दोन प्रेमकविता

अर्थातच याही कविता पूर्वप्रकाशित आहेत.

दोन निरनिराळ्या मूड्समधल्या या कविता. संबंध म्हटला तर नाही, म्हटला तर आहे.

***

तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा

'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असावं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

नजरेतली उनाड फुलपा़खरी मिश्किली सहज वाचत जाणारा मित्र
शरीराच्या अनवट वाटांनी अज्ञातातले प्रदेश उलगडत नेणारा प्रियकर
स्वामित्वाच्या रगेल अधिकाराचं उद्धट-आश्वासक आव्हान पुढ्यात फेकणारा शुद्ध नर
आणि भिजल्या नजरेची कोवळीशार जपणूक पावलांखाली अंथरणारा बापही.
ही सगळी नाती रुजत गेली तुझ्या-माझ्यामधल्या मातीत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

तुझ्या स्वप्नील नजरेत बिनदिक्कत हरवून जाताना
तु़झ्या मोहासाठी लालभडक मत्सराशीही रुबरु होत जाताना
निर्लज्ज होऊन तु़झ्या स्पर्शाला साठवताना - आठवताना
तुला कुशीत घेऊन लपवून ठेवावं सगळ्या जगाच्या नजरेपासून
असं आईपण माझ्या गर्भात रुजवत जाताना
बाई आणि आईही जागत गेली माझ्याआत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

आणि आता,
थेट 'शोले'मधल्या त्या सुप्रसिद्ध सीनची आठवण यावी
तशी ही नात्यांची छिन्नविच्छिन्न कलेवरं आपल्या दोघांमध्ये ओळीनं अंथरलेली.
भयचकित हुंदका गोठून राहावा ओठांवर
आणि सगळ्या बेडर उल्हासावर दु:खाची काळीशार सावली धरलेली.
तरीही सगळ्या पडझडीत क्षीणपणे जीव धरून राहावी कोवळी ठकुरायन
तशी एकमेकांबद्दलची ओलसर काळजी अजुनी जीव धरून राहिलेली.
तिचं कसं होणार हा एक यक्षप्रश्न तेवढा उरलेला
आता तुझ्या-माझ्यामधल्या उजाड़ प्रदेशात,
या सगळ्या विध्वंसासकट
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

प्रदेश उजाड खरेच...
पण या आणि अशा अनुभवांना पचवत जाते,
तेव्हाच तर बाई ’आपला’ पुरुष मागू पाहते...
आपसूक मिळून गेलेलं एक कसदार उत्तर.
कसल्याच दु:खांची क्षिती न बाळगता
तुला ’आपलं’ म्हटलं तेव्हा.

'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असतं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

(२९ ऑक्टोबर २००७)

***

पुन्हा या रस्त्यांवरून

शरीराच्या शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
तात्पुरत्या आणि आजन्म,
उष्ण आणि जिवंत गरजांनी भारलेल्या,
विलक्षण खर्‍या,
आज-आत्ताच्या क्षणात पाय घट्ट रुतवून धरणार्‍या,
उद्यामध्ये पूर्ण बहरण्याच्या अनंत शक्यतांची बीजं पोटी घेऊन असणार्‍या.
मान्य.

पण त्यातच आहेत आपल्या बहुमितीय प्रसरणशील होऊ शकणार्‍या
नात्याला चौकटींचे क्रूर संदर्भ देण्याच्या शक्यताही.
उद्या,
शरीरानं शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
टळणार नाहीत.
ही अपरिहार्यता
आणि आश्वासनही.

तोवर जगून घेऊ देत मला
आपल्यामधले अशारीर, निवळशंख क्षण.
कसल्याही सस्पर्श देवाणघेवाणी शक्य नसताना
एकमेकांना उद्देशून हवेवर लिहिल्या गेलेल्या कवितांच्या ओळी.
प्रिय व्यक्तींनी दिलेले सल मिटवून टाकता येतील आपल्या कोवळ्या सुरांनी
अशा भाबड्या आशा बाळगत तळ्याच्या काठावरून सोडून दिलेल्या लकेरी.
टक्क जाग्या रात्री एकमेकांना सोबत करत, लखलखत्या आभाळाकडे पाहत
एकमेकांना सांगितलेल्या सुरस आणि चमत्कारिक, पर्युत्सुक सिनेमास्कोपिक गोष्टी.
शब्दांची, अर्थांची आणि मौनांचीही भाषांतरं.
स्पर्शांच्या तहानेइतकं हे सारंही माझ्या आतड्याचं आहे,
हे तुलाही ठाऊक असेलच
असा अनाकलनीय विश्वास...
जगून घेऊ देत.

पुन्हा या रस्त्यांवरून
आपण चालू न चालू...

(१७ जानेवारी २०१४)

***

4.285715
Your rating: None Average: 4.3 (7 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

आपली कविता

आपली कविता

उत्तम!

दोन्ही कविता जबरी ! मानतो!

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

सप्तरंगी लोलक

"स्त्री-पुरुष" नात्याचा संदर्भ असलेल्या, निर्मम मनाने भोगाव्या अशा या दोन कविता. कौतुक करण्यास शब्द थिटे आहेत. सुंदर शब्दरचनेबरोबरच शृंगार, समर्पण, प्रेम, मोह, मत्सर यांचा सप्तरंगी लोलक श्ब्दाशब्दातून जाणवत रहातो. कल्पनेच्या पंखांबरोबरच वास्तवाचे भान शब्दबद्ध केलेल्या अलवार कविता. खूप आवडल्या.

फार सुंदर

फार सुंदर.
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा प्रचंड आवडली

सोनाली.

सुरेख... दोनही कविता आवडल्या...

सुरेख... दोनही कविता आवडल्या... (स्माईल)

खासकरुन "तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा..."

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

नात्यांची चिकित्सा करण्यात एक

नात्यांची चिकित्सा करण्यात एक फ्रिक्शन असते. नाती जितकी सहज असतील तितकी चांगली.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

बॉर्रं!

बॉर्रं!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एतत्संबंधीचा अजूनेक भारी

एतत्संबंधीचा अजूनेक भारी ड्वायलॉक भागानगरीय चतुर्स्तंभघुमटवासी चलच्चित्रात आहे - ठीके इस्माईलभाई!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

फार सुंदर. "पुन्हा

फार सुंदर. "पुन्हा या रस्त्यावरून" जास्त भावली.

पण त्यातच आहेत आपल्या बहुमितीय प्रसरणशील होऊ शकणार्‍या
नात्याला चौकटींचे क्रूर संदर्भ देण्याच्या शक्यताही.

आणि
एकमेकांना उद्देशून हवेवर लिहिल्या गेलेल्या कवितांच्या ओळी.

हे सहीच.

दुसरी खूप आवडली..

दुसरी खूप आवडली..

कविता फारशा समजत नाहीत; त्यात

कविता फारशा समजत नाहीत; त्यात ह्या प्रेमकविता + जरा हटके पद्धतीने लिहीलेल्या. त्यामुळे दोनतीनदा वाचल्यावर पहिली आवडली. दुसरी अजून परत वाचावी लागेल.

Amazing Amy

पैली मस्त जमली आहे!!! अरुणा

पैली मस्त जमली आहे!!! अरुणा ढेरेंच्या 'पुरुष असाही असतो' चा प्रभाव वाट्टोय का किञ्चित?

दुसरी नाय आवडली.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हम्म ती "अनय" कविता का? मस्तच

हम्म ती "अनय" कविता का? मस्तच आहे ती.

