एका खेळियाने

दिलीप प्रभावळकरांच्या'एका खेळियाने' ची सुधारित आवृत्ती नुकतीच वाचनात आली.'अक्षर प्रकाशन' च्या या आवृत्तीत प्रभावळकरांनी त्यांच्या 'वा गुरु!' या अगदी अलीकडच्या नाटकापर्यंतचा त्यांच्या रंगमंच आणि चित्रपटसृष्टीतल्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. 'दिलीप प्रभावळकरसारखा आर्टिस्ट जर तिकडे (पाश्चिमात्य देशांत ) असता तर त्यानं रान पेटवलं असतं' हे पु.ल. देशपांडेंचं वाक्य या पुस्तकाच्या वेष्टणावर छापलेलं आहे. (का? कुणास ठाऊक!वेष्टणावर प्रभावळकरांची प्रशंसा करणारी इतरही वाक्यं आहेत. पुस्तक नीट निरखून बघून वाचायला सुरवात करणार्‍यांना हा प्रथमग्रासे मक्षिकापात वाटू शकेल. प्रभावळकरांची प्रतिमा एका नटापलीकडे विचार करणारा, अर्थपूर्ण लेखन करणारा बहुरुपी कलाकार अशी आहे, त्यामुळे वेष्टणावरील ही वाक्ये आणि मुखपृष्ठावरील आणि पहिल्या काही पानांवरील मुद्दाम 'पोझ' देऊन काढलेले फोटो हे सुरवातीलाच विरस करुन जातात. उलट मलपृष्ठावरील आबा, सासू, नंदू आणि बापू या चार मोजक्या भूमिकांचे फोटो बघायला बरे वाटते. मुखपृष्ठाच्या जागी मलपृष्ठ आणि मलपृष्ठाच्या जागी मुखपृष्ठ अशी 'अक्षर' वाल्यांकडून 'उसंडु' झाली काय? ) रान पेटवणं म्हणजे काय हे माहिती नाही, पण मराठीतला (आणि आता हिंदीतलाही) एक गुणी अभिनेता, एक प्रयोगशील कलाकार, एक विचारी माणूस आणि एक सिद्धहस्त लेखक अशा अनेक भूमिकांतून प्रभावळकर आपल्याला भेटत आलेले आहेत. कॉलेजातील हौशी नाटकांनतर व्यावसायिक नाट्यभूमीवरची प्रभावळकरांची पहिली जोरदार 'एंन्ट्री' म्हणजे 'अलबत्या गलबत्या' मधली त्यांची चेटकीण. या चेटकिणीबद्दल (आणि पुण्यात दोन प्रयोग असताना दुसर्‍या प्रयोगाला वेळ होतो म्हणून भर ट्रॅफिकमधून या चेटकिणीने स्कूटरवर मागे बसून लोकांना घाबरवत, दचकवत 'जस्ट फॉर लाफ्स गॅग्ज' मधल्या प्रसंगासारख्या केलेल्या प्रवासाबद्दल ) प्रभावळकरांनी इतरत्रही लिहिले आहे.त्यानंतरच्या 'प्रेम कहाणी', 'आरण्यक', 'नगर अंधेरा' या नाटकांमधून प्रभावळकरांची स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रियाच सुरु होती असे वाटते. 'पोर्ट्रेट' या एकांकिकेत प्रभावळकरांनी साकारलेल्या लष्करी अधिकार्‍याच्या भूमिकेबाबत बाकी कुतुहल वाटते. मतकरींची ही एकांकिका पहायला मिळायला हवी होती असे वाटते.
या पुस्तकात वर्णन केलेल्या 'एलिअनेशन थिअरी' या जर्मन रंगभूमीवरील कल्पनेची हे पुस्तक वाचताना गंमत वाटते. मराठी रंगभूमीवरची कल्पना काय तर अभिनय इतका खोल, उत्कट असावा की प्रेक्षकाचाही रंगमंच आणि वास्तव यात गोंधळ व्हावा. प्रेक्षकाला लेखकाने आपल्या लिखाणाने आणि अभिनेत्याने आपल्या अभिनयाने आपल्यामागे फरफटत नेले पाहिजे. 'एलिअनेशन थिअरी' मध्ये याच्या बरोबर विरुद्ध विचार मांडलेला आहे. एखाद्या नाट्यपूर्ण, उत्कट प्रसंगानंतर विंगेतून एका लाकडी बॉक्सवर हातोड्याने प्रहार करुन 'टॉक' असा मोठा आवाज काढला जाई, का, तर प्रेक्षकांना हे सगळं नाटक आहे, याचा फक्त भावनिक पातळीवर विचार करु नका, वैचारिक पातळीवरुन करा याची जाणीव करुन देण्यासाठी. 'रसभंग' वगैरे कल्पनांना येथे स्थान नाही, कारण मुळात प्रेक्षकाला नाटकात आस्वादक असे गुंतू द्यायचेच नाही. 'समीक्षक' या भूमिकेत माणूस शिरला की त्याला रसग्रहणापेक्षा चिरफाडीतच अधिक रस कसा वाटू लागतो याचे हे उदाहरण आहे, असे मला वाटते.
'गजरा' या दूरदर्शवरील कार्यक्रमांतून अनेक मराठी कलाकारांना 'ब्रेक' मिळाला आहे. त्याबद्दल दूरदर्शनचे आपण कायम आभार मानले पाहिजेत. 'गजरा' मध्ये प्रभवळकरांना या माध्यमात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी तिचे सोने केले. 'गजरा' मध्ये काम करत करत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरवात झाली असावी. 'पंचवीस एके पंचवीस'सारखी 'बेस्ट ऑफ गजरा' मध्ये समाविष्ट केलेली नाटिका दुसर्‍या कर्यक्रमासाठी टेप उपलब्द्ध नाही म्हणून पुसली जाते हे वाचून वैषम्यही वाटते.
त्यानंतरचा प्रभावळकरांचा मोठा पल्ला म्हणजे चिमणराव. प्रभावळकरांनी चिमणराव जिवंत केला, घराघरात नेला हे त्यांचे कर्तृत्व आहेच, पण ते चिमणरावात गुंतून पडले नाहीत, हे त्याहूनही मोठे कर्तृत्व आहे असे मला वाटते.'चिमणराव' मालिका यशस्वी झाली पण तो चित्रपट चालला नाही याचे आपल्याला खूप वाईट वाटले असे प्रभावळकर लिहितात. पण त्या निमित्ताने त्यांना चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाला हे एक बरे झाले. चिमणरावांच्या प्रतिमेतून बाहेर पडणे हे त्या वेळी प्रभावळकरांसमोरचे मोठेच आव्हान असले पाहिजे. 'एक डाव भुताचा' या प्रभावळकरांच्या पुढील - आणि खरे तर त्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वाच्या- चित्रपटाच्या वेळी आपल्याला आलेले अनुभव, विशेषतः अशोक सराफ या अभिनेत्याबरोबर काम करताना आपल्याला अभिनेता आणि माणूस म्हणून त्याची जवळून झालेली ओळख याविषयी प्रभावळकरांनी मनापासून लिहिले आहे. आपली अशोक सराफ या अभिनेत्याविषयी मते काहीही असोत, पण नव्या मराठी माणसाला सांभाळून घेणारा, मदत करणारा मराठी माणूस हे -अगदी भूतकाळातले असले तरी- वाचायला बरे वाटते.
