चूक की बरोबर

संकल्पना

चूक की बरोबर

मूळ लेखक- रेमों दव्होस (१९२२-२००६)

भाषांतर - उज्ज्वला

रेमों दव्होसबद्दल - जन्म फ्रेंच आई-वडिलांच्या पोटी बेल्जिअममधला. बहुतेक सर्व वास्तव्य फ्रान्समध्येच. त्यांनी सर्कशीत विदूषक होण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. सुरुवातीला विदूषकी, जगलिंग असेच उद्योग केले. पण ते चेंडूंइतकंच शब्दांशीही खेळत. पुढे त्यांनी स्वतंत्रपणे एकपात्री विनोदी प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांना अभिनयाची पारितोषिकं, विनोदासाठीचं मोलिएर पारितोषिक इ. तर मिळालीच, पण त्यांची फ्रेंच भाषा समितीवरही नियुक्ती झाली होती. पुढील उतारा त्यांच्या विनोदबुद्धीची आणि शब्दप्रभुत्त्वाची साक्ष देतो.

---

कोण बरोबर कोण चूक कधीच सांगता येत नाही.
कठीण असतं ठरवणं.
मी बराच काळ सगळ्यांचंच बरोबर मानत आलो.
मग एक दिवस मला जाणवलं की मी ज्यांचं बरोबर मानत होतो त्यातल्या बऱ्याच जणांचं चूक होतं!
म्हणजे मी बरोबर होतो!
म्हणजेच माझं चूक होतं!
ज्यांना आपलं बरोबर वाटायचं त्यांचं चूक होतं, आणि मला त्यांचं बरोबर वाटायचं - तर माझं चूक होतं!
म्हणजे असं की, माझं चुकीचं नसताना आपलं चुकीचं असूनही ते बरोबरच आहे असं जे भासवत होते, त्यांचं मी बरोबर मानणं हे चूकच होतं.
बरोबर आहे ना माझं ? कारण त्यांचं चूक होतं!
आणि ते ही निष्कारण!
हे मात्र मला म्हटलंच पाहिजे कारण
कधी कधी माझीही चूक असतेच.
पण जेव्हा माझं चुकतं तेव्हा त्याला कारण असतं, ते मी सांगत नाही.
कारण मग माझी चूक कबूल करणंच होईल ना ते!!!
बरोबर आहे ना माझं?
बघा ना, ज्यांचं बरोबर असतं त्यांना कधी कधी मी बरोबर असंही म्हणतोच.
पण ते सुद्धा चुकीचंच बरं का.
कारण हे म्हणजे ज्यांचं चूक त्यांचं चूक असं म्हणण्यासारखंच आहे.
काही खरं नाही!
थोडक्यात, आपलं चूक असण्याचं काही कारणच नाही असं ज्यांना वाटतं त्यांना बरोबर काय ते सांगायला जाणं हे चूकच आहे !

मूळ ध्वनी आणि गती कळण्यासाठी हा व्हिडिओ :

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet