गेले विमान कोणीकडे?

मलेशियन एअरलाइन्सचे विमान बेपत्ता झाल्याची घटना जितकी धक्कादायक आणि क्लेशकारक होती तितकीच ती रहस्यमय होती आणि रोज येणार्‍या बातम्यांमधून तिला नाट्यपूर्ण कलाटण्या मिळत होत्या. यामुळे या घटनेबद्दल आपणही चार शब्द लिहावेत असे वाटल्याने मी त्यावर एक लहानशी लेखमाला लिहिली होती. तिचे संकलन करून सर्वसामान्य वाचकाला सहज समजावे अशा पद्धतीने हा लेख लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. थोड्याच दिवसांपूर्वी ऐसी अक्षरेवर श्री. गवि यांचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख (चर्चा) येऊन गेला होता आणि त्यावर मुख्यतः त्यांनीच आणि इतर वाचकांनी दिलेल्या प्रतिसादांमधून अद्ययावत माहितीसुद्धा मिळत गेली होती. एकाच विषयावर दुसरा लेख देणे अप्रस्तुत वाटल्यामुळे तेंव्हा मी माझा लेख सादर केला नाही. पण आता श्री.गविंच्या लेखावरील चर्चा थांबली असल्याने माझा लेख देत आहे.
---------------------------
एकादा माणूस अचानक ऑफिसला आला नाही किंवा त्याच्यासंबंधी कोणाचा काही निरोपही आला नाही तर तो माणूस कदाचित काही कामासाठी दुसरीकडे गेला असेल, आजारी असेल किंवा त्याने सुटी घेतली असेल असेच इतरांना वाटते. त्याच्या घरी चौकशी केली किंवा घरच्या लोकांनीच त्याची ऑफिसात चौकशी केली आणि या दोन्ही जागी तो नसल्याचे ध्यानात आले तर मात्र सगळ्यांचे धाबे थोडे दणाणते. या परिस्थितीत तो फक्त हरवला किंवा परागंदाच झाला आहे की त्याचे काही बरेवाईट तर झाले नाही ना? अशा शक्यता असल्या तरी कोणीही लगेच तिसरी शक्यता सहसा विचारात घेत नाही. तो कुठे तरी असेल आणि सापडेल किंवा परत येईल असाच विचार केला जातो, पण विमानाच्या बाबतीत मात्र ते कुठे आहे असा प्रश्न पडला तर त्याचा अपघात झाला असण्याचाच विचार सर्वात आधी मनात येतो आणि त्यानंतर त्याच्या अपहरणाचा. ते चुकून इकडे तिकडे भरकटत गेले असण्याची शक्यता फारच कमी असते.

विमान आकाशात उडल्यापासून ते पुन्हा जमीनीवर उतरेपर्यंत त्याचा नेमका ठावठिकाणा समजत असतो. एकादे विमान अचानक रहस्यमय रीतीने गायबच झाल्याची घटना क्वचित घडते. एअरोडायनॅमिक्सच्या नियमांनुसार पाहिल्यास कोणत्याही विमानाचे दीर्घकाल आकाशातच भटकत राहणे केवळ अशक्य असते. निदान त्यातले इंधन संपल्यानंतर तरी ते पृथ्वीच्या पाठीवर कुठे ना कुठे उतरले असणार किंवा कोसळले असणार एवढ्या दोनच शक्यता असतात, पण पृथ्वीच्या पाठीवरील निरीक्षणकेंद्रांमधून आणि उपग्रहांमार्फत सतत इतकी पाहणी चाललेली असते की यातल्या कोणत्याही घटनांची कोणालाही खबरबातच लागू नये असे क्वचितच घडते. निदान त्या यंत्रणांबद्दलचा सर्वसाधारण समज तरी असाच आहे. पण कधीकधी सत्य हे कल्पनेपेक्षा भीषण असते असे म्हणतात. तशीच एक रहस्यमय घटना मागील महिन्यात घडली. या घटनेत नेमके काय घडले आणि ते कोणत्या क्रमाने घ़डले हे अजूनही निर्विवादपणे जगासमोर आलेले नाही. यासंबंधी मला प्रसारमाध्यमांमधून घरबसल्या जेवढी माहिती ज्या क्रमाने मिळत गेली, त्यामधून कोणती कोडी पडत आणि उलगडत गेली हे या लेखात मी लिहिणार आहे.

दिनांक ७ मार्चच्या मध्यरात्रीनंतर ४१ मिनिटांनी म्हणजे ८ मार्च सुरू झाल्या झाल्या मलेशियन एअरलाइन्सच्या एका जम्बोजेट विमानाने मलेशियातल्या कौलालंपूर विमानतळावरून उड्डाण केले. या बोइंग ७७७ विमानात २२७ प्रवासी आणि पायलट, एअरहॉस्टेसेस वगैरे १२ कर्मचारी अशी २३९ माणसे होती. त्यांना घेऊन निघालेले ते विमान सकाळी साडेसहा वाजताच्या सुमाराला चीनमधल्या बैजिंगला पोचणार होते. त्या विमानाने अगदी व्यवस्थितपणे उड्डाण केले आणि ठरलेल्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात केली. त्याच्या प्रवासातल्या प्रगतीच्या सूचनाही मिळत गेल्या. पण सुमारे चाळीस मिनिटांनी काय झाले कोण जाणे? त्या विमानाचा जमीनीवरील यंत्रणांशी असलेला संपर्क तुटला तो कायमचाच!

जेंव्हा मलेशियाचे विमान बेपत्ता झाल्याचे कळले तेंव्हा त्या बातमीने जगभर हलकल्लोळ माजला. त्या विमानावरून शेवटचा संदेश आला तेंव्हा ते विमान मलेशियाचा किनारा सोडून समुद्रावर उडत होते आणि अजून व्हिएटनामपर्यंत पोचले नव्हते. त्यानंतरसुद्धा ते तसेच पुढे जात जात वाटेत कुठे तरी, बहुधा समुद्रातच कोसळले असावे असा प्राथमिक अंदाज केला जाणे साहजीकच होते. यामुळे त्या भागातल्या समुद्राची पाहणी सुरू झाली. देशोदेशींच्या ज्या कोणत्या नौका त्या भागात होत्या त्यांनी समुद्राचा तो भाग पिंजून काढला, तसेच आकाशामधून विमानांनी पण शोध घेतला. "कसलासा मोठा आवाज ऐकू आला." किंवा "कुठेतरी आग दिसली." अशा प्रकारची भोंगळ माहिती कुणी कुणी दिली असे म्हणतात, पण त्यात काही तथ्य आढळले नाही. त्या विमानाचा किंवा त्याच्या अवशेषांचा शोध चालतच राहिला.

विमानाने हवेत उडतांना तरंगत रहावे यासाठी त्याला वजनाने अत्यंत हलके केलेले असते. त्याला अलगदपणे पाण्यावर उतरवले गेले आणि बाहेरचे पाणी त्या विमानात शिरले नाही तर ते विमान पाण्यावर तरंगत रहायला हवे. अशा प्रकारे समुद्रावर उतरवल्या गेलेल्या विमानातल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलेले मी एका जुन्या इंग्रजी सिनेमात पाहिले आहे. त्या सिनेमाच्या शेवटी असे नमूद केले होते की जरी यातली गोष्ट पूर्णपणे काल्पनिक असली तरी अशा प्रकारे प्रवाशांना वाचवण्याची क्षमता आणि कौशल्य खरोखरच सैन्यदलाकडे आहे. त्यानंतरच्या १०-१२ वर्षांमध्ये त्यात वाढच झाली असणार. मलेशियाचे विमानसुद्धा त्याच्या वैमानिकाने असेच अलगदपणे समुद्राच्या पाण्यावर उतरवले असले तर त्यातल्या प्रवाशांची सुटका करणे शक्य असावे अशी आशा वाटत होती.

प्रवासी विमानातल्या सीट्सच्या खाली एक लाइफ जॅकेट ठेवलेले असते असे नेहमी सुरक्षा सूचनांमध्ये सांगितले जात असे. ही सूचना देशांतर्गत प्रवास करतांना मला विनोदी वाटत असे आणि आपल्या खुर्चीच्या खाली खरोखरच हे जॅकेट ठेवले आहे का ते पहाण्याची इच्छाही कधी कधी होत असे. पण आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये ते नक्कीच ठेवले जात असणार. मलेशियाच्या विमानातल्या प्रवाशांनासुद्धा आणीबाणीच्या वेळी ते जॅकेट मिळाले असले आणि त्याचा वापर करून त्यांनी आपला जीव वाचवला असला तर ते समुद्रात तरंगतांना दिसतील आणि पाहणी करणा-या नौकांकडून वाचवले जातील अशी आशाही थोडी अंधुक असली तरी वाटत होती.

समजा त्या प्रवाशांचे नशीब एवढे चांगले नसले आणि त्यांचे विमान समुद्रात अत्यंत वेगाने धाडकन कोसळून तत्क्षणी तुटून फुटून गेले असले तर त्याच्या टाकीत नुकतेच भरलेले हजारो लीटर इंधन पाण्यावर सांडले असते. त्याचा भडका उडाला असला तर तो महाप्रचंड जाळ दुरूनही दिसला असता आणि भडका उडाला नसला तर त्या तेलाचे तवंग दूर दूर पर्यंत पसरले असते. शिवाय हे जंबो जेट विमानसुद्धा आकाराने महाकाय असते. पाण्याला धडकल्यामुळे त्याचे बारीक तुकडे होणार नाहीत. वाकडे तिकडे झालेले विमानाचे मोठे भाग शिल्लक राहिलेच असते. पण पहिल्या दिवशी केलेल्या टेहेळणीमध्ये यातले काहीच दिसले नाही. या शिवाय आणखी काही महत्वाचे मुद्दे होते. सुमारे तीस चाळीस हजार फूट उंचीवरून वेगाने चालणारे विमान एकादा दगड पडल्यासारखे क्षणार्धात सरळ खाली पडू शकत नाही. ते कुठल्याही कारणाने आकस्मिकपणे खाली खाली येऊ लागले तर वैमानिकाला कळणारच. अशा वेळी "अरे देवा!, हे काय होतंय्? कोणीतरी वाचवा हो." असा प्रकारचे उद्गार तो काढेल, जोरात किंचाळेल, तातडीने एसओएस (सेव्ह अवर सोल्स) मेसेजेस पाठवेल. पण त्याने यातले काहीच का केले नाही? त्याचा अखेरचा जो आवाज ऐकला गेला तो होता "गुड नाईट". या सर्वांवरून एकच निष्कर्ष निघत होता तो म्हणजे हे विमान ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाले त्या जागेच्या आसपास आणि ज्या वेळी हरवले त्यानंतर लगेचच ते कोसळलेले नाही. पहिल्या दिवसभरातल्या विविध प्रकारच्या शोधाशोधीनंतर एवढे अनुमान जवळ जवळ निश्चित झाले होते. पण मग ते विमान कुठे गेले? आणि त्याचे काय झाले असावे? हे यक्षप्रश्न अनुत्तरितच होते.

या विमानातल्या २३९ प्रवाशांपैकी १५२ चीनचे आणि ५० मलेशियाचे नागरिक होते. उललेले ३७ उतारू निरनिराळ्या देशांचे रहिवासी होते. यातले पाच भारतीय होते, त्यातले चार मराठी भाषी आणि त्यातले तीन मुंबईचे होते. यामुळे या घटनेला इथल्या वृत्तपत्रांमध्ये ठळक अक्षरांत प्रसिद्धी मिळाली होती, त्या उतारूंची नावे आणि त्यांच्या नातलगांची माहिती छापून आली होती आणि त्यांच्याविषयी आत्मीयता वाटायला लागली होती. त्या विमानाच्या तपासासंबंधीच्या उलट सुलट बातम्या रोज छापून येत होत्या आणि त्यांच्याबरोबर वाचकांची मने आशानिराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेऊ लागली होती.

विमानाचे अपहरण हे एक दुर्दैवी सत्य गेल्या काही वर्षांपासून जगासमोर आले आहे. ते टाळण्यासाठी अत्यंत किचकट अशी सुरक्षा व्यवस्थाही अंमलात आणली गेली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये जाणार्‍या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जाते. काही ठिकाणी तर डोक्यावरचे पागोटे, अंगावरचे डगले, कंबरेचा पट्टा आणि पायातले बूटसुद्धा काढून दाखवावे लागतात, पिण्याच्या पाण्याची बाटलीसुद्धा प्रवासात आपल्यासोबत नेता येत नाही. विमानप्रवासात आवश्यक असतील तेवढीच औषधे बरोबर नेता येतात आणि त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन दाखवावे लागते. या सगळ्या दिव्यामधून कोणत्याही प्रकारचे घातक शस्त्र किंवा जालिम विष विमानात नेता येणे आजकाल जवळजवळ अशक्य असते. यामुळे अपहरणाचे प्रमाण आता खूपच कमी झाले आहे. तरीसुद्धा या सगळ्यांवर मात करून ते करण्याचे प्रयत्नही चाललेले असतातच. कदाचित या वेळच्या अपहरणकर्त्यांनी एकादी नवीन शक्कल लढवली असावी. तिची शक्यता कमी वाटत असली तरी तिचा विचार करणे आवश्यक होते.

या विमानाच्या अपहरणाच्या शक्यतेसंबंधी आणखी काही माहिती मिळाली होती. त्यावरून एवढे सिद्ध झाले होते की ते विमान ज्या ठिकाणी असतांना त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता तिथून ते चीनच्या दिशेने नाकासमोर उत्तरेला न जाता झर्रकन डावीकडे वळून पश्चिमेच्या दिशेने पुन्हा मलेशियाच्या भूमीवरून उडत होते. उपग्रहांमार्फत मिळालेल्या काही माहितीच्या आधारावरून असे वर्तवले गेले की तिथून ते पुढे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका वगैरे देशांच्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता होती.

या विमानाचे अपहरण झाले असले तर ते कुणी आणि कशासाठी केले असेल? या प्रश्नावर विचार चाललेला होता. एकाद्या माथेफिरूंच्या लहान टोळक्याने ते केले असले तर त्यांनी विमानातल्या संदेशयंत्रणेचाच उपयोग करून आपल्या मागण्या मांडल्या असत्या आणि त्यांची पूर्ती न केल्यास सर्व प्रवाशांसह ते विमान उडवून देण्याची धमकी दिली असती. हे काम एकाद्या अतिरेक्यांच्या संघटनेचे असते तर त्यातल्या विमानाबाहेरच्या सदस्याने किंवा प्रवक्त्याने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारून मागण्या आणि धमक्या दिल्या असत्या. पण पहिल्या दिवसभरात असे काहीच घडले नाही. या विमानाचा संपर्क पहिल्या तासाच्या आतच तुटला होता आणि त्यामुळे ते आपल्या नियोजित मार्गाने जात नसावे याबद्दल दाट शंका निर्माण झाली होती. तरीसुद्धा पाच सहा तास कोणीही याची वाच्यता केली नाही. या विमानाची बैजिंगला पोचण्याची वेळ टळून गेल्यानंतर ते हरवले असल्याचे जाहीर केले गेले. कदाचित अपहरणकर्त्यांच्या निरोपाची वाट पाहून हे केले असण्याची शक्यता आहे, किंवा काही चमत्कार होऊन हे विमान अवचितपणे बैजिंगला अवतीर्ण होईल अशी आशा वाटली असेल.

११ सप्टेंबरला अमेरिकेत घडलेल्या अतिरेक्यांच्या कारवाईत विमानांचे अपहरण करून त्यांनी वर्ल्डट्रेडसेंटर, पेंटॅगॉन वगैरे प्रमुख इमारतींना आत्मघातकी धडका दिल्या होत्या. या वेळीसुद्धा मलेशियन विमानाने अशाच एकाद्या मोठ्या लक्ष्यावर धडक मारण्याचा बेत आखला असावा अशीही शंका आली होती. हा निश्चितपणे भारतातल्या एकाद्या महानगरावर किंवा सैनिकी स्थळावर हल्ला करण्याचाच प्रयत्न होता असे काही कांगावखोर भारतीयांनी तर छातीठोकपणे सांगून टाकले. सध्याच्या परिस्थितीत ते अशक्य वाटतही नाही. कांही का असेना, पण कोणाचा असा बेत असला तरी विमानाने आकाशात उडत राहण्याची जास्तीत जास्त जी काही मुदत होती तेवढ्या काळात तो सफळ झाला नाही. त्यानंतर ते होणे शक्यच नव्हते.

