ड्रीमरन १६

मुंबई मेरेथोन २०१६ आज पार पडली. Standard Chartered बँकेतर्फे दरवर्षी जानेवारीमध्ये आयोजित केली जाणारी ही स्पर्धा दिवसेंदिवस प्रचंड लोकप्रिय होत चालली आहे. फुल (४२ किमी) , हाफ(२१ किमी) आणि ड्रीम रन (६ किमी) अशा तीन प्रकारांपैकी ड्रीमरनमध्ये भाग घेण्याचे माझे हे सलग दुसरे वर्ष. त्याआधी केवळ बातम्यांमध्येच बघायचो. पण मागच्या वर्षी मात्र आमच्या बँकेच्या कृपेने भाग घेण्याची संधी मिळाली. तशी ड्रीमरन म्हणजे खऱ्या अर्थाने मेरेथोन नव्हेच. जे अस्सल धावपटू आहेत त्यांच्यासाठी फुल आणि हाफ मेरेथोन आहेच. पण म्हणजे ज्यांना कमीत कमी कष्टात , मस्त मजा करत , नाचत-गात मेरेथोन पळण्याचा अनुभव मिळवायचा असेल किंवा फील वगैरे घ्यायचा असेल अशांसाठी ड्रीमरन म्हणजे पर्वणीच. थोडक्यात हौशागौशांसाठी खास बनवलेली.

मागच्या वर्षी आपला उत्साह जरा जास्तच होता. जे टीव्हीवर पाहायचो ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होतं. सगळीकडे जल्लोष आणि उत्साह , वेगवेगळ्या भाग घेतलेल्या संस्था व त्यांचे रंगीबेरंगी कपडे , ठिकठिकाणी स्टेजवर उभे राहून लोकांना प्रोत्साहन देणारे सेलीब्रेटीज, नेते , मंत्री. एकदम शिस्तबद्ध आयोजन. एक नंबर वाटलेलं. मग ड्रीम रन सुरु झाली.
पहिले दोन किलोमीटर इतकी गर्दी असते की मुंगीच्या गतीने चालावं लागतं. बोंबलायला ही कसली ड्रीमरन , आम्हाला पळायला मिळणार की नाही असं वाटायला लागलं. पण नंतर गर्दी विखुरली त्यावेळी जरा पळण्याचा प्रयत्न केला पण सगळा उत्साह ओसरला. आयला , धड १०० मीटर पण सलग पळता येईना. पाय दुखायला लागायचे. हस्श-हुश्श व्हायचं. बाजूला फुल , हाफ मेरेथोन पळून येणारे आपलापेक्षा तिप्पट वयाचे लोक बघितल्यावर लईच लाज वाटायला लागली. तेव्हा मनोमनी ठरवून टाकलं उद्यापासून पळायला सुरुवात करायची. एक वर्ष एकदम बॉलीवूड ष्टाईल तयारी , व्यायाम वगैरे (background ला एखादे गाणे) करून पुढल्या वर्षी डायरेक्ट हाफ मेरेथोनच पळायची. मित्रांना पण सांगून टाकलं.

पण च्यामारी , १ आठवड्यात पुनश्च: हरिओम. सगळ्या गर्जना हवेत. मुळात आपण आरंभशूरांचा शहेनशाह असल्यामुळे कोणतेही काम सुरु करताना उत्साह दांडगा पण हळूहळू पीछेहाट ठरलेली. १० दिवसांत सगळं बंद. मग पुन्हा सप्टेंबरमध्ये नव्याने अर्ज आले. म्हटलं यावेळी देऊया का हाफ मेरेथोनचा दणका ? पण नंतर म्हटलं राहुदे. उगाच अचाट ताकतीचे पुचाट प्रयोग नकोत. गपगुमानं पुन्हा ड्रीमरनसाठी अर्ज भरला. पण यावेळी भरपूर पळून मागच्या वर्षीचा बदला वगैरे घ्यायचा ठरवून टाकलं. मग काय , ऑक्टोबरपासून पुन्हा जिम सुरु. रोज थोडा सराव करायचा. पण पुन्हा तेच. १५ दिवसांत कंटाळा आला. पण यावेळी मात्र आरंभशूर हा कलंक थोडा तरी पुसुया म्हटलं. मग चकदे , भाग मिल्खा भाग , मेरी कोम , ब्रदर्स यामधली गाणी , १० १० वेळा रिपीट करून ऐकू लागलो. अग्निपथ कविता स्वत:शीच गुणगुणायला लागलो. उगाचच मुठी आवळायच्या दात ओठ खायचे आणि करायची सुरुवात व्यायामाला. आठव अभ्या , आठव मागचे वर्ष. आठव तुझी नामुष्की. राब साल्या.राब.

बाकी माझ्या बॉडीत काही जास्ती फरक नाही पडला पण सुदैवाने ४ महिने सलग करू शकलो.

आणि मग आजचा दिवस उजाडला. पुन्हा तेच मस्त वातावरण. पण यावेळी कुतूहल शमलेलं. यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेने गर्दी प्रचंड वाढलेली. त्यामुळे पहिले ३ किलोमीटर केवळ गर्दीतून चालत राहिलो. म्हटलं आता मिळणार नाही पळायला. पण मरीन ड्राईववर गर्दी विखुरली. आणि मग केली सुरुवात. चला, मागच्या वर्षीपेक्षा फरक लगेच जाणवला. पळताना फार त्रास नाही झाला. अर्थात मध्ये मध्ये थांबावं लागायचं. पायात गोळे यायचे. पण तरी दमल्यासारखं होत नव्हतं. धाप लागत नव्हती. शेवटी एकदाची ड्रीमरन संपली. त्या चार महिन्यांचा थोडा का होईना फायदा झालाच. पण १ वर्ष सराव केला असता तर कदाचित हाफ पळू शकलोही असतो याची खंत वाटली.

असो. तर यानिमित्ताने मुंबईची अजून एक नव्याने ओळख झाली. एरवी सतत ‘धावपळीत’ असणारे मुंबईकर ड्रीमरनवेळी मात्र निवांत , बिनधास्त होते. हसत होते , नाचत होते. मध्येच पळत होते. फोटो काढत होते. एकेकाचा उत्साह बघण्यासारखा होता. अनेक स्वयंसेवी संस्था गरीब, अनाथ छोट्या मुलांना पळण्यासाठी घेऊन आलेल्या. पोरं एकदम खुश होती. अनेक बँका,कंपन्यांचे लोक ग्रुप करून आलेले. ठिकठीकाणी स्टेज उभारून गाणी- नाच सुरु होते. वातावरण पण मस्त होते. आणि आयोजन तर प्रश्नच नको. मागच्यासारखेच एक नंबर.
यावर्षी ड्रीमरनमध्ये परदेशी लोकांचा सहभाग देखील लक्षणीय होता. चला, त्या निमित्ताने त्यांच्या कल्पनेतल्या टिपिकल इंडियापेक्षा एक वेगळा इंडिया त्यांना अनुभवायला मिळाला असेल अशी अपेक्षा आहे.

बाकी मला मुंबईमध्ये येऊन दोन वर्षे होऊन गेली. सांगलीहून आलेलो. अजूनपर्यंत मनाने मुंबईचा बनलोच नव्हतो. कदाचित अजूनही नसेन. याच्याआधी कधीच मुंबई न पाहिलेला मी. केवळ जीवाची मुंबई ,पक्का मुंबईकर ,लोकलवारी असे शब्द ऐकायचो,वाचायचो.पण मुंबईत नोकरी करायचा विचारही मनाला शिवत नव्हता. उगाचच आपली भीती वाटायची. आपली मजल पुण्यापर्यंत. पुणे खूप आवडायचं. इथे यावं लागलं. पण आज धावताना पहिल्यांदा का कुणास ठाऊक , मुंबईचा झाल्यासारखं वाटलं.
बाकी पुढच्या वर्षी हाफ मेरेथोन नक्की बर का.
(मी काही खूप मोठा नाही. आणि अनेक दिग्गज लोकांनी मुंबईबद्दल कितीतरी लिहून ठेवलंय. त्यामुळे आपण किस झाड की पत्ती. पण तरी , माझ्या मनातल्या मुंबईबद्दलच्या भावना लिहाव्या वाटतात. कधीतरी लिहावं म्हणतो. बघू).

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

सिंगापुरात गेल्यावर्षी १० किमीची शर्यत धावलो स्टॅनचार्टचीच. काहीच गंमत नव्हती. कंप्लीट कॉर्पोरेट इव्हेन्ट. इथे सगळंच आखीव-रेखीव असतं. कृत्रिम. बोरिंग. शहराचं कॅरॅक्टर असतं प्रत्येक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐशीवरचे बहुतेकजण परदेशात राहतात का ? कारण आजवर जेवढे लेखन वाचले त्यातले अनेकजण 'मी भारतात असताना......' वगैरेसारखी वाक्ये लिहिताना दिसतात. एकंदरीत इकडे एनआरआय मंडळी जास्त असावीत असं दिसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदरीत इकडे एनआरआय मंडळी जास्त असावीत असं दिसतंय.

नॉट नेसेसरिली!

(आमच्यासारखी ओसीआय मंडळीदेखील इकडे पुष्कळ पडीक असतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला लिहिला आहेस अनुभव . मुंबई बद्दल नक्की लिही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगले लिहिलयं !
माझा एक मित्र आहे. लग्न केलेलं नाही. दुपारी २-३ पर्यंत दिवसभराची कामे आवरुन घ्यायची. मग धावायची प्रॅक्टीस. विचारलं की म्हणतो, 'पोटाला जितकं लागतं तितकं कमवतो. बचत करुन काय करु ? धावण्याच्या छंद आहे तर तोच जोपासतो'.

दरवर्षी मुंबई मॅरेथॉन, ठाणे मॅरेथॉन धावतो. पहिल्या पाच-दहात देखील अजून आला नाही पण त्याच्या छंदाचे मला मनापासून कौतुक वाटते. म्हणजे नुसत्याच धावण्याच छंदाचेच नव्हे तर पैशासाठी न धावण्याच्या वृत्तीचे देखील.

अवांतर : मुंबईत स्वागत. मुंबई तुम्हाला आवडो ही सदिच्छा ! बाकी इकडे यायचे, नोटा छापायच्या आणि मग दुसरीकडे गेले की मुंबईला नावे ठेवायची असे बरेच प्राणी बघण्यात आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बचत करुन काय करु ?

रियली?

तर पैशासाठी न धावण्याच्या वृत्तीचे देखील.

खरच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घोर कलियुग हो ! खरं बोलायची सोय नाही राहिली आजकाल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी दहा कि.मी. च्या पलिकडे गेलेली नाही पण माझी एक फुल मेरेथोनवाली मैत्रीण परवा मुंबईला तिच्या वयोगटात तिसरी आली. मला ह्या मंडळींचं मनापासून कौतुक आहे. कसे काय एवढं धावतात देव जाणे. पुढच्या आठवड्यात मी १० कि.मी बंगलोर पिकाथोन(बायकांची रेस) धावणार आहे. इथे टी.सी.एस ला खूपच गर्दी असते आणि चेंगरा-चेंगरीची भीती वाटते म्ह्णून मी त्या रनला जाणं सोडून दिलं. आता या बायकांच्या रनमध्ये धावते.
मूळ मुंबईची असून मी मुंबईत कधीच अशी रन धावलेली नाही. ते एक माझं स्वप्न आहे!

अभिजीत दादा, मुंबईबद्दल जरुर लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

मला ह्या मंडळींचं मनापासून कौतुक आहे. कसे काय एवढं धावतात देव जाणे.

काही लोक जरा जास्त फिट जन्माला येतात, माझ्यासारखे काही रडतरखडत पाच किमी धावतात. काहींना गणित-इंग्लिश जमत नाही, काहींना धावणं जमत नाही. ... असं मी स्वतःला सांगते. धावणाऱ्यांचं कौतुक आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ड्रीमरनमधील सहभागाबद्दल अभिनंदन. भारतातल्या मॅरॅथॉन्समधे SCMM चे एक खास स्थान आहे. खासकरून मुंबइकरांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादामुळे.

जास्त अंतर धावण्याविषयी.. हाफ्/फुल मॅरॅथॉन धावणारे फार काही वेगळे असतात असे नव्हे. लांब पल्ल्याच्या धावण्याच्या प्रकारात सर्वात महत्वाचा असतो तो मनोनिग्रह. सर्वसाधारणपणे मानवी शरीर एवढा ताण सहज सहन करू शकतं, प्रश्न असतो तो हे का करायचं. नुसत्या फिटनेससाठी एवढं धावयची गरज नाही. ते एक वेड लागतं. आणि एवढे अंतर धावत कापण्याचा आनंदच (अध्यात्मिक??) काही असा असतो हे प्रश्न आपण विसरून जातो. .

मॅरॅथॉन धावण्यात फिनिश लाइन गाठणे एवढं अवघड नसतं जेवढं स्टार्ट लाइनपर्यंत पोचणं अवघड असतं ..

नक्की प्रयत्न करा. मॅरॅथॉन नक्की धावाल पुढल्यावर्षी. एखादा रनिंग ग्रुप जॉइन करा म्हणजे धावणं कंटाळवाणं होणार नाही. आणि योग्य मार्गदर्शन मिळेल मॅरॅथॉनसाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धावणं माणसाचं अगदी बेसिक इन्स्टिक्ट असावं असं लहान मुलांकडे बघुन वाटत आलं आहे. तरी आता २-३ किमीहून अधिक धावता येईल का शंका आहेच. प्रयत्न नाही केला कधी.
तुमचे कौतुक वाटले.
बाकी मुंबईला धावणं नवीन नसल्याने अश्यावेळी धावण्यापेक्षा ते सहा किलोमीटर अनुभवणे अधिक चालत असेल Smile

(मुळचा मुंबईकर)ऋ

बाकी मुंबईबद्दल लिहा हो.. राजहंसाचे चालणे.. वगैरे आहेच.
पण जरा तब्येतीत लिहा... दर २-४ परिच्छेद होताच प्रकाशित करायची घाई नको Smile (हे अर्थात माझे मत. हव्या त्या पद्धतीने प्रकाशित करायला तुम्ही मोकळे आहातच)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!