Dead Man's Hand - ४

आधीचे भाग - , ,

रात्रीचे आठ वाजून गेले होते. सांताक्रूजच्या त्या पबमध्ये बर्‍यापैकी गर्दी होती. अर्थात त्यात तरुणाईचा जास्तं भरणा होता. जवळपास प्रत्येकजण आपल्या पार्टनर बरोबर किंवा मित्रं-मैत्रिणींच्या ग्रूपबरोबर तिथे आलेला होता. पबच्या एका बाजूला असलेल्या डान्सफ्लोअरवर अनेकजण बेधुंदपणे नाचत होते. पबचा डीजेही तरुणाईची नस बरोबर ओळखून एकापाठोपाठ एक गाणी वाजवत होता आणि त्याला दाद देत प्रत्येकजण मनसोक्तं थिरकत होता. काहीजण आरामात ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते आणि मधूनच उठून डान्सफ्लोअरवर एखादी चक्कर टाकत होते. वातावरणात वेगळाच उत्साह आणि सळसळता जोश भरुन राहीला होता.

तो मात्रं अलिप्तपणे एकटाच कोपर्‍यातल्या आपल्या टेबलपाशी बसलेला होता. त्याला तिथे आल्याला तासभर उलटून गेला होता. वारंवार त्याची नजर घड्याळाकडे जात होती. त्याच्या एकंदर अविर्भावावरुन तो कोणाची तरी वाट पाहत असावा हे सहज कळून येत होतं. अद्यापही त्याचा पहिलाच पेग संपलेला नव्हता. अर्थात नेहमीचंच गिर्‍हाईक असल्याने तो कितीही वेळ बसला असता तरी त्याला कोणी एका शब्दानेही हटकलं नसतं. तो ज्या व्यक्तीची वाट पाहत होता तिला तिथे येण्यासाठी बहुतेक उशीर झालेला असावा कारण तो बराच त्रासलेला वाटत होता.

"हाय धीरज!" तो आपल्या विचारात गुंतलेला असतानाच अचानक त्याच्या कानावर शब्दं आले.

अखेर ती आली होती!

"सॉरी, आय अ‍ॅम लेट! इथल्या ट्रॅफीकचं मला काही जजमेंटच येत नाही! आय स्टार्टेड अ‍ॅट अराऊंड सिक्स, पण तरी इथे येईपर्यंत इतका लेट झाला! नाऊ डोन्ट टेल मी, आय अ‍ॅम नॉट यूज्ड टू ट्रॅफीक ओके? लंडनच्या ज्या एरीयात मी राहते, दॅट इज वन ऑफ द वर्स्ट ट्रॅफीक एरीया, बट धिस वॉज सिंपली हॉरीबल! मी कॅब केली, बट दॅट कॅबी ऑल्सो प्रूव्ह्ड टू बी हेल्पलेस!"

"नेव्हर माईन्ड! काय घेणार?"

"यू नो व्हॉट आय प्रिफर! ऑफकोर्स व्हाईट रम!"

धीरजने वेटरला बोलावून ऑर्डर दिली तेव्हा ती आपला स्कार्फ ठीक करण्यात गुंतली होती. वेटरने ड्रिंक्स आणून सर्व्ह केले तरीही तिचं स्कार्फ अ‍ॅडजेस्ट करणं काही संपलं नव्हतं. आधीच तिला येण्यास उशीर झाल्याने तो काहीसा वैतागला होता आणि आल्यापासून तिचं सगळं लक्षं त्या स्कार्फमध्ये असल्याने तो अधिकच अस्वस्थं झाला होता. बर्‍याच वेळाने अखेर तिच्य मनाप्रमाणे स्कार्फ बांधून झाल्यावर त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. पण अद्यापही तिचं समाधान झालं नसावं, कारण आता ती डोळ्यावर असलेला गॉगल अ‍ॅडजेस्ट करण्यात गुंतली होती. भर रात्री गॉगल लावण्याचं काय प्रयोजन होतं त्याला कळेना, पण तिला काही बोलण्यात अर्थ नव्हता. ती सरळ उठून निघून गेली तर त्याने मनात योजलेल्या बेतावर पाणी पडणार होतं.

"तू रात्री झोपतानाही स्कार्फ गुंडाळून आणि गॉगल लावून झोपतेस की काय?" त्याने काहीसं तक्रारीच्या सुरात विचारलं.

"माय फेस इज टू प्रेशस् फॉर मी!" ती खळखळून हसत म्हणाली, "सो आय टेक केअर ऑफ इट अ‍ॅज मज अ‍ॅज आय कॅन! तुला तर माहीतच आहे, आफ्टर ऑल आय अ‍ॅम ट्राईंग टू एन्टर द शो बिझनेस! उद्या मी फिल्मस्टार झाले की ह्याच चेहर्‍यासाठी लोकं जीव टाकतील! सो आय हॅव टू कीप इट मेन्टेन्ड अ‍ॅन्ड फ्रेश ऑल्वेज!"

"ऑफकोर्स! लेट्स टोस्ट टू द फ्यूचर सुपरस्टार ऑफ बॉलीवूड!"

दोघांचे ग्लास भिडले. काही क्षण कोणीच काही बोललं नाही.

"दॅट रिमाईंड्स मी, माझा एक बेस्ट फ्रेंड आज रात्री बँगलोरहून येणार आहे!" आपलं ड्रिंक सिप् करत धीरज म्हणाला, "तो फिल्म इंटस्ट्रीतला एक टॉपचा प्रोड्यूसर आहे! आज रात्री तो माझ्या घरीच राहणार आहे. खरंतर मी त्याला एअरपोर्टवरुनच पिकअप करणार होतो, पण मग तुला भेटायला इथे येता आलं नसतं, सो आय टोल्ड हिम टू टेक अ कॅब!"

"दॅट्स सो नाईस ऑफ यू!"

"तो लवकरच एक नवीन फिल्म लाँच करणार आहे आणि त्यासंदर्भातच डिस्कशन करण्यासाठी तो आज रात्री माझ्याकडे येणार आहे. त्याची फ्लाईट लँड झाली की तो मला कॉल करेल. आपण असं करु, त्याचा कॉल आला की आपण माझ्या घरी जावू! तो या फिल्मसाठी एका नवीन चेहर्‍याच्या शोधात आहे. मी ऑलरेडी तुझ्याबद्दल त्याच्याशी बोललो आहे. आता तो तसा माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, बट आफ्टर ऑल तू त्याला पर्सनली भेटणं फार महत्वाचं आहे. ही इज ऑल्सो इंट्रेस्टेड टू सी यू वन्स बिफोर इट कॅन मूव्ह अहेड! आय अ‍ॅम शुअर यू विल बॅग धिस फिल्म!"

"वॉव!" ती आनंदाने चित्कारली, "यू आर ग्रेट! इफ आय गेट द फिल्म, आय ओ यू अ पार्टी फॉर शुअर! माझा अजूनही विश्वास बसत नाही! इज धिस फॉर रियल ऑर इट्स अ ड्रीम?"

धीरज वॉशरुमच्या दिशेने गेला तेव्हा त्याच्या मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पोरगी बरोबर गळाला लागली होती. एकदा का ती आपल्याबरोबर घरी आली, की पुढचं सगळं अगदीच सोपं होतं! फिल्मलाईनमध्ये चान्स मिळण्यासाठी थोडंफार कॉम्प्रोमाईज करावंच लागतं! आता फक्तं योग्य वेळेस कोणाचा तरी फोन येण्याची व्यवस्था केली आणि जमलं तर कोणाला तरी घरी बोलावलं की काम संपलं! फुकटची मजा मारायला मिळत असेल तर कोण येणार नाही? तो पुन्हा टेबलपाशी आला तेव्हा पुढच्या सुखद कल्पनेनेच त्याच्या अंगावर रोमांच उभे राहीले. एका दमात समोर असलेला पेग रिकामा केला. वेटरला खूण करुन त्याने आणखीन एक लार्ज पेग आणण्याची सूचना केली. दोन मिनिटांतच वेटरने पेग आणून ठेवला तसा तो उठला आणि पुन्हा वॉशरुमला जाण्याच्या निमित्ताने तिथून दूर झाला. दहा मिनिटांनी तो परत आला तेव्हा ती गंभीर चेहरा करुन बसली होती.

"धीरज, एक इमर्जन्सी आली आहे!" ती काहीशा पडेल स्वरात म्हणाली, "आय निड टू गो फॉर सम पर्सनल वर्क!"

"पर्सनल वर्क? आता?" तो नाराजीने म्हणाला, "पण माझ्या प्रोड्यूसर मित्राबरोबरच्या आपल्या मिटींगचं काय? आय हॅव गिव्हन हिम वर्ड ऑन युवर बिहाफ! तुझं काम उद्या नाही का करता येणार? अशी ऑपॉर्चुनिटी पुन्हा पुन्हा मिळत नसते!"

"आय नो! पण मला खरंच आता जावं लागेल! इट्स अ मॅटर ऑफ जस्ट हाफ अ‍ॅन अवर! प्लीज धीरज, फक्तं अर्धा तास वेट कर ना! फॉर माय सेक, प्लीज? आय विल बी बॅक इन हाफ अ‍ॅन अवर, प्रॉमिस! आय डोन्ट वॉन्ट टू लूज धिस ऑपॉर्चुनिटी! एवढंच कर ना माझ्यासाठी धीरज! वन्स आय अ‍ॅम बॅक, तुझ्यासाठी तू म्हणशील ते करायला मी तयार आहे! प्लीज!"

ती इतक्या आर्जवी सुरात म्हणाली की नकळतच त्याची मान होकारार्थी हलली. ती घाईघाईतच बाहेर पडली!

******

"पवई पोलीस स्टेशन! हेड कॉन्स्टेबल तुपे बोलतोय..."

"हॅलो! मी पवई गार्डन सोसायटीचा सेक्रेटरी संजय गांधी बोलतो आहे. आमच्या सोसायटीतला एक माणूस बाल्कनीतून खाली पडला आहे. डोकं पार फुटलं आहे. आय थिंक ही इज डेड! तुम्ही ताबडतोब इथे या!"

"डोकं फुटलं आहे? ठीक आहे. हे पहा गांधी, आम्ही तिथे येईपर्यंत कोणालाही बॉडीला हात लावू देवू नका."

हेड कॉन्स्टेबल तुपेंनी फोन ठेवला आणि सब् इन्स्पे. मढवींची गाठ घेऊन त्यांना ही बातमी दिली. मढवी आपल्या खुर्चीत बसून आरामात पेंगत होते. भल्या पहाटे साडेतीन वाजता असली काही भानगड आपल्यासमोर येईल अशी त्यांना बिल्कूल अपेक्षा नव्हती. तुपेंकडून सारा प्रकार कळताच त्यांच्या डोळ्यावरची झोपेची धुंदी खाड्कन उतरली. पोलीस फोटोग्राफरला आणि त्यापाठोपाठ आपले वरिष्ठ अधिकारी इन्स्पे. सैंदाणेंना या घटनेची खबर देवून ते तुपेंसह घटनास्थळी जाण्यासाठी जाण्यासाठी बाहेर पडले.

रात्रीच्या अंधारात वार्‍याशी स्पर्धा करत पोलिसांची जीप पवई गार्डन सोसायटीच्या गेटमधून आत शिरली. सोसायटीतील रहिवाशांचा बराच मोठा घोळका मधोमध असलेल्या गार्डनमध्ये जमून आपापसात चर्चा करत होता. जवळपास तेवढेच लोक आपापल्या बाल्कनीमधून खाली नजर ठेवून होते. पोलिस आलेले पाहताच मात्रं सर्वजण चिडीचूप झाले. खाली उतरुन मढवींनी त्यांच्याकडे नजर टाकत विचारलं,

"तुमच्यापैकी गांधी कोण आहे?'

"हॅलो ऑफीसर!" सुमारे पन्नाशीचे एक गृहस्थ पुढे झाले आणि हस्तांदोलनासाठी हात पुढे करत म्हणाले, "माझं नाव संजय गांधी! मी आमच्या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. मीच तुम्हाला फोन केला होता!"

"गांधी, नेमकं काय झालं सांगू शकाल?"

"सर्टनली! पहाटे सव्वातीनच्या सुमाराला डोअरबेल वाजल्यामुळे मला जाग आली. आमचा वॉचमन शंभूनाथ दारात होता. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याने दिलेल्या माहितीवरुन आम्ही खाली जाऊन पाहिलं तो हा प्रकार दिसला. त्याची अवस्थाच अशी होती की डॉक्टरना फोन करण्यात काही पॉईंटच नव्हता म्हणून मी तुम्हाला फोन केला!"

गांधींशी बोलता-बोलता मढवी मृतदेहापाशी आले. बिल्डींगपासून सुमारे पाच-सहा फूट अंतरावर काँक्रीटच्या पेव्हमेंटवर तो मृतदेह पडलेला होता. तो सुमारे तिशीचा तरुण असावा. काळी जीन्स आणि मूळचा पांढरा रक्तात न्हाऊन निघाल्याने अर्ध्याच्यावर लालेलाल झालेला टी-शर्ट त्याच्या देहावर होता. तो बर्‍याच उंचावरुन खाली पडलेला असावा कारण कवटी तर फुटलेली होतीच, पण त्याच्या मेंदूचे तुकडेही इतस्तत: विखुरलेले होते. चेहरा पूर्णपणे चेचला गेलेला होता. जमिनीवर डोकं आपटताक्षणीच त्याला मृत्यू आला असावा असा मढवींनी अंदाज बांधला. ते मृतदेहाचं निरीक्षण करत असतानाच पोलिस फोटोग्राफर आणि फिंगर प्रिंट एक्स्पर्टस तिथे पोहोचले होते. फोटोग्राफर मढवींच्या सूचनेप्रमाणे आवश्यक त्या सर्व अँगल्समधून फोटो काढत होता. त्याचं हे काम सुरु असतानाच इन्स्पे. सैंदाणेंची जीप तिथे येऊन पोहोचली. त्यांना पाहताच मढवी, तुपे आणि इतर पोलिसांनी कडक सॅल्यूट ठोकले. सैंदाणेंनी काही क्षण मृतदेहाचं निरीक्षण केलं आणि ते मढवींकडे वळले.

"फॅक्ट्स काय आहेत?"

"प्रथमदर्शनी तरी अ‍ॅक्सीडेंटची केस वाटते सर, कदाचित सुसाईडही असू शकेल!"

"हं...." सैंदाणेंनी गांधींना विचारलं, "कोण आहे हा? कुठल्या फ्लॅटमध्ये राहतो?"

"हा धीरज सक्सेना आहे सर! सी विंगमध्ये सोळाव्या फ्लोरवर राहतो. फ्लॅट नंबर १६०३! आमच्या सोसायटीतल्या सर्वात टॉप फ्लोअरला असलेल्या फ्लॅट्सपैकी एक फ्लॅट! बाकीच्या सर्व विंग्ज १२ किंवा १४ फ्लोअरच्या आहेत!" गांधींनी माहिती पुरवली.

"सोळावा मजला, तरीच डोकं असं फुटलं आहे!" सैंदाणे विचार करत म्हणाले, "घरी कोणकोण आहे याच्या? आई-वडील, बायको?"

"कोणीही नाही. एकटाच राहतो तो इथे"

"अच्छा? गांधी, जरा आमच्याबरोबर चला आणि याचा फ्लॅट दाखवा. तुमच्याकडे मास्टर की असेल ना?"

"घरी आहे. लेट मी गेट इट सर!"

गांधी किल्ली घेऊन येईपर्यंत सैंदाणेंनी हेड कॉन्स्टेबल तुपेंना पुढील सूचना दिल्या आणि ते मढवींसह सी विंगकडे वळले. लिफ्टने सोळाव्या मजल्यावर आल्यावर धीरजच्या फ्लॅटकडे वळण्यापूर्वी त्यांनी मधल्या पॅसेजची पाहणी केली. प्रत्येक मजल्यावर एकूण चार फ्लॅट होते, पण पॅसेजची रचना अशी वैशिष्ट्यपूर्ण केली होती की कोणत्याही फ्लॅटमधून दुसर्‍या फ्लॅटचं प्रवेशद्वार दिसत नव्हतं. धीरजचा फ्लॅट पॅसेजच्या पुढच्या बाजूला होता. गांधींनी आणलेली मास्टर की लावून मढवींनी फ्लॅटचं दार उघडलं. त्यांच्याच सूचनेनुसार मोबाईलच्या प्रकाशात स्विचबोर्ड शोधून मढवींनी होती नव्हती ती सर्व बटणं चालू केली. झगझगीत उजेडाने हॉल उजळून निघाला.

हॉल चांगला प्रशस्तं होता. सुमारे १६ बाय १२ चा तरी असेल. मोजकंच सामान ठेवल्यामुळे तो अधिकच मोठा वाटत होता. एका भिंतीवर असलेल्या वॉल माऊंटींगवर टी.व्ही. होता. टी.व्ही.च्या बरोबर समोर किमान तीन-चार माणसं तरी ऐसपैस बसू शकतील असा सोफा होता. एका कोपर्‍यात लहानसा बार होता. धीरज व्हिस्कीचा शौकीन असावा. बारमध्ये बर्‍याच इम्पोर्टेड व्हिस्कीच्या बाटल्या होत्या. त्याच्या बाजूलाच आटोपशीर डायनिंग टेबल आणि चार खुर्च्या होत्या. सोफ्यासमोरच काचेचा टी-पॉय होता. बॅचलर अजिबात पसारा नव्हता. हॉलमधलं सर्वकाही जागच्या-जागी होतं.

सैंदाणेंनी फोटोग्राफरला हॉलचे फोटो काढण्याची सूचना दिली आणि ते आतल्या पॅसेजकडे वळले. पॅसेजचं एक दार किचनमध्ये उघडत होतं. किचनमध्येही मोजकंच सामान होतं. ओट्यावर एक पिझ्झाचा उघडा बॉक्स होता. बॉक्समध्ये पिझ्झाचे दोन पीस अद्यापही तसेच होते. त्याच्या शेजारीच ब्रेडचं एक पुडकंही पडलेलं होतं. फ्रीजमध्ये पाणी आणि सोड्याच्या बाटल्या, अंड्याचा मोठा कार्टन आणि बटर, थोड्याफार भाज्या होत्या. पॅसेजच्या दुसर्‍या टोकाला दोन बेडरुम्स होत्या. एका बेडरुममध्ये फक्तं कॉम्प्युटर डेस्क आणि चेअर होती. बाकी संपूर्ण बेडरुम रिकामीच होती. दुसर्‍या बेडरुममध्ये डबलबेड आणि भिंतीतला वॉर्डरोब होता. बेडरुमच्या भिंतीवर गोर्‍या मॉडेल्सची अत्यंत हॉट पोस्टर्स लावलेली होती.

"बराच रसिक होता की हा धीरज!"

सैंदाणे पोस्टर्स पाहून मढवींना म्हणाले. याच बेडरुमचं दार बाल्कनीत उघडत होतं. बाल्कनी म्हणण्यापेक्षा ती एक लहानशी ओपन टेरेसच होती. त्यातच सोसायटीतल्या सर्वात उंचावरच्या फ्लॅट्सपैकी एक असल्याने पेंट हाऊस असल्यासारखा फील येत होता. टेरेसमध्येही एक लहानसं टेबल आणि इझी चेअर होती. सोळावा मजला असल्याने वार्‍याचा जोर चांगलाच होता. सैंदाणेंनी टेरेसच्या कोपर्‍यात असलेलं दिव्याचं बटण शोधून काढलं, पण दिवा लागला नाही. बहुतेक बल्ब गेला असावा. दिवस उजाडल्यावर टेरेसची तपासणी करण्याचा विचार करुन ते परत आत शिरले आणि फ्लॅटचं दार उघडून बाहेरच्या पॅसेजमध्ये आले.

सोळाव्या मजल्यावर असलेल्या इतर फ्लॅट्समधल्या लोकांबद्द्ल त्यांनी गांधींकडे चौकशी केली. १६०१ नंबरचा फ्लॅट मायकेल परेरांचा होता. दोन महिन्यापूर्वी ते आपल्या मुलाकडे अमेरीकेत गेले होते. १६०२ मध्ये सौमित्रं बॅनर्जी राहत होते. ते देखिल गेल्या आठ दिवसांपूर्वी दुर्गापुजेच्या निमित्ताने कलकत्त्याला गेलेले होते. १६०४ मध्ये राह्त असलेले मालवणकर तेवढे तिथे हजर होते.

"धीरजबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कशा प्रकारचा माणूस होता?"

"फारसं काही नाही साहेब! पॅसेजमध्ये किंवा लिफ्टमध्येच कधी त्याच्याशी गाठ पडली हसायचा, तेवढ्यापुरतं दोन शब्दं बोलायचा इतकंच! तो काय काम करतो वगैरे कधी बोलला नाही, पण त्याची कॉम्प्युटर इन्स्टीट्यूट आहे असं कानावर आलं होतं. कदाचित त्यामुळेच असेल, पण कायम एकदम अप टू डेट आणि पॉश राहयचा. कायम ब्रँडेड कपडे आणि सेंट्स वापरायचा. मात्रं त्याची संगत फारशी चांगली नसावी साहेब! त्याचे तीन-चार मित्रं नेहमी येत असत. रात्री उशिरा आणि पहाटेपर्यंतही त्यांचा धांगडधिंगा आणि दारु पार्ट्या चालायच्या. त्यांच्यापैकी एकाचा बाप राजकारणी होता त्यामुळे त्यांना काही बोलूनही उपयोग होत नव्हता. बर्‍याचदा वेगवेगळ्या मुलीही त्याला भेटायला येत असत. आता वरकरणी हाय-फाय वाटत असल्या तरी त्या कोणत्या टाईपच्या मुली होत्या हे कोणीही ओळखू शकलं असतं! आम्ही एक-दोन वेळा त्याची कंप्लेंटही केली होती, पण मी जे काही करतो ते माझ्या फ्लॅटमध्ये चार भिंतींच्या आड करतो असं उत्तर देऊन त्याने आम्हाला गप्पं केलं होतं साहेब!"

मालवणकरांनी एका दमात माहिती दिली. गांधींनीही होकारार्थी मान डोलवत त्यांना पुष्टी दिली. आपल्याला आणखीन फारसं काही कळणार नाही याची कल्पना येऊन सैंदाणे लिफ्टकडे वळले तोच मालवणकारांना काहीतरी आठवलं,

"काल रात्रीही अकराच्या सुमाराला त्याच्याकडे एक मुलगी आली होती साहेब! पण एरवी येणार्‍या मुलींसारखी ती मुलगी नसावी कारण तिच्याकडे त्याच्या फ्लॅटची किल्ली होती. किल्लीने दार उघडून ती आतमध्ये शिरली!"

"मुलगी?" सैंदाणे चमकले, "तुम्ही पाहिलीत तिला? तिचं वर्णन करु शकाल?"

"सॉरी सर! मी तिचा चेहरा वगैरे पाहिला नाही. मी आणि माझी मिसेस नुकतेच बाहेर डिनर घेऊन परतलो होतो. फ्लॅटचं कुलुप काढून आम्ही दोघंही आत गेलो आणि पाच मिनिटांनी ट्रॅशबिन बाहेर ठेवण्यासाठी म्हणून मी दार उघडलं. नेमक्या त्याच वेळेस लॅच उघडल्याचा आवाज आला म्हणून सहज पॅसेजमध्ये डोकावलो तेव्हा ती आत शिरत होती. तिने मोठा ओव्हरकोट घातला होता आणि पायात हील्सचे सँडल्स होते एवढंच बघू शकलो!"

"ती मुलगी आली तेव्हा धीरज घरी होता?"

"माहीत नाही साहेब, पण कदाचित नसावा नाहीतर ती किल्लीने दार उघडून आत गेली नसती!"

मालवणकरांनी दिलेल्या माहितीबद्द्ल त्यांचे आभार मानून सैंदाणेंनी धीरजच्या फ्लॅटला कुलूप लावलं आणि गांधींसह ते लिफ्टने खाली आले. एव्हाना बिल्डींगच्या खाली पोलिसांची हर्स आली होती. मढवींनी सोसायटीतल्याच दोन रहिवाशांसमोर इन्क्वेस्ट पंचनामा करुन धीरजचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याची व्यवस्था केली होती. सैंदाणेंनी गांधीना घरी पाठवून दिलं आणि वॉचमनला बोलावण्यास एका शिपायाला पिटाळलं. अवघ्या मिनीटभरातच थरथर कापत वॉचमन त्यांच्यासमोर हजर झाला. सैंदाणेंनी त्याला एकदा आपादमस्तंक न्याहाळलं आणि दुसर्‍या शिपायाला चहा मागवण्याची सूचना दिली. चहा पिऊन वॉचमन जरासा सावरल्यावर सैंदाणेंनी त्याला आपल्यासमोर बसवलं.

"शंभूनाथ नाव ना तुझं?"

"जी साब!" शंभूनाथ हात जोडत म्हणाला, "शंभूनाथ कुशवाह!"

"तू एकटाच वॉचमन आहेस इथे?"

"नाही साबजी ! माझ्याबरोबर महेंद्रनाथ म्हणून दुसरा वॉचमन आहे. तो दुसर्‍या गेटवर असतो, पण त्याला बरं नसल्यामुळे तो आलेला नाही. कालपासून मी एकटाच ड्यूटीवर आहे!"

"दुसरं गेट? कुठे आहे हे दुसरं गेट?"

"सी विंगच्या मागच्या बाजूला आहे साबजी ! पण त्या गेटमधून फक्तं सायकली आणि बाईक्सच आत येऊ शकतात. मोठ्या गाड्यांना मेनगेटमधूनच यावं लागतं."

"बरं! आता सांग काल रात्री काय झालं?"

"काल सकाळपासून मी ड्यूटीवर होतो! सकाळीच महेंदरचा फोन आला की तो आज येऊ शकणार नाही. मी त्याप्रमाने गांधीसाबना सांगितलंही, पण त्यांनी मलाच दोन्ही गेट सांभाळण्याचा हुकूम केला. दिवसभर सगळं ठीक होतं. रात्री नऊनंतर मी दोन्ही गेट बंद केली आणि मेनगेटपाशी असलेल्या चौकीत बसलो होतो. छोट्या गेटवर कोणी आलं असतं तर त्यांनी गेटच्या बाहेर असलेला अलार्म वाजवला असता आणि मला चौकीत कळलं असतं. रात्री साडेदहाच्या सुमाराला मालवणकरसाबची गाडी आली. त्यानंतर अकरा वाजता बी विंगमध्ये राहणारे त्रिपाठीसाब आले. त्यांच्यानंतर बारा वाजता सक्सेनासाब आले!"

"अच्छा? पुढे काय झालं?"

"महेंदर नसल्यामुळे मी दर अर्ध्या - पाऊण तासाने सोसायटीत दहा - पंधरा मिनीटं राऊंड मारत होतो साहेब. पहाटे तीननंतर अशीच राऊंड मारत मी मागच्या गेटपाशी आलो असतानाच अचानक काहीतरी आदळल्यासारखा धप्प SSS असा आवाज झाला. घाईघाईने मी पुढच्या गेटच्या दिशेने धावत आलो. मी सी-विंगच्या समोर आलो असतानाच 'वॉचमन SS' अशी माझ्या नावाची हाक मारलेली ऐकू आली. मी तिकडे वळलो तेवढ्यात सी-विंगच्या पार्कींगच्या साईडच्या एन्ट्रन्समधून एक मॅड्म बाहेर आल्या. त्यांनी पुढच्या बाजूला बोट दर्शवलं आणि सेक्रेटरी साहेबांना बोलवण्यास सांगितलं. मी धावत जाऊन पाहिलं तर सक्सेनासाब पडले होते. त्यांच्या डोक्याचा पार चेंदामेंदा झालेला होता. असा प्रकार मी जन्मात कधी पाहिला नव्हता साबजी! जे काही खाल्लं होतं ते पोटात ढवळायला लागलं. काय करावं हे मला कळलंच नाही. एव्हाना दोन-चार घरांतून दिवे लागले होते. तेवढ्यात सी-विंगमधले रुपानीसाब खाली आले आणि त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगून मी गांधीसाबना बोलावण्यासाठी त्यांच्या घरी गेलो!"

"ती मॅडम कोण होती हे तू ओळखलंस? तिचा चेहरा पाहिलास?"

"नाही साबजी! एकतर रात्रीचा अंधार होता आणि ती एन्ट्रन्सच्या लाईटखालीच उभी होती त्यामुळे तिचा चेहरा अंधारात होता. आणि नेमकी काय भानगड झाली असावी हे न कळल्यामुळे मी पण गोंधळून गेलो होतो साहेब. तिने मोठा कोट घातला होता आणि डोक्यावर कपडा गुंडाळलेला होता. बहुतेक तिच्या डोळ्यांवर चष्मा असावा साबजी, पण मला नक्की सांगता येणार नाही. गांधीसाबना बोलावून आणल्यावर मी पुन्हा तिथे जाऊन पाहिलं तेव्हा मात्रं ती तिथून गायब झाली होती!"

"काळा कोट आणि डोक्यावर कपडा! नक्की ही तीच असणार!" सैंदाणे मढवींना म्हणाले, "शंभूनाथ, त्या बाईला तू यापूर्वी कधी पाहिलं होतंस? कधी सक्सेनाकडे आली होती याआधी?"

"नहीं साबजी!" शंभूनाथ उत्तरला, मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं करत तो म्हणाला, "एक बात याद आयी साबजी, काल रात्री साडेदहाच्या सुमाराला मागच्या गेटचा अलार्म वाजल्याची चौकीत रिंग आली. मी मागच्या गेटवर जाऊन पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. मी गेटमधून बाहेर पडून रस्त्यावरही पाहीलं, पण कोणीच दिसलं नाही. मी मागचं गेट बंद करुन मेनगेटवर परत आलो तेव्हा मेनगेटच्या बाजूचं जे लहान गेट आहे ते उघडं दिसलं. मला त्यावेळी आश्चर्य वाटलं साबजी, पण सोसायटीतच राहणारं कोणीतरी आलं असावं असा विचार करुन मी गेट बंद करुन घेतलं."

"एक सांग शंभूनाथ, चौकीत रिंग वाजल्यावर मागच्या गेटपर्यंत जाऊन आणि तिथे कोणी नाही हे पाहिल्यावर मागचं गेट बंद करुन पुन्हा चौकीत येण्यासाठी किती वेळ लागला तुला?"

"दहा मिनीटं तरी नक्कीच लागली साहेब. कारण गेट उघडून मी रस्त्यावरही जाऊन पाहिलं होतं."

"आणि तू राऊंड मारत असताना धीरज खाली पडल्याचा आवाज झाल्यावर पुन्हा सी-विंगशी पोहोचण्यास तुला किती वेळ लागला?"

"मी त्यावेळेस पार मागच्या कॉर्नरला होतो साबजी! आवाज आल्यावर काय झालं असावं याचा अंदाज घेऊन मी धावत इकडे आलो तरी चार - पाच मिनीटं तरी लागली असावीत!"

सैंदाणे काहीच बोलले नाहीत. त्यांचं विचारचक्रं सुरु होतं. दोन वॉचमनपैकी एक रजेवर असल्याचा चाणाक्षपणे फायदा घेऊन शंभूनाथच्या नजरेस न पडता त्या मुलीने सोसायटीत प्रवेश मिळवून धीरजचा फ्लॅट गाठला होता. धीरज बाहेरख्याली होता आणि नेहमी वेगवेगळ्या मुलींना फ्लॅटवर आणत होता. ही मुलगी मात्रं किल्लीने दरवाजा उघडून त्याच्या फ्लॅटमध्ये शिरली होती. मालवणकर आणि शंभूनाथ यांनी दिलेल्या माहितीवरुन ती मुलगी अकराच्या सुमाराला आली होती आणि धीरज बारा वाजता आला होता. याचा अर्थ धीरज येण्यापूर्वी सुमारे तासभर ती मुलगी त्याच्या फ्लॅटमध्ये त्याची वाट पाहत होती आणि तो घरी परतल्यावरही पुढचे तीन तास त्याच्या फ्लॅटमध्येच होती. धीरज बाल्कनीतून खाली पडल्यावर त्याच्या फ्लॅटचं लॅच ओढून लिफ्टने खाली येण्यास तिला चार - पाच मिनीटं पुरेशी होती. अचानकपणे समोर आलेल्या शंभूनाथला सहजपणे चकवून ती तिथून निसटली होती. याचा अर्थ सरळ होता, धीरजच्या मृत्यूमागे तिचा हात होता किंवा त्यावेळेस आपण तिथे हजर होतो हे लपविण्याचा तिचा हेतू होता!

एव्हाना सकाळचे साडेसात वाजत आले होते. सैंदाणेंनी शंभूनाथला पाठवून दिलं आणि पुन्हा धीरजच्या फ्लॅटकडे मोर्चा वळवला. मढवी, पोलिस फोटोग्राफर आणि फिंगर प्रिंट एक्स्पर्ट्स यांच्यासह त्यांनी धीरजचा फ्लॅट गाठला आणि बेडरुममधलं दार उघडून बाल्कनी कम टेरेसमध्ये आले. आदल्या रात्रीच्या अंधारात टेरेस त्यांना नीटपणे पाहता आली नव्हती. अर्थात टेरेसमध्ये छोटंसं टेबल आणि इझी चेअर सोडली तर पाहण्यासारखं फारसं काही नव्हतंच. सैंदाणेंनी टेरेसच्या रेलींगची काळजीपूर्वक पाहणी केली. रेलिंगवर एक-दोन ठिकाणी घासण्याच्या खुणा दिसत होत्या. इतकंच नव्हे तर रेलिंगखालच्या जमिनीवर असलेल्या थोड्याशा धुळीत हील्सच्या सॅडलचा एक ठसा त्यांना आढळला. हा ठसा अर्थातच धीरजकडे आलेल्या त्या मुलीच्या सँडलचा असणार यात कोणतीच शंका नव्हती. 'याचा अर्थ ती मुलगी इथे उभी होती!' सैंदाणेंच्या मनात आलं.

"मढवी, धीरजची बॉडी बिल्डींगपासून किती अंतरावर पडली होती?" टेरेसमधून खाली पाहत त्यांनी मढवींना विचारलं.

"पाच फूट दहा इंच!" मढवींनी पंचनाम्यात लिहीलेला आकडा वाचला.

'पाच फूट दहा इंच...' सैंदाणे स्वत:शीच पुटपुटत म्हणाले. त्यांचं विचारचक्रं पुन्हा सुरु झालं होतं. एव्हाना फोटोग्राफर आणि फिंगर प्रिंट एक्स्पर्ट्सचं काम आटपलं होतं. टेरेसच्या रेलिंगवर त्यांना भरपूर प्रिंट्स मिळाल्या होत्या. फ्लॅटला कुलूप घालून सर्वजण खाली आले तोपर्यंत धीरजचा मृतदेह घेऊन पोलिस हर्स राजावाडी हॉस्पिटलच्या दिशेन निघून गेली होती. सैंदाणे आणि मढवी धीरज नेमका ज्या ठिकाणी पडला होता तिथे आले. मृतदेहाची नेमकी जागा खडूने बाह्याकृती काढून दर्शवण्यात आलेली होती. ती आकृती आणि खासकरुन बिल्डींगच्या भिंतीपासूनचं तिचं अंतर पाहिल्यावर सैंदाणेंचा चेहरा गंभीर झाला होता.

"मढवी, धीरजचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट लवकरत लवकर देण्याची राजावाडीच्या डॉक्टरांना विनंती करा." सोसायटीतलं काम आटपून पोलीस स्टेशनवर परतताना सैंदाणे मढवींना सूचना देत होते, "या धीरजचा सगळा इतिहास खणून काढा. त्याची कॉम्प्युटर इन्स्टीट्यूट, त्याचे मित्रं, त्याच्याकडे येणार्‍या मुली सगळ्यांची नीट चौकशी करा. त्याचं मोबाईल रेकॉर्डही तपासून बघा. धीरजच्या बॉडीची परिस्थिती आणि बिल्डींगच्या भिंतीपासूनचं अंतर विचारात घेतलं तर त्याने आत्महत्या निश्चितच केलेली नाही. धीरजने बाल्कनीतून स्वत: उडी मारली असती तर तो बिल्डींगपासून किमान दहा - बारा फूट अंतरावर पडला असता. मात्रं आपल्याला त्याची बॉडी भिंतीपासून साडेपाच फुटांवर सापडली आहे. याचा अर्थ तो अपघाताने खाली पडला असावा किंवा त्याला वरुन कोणीतरी खाली फेकलं असावं आणि माझ्या अंदाजाप्रमाणे हीच शक्यता जास्तं आहे! हा एक अत्यंत डोकेबाजपणे केलेला खून आहे. काल रात्री धीरजकडे आलेल्या त्या मुलीचा या खुनात हात आहे किंवा ती या खुनाची महत्वाची साक्षीदार आहे! शंभूनाथला सहजपणे फसवून ती पळून गेली याचा अर्थ ती इथे आसपासच राहणारी असावी किंवा तिच्याकडे नक्कीच कोणती तरी गाडी असावी! त्यादृष्टीने प्रयत्नं करा. इथे आसपास असणारे आणि रात्री धंदा करणारे रिक्षावाले - टॅक्सीवाले, कॉल सेंटरचे कॅबवाले यांच्याकडे चौकशी करा. आपल्या सगळ्या खबर्‍यांना कामाला लावा. कोणत्याही परिस्थितीत ती मुलगी आपल्याला सापडलीच पाहिजे!"

******

डोक्यावर गार पाणी पडलं तसा धीरज खडबडून जागा झाला.

एक क्षणभर नेमकं काय झालं हेच त्याला कळलं नाही, पण भानावर आल्यावर आपण आपल्याच घरात आपल्याच बेडरुममध्ये आहोत हे ध्यानात आल्यावर त्याला जरा हायसं वाटलं. आपल्याला बहुतेक एखादं स्वप्नं पडलं असावं! पण.... पण अद्यापही केसांवरुन पाणी ओघळतं आहे, याचा अर्थ ते निश्चितच स्वप्नं नव्हतं! याचा अर्थ... आपल्याव्यतिरिक्तं घरात आणखीन कोणीतरी आहे! पण कोण? एखादा चोर तर घुसलेला नाही? पण चोर असेल तर तोंडावर पाणी ओतून आपल्याला कशासाठी जागं करेल? मग दुसरं कोण....

"धीरज...."

अचानक त्याच्या कानावर एका स्त्रीचा आवाज आला तसा त्याचा थरकाप झाला.

"कोण? कोण आहे?" त्याने कसंबसं धीर करुन विचारलं.

"एवढ्यात विसरलास मला धीरज? आताशी तर जेमतेम नऊ-दहा महिने झाले असतील... "

"नऊ-दहा महिने? कोण आहेस तू ...." त्याने चाचरत विचारलं.

त्याचं वाक्यं पूर्ण होण्यापूर्वीच अचानक एक चेहरा त्याच्यासमोर प्रगट झाला.

"तू SSS ?" तो कसाबसा म्हणाला.

"ओळखलंस मला धीरज?" तिचा आवाज बर्फासारखा थंड, पण तितकाच धारदार होता, " तुला काय वाटलं, इतक्या सहजासहजी सगळं संपलं? तू जे काही केलंस ते कोणालाही कळणार नाही? तुझ्यापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही? नाही धीरज! तू... खरंतर तुम्ही सगळ्यांनी जे काही केलंत त्याची किम्मत चुकवण्याची आता वेळ आली आहे.... आणि माझ्यादृष्टीने त्याची किम्मत एकच आहे धीरज, ती म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाचा मृत्यू!"

धीरजच्या तोंडून शब्दं फुटत नव्हता. तिचा चेहरा पाहून तो इतका हादरला होता की त्याला काही सुचत नव्हतं. तिच्या निस्तेज निर्जिव डोळ्यात त्याला आपलं भीषण भवितव्यं दिसत होतं! निर्वाणीचा प्रयत्नं म्हणून तो सगळा जोर लावून बेडवरुन उठण्याचा प्रयत्नं करु लागला, पण आपल्या हातापायांतली सगळी शक्तीच कोणीतरी काढून घेतली असं त्याला वाटत होतं. हात जेमतेम हलवता येत होते, पण त्यावर भार देत उठून बसणं अशक्यं झालं होतं. त्याची चाललेली धडपड पाहून ती भेसूर हसली.

"काय झालं धीरज? हात - पाय हलवता येत नाहीत? बेडवरुन उठता येत नाही?" ती कुत्सितपणे म्हणाली, "डोन्ट इव्हन ट्राय! तुला आता बेडवरुन कधीच उठता येणार नाही! तुझ्या शरीराचा प्रत्येक अवयव आता असाच निकामी होत जाणार आहे! शेवटच्या क्षणापर्यंत असाच तडफडणार आहेस तू धीरज! स्वत:ला मरण यावं म्हणून भीक मागशील तू, पण सुखासुखी मरण येणार नाही याची मी काळजी घेईन! युवर टाईम इज अप मि. धीरज सक्सेना!"

"प्लीज.... माझ्यावर दया कर! मला माफ कर! त्या सगळ्यांच्या नादाला लागून मी खूप मोठी चूक केली...."

"तुला माफ करु? तुझ्यावर दया करू?" तिने अशा काही स्वरात विचारलं की त्याचा थरकाप उडाला, "तुला कधी कोणाची दया आली का रे धीरज? पण चल, तरीही मी तुला एक चान्स देते...."

त्याने आशेने तिच्याकडे पाहीलं. जीव वाचवण्याची अखेरची संधी!

"मी तुला फक्तं काही प्रश्नं विचारणार आहे! त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला आधीच माहीत आहे, फक्तं ते मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. एक शब्दही चुकीचा उच्चारलास किंवा खोटं बोलण्याचा प्रयत्नं केलास, तर त्याच क्षणी तुला कल्पनाही केली नसशील इतका भयानक मृत्यू येईल. माझ्या सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं दिलीस, तर मात्रं मी तुला सोडून देईन आणि जशी आले तशी निघून जाईन!"

.... आणि धीरज बोलू लागला!

******

इन्स्पे. सैंदाणे गंभीरपणे आपल्या समोरचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट वाचत होते. आदल्या दिवशी संध्याकाळीच राजावाडी हॉस्पिटलच्या डॉक्टरनी त्यांना फोन करुन थोडीफार कल्पना दिली होती. त्यांचा तपशीलवार रिपोर्ट सकाळी सैंदाणेंच्या समोर आला होता. ते रिपोर्ट पाहण्यात मग्नं असतानाच सब् इन्स्पे. मढवी आले.

"जयहिंद सर! हे धीरज सक्सेनाचं मोबाईल रेकॉर्ड!" मढवींनी हातातलं पाकीट सैंदाणेंच्या समोर ठेवलं.

सैंदाणेंनी धीरजचं मोबाईल रेकॉर्ड काळजीपूर्वक तपासून पाहिलं. धीरजचा मोबाईल त्यांच्याकडे होताच. मढवींनी आणलेलं कॉल रेकॉर्ड मोबाईलमधल्या कॉल रजिस्टरशी पडताळून पाहताना ते एकदम चमकले. धीरजच्या मोबाईलमधल्या कॉल रजिस्टरप्रमाणे त्याला आलेला शेवट्चा फोन कोणा उदय नामक व्यक्तीचा होता. परंतु धीरजचं मोबाईल रेकॉर्ड मात्रं काहीतरी वेगळंच दर्शवत होतं. उदयचा फोन येऊन गेल्यावर धीरजला पहाटे तीनच्या सुमाराला एका नंबरवरुन मेसेज आला होता. हा मेसेज आला त्यावेळेस धीरजच्या मोबाईलचं लोकेशन तो आपल्या घरीच असल्याचं दर्शवत होतं. आश्चर्याची गोष्टं म्हणजे याच नंबरवरुन रात्री अकराच्या सुमाराला धीरजला फोन आला होता आणि जेमतेम मिनिटभर बोलणं झालं होतं. सैंदाणेंनी धीरजच्या मेसेंजरची इनबॉक्स चेक केली, पण तो मेसेज मात्रं त्यांना आढळला नाही. त्यांनी दोन-तीन वेळेस तो नंबर डायल करुन पाहिला, पण तो स्विच ऑफ होता.

"मढवी, ही नक्कीच काहीतरी वेगळी भानगड आहे." धीरजच्या मोबाईल रेकॉर्ड आणि कॉल रजिस्टरची त्यांना माहिती देत सैंदाणे म्हणाले, "राजावाडीतून धीरजचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आला आहे. धीरज पहाटे सव्वातीनच्या सुमाराला बाल्कनीतून पडला आहे असं शंभूनाथ आणि गांधींचं स्टेटमेंट आहे आणि त्याचा मृत्यू त्याच्या डोक्यावर झालेल्या आघातामुळेच झालेला आहे हे देखिल सत्यं आहे पण धीरज स्वत: बाल्कनीतून खाली ऊडी मारणं शक्यंच नव्हतं, इतकंच काय मृत्यूपूर्वी अर्धा तास त्याला सरळ बसणंही अशक्यं झालं असावं! मढवी, बाल्कनीतून खाली पडण्यापूर्वी अर्धा तास धीरजला पॅरेलिसीसचा अ‍ॅटॅक आला होता आणि कोणत्याही प्रकारे हालचाल करण्यास तो असमर्थ होता!"

"का SS य?" मढवी वेड्यासारखे सैंदाणेंकडे पाहत राहीले.

"होय मढवी. पोस्टमॉर्टेम करणार्‍या डॉक्टरना धीरजच्या पोटामध्ये एका विशिष्टं प्रकारचं औषध आढळून आलं आहे. या औषधामुळेच त्याला पॅरेलिसीसचा अ‍ॅटॅक आला आहे आणि बहुतेक त्यामुळे तो बेशुद्धही झाला असावा. त्यानंतर त्याला बाल्कनीतून फेकण्यात आलं आहे. हा अपघात किंवा आत्महत्या नाही मढवी, मी कालच अंदाज केल्याप्रमाणे हा सरळ-सरळ खून आहे. त्यादृष्टीनेच आपल्याला पुढच्या हालचाली कराव्या लागणार आहेत. धीरजकडे आलेल्या त्या मुलीचा काही तपास लागला?"

"नाही सर! तिच्याबद्दल अद्यापही काहीही कळलेलं नाही. आपल्या कोणत्याही खबर्‍याकडूनही काहीही बातमी आलेली नाही. आम्ही इथल्या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांकडे तसंच कॉलसेंटरच्या कॅबवाल्यांकडेही चौकशी केली, पण अद्यापतरी काहीही हाती लागलेलं नाही."

"त्या धीरजच्या मित्र-मैत्रिणींबद्दल काय कळलं?"

"सर हा धीरज घाटकोपर स्टेशनच्या जवळ एक कॉम्प्युटर इन्स्टीट्यूट चालवतो. इतकंच नव्हे तर एक एम्प्लॉयमेंट एक्सचेंज चालवतो. अर्थात हे केवळ नावापुरतंच, कारण या एक्सचेंजमधून फारशा कोणाला नोकर्‍या मिळालेल्या नाहीत. खरंतर हा धीरज फक्तं नावापुरता या दोन्हीचा मालक आहे. खरा मालक आहे आमदार भरतदादा चव्हाणांचा मुलगा किरण चव्हाण!"

"आमदार भरतदादा चव्हाण?" सैंदाणे चपापले. हे प्रकरण अत्यंत सावधपणे हाताळावं लागणार याची त्यांना कल्पना आली. "एक काम करा मढवी, या धीरजच्या मित्रांना बोलावून घ्या. त्यांच्याकडे चौकशी करावी लागेल. आमदार चव्हाणांच्या चिरंजीवांनाही बोलवावं तर लागेलच! बघू काय कळतं त्यांच्याकडून. दरम्यान तुम्ही त्या मुलीचा शोध सुरुच ठेवा. आणखीन एक धीरजच्या कॉल रेकॉर्डमध्ये असलेला तो शेवटचा नंबर ज्यावरुन त्याला मेसेज आला आहे, तो कोणाचा आहे याचा पत्ता लावा आणि त्या माणसाला बोलावून घ्या! या प्रकरणाची बातमी आपल्या रोजच्या नोटीसमध्येही पाठवून द्या!"

इन्स्पे. सैंदाणेंच्या सूचनेप्रमाणे मढवींनी धीरजच्या मित्रांना फोन करुन स्टेटमेंट देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं. त्यांच्या अपेक्षेविरुद्ध खुद्दं किरण चव्हाण इतर तिघा मित्रांना घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी सैंदाणेंना येऊन भेटला. धीरजच्या मृत्यूचा चौघांनाही चांगलाच धक्का बसलेला होता. खासकरुन त्याचा मित्रं उदय इनामदार फारच अपसेट झाला होता.

"रात्री बारा वाजता त्याचा मला फोन आला होता सर!" उदय म्हणाला, "त्यावेळेस तो घरी चालला होता. कार ड्राईव्ह करत असल्यामुळे फारसं बोलणं झालं नाही. ऑल्मोस्ट घरी पोहोचलो असल्याचं त्याने सांगितलं. तेच बोलणं शेवटचं ठरेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं!"

सैंदाणेंनी चौघांकडेही काळजीपूर्वक आणि तपशीलवार चौकशी केली. धीरजची कोणाशीही कोणत्याही प्रकारची दुष्मनी किंवा वादविवाद असल्याचं चौघांनीही ठामपणे नाकारलं. सैंदाणेंनी धीरजच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या आर्थिक व्यवहारांबद्दल आणि एकूणच कारभाराबद्दल किरणलाही छेडून पाहिलं, पण आपण त्याला केवळ आर्थिक मदत केली होती, रोजच्या कामाशी आपला काहीही संबंध नव्हता असं सांगत त्याने कानावर हात ठेवले. बाहेर पडताना काहीही करुन धीरजच्या मृत्यूचा लवकरात लवकर तपास करावा अशी विनंती करण्यासही किरण विसरला नाही. इतकंच नव्हे तर गरज भासल्यास आपण आपल्या वडिलांना गृहमंत्र्यांशी याबद्दल चर्चा करण्यास सांगू अशी सैंदाणेंना आडमार्गाने धमकीही दिली! मढवींना खरंतर त्याच्या एक सणसणीत कानफटात वाजवण्याची इच्छा होत होती, पण महत्प्रयासाने त्यांनी आपला राग आवरला होता.

"साला हरामखोर, बापाच्या जीवावर फुकटचा रोब झाडतो..." सर्वजण बाहेर पडल्यावर मढवी संतापाने धुमसत म्हणाले.

"जाऊ देत मढवी! उद्या त्यांचे वडील गृहमंत्र्यांकडून आपल्यावर बांबू आणायचे! तुम्ही कामाला लागा. त्या मुलीचा पत्ता लावा आणि धीरजला फोन आलेल्या त्या शेवटच्या नंबरच्या मालकाचाही!"

******

सिनीयर इन्स्पेक्टर रोहित प्रधान क्राईम ब्रँचच्या ऑफीसमध्ये पोहोचला तेव्हा सकाळचे दहा वाजत आले होते. नेहमीप्रमाणे कमिशनर मेहेंदळेंना भेटून तो आपल्या केबिनमध्ये जेमतेम पोहोचला होता की सब्. इन्स्पे. कदम त्याच्यासमोर हजर झाले. त्यांच्या चेहर्‍यावरुनच काहीतरी घडलं असावं याचा त्याला अंदाज आला. कदमनी हातातली पोलीस नोटीस त्याच्यासमोर ठेवली आणि पेनने मार्कींग केलेल्या नावाकडे त्याचं लक्षं वेधलं.

"धीरज सक्सेना?" रोहितने क्षणभर प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहीलं, दुसर्‍याच क्षणी त्याला लिंक लागली.

"येस सर!" कदम मान डोलवत म्हणाले, "तोच धीरज सक्सेना! पवई पोलीस स्टेशनची केस आहे."

रोहितने ताबडतोब पवई पोलीस स्टेशनला फोन लावला. हेड कॉन्स्टेबल तुपेंनीच नेमका फोन उचलला होता. सुदैवाने सैंदाणे पोलीस स्टेशनमध्येच होते. क्राईम ब्रांचमधून खुद्दं सिनीयर इन्स्पे. प्रधानांचा फोन आहे हे कळताच ते ताबडतोब फोनवर आले.

"प्रधानसाहेब, मी आत्ता तुम्हालाच फोन करण्याच्या तयारीत होतो, तेवढ्यात तुम्हीच फोन केलात!"

"तुम्ही मला फोन करणार होतात? कोणत्या संदर्भात?"

"पवईला राहणार्‍या धीरज सक्सेना नावाच्या एका माणसाचा सोळाव्या मजल्यावरच्या बाल्कनीतून खाली पडून मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या किंवा अ‍ॅक्सीडेंट नसून खुनाची केस आहे अशी माझी खात्री आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टप्रमाणे मृत्यूपूर्वी अर्धा तास त्याला पॅरॅलिसीसचा अ‍ॅटॅक आला होता आणि तो बाल्कनीतून पडला तेव्हा पूर्णपणे पॅरालिटीक अवस्थेत होता. अर्थातच त्याला कोणीतरी वरुन फेकलं आहे हे उघड आहे. त्या रात्री धीरजकडे एक मुलगी आली होती आणि तिचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे. सध्या आम्ही त्या मुलीच्या शोधात आहोत. आम्ही धीरजचं मोबाईल रेकॉर्ड चेक केलं तेव्हा एक नाव समोर आलं सर आणि माझ्या आठवणीप्रमाणे आठ - नऊ महिन्याबद्दल तुम्ही त्याबद्दल स्टेटवाईड अ‍ॅलर्ट पाठवला होता सर!"

"आठ - नऊ महिन्यांपूर्वी? स्टेटवाईड अ‍ॅलर्ट?" रोहित क्षणभर विचारात पडला.

"येस सर! स्वप्ना देशमुख!"

"व्हॉट SS?" तो एकदम उडालाच, "आर यू शुअर सैंदाणे? मोबाईल नंबर सांगू शकाल?"

"एक मिनीट सर!" सैंदाणेंनी धीरजच्या केसची फाईल काढून नंबर सांगितला, "आजच सर्व्हीस प्रोव्हायडरकडून नंबरबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली आहे. हा नंबर गेल्या नऊ महिन्यांपासून बंद होता, पण चार दिवसांपूर्वीच तो पुन्हा सुरु झाला आहे!"

"सैंदाणे, मी सब् इन्स्पे. कदमना तुमच्याकडे पाठवतो आहे. या केसची फाईल त्यांच्याकडे द्या! अगदी एफआयआर पासून तुम्ही केलेला इन्क्वेस्ट, प्रत्येक स्टेटमेंट, पीएम रिपोर्ट, मोबाईल रेकॉर्ड्स, फोटोग्राफ्स आणि प्रिंट्स, आय वॉन्ट इच अ‍ॅन्ड एव्हरी पीस ऑफ पेपर. ही केस मी क्राईम ब्रँचकडे घेतो आहे!"

"काय झालं सर?" रोहितने फोन खाली ठेवला तसं कदमनी उत्सुकतेने विचारलं.

"कदम, धीरजचा खून झाला आहे आणि मृत्यूपूर्वी त्याला स्वप्ना देशमुखचा मेसेज आला होता!"

"स्वप्ना देशमुख?" कदम वेड्यासारखे त्याच्याकडे पाहत राहीले.

"येस कदम! स्वप्ना इज बॅक आफ्टर ऑल! तुम्ही ताबडतोब पवईला जाऊन इन्स्पे. सैंदाणेंकडून केसची फाईल ताब्यात घ्या. धीरजच्या फ्लॅटवरही जाऊन या. नऊ महिन्यांपासून बंद असलेला स्वप्नाचा फोन चार दिवसांपूर्वी पुन्हा सुरु झाला आहे. तिच्या मोबाईलच्या सर्व्हीस प्रोव्हायडर कंपनीतून तिच्या नंबरचे सगळे डीटेल्स मागवून घ्या. तसंच स्वप्नाचा मोबाईल नंबर २४ तास ट्रेस करण्याचीही त्यांना ऑर्डर द्या! आय अ‍ॅम शुअर प्रिया मल्होत्राच्या केसबद्दल लवकरच आपल्या हाती काहीतरी लागण्याची शक्यता आहे!"

******

रोहित गंभीरपणे आपल्यासमोरची धीरज सक्सेनाच्या केसची फाईल वाचण्यात गढून गेला होता. त्याच्या सूचनेप्रमाणे कदमनी पवई पोलीस स्टेशन गाठून इन्स्पे. सैंदाणेंची भेट घेतली होती. सैंदाणेंबरोबर धीरजच्या सोसायटीला आणि त्याच्या फ्लॅटला भेट देऊन झाल्यावर त्यांनी हेड कॉन्स्टेबल नाईकना फाईल घेऊन क्राईम ब्रँचमध्ये पाठवलं होतं आणि स्वप्नाच्या मोबाईलच्या सर्विस प्रोव्हायडरचं ऑफीस गाठलं होतं. तिच्या मोबाईल नंबरचं सर्व रेकॉर्ड घेऊन आणि तिचा नंबर ट्रेस करण्याची सूचना देऊन ते क्राईम ब्रँचमध्ये परतले होते.

"जयहिंद सर!"

"जयहिंद!" समोरच्या खुर्चीत बसण्याची त्यांना खूण करत त्याने फाईल मिटून टेबलवर ठेवली. "गो अहेड...."

"सर, चार दिवसांपूर्वी स्वप्नाचा मोबाईल राजस्थानमधल्या बारमेर इथे अ‍ॅक्टीव्हेट करण्यात आला आहे. तिच्य जुन्याच नंबरचं सिम कार्ड तिला पुन्हा देण्यात आलं आहे कारण तिचा मोबाईल आणि सिम कार्ड चोरीला गेलेलं होतं. बारमेरमधल्या सदर पोलीस स्टेशनमध्ये तिने तशी कंप्लेंटही नोंदवलेली आहे. या एफआयआरची कॉपी सिम कार्ड घेताना देण्यात आली आहे!"

"राजस्थानमध्ये बारमेरला?" रोहित विचार करत म्हणाला, "ही स्वप्ना आपल्या कल्पनेपेक्षाही भलतीच स्मार्ट आहे हे नक्की! तब्बल नऊ महिने गायब झाल्यानंतर आता ती अचानक प्रगटली आहे. बारमेरसारखं आडबाजूचं ठिकाण गाठून मोबाईल हरवल्याचं नाटक करुन तिने एफआयआर दाखल केली आहे आणि ती वापरुन आपला जुनाच मोबाईल नंबर सुरु करुन घेतला आहे. त्यानंतर मुंबईत आल्यावर तिने धीरजला कॉन्टॅक्ट केलं आहे आणि त्यानंतर लगेचच धीरजचा खून झाला आहे! आय अ‍ॅम शुअर या भानगडीत स्वप्ना नक्कीच कुठेतरी आहे. कदाचित रात्री धीरजकडे आलेली मुलगी स्वप्नाच असावी. पण....."

रोहित बोलताबोलता मध्येच थांबला. काही क्षण विचार करुन तो म्हणाला,

"एक गोष्टं लक्षात येत नाही कदम... धीरजच्या शेजारी राहणार्‍या मालवणकरांच्या स्टेटमेंटप्रमाणे त्यांनी साडेदहा वाजता एका मुलीला त्याच्या फ्लॅटमध्ये शिरताना पाहिलं आहे. स्वत: धीरज बाराच्या सुमाराला घरी परतला आहे. स्वप्नाच्या कॉल रेकॉर्डवरुन तिने धीरजला मेसेज केला तेव्हा तिचा मोबाईल धीरजच्या सोसायटीतच होता. मालवणकरांनी पाहिलेली मुलगी स्वप्नाच असेल तर ती आणि धीरज दोघंही घरात असताना मेसेज करण्याची जरुरच काय? ती स्वप्ना नव्हती आणि धीरजचा खून झाल्यावर वॉचमनला चकवून ती पळून गेली असं मानलं तर मग सैंदाणेंचं इन्व्हेस्टीगेशन सुरु असताना स्वप्ना कुठे होती? आणि ती नंतर सोसायटीतून बाहेर कधी आणि कशी पडली?"

"सर शक्यं आहे की धीरजचा खून झाल्यावर स्वप्ना टेरेसवर लपून राहीली असेल आणि पोलिसांचं इन्व्हेस्टीगेशन संपल्यावर गुपचूप निघून गेली असेल?" कदमनी शंका बोलून दाखवली.

"आय डोन्ट थिंक सो कदम! एकतर पवई पोलीस जवळजवळ सकाळी नऊ वाजेपर्यंत सोसायटीत इन्व्हेस्टीगेशन करत होते. धीरजचा फ्लॅट विशेषत: त्याच्या फ्लॅटची ओपन टेरेस चेक करताना सैंदाणेंनी बिल्डींगची टेरेसही तपासल्याचं इन्क्वेस्टमध्ये स्पष्टपणे नोट केलेलं आहे. स्वप्ना जर टेरेसवर असती तर ती पवई पोलिसांना सापडली असती!"

"कदाचित एक शक्यता अशीही आहे साहेब, स्वप्नाने केवळ धीरजला मेसेज केला असेल पण खून त्या दुसर्‍या मुलीनेच केला असेल?" इतका वेळ शांत असलेल्या नाईकांनी वेगळा मुद्दा मांडला.

"तुम्ही म्हणता ती शक्यता नाकारता येत नाही नाईक!" रोहित होकारार्थी मान हलवत म्हणाला, "पण प्रियाच्या केसमधली धीरज आणि स्वप्ना यांची लिंक पाहिली तर मला तसं वाटत नाही. अर्थात आपले हे सर्व तर्क मालवणकरांनी पाहिलेली मुलगी स्वप्ना नव्हती यावर आधारलेले आहेत. ती जर स्वप्नाच असेल आणि धीरजचा खून करुन पळून गेली असेल तर? राहिला प्रश्नं मेसेजचा पण ते अगदीच अशक्यं नाही! आय हॅव अ फिलींग ती स्वप्नाच असावी आणि तिनेच धीरजचा खून केला आहे!"

"सर," अचानक कदमना काहीतरी आठवलं, "पवई पोलीसांना धीरजच्या घरात टी-पॉयवर एक खेळण्यातला पत्ता सापडला आहे. मात्रं सगळ्या घरभर शोध घेवूनही पत्त्यांचा उरलेला कॅट सापडलेला नाही!"

"खेळण्यातला पत्ता?" रोहितने गोंधळून विचारलं, "यू मिन प्लेईंग कार्ड्स?"

"येस सर!" कदमनी फाईलमधून तो पत्ता काढून त्याच्यासमोर ठेवला, "किलवरची अठ्ठी!"

रोहितने तो पत्ता हातात घेत त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं, पण त्यातून त्याला काहिही बोध होत नव्हता. दुकानात अगदी सहजपणे उपलब्ध असलेल्या पत्त्यांच्या कोणत्याही कॅटमधला एक सामान्य पत्ता होता तो. पण मुद्दाम धीरजच्या घरी ठेवण्याचं काय प्रयोजन होतं?

"एक कळत नाही सर, धीरजला मारुन स्वप्नाला काय मिळणार आहे? त्याच्या खुनामागचा उद्देश काय?"

"मोटीव्ह... एक काम करा कदम, स्वप्नाची बँक रेकॉर्ड्स पुन्हा एकदा चेक करा. खासकरुन गेल्या काही दिवसात तिने काही ट्रँझॅक्शन्स केली आहेत का ते नीट चेक करा."

"सर, स्वप्नाचं बँक स्टेटमेंट मी ऑफीसमध्ये येतानाच घेऊन आलो आहे सर!" कदम स्मित करत म्हणाले, "स्वप्नाच्या बँक अकाऊंटमध्ये गेले नऊ महिने फक्तं व्याज जमा झालेलं आहे बाकी कोणतंही ट्रँझॅक्शन - डिपॉझिट किंवा विड्रॉवल नाही. मात्रं तिच्या मोबाईलचं बिल तेवढं दर महिन्याला वेळेवर भरलं जातं असं दिसतं आहे! बहुतेक तिने ते ऑटॉमॅटीक पेमेंट केलं असावं!"

"साहेब, स्वप्नाच्या बँकेतून एकही पैशाचं ट्रँझॅक्शन झालेलं नसेल तर मग गेले नऊ महिने ती स्वत:चा खर्च कसा भागव्त होती? बारमेरला मोबाईल चालू करण्यासाठी, मुंबईला येण्यासाठी आणि इथे आल्यावरही तिला पैसे लागतच असणार, मग ती हे पैसे कुठून आणते?" नाईकनी विचारलं, "आम्ही बोरीवलीला तिच्या घरी जाऊन आलो. गेल्या नऊ महिन्यांपासून ती तिथे फिरकलेली नाही किंवा तिचा काही मेसेजही आलेला नाही. तिचं सामान घेण्यासाठीही कोणी आलेलं नाही. आता ती मुंबईत परतली आहे तर ती राहते तरी कुठे?"

"एक्झॅक्टली याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत नाईक!" रोहित गंभीरपणे म्हणाला, "कदम, धीरज त्या दिवशी रात्री एवढ्या उशिरा कुठून परत येत होता याचा शोध घ्या. दुसरं म्हणजे त्याचे चार मित्रं - किरण चव्हाण, उदय इनामदार, कौशल संपत आणि तो रिझवान खान, सगळ्यांच्या मागे आपली माणसं सोडा. माझ्या अंदाजाप्रमाणे प्रियाचा खून झाला त्यावेळी स्वप्नाला तोंड बंद ठेवण्यासाठी मिळालेले पैसे आता संपले असावेत आणि म्हणून ती अज्ञातवासातून बाहेर येत पुन्हा मुंबईत परतली असावी. स्वत:च्या बँक अकाऊंटमधले पैसे तिने काढले तर ते लगेच पोलीसांना समजेल या भीतीमुळे ती ते काढत नसावी. त्यामुळे पैशांसाठी ती यांच्यापैकी कोणालातरी गाठण्याचा प्रयत्नं करणार हे नक्की! धीरजलाही ती पैशांसाठीच भेटली असावी, पण त्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर तिने रागाच्या भरात तिने त्याचा खून केला असावा. धीरजच्या मित्रांच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवला तर त्याच्या घरी कायम पन्नास हजाराची कॅश ठेवलेली असायची. पवई पोलिसांना त्याच्या फ्लॅटमध्ये हे पैसे सापडलेले नाहीत. हे पैसे अर्थात स्वप्नानेच उचलले असणार! त्या अँगलनेही ट्रेस घ्या. यावेळेस ती आपल्या हातातून सुटता कामा नये!"

******

दुसर्‍या दिवशी सकाळी रोहित ऑफीसमध्ये येताच कदम त्याच्यासमोर हजर झाले.

"सर, ज्या रात्री धीरजचा खून झाला त्या वेळेस तो सांताक्रूजच्या एका पबमधून परत येत होता. रात्री पावणेअकरा पर्यंत तो तिथे बसला होता. क्लबच्या बारटेंडरच्या म्हणण्याप्रमाणे तो खूपच वैतागलेला वाटत होता. त्याच्या बोलण्यावरुन असं कळलं की आदल्या रात्री त्याच पबमध्ये तो ज्या मुलीला भेटला होता तिचीच तो वाट पाहत होता. त्या दिवशीही रात्री साडेआठच्या सुमाराला ती मुलगी त्याला भेटली होती, पण दोघं तिथे बसल्यावर तास-दीड तासाने - रात्री दहाच्या सुमाराला अर्ध्या तासात येते म्हणून ती जी पबमधून बाहेर पडली ती परत आलीच नाही! अकराच्या सुमाराला ती येऊ शकत नसल्याचा तिचा फोन आला आणि त्यानंतर पाच मिनिटांतच तो पबमधून निघून गेला."

"ती मुलगी कोण होती हे कळलं? तो बारटेंडर ओळखतो तिला?"

"नाही सर! बारटेंडरच्या स्टेटमेंटप्रमाणे धीरजची तिच्याशी गाठ पडली त्या दिवशी ती मुलगी प्रथमच पबमध्ये आलेली होती. आणि धीरजचा खून झाला त्यानंतर आजपर्यंत ती कधीच परत आलेली नाही. ती सुमारे २६ - २७ वर्षांची असावी आणि तिचे केस चांगले लांबसडक होते यापलिकडे बारटेंडर तिचं धड वर्णनही करु शकला नाही. दोन्ही वेळेस ती सर्वात कॉर्नरच्या टेबलला बारकडे पाठ करुन बसली होती त्यामुळे तिचा चेहराही त्याला दिसला नव्हता! मी त्या टेबलला सर्विस देणार्‍या वेटरलाही गाठलं, पण त्यालाही तिचं नीट वर्णन करता आलं नाही. दोन्ही दिवसात ऑर्डर घेण्यासाठी किंवा सर्व्ह करण्यासाठी ज्या वेळेस तो टेबलपाशी गेला त्या प्रत्येक वेळी ती आपला स्कार्फ नीट करण्याच्या बहाण्याने चेहरा झाकून घेत होती! पबमध्ये ती धीरजलाच भेटण्यासाठी आली असावी कारण आत आल्यावर धीरजकडे नजर जाताच ती सरळ त्याच्या टेबलपाशी जाऊन बसली होती! पहिल्या दिवशी रात्री सुमारे बाराच्या सुमाराला दोघं एकत्रंच पबमधून बाहेर पडले. दरवानाच्या म्हणण्यानुसार धीरज तिला आपल्या कारने घरी सोडण्याबाबत आग्रही होता, पण ती त्याच्या कारमध्ये न बसता टॅक्सीनेच निघून गेली. दुसर्‍या दिवशी मात्रं रात्री दहा वाजता ती एकटीच पबमधून निघून गेली ती परत आलीच नाही! मी बारटेंडर, वेटर आणि दरवान तिघांनाही स्वप्नाचा फोटो दाखवला, पण तिने स्कार्फने स्वत:चा चेहरा झाकून घेतलेला असल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही."

"आय सी.... " रोहित विचार करत म्हणाला, "स्वप्नाबद्दल आणखीन काही कळलं? कोणाशी काही कॉन्टॅक्ट?"

"नाही सर! आपली माणसं त्या चौघांवरही नजर ठेवून आहेत. धीरजच्या अचानक झालेल्या मृत्यूने बसलेल्या शॉकमधून ते हळूहळू बाहेर येत आहेत. त्याच्या फ्यूनरललाही चौघं नॉर्मल वाटत होते. कालपासून त्यांचं रोजचं रुटीनही व्यवस्थित सुरु आहे!"

"आपण स्वप्नाचा मोबाईल ट्रेस करण्यासाठी कळवलं होतं त्याचा काही अपडेट?"

"धीरज पबमध्ये असताना रात्री अकरा वाजता त्याला आलेला फोन स्वप्नाचाच होता सर! त्यावेळेस ती धीरजच्या फ्लॅटमध्येच असणार, कारण त्या मालवणकरांनी त्याच वेळेस तिला आत शिरताना पाहिलं आहे. त्यानंतर तिचा फोन ऑफ आहे. पहाटे तीनच्या सुमाराला तिने धीरजला मेसेज केला तेव्हाही ती त्याच्य फ्लॅटमध्येच असावी. धीरजला मेसेज केल्यानंतर स्वप्नाचा मोबाईल पहाटे सव्वाचार वाजेपर्यंत सुरु होता. सव्वातीनपर्यंत ती सोसायटीतच होती, पण त्यानंतर ती सुसाट वेगाने जेव्हीएलआर - वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने सव्वाचार वाजता बोरीवली स्टेशनपर्यंत गेली आहे. त्यानंतर मात्रं तिचा फोन बंदच आहे!"

"याचा अर्थ धीरजला पबमध्ये भेटलेली मुलगी स्वप्नाच होती! ती बोरीवली स्टेशनला गेली आहे याचा अर्थ ती पुन्हा मुंबईबाहेर सटकली असावी! एनीवे कदम, बोरीवली स्टेशनच्या बाहेर जरा इन्क्वायरी करा. तिथे असणारे चहावाले, हमाल, स्टेशनच्या परिसरातच राहणारे भिकारी सगळ्यांकडे चौकशी करा. त्यांच्यापैकी कोणी ना कोणी तिला पाहिलं असण्याची शक्यता आहे. भल्या सकाळी बोरीवलीहून मुंबईबाहेर जाणार्‍या कोणत्या गाड्या आहेत हे सुद्धा चेक करा. बोरीवली एस टी स्टँडही चेक करण्यास विसरु नका! शक्यं आहे की तिने बसही पकडली असेल! आणि बाय द वे, त्या धीरजच्या इन्स्टीट्यूट आणि एम्प्लॉयमेंट एजन्सीचं काय? कोणी त्याकडे लक्षं देतं आहे का?"

"धीरज गेल्यानंतर दोन दिवस दोन्ही बंदच होतं सर, पण त्यानंतर कौशलने दोन्ही टेकओव्हर केलं आहे! आणखीन एक सर, बोरीवलीला पोहोचल्यावर स्वप्नाने किरणला फोन केला होता! जेमतेम दहा सेकंदंच बोलणं झाल्यावर फोन कट् झाला आहे!"

"स्वप्नाने किरणला फोन केला होता? व्हेरी इंट्रेस्टींग!"

******

धीरजच्या मृत्यूला पंधरा दिवस उलटले होते....

काळ ही अशी एक गोष्टं आहे जी कोणासाठीही थांबत नाही. काहीही झालं तरी तो सेकंदा-सेकंदाने पुढे सरकतच राहतो. कितीही दु:खद घटना घडली तरी अखेर त्यातून सावरुन बदलत्या काळाबरोबर पुढे जावंच लागतं. कितीही जीवघेणा आघात झाला तरी जाणार्‍या प्रत्येक दिवसागणिक हळूहळू तो घाव भरुन निघतो. धीरजच्या आकस्मिक मृत्यूच्या धक्क्यातून त्याचे कुटुंबिय आणि मित्रं हळूहळू सावरुन आपापल्या दैनंदीन कामात मग्नं होत होते. त्या चौघांपैकी कोणाशी ना कोणाशी स्वप्ना निश्चित संपर्क साधेल ही खात्री असल्याने सीआयडींची माणसं त्यांच्यावर नजर ठेवून होती.

रोहितच्या सूचनेवरुन सब् इन्स्पे. कदमनी पुन्हा एकदा धीरजचे शेजारी मालवणकर, वॉचमन शंभूनाथ, सेक्रेटरी गांधी यांची भेट घेऊन स्टेटमेंट घेतलं होतं. स्वत: रोहितने सोसायटीची दोन्ही गेट्स, बिल्डींग्ज आणि धीरजच्या फ्लॅट काळजीपूर्वक तपासून पाहिला होता. शंभूनाथने त्या दिवशी ज्या ठिकाणी त्या मुलीला पाहिलं होतं तिथे मुद्दाम अंधार पडल्यावर जाऊन त्याला तिचा चेहरा दिसणं शक्यं नव्हतं याचीही त्याने खातरजमा करुन घेतली होती. परंतु या सगळ्या खटाटोपानंतरही त्याच्या हाती फारसं काही लागलं नव्हतं. फिंगर प्रिंट एक्सपर्ट्सचा रिपोर्ट तर अगदीच निराशाजनक ठरला होता. फ्लॅटमध्ये धीरजच्या प्रिंट्स ठिकठिकाणी आढळून आल्या होत्या, परंतु दुसर्‍या कोणाचीही एकही प्रिंट तिथे आढळून आली नव्हती.

स्वप्नाच्या बाबतीत पोलीसांचा तपास बोरीवली स्टेशनशीच खुंटला होता. पोलिसांच्या सूचनेप्रमाणे तिचा मोबाईल ट्रेस केला जात होता, पण गेल्या पंधरा दिवसात एकदाही तिचा मोबाईल ऑनच झाला नव्हता! हेड कॉन्स्टेबल नाईक थेट राजस्थानमध्ये बारमेरपर्यंत जाऊन धड्कले होते. स्वप्नाची एफआयआर लिहून घेणारा हवालदार आणि तिला सिम कार्ड इश्यू करणारा सर्विस गॅलरीतला क्लार्क यांची गाठ घेऊन त्यांनी चौकशी केली होती, पण त्यातूनही काहीही निष्पन्न झालं नव्हतं. नाही म्हणायला तिचं वर्णन करताना दोघांनीही तिच्या लांब केसांचा आणि ओव्हरकोटचा तेवढा उल्लेख केला होता. नाईकांकडून ही माहिती कळताच धीरजकडे त्या रात्री आलेली मुलगी स्वप्नाच होती आणि तिनेच त्याचा खून केला होता याबद्दल रोहितची पक्की खात्री पटली पण....

स्वप्नाने पुन्हा एकदा पोलिसांना चकवून दडी मारली होती!

******

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त. आता जरा जरा उलगड़त चाललंय रहस्य. येऊ दे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाट बघतोय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?