हुश्शार छोकरी

हुश्शार छोकरी
[म्हटले तर छोट्यांची; म्हटले तर मोठयांची गोष्ट!
कथेतल्या छोकरीचे एकदम लग्न होते. ती राणीही होते..... सर्बियन लोककथेचा हा स्वैर अनुवाद!]

आटपाट नगरात एक हुश्शार छोकरी रहायची.राजापेक्षा हुशार. त्याच्या दरबाऱ्यापेक्षाहुशार. तिच्या बापाला छोकरीचा अभिमान वाटायचा.
म्हणायचा, ‘सगळ्या राज्यात माझी छोकरी हुश्शार!’
राजाला ते कळले. त्याने बापाला बोलवून घेतले. विचारले,
‘तुझी छोकरी सगळ्या राज्यात हुश्शार?’
‘होय, महाराज! आहेच ती!’
राजाने कोडे घातले. ‘ही अंडी घरी ने. तुझ्या छोकरीला यातनं कोंबडीची पिल्लं काढून दाखव म्हणावं!
तिनं तसं केलं तर, तिला सोनंनाणं देईन. अन नाही जमलं तर, तुला शंभर फटके देईन!’
बाप घरी आला. छोकरीला सगळी हकीकत सांगितली. तिने क्षणात ओळखले, कि अंडी उकडलेली आहेत!
तिने आयडिया केली. बापाच्या हातात उकडलेल्या बियांची पिशवी दिली. म्हणाली, ‘ज्या रस्त्यावरून राजा जातो, तिथे जा.
राजा जवळ येताच मी सांगते तसं म्हणा आणि या बिया पेरायला लागा!’
छोकारीने सांगितले तसे बापाने केले. बिया पेरता पेरता मोठ्ठ्याने म्हणू लागला,
‘देवा देवा! या उकडलेल्या बिया रुजू देत. भलं मोठ्ठ पीक येऊ देत!’
राजानं ते ऐकलं. त्याला आश्चर्य वाटलं.
‘उकडलेल्या बिया कुठं उगवून येतात का? कोण तो मूर्ख? आणा रे त्याला इकडे!’
या बापाला राजाने एकदाच पाहिलेलं. त्यामुळे ओळखता आलं नाही.
म्हणाला, ‘उकडलेल्या बिया कधी रुजतील का? त्यातून कधी पीक येईल का?’
बाप आदबीने म्हणाला, ‘महाराज म्हणतील ते खोटं कसं असेल?
उकडलेल्या अंड्यातून पिल्लं बाहेर येतील तर, या बियातून पीक का नाही येणार?’
राजाने त्या बापाला ओळखले. म्हणाला, ‘तुझी छोकरी खरंच हुशार दिसते. हे तागाचे दोन धागे घे!
तुझ्या छोकरीला म्हणावं , एका मोठ्ठ्या जहाजासाठी यापासून एक शीड विणून दे. हे जर तिनं केलं, तर तिला निम्मं राज्य देईन.
नाही केलं तर तुला हजार फटके देईन!’

दुसऱ्या दिवशी छोकारीने बापाच्या हातात, फूटभर लाकूड दिलं. म्हणाली, ‘हे महाराजांकडे घेऊन जा. त्यांना म्हणावं, आधी या लाकडापासून मोठ्ठं जहाज तयार करा. मग त्या मापाचं शीड काय मी लग्गेच बनवून देईन!’
छोकरीनं सांगितलं तसं बापानं केलं.
आता मात्र राजाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. तिला दरबारात हजार राहण्याची आज्ञा दिली.

हुश्शार मुलीने स्वतः च्या हाताने कातलेले जाडेभरडे कपडे घातले. पायात साध्या चपला घातल्या.
पण हाय! छोकरी म्हणजे गुलाबाचं फूल! राजाला पार आवडून गेली.
तरी राजा तो राजाच! त्याला तिच्या हुशारीची प्रत्यक्ष परिक्षा पहायची होती.
त्याने हुकमी आवाजात विचारले, ‘ सगळ्यात दुरून येणारा पण आख्ख्या जगाला ऐकू जाणारा आवाज कोणता?’
छोकरी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली, ‘वीज! तिचा आवाज आकाश पृथ्वी व्यापून उरतो!’
मग अदबीने झुकून विनम्रपणे म्हणाली, ‘...आणि महाराज, आपले हुकुम, आपल्या आज्ञा!..... ज्या क्षणार्धात सगळ्या राज्यात पोहचतात.त्यांची तत्काळ अंमलबजावणी होते!’
छोकरीचे असले उत्तर ऐकून राजा पुरता विरघळून गेला.
तिला लग्नाची मागणी घातली. राणी होशील का, असे विचारले.
हुश्शार पोरगी धीट होती. म्हणाली, ‘तुम्ही श्रीमंत, मी गरीब. तुमचं जगणं निराळं, माझं निराळं! न जाणो, तुम्हाला माझा कधी एकदम राग येईल. तुम्ही फटक्यात मला, माहेरी धाडाल . अशावेळी माझी एक अट असेल!’
‘ती कोणती?’
‘माहेरी जाताना, मला इथली एक प्राणप्रिय गोष्ट घेऊन जायची परवानगी असावी!’
‘दिली!’

मग त्या हुश्शार छोकरीचे आणि राजाचे थाटामाटात लग्न झाले. हुश्शार छोकरी आता, बुद्धिमान राणी झाली. राजाच्या बरोबरीने राज्य करू लागली. काळ पुढे सरकत होता, आणि एके दिवशी......

राजाराणीला मेजवानीला जायचे होते. दुसऱ्या राज्यातले बडे पाहुणे येणार होते. पण झालं काय की राणीचा साजशृंगार काय आटपेना! बुद्धिमान असली म्हणून काय झालं, साजशृंगार करू नये असं थोडंच असतं? तिचे काही आवरेना. अन इकडे उशीर झाला म्हणून राजा रागावला.
रागाच्या भरात ओरडलाच! ‘ते दागदागिने आणि भरजरी कपडेच तुला इतके आवडतात ना?
तेच तुझ्यासाठी मौल्यवान आहेत ना? जा! तेच घे अन चालती हो तुझ्या माहेरी!’
बुद्धिमान राणीने ते ऐकले. तिला खूप दु:ख झाले.
तिने राजाला विनंती केली, ‘मी तुमच्या आज्ञेबाहेर नाही. पण आजची रात्र मला इथेच राहू दे. तुमच्या बरोबर जेवू दे!’
रागात असला तरी, राजाचा राणीवर भारी जीव! ‘ओके’ म्हणाला.
राजाच्या नकळत राणीने सरबतात झोपेचे औषध घातले.
कसलीही शंका न घेता, राजाने मुकाट्याने सरबत घेतले अन थोड्याच वेळात एकदम गाढ झोपी गेला.

मग राणीने झोपलेल्या राजाला आपल्या माहेरी घेऊन जायची, सेवकांना आज्ञा दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी राजाला जाग आली. आपण या शेतकऱ्याच्या झोपडीत कसे म्हणून त्याला आश्चर्य वाटत होते. त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याची राणी तिच्या माहेरच्या जाड्याभरड्या कपड्यांत साधेपणाने उभी होती.
‘या सगळ्याचा अर्थ काय?’ संतापाने राजाने विचारले.
राणीतल्या हुश्शार छोकारीने उत्तर दिले,
‘ पतिराज! तुम्ही मला लग्नाआधी वचन दिले होते. जर तुम्ही मला कधी माहेरी धाडलेत, तर मी माझी प्राणप्रिय गोष्ट सोबत नेऊ शकेन!’
‘हो!’ राजा अजून घुश्श्यातच.
‘माझी प्राणप्रिय गोष्ट तुम्ही आहात. म्हणून इथे येताना मी तुम्हाला घेऊन आले!’

आता एवढ्या मधाळ, निष्ठावान उत्तरावर कुठला राजा भाळणार नाही?
राजाला स्वत:च्या रागाचा राग आला. राणीच्या प्रेमावर परत जीव जडला. तिला घेऊन तो परत राजवाड्यात गेला.

तेव्हापासून ती हुश्शार छोकरी राज्यातल्या घराघरात राज्य करतेय!

4
Your rating: None Average: 4 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

हा हा! हुश्शार कथा

हा हा! हुश्शार कथा आहे.
आवडली. आज मुलीला सांगेन

अवांतरः यासोबत रेखाटने वा चित्रे असती तर बहार आली असती!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुझ्या मुलीलाच सांग की यासाठी

तुझ्या मुलीलाच सांग की यासाठी चित्रं काढायला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फक्त फुल आणि न ओळखु येणारे घर

फक्त फुल आणि न ओळखु येणारे घर इतकीच चित्रे चालणार असतील तर सांगतो (डोळा मारत)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान चिमुकली गोष्ट.

छान चिमुकली गोष्ट.

ऋषिकेश, अदिती, घासकडवी.....

ऋषिकेश, अदिती, घासकडवी..... मनापासून धन्यवाद.
छोट्यांचे पान फारसे वाचले जात नाही. उघडले हि जात नाही.
पण सगळे नवे चांगले वाचक, लेखक कसे निर्माण होणार या चर्चांमध्ये गुंतलेले मात्र दिसतात. असो.

गोष्ट मस्त. अरेबियन नाईट्स

गोष्ट मस्त. अरेबियन नाईट्स मधल्यासारखी वाटली.

एक शंका

तिने क्षणात ओळखले, कि अंडी उकडलेली आहेत!

तिने हे क्षणात (अंडी न फोडता) कसे ओळखले की ही अंडी उकडलेली आहेत?

मस्त आहे. आवडली.

मस्त आहे. आवडली.