दिवाळी अंक २०१२ : काही दृष्टीक्षेप

गेल्या वर्षी लिहिलेल्या http://www.aisiakshare.com/node/229 या धाग्यासारखा धागा यंदा काढायचा विचार होताच. मात्र एक गोष्ट लगेच लक्षांत आली की, यंदा हा धागा काढायला जवळजवळ एक महिना उशीर झालाय्. पण थोडा विचार केल्यावर हेही लक्षांत आलं की यंदा दिवाळी एक महिना उशीरा आली. पर्यायाने आमच्यापर्यंत अंक पोचणे आणि ते हळुहळू वाचून त्यावर काहीतरी खरडणे यालाही उशीर होणे क्रमप्राप्तच होते.

गेल्या वर्षीचीच यादी यंदाही आहे. यंदाच्या दिवाळी अंकांवर सन्जोप राव यांनी ही http://www.aisiakshare.com/node/1207#comment-18401 दणदणीत प्रतिक्रिया देऊन एकप्रकारे सुरवात केलीच आहे. माझ्या प्रस्तुत धाग्यावरही त्यांनी वाचलेल्या अंकांमधल्या गोष्टींवरची थोडीबहुत चर्चा होईल असं मला वाटतं.
जसजसे अधिकाधिक अंक वाचून होतील तसतसं अधिक लिहीत जाईन म्हणतो. या दरम्यान अन्य वाचकांनीही आपली रोचक आणि बहुमूल्य मतं मांडावीत.

गेल्यावर्षीच या प्रकारचा लेखाजोखा केलेला असल्यामुळे, मनातल्या मनात यंदा थोडी तुलना होणं अपरिहार्यच होतं. "प्रहार"च्या दिवाळी अंकामधे लक्षणीय फरक पडल्याचं मला जाणवलं. गेल्यावर्षी आल्हाद गोडबोले, मुकेश माचकर, राम जगताप आणि अभिजीत ताम्हाणे अशी मातबर मंडळी त्यांच्याकडे होती आणि त्यांनी मिळून केलेल्या कामाचं स्वरूप आणि दर्जा या गोष्टी लख्खपणे अंकामधे दिसत होत्या. रामचंद गुहा यांच्यासारख्या मोठ्या माणसाची मुलाखत, आंतरजालावरच्या अभ्यासू लोकांना हाताशी धरून त्यांच्याकरवी मराठी आंतरजाल विश्वाचा मागोवा, युरोपमधील आर्ट म्युझियम्स आणि चळवळी , माचकरांचा नॉस्टाल्जिक ढुढ्ढाचार्यांवरचा खुसखुशीत लेख (ज्याची दखल इथे घेतली गेली : http://www.aisiakshare.com/node/292 ) आदि नावीन्यपूर्ण आणि मार्मिक गोष्टींनी गेल्यावर्षीचा अंक नटलेला होता. यंदा सर्व मामला अपरिचित वाटणार्‍या नावांकडे सोपवला गेलेला दिसला. गुणी आणि सीनियर लोकांच्या गैरहजेरीमधे "प्रहार"ने चांगली कामगिरी केली असंच मी म्हणेन. (संपादक : महेश म्हात्रे) त्यांनी देशातल्या काही एनजीओ संस्थांची सांगोपांग माहिती देणारी सुमारे १० ते १२ फीचर्स केली आहेत. त्यांनी आपल्या तरुण वार्ताहरांना त्या त्या संस्थांमधे पाठवून त्यांच्याकरवी यथास्थित माहिती मिळवून, रंगीत छायाचित्रे आणि आकडेवारीसहित चांगली माहिती दिलेली आहे. "लोकसत्ता"च्यासमोर गेल्या वर्षी हीच परिस्थिती असताना त्यांनी केलेलं काम नक्कीच या दर्जाचं नव्हतं. ("लोकसत्ता"ने स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांची "ओळख" करून देणारे लेख - ज्यात अंतुले , बाबासाहेब भोसले आणि निलंगेकरही आले - अंकभर गेल्यावर्षी दिलेले होते. !!)

मनोविकास प्रकाशनाने काढलेला "इत्यादि" हा अंक मला आवडला. दुष्काळाची मीमांसा, बदलत्या काळातले नातेसंबंध आणि कुटुंबसंस्थांचं स्वरूप, संस्कृतीवेध अशा तीन वेगवेगळ्या विभागांमधे काही मान्यवर लोकांचे चांगले लेख आहेत.

वेळ मिळेल तसे मनोविकास आणि अन्य अंकांबद्दल लिहितो.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

दिवाळी अंकांचे रसग्रहण आणि त्यांबद्दल चर्चा करण्याबाबत आंतरजालावर यंदा एकूणच उदासीनता जाणवत आहे. मुक्तसुनीत, तुम्ही 'नेटा'ने लिहा. वाचायला आवडेल. जमेल तशा आम्हीही आमच्या अर्धवट भाजलेल्या, कच्च्या विटा लावू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

यंदा का कोण जाणे छापिल अंक वाचलेच नाहियेत - वाचावेसे वाटलेच नाहियेत. या धाग्याच्या निमित्ताने तशी उबळ आली तरी सार्थक झाले म्हणायचे :०

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र चा दिवाळी अंक हा दिवाळी अंक न म्हणता वार्षिक विशेषांक म्हटले जाते. बोलीभाषेत मात्र सर्व याला दिवाळी अंकच म्हणतात. दिवाळी अंक म्हटले तर प्रतिगामी वा अंधश्रद्ध ठरु अशी भिती त्यामागे असावी.
अंकात सुमन ओक यांचा लेख आहे. विषय आहे जोहॅनिस क्वॅक (जॉन) या जर्मन तरुणाने " भारतीय बुद्धीवादी,त्यांच्या अश्रद्धेचे स्वरुप आणि श्रद्धेबाबत भ्रमनिरास" या विषयावर केलेले एक संशोधन.ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस ने प्रकाशित केले आहे. त्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कार्य यावर प्रकाश टाकला आहे.
पुष्पाताई भावे यांची राजीव देशपांडे यांनी घेतलेली विशेष मुलाखत अंकात आहे. कार्यकर्ता मुलाखत म्हणुन प्रा प रा आर्डे यांची तिमिरातून तेजाकडे अशी मुलाखत आहे.
धर्मस्थळ चिकित्सेत मुंबईचा मिरा दातार दर्गा, बुलढाण्यातील चिखलीचा सैलानी बाबाचा दर्गा, रत्नागिरीतील शहानूर बाबाचा दर्गा, सांगलीजवळ ख्वाजा कबीर दर्गा, नंदूरबार जवळील गुलामअली चिश्ती दर्गा अशा पाच दर्ग्यातीळ अघोरी उपचाराबद्दल माहिती देणारे लेख आहेत. मनोरुग्णांना दर्ग्याची नव्हे तर मानसमित्रांची गरज या डॉ प्रदीप जोशी यांचा लेख ही आहे.
ओळख प्रेरणादायी कामाची अंतर्गत अंनिस च्या कोल्हापूर व लातूर येथील आंतरजातीय विवाह केंद्राच्या भुमिका व अनुभव या बद्दल माहिती आहे.
गर्भ संस्कार एक थोतांड- डॉ चंद्रकांत संकलेचा ; हिंदूत्ववादी संघटनांनी हिंदुंच्याकरिता केले तरी काय? - डॉ शरद अभ्यंकर हे लेख आहेत.
"वाढती दैववादी मानसिकता व आजचे समाज वास्तव' हा परिसंवाद आहे. यात कॉ. गोविंद पानसरे, संध्या नरे-पवार, सुभाष थोरात, तारा भवाळकर, डॉ रावसाहेब कसबे, डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा सहभाग आहे.
एकंदरी अंक अर्थातच वैचारिक मेजवानी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अधिष्ठान आणि दक्षता चे अंक दर्जेदार आहेत.
नक्कीच वाचनीय आहेत.
अधिष्ठान मधील काही लघुकथा मनात घर करुन राहतात. विशेषतः अरुण डावखरे यांची टाईम फ्रेम.
जोसेफ तुस्कानो यांनी 'सिडने शेल्डन' यांच्या एका कादंबरीचा 'दहशतवादी' या नावाने केलेला केलेला अनुवादही वाचनीय आहे. शिवाय अधिष्ठान मधे संजय सोनवणी, पद्माकर वर्तक, जयंत साळगांवकर या प्रसिद्ध व्यक्तींचे लेख आहेत.
दक्षता मधील पोलिस कथा चांगल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0