'पळा पळा कोण पुढे पळतो तो' या फार्ससंदर्भात प्रभावळकरांनी केलेले लिखाण मुळातून वाचावे असे आहे. एकतर बबन प्रभूंचा हा फार्स लेखन या दृष्टीकोनातून सगळ्यात अधिक जमलेला आहे. माझ्याकडे कुठेतरी त्याच्या संहितेचे जुनी, जीर्ण पुस्तक होते. ते वाचतानाही धोधो हसू फुटत असे. महामहोपाध्याय बिंदूमाधवशास्त्री , प्रमोदिनी, गागाचार्य, बन्सीधर, उकिडवे.. सगळी धमाल होती. एका वेळी पाच धोतर-पगडीवाल्यांची स्टेजवर पळापळ - त्यातही आत्माराम भेंडे, प्रभावळकर, भक्ती बर्वे ही कास्ट आणि भेंडेचं दिग्दर्शन यामुळे तो प्रकार भन्नाटच होत असणार यात शंका नाही.नटांच्या हातात नसलेल्या काही कारणांने हे प्रयोग बंद पडले असे प्रभावळकर म्हणतात तेंव्हा ते काय कारण असावे या भोचक कुतुहलापेक्षा काहीही असले तरी ते प्रयोग चालू रहायला पाहिजे होते असे वाटते.
'झोपी गेलेला जागा झाला हे प्रभावळकरांचे त्यानंतरचे नाटक. 'झोपी गेलेला जागा झाला' चे गेल्या वर्षी 'सुबक' तर्फे पुनरुज्जीवन होऊन काही प्रयोग झाले होते. 'झोपी...' हा तसा त्या मानाने दुय्यम दर्जाचा फार्स. लेखनापेक्षा दिग्दर्शकाच्या आणि नटांच्या 'इम्प्रूव्हायझेशन' वर अधिक बेतलेला. ही पुढे मराठीतली पहिली प्रायोजित मालिका वगैरे झाली. दरम्यान प्रभावळकर नट म्हणून रंगभूमीवर आणि दूरदर्शनवर चांगलेच स्थिरावले होते. मराठी चित्रपटातही त्यांची वाटचाल सुरु होती. पण या माध्यमाबाबत, विशेषतः सुरवातीच्या काळात त्यांना मिळालेल्या मराठी चित्रपटांतील भूमिकांबाबत त्यांनी या पुस्तकात असमाधान व्यक्त केले आहे. ते बरोबरच आहे असे मला वाटते. अलका कुबलबरोबर नाचतानाचा त्यांचा एक फोटो या पुस्तकात आहे. त्याखाली 'हे मी का करतोय?' असं शीर्षक त्यांनी दिले आहे. ते अगदी योग्य वाटते. बेर्डे, पिळगावकर, कोठारे (आणि काही प्रमाणात अशोक सराफ) यांनी मराठी चित्रपटाला जे काही केले त्या अपराधाची तुलना एकता कपूरने खाजगी टीव्ही मालिकांना जे काही केले त्याच्याशीच होईल. त्यामुळे बाप्पा तुला क्षमा नाही, वाड्यावरची धेंडे दोंद वाढवतात आणि माझ्या काशाचे पाय बाकी पांगळे होतात, आणि मोगरा मात्र फुलतच राहातो...त्यामुळे बाप्पा तुला क्षमा नाही.. असो. प्रभावळकर या सगळ्यात खेचले गेले हे त्यांचे नशीब. त्यातून ते सहीसलामत बाहेर पडले हे आपले नशीब.'माझे सुदैव असे की मी त्यांची सून झाले, पण त्याहूनही मोठे सुदैव असे की मी त्यांची बायको झाले नाही' प्रमाणे! याचे कारण असे की या माध्यमातूनच प्रभावळकरांनी पुढे 'चौकट राजा', 'रात्र आरंभ' असे परफॉर्मन्सेस दिले. पण ती पुढची गोष्ट झाली.
'वासूची सासू' हा प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासातला पुढचा आणि महत्वाचा टप्पा. या पुस्तकात दिलेला दाराच्या चौकटीला रेलून उभ्या राहिलेल्या या सासूचा फोटो (एक चौकटीवरचा पुरुषी हात सोडला तर) 'मारु' दिसतो. एकूण हा सासूचा प्रयोग भन्नाटच होता. अरुण नलावडे, अतुल परचुरे (थोडाफार सुसह्य अविनाश खर्शीकरही) आणि दोन अफलातून भूमिकांत प्रभावळकर. बेरकी अण्णा नंतरनंतर सासूची भूमिका 'एन्जॉय' करायला लागतात तेंव्हाच्या गोंधळाला तर तोड नाही. ते चंद्रनमस्कार, ते लाडीक 'शीतल, शीतल..' 'फार त्रास झाला हो हिच्या वेळेला' वगैरे. या सगळ्या प्रकारात आपण जे करतो आहे ते यशस्वी होतं आहे हे कळाल्यानंतर नटाचं भान सुटणं अगदी शक्य असतं, पण आपलं ते सुटलं नाही असं प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. ते अगदी पटण्यासारखं वाटतं.
प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासातले पुढचे महत्वाचे टप्पे म्हणजे 'एक झुंज वार्‍याशी', 'नातीगोती' , 'एक हट्टी मुलगी' आणि 'घर तीघांचं हवं' मधल्या त्यांच्या भूमिका. (तीघांचं मधली 'ती' हा उच्चारानुसार दीर्घ आहे, मग ती तिखटातल्या 'ति' सारखी र्‍हस्व का लिहिली जाते? पण ते असो.) \'एक झुंज वार्‍याशी' हे पु.लंनी अवघ्या चार दिवसांत रुपांतरीत केलेलं आणि वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक आणि त्यातली सामान्य माणूस ही भूमिका हे मोठं आव्हान होतं आणि त्या प्रयोगाचा गंभीर ताण यायचा असं प्रभावळकर लिहितात. या नाटकादरम्यानची एक महत्वाची आठवण प्रभावळकरांनी लिहिली आहे. या नाटकात 'सद सद् विवेकबुद्धी हा शब्द बर्‍याच वेळा येतो. बरेच लोक हा शब्द सत् सत् विवेकबुद्धी असा उच्चारतात.( हे दोन्ही शब्द सलग, पूर्ण असे वाचावेत) या नाटकाच्या प्रयोगाच्या तालमीदरम्यान मुद्दाम येणारे डॉ. अशोक रानडे यांनी नटांना हा शब्द कसा म्हणायचा - पहिला 'द' पूर्ण, दुसरा अर्धा हे मुद्दाम शिकवलं, आणि ते नाटकात काटेकोरपणे पाळलं गेलं. भाषाशुचितेचा हा आग्रह 'केल्या गेली आहे.' च्या जमान्यात मला फार निर्मळ वाटतो.
जवळजवळ वीस वर्षे अभिनय करुनही 'एक झुंज वार्‍याशी' या नाटकातून बरंच शिकायला मिळालं, फक्त आपली शिकायची तयारी हवी असं प्रभावळकर लिहितात तेंव्हा तर ते एका यशस्वी कलाकाराचं सूत्रच सांगून जातात असं वाटतं.
'नातीगोती' हेही गंभीर प्रकृतीचं नाटक. त्यातला काटदरे साकारताना आपण आपल्याला त्यात गुंतू दिलं नाही, त्यातला मतिमंद बच्चू गेल्यानंतर दोन्ही हातांनी तोंड झाकून ओक्साबोक्सी रडताना हाताच्या आड बाकी आपला चेहरा कोरा रहात असे असे प्रभावळकर लिहितात. कदाचित 'एलिनेशन थिअरी' चा त्यांच्यावरील प्रभाव तोवर कायम असेल. किंवा कदाचित हेच कलाकाराचं खरं कौशल्य असेल. त्यामुळे 'नातीगोती' मधले काटदरे बघताना प्रेक्षकांना त्रास होत असे, पण ते साकारताना आपल्याला अजिबात त्रास होत नसे, असं प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. 'नातीगोती' च्या प्रयोगादरम्यान जळगावच्या प्रेक्षकांनी प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांच्यामधील एका गंभीर प्रसंगात अश्लील शेरेबाजी केली आणि मग प्रभावळकरांना त्यांची काटदरेंची भूमिका सोडून त्या प्रेक्षकांना खड्या आवाजात कसं सुनवावं लागलं त्याची एक आठवण या पुस्तकात आहे. गावात बदल, बाकी अशी एखादी आठवण प्रत्