फुसके बार – ०५ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – ०५ फेब्रुवारी २०१६
.

१) राजस्थान पर्यटनाच्या जाहिराती

राजस्थान पर्यटनाच्या काही जाहिराती फार छान आहेत. एक चिनी पर्यटक मुलगी राजस्थानातील एका किल्ल्याला भेट देते. ती सभोवताली पाहते तर तिला काय दिसते? किल्ल्याची तटबंदी जी थेट चीनच्या भिंतीसारखी लांबच लांब आहे.

मागे मध्य प्रदेश सरकारच्या जाहिराती अशाच कल्पक असत.

२) किस्त्रीमच्या मागच्या दिवाळी अंकात गिरीश दाबके यांचा ‘पाश्चिमात्यांच्या तात्विक तलवारी’ हा लेख काही अपरिचित गोष्टी सांगतो.

साम्यवादाचा उद्गाता कार्ल मार्क्सने ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ असे म्हणले खरे, पण याच मार्क्सने ब्रिटीशांचे राज्य असलेल्या भारतामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हे ब्रिटीशांचे कर्तव्यच होते असे म्हटले होते. आता या मार्क्सने कधीही भारताला भेट दिलेली नव्हती, भारतातील सामाजिक परिस्थितीची त्याला काही कल्पना नव्हती. आणि तरीही त्याने अशी भूमिका घ्यावी हे मोठेच आश्चर्य.

मॅक्समुल्लर या ज्या जर्मन विद्वानाबद्दल भारतामध्ये फार आदराने बोलले जाते, वेदांचा अभ्यास करण्याचे ज्याचे कार्य सर्वविदित आहे, त्याच्या हेतुबद्दलही या लेखामध्ये प्रश्नचिन्ह उभे केले आहे. योरपमध्ये ब्रिटन व जर्मनीमध्ये वितुष्ट असले तरी भारतातील ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबाबतीत या दोन्ही देशांमध्ये एकमत होते.

३) एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीमचा प्रचार व वस्तुस्थिती

नॅशनल पेन्शन स्कीम सर्वांसाठी लागू होऊनही आज बहुतेक बॅंकांमध्ये या योजनेबद्दल व्यवस्थित माहिती मिळताना दिसत नाही. कोठे त्याबाबत चौकशी करायला जा, तर बॅंकेचे लोक त्यांच्या दुस-याच कोणत्या तरी योजनेची माहिती देतात व त्यामध्ये गुंतवणूक करायला सांगतात असा अनुभव सध्या येत आहे.

ही योजना यशस्वी व्हायची इच्छा असेल तर केन्द्र सरकारने काही प्रभावी पावले उचलायला हवीत.

४) श्रीलंकेतला अनुभव

काही वर्षांपूर्वी येता-जाता ट्रांझिटमध्ये असताना कोलंबो विमानतळातून बाहेर पडून कोलंबो शहरात फिरता आले.

वाहतुकीचा खोळांबा असतानाही कोठे हॉर्न वाजवणे नाही, वाहतुकही शिस्तबद्ध. आमच्या ड्रायव्हरला याबाबत विचारले तर तो म्हणाला की हॉर्न कशासाठी वाजवायचा? त्यामुळे उगाचच अस्वस्थता वाढते, ब्लड प्रेशर वाढते. तर मग कशासाठी हे सगळे करायचे?

एवढी साधी गोष्ट जी त्याला कळली ती आपल्याकडच्या लोकांना का कळाली नाही हा प्रश्न विचारायचा नाही.

५) मुरूड येथील समुद्रात विद्यार्थी बुडून मरण्याच्या घटनेच्यावेळी आबेदा इनामदार महाविद्यालयाचे कोणतेही पदाधिकारी दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचले नाहीत याबद्दल मी काल लिहिले होते. मृत मुलांचे पालक काल संस्थेच्या प्राचार्यांना भेटायला गेले, तेव्हा स्वत: प्राचार्यांनी या मृत विद्यार्थ्यांच्या पालकांशी अतिशय माजोरडेपणाचे वर्तन केले. त्यांच्या वागण्यात या मुलांच्या मृत्युचे काहीही गांभीर्य दिसत नव्हते.

अल्पसंख्यांकाची प्रसिद्ध शैक्षणिक संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या या संस्थेच्या पदाधिका-यांचे खरे स्वरूप या निमित्ताने समोर आले.

६) सियाचेनमध्ये भारताचे दहा जवान बर्फाखाली गाडले गेले असे शोधमोहिमेनंतर आज लष्कराने जाहिर केले.

या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भारत काय किंवा पाकिस्तान काय यांनी आपापले सैन्य मागे हटवायचे किंवा अगदीच तुरळक प्रमाणात ठेवायचे हा अलिखित नेम पाकिस्तानच्या कारगिलमधील आगळीकीमुळे बंद झाला. तेव्हापासून दोन्ही पक्षांच्या लष्कराची या काळात प्राणहानी होते.

योगायोगाने कालच मुळचे उडुपीकडील असलेले रास्ते नावाचे लष्करातील निवृत्त अधिकारी त्यांच्या मित्राची गाडी दुरूस्त करण्यासाठी एका गॅरेजमध्ये आले असता भेटले. त्यांचे सियाचेन व कारगिल या दोन्ही ठिकाणी पोस्टींग होते. ते तेथे बराच काळ होते. त्यांना तिथले लोक बर्फातला वाघ म्हणायचे असे त्यांनी सांगितले. तेथे तैनात असलेल्या अनेक अधिका-यांना व जवानांना पूर्ण तळपाय दुखण्याचा आजार जडतो व तो आयुष्यभर राहतो असे ते म्हणाले.

मागे गुलमर्गमध्ये हिमालयातल्या उंचीवर युद्ध करण्याच्या तंत्रासंबंधीची जी इन्स्टिट्युट आहे, तेथेही काही अधिका-यांनी त्यांचे अनुभव सांगितले होते. त्या उंचीवर ऑक्सिजनची कमतरता असते, दोन्हीकडच्या बाजूंना विरोधी ठाणी कोठे आहेत याची पूर्ण माहिती असल्यामुळे त्यांच्यासमोर जावे लागणार नाही, इतपत म्हणजे फारच मर्यादित हालचाल होते. कारण गोळीबार होण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून तेथे पोस्टींग असताना शरीराचे वजन झपाट्याने कमी होते.

या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत हे वेडे जवान नक्की कोणासाठी आपला जीव धोक्यात घालत असतात, मग ती युद्धजन्य परिस्थिती असो किंवा नसो? आपल्याकडे कोणाला त्यांच्या बलिदानाने काहीतरी फरक पडतो असे वाटते का?