मी पाहिलेला ऐसी अक्षरे दिवाळी कट्टा
व्यवस्थापकः
मी यांनी केलेल्या पुढिल नेमक्या सुचवणीला नव्या धाग्यात बदलत आहोत. एकानेच वृत्तान्त लिहून एकाच नजरेने कट्ट्याकडे बघण्यापेक्षा अशा प्रकारचा वृत्तान्त वाचायला अधिक मजेशीर असेल असे वाटते. तेव्हा येऊ द्यात तुमच्या शैलीत, तुमच्या शब्दात तुम्ही पाहिलेला ऐसी अक्षरे कट्टा.
=======
कट्टा वृत्तांत कसा द्यावा याबाबत काही चिंतन -
१. क्राऊड सोर्सिंगच्या धर्तीवर सगळ्यांनी मिळून वृत्तांत द्यावा, सगळ्यांचे परिप्रेक्ष्य... किमान आणि कमाल एक-एक परिच्छेद आला तरी चालेल.
२. फोटोंना खुमासदार कॅप्शन्स सुचवाव्यात.
-------
पूर्ण वेळ मी कट्ट्याला नसल्याने वृत्तांत देण्यासाठी इतरांना विनंती करतो, पण फोटोंची लिकं आणि एक प्रातिनिधिक फोटो इथे डकवत आहे. कट्टा वृत्तांत धाग्यावर सगळे फोटो टाकता येतील.
टीप १ - सगळ्यांचेच फोटो काढण्यात मला यश आले नाही, तेंव्हा त्याबद्दल दिलगीर आहे.
टीप २ - सगळ्याच फोटोंचा दर्जा उत्तम राखण्यातही मला यश आले नाही त्याबद्दलही दिलगीर आहे.
टीप ३ - ज्या लोकांना शब्दात पकडता येत नाही, त्यांना कॅमेरातही पकडणे अवघड झाले आहे (सुज्ञास अधिक सांगणे नलगे वगैरे).
धन्यवाद
मजा आ गया
इतक्या सगळ्या ऐअकरांनी माझ्या अकस्मात आमंत्रणाला मान देउन माझ्या गरीबखान्याची शोभा वाढवल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.
वाडेश्वरमधुन ठरल्याप्रमाणे घरी न येता मधुनच फरारी झालेल्यांचे विशेष आभार.
अगदी ऐनवेळेस ठरल्यामुळे मनाजोगता पाहुणचार करता आला नाही याची रुखरुख वाटते आहे.
फोटो टाका आता ज्यांनी काढले असतील त्यांनी....
वाहत येईल पूर अनावर...
वाहत येईल पूर अनावर...
साधारण १०:४० च्या दरम्यान मी रणभूमीवर पोहोचलो. तोपर्यंत टिंकू, सविता, "मी", अनुप ढेरे इ. प्रभृती पोहोचलेलेच होते. अनुप से गले मिलनेकी अनेक दिवसांची माझी ख्वाहिश मी आज पुरी करून घेतली. तेवढ्यात अशी माहीती मिळाली की ... आत सलील व परचुरे साहेब रेस्तरॉ मधे बसून "च्या" पित होते. हे दोघे ऐसी वर वाचनमात्र असतात व यांचा ऐसी वर आयडी नाही - हे मला आजच समजले. ते त्यांचा यज्ञ संपवून बाहेर आलेच. आणि भेटल्यावर मिश्कीली सुरु व्हायला पाच सेकंद सुद्धा लागली नाहीत. तेवढ्यात रमताराम आला. माझ्या जिवात जीव आला. मनोबा आला व पाठोपाठ मिहिर पण आला. बहारोंको चमन याद आया. मनोबा ने निषेधात्मक लाल रंगाचा टी शर्ट का घातला होता ते मला अजुनही कळलेले नाही. आणि मग टेबल मिळवण्याबद्दल मागणी जोर धरू लागली. आणि हां हां म्हणता ... टेबल मिळालेही. मग ३ टेबले एकत्र जोडून घेऊन त्यातल्या साधारण मध्यभागातील एका खुर्चीवर मी बसलो. व सलीलदा शेजारीच "उजव्या" बाजूस बसले. समोर मनोबा ("लाल" बावटा घेऊन), व "डाव्या" बाजूला अमुक बसलेला. माझ्या उजवीकडे पलिकडे टिंकू, तिच्यासमोर सविता आसनस्थ. इकडे डावीकडे परचुरे साहेब व समोर दस्तुरखुद्द रमताराम. तेवढ्यात अर्धवट येऊन अगदी समोरच बसला. अर्ध्या व मनोबा यांच्या मधे "मी" बसला होता. फोटो काढण्यासाठी दणकट क्यामेरा घेऊन आलेला ... हाच तो. परचुरे सायबांनी त्यांचा कवितासंग्रह (वनाचे श्लोक) पेश केला. तो चाळताना अनेक जण तरुवेलींच्या ... गर्दझुल्यात पोहोचले ही असतील.
--
ये रे घना ये रे घना .... इडल्या वाढ दणादणा....
खायला काय मागवायचे याबद्दल एक परिसंवाद सुरु झाला. अध्यक्षस्थानी कोणीही नव्हते. प्रत्येकाने आपापल्या आवडी नुसार.... पण बहुतेकांनी इडली किंवा इडली+वडा मागवला. व वेटर ने हे सगळे प्रकार चांगल्यापैकी चटकन आमच्या पुढे आणून ठेवले. (माझ्यासारखे) काही जण तुटुन पडले तर काही जण आस्ते आस्ते आस्वाद घेऊन राहीले होते. प्यायला काय मागवायचे याबद्दल मात्र अनेक मतप्रवाह होते. कोणाला सोडा तर कोणाला चहा, तर कोणाला कॉफी असा माहौल होता. थोडक्यात काय ... फन्ना उडवला. इडल्या खाताखाता "सरकार आवश्यक आहे का?" किंवा "सरकार कसे आवश्यक आहे?" किंवा "प्राईस सिस्टिम ही सरकारला परफेक्ट सब्स्टिट्युट म्हणून काम करू शकते का ?" याबद्दल माझा व अर्ध्याचा एक छोटेखानी विवाद झाला. जिझिया कर हा चांगल्यापैकी समर्थनीय प्रकार आहे असा मुद्दा मी मांडला (मनोबा च्या प्रश्नास उत्तर म्हणून) ... बाकीची चर्चा काय झाली ते इतरांकडूनच ऐका.
--
तू कौन है ... तेरा नाम है क्या...
मग एका पाठोपाठ एक बिका, उत्पल, घनु, सिफर, मेघना, केतकी, अंतरानंद (क्रमवारी चुकली असेल) ही मंडळी आली. नंतर एक ओळखपरेड झाली. प्रत्येकाने उठुन नाव सांगायचे व आयडी सुद्धा सांगायचा. नंतर ऋ आला. व तदनंतर चिजं आले. मयुरेश प्रभुणे सुद्धा हजेरी लावून राहिले होते. हे मटा मधे सायन्स रिपोर्टर आहेत. पुन्हा ओळखपरेड झाली. तेवढ्यात ब्याट्या आला. मग डोसे व कॉफी चा एक मर्यादित राऊंड झाला. याच दरम्यान अमृतवल्ली मॅडम आल्या.
--
इथं नको तिथं जाऊ...
इतकं होईपर्यंत साडेबारा वाजत आलेले होते. हॉटेलासमोर वेटिंग वाल्यांची रांग लागलेली होती. त्यामुळे आम्ही तिथुन निघण्याच्य दृष्टीने विचार करणे संयुक्तिक होते. अर्धवट ने प्रस्ताव असा ठेवला की त्याच्या घरी एक मोठ्ठा हॉल आहे व तिथे पार्टी कंटिन्यू होऊ शकते. जवळपास सगळ्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने पार्टी तिकडे चालू राहणार हे सुनिश्चित झाले.
(काही जणांची नावे माझ्याहातून राहीलेली असतील. पण त्यांना वगळण्याचा हेतू नाही.)
पुण्यातल्या जाहीर कट्ट्याचा जाहीर वृत्तान्त
जाहीर कट्ट्याचं ठिकाण वाडेश्वरी ठरलेलं असलं, तरी वहुमानमधल्या चीज ऑम्लेटचा मोह न सुटल्यामुळे मी आणि अंतरा आनंद पुण्यात भल्या पहाटे साडेआठला पोचलो. ऋचं कलत्र, लाजलेल्या सईबाईसाहेब, मी आणि अंतरा आनंद नावाच्या नव्या सदस्या असे आम्ही वहुमानी गेलो, तेव्हा दाराशीच बुभुक्षितांची रेटारेटी चालली होती. मी हताश झाले होते खरं तर. पण तेवढ्यात ’गांधी हॉस्पिटल’शेजारचं (जहांगीर हॉस्पिटलचं इतकं संस्कृतायझेशन करणं हा अमुकवरचा नवा नमोप्रभाव असावा.) वहुमान शोधणारा अमुक तिथे येऊन पोचला. (रेल्वेनं येणं सोईचं ठरेल असं ठरल्याचं त्यानं मला फोनवरच्या चौकशीत भासवलं होतं. पण प्रत्यक्षात एक्स्प्रेस वेवरच्या फूड मॉलात तो गोंधळून फिरताना दिसला आणि मी एष्टीतून खच्चून जोरात ’अऽऽऽमोल’ अशी हाक मारताच अजूनच भंजाळला. मग युनिव्हर्सिटी, चांदणी चौक, की स्टेशन ही त्याची विनम्ब्र विचारणा डायवरसाहेबांनी उडवून लावली ("नंतर काय त्ये इचारा!"). तो बिचारा पोचल्यावरही त्याच धक्क्यात होता. त्यामुळे) त्याला पिळण्यात भुकेचा थोडा विसर पडला. केतकी-सिफर-घनू हेही लोक तिथे आल्यावर रेटारेटीला बळ (आणि वजन) मिळालं आणि आम्ही आत घुसलो. तिकडे वाडेश्वरी लोक पोचून जागा पकडते झाले, तरी आमचं चीज ऑम्लेट काही येईना. ते साधारण पाऊण तासानं आलं आणि त्याचं आम्ही चीज केलं.
मग ऋच्या कुटुंबसंस्थेनं कल्टी मारली आणि आम्ही वाडेश्वराकडे मोर्चा वळवला. मनोबा, टिंकू, सविता, सलिल (लि र्हस्व), हर्ष परचुरे (यांचा आयडी नाही. पण अमुकराव दिसल्या दिसल्या त्यांनी थेट अमुकरावांच्या पायांवर डोकं टेकलं, तेव्हा भंजाळण्याची पाळी आमची होती. अमुकरावांच्या या पैलूची खोलवर चौकशी करण्याचं नोंदून ठेवत आत शिरलो.), मिहिर (याला मी ओळखलंच नाही. साहेबांनी घरचं वास्तव्य चांगलंच अंगी लावून घेतलंय) गब्बर, रमताराम, अर्धवट, मयुरेश प्रभुणे (मटारी पत्रकार. आयडी अगदीच ताजा आहे.), मयुरेश कण्णूर (आयबीपी माझा - आयडी नाही. बादवे - ओळख करून देताना ’आयडी’ नाहीतर ’आयडी नसल्याची कबुली’ देण्याची सवय लोकांनी तत्काळ अंगी बाणवून घेतली), मी (कॅमेर्यासकट), बिपिन कार्यकर्ते... ही मंडळी आधीच आली होती. त्या टेबलावर अत्याचार करून जागा करून घेण्यात काही मिनिटं खर्ची पडली. जिझिया कर - प्राइसिंग सिस्टीम - इडली मळगापोडी - वनाचे श्लोक - मटारी मराठी - मनोबाचे गट्स (कोण ते, कोण यावर खवचटासारखं खिक् करून हसलं?) असे काहीच्या काही सैरावैरा शब्द ऐकू येत होते. मग उत्पल (येस, दिवाळी टू दिवाळी) आणि मागाहून च-ह-क्क-ह चिंतातुर जंतू ही वजनदार (जालीय आणि/किंवा प्रत्यक्ष वजनदार) मंडळी प्रवेशली आणि कोरम भरला. पुन्हा एक ओळखीची राउंड होतेय, तो उशिरा उठलेल्या बॅट्या आणि मागाहून अमृतवल्ली आणि सिद्धार्ध राजहंस ही मंडळी आली आणि वेटर्सनी शरणागती पत्करून त्यांना उभंच राहायची विनंती केली. इडल्या, कॉफ्या, कोकम सोडे आणि अंदाधुंद गप्पा होत होत्या, तेव्हा अर्धवट यांनी त्यांच्या घरी यायचं आमंत्रण दिलं. "आम्ही खरंच येऊ हां!" अशी धमकी दिल्यावरही ते कायम राहिलं, तेव्हा बिलं चुकवणं, फोटो, उत्पलच्या कवितासंग्रहावर त्याची सही, सही घेताना फोटो (असा एक फोटो ऐसीच्या कट्ट्याला कंपल्सरी असतो. संदर्भासाठी जिज्ञासूंनी पाहा : पुणे कट्टा आणि ठाणे कट्टा यांचे वृत्तान्त), बाहेर वाडेश्वरच्या दारात ग्रुप फोटो (फोटोची जबाबदारी मी यांनी पेलली होती, हे इथे साभार नोंदलं पाहिजे), कोल्हटकरांच्या ’त्या’ खोलीची यथाशक्ती पाहणी... असं आटपून आम्ही अर्धवट यांच्या घरावर हल्ला केला; तेव्हा काही चिंतातुर, वजनदार आणि इतर मंडळींनी कल्टी मारण्याची संधी साधून घेतली.
अर्धवटरावांच्या सुरेख, शांत आणि प्रशस्त हॉलला आम्ही काही मिनिटांतच एखाद्या फलाटाची अवकळा आणली हे सांगणे न लगे. पुन्हा एकदा पोळीभाजीच्या गुंडाळ्या ऑरडरणे, जाण्याच्या घाईत दारात सुमारे पाऊण तास गप्पा मारून बर्याच सदस्यांना बाहेर उभं ठेवणार्या गब्बरला हाकलणे, अमृतवल्ली यांच्याकडून त्यांची मणिकर्णिका यांच्या ब्लॉगवर आधारित शॉर्टफिल्म आणवणे, ती पाहणे, त्यावर चर्चा, बिलांची वसुली.... हे सगळं यथासांग झालं तेव्हा घड्याळ चाराकडे कललं होतं. बॅट्या आणि कार्यकर्ते यांच्या इराण, हलाल, झटका, शिया-सुन्नी, सातवाहन... असे काहीच्या काही दुहेरी विषय रंगले होते. गाळीव नसलेल्या इतिहासात फार रस नसल्यामुळे आणि चहाची उणीव जाणवत असल्यामुळे अस्मादिकांनी जांभया आवरत पुन्हा एकदा लोकांना टपरीकडे चालवलं - तेव्हाही पुढच्या कट्ट्यांचे वायदे करत मेंबरांनी अर्धवट यांच्या परिसरातली शांतता डहुळवलीच.
मुंबईकरांना परतायचं असल्यामुळे कट्टा जऽऽरा लवकर संपला हे खरं. पण पुण्यातल्या उर्वरित मेंबरांनी वेताळ टेकडीकडे मोर्चा वळवून श्रीराम लागू यांचं दर्शन घेतल्याची वदंता आहे. त्यांनी वरच्या वृत्तान्तातल्या गाळलेल्या जागा आणि नंतरच्या उपकट्ट्याबद्दल लिहावं ही विनंती...
हा हा हा ... ही ही ही...खो खो खो...ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
परंपरेप्रमाणे ऐसीच्या कट्ट्याला येऊन परंपरेप्रमाणे धन्य धन्य झाले.
==
कट्ट्यावर असताना कानावर पडलेली काही अवतरणे देतोय.
"आता अजून एक सदस्य आला तर त्याला समोरच्या खिडकीमागे उभे करून 'मखरातला गणपती' करूया" (मग सगळे "ख्यॅ ख्यॅ ख्यॅ")
--
"अच्छा तुम्ही खरंच चित्रकार आहात?" (मग सगळे "ख्यॅ ख्यॅ ख्यॅ")
--
"त्या भाषेला आम्ही मटारी मराठी म्हणतो"(मग सगळे "हा हा हा")
--
एक दयार्द्र कटाक्ष टाकत "तो ना तो विज्ञानात कैतरी करत असतो त्यामुळे आम्ही फार खोलात नै शिरलो" (मग सगळे "ख्यॅ ख्यॅ ख्यॅ")
--
"तु ना? तु फारच उंच असशील असे मला वाटले होते" (मग सगळे "हा हा हा")
--
"तुमचा आकार कितीही बारीक असला तरी खुर्च्यांचा आकार तितकाच असल्याने अधिक व्यक्ती मावणे शक्य नाही." (मग सगळे "ख्यॅ ख्यॅ ख्यॅ")
--
"मी सध्या नवा लेखक असल्याने नक्की सही देताना काय लिहावं याचा विचार करतोय" (मग सगळे "हा हा हा")
--
"हा हा हा"
--
"ही ही ही"
--
"खो खो खो"
--
"ख्यॅ ख्यॅ ख्यॅ"
आणि मग नंतर नंतर निव्वळ "हा हा हा ... ही ही ही...खो खो खो...ख्यॅ ख्यॅ ख्यॅ" हेच कानात घुमत होते!
हाय रे दुर्दैवा
आम्ही कट्ट्याच्या वेळी वाडेश्वरसमोर असूनही कट्ट्याला येऊ शकलो नाही. आम्ही फक्त कट्टेकरी मंडळी वाडेश्वरात आणि तिथून बाहेर जाताना पाहिली. आमच्या काही दोस्तांना अचानक आमची आठवण आली आणि त्यांनी आम्हांस भेटावयास पाचारण केले. सबब, कट्ट्याला येऊ न शकल्याने अपार खिन्नता आलेली आहे. :(
लेखातल्या फोटोत बहुतेक जण आपण
लेखातल्या फोटोत बहुतेक जण आपण त्या गावचेच नाही अशा प्रकारे का बघत आहेत? खरं तर मेघना त्या गावची नाही, पण ती बघा कशी ठणकावून बघते आहे! तसा ऋषिकेशही आपल्या गावाशी (म्हणजे सुपरअर्बशी) इमान राखून आहे. पण बाकीचे 'मी ह्यांच्याबरोबर नाय ब्वॉ' अशा थाटात आहेत. वृत्तांतात तर मारे खो खो खो हसल्याचं लिहिलं आहे. पण आता मला हे लोक कट्टा वगैरे काही न करता फोटोपुरतेच अचानक गाठ पडल्यासारखे वाटताहेत.
लोकहो, असा कट्टा झालाच नाही! (कोणी कोल्ह्याला द्राक्षं आंबट म्हटलं तर म्हणो बापडा. द्राक्षं सोडून तो तुमच्या उसाला लागंल तेव्हा कळेल.)
मेघना, बॅटू, बि.का. मिहीर
मेघना, बॅटू, बि.का. मिहीर ओळखू आले. बाकीच्यांची ओ.प. व्हावी.
मध्यभागातील एका खुर्चीवर मी बसलो. व सलीलदा शेजारीच "उजव्या" बाजूस बसले. समोर मनोबा ("लाल" बावटा घेऊन), व "डाव्या" बाजूला अमुक बसलेला. माझ्या उजवीकडे पलिकडे टिंकू, तिच्यासमोर सविता आसनस्थ. इकडे डावीकडे परचुरे साहेब व समोर दस्तुरखुद्द रमताराम.
असं लिहीलंय आणि फटू नाही..
णिषेढ!
ओ. प. करण्यासारखा फोटूच नाहीय
ओ. प. करण्यासारखा फोटूच नाहीय २५ २६ जणांचा एकत्र! तरी इथे जे फोटो टाकलेत त्यात कोणकोण आहे सांगते.
मूळ धाग्यातल्या फोटोत डावीकडून अंतराआनंद, मिहिर, ऋ, मेघना, बिका, सलिल, अमुक, चिंजं, उत्पल.
बिकांनी टाकलेल्या फोटोंमधे पहिल्यात आहे तो उत्पल (त्याच्या मागचा तो पोनीवाला... त्याला बोलवायला हवे होते ऐसीवर... सुस्कारा...)
दुसर्या फोटोत दरवाज्याकडून घड्याळाप्रमाणे
जमीनीवरचे: मनोबा, ब्याट, केतकी, सिफ़र, अंतराआनंद, सलिल, रमताराम, अर्धवट, मेघना.
खुर्चीवरचे: अमुक, टिंकू, सविता, ऋ, अमृतवल्ली.
अंतराआनंद यांचा पहिला कट्टा
अंतराआनंद यांचा पहिला कट्टा असावा ... अमुक त्या बाबतीत कधीच जुना झाला. अमेरिकेत तो भल्या भल्या लिहित्या आणि न लिहित्या ऐसीकरांना भेटला आहे. 'गे प्राईड' कट्टा झाला तेव्हाही तो होता ... अर्थात तिथे मी आणि धनंजय असल्यामुळे तिसऱ्या माणसाला बोलायची संधी कितीशी मिळणार. आणि त्यात तो अमुक.
माझ्यासारख्या अत्यंत शांत (अन
माझ्यासारख्या अत्यंत शांत (अन अबोल) व्यक्तीपेक्षाही अमुकराव शांत आहेत.
=)) ते एक असोच.
परंतु दुसर्या दिवशी पंच पंच उषःकाली अमुकरावांनी आपले मौन सोडले आणि आपल्या कामाची माहिती आम्हां पामरांना कळेल अशा सोप्या भाषेत सांगायला सुरुवात केली. एखाद्या पिच्चरच्या प्रिंटचा आवाज कितीही वाढवला तरी कमीच असतो, तसा काहीसा आवाज असूनही लोक एकदम शांतता राखून होते. रात्रभरच्या चर्चेनंतर आम्ही तेव्हा अर्धवट झोपेत असल्याने सगळं काही समजलं नाही, पण धातू-वितळणे-संयोग-इलेक्ट्रिसिटी असे शब्दसमुच्चय आठवताहेत.
वृत्तांत
मौजमजेच्या प्रकारात धागा काढावा आणि लोकांनी 'वा, मजा आली!' असं म्हणावं असा कट्टा झाला, पण हि सुरुवात म्हणुन छान झाली, गब्बरने शोलेमधे अमिताभला खाल्ला होता हि सल आजही अमिताभला जाणवते असे जाणकार म्ह्णतात, इथे गब्बरने मात्र वाडेश्वरचा जवळपास सगळाच कट्टा हायज्याक केला होता, इथे गब्बरच्या डावीकडे बसलेली आणि डावी मंडळी मात्र ऑलमोस्ट ह्या कट्ट्याशी आपला संबंध नसल्यासारखी बसली होती.
वेगळं काय तर, एरवी वाचनमात्र असलेले सलिल आणि अर्धवट'राव' हि मंडळी कमालीची व्होकल निघाली, आणि कट्ट्याला अशी माणसं जास्त हवी अशी खुण बांधून घेतली. हि माणसं बहुदा आयडींपेक्षा खर्याखुर्या माणसांमधे जास्त रमत असावीत.
अर्धवट ह्यांनी त्यांच्या टुमदार घरात सगळ्यांना ओसरी आणि हॉल दोन्ही दिला(इथे 'दिली' किंवा 'दिला' ह्याचा निकाल राजेश/धनंजय ह्यांना विचारुन देईन), रमताराम मात्र त्यांचा बहुमूल्य वेळ अर्धवट ह्यांच्या लहान मुलास देऊन ते समाजवादी नसल्याचे सिद्ध करण्यात घालवला, (किंवा बाकीचे कसे फडतूस आहेत हे त्यांना सांगायचे असावे..).
मनोबाने घातलेल्या टिची समिक्षा चिंतातूर जंतू आणि गब्बरनेही केली त्यावरुन तो टि केवढा अनवट(पोस्टमॉडर्न) होता हे माझ्या लक्षात आलं. मनोबा प्रश्नार्थक चिन्ह घेऊन उभा होताच, पण माझ्या आयडीबद्दल असलेली जुनी तक्रार त्याने पुन्हा केली "'मी'नालायक आहे वगैरे...असं म्हणता येत नाही" त्याचा हा मॉडेस्टपणा मला भावला.
गब्बर तंबाखु खात नाही पण बोलताना पण बर्याच लिंका देतो आणि त्या नेहमीप्रमाणे वरुन जातात, त्याच्यामुळे अनेकांना भांडवलवाद म्हणावा तेवढा वाईट नाही असं वाटायला लागलं आहे.
मिहिर(होउ घातलेला) आणि अमुक हे दोघे फिजिशिष्ठ आहेत एवढचं कळलं त्यामुळे घाबरुन फार बोललो नाही, परत ह्यावर तुमच्याशी चर्चा करायची आहे असं माफक म्हणायचा प्रयत्न केला, 'बिका'पण जवळपास प्रत्येकाला हे म्हणत होता.
कट्ट्याच्या आधी व्यनितून सुरु झालेला 'पिंक' शर्टाचा मुद्दा (टिंकुने मांडल्यावर) ऋषिकेशने घातलेला वांगी कलरचा शर्ट कसा पिंक आहे किंवा नाही ते बिकांकडे ३ पिंक शर्ट आहेत वगैरे आणि फिरत शेवटी परुषांना रंगच कसे कळत नाही असा संपला.
मयुरेश वगैरे पत्रकारमंडळींनी ह्या घटनेची दखल घेतली असुन, ते गंभीररित्या कट्ट्याकडे पहात असल्याचे जाणवले, त्यांना त्यांच्या आजुबाजुला बसलेल्या (रमताराम, उत्पल, जंतु) थोरांनी कट्ट्यामागचे अनेक सामाजिक, वैचारीक आणि साहित्यिक अंतर्विरोध एक रोचक परिप्रेक्ष्य कसा निर्माण करतात ह्याबद्दल सांगितले असावे असे नंतर त्यांच्या चेहर्याकडे बघुन वाटत होते, त्यांनी नंतर वेटरकडे पाचक वगैरे मिळते का असे विचारल्याचेही ऐकल्यासारखे वाटते.
वैयक्तिकरित्या, मला मेघना, अमुक, अंतराआनंद, घनु, अनुप, मिहिर आणि इतर काही लोकांशी अधिक बोलता आलं ह्याचं वाईट वाटतं आहे, त्यामुळे छोटे गप्पा जास्त असणारे कट्टे परत व्हावेत ह्या आशेत 'मी' आहे.
ह्या लोकांना कुठल्याही शब्दात पकडणं गुन्हा आहे, त्यामुळे मी फक्त काही फोटोत त्यांची एखादीच बाजु पकडण्याचा प्रयत्न करुन अर्थनिर्णयन प्रत्येकाच्या परिप्रेक्ष्यावर सोडून दिले आहे.
सिद्धार्थ राजहंस, अमृतवल्ली ह्यांच्याशीही गप्पा मारता आल्या नाहीत, परत कधी मारुयात असे ठरवले आहे.
कोल्हटकरांच्या त्या खोलीविषयी म्हणायचं तर दर्शनी भागात खोली दिसत नाही, मागच्या बाजुस मात्रा बाहेरुन दगडी दिसणारी अशी एक खोली वरच्या मजल्यावर दिसत होती, त्याची अधिक चौकशी मात्र आम्ही केली नाही, त्यासाठी नविबाजु हवे होते असे मला वाटले, पुढच्या माझ्या वाडेश्वराच्या ट्रिपला मात्र मी माहिती काढेन.
बरिच मंडळी मात्र असायला हवी होती असं मला वाटलं, त्यात - राजेश, सोकरजी, गवि, राधिका, थत्ते असते तर अजुन मजा आली असती. आणि हो अरुण जोशींच्या गायब होण्यामुळे बरेच लोक हळहळले, ते परत यावेत ह्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळते.
फोटो सगळ्यांनी बघा, अजुन १ दिवस ते सामाजिक अवकाशात उपलब्ध असतील नंतर ते मात्र मागणीनुसार-पुरवठा तत्त्वावर उपलब्ध होतील ह्याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.
पुढचा कट्टा अजुन चांगला व्हावा हि कट्टेश्वरीच्या चरणी विनंती करतो आणि रजा घेतो.
तुमचं मनही तुमच्या
तुमचं मनही तुमच्या बायसेप्सप्रमाणे मोठं करुन दिलगीरी मान्य करावी.
:D
त्यात वाडेश्वरला येण्याआधी नुकताच वहुमन ला अशक्य लोणी चापून आलो होतो म्हणून जरा अजूनच, यू नो ... आणि म्हणूनच अर्धवटरावां कडे येण्याचे टाळले, म्हंटलं आपल्यामुळे इतरांना बसायला अडचण नको ;) (पण त्यांच्या प्रशस्त हॉल चे फोटे पाहिल्यानंतर, मी सहज कुठेतरी मावून गेले असतो असे वाटले ;)).
वेल, फोटो एकदम झकास आहेत सगळे, पोर्ट्रेटस तर उत्तमच (मी लगेच व्हॉट्स अॅप वर तुम्ही काढलेला माझा फोटो प्रोफाईल पिक म्हणून अपडेटवला आहे :) )
आणि हो अरुण जोशींच्या गायब
आणि हो अरुण जोशींच्या गायब होण्यामुळे बरेच लोक हळहळले, ते परत यावेत ह्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळते.
आता मी परत आलो आहे. आशा आहे कि लोकांची एक प्रकारची हळहळ कमी होऊन दुसर्या प्रकारची हळहळ चालू होईल. (गेला होता तेच बरं होतं. इ इ ) ;)
काय राव, लोक सासरी जाऊ देईनात आरामात महिनाभर.
कॉलेजमध्येही कट्टाभक्ती कधी
कॉलेजमध्येही कट्टाभक्ती कधी केली नसल्याने कट्टा या प्रकाराबद्द्ल प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे शब्दश: मजल-दरमजल करत मी मेघनाबरोबर कट्ट्याला आले.
(१)लिखाण, प्रतिक्रिया वैगेरे वाचून आणि आयडी वरून ज्या कल्पना केलेल्या असतात त्याला जागणारे आणि न जागणारे ही भेटले.
(२) मेघना, मन हे मी कल्पना केल्याप्रमाणे तर गब्बर (सगळ्यांनी वर लिहीलं आहेच), बॅट्मन ( उंच नसलेला) हे माझ्या कल्पनेत न बसणारे. ‘मन’, पाठीचं प्रश्नचिन्ह करून बोलत असावा असं का कोण जाणे मला वाटायचं. आणि तो खरचं तसा होता. मेघना आणि मी एकत्र प्रवास केला पण अगदी मोजकं बोललो त्यामुळे तिच्याबद्द्लचा माझा अंदाज चुकतो की काय असं वाटलं होतं पण कट्ट्यावरची तिचं बोलणं ऐकून माझा अंदाज फारसा चुकीचा नव्ह्ता हे जाणवलं. रमताराम आणि बिका यांच्यात मी गोंधळ करत होते. लिखाण आणि प्रतिसादासारखाच समंजस वाटणारा ऋषीकेश. `चिंता करितो....’ चा अविर्भाव आणणारे चिंज ( खरोखरचा चेहरा चिंता करणारा नाही; तर हा माणूस खाण्याऐवजी माहिती,वाचन यावर जगत असेल काय ? अशी बाकीच्यांना चिंता करायला लावणारा आहे.)
(३) बाकी मजा आली. गेल्या काही वर्षात दंगामस्ती करणे, ओळखी करणॆ वैगेरे प्रकार विसरल्याने मी फारसं बोलले नाही पण बोलणं enjoy केलं. मात्र एखाद्याशी त्याचा आय-डी कुठ्ला असावा हे आठवून बोलायला जाईपर्यंत त्याचा ताबा कोणीतरी घेतलेला असायचा.
(४) अर्धवटरावांचे आभार. त्यांच्या प्रशस्त घरात कट्टा अजून खुलला होता. @ ’मी’ सुरेख फोटो काढलेत.
(५) एका शब्दात सांगायचं तर ’रिफ्रेशिंग’ प्रकार होता. ’ऐसी’करांकडे आनंदी माणसाचा सदरा आहे हे जाणवलं . तो मिळवायचा असेल तर कट्ट्याला हजेरी लावणे+बोलणे+विचारणे+मुलाखतीला उत्तरे देणे (@मनोबा)मस्ट आहे याची खुणगाठ बांधली आहे.
मजा आया
सालं दंगा घालायला आम्ही पैले हजर असतो. पण जन्ता तशी मिळायला हवी. नायतर सर्वोदयींच्या शिबीरात वात्स्यायन शिकवल्याचा फील यायचा. पण हिते आपल्या सारखी ड्याम्बिस माणसं पण भेटली. मुख्य म्हणजे आमचा जुना मित्र सलिल अनेक वर्षांनी सापडला. समवयस्क म्हातारे मित्र वगळले तर बहुतेक सार्यांनाच प्रथमच भेटलो होतो. सार्यांनी 'सर' म्हणायला सुरुवात केली तर काय आफत येईल या चिंतेत होतो. सुदैवाने मंडळी अपेक्षेहुन बरीच बरी निघाली* (*श्रेयअव्हेर: अर्धवट)
भांडवलदार लोक मार्केटिंग मधे तरबेज असल्याचे प्रत्यंतर गब्बरने पुन्हा एकवार दिले. बर्याच लोकांना प्रथमच भेटत असल्याने फर्स्ट इम्प्रेशन चांगले होईल याची व्यवस्थित काळजी त्याने घेतली. ;) शोकेसमधले आणि प्रत्यक्षात मिळणारे प्रॉडक्ट यात नेहेमी फरक असतो हे विसरू नका रे पोरांनो. (मला प्रायवेट नसलेल्या एखाद्या सिकुरिटी एजन्सीचा पत्ता देता का कोणी?) सलिलला त्याच्या 'शेंडीचे रहस्य' विचारायचे राहूनच गेले. यापूर्वी आम्ही भेटलो तेव्हा बरा होता हा माणूस. मनोबा हा इतका गंभीर प्रवृत्तीचा असेल अशी अपेक्षा नव्हती. एकदोनदा घाबरून मीच त्याला 'सर' म्हणालो की काय असा मला संशय आहे. सर्वात मोठा कल्ला अर्धवटच्या घरी झाला. मेघनाने अचूक शब्द वापरला, रेल्वेच्या फलाटाची कळा आणली आम्ही तिथे. एकाच वेळी तीन चार वेगवेगळे गट विविध मुद्द्यावर तावातावाने चर्चा करत असल्याने आसपासचे लोक येऊन १४४ कलम लागू करतील की काय अशी क्षणभर भीती वाटली. अर्धवटच्या अर्धांगाच्या सोशिकतेची पुन्हा एकदा प्रचीती आली. त्यानंतर अमृतवल्लीच्या फिल्मवरही जोरदार चर्चा झाली.
खंत एकच की ग्रुप मोठा असल्याने अनेकांची नीट ओळख होऊ शकली नाही. त्यामुळे तिघा चौघांची नावे आता आठवेना झाली आहेत. तेव्हा एखाद्या फोटोवर इथे ओळख परेड करावी असे सुचवतो.
दंगा!
पार्किंगसाठी अनेक सव्यापसव्य करुन वहुमनच्या दारात पोहोचले तेव्हा खांद्यावर शबनम अडकवलेली आणि खादीचा मळकट रंगाचा शर्ट घातलेला असा माणूस दिसला. अमुक येणार हे माहीत होतं, त्यामुळे त्या वेटिंगच्या गर्दीतून आपली लोकं ओळखायला काहीच अडचण आली नाही. तोपर्यंत मेघना बाकी लोकांना घेऊन रिकाम्या टेबलावर आक्रमण करण्याच्या तयारीत होती. नंतर रीतसर जागा मिळाली, आम्ही (स्वतः आणि टेबल शेअर करण्यार्या दुसर्यांनी ऑर्डर केलेलं सुद्धा) भरपूर हादडलं वगैरे. शेवटी गौरीने आमची वरात वाडेश्वरी आणून पोहोचवली. या प्रवासात अमुकराव माझ्याशी आख्खं एक वाक्य बोलाले आणि मी धन्य झाले!
आम्ही कोपर्यात मोठी जागा अडवून बसलेल्या आपल्या कट्टार्थींपर्यंत पोहोचलो. सलिल येणार हे माहीत नव्हतं, म्हणून त्याला अचानक तिथे पाहून मस्त सरप्राइज मिळालं! बहुतेकांना आधी भेटलेले असल्याने ओळखीच्या लोकांशी गप्पा लगेचच सुरु झाल्या. नंतर दुसर्या टोकाला अनोळखी चेहेरे दिसू लागले, तसे इकडच्या टोकावरुन आम्ही सविता, घनु, सिफर, अनुप वगैरे लोकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली. पत्रकार वगैरे मंडळी आलीयेत कळल्यावर गहिवरुन ताबडतोब ओळख परेड झाली पण ती मंडळी आली तशी पटकन निघूनही गेली.
नंतरचा पूर्ण वेळ खिदळणं, गप्पा आणि नवीन आलेल्या लोकांसाठी जागा करणे यात मजेत गेला! वाडेश्वरच्या वेटर्सच्या पेशन्सची यथाशक्ती परीक्षा पाहिल्यानंतर अर्धवटरावांच्या घरी कट्टा हलला. इतका वेळ उभ्या असलेल्या अमृतवल्ली आणि सिद्धार्थ राजहंस यांना खाणं होईपर्यंत सोबत झाल्यावर आम्हीही सगळे अर्धवटच्या महालात पोहोचलो. अमृतवल्ली आणि सिद्धार्थची शॉर्टफिल्म संपताच सगळ्यानी पुन्हा एकदा मागवलेल्या खाण्यावर ताव मारला, आणि भरल्या पोटी त्यावर अभिप्राय द्यायला सुरुवात केली. कट्टा पुण्यात असल्याने आपण सूचना दिल्या नाहीत तर फाऊल होईल असे वाटून की काय, २० मिनिटांच्या फिल्मची अर्धा तास चिकित्सा झाली. अंतराआनंद फारच कमी बोलल्या, पण त्याची कसर त्यांनी भेट दिलेल्या सुंदर बुकमार्क्सने भरुन काढाली. शेवटी मेघनाने सगळ्यांना चहासाठी हाकललं नसतं तर कितीही वेळ तिथेच डेरा टाकण्याची लोकांची तयारी होती पण अजून थांबणं शक्य नव्हतं म्हणून माझ्याप्रमाणे बर्याच लोकांनी कल्टी मारली.
अशा तर्हेने कट्टा सुफळ संपूर्ण झाला! कट्टा यशस्वी करून दाखवल्याबद्दल सगळ्या आयोजकांचे विशेष आभार! असेच अजून छोटे मोठे कट्टे होत राहोत आणि सगळे लोक नेहमी भेटत राहोत!
@मी - फोटो मस्त आहेत सगळे, धन्यवाद :)
कट्टा पुण्यात असल्याने आपण
कट्टा पुण्यात असल्याने आपण सूचना दिल्या नाहीत तर फाऊल होईल असे वाटून की काय, २० मिनिटांच्या फिल्मची अर्धा तास चिकित्सा झाली.
=))
खर्रं!
"काय मस्त फिल्म बनली आहे" याने सुरूवात करून, "फक्त यंव जरा ठिक नव्हते. आणि हे असे असते तर कळले असते" इथपासून ते लाईट, ध्वनी, इडिटिंग सगळ्याप्रकारे चिकित्सा करून झाल्यावर पुन्हा एकदा ध्रुपदावर - "पण फिल्म बाकी झकास झालीये" :)
अंतराआनंद फारच कमी बोलल्या, पण त्याची कसर त्यांनी भेट दिलेल्या सुंदर बुकमार्क्सने भरुन काढाली.
अरे हो! फारच सुरेख बुकमार्क्स आहेत.
अंतरा धन्यवाद!
मेरेकू नही हाकल्या
मी सदस्य नसूनही थोडा वेळ कट्ट्यात रमलो.
मला हाकलले नाहीत त्याबद्दल धन्यावाद !
विशेष म्हणजे, मी जेव्हा पहिल्यांदा जाण्यासाठी वाडेश्वराबाहेर पडलो, तेव्हा जुना पुराणा ताजा तवाना 'अमुक' मला अनेक वर्षांनी भेटला !
अत्यानंदाने मी त्याच्या पाया पडलो.
ह्या भेटीमुळे देखिल माझं तिथे थांबणं सार्थकी लागलं ...
धन्यवाद सलिल की सलील की काय तो ...
एका उप-कट्ट्यात मी बॅट्या ,
एका उप-कट्ट्यात मी बॅट्या , गब्बर व टिंकू भेटलो. गब्बर अतिशय हसतमुख व जिंदादिल आहे. हुषार आहे हे माहीत होते पण प्रचंड उस्फूर्त आहे. बॅट्या व टिंकू यांना भेटून खूप मजा आली.
गब्बरचा स्थाईभाव उस्फूर्तता आहे. Spontaneity really runs amuck.
मुँह-फट था बे-लगाम था रुस्वा था ढीट था
जैसा भी था वो दोस्तो महफ़िल की जान था
पैकी ढीठ अन मेहेफील की जान - हे त्याच्या व्यक्तीमत्वाशी मॅच होतय :)
अन्यांच्या वृत्तांतओंजळीतून निसटलेले विवक्षित क्षणकण
..................पुणे श्टेशनच्या बाहेर ५-६ जणांना 'वहुमान' कुठे आहे असे मराठीत विचारल्यावर "मालूम नै" असे उत्तर मिळत होते. हीच ती मराठी माणसाची सांस्कृतिक राजधानी की वैभव की काय असा विचार बळावत असता शेवटी एका 'पुण्य'वान माणसाने "हे हितं खाली जाऊन पूल वलांडा नि जांगीर हाश्पिल्टच्या बगलेतच है की", असे ऐकल्यावर मी पुण्यातच आलो असल्याची खात्री पटली (मुंबईत रस्ते डावी-उजवीकडे जातात तर पुण्यात खालच्या-वरच्या अंगाला) आणि पुणं बदलत चालल्याचीही. कारण माझ्या लहानपणी पुण्यात, "हे इथं कुत्र्याच्या भुकावर आहे ते दुकान" असं सांगण्याची पद्धत होती. म्हणजे कुत्र्याचं भुंकणं जिथपर्यंत पोहोचतं तिथपर्यंत. :)
तर 'वहुमाना'त पोहोचल्यानंतरच्या बर्याच गोष्टी इतर कट्टेकरांनी आधीच सांगितल्या आहेत तेंव्हा कट्ट्याची 'न'वी बाजू व काही निरीक्षणे तेवढी मांडावी म्हणतो.
. 'वहुमाना'त पूर्ण कट्टा केला असता तर दुपारपर्यंत त्या इराण्याला आयडेन्टिटी क्रायसिस् होऊन दुसर्या दिवशी 'जागा भाड्याने देणे आहे'ची पाटी तिथे लागली असती.
. जाज्वल्य व शाश्वत कट्टा-प्रश्न (जाज्वल्य व शाश्वत अकट्टा-प्रश्न: 'ही पाककृती अंडे न घालता कशी करायची ?') विचारला गेलाच - "हे 'न'वी बाजू कोण ?" पण ती बाजू या कट्ट्यातही अंधारातच राहिली असल्याने पुढल्या कट्ट्याच्या वेळेस पुन्हा हा प्रश्न उपस्थित होईल याची खात्री आहे. या प्रश्नाचा प्रवास शेवटी "अरे ये 'न'वी बाजू को नाहीं जान्ता !" इथपर्यंत ज्या दिवशी होईल तो 'ऐसी..' च्या दिनवैशिष्ट्यात नमूद केला जावा, अशी जोरदार मागनी या माद्यमातून इथं केली जात आहे.
. टिंकू कट्टा-गणवेषात आल्याने तिची ओळख पटली (पाहा चित्र : पुणे कट्टा - जाने.१८, २०१४).
तरी, तिला दिवसभरात एखादी छोटी मुलगी अचानक येऊन बिलगेल व आम्हांला आश्चर्यचकित होण्याची संधी मिळेल अश्या प्रतिक्षेत होतो पण तसे न झाल्याने तिला मागच्या पुणे कट्ट्यात मिळालेल्या 'संतूरसंतूर' किताबाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
. सलिलची भेट ही अनपेक्षित आणि सुरस होती. आम्हांला एक सामायिक मित्र (आयडी 'अविचारी') आहे हे प्रथमच कळले.
. समोर बसलेले 'अर्धवट' हे तर्हतर्हेचे प्रश्न, काल्पनिक परिस्थितीतली उदाहरणे (म्हणजे एका गावात १ गब्बर श्रीमंत आहे आणि १०० गरीब आहेत, तर सरकार … ) आदिंची फैर झाडत होते आणि उजवीकडे गब्बर पुढ्यातल्या कोकम सोड्याइतपत उसळून 'हे इथपर्यंत मान्य पण तिथपासून पुढे अजिबात अमान्य कारण ….' (सोड्यासोबत नेहमीचे पेय नसल्याने गब्बरचा जोर कमी पडत होता की काय ते व्याडेश्वरच जाणे !). दुसयांदा सोडा मागवला तेव्हा स्वारी जरा फार्मात आली. पण तोवर 'अर्धवटां'कडे जायची वेळ झाली होती.
. वाडेश्वरात वेटरने सुरुवातीस एकदाच पाणी देऊन त्याच्या परीने कट्ट्याचा निषेध केला.
. गब्बर - बॅटमेनला पाच्पाचशेच्या नोटा देताना 'मी' यांनी रंगे हाथ क्यामेर्यात पकडले असल्याने येत्या काही चर्चांत दोघांचा अक्ष बनताना दिसला तर ब्लॅकमेलचे प्रताधिकार 'मी' यांकडे मागावेत.
. 'अर्धवट' यांचे पूर्ण नाव विचारून घेतल्याने त्यांच्या घरी विनासायास जाता आले. त्यांचे चिरंजीव (आलामंतर कोलामंतर छू:), अतिशय ऐसपैस, (पंखा न लावाताही) थंडगार घर आणि आपुलकी यांनी छाप सोडली. अनेक आभार !
. वाडेश्वरातली उरलेली चर्चा खुद्द गब्बर निघाला तेंव्हा अर्धी जनता दारात गोळा करून पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असावा. तिकडे घरात बिकाशेठ त्यावेळी तितक्याच तीव्रतेने 'व्हेज रोल्स किती आणि पनीर रोल्स किती' या अधिक जिवंत प्रश्नावर कासावीस होऊन तोडगा काढत होते.
. केतकीने आणलेले आवळे-तुकडे चवीला खल्लास होते.
. अमृतवल्ली आणि सिद्धार्थ राजहंस यांनी केलेल्या लघुपटाबद्दल इतरजण बोलताना 'हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे' अश्या ओळी अमृतवल्लीला सारख्यासारख्या ऐकू येत होत्या, असे वाटत होते. ;)
. मिहिरला बिघडवण्याचे आव्हान निळूभौंनी लवकरच स्वीकारावे ही विनंती. अन्यथा स्वघोषित 'सालस-गरीब-मितभाषी व्यक्तित्व'चा पुरस्कार फिरत्या ढालीत बदलून पुढच्या कट्ट्यात मिहिरकडे समारंभपूर्वक ती द्यावी लागेल.
. रात्रीच्या उपकट्ट्यात अमृतवल्ली, सिद्धार्थ राजहंस यांनी अगत्याने केलेला पाहुणचार आणि गप्पा दीर्घकाळ लक्षात राहतील. मनोबाचे प्रश्न (बंदुकीतुन सुटलेली गोळी पुन्हा वापरता येते का ?), बॅट्याची अव्याहत बडबडबॅटिंग (ग्रीकपुराण ते हिंदू-बौद्धधर्म मिसळण), कॉफी, पपई, सलिलचे गुणी बाळाप्रमाणे भांडी घासून ठेवणे, अमृतवल्लीने तिच्या शिक्षकांचे सांगितलेले किस्से, ऋचे डोके बंद होणे (इतर सर्व जण त्याला पुलंचा एक विनोद समजावून सांगत होते म्हणजे बघा !), पहाटे चारला वेताळ टेकडीवर इतरजण गेले असता मी, बॅटमॅन आणि मनोबांनी ताणून देणे, मेघनाने पहाटे केलेला उत्तम चहा, निव्वळ अमृतवल्लीने विचारल्यामुळे मी सांगितलेला संशोधनाचा गाळीव इतिहास आणि त्यावेळी इतरांनी डोळे, कान उघडे ठेवण्याचे फसलेले सोंग (अपवाद : मनोबा. कारण तो ढाराढूर होता), इ. गोष्टी अनेक दिवस मौजेने चघळता येतील अशाच आठवणीत राहतील.
. रमताराम यांनी म्हटल्याप्रमाणे मोठ्या कट्ट्यात सगळ्यांशीच नीट बोलता येत नाही. तर सविता, केतकी, घनू, सिफ़र, अनुप, मी, इ. वल्लींशी पुन्हा कधीतरी बोलायला मिळेल अशी आशा आहे.
@'मी' : व्यक्तिचित्रे छान आली आहेत. केतकी, सलिल, जंतू यांची आवडली. केतकीचे विशेषकरून.
-----
आता माझा मूकपणा लोकांनी इतक्या मनमोकळेपणाने स्वीकारला आहे तर गर्दीत कुणी एक अमुक असलेल्या मला क्षीण समर्थन म्हणून 'वा. रा. कांत' यांच्या ओळी -
राहिले ओठांतल्या ओठांत वेडे शब्द माझे
भेट होती आपुली का ? ती खरी, की स्वप्न माझे ?
--
कट्टावृत्तांत
कट्टावृत्तांत आवडला,
@अंतराआनंद - बुकमार्क मस्त आहे, खरं सांगायचं तर खूप खूप वर्षांनी असं स्वहस्ते बनवलेलं काही भेट मिळालं, त्यातला आनंद विसरलोच होतो.
आता त्या बुकमार्कमुळे तरी पुस्तकाचे कोपरे दुमडून ठेवायची सवय मोडेल ही भाबडी आशा आहे.
@गब्बर - गब्बरने लोकांचा गैरसमज करुन देण्यात इथेही यश मिळवलेलं पाहुन, मनाला अपार खिन्नता आली. गब्बरबरोबर आणी ररासरांबरोबर अनेक दीर्घ आणि अत्यंत अनुत्पादक चर्चा ऐकण्यात तासंतास घालवल्यावर, दोघांच्याही हलकटपणाची पातळी (तळ नव्हे, तो अंदाज अजुनही नाही ;) ) मला माहिती आहे असा मी दावा फक्त मीच करू शकतो.
हृशिकेशबरोबर याआधी माफक संवाद झाला होताच, पण भेटीचा योग आला नव्हता. मी भेटुया असे सुचवताच त्याचा जो रिप्लाय आला त्यावरुन तो जरा आखडूच असावा असा समज झाला होता. प्रत्यक्ष भेटुन तसा 'वाटला' नाही, तसा नसेलच याची खात्री होण्यासाठी आठदहावेळा भेटावे लागेल, मग नक्की मत बनवता येइल ;)
अमृतवल्ली व सिद्धार्थची शॉर्टफिल्म मला पुर्ण पाहता आली नाही, पण त्यानंतरच्या किंचीत समिक्षेत मात्र मी हिरीरीने भाग घेतला. पुन्हा पहावी लागेल.
अमृतवल्लीने कवितांच्या मैफिलिला यायची इच्छा आपणहून बोलुन दाखवली, ती जितक्या उत्स्फुर्तपणे आणी मनापासुन ते बोलली, 'ये तो अपनी जातवाली है' ( ररासर, प्लिज नोट ) 'माझीया जातीचा मज मिळो कोणी' यातला आनंद अवर्णनीयच. यापुढच्या कवितांच्या मैफिलीमध्ये एक खुर्ची नक्की झाली तिच्यासाठी.
अरे'बिका' आणि ररासर आमच्या घरातलेच मेंबर असल्यामुळे पोराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून थोडंसं यजमानाच्या भुमिकेत शिरता आलं, (म्हणजे कुणीही काहीही मागितल्यावर, उगाच थोडंसं बुड हलवल्यासारख्ं करुन दाखवणे, 'चहा हवा बुवा आता' असलं काही ऐकायला आलं तरी न ऐकल्यासारखं भासवणे वगैरे वगैरे.
बॅटमॅनला भेटलो नव्हतो कधी, दिवसा दिसेल अशी खात्री नव्हती, पण दिसला, हा भिडु नोट करुन ठेवला आहे, अजुन भेटलं पाहिजे.
मेघनाने आणि बिकाने अत्यंत हुकुमशाही पद्धतीने दुपारच्या गिळण्याची व्यवस्था केल्यामुळे, नेहेमिच्या 'शाकाहार विरुद्ध मांसाहार' 'जैन फुड विरुद्ध तामसी फुड' चर्चा रंगल्या नाहीत, नाहि म्हणायला 'हलाल व झटका - एक तौलनिक अभ्यास' हा परिसंवाद काही वेळ चांगला झाला.
मला जाणवलेल्या गोष्टींपैकी काही बाबी मात्र रोचक होत्या -
बहुतेक सदस्यांना मी माहित नव्हतो, मी आता जालावर मुरलो असा माझा समज होता, पण बहुतेक सदस्य अर्धवट हे नाव पहिल्यांदाच ऐकत होते हे पाहुन आश्चर्य वाटलं,
अर्थात मी बरेच दिवसात काहीच नवं लिहिलं नाही, त्यामुळे नवी काहीतरी लेखमाला सुरु करावी, किंवा किमान जुन्या अर्ध्या राहीलेल्या तरी पुर्ण कराव्या असं आवर्जुन वाटलं.
मज्जा आली सगळ्यांना भेटुन, आणि नवीन काही लिहायला प्रेरणा मीळाली हा मुख्य फायदा झाला मला.
काही आयडींना मी अगदि पहिल्यांदाच भेटत होतो, म्हणजे प्रत्यक्ष नव्हे तर जालावरही त्यांचं फार काही मी कधिच वाचलं नव्हतं - टिंकु, अमुक, मी, सलिल, केतकी, अविचारी या लोकांचा प्रत्यक्ष भेटितला स्वभाव पाहता यांच्या जालीय वावरावर आता लक्ष राहीलच.
कौटुंबीक अडचणीमुळे आणि अगदी अचानक ठरल्यामुळे मनासारखा पाहुणचार अजिबात करता आला नाही, त्याबद्दल खरंच रुखरुख वाटतेय.
सॉरी गब्बरभाऊ, तू रितसर
सॉरी गब्बरभाऊ, तू रितसर आमंत्रण देवुनही मी नाही येवु शकलो ;)
एकंदरीत वृत्तांत वाचल्यावर पुन्हा एकदा असे कट्टे अनुभवावेत असे वाटु लागले आहे. (गेल्या दोन वर्षात अर्धवटच्या घरी अनुभवलेली बाकिबाबांची मैफल सोडली तर कट्टे हा प्रकारच वर्ज्य करुन टाकला होता) बघु यापुढे प्रयत्न करु :)
कट्ट्याला मजा आली. बरेच लोक
कट्ट्याला मजा आली. बरेच लोक असल्याने नीट ओळख, गप्पा हे होऊ शकलं नाही. पण आजवर 'सदस्य' असणारे लोक जिवंत स्वरूपात दिसत असल्याने छान वाटत होतं. माणसाला समोर पाहण्यातली, भेटण्यातली (आणि मुख्य म्हणजे बोलण्यातली) मजा नेटसंवादात नाही.
दुपारी काम होतं त्यामुळे अर्धवटकडे जाता आलं नाही. त्याला सांगायचं होतं, पण तोवर तो पुढे निघून गेला होता.
उत्पल
यंदा १३ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर
यंदा १३ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरच्या दरम्यान गब्बर पुण्यात असणार आहे.
शनवार रविवारी पुन्हा वाडेश्वर (किंवा त्यासारख्या) ठिकाणी भेटायचं घाटतय.
सायंकाळी भेटायचं तर गब्बरसह तीर्थप्राशनही होउ शकतं.
काही जुने धागे आठवले.
.
http://aisiakshare.com/node/3301
.
http://aisiakshare.com/node/2371
.
http://aisiakshare.com/node/3286?page=1
.
सध्या जरा कामात व्यग्र आहे. फुरसतीत परतेन.
प्रकाटाआ
प्रकाटाआ