता "तुमचे परांजपे दिसले होते" असं आदरार्थी एकवचनातच म्हणून लागले. मग काही दिवसांनी परांजपे वयात आले आणि घरी टिकेनात. मग त्यांचे पंचक्रोशीतल्या वेगवेगळ्या मांजरीणींबरोबरचे पराक्रम आम्हाला शेजाऱ्यांकडून कळू लागले. पण लहानपणी परांजपे फार गोड होते. माझ्या किंवा माझ्या बाबांच्या खांद्यावर चढून बसायचे. प्रेमळ होते.
तर आमच्या घरात प्राण्यांना क्रिएटिव्ह नावं द्यायचे संस्कारच आहेत.
‘घाऱ्या’?
तुमच्या या परांजप्यांचे पहिले नाव बायेनीचान्स ‘घाऱ्या’ होते काय?
(‘आमच्या जमान्या’त (नि कदाचित त्याहीअगोदरच्या एकदोन पिढ्यांपासून), पुण्याच्या स.प. महाविद्यालयातल्या रसायनशास्त्र विभागात परांजपे नावाचे एक जुने आणि जाणते प्रयोगशाळा-प्रमुख होते. त्यांचे खरे पूर्ण नाव ठाऊक नाही, परंतु, ‘घाऱ्या परांजपे’ याच नावाने ते पंचक्रोशीत (कु)प्रसिद्ध होते. माणूस तसा हुशार असावा, प्रचंड अनुभवी तर होताच होता, कदाचित फ्रस्ट्रेटेड असण्याचीही शक्यता अगदीच नाकारता येत नाही. मात्र, एक तर जमदग्नीचा अवतार, नि त्यात पुन्हा तोंडाने प्रचंड फटकळ. टाळके सटकले, तर कधी कोणाबद्दल आख्ख्या ४११०३० पिनकोडास ऐकू जाईल इतक्या दणदणीत आणि खणखणीत आवाजात काय (आणि शक्य तोवर पराकोटीचे अश्लील) बोलेल, याचा नेम नसे. मात्र, ‘जुना माणूस’ म्हणून फारसे कोणी ते मनाला लावून न घेता शक्यतो ते चालवून घेतले जात असे.
तर या ‘घाऱ्या परांजप्या’चा मुलगा आमच्या वर्गात होता. बोलायला वगैरे बापाच्या तुलनेत पराकोटीचा सभ्य असावा. (माझा त्याच्याशी जास्त संबंध आला नाही.) मात्र, बापामुळे त्याचेही नाव आमच्या गोटात ‘घाऱ्या’ पडले होते. (आमच्या दुसऱ्या एका वर्गमित्राने एकदा मला सांगितले होते, की “अरे त्याला ‘घाऱ्या’ म्हणतात, कारण त्याचे बाबा घाऱ्या आहेत”, म्हणून.)
तर तुमच्या परांजप्यांवरून आज हे उगाच आठवले, नि त्यांना (पक्षी: तुमच्या परांजप्यांना) ‘घाऱ्या परांजपे’ हे नाव शोभून गेले असते, असा एक विचार मनाला चाटून गेला, इतकेच. असो चालायचेच.)
स्वभाव?
वरिजनल ‘घाऱ्या परांजप्या’चे डोळे हिरवे होते, की निळे, की अन्य कोठल्या रंगाचे, ते आता आठवत नाही. (किंबहुना, तेव्हासुद्धा नीट निरखून पाहिले नव्हते; बिशाद नव्हती.)
मात्र, ‘घाऱ्या परांजपे’ हे नामाभिधान बहुधा डोळ्यांच्या रंगावरून नसून, स्वभावातल्या/बोलण्यातल्या हिरवटपणावरून असावे, अशी एक प्राथमिक अंदाजवजा शंका आहे. (चूभूद्याघ्या.) (अन्यही काही — आणि, डोळ्यांच्या रंगाशी पूर्णतया असंबंधित असे — कारण असणे हेही अगदीच अशक्य नाही.)
(अन्यथा, पुण्यात — आणि, त्यातही, ४११०३० पिनकोडात — घाऱ्या डोळ्यांची माणसे कितीतरी असतील. त्या सगळ्यांना ‘घाऱ्या’ म्हणून थोडेच संबोधले जाते? आजूबाजूच्या भागात घाऱ्या डोळ्यांचे नग जर पुष्कळ असतील, तर ‘घाऱ्या’ हे आवर्जून संबोधन म्हणून कोण कशास वापरेल? किंबहुना, त्यातील वैशिष्ट्य तरी कोणास कशास जाणवेल, नाही का?)
बहुतेक
मला वाटतं डोळे घारेच होते त्यांचे. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांचं ते नाव त्यांच्या बालपणीपासूनचं आणि त्यांचं बालपण सदाशीव वगैरे पेठांत गेलेलं नसल्याने शेवटचा मुद्दा बाद. अर्थात, मी म्हणतोय ते आणि तुम्ही म्हणताय ते एकच व्यक्ती असतीलच असे नाही. खात्री करून पहावी लागेल.
स. प
मी सप महाविद्यालयात होते तेव्हा आम्हाला रसायनशास्त्र (बहुधा फक्त ऑरगॅनिक) शिकवायला एक केळकर म्हणून होते. ते toluene या रसायनाचा उच्चार टोळविन असा (इतक्या आत्मविश्वासाने) करायचे की पुढे अनेक पाश्चात्य लोकांना त्याचा उच्चार करताना ऐकल्यावर तेच चूक आहेत असं मला वाटत आलं आहे. अजूनही मी (निदान मनात तरी) टोळविन असाच उच्चार करते. बेनझीन आणि टोळविन.
>>>इश्श! :D ब-याच दशकांनी हा…
>>>इश्श! :D
ब-याच दशकांनी हा शब्द ऐकण्यात (वाचण्यात) आला.
नव्वदच्या दशकापासून पुण्यामुंबईतील, आणि एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपासून महाराष्ट्रातील मुलींच्या तोंडी च्यायला, आयचा, शिट, फक, ऐझ्वली असे शब्द ऐकू यायला सुरवात झाली आणि आता तर ... असोच.
मराठीतील एक शब्द विशेष करुन मराठी सुसंस्कृत आणि सभ्य स्त्रियांकडून वापरला जात असे. त्याचा वापर अजून (निदान एका व्यक्त्तीला तरी ) माहित आहे हे पाहून बरे वाटले.