या विमानाचे अपहरण करण्याचा कट शिजला असावा या शंकेला पुष्टी मिळावी अशा काही गोष्टी समोर येत गेल्या. विमानातल्या सर्व प्रवाशांची यादी आणि पासपोर्टचे क्रमांक प्रसिद्ध केले गेले. त्यातला एक ऑस्ट्रेलियन आणि एक इटालियन गृहस्थ आपापल्या घरीच होते असे समजले. ते लोक क्वालालंपूरलाच गेले नव्हते. तिथून बैजिंगला जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. या दोघांचे पासपोर्ट मागच्या किंवा त्याच्या मागल्या वर्षी चोरीला गेले होते. त्यांनी तशी व्यवस्थित नोंदही कागदोपत्री केलेली होती. मग त्यांच्या नावांनी विमानाची तिकीटे कशी निघाली, ती कोणी काढली वगैरे दिशेने तपास केल्यानंतर ते तोतये इराणी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले, इतकेच नव्हे तर त्यांची नावांसकट माहितीसुद्धा प्रसिद्ध झाली. हे सगळे फक्त एका दिवसात घडले यावरून तपास करणार्‍यांची कार्यक्षमता किती कौतुकास्पद आहे असे वाटते किंवा या सगळ्या गोष्टींची तपशीलवार खबरबात कोणी ठेवत असावा का अशी शंकाही येते. ही माहिती तरी कितपत खरी असेल तेही सांगता येत नाही. या इराण्यांच्याबद्दल जेवढी माहिती सांगितली गेली त्यावरून हे कृत्य त्यांचे नसावे असा निर्वाळा दिला गेला. हा निष्कर्ष म्हणजे भुरट्या चोर्‍या करणारा चोर बँकेवर दरोडा घालून तिला लुटू शकणार नाही अशा प्रकारचा होता. युरोपातल्या एकाद्या प्रगत देशात अवैधरित्या शिरकाव करून घेऊन तिथे आरामात रहायचे एवढाच त्यांचा उद्देश होता असे सांगितले गेले. पण त्यासाठी त्यांना चीनमध्ये जाण्याची काय गरज होती? त्या देशात अशा प्रकारे सुरक्षितपणे राहणे शक्यच नसतांना ते तिथे का जाणार होते? या प्रश्नांचा तर्कसंगत खुलासा होत नव्हता. विमानाचे अपहरण करण्यासाठी लागणारे धैर्य, निष्ठुरपणा, कौशल्य वगैरे गुण त्यांच्यात नव्हते एवढे वाटल्यास कदाचित पटण्यासारखे वाटत होते. पण सगळ्या तज्ज्ञांनी हे मान्य केले त्या अर्थी या दोघांवरून संशयाची सुई बाजूला सरकवली गेली.

या विमानाचे अपहरण होण्याच्या शक्यतेबाबत मूलभूत शंका उत्पन्न करणार्‍या आणखी काही गोष्टी होत्या. अपहरण केलेले विमान मार्ग बदलून भलत्याच ठिकाणी नेले जात असले तरी ते अचानकपणे संपूर्णपणे अदृष्य होत नाही. त्याचा बदललेला मार्ग निरीक्षकांना समजत राहतो. अखेरीस त्या विमानाला अतिरेक्यांच्या मित्रपक्षाच्या एकाद्या विमानतळावर उतरण्यासाठी संपर्क साधावा लागतोच. आणि सध्याच्या जगात हे संदेश लपून रहात नाहीत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मायनामार, थायलंड वगैरे ज्या कोणत्या देशांवरून त्या विमानाने उड्डाण करण्याची शक्यता होती त्या सर्वांनी तसे काहीही घडलेले नाही असे अगदी निक्षून सांगितले. यात कोणी खोटेपणा केला असला तर तो उद्या त्यांच्या अंगलट येणारच याची कल्पनाही त्यांना नक्कीच असणार. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवता येईल.

हे विमान कुठेही सुखरूपपणे उतरल्याचे समजले नाही, ते कोसळल्याच्या खुणा दिसल्या नाहीत तर त्याचे हवेतच काही बरेवाईट झाले की काय अशीही एक शक्यता वर्तवली गेली. त्या विमानात ठेवल्या गेलेल्या शक्तीशाली बाँबच्या स्फोटाने त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडून त्यांचे रूपांतर अगदी बारीक धुळीसारख्या कणांमध्ये झाले असेल किंवा त्यांची वाफ होऊन गेली असेल, एकाद्या क्षेपणास्त्राने त्याचा अचूक वेध घेऊन त्याला हवेतच जाळून खाक केले असेल अशा कल्पना मनात येणे साहजीक असले तरी असे घडण्याची शक्यता दिसत नाही. अशा प्रकारचा रासायनिक बाँब अस्तित्वात नाही. निदान असे कधीच ऐकिवात आलेले नाही. यासाठी अणूबाँबचा उपयोग केला गेला असता तर त्यातून निघणार्‍या विकिरणांनी आभाळ व्यापून टाकले असते आणि जगातल्या सगळ्या प्रयोगशाळांनी त्याची दखल घेतली असती. तसे काहीच घडले नाही. यामुळे ही शक्यताही फेटाळली गेली. पण मग त्या विमानाचे काय झाले?

मलेशियन एअरलाइन्सच्या ज्या हरवलेल्या विमानाचे रहस्य अशा प्रकारे गहन होत चालले होते, ते चालवणार्‍या वैमानिकांबद्दलही विचार केला गेला जाणे आवश्यक आणि साहजीक होते. त्या विमानाचा मुख्य वैमानिक (पायलट) कॅप्टन झहारी अहमद शाह आणि त्याचा सहाय्यक फरीक अब हमीद यांच्या घरांची झडती घेतली गेली. त्यात आक्षेपार्ह असे काही सापडले नाही असे सांगितले गेले. त्यांचा कोणत्याही दहशतवाद्यांशी थेट संबंध जोडता आला नसला तरी त्यामधून एवढे समजले की हा पायलट एक असामान्य माणूस होता. तो एक निष्णात आणि अनुभवी वैमानिक होताच, त्याने त्याच्या घरातच बोइंग विमानाचे एक सिम्यूलेटर तयार करून ठेवले होते.

विमानकंपन्यांकडे जे फ्लाइट ट्रेनिंग सिम्युलेटर्स असतात त्यात त्या विमानाच्या कॉकपिटची संपूर्ण प्रतिकृती असते. तिथली पॅनेल्स, बटने, जॉयस्टिक्स, लीव्हर्स, इंडिकेटर्स, डिस्प्लेज, रेकॉर्डर्स वगैरे सगळ्या गोष्टी, अगदी वैमानिकांच्या खुर्च्या सुद्धा जशा खर्‍या विमानात असतात तशाच्या तशा तिथे ठेवलेल्या असतात. विमानाचे इंजिन सुरू करणे, त्याचा वेग वाढवणे किंवा कमी करणे, विमानाला आभाळात उंचीवर नेणे किंवा खाली आणणे, त्याला डावीउजवीकडे वळवणे, जमीनीवरून हवेत उड्डाण करणे (टेक ऑफ) आणि आकाशातून खाली धावपट्टीवर उतरवणे (लँडिंग) वगैरे फ्लाइटसंबंधातल्या सगळ्या क्रिया त्या खुर्चीवर बसून करून पाहण्याची सोय असते. आणि प्रत्यक्षातल्या विमानात त्या क्रिया घडत असतांना त्यातल्या पॅनेलवर जे जे काही दिसावे ते सगळे अगदी तसेच आणि त्याच वेगाने, त्याच क्रमाने रियल टाइममध्ये सिम्युलेटरमधल्या पॅनेलवर दिसते. यासाठी खूप काँप्लेक्स इलेक्ट्रॉनिक सर्किट्स तयार करून ठेवलेली असतात. काँप्यूटर प्रोग्रॅम केलेले असतात, विमानाच्या उड्डाणाशी संबंधित असलेली काळ, काम आणि वेगाची सगळी गुंतागुंतीची समीकरणे इलेक्ट्रॉनिकली सोडवली जाऊन त्यानुसार या पॅनेलवर योग्य ती इंडिकेशन्स अचूकपणे मिळत जातात. खर्‍या विमानाच्या वैमानिकाला जी माहिती त्यांच्यामधून मिळत असते ती सगळी या सिम्युलेटरवर बसलेल्याला माणसालाही अगदी तशीच्या तशीच दिसते. ऊन, वारा, वादळ, पाऊस, ढग, धुके वगैरे नैसर्गिक बदल आणि त्यांच्यामुळे होत असलेला हवेच्या दाबातला फरक वगैरेंचे आभास या सिम्युलेटरमध्ये कृत्रिमरीत्या निर्माण करता येतात. त्यांच्यामुळे विमानाच्या हवेमधून उडण्यावर जे परिणाम होतात तेही त्या चालकाला समजतात आणि त्यानुसार योग्य त्या क्रिया करून त्याचे काल्पनिक विमान तो चालक चालवत राहतो. थोडक्यात म्हणजे प्रत्यक्ष विमान न चालवता ते चालवण्याचा सराव सिम्युलेटरवर करता येतो. प्रतिकूल परिस्थितीत किंवा आणीबाणीच्या प्रसंगी काय करायचे आणि त्यामुळे काय होते हे सगळे त्याला ट्रेनिंग सिम्युलेटरवर शिकायला मिळते. त्याने केलेल्या कृतीत काही गफलत झाली, त्याचे काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले तरी त्यामुळे खरोखरचा गंभीर अपघात होण्याचा धोका यात नसतो, पण काय होऊ शकते हे दाखवले जाते आणि त्याची जाणीव मात्र होते.

अशा प्रकारचे फुल स्केल सिम्युलेटर तयार करण्यासाठी त्या विमानाचे भाग मिळायला हवेत, त्यामुळे ते घरी बनवता येणे मला तरी शक्य वाटत नाही. पण काँप्यूटरच्या स्क्रीनवर कॉ़कपिट किंवा विमानाचे चित्र किंवा आराखडा काढून त्याला काँप्यूटर प्रोग्रॅमनुसार गतीमान करता येणे शक्य असते. आजकालच्या काँप्यूटर गेम्समध्ये अनेक प्रकारच्या काल्पनिक मोटारगाड्या, विमाने किंवा रॉकेट्ससुद्धा उडवता येतात. नव्या वैमानिकांचे प्रशिक्षण हा सुद्धा कॅप्टन शाहच्या कामाचा भाग असल्यामुळे त्याला विमानाच्या सिम्युलेटर्सची माहिती असणारच. त्या हुषार गृहस्थाने काँप्यूटर गेम्समधल्या विमानांचा उपयोग करून हा खास सिम्युलेटर तयार केला होता आणि हा त्याचा एक छंद होता म्हणे. पण त्यासाठी खर्‍या विमानाच्या भागांची मॅथेमेटिकल मॉडेल्स लागतील, खेळातल्या विमानांना चालवण्यासाठी तयार केलेले सॉफ्टवेअर मिळायला हवे, त्यात बदल करण्यासाठी लागणारे ज्ञान आणि कौशल्य हवे. हे सगळे त्याने एकट्याने जमवले की यात त्याचे काही साथीदार होते वगैरेंबद्दल कसलीही माहिती बाहेर आली नाही. आपल्या विमानाकडून नेहमीपेक्षा निराळी अशी कोणकोणती कामे करून घेता येतील हे त्याने या सिम्युलेटरचा उपयोग करून ठरवले असणे आणि त्याची प्रॅक्टिसही करून घेतली असणे शक्य आहे. पण हे सगळे नुसते तर्क आहेत. त्याने असा कसलाच रेकॉर्ड त्याच्या काँप्यूटरमध्ये शिल्लक ठेवलेला नव्हता.

त्या विमानाचा बाह्य जगाशी असलेला संपर्क तुटल्यानंतरसुद्धा ते विमान उडत राहिले होते आणि सुमारे तासाभरानंतर मलेशियाच्या पश्चिम किनार्‍यापाशी रडारवर दिसले होते. जर विमानात झालेल्या एकाद्या अपघाताने त्याचा संपर्क थांबला असता, पायलट आणि प्रवासी गतप्राण झाले असते किंवा बेशुद्ध पडले असते तर ते विमान अशा प्रकारे वळणे घेत उडत राहिले नसते. त्या दरम्यानच्या काळात कोणीतरी व्यक्ती नक्कीच ते विमान व्यवस्थितपणे चालवत असणार आणि ती व्यक्ती म्हणजे पायलटच असण्याची जास्त शक्यता होती. त्यानंतरसुद्धा सहा सात तास उपग्रहाकडून येणार्‍या पिंग नावाच्या संदेशाला या विमानाकडून उत्तर मिळत होते, या अर्थी ते बुडालेले किंवा नष्ट झालेले नव्हते. या सगळ्या निरीक्षणांचे सार काढून असे ठरवण्यात आले की मलेशिया सोडल्यानंतर ते विमान दक्षिणेकडे हिंद महासागरावर उडत राहिले असावे आणि अखेरीस (कदाचित त्यातले इंधन संपल्यानंतर किंवा इतर काही कारणामुळे) ते ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला कुठेतरी समुद्रात कोसळून बुडले असावे. मलेशियाच्या सरकारने अशी अधिकृत घोषणा करून नुकसान भरपाई, विम्याची रक्कम, वारसाहक्काची अंमलबजावणी वगैरेंची सोय केली.

असे असले तरी मुळात त्या विमानाने चीनला जाण्याचा मार्ग सोडून दक्षिणेचा रस्ता का धरला? हा प्रश्न शिल्लक राहतोच. जोपर्यंत त्या विमानाचे अवशेष मिळत नाहीत, मुख्य म्हणजे त्यातला ब्लॅक बॉक्स सापडत नाही तोपर्यंत ते नष्ट झाल्याचा कसलाच प्रत्यक्ष पुरावा हाती लागला असे म्हणता येणार नाही. यामुळे प्रवाशांचे नातलग त्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. अजूनसुद्धा ते कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी सुखरूप असतील अशी एक वेडी आशा त्यांना वाटत होती, पण जसजसे दिवस गेले आणि कोणताच नवा सुगावा लागला नाही तसतशी ती शक्यता कमी कमी होत गेली.

हे विमान हरवल्यानंतर अनेक प्रकारच्या अफवा उठल्या होत्या. अमेरिकेचा (यूएसचा) दक्षिण किनारा आणि वेस्ट इंडीजची बेटे यांच्या दरम्यानच्या समुद्रातल्या एका त्रिकोणी भागाला बर्म्यूडा ट्रँगल असे म्हणतात. त्या भागात जबरदस्त ताकत असलेल्या भुताखेतांची वस्ती होती म्हणे. तिथे गेलेली जहाजे बेपत्ता होतातच, त्यांना शोधायला गेलेलेही परत येत नाहीत. अशा प्रकारच्या अफवा एका काळी पसरल्या होत्या. ती भुते काही काळ शांत राहिल्यानंतर आता आशिया खंडात हिंदी महासागराच्या या भागात रहायला आली असावीत आणि हे त्यांचेच काम असावे असे विधान कुणीसे केले असे म्हणतात. ते काम करणारी कोणी भुतेखेते नसून परग्रहावरून आलेली आणि समुद्राखाली असलेल्या पाताळात रहिवास करणारी एलियन्स मंडळी असावीत अशा कल्पना सायन्सफिक्शनची डूब देऊन वक्तवल्या जात होत्या. कदाचित त्यांनीही आपला मुक्काम आशियामध्ये हलवला असेल असे म्हणायला हरकत नाही.

काही परग्रहवासी पाताळात दडून बसलेले असल्याची परीकथा आता तशी जुनी झाली आहे. ते लोक फ्लाइंग सॉसर्समध्ये बसून अवचित पृथ्वीवर येऊन धडकतात आणि तसेच भुर्रकन उडून जाऊन पुन्हा अदृष्य होतात ही कथा त्यापेक्षासुद्धा जुनी असली तरी ती जास्त सुरस आणि जास्त प्रमाणात प्रचलित आहे. अशाच एकाद्या अतिविशालकाय फ्लाइंग सॉसरने मलेशियाच्या अख्ख्या विमानाला आभाळात वरच्या वर गिळंकृत केले असेल आणि आपल्यासोबत त्यालाही ते लोक आपल्या ग्रहावर घेऊन गेले असतील अशी आणखी एक फँटसी पसरवली गेली होती.

विमानात अचानक यांत्रिक बिघाड झाला असावा हा एक सर्वसाधारण तर्क झाला. पण त्यात नेमके काय झाले असेल? या प्रकारच्या विमानात अनेक प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था असतात. एकादा भाग निकामा झाला तरी ते काम करून घेण्याची पर्यायी व्यवस्था असते. एकदा मी प्रवास करत असलेल्या विमानाचे एक इंजिन बंद पडल्यानंतरसुद्धा ते सुरक्षितपणे मुंबईला येऊन पोचले होते. मलेशियाच्या विमानाच्या अपघाताबद्दल असा एक तर्क मांडला गेला होता की विमानाच्या एका चाकाला कदाचित रनवेवरून धावतांनाच झालेल्या घर्षणामुळे आग लागली असेल आणि त्या चाकांना पोटात घेतल्यानंतर ती आग विमानात पसरली असेल, त्यातून निघालेल्या धुरामुळे वैमानिकासकट सगळी माणसे बेशुद्ध पडली असतील किंवा घुसमटून मरून गेली असतील. असा एक अंदाज केला जात होता. पण हे सगळे क्षणार्धात होऊ शकत नाही. वैमानिकांकडे ऑक्सीजन मास्क असतात. त्या दरम्यान वैमानिकाने एसओएस किंवा कसलाच संदेश का पाठवला नाही? साधे गुड नाइट का म्हंटले? धुरामुळे सर्वात आधी संदेशयंत्रणा कशी खराब होईल? असे काही प्रश्न निघतात.

हा अपघात नसून घातपात असला तर तो कोणी घडवून आणला असेल? त्यामागे त्याचा काय उद्देश असेल? याचा काही पत्ता लागत नाही. पुन्हा एकदा वैमानिकाचा विचार केला तर त्याला संदेशयंत्रणा निकामी करणे शक्य आहे, त्यानंतर विमानाची दिशा वळवून त्याला दक्षिणेकडे नेणेही शक्य आहे. पण त्याचे सहाय्यक, हवाई सुंदरी वगैरेंच्या ते लगेच लक्षात यायला हवे. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे बहुतेक प्रवासी झोपले असले तरी त्यातले काही जण तरी नक्कीच जागे असतील. रात्रीच्या अंधारात बाहेर काही दिसत नसले तरी आपले विमान कुठे आहे हे समोर लावलेल्या स्क्रीनवर दाखवत असतात. त्यांना फसवून ते चीनच्याच दिशेने जात असल्याचे दाखवले गेले होते का? यातल्या कुणालाही शंका आली तर तो स्वस्थ कसा बसेल? नक्कीच गोंधळ घालेल, इतर प्रवाशांना ते सांगेल. त्यांना न जुमानता विमानाला भलतीकडे नेणे वैमानिकाला किंवा ज्या कोणी त्याची जागा घेतली असेल त्याला शक्य असेल का?

त्याला हे सगळे शक्य झाले असे जरी समजले तरी मुळात त्या मूळच्या किंवा त्याच्या जागेवर बसलेल्या विमानचालकाने असले भलते सलते करण्याची आवश्यकताच काय होती? त्याला जर आत्महत्याच करायची असली तर त्यासाठी २३८ इतर माणसांची हत्या करण्याची काहीच गरज नव्हती. यापेक्षा सोपे अनेक मार्ग त्याला दिसले असते. त्यातूनही त्याला विमानअपघातातच मरायचे असले तर त्याला ते टेक ऑफनंतर लगेच करता आले असते. त्याने आत्महत्या केली असे न दाखवता तो एक अपघातच होता असे त्याला दाखवायचे असले तर त्यापासून त्याला काय फायदा होता? तो मरून गेल्यानंतर लोक काही का म्हणेनात? त्याने त्याला काय फरक पडणार होता? एका लेखकाने असे सुचवले आहे की त्या विमानाने पार अंटार्क्टिकापर्यंत पोचून तिथे कोसळावे. आता तिथला हिवाळा सुरू झाला असल्याने त्या विमानावर बर्फांचे ढीग जमत जातील आणि ते कायमचे अदृष्य होऊन जाईल. असा विचार केला गेला असावा. पण ते कशासाठी? वैमानिकाच्या ऐवजी त्याचा सहाय्यक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने हे घडवून आणले असले तर तिच्याबद्दलसुद्धा हेच प्रश्न उपस्थित होतात. या शिवाय त्या व्यक्तीकडे हे करण्याइतके कौशल्य असेल का? हा आणखी एक प्रश्न उठतो.

अशी एक शक्यता दिसते की सुरुवातीला वैमानिकाने त्याच्या स्वतःच्या योजनेनुसार किंवा कोणाच्या दडपणाखाली विमानाची दिशा बदलली, कदाचित त्या दुसर्‍या व्यक्तीने हे काम स्वतःही केले असेल. पण त्या वेळी त्यांची जी काही योजना होती ती सफळ होऊ न शकल्याने ते विमान दक्षिणेकडे भरकटत गेले असेल. किंवा कदाचित ते रहस्यमय काम करून झाल्यानंतर विमानाची विल्हेवाट लावली गेली असेल. काही लोकांना अशा शंका आल्या की या विमानातल्या प्रवाशांपैकी कोणी गुप्तहेर असतील, त्यांना काही खतरनाक माहिती किंवा सामुग्री मिळाली असेल, त्यांच्यावर लक्ष ठेवणारे विरुद्ध देशाचे गुप्तहेरसुद्धा त्या विमानात बसलेले असतील. ती माहिती कोणाच्याच हाती लागू नये म्हणून ते विमानच गायब केले गेले असेल. वगैरे वगैरे वगैरे ..... अशा अनेक अफवांचे पीक या काळात आले, अजून त्यात भर पडत आहे. ही आंतरराष्ट्रीय महत्वाची घटना असल्यामुळे जगातल्या सगळ्या मुख्य राष्ट्रांनी त्यात लक्ष घालणे साहजीकच होते. हे विमान बोइंग या अमेरिकन कंपनीने बनवलेले होते, त्यातले बहुसंख्य प्रवासी चिनी नागरिक होते यामुळे या दोन महासत्तांचा या घटनेशी थेट संबंध होता. ही घटना भारतापासून जवळच घडली होती, त्यामुळे विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय विमाने आणि आगबोटी धावून गेल्या. शोध घेण्याच्या जागेचा विस्तार होत गेला त्याप्रमाणे तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या इतर अनेक राष्ट्रांनी त्यात भाग घेतला.

या सगळ्यांच्या प्रयत्नात सुसूत्रता आणणे आवश्यक असते आणि त्यासाठी प्रत्येकाने त्याला मिळालेली किंवा त्याच्याकडे असलेली सर्व माहिती जशीच्या तशी इतरांना देणे अपेक्षित असते. पण तसे केले तर मग त्या देशाची या बाबतीतली क्षमता सर्वांना समजेल तसेच त्यातल्या त्रुटीही समजतील आणि या बाबतीत गोपनीयता राखणे राष्ट्राच्या हिताचे असते. तंत्रज्ञानाच्या कपाटातली काही झुरळेही बाहेर निघणे शक्य असते आणि त्यांना झाकूनच ठेवणे बरे असते. अशा प्रकारच्या कारणांमुळे सगळ्यांनी खुल्या दिलाने अगदी हातात हात घालूनच काम केले असे सांगता येणार नाही. पण एकंदरीत पाहता गेल्या कित्येक वर्षांतली ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पातळीवरची शोध मोहीम आहे असे म्हणता येईल, तरीही तिला अजून म्हणावे तेवढे यश मिळालेले नाही. या घटनेची संपूर्ण आणि विश्वसनीय अशी हकीकत खरेच कधी तरी मिळणार आहे का? कोण जाणे !

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

खूप्पच छान लेख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बेपत्ता मलेशियन विमानाचा शोध कधीही लागणार नाही. कारण ते पृथ्वीवर पडलेच नाही. हे विमान परग्रहवासीयांनी (परग्रहवासीयांनाच मराठीत एलियन्स म्हणतात बरं का!) पळवून नेले आहे. या विमानाचा कोणताही धागादोरा त्यामुळेच सापडत नाही. पृथ्वीवरील इंचभर जागेतील वस्तूही टिपू शकता येईल, एवढ्या उच्च क्षमतेचे उपग्रह आज अमेरिका आणि इतर प्रगत देशांकडे आहेत. या कोणत्याही उपग्रहाला या विमानाचा साधा एक तुकडाही आजपर्यंत शोधता आलेला नाही. मुळात विमानाएवढी मोठी वस्तू अचानक गायब करण्याशी क्षमता असलेले तंत्रज्ञान पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्राकडे नाही. असे तंत्रज्ञान केवळ परग्रहवासियांकडेच असू शकते. या पाश्र्वभूमीवर, हे विमान परग्रहवासियांनी नेले यात कोणतीही शंका उरत नाही.

हे विमान परग्रहवासियांनी नेले आहे, याची माहिती बड्या राष्ट्रांच्या प्रमुखांना एव्हाना मिळालीही असेल. मात्र, नेहमीप्रमाणे ही माहिती कधीही उघड केली जाणार नाही. सर्व प्रगत देशांकडे परग्रहवासियांशी संबंधित गोपनीय विभाग असतो. असा विभाग सुरू करण्याच्या हालचाली भारत सरकारनेही चालविल्या आहेत, अशी वदंता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या प्रतिसादाला 'पॉप्युलर कल्चर' मध्ये एपीक फेल असे म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परग्रहवासी फक्त परीकथांमध्येच असतात याविषयी माझी खात्री आहे. मलेशियाचे विमान हिंद महासागराच्या तळाशी म्हणजे काही किलोमीटर खोलातल्या गाळात जाऊन रुतून बसले असले तर ते सहजासहजी सापडणे अशक्य नसले तरी कठीण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीवरच्या सगळ्याच समुद्रांमध्ये कोट्यावधी टन कचरा गोळा झालेला आहे. त्यातून विमानाच्या तुकड्याच्या संभाव्य आकारांना ओळखणे कठीण असते.
दुसरी अंधुक शक्यता अशी असू शकते की काही अफवांमध्ये सांगितले गेल्याप्रमाणे हे विमान एकाद्या गुप्त स्थळी उतरवले गेले असले आणि मुद्दाम लपवून ठेवले असले तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.

लेखाबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टायरच्या आगीविषयी शक्यता व्यक्त करणार्‍याने असेही म्हटले होते (निळोबांनी त्याचा दुवा दिला होता) की पृथ्वीवरचा प्रत्येक चौरस इंच उपग्रहांद्वारा मॉनिटर होत असतो ही समजूत खरी नाही. विमानाच्या नॉर्मल मार्गावरसुद्धा काही काळ विमान कुठल्याच एटीसीच्या संपर्कात नसू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मॉनिटर होत असला तरी किंवा ह्या संदर्भात विमान इतर काही उपग्रहांनी मॉनिटर केले असल्यास ते उघड करणे राजकीय दृष्ट्या योग्य नसेल(औट ऑफ स्कोप गोष्टींचे मॉनिटरींग) हि शक्यता असु शकेल न?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तशी पण शक्यता त्या लेखात दिली होती. उदाहरणार्थ लष्करी रडारसुद्धा उंचावरून स्मूथली उडणार्‍या विमानांवर लक्ष ठेवत नसतील- जोवर ते विमान संशयास्पद हालचाली करीत नाही तोवर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उदाहरणार्थ लष्करी रडारसुद्धा उंचावरून स्मूथली उडणार्‍या विमानांवर लक्ष ठेवत नसतील- जोवर ते विमान संशयास्पद हालचाली करीत नाही तोवर.

हे लक्ष न ठेवता कळणे कसे शक्य आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला तर वेगळीच शंका येते.

बेपत्ता मलेशियन विमानाचा शोध कधीही लागणार नाही. कारण ते पृथ्वीवरच्या जादूगारांनी (जादूगारांनाच मराठीत विचेस आणि विझर्ड्स म्हणतात बरं का!) पळवून नेले आहे. या विमानाचा कोणताही धागादोरा त्यामुळेच सापडत नाही. पृथ्वीवरील इंचभर जागेतील वस्तूही टिपू शकता येईल, एवढ्या उच्च क्षमतेचे उपग्रह आज अमेरिका आणि इतर प्रगत देशांकडे आहेत. या कोणत्याही उपग्रहाला या विमानाचा साधा एक तुकडाही आजपर्यंत शोधता आलेला नाही. मुळात विमानाएवढी मोठी वस्तू अचानक गायब करण्याशी क्षमता असलेले तंत्रज्ञान पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्राकडे नाही. असे तंत्रज्ञान केवळ जादूगारांकडेच असू शकते. या पाश्र्वभूमीवर, हे विमान जादूगारांनी नेले यात कोणतीही शंका उरत नाही.

हे विमान जादूगारांनी नेले आहे, याची माहिती बड्या राष्ट्रांच्या प्रमुखांना एव्हाना मिळालीही असेल. मात्र, नेहमीप्रमाणे ही माहिती कधीही उघड केली जाणार नाही. सर्व प्रगत देशांकडे जादूगारांशी संबंधित गोपनीय विभाग असतो. असा विभाग सुरू करण्याच्या हालचाली भारत सरकारनेही चालविल्या आहेत, अशी वदंता आहे.

पहा: हॅरी पॉटर आणि हाफ ब्लड प्रिन्स, अध्याय पहिला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson