भैराळं

कावळा शिवलेल्या बाईसारखं भैराळं लांब एका बाजूला गावाच्या वाटेला न येता बसून असायचं.

गावच्या आणि भैराळ्याच्या मधून गाडीरस्ता जात होता. एक पायवाट त्या रस्त्यापासून दबकत दबकत, मध्येमध्ये उगवलेल्या गवताखाली लपत लपत भैराळ्याकडे येत असे. भैराळ्याच्या काठाजवळ न यायची खबरदारी घेता ती थोडी दूरवरच एका उंचवट्यावर जाऊन हळूच, झुडूपांआडून त्या तळ्याकडे चोरून पहात असे.

उन खात पडलेल्या एखाद्या काळ्याकुट्ट श्वापदासारखं हात-पाय पसरून भैराळं पडलेलं असे. त्याचं पाणी इतर तळ्यांसारखं निळं-हिरवं नव्हतं. भर दुपारीसुद्धा ते तळं ग्रहणासारखं काळं-कुळकुळीत दिसत असे. सजीवतेची कोणतीही खूण त्याच्या अवतीभवती नव्हती. त्याच्या पाण्यावर कधी चतुर भिरभिरताना दिसत नसत, तर कुठला पक्षी त्याच्या काठाजवळ वाळूतले किडेमकोडे वेचून खाताना दिसत नसे. त्याच्या सभोवती दाटीवाटीने उभे असलेले वृक्ष गोठून गेल्यासारखे स्तब्ध दिसत. त्यांची पाने कधी वार्‍याने सळसळत नसत. वारादेखील त्या तळ्याभोवती मान टाकून जाई.

काळ्या पाण्यावर सूर्याची हजारो प्रतिबिंबं मात्र चमकत रहात.

भैराळ्याच्या पलिकडे काय आहे हे कोणाला ठाऊक नव्हतं. ऑक्टोपसच्या आडव्या-तिडव्या हातांप्रमाणे भैराळ्याला फुटलेले काही हात पलिकडच्या टेकड्यांच्या मागे जाऊन अदृश्य होत. ते कुठे जाऊन संपतात त्याची उठाठेव करण्याचं कुणाला कधीच कारण वाटलं नव्हतं.

मात्र या सर्वांहून अधिक गूढ होतं ते भैराळ्याच्या मधोमध असलेलं बेट. गर्द झाडीने आच्छादलेल्या त्या काळोख्या बेटावर काय आहे याचं कुतूहल करत मघा आलेली ती पायवाट काही वेळ थांबून राही आणि घाबर्‍याघाबर्‍या, आल्यासरशी परत जाई.

भैराळ्याच्या दिशेला जायचं नाही असा गावातला अलिखित नियम होता. म्हणजे तसं कोणी कोणाला कधी सांगत नसे. भैराळ्याचं नावही कधी गावात उच्चारलं जात नसे. त्याचं नाव कसं पडलं हेसुद्धा कुणाला माहित नव्हतं. पण गावातलं लहान पोरदेखिल कुणी न सांगता 'तिथं जायचं नाही' हे आपोआपच उमजून घेत वाढत असे आणि आयुष्यात कधी त्या तळ्याच्या दिशेला न फिरकता म्हातारं होत एक दिवस मरून जात असे. पलिकडच्या बाजूने बारमाही नदी वहात असता गावाला पाण्यासाठीही कधी भैराळ्याची वाट धरावी लागली नाही.

आजारपणाने खंगलेली संभ्या पवाराची बायको एकदा नदीवर जायला फार चालावं लागतं म्हणून भल्या पहाटे भैराळ्याकडे गेली. ती परत आली ती कळशी तिथेच टाकून. थरथर कापणार्‍या, पांढर्‍याफटक पडलेल्या तिला बघून बायांनी काय झालं ते खोदून-खोदून विचारलं, पण चकार शब्द न बोलता ती घरी येऊन एका कोपर्‍यात थरथरत पडून राहिली काही न बोलता, काही न खाता-पिता आठ-दहा दिवस, तापाने फणफणत.

अखेर एका रात्रीची ती उठली आणि नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडली. त्यानंतर बरेच दिवस गावभर वेड्यासारखी भटकताना ती लोकांना दिसे. हळूहळू तिने लोकांना रस्त्यात शिव्याशाप देणं, बायांना धरून झिंज्या उपटणं सुरू केलं. तेही लोकांनी डोळ्याआड केलं. पण जेव्हा भर दिवसा गावातून नागवी फिरू लागली तेव्हा मात्र तिला गावाबाहेर हाकलली. नंतर आठवड्याभरातच चारपाच मैल खालच्या बाजूला असलेल्या गावाजवळ नदीच्या पात्रात तरंगताना ती लोकांना दिसली.

त्या दिवसापासून भैराळं आणखीच अस्पृश्य झालं.

गावात आलेला एखादा नवखा माणूस कधी चुकारपणे भैराळ्याच्या दिशेने जाणार्‍या पायवाटेवर वळत असे. त्याला त्या दिशेने जाताना कुणी गावकर्‍याने पाहिलं तर तो अस्वस्थ होऊन जागच्याजागीच चुळबुळत उभा राही. काय करावं, याचा विचार करत तो काही वेळ घालवी. अखेर न राहून तो पावण्याला साद घालत असे.

'ओ! कुठं चाल्ला?'

'आं? काही नाही, असंच पाय मोकळे करायला चाल्लो होतो.' पाहुणा बावचळून म्हणे.

'जाऊ नका तिकडं.' गावचा माणूस अर्धवट आर्जवाने, अर्धवट जरबेने म्हणे.

'का हो?'

'तिथं कोन जात न्हाय.'

'का?'

गाववाला क्षणभर गप्प होई. डोळे किलकिले करून तो इकडे-तिकडे पाही. काय बोलावं, याचा विचार करत तो काही क्षण उभा राही.

'तिथं कोनी जात न्हाय.' तो परत म्हणे. 'बायामान्सं तर अजिबात जात न्हायत'.

'अहो पण मी कुठे बाईमाणूस आहे?' पाहुणा हसत चेष्टेने म्हणे.

एक नापसंतीचा कटाक्ष टाकून गावकरी आपल्या दिशेने चालू पडे. नवखा माणूस क्षणभर काय करावं याचा विचार करीत उभा राही. अखेर पाय उचलून तो तळ्याच्या दिशेला लागे. 'अडाणी लोक तिच्यायला' असा विचार करत तो तळ्याकाठी येऊन उभा राही. त्या तळ्याभोवती एवढी नीरव शांतता का, असा त्याला प्रश्न पडे. आजूबाजूला एखादा पक्षीदेखील दिसत नाही याचं आश्चर्य करीत तो उभा राही. त्या तळ्याच्या काळ्या पाण्यावर चमचमणारी सूर्याची प्रतिबिंबं पाण्याला फुटलेल्या हजारो डोळ्यांप्रमाणे दिसत आहेत, असं त्याला वाटून जाई. बराच वेळ त्या डोळयांकडे नजर लावून पाहात उभा राहिल्यावर अचानक, ती सर्व बुबुळे आपल्याकडेच रोखून पहात आहेत, ही जाणीव त्याला होई आणि दचकून तो काढता पाय घेई.

भैराळ्याला मात्र या कशाचीच पर्वा नव्हती. आपल्या पोटातलं रहस्य आपल्यापाशीच ठेवून ते दिवसरात्र पडून रहात असे.

* * * * * * * * *

'दो हफ्तों के लिये जा रहे है मम्मी-डॅडी?' कौशलने विचारलं.

"हो." मोहिनी म्हणाली.

त्याच्या डोळ्यांत एक चमक येऊन गेली. चेहरा विचारमग्न झाला. मनातल्या मनात कसलासा प्लॅन आकार घेऊ लागला.

'कसला विचार करतोयस एवढा?' त्याच्या कोपराला हाताने हलकेच ढुशी देत तिने विचारलं.

'काय म्हनालीस? आं, कसलाच्य नाही.' तो घाईघाईने म्हणाला.

गुप्ते पतिपत्नी पंधरा दिवसांच्या अतिपूर्वेच्या टूरवर निघाले आणि एकुलत्या एका तरूण मुलीला घरी एकटीच ठेवून जायचं त्यांनी ठरवलं तेव्हा त्यांच्या निकटवर्तीयांच्या भुवया साहजिकपणे उंचावल्या. पण गुप्त्यांनी विचार करूनच हा निर्णय घेतला होता. एकदा तरी परदेशपर्यटन करण्याचं त्यांनी आयुष्यभर स्वप्न पाहिलं होतं, पण कधी योग जमलाच नाही. मध्यमवर्गीयांच्या खिशाला दोन विमानतिकिटंही भारीच, त्यात तीन तिकिटाचं गणित जुळवताना गुप्त्यांच्या नाकी नऊ यायला लागले. शेवटी मोहिनीनेच त्यांना सुचवलं आणि त्यांना पटलं. 'तिची ती जग फिरेलच पुढेमागे. सध्या आपणच जाऊन येऊ' असं पत्नीला म्हणत थोड्या अपराधीपणेच त्यांनी जायचं ठरवलं. मोहिनीला न नेण्यात नाही म्हटलं तरी त्यांचा आणखीही सुप्त हेतू होताच. सुनिता अजूनही छान दिसते. इतक्या वर्षांत कधी कुठे एकांतात फिरणं झालंच नव्हतं. या प्रवासाच्या निमित्ताने पत्नीबरोबर थोडा एकांत मिळावा असं त्यांनाही वाटत होतं. काळजी घेण्याबाबत मोहिनीला हजारभर सूचना देऊन दोघा पतिपत्नींनी एकदाचं बॅन्कॉकच्या विमानात पाऊल ठेवलं त्याला दहा मिनिटेही झाली नाहीत तेव्हा कौशलची मर्सिडिज सहारवर येऊन पोहोचली होती.

कौशल आणि मोहिनीची जोडी हा सार्‍या कॉलेजच्या कौतुकाचा विषय होता. त्यात असूयेचा भाग नव्हता. मर्दानी देखणेपणाने ओसंडणारा कौशल आणि चंद्रासारख्या सोज्वळ आणि मोहक चेहर्‍याची मोहिनी कॉरिडॉरमधून जेव्हा एकत्र जाऊ लागत तेव्हा वनातून चालणार्‍या राम-सीतेकडे वानरांनी पहावं तसे सर्व मुलं-मुली त्यांच्याकडे पहात. प्राध्यापकही त्यांना रस्त्यातून वाट करून देत असत. कौशलला पाहून पाघळणार्‍या कितीतरी मुली होत्या, पण त्या दोघांची जोडी फुटावी असं कोणालाच वाटत नसे. एखाद्या चित्रपटातल्या प्रेमी युगुलाप्रमाणे त्यांच्या जागी आपल्याला कल्पून लोक व्हिकॅरियसली जगून घेत, एवढंच.

सुरुवातीला त्याच्या मोहापासून स्वतःला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न तिनेही करून पाहिला होता. शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिला या कशामध्ये गुंतायचं नव्हतं. आपल्या शिक्षणासाठी वडिलांवर पडणारा प्रचंड बोजा, आणि आपली जबाबदारी यांची तिला जाणीव होती. पण विस्तवापुढे लोण्याचा काय पाड? 'मी तुला आवडत नाही म्हनतेस, तर पायाचा अंगूठा जमिनीवर का घासतेस?' कौशलने तिचं मनगट आवळून मोडक्या-तोडक्या मराठीत तिला विचारलं आणि तिने स्वतःभोवती बांधून घेतलेलं कुंपणही गळून पडलं होतं. हळूहळू झाड कुठलं, आणि वेल कुठली हे ओळखता येणं मुश्किल झालं एवढी दोघांची मनं एकमेकांत गुंतून गेली होती. त्याने मिठीत घेतलं की तिचं अंगअंग पेटून उठत असे. त्याचं मर्दानी सौंदर्य, तिच्या तारूण्यसुलभ ऊर्मी आणि दोघांचं एकमेकांवर असलेलं जीवापाड प्रेम यांच्या वादळात तिच्यावरचे मराठी मध्यमवर्गीय संस्कार कुठल्याकुठे उडून जात. त्याचीही अवस्था वेगळी नव्हती. दिवसरात्र तो तिचाच विचार करत असे. तिला घेऊन दूर दूर कुठेतरी जावं असं स्वप्न तो सारखं पहात राही. तिचे आईवडिल बाहेरगावी जात आहेत असं त्याला कळलं तेव्हा त्याच्या मनात विचारचक्रं फिरू लागली नसती तरच नवल.

अखेर त्याच्या मनात रुळणारी कल्पना त्याने तिच्यापुढे उघड केली.

'मग, जायच्यं का, बेबी?' आपला पूर्ण चार्म आणून त्याने विचारलं.

'चल, काहीतरीच!' तिने त्याला उडवून लावलं. 'मी नाही येणार तुझ्याबरोबर एकटी.'

'व्हाय नॉट! आपलं मस्त फार्महाऊस आहे. खाली अस्तं ते हमेशा. तुझे मम्मी-डॅडी नाहीयेत. मी माझ्या डॅडींना बोल्लो अभिषेक आणि मार्दवबराबर च्याल्लोय. कौनालाच काय कल्नार नाहीये'

'अरे पण!'

'अरे पन काय? चार दिनच्या तर सवाल आहे. सोच, आपल्याला टोटल प्रायव्हसी असनार! नेक्स्ट वीकला तुझे मम्मी-डॅडी येनार. मग वापस असा मौका कधी मिल्नार?'

कौशलला आणखी बराच वेळ मनधरणी करावी लागली पण शेवटी 'हूं' असा हलका होकार तिच्या ओठांतून उमटलाच.

क्रमशः

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

कथा रोचक वाटते. संपूर्ण वाचल्यावर प्रतिसाद नोंदवेन असं म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

भैराळ्याचं वर्णन मस्त जमलंय. त्याला एक व्यक्तिमत्व देण्यात यशस्वी झालेला आहात. आणि तेही गूढतेच्या धुक्यातून अधूनमधून छोटे पैलू दाखवत...

पुढचे भाग लवकर टाकावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेखन. वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

शीर्षकापासूनच सगळं आवडलंय. पण शेवट येईपर्यंत 'नो कमेंट'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'भैराळं' काय आहे? धारप, मतकरी, गुप्ते रांजणकर? की तेंडुलकर, नेमाडे, मनोहर? या प्रश्नामध्येच भैराळ्याचं यश आहे. आणखीही एक शक्यता आहे, पण तिच्यातही भैराळ्याचं यश आहेच... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आणखीही एक शक्यता.....!!? हे काय गौडबंगाल आहे?

ही कथा खवचट खान यांनी लिहीलेली आहे. नाही का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'भैराळं' काय आहे? धारप, मतकरी, गुप्ते रांजणकर? की तेंडुलकर, नेमाडे, मनोहर? या प्रश्नामध्येच भैराळ्याचं यश आहे.

या प्रश्नामध्येच भैराळंच्या या भागाचं यश आहे. ते पुढं टिकून रहावं, ही शुभेच्छा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहा! दमदार सुरवात आहे
यापुढली प्रतिक्रीया कथा संपवल्यावरच! टाका पुढचे भाग पटापट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जेवढं आलंय तेवढ्यावरची प्रतिक्रिया.... एकदम मस्त! दमदार. भैराळं आवडलं. डोळ्यासमोर व्यक्त अव्यक्त गुणांनिशी उभं राहिलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

इंटरेस्टिँग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

पहिला भाग उदय प्रकाशच्या 'तिरीछ'ची आठवण करून देतो.

>>मर्दानी देखणेपणाने ओसंडणारा कौशल आणि चंद्रासारख्या सोज्वळ आणि मोहक चेहर्‍याची मोहिनी कॉरिडॉरमधून जेव्हा एकत्र जाऊ लागत तेव्हा वनातून चालणार्‍या राम-सीतेकडे वानरांनी पहावं तसे सर्व मुलं-मुली त्यांच्याकडे पहात.<<

>>हळूहळू झाड कुठलं, आणि वेल कुठली हे ओळखता येणं मुश्किल झालं<<

>>त्याने मिठीत घेतलं की तिचं अंगअंग पेटून उठत असे. त्याचं मर्दानी सौंदर्य, तिच्या तारूण्यसुलभ ऊर्मी आणि दोघांचं एकमेकांवर असलेलं जीवापाड प्रेम यांच्या वादळात <<

हे मात्र जरा विचित्र वाटलं. म्हणजे वातावरण आताचं आणि शैली मात्र ना. सी. फडक्यांची किंवा कुमुदिनी रांगणेकरांची असं काहीसं झालं.

असो. वातावरणनिर्मिती रोचक आहे. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मिठीतला मी/मि पहिला की दुसरा, असलाच प्रकार झाला हा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मिठीतला मी/मि पहिला की दुसरा, असलाच प्रकार झाला हा.<<

मिठीतले तुम्ही पहिले असाल तर चांगलंच आहे, पण दुसरेपणाची मिठीसुद्धा वाईट नसते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हुश्श... मला वाटलं की पहिली, दुसरी यातच तुम्ही लटकणार की काय! तेव्हा, ते फडके असोत वा रांगणेकर! आस्वाद घ्या... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरुवात तर एकदम सही झालीय.
बाकी प्रतिसाद कथा पुर्ण झाल्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भैराळ्याचं वर्णन ज्या लेव्हलचं झालं आहे त्याच लेव्हलला पुढचे वर्णन वाटत नाही. कथेला मधेच जोड दिल्यासारखा वाटतो. तरीदेखील उत्कंठावर्धक! पुढील भागाची प्रतीक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरुवात तर छान रोचक झालीये, बाकी प्रतिसाद कथा पूर्ण झाल्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...