* सदर शब्दाचा वरील प्रतिसादात केलेला वापर योग्य्/अयोग्य याबाबत काहीही टिपण्णी नाही.
…
नव्वदच्या दशकापासून पुण्यामुंबईतील, आणि एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपासून महाराष्ट्रातील मुलींच्या तोंडी च्यायला, आयचा, शिट, फक, ऐझ्वली असे शब्द ऐकू यायला सुरवात झाली आणि आता तर ...
या संदर्भातली आपली angst समजू शकतो. (किंबहुना, तिच्याशी बऱ्याच अंशी सहमतही असू शकेन.) परंतु, पुण्यामुंबईतील, झालेच तर महाराष्ट्रातील, मुलांच्या तोंडी प्रस्तुत (अप)शब्द त्याहून बऱ्याच अगोदरपासून रुळलेले आहेत, याबद्दल काही टिप्पणी नसल्याचे आश्चर्य वाटले.
(अर्थात, आपण कशावर टिप्पणी करावी, नि कशावर करू नये, याचा निर्णय हा सर्वस्वी आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत येत असल्याकारणाने… चालायचेच. मात्र, उलटपक्षी, आपला आक्षेप किती गंभीरपणे घ्यावा, हे सर्वस्वी आपल्या श्रोत्यांच्या निर्णयस्वातंत्र्याच्या कक्षेत येत असल्याकारणाने… तेही चालायचेच.)
मराठीतील एक शब्द विशेष करुन मराठी सुसंस्कृत आणि सभ्य स्त्रियांकडून वापरला जात असे. त्याचा वापर अजून (निदान एका व्यक्त्तीला तरी ) माहित आहे हे पाहून बरे वाटले.
शब्दांना आयुर्मर्यादा असते. एखाद्या भाषिक समाजाला एखाद्या शब्दाची जर गरज उरली नाही, तर तो शब्द हळूहळू वापरातून नाहीसा होतो, लुप्त होतो. यात inherently चांगले किंवा वाईट असे काहीही नाही.
(म्हणजे, असा शब्द आहे, आणि तो कधी काळी वापरात होता, हे किमान एका व्यक्तीला माहीत आहे, ही (त्या व्यक्तीच्या सामान्यज्ञानाच्या दृष्टिकोनातून) चांगलीच गोष्ट आहे. मात्र, तो शब्द व्यापक पातळीवर वापरात नाही, यात हळहळ वाटण्यासारखे काहीच नाही.)
(दुसरी गोष्ट: एक व्यक्ती तो शब्द (कदाचित विनोद म्हणून का होईना, परंतु) वापरते, आणि त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या व्यक्तींना तो समजतो, याचा अर्थ तो शब्द (सामान्य वापरात नसला, तरी) अद्याप लुप्त झालेला नाही, असा होऊ नये काय? आणि, आजूबाजूच्या व्यक्तींना जर तो समजू शकत नसता, तर तो (विनोद म्हणून का होईना, परंतु) वापरण्यात त्या (वापरणाऱ्या) व्यक्तीस काय हशील?)
(अतिअवांतर: हशील हा शब्द आपणांस वा या धाग्यावर उपस्थित असलेल्या इतर कोणास जर कळला, तर त्याबद्दल मला बरे वाटणे हे सयुक्तिक ठरावे काय?)
असो चालायचेच.
शिव्या हे मुलांचे आणि…
शिव्या हे मुलांचे आणि पुरुषांचे जन्मसिद्ध हक्क असल्याचे पुरातन कालापासून आहे. त्यावर तिच्यामायला काय घंटा बोलणार. ते कुणी मनावर घेत असेल असे वाटत नाही.
बाकी काही विशिष्ट जातींच्या आणि धर्माच्या स्त्रियांच्या तोंडीच काय ते अपशब्द पूर्वी ऐकीवात येत असत. हल्ली तसे राहिले नाही. असो.
बाकी तुमचा एवढा मोठा प्रतिसाद वाचून त्यावर उत्त्तर देण्यात काय हशील ?
गैरसमज
मी सभ्य आहे असा तुमचा गैरसमज या शब्दामुळे झाला आहे. माझ्या तोंडी "अय्या" हा शब्द अजूनही असतो. कारण माझ्या आईच्या बोलण्यात आजीच्या बोलण्यात तो असायचा. पण पुढची पिढी असल्याने मी माझी शब्दसंपदा काळाप्रमाणे वाढवली आहे. आणि मी "अय्या" आणि "फक" हे दोन्ही शब्द एकाच वाक्यात वापरू शकते. कधीकधी अय्या फक! एवढं एकच वाक्यही मी उद्गारून लोकांची करमणूक केली आहे.
मी किती किती असभ्य शब्द वापरू शकते याचं फुल स्पेक्ट्रम मी गाडी चालवत असताना ऐकायला मिळतं. पण शेजारची व्यक्ती सुपरिचित असेल तरच. माझा एकरांत कोकणस्थ आडनाव धारण करणारा नवरा चारचाकी चालवत नाही. त्यामुळे जेव्हा तो शेजारी बसतो तेव्हा कुणी मध्येच आलं तर एखादा चांगला अपशब्द वापरायची जबाबदारी तो आनंदाने घेतो.
पण मला अय्या आणि इश्श हे शब्द वापरायला आवडतात.
‘फ़ऽऽऽ’… (अतिअवांतर)
Pho (उच्चारी: ‘फ़ऽऽऽ’. दंत्योष्ठ्य.) हा व्हिएतनामी नूडलयुक्त सुपाचा एक प्रकार आहे. (अवांतर: तत्त्वतः ‘सूप’ जरी म्हटले, तरी, it’s a meal by itself.) झालेच तर, कॉफीबरोबर इतरही अनेक खाद्यपदार्थ विकणाऱ्या (बहुतकरून फ्रेंच. परंतु, पुण्यात, इराणीसुद्धा. भले त्यांत कॉफी हा (उपलब्ध असलाच, तर) अतिदुय्यम खाद्य/पेयप्रकार असला, तरीही. किंवा, उडुपी.) खाणावळींची नावे जेणेकरून ‘कॅफे अमूकतमूक’ किंवा ‘फलानाढिकाना कॅफे’ अशा स्वरूपाची असतात, तद्वत, जेथे Pho मिळते, अशा व्हिएतनामी खाणावळींची नावेसुद्धा अनेकदा ‘Pho अमूकतमूक’ किंवा ‘फलानाढिकाना Pho’ अशा स्वरूपात आढळतात.
तर, सांगण्याचा मतलब, आमच्या मेट्रो अटलांटा परिसरात ‘What The Pho’, झालेच तर ‘Pho King’, अशा नावांच्या व्हिएतनामी खाणावळी पाहण्यात आलेल्या आहेत.
चालायचेच.
Fucking Hell (सुपरअवांतर)
ऑस्ट्रियात, साल्झबुर्गच्या जवळपास कोठेतरी, म्हणे जेमतेम कशीबशी तीनआकडी लोकसंख्या असलेले एक अतिशय nondescript असे खेडेवजा गाव आहे. परवापरवापर्यंत या गावाचे पारंपरिक (तथा अधिकृत) नाव Fucking (उच्चारी: ‘फ़ूकिंग’) असे होते.
अगोदर म्हटल्याप्रमाणे, या गावात आवर्जून भेट देण्यालायक विशेष असे वास्तविक काहीही नाही. मात्र, दुर्दैवी स्पेलिंगामुळे, हे गाव ब्रिटिश टूरिष्टांमध्ये उगाच नको तितके लोकप्रिय होऊन बसले. गावाच्या नावाच्या पाटीसमोर फोटो (क्वचित्प्रसंगी संभोगाच्या पोज़मध्येसुद्धा) नाहीतर सेल्फ्याच काय काढतील, गावाच्या नावाची पाटी कापून सूव्हेनीर म्हणून पळवूनच काय नेतील, वगैरे वगैरे. (आणि, पाटी कापली, की तेथे पुन्हा नवी पाटी बसविण्याचा खर्च गावकऱ्यांच्या बोडक्यांवर येऊन बसत असे. आधीच जेमतेम शंभरावर लोकसंख्या असलेल्या गावाचे बजेट ते कितीसे असणार! त्यात दर वेळेस नि वारंवार हा भुर्दंड, म्हणजे… पण लक्षात कोण घेतो?)
शेवटी, ब्रिटिश टूरिष्टांच्या उच्छादास वैतागून, २०२१ साली या गावाने आपले नाव अधिकृतरीत्या बदलून Fugging असे करून घेतले.
(गरजूंनी Fugging, Upper Austria असे गुगलून (अथवा विकून) पाहावे.)
तर, या गावात म्हणे एक अतिशय प्रसिद्ध अशी बियर बनत असे. (कदाचित अजूनही बनत असेल.) बियरचे नाव: Fucking Hell. (Hell म्हणजे जर्मन भाषेत pale lager, म्हणे.)
चालायचेच.
मीदेखील लहानपणापासून मराठीतील ‘फ’चा उच्चार ‘फ़’ असाच करीत आलेलो आहे. (इंग्रजी माध्यमाशी — मग भले ते सदाशिवपेठी इंग्रजी माध्यम असले, तरीही — आयुष्यात नको तितक्या लवकर संपर्क आल्याचा परिणाम. अर्थात, इंग्रजी ‘फ़’चा उच्चार आयुष्यभर ‘फ’ असा करण्यापेक्षा ते बरे.) अर्थात, मराठीत ‘फ’ असा उच्चार असतो, याची तेव्हाही कल्पना असली, तरी, एकदा सवय लागली, ती लागली.
मात्र, याबद्दल कधी कोणी खंत अथवा चीड व्यक्त करून दाखवली नाही. त्याला कारण असावे. (खरे तर, दोन कारणे असावीत.) एक तर, मराठी वापरात ‘फ़’ हा पर्यायी उच्चार म्हणून (जोवर ‘फ’ किंवा ‘फ़’ यांपैकी कोठलातरी एक — आणि एकच — वापरला जात आहे — घोड़ा-चतुर होत नाही — तोवर) तोपर्यंत बहुधा बऱ्यापैकी रुळला असावा. दुसरे म्हणजे, (उदाहरणादाखल, उर्दूतल्याप्रमाणे) ‘फ’ आणि ‘फ़’ यांच्यात भेद करण्याचे मराठीत काही कारण नसावे. त्यामुळे, कोणाला फारसा फरक पडत (अथवा जाणवत) नसावा. (अर्थात, हा आपला माझा अंदाज.)
(अर्थात, आयुष्यात पुढे कधीतरी मराठी माध्यमाच्या शाळेत स्थलांतर केल्यानंतरसुद्धा या उच्चारावरून माझी कधी कोणी शाळा घेतलेली नाही, ही बाब अलाहिदा.)
तुम्ही वेगळ्या काळात जगला आहात
अलीकडे मराठीजन मराठी कशी नेसावी, बोलावी, झेलावी याबद्दल अधिक आक्रमक झाले आहेत. दिवाळीनंतर आम्ही वंदे भारत नावाच्या नवीन विद्युतगाडीने (जीत बसून सतत मोदींचे हसतानाचे व्हिडिओ बघावे लागतात) ठाण्याला गेलो होतो. तिथे ज्या रिक्षात आम्ही बसलो तो रिक्षावाला खूपच म्हणजे खूपच बडबड्या होता (अर्थात, हा आरोप मी इतर कुणावर करणे म्हणजे थोडा दांभिकपणाच आहे). त्याच्याशी माझा नवरा अखंड मराठीत बोलत होता. आमचं गंतव्यस्थळ येईपर्यंत माझ्या नवऱ्याला तो रिक्षावाला कसा शिंदेंवर नाराज आहे. तरी त्याला शाखाप्रमुख केलं आहे. भाजप कशी यायला नाही पाहिजे वगैरे सगळं मराठीत सांगितलं. आणि नवराही मराठीच बोलत होता..पण उतरताना सवयीने मी नवऱ्याला हिंदीत काहीतरी विचारलं (तो कोकणस्थ असला तरी पेशव्यांनी माळव्यात पाठवलेला कोकणस्थ आहे..त्यामुळे त्याचं मराठी मला(ही) सहन होत नाही). तर तो रिक्षावाला माझ्यावर गुरकावला. मॅडम मराठीत बोला!
मग मी त्याला पुणेरी मराठीत २ खडूस टोमणे मारले आणि त्याची खात्री पटवून दिली.
पण हिंदी कुणाची प्रेमाची भाषाही असू शकत नाही का? म्हणजे प्रेमाची नाही. पण प्रेम कमी होऊन घटस्फोट होऊ नये म्हणून कुणी आपसात हिंदी बोलत असेल तर या बटाट्याचे काय गेले?
तुम्ही रिक्षावाल्याच्या…
तुम्ही रिक्षावाल्याच्या मताला अगोदर सहमत झाला असता तर तुमचं हिंदीही त्याने खपवून घेतलं असतं. मविआभक्त नाही असा संशय आल्याने सगळा पुढचा इतिहास घडला. महाराष्ट्रात विविध भागाप्रमाणे मविआ, मोदी,रागा भक्त असल्याचे दाखवावे लागते. राजकारण विषय नसेल तर बालाजी, साईबाबा,स्वामी यांचे भक्त व्हावे लागते.
>>>मी सभ्य आहे असा तुमचा…
>>>मी सभ्य आहे असा तुमचा गैरसमज या शब्दामुळे झाला आहे.
अजिबात माझा असा गैरसमज झालेला नाही. माझी वाक्यरचना तुम्ही नीट वाचली नसावी किंवा मला जाणवत नसली तरी सदोष झालेली असावी. तरी आपण (अजिबात) सभ्य नाही आहात असे मी पुन्हा (एकवार) जाहीर करतो आणि खाली बसतो.
आ?
नबांचा विरोध आहे म्हणून धागा उडवता? हे जर सगळीकडे लागू केलं तर सगळं संस्थळच बंद करावं लागेल.
काहीही सुरु केल्यावर ते नीट चालेपर्यंत काही कळ काढायला नको का? आणि नबा असे कोण लागून गेले आहेत?
त्यांचं मत तुम्हाला इतकं महत्त्वाचं का वाटतं? तुम्ही खरडफळा तुमच्या आनंदासाठी काढला आहे ना? एखाद्या छोट्या मुलाला असा फळा आणि खडू दिले तर ते आनंदाने दिवसभर एकटं चित्र काढत बसेल त्यावर. नाबांना माझी चित्र आवडत नाहीत म्हणून फळा पुसून टाकणार नाही!
जोपर्यंत तुम्हाला इथे तुमच्या आवडीचं पब्लिक भेटत नाही तोपर्यंत मी तुमच्या खरडफळ्यावर आवर्जून हजेरी लावेन.
अहो अहो अहो, हा उपहास होता…
अहो अहो अहो, हा उपहास होता. शिवाय नबा यांनी एक शेप्रेट हत्तीखानाही काढला आहे , तेव्हा कशाला उगाच हे म्हणून लिहिलं.
फार कुणाला उत्साह नसेल तर बंद करू असा आशय होता त्याचा.
आता तुम्ही पाल विषयक चर्चेत सहभाग घेतला आहेत , तेव्हा हा खरडफळा चालणार असं दिसतंय.
तेव्हा चालू द्या आता ..
पण… पण… पण…
…मी विरोध नक्की कधी केला??? (उगाच का माझ्या नावावर बिले फाडायची ती?)
माझा विरोध (असलाच तर) केवळ हत्तींना वंचित करण्याबद्दल होता. (म्हणजे, ‘इथे (निदान या धाग्यावर तरी) हत्तींचा धुडगूस नको’ ही त्यामागील भावना मी कदाचित समजू शकत असलो, तरीही, ‘इथे (या धाग्यावर) हत्तींना प्रवेश नको’ हे एक धोरण म्हणून मला पटू शकत नाही. (हत्तीच कशाला, त्या बाबतीत मी राजेश१८८च्याही धुडगुसाच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे, मला व्यक्तिशः जरी तो पटत नसला, तरीही.)) परंतु तरीही, ठीक आहे, तसे तर तसे, इथे हत्ती नको, तर मग (मला अजिबात न पटणाऱ्या) Separate but equal तत्त्वाखाली त्याला निदान वेगळी facility तरी उपलब्ध असावी, केवळ या सद्हेतूने हत्तीखाना काढला, इतकेच. (लवकरच ‘पटाईतखाना’सुद्धा (की ‘पटाइतालय’?) काढण्याचा विचार आहे. की आधी ‘राजेश१८८घर’ काढावे?)
तर लोक इथे माझ्याच नावाने बिले फाडून राहिले!
खऱ्याची दुनिया नाही राहिली, हेच खरे. (होती कधी, म्हणा!) चालायचेच.
दोन दिवसांपूर्वी पुण्यभूमी ला अल्पकालीन वास्तव्य केले.
माझ्या यजमानाने मला मूळ पुण्यभूमी सदाशिव कोथरूड मध्ये न नेता गाडीत टाकून मुळशी रोड वर नेले. तेथील सतत पाट्या वाचून काळया खेकड्या ची मागणी केल्यावर तुच्छतेने निर्भर्त्सना करून अखेरीस मला तलावा लगतच्या हॉटेलात (हॉटेल सुंदर होते तलाव पावसाळी वातावरण वगैरे ) तसे चविष्ट गावरान वगैरे अन्न खाऊ घातले. मात्र पुढे आत्ममंथन वगैरे चा त्याचा प्लॅन ऐकून मी सावध झालो आणि पुण्यभूमीतून काढता पाय घेतला याचे यजमानाला प्रचंड दुःख झाले. जड अंतःकरणाने त्याने मला मी त्याला निरोप दिला
मुळशी मध्ये कोणी "आत्म मंथन"केलेले आहे का ?
तसा यजमान भला माणूस आहे माझा जीवलग आहे. मात्र spiritual इन्फेक्शन झाल्याने हल्ली तब्येत ठीक राहत नाही मग असल काहीबाही आग्रह करतो चालायचेच
आदरणीय न बा यांचे अभिनंदन…
आदरणीय न बा यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा
https://www.facebook.com/share/v/1BdQzL5Wz3/
?
म.मं. अटलांटाचा आणि 'न'वी बाजूंचा नक्की काय (बादरायण)संबंध लावलात, म्हणे?
'न'वी बाजू हे तर (तूर्तास किमान पाव शतकापासून) म.मं. अटलांटाचे सदस्यदेखील नाहीत. (कटाक्षाने नाहीत, परंतु, तो वेगळा मुद्दा.) किंबहुना, म.मं. अटलांटा-आयोजित एखाद्या कार्यक्रमास 'न'वी बाजूंनी (न-सदस्य म्हणून, तिकीट काढून) उपस्थिती लावल्यालासुद्धा आजमितीस किमान दोन दशके उलटली.
किंबहुना, म.मं. अटलांटा आणि 'न'वी बाजू हे दोन्हीं अटलांटा परिसरात आहेत, एवढेच काय ते दोहोंमधील साधर्म्य. अर्थात, 'न'वी बाजूंचे धोरण तसे उदारमतवादी असल्याकारणाने, केवळ आपण अटलांटा परिसरात आहो, म्हणून म.मं. अटलांटानेसुद्धा अटलांटा परिसरात असता कामा नये, अशी काही त्यांची भूमिका नाही, त्यामुळे, चालून जाते. (उलटपक्षी, म.मं. अटलांटा हे अटलांटा परिसरात आहे, म्हणून 'न'वी बाजूंनीसुद्धा अटलांटा परिसरात असता कामा नये, अशी जर काही म.मं. अटलांटाची भूमिका यदाकदाचित असलीच, तर 'न'वी बाजू तिला भीक घालीत नाहीत, त्यामुळे, तीही बाजू ठीकच आहे.)
थोडक्यात सांगायचे, तर, 'न'वी बाजू आणि म.मं. अटलांटा यांचे अटलांटा परिसरात केवळ सहअस्तित्व आहे, साहचर्य अथवा सहजीवन नव्हे, एवढेच स्पष्ट करून मी आता (दिलीत, तर आपल्या परवानगीने, नपक्षी, आपल्या परवानगीविना) खाली बसतो.
(असो चालायचेच.)
Div tag…
या वेळेस div tag ही घेतला.
Div तथा span टॅगांचे माझे सर्व प्रयोग मात्र फसले.
बहुधा रिस्ट्रिक्टेड मोडात हे टॅग चालत नसावेत. Pवर काम भागवावे लागते.
फार कशाला, styleसारखी अॅट्रिब्युटेसुद्धा फसली. सरतेशेवटी, fontसारख्या obsolete टॅगांचे पुनरुज्जीवन करून वापरावे लागले. (ते मात्र चालतात बरे!)
असो चालायचेच.
न'बा,चूक लक्षात आणून…
न'बा,चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
"Restricted HTML for gamabhana" >>> Full HTML करायचं विसरलो होतो. कोड बरोबरच होता,CSS inline font size, color elements चालत नसावेत असा समज झाला होता पण इतर संस्थळांवर Full HTML असतंच त्यामुळे तिकडे लक्षच गेलं नव्हतं.
जसजसे प्रतिसाद वाढू लागले…
जसजसे प्रतिसाद वाढू लागले तसे जुन्या पद्धतीच्या खरडफळ्याचे अधिकपण लक्षात येऊ लागले. आणि नव्या ड्रुपल अकराचे उणेपण.
'नवीन प्रतिसाद' हा अजूनही घोळच आहे. कधी बरोबर दाखवतो आणि तिकडेच उघडतो तर कधी सर्वच प्रतिसाद आकडा नवीनच म्हणून दिसतो.
आता खरडफळा ( धागा) इतका लांबला आहे की तो बादच झाला. पहिला बरा होता, नवा प्रतिसाद वरच यायचा आणि मधल्या कुठल्याही प्रतिसादास उप प्रतिसाद देता न आल्याने गिचमिड होत नसे.
तर इथून( खरडफळ्यावरून )आता टाटा.
नाही. त्यातली एक उघडून…
नाही.
त्यातली एक उघडून पाहिली की बाकीच्या गायब होतात. मला वाटतं ड्रुपल एडिट करणाऱ्या( फेरफार करणारे) लोकांना मेसेज करून विनंती करायची की तो जुना आराखड्याचा ढाचा कोड परत आणा. इमेल - व्यक्तिगत संदेश सेप्टिक सिक्युरिटी कारणासाठी काढली ते समजू शकतो. खरडवहीसुद्धा सुरू करता येईल कदाचित.
नाइलाजाचे नाव…
तुम्ही जे सुचविता आहा, ते नवीन ड्रुपलात कितपत (आणि कसे) शक्य आहे, याबद्दल कल्पना नाही. तूर्तास, मला वाटते, ‘काहीच नाही, त्यापेक्षा निदान हे तरी’ (अर्थात, ‘मजबूरी का नाम महात्मा गाँधी’१) एवढ्याच तत्त्वावर प्रस्तुत धागा काढण्यात आलेला आहे. (चूभूद्याघ्या.)
१ हा दिल्लीच्या बाजूस प्रचलित असलेला एक अत्यंत अश्लील असा वाक्प्रचार आहे. असो.
पाट्या
नांदेड सिटीमध्ये एके ठिकाणी
"कुत्र्या पासून सावध रहा" अशी पाटी आहे. तर एकतर शब्दयोगी अव्यय आणि मुख्य शब्दाचा घटस्फोट घडवून आणून
कुत्र्या
पासून सावध रहा.
असं लिहिलं आहे.
त्यामुळे कुणीतरी आपल्यालाच कुत्रा म्हणत आहे असा आधी समज होतो.
आणि कर्वेनगरमध्ये जिथे पूर्वी वर्णेकर मासेवाले होते त्याशेजारी एक पाकीज़ा नावाचं बुटिक निघालं होतं.. बरेच दिवस तिथे जाऊन काय काय माल आहे बघायचं असं ठरवत होते. तोपर्यंत कर्वेनगरात मुसलमान फळवाल्यांकडून फळं घेऊ नका वगैरे फॉरवर्ड फिरू लागले. आणि व्यवस्थित हिंदू नाव असलेल्या लोकांचे जिपे तपासल्यास ते कसे खान किंवा शेख असतात असं काही तिथले थेर्डे पसरवू लागले. त्यामुळे या पाकीज़ा बुटिकच्या नावाआधी बहुतेक त्या मालकिणीचे सासरचे किंवा माहेरचे यांनी हट्ट करून श्री लावून घेतलं. सो आता ती पाटी
।।श्री।।
पाकीज़ा
अशी आहे.
जय कोथरूड उर्फ सदाशिवपेठ 2.0
…
शब्दयोगी अव्यय आणि मुख्य शब्दाचा घटस्फोट
ही खरे तर हिंदी भाषेची खासियत आहे. त्यामुळे, ‘(मराठीवरील) हिंदी भाषेचे अतिक्रमऽऽऽऽऽऽण!’ (पाहा: ‘त्याने अमक्यातमक्याची मदत केली’-छाप भाषा. आजकालचे मराठी पत्रकार नि वृत्तनिवेदक ही वापरण्यात पटाईत आहेत, असे ऐकून आहे. असो.) अशी प्रीमॅच्युअर, नी-जर्क बोंब ठोकण्याचा मोह अनावर होतो. परंतु, नाही. हे जेथे घडले, तो परिसर लक्षात घेता, हे एखाद्या मराठमोळ्या मावळ्याच्याच (स्वा)भाषिक/शौद्धलेखनिक अज्ञानाचे (मराठीत: अडाणचोटपणाचे) द्योतक असावे, असा प्राथमिक अंदाज मांडावयास जागा आहे. O tempora, O mores!
(आपलेच लोक हे असे असताना, उगाच कशाला दर वेळेस परप्रांतीयांच्या/‘भय्यां’च्या नावाने बोटे मोडायची ती?)
त्यामुळे कुणीतरी आपल्यालाच कुत्रा म्हणत आहे असा आधी समज होतो.
शिवाय, नक्की कोणा/कशापासून सावध राहायचे, याचाही बोध होत नाही. (Unspecific paranoia?)
आणि व्यवस्थित हिंदू नाव असलेल्या लोकांचे जिपे तपासल्यास ते कसे खान किंवा शेख असतात असं काही तिथले थेर्डे पसरवू लागले.
समजा असले, तर त्याने नेमके काय बिघडते?
हिंदूंच्या मंगलप्रसंगी हमखास ज्याची सनई एके काळी नुसती वाजायचीच नव्हे, तर अनिवार्य समजली जायची, त्याचे नाव (न तपासतासुद्धा) ‘खान’ असे आढळायचे. (आणि, तेसुद्धा, नुसतेच ‘खान’ नव्हे, तर ‘अल्लाच्या नावाने खान’. परंतु, ते एक असो.) झालेच तर, विठ्ठलाची भक्ती करणारा एक जण पूर्वी ‘शेख’ निघाला. (फार कशाला, त्याच परंपरेवर पांडित्यपूर्ण विवेचन करणारा एकजण ‘पठाण’सुद्धा निघाल्याचे आठवणीत आहे.) याची आठवण या थेरड्यांना करून द्यायला पाहिजे काय? (परंतु, उपयोग होणार नाही.)
हे असे होऊ लागले, की मग (ऑफऑलदपीपल) ओवैसींसारख्यांबद्दल आदर वाढू लागतो. नव्हे, त्यांच्यासारख्या नेतृत्वाची देशाला आज किती गरज आहे, हे जाणवू लागते. चालायचेच. (वन ऑफन/ऑफ्टन आस्क्स फॉर इट.)
सो आता ती पाटी
।।श्री।।
पाकीज़ा
अशी आहे.
खरे तर “श्रीमती”चे लघुरूप “श्री.” असेच करण्याची प्रथा आहे. मग हे काय भलतेच?
(किंवा कदाचित, ती पाटी “॥श्रीश्री॥ पाकीज़ा” अथवा “॥श्री१०८॥ पाकीज़ा” अशी जर केली असती, तर गिऱ्हाईक तितक्या पटींनी वाढले असते काय?)
असो चालायचेच.
.
>>किंवा कदाचित, ती पाटी “॥श्रीश्री॥ पाकीज़ा” अथवा “॥श्री१०८॥ पाकीज़ा” अशी जर केली असती, तर गिऱ्हाईक तितक्या पटींनी वाढले असते काय?)
१०८ चा काय सिग्निफिकन्स?
पण त्यांनी असला बावळटपणा केल्याने त्यांचं एक कष्टमबर नक्कीच गेलं. मी नाही जाणार तिथे आता. माझेही पाचदहा हजार वाचले.
जाणार
हिंदुत्ववाद्यांचं फावु नये म्हणुन मी तिथे जाणार आणि काहीतरी खरेदी करणार! डहाणुकर कॉलनीच्या रिवाजाप्रमाणे, त्यांना पुन्हा नांव बदलुन, ' पाकीजाश्री" ठेवण्याची सुचना करणार! इथे, प्रत्येक पुनर्निर्माण झालेल्या सोसायटीचं जुनंच नांव, मागे श्री लावुन ठेवण्याची पद्धत दिसली.
?
बायकांच्या ब्यूटी पार्लरास तिरशिंगराव नेमक्या कोठल्या प्रकारे उपकृत (मराठीत: पेट्रनाइज़) करू शकतील, याचे चित्र डोळ्यांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करतोय; जमत नाहीये.
(अवांतर: तिरशिंगरावांत हे अंग असेल, याची शंकासुद्धा आली नव्हती. किंवा, कदाचित माझाच काही गैरसमज होत असू शकेल. (चूभूद्याघ्या.))
अहो नबा!!
बुटिक म्हणजे boutique. तिथे श्रीमंत बायका कलकत्ता, झालंच तर गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान अशा ठिकाणी काँटॅक पटवून साड्या ड्रेस मटेरियल स्वस्तात घेऊन येतात..आणि मग ते पुण्यामुंबईला १०० पेक्षा अधिक टक्के फायद्याने विकतात. म्हणजे कलकत्त्यात घोरिया हाट म्हणून एक प्रसिद्ध बाजार आहे. तिथून १५०० ला आणलेली साडी इथे ६००० ला विकायची.
शिवाय ही बुटिक कल्चर उच्च भ्रू बायकांमध्ये फार आहे. हल्ली तुम्ही म्हणता त्या ब्युटी पार्लरमध्ये खोटी नखं लावून मिळतात लांब लांब. तशी नखं असणाऱ्या आणि शोफरवाल्या गाडीतून उतरणाऱ्या बायका अशा ठिकाणी कपडे घ्यायला जातात. मला एकदा तशी नखं लावून बघायची आहेत.
१०८…
१०८ चा काय सिग्निफिकन्स?
चांगला प्रश्न आहे. मात्र, याचे खात्रीलायक उत्तर मलाच नीटसे ठाऊक नसल्याकारणाने, मी ते तुम्हाला देऊ शकणार नाही, याबद्दल क्षमस्व. (तुम्हीच ते गूगल केलेत, आणि (त्यातून काही अर्थबोध झाल्यास) ते मला समजावून सांगितलेत, तर उपकृत राहीन.)
मात्र, साधूमंडळी वगैरेंच्या नावांसमोर हे चिकटविलेले अनेकदा पाहिलेले आहे.
कदाचित इथेही काहीजणांना याचे उत्तर ठाऊक असण्याची शक्यता आहे. (कदाचित, पटाईतकाका? परंतु, पटाईतकाकांनी लिहिलेले काहीही आम्ही सहसा मिठाच्या खड्यासोबत नव्हे, तर आख्ख्या मिठागरासोबत घेतो. तरीही, असल्या भानगडींशी त्यांचा शक्यतो निकटसंबंध असल्याकारणाने (चूभूद्याघ्या.), या बाबतीतील त्यांच्या विधानाकडे ब्रह्मवाक्य म्हणून जरी नव्हे (कदापि नव्हे!), तरी, किमानपक्षी एक विदाबिंदू म्हणून पाहता यावे.) (अर्थात, श्री. पटाईत हे या बाबतीत सहकार्य करतीलच, याची काही शाश्वती नाहीच, म्हणा. परंतु, कदाचित येथील इतरही सदस्यांना या संदर्भात काही माहिती असू शकेल, ती माहिती अधिक विश्वासार्ह असू शकेल, तथा, असे सदस्य कदाचित सहकार्य करतीलही. सबब, अशा सदस्यांनी पुढे येऊन अवश्य सहकार्य करावे, असे या निमित्ताने त्यांना आवाहन. आणि, आगाऊ आभार.)
ममदानीच्या निमित्ताने
न बा,ममदानी निवडून येणे त्यामुळे इथल्या बऱ्याच भांडवलशाहीप्रेमी लोकांना दुःख झालय. (त्यांना काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. ममदानीने न्यूयॉर्क विकून टाकले तरी इकडे काय फरक पडणारे? इथे पुणे शहर विकून खाणे सुरु आहे त्याबद्दल निवांत आहेत लोक)
ममदानीच्या निमित्ताने ( म्हणजे ममदानी निवडून येण्याविषयी) तुमचे काही मत आहे काय?आणि असले तर काय असेल?
'ममदानीच्या निमित्ताने' असा एक नवीन धागा काढावा काय ?
Mixed feelings
ममदानी जिंकल्याबद्दल मला mixed feelings आहेत.
म्हणजे, एकीकडे ते जिंकल्याचा आनंद तर निश्चित आहे. (माणूस भला दिसतो. प्रामाणिक वाटतो. ताज्या दमाचा आहे. कल्पना चांगल्या आहेत. वगैरे वगैरे.) परंतु, अमेरिकेत गेल्या सोळासतरा वर्षांपासून जो राजकीय माहौल चालू आहे, तो पाहता, त्यांचा ओबामा केला जाईल — आणि, he may have already been set up for failure (or worse) — अशी दुसरीकडे भीती वाटते.
ओबामा निवडून आले, तेव्हासुद्धा अशीच आशा वाटली होती. (ओबामा हादेखील असाच भला, प्रामाणिक, (तेव्हा) ताज्या दमाचा, चांगल्या कल्पना असलेला वगैरे माणूस.) But, for no fault of his, he turned out to be an utter failure. कारण, एक काळा माणूस व्हाइट हाउसमध्ये (आमच्या व्हाइट हाउसमध्ये) जाण्याची जुर्रत करू शकतो, या कल्पनेने रिपब्लिकन इतके बिथरले, इतके पिसाळले, की ‘ओबामांना आम्ही one-term President करू’ अशी जाहीर प्रतिज्ञा करून बसले. म्हणजे, तोवर, रिपब्लिकन पक्षात वर्णवर्चस्वाची, झालेच तर ख्रिस्ती मूलतत्त्ववादाची, लक्षणे आहेत, अशी अंधुक कल्पना येण्यासारखी परिस्थिती तशी खूप अगोदरपासून होती. मात्र, ओबामा निवडून आल्यापासून they dropped all pretenses, कमरेला गुंडाळलेले सोडून देऊन ते डोक्याला बांधले नाही, तर (पुन्हा कधीही नको, म्हणून) दूर फेकून दिले, आणि went on to a full-blown Nazi mode. (तेव्हापासूनच्या रिपब्लिकन राजकारण्यांच्या एकाहून एक पिसाळलेल्या वक्तव्यांकडे पाहिले असता हे सहज लक्षात येईल. आणि, don’t get me wrong… पिसाळलेल्या राजकारण्यांना रिपब्लिकन पक्षात नेहमीच जागा होती. परंतु, they used to be kept well under wraps. ओबामांच्या निवडणुकीनंतर they simply started crawling out of the (rotten) woodwork.)
त्यानंतर मग या रिपब्लिकनांनी ओबामांना छळ-छळ-छळले. पदोपदी त्यांच्या मार्गात धोंडे आणून घातले. ‘ओबामांचा जन्म आफ्रिकेतला आहे, म्हणजे ते natural-born American नाहीत, आणि म्हणून घटनेनुसार अध्यक्षपदास पात्र नाहीत’ असे (खोटेनाटे) आरोपच काय केले, त्यावर ओबामांनी आपला अधिकृत जन्मदाखला जाहीर करून (ज्यायोगे त्यांचा जन्म हवाई बेटांत — म्हणजे अमेरिकन भूमीत — झालेला आहे, हे सिद्ध होत होते) त्याचे खंडन केले असता, त्या दाखल्याच्या खरेपणावर शंकाच काय घेतल्या, झालेच तर, त्या जन्मदाखल्याच्या अधिकृतपणाबद्दल ‘तपास करण्यासाठी’ म्हणून हवाईला पथकेच काय पाठवली, एकंदर, येनकेन प्रकारेण distractions निर्माण केली, अडथळे निर्माण केले. झालेच तर, जस्टिस स्कलिया गचकल्यानंतर सुप्रीम कोर्टावर जे रिक्तपद निर्माण झाले, ते भरून काढण्यासाठी ओबामांनी रीतसर आपला उमेदवार पुढे केला असता, “अध्यक्षपदाच्या शेवटच्या वर्षात अध्यक्षाने सुप्रीम कोर्टावर नेमणुका करू नयेत; तो अधिकार पुढील अध्यक्षपदीय निवडणुकीत नव्याने लोकनिर्वाचित होणाऱ्या अध्यक्षाचा असावा”, असे (कोठेही अस्तित्वात नसलेले) “नीतितत्त्व” अक्षरशः ढुंगणातून उपसून काढून पुढे केले, आणि ओबामा अध्यक्ष असेपर्यंत त्या उमेदवाराच्या साध्या सुनावणीससुद्धा नकार दिला. (पुढे ट्रंप अध्यक्ष असताना जस्टिस जिन्सबर्ग वारल्यानंतर मात्र, “नीतितत्त्व” रीतसर फिरवून, ट्रंपची कारकीर्द संपण्यास जेमतेम काही महिने उरलेले असताना, किंबहुना, पुढील अध्यक्षपदीय निवडणूक होऊन तिची मतमोजणी सुरू अस्तानासुद्धा, ट्रंपने पुढे केलेल्या उमेदवाराची झटपट सुनावणी घेऊन तिला कायमसुद्धा करण्यात आले. चालायचेच.)
एकंदरीत, ओबामा निवडून आले खरे — किंबहुना, रिपब्लिकनांच्या नाकावर टिच्चून पुढे दुसऱ्यांदासुद्धा निवडून आले — परंतु, आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत, फारसे काही काम करू शकले नाहीत. त्यांना काम करू दिले गेले नाही. त्यांच्या मार्गात पदोपदी नाही नाही ते अडथळे आणले गेले.
Obama contested — and was elected — on a campaign promise of Change. Well, he brought Change, all right — an unwelcome, undesirable change in the Republican Party.
अमेरिकन राजकारण गढूळ होण्यास ट्रंप आल्यापासून सुरुवात झाली, असा एक सार्वत्रिक समज आहे. तो चुकीचा आहे. अमेरिकेचे राजकारण पराकोटीचे गढूळ होण्यास सुरुवात जी झाली, ती ओबामा सर्वप्रथम जेव्हा निवडून आले, तेव्हापासून. ट्रंपची राजकारणात सरशी ही केवळ त्या गढूळ झालेल्या राजकारणाची अंतिम परिणती होती — यह तो होना ही था। As I always like to say: Trump is not the disease, but merely a symptom of the disease.
आणि, या सगळ्यात ओबामांचे पाप इतकेच होते, की, ते (१) कृष्णवर्णीय होते, आणि (२) (कृष्णवर्णीय असूनसुद्धा) (अध्यक्षपदाच्या) निवडणुकीसाठी उभे राहिले, आणि (३) (कृष्णवर्णीय असूनसुद्धा) (अध्यक्ष म्हणून) निवडून आले.
बाकी, मूळ विषयावर येता, ममदानींच्या पापांची गणती मी ती काय करावी? ते:
(१) मुस्सलमान आहेत (चेक),
(२) ब्राउन कातडीचे आहेत (चेक),
(३) इमिग्रंट आहेत (पक्षी: त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही; झालेच तर, ते (तथा त्यांचे आईवडील) हे “बाहेरून” आलेले आहेत (भले आजमितीस अनेक वर्षांपासून ते अमेरिकन नागरिक असले, तरीही)) (चेक),
(४) ‘इस्राएल’ नामक एका विशेष परराष्ट्राचा त्यांनी उदोउदो केलेला नाही (भले ते केवळ न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी उभे राहिलेले असोत — येरुशलेममधील अमेरिकन वकील अथवा अमेरिकन परराष्ट्रमंत्री या पदासाठी नव्हे (ही दोन्ही पदे अध्यक्षनियुक्त असून, त्या पदांवर नेमल्या जाणाऱ्या व्यक्ती या लोकनियुक्त प्रतिनिधी नसतात — किंबहुना, त्या लोकनियुक्त प्रतिनिधी असणे हे घटनेनुसार निषिद्ध आहे — ही बाब अलाहिदा) — आणि, त्या दृष्टीने, या गोष्टीमुळे वन वे ऑर द अदर काहीही फरक पडत नसो) (चेक),
(५) (एवढे सगळे असूनसुद्धा) त्यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याचे धाडस केलेले आहे (चेक), आणि
(६) (इतकेच नव्हे, तर, एवढे सगळे असूनसुद्धा) ते न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आलेले आहेत (चेक).
बास काय राव, इतकी पापे पुरे नाहीत झाली का?
त्यामुळे, I sincerely hope that he is successful, but am afraid that that is not to be. ममदानींचा ओबामा केला जाईल, ही भीती वाटते.
असो चालायचेच. पाहू यात काय काय होत जाते ते.
पहिलेपणाचा शाप
नेटफ्लिक्सवर 'मॅडम सेक्रेटरी' नावाची चीझी मालिका आहे. त्यातलं मुख्य पात्र सुरुवातीला अमेरिकेची सेक्रेटरी ऑफ स्टेट, परराष्ट्रमंत्री होते. मग पुढे ती राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडूनही येते. तेव्हा तिला बराच विरोध होतो, त्यानंतर तिला प्रश्न पडतो की, फक्त अमेरिकेची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष एवढंच तिचं कर्तृत्व असेल का?
मालिका अमेरिकी असल्यामुळे तसं काही तिथे होत नाही.
ओबामाच्या निवडणुकीनंतर इलहान ओमर आणि अलेक्झांड्रिया ओकाझिओ कॉर्टेझ संसदेत निवडून आल्या. त्यांना किती काळ निवडणुका लढवता येतील यावर मर्यादा नाही. झोहरान ममदानीवरही अशी मर्यादा नाही.
न्यू यॉर्कच्या महापौराकडे तशीही फार सत्ता नसते. ममदानी काही कामही करेल, अशी मला आशा आहे. पण ते नाही जमलं तर किमान समाजमाध्यमं वापरून तरुण लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता तरी आहे. आणि त्याला सुरुवातीला होईल तो विरोध हळूहळू कमी होईल, अशी आशा करू.
भुरानंतरचे बाविस्कर
'भुरानंतरचे बाविस्कर' अभिजात लिटफेस्ट मधली ही मुलाखत आवडली.
https://www.youtube.com/watch?v=c-rCP1R0WXc
भुरा वाचलेलं नाही. पण बुकगंगावर सुरवातीची काही पाने वाचली. थोडक्यात इंग्रजी दहावी नापास झाल्यावर या माणसाचा प्रवास थक्क करणारा आहे.

स्वागत...नवीन प्रतिसाद…
स्वागत.
.
.
एक दोन ओळींचे विचार मांडायला धागा काढावा लागत नाही आणि अगोदरच्या खरडींशी संबंध असलाच पाहिजे असे नसते हाच खरडफळ्याचा फायदा.
नवीन प्रतिसाद वरती ठेवण्याची सोय आहे का नव्या ड्रुपळात हे नवीन ऐसी सुरू झाल्यावर तपासले होतं पण तेव्हा सापडलं नव्हतं.