एक आठवलेली कविता

तुझी कविता वाचताना कुसुमाग्रजांची आठवलेली एक कविता

नात्यास आपुल्या नाव देऊ नकोस काही ।
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही ॥

व्यवहार कोविंदांचा होईल रोष होवो ।
व्याख्येतूनच त्यांची प्रद्ण्या वाहात जाई ॥

ना तालराग यांच्या बंधात बांधलेला ।
स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही ॥

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा ।
मंझिलकी जयाची तारांगणात राही ॥

तशाच धाटणीची सोनाली वायकुळ

तशाच धाटणीची सोनाली वायकुळ यांची , माझी अतिशय आवडती कविता - http://www.misalpav.com/node/17033

पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो
यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो
नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात?
आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात?
नाही दिली नावं म्हणून काही अडत का?
आणि फक्त ‘नाव’ कधी मन आपली जोडतं का?
नावांच्या परिघात कोंडतात नाती
नियम तोडायला मग भांडतात नाती
म्हणूनच सांगू का
नात्यांची नावं शोधायची नसतात
नात्यांना नावं ठेवायची नसतात

छान आहे ही कविता; खासकरून तू

छान आहे ही कविता; खासकरून तू इथे दिलेला भाग.
पण 'नात्यांना नावं ठेवायची नसतात' हे 'नाव देणे' या अर्थाने आहे ना? 'नावं ठेवणे' मंजे 'वाईट बोलणे' असा अर्थ होतो. की तोच अर्थ घ्यायचाय?

Amazing Amy

नावं ठेवणं नसून नावाच्या

नावं ठेवणं नसून नावाच्या चौकटीत बांधण्याचा अर्थहीन प्रयत्न/अट्टाहास करणं या अर्थाने वाटले मला.

ह्म्म्म्म

दुसरी कविता मला काय नक्की कळ्ळी नाही. Sad
मात्र निवळशंख हा शब्द बेक्कार आवडला. "बहुमितीय प्रसरणशील" काही झेपलं नाही.

मलाही दुसरी कळली नाही

मलाही दुसरी कळली नाही Sad
बहुमितिय प्रसरणशील मात्र कळलं.
निवळशंख शब्द खासच.

अर्थ समजावून सांगण्याचा

Sad अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं मुळात कविता गंडल्याचंच लक्षण. पण प्रयत्न करते -

जे नातं उद्या कदाचित शरीरसंबंधात परिणत होण्याची शक्यता आहे, अशा नात्याबद्दलची ती कविता आहे. उद्या प्रियकर आणि प्रेयसी आणि पुढे अजूनही काही, अशा रूढ नात्यांत शिरलोच आपण, तर त्यातल्या चौकटी निराळ्या असतील. त्यांचे फायदे-तोटे निराळे. ते असोत किंवा नसोत. आज-आत्ता जे काही आहे, ते मात्र अमोल आहे. ते अनुभवून घेऊ या, असं कवयित्री (कैच्याकै वाटतं हो आपल्याच कवितेबद्दल या टोनमध्ये बोलणं, छ्या!) म्हणते आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वा! सुरेख कल्पना आहे. धन्यवाद

वा! सुरेख कल्पना आहे. धन्यवाद मेघना. त्या चष्म्यातून वाचते.
______________
आहाहा!!! काय सुरेख कल्पना आहे अन आता कविता फिट्ट समजली. अजिबात गंडली नाहीये.

ते असोत किंवा नसोत. आज-आत्ता

ते असोत किंवा नसोत. आज-आत्ता जे काही आहे, ते मात्र अमोल आहे. ते अनुभवून घेऊ या,

.

वक्त का मतलब होता है "अब"
प्यार करना है तो "अब"
हाथ पकडना है तो "अब"
माफी मांगना है तो "अब" ________ सेक्सी सॅम

.

आज-आत्ता = माइंडफुलनेस

आज-आत्ता = माइंडफुलनेस (बुद्धीझम)
छान लिहीलं आहेस गब्बर.

जीयो

पुन्हा या रस्त्यांवरून

कविता वाचत जातो आणि तुम्ही जिंकत जाता!
जीयो जीयो , असाचं लिहीत रहा या शुभेच्छा! (स्माईल)

दुसरी कविता कमाल आहे...

दुसरी कविता कमाल आहे...

आँ?

त्या खणखणीत वादावादी, स्त्री विरुद्ध पुरुष वगैरे नंतर एकदम प्रेमबिम?
थांब वाचतो आधी आनी मग प्रतिसाद टंकतो.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खणखणीत वादावादी करणारे लोक

खणखणीत वादावादी करणारे लोक प्रेम करू शकत नाहीत की काय, आँ?!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पहीली प्रचंड आवडली

पहीली प्रचंड आवडली होती/आहे.
दुसरीही छान आहे.

दुसरी प्रचंड आवडली! पहिलीही

दुसरी प्रचंड आवडली!

पहिलीही ताकदीची कविता आहे, मात्र त्यातील काही वाक्य विशेषत: "स्वामित्वाच्या रगेल अधिकाराचं उद्धट-आश्वासक आव्हान पुढ्यात फेकणारा शुद्ध नर" मधील स्वामित्त्व शब्द जखम करून गेला Sad

एकुणच २००७ ते १४ मध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय तर! (डोळा मारत)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोल! आता तिसरी परवाची कविता

लोल! आता तिसरी परवाची कविता दाखवली तर परत आणिक एक पूल बांधशील की! तारखा एवढ्याकरता लिहिल्या, की 'दोन्हीत काही संबंध आहे का? कोण हा प्रियकर?' छापाचे प्रश्न येऊ नयेत. तर - असो!

स्वामित्वाबद्दलः कायम जरी नाही, तरी काही क्षणांसाठी केलेलं / झालेलं स्वामित्वाचं प्रदर्शन मोहक असतं, असू शकतं आणि त्याचा स्त्रीच्या मुक्त असण्यानसण्याशी काही संबंध नाही, असं मी मानते.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कविता पुन्हा सावकाश, सवडीने

कविता पुन्हा सावकाश, सवडीने वाचेन.

स्वामित्वाबद्दलः कायम जरी नाही, तरी काही क्षणांसाठी केलेलं / झालेलं स्वामित्वाचं प्रदर्शन मोहक असतं, असू शकतं आणि त्याचा स्त्रीच्या मुक्त असण्यानसण्याशी काही संबंध नाही, असं मी मानते.

ललित लेखनाची जशी चिरफाड नको तसं चिरफाड करत समर्थनही नको वाटतं. पण कधीतरी हा विषय निघेल तेव्हा तुझी आठवण होईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तरी काही क्षणांसाठी केलेलं /

तरी काही क्षणांसाठी केलेलं / झालेलं स्वामित्वाचं प्रदर्शन मोहक असतं, असू शकतं आणि त्याचा स्त्रीच्या मुक्त असण्यानसण्याशी काही संबंध नाही,

गुलामीचा आणि मुक्तीचा एकत्र हव्यास हसू आणणारा आहे.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

गुलामीचा आणि मुक्तीचा एकत्र

गुलामीचा आणि मुक्तीचा एकत्र हव्यास हसू आणणारा आहे.

आचरण ग्रे असलं तरी थेरीचा चष्मा बायनरी असल्यास असे प्रश्न येतात. लिखाणात तीच गोष्ट कैच्याकै वाटते आचरणापेक्षा.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

थँक्यू! तुमच्याकडून निंदा,

थँक्यू! तुमच्याकडून निंदा, हाच माझ्या कवितेचा बहुमान!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अणि मी स्तुती केली तर ते काय

अणि मी स्तुती केली तर ते काय आहे?

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

माझ्याकडून चूक झाल्याची

माझ्याकडून चूक झाल्याची खातरी, किंवा तुमचा ढळढळीत खोटेपणा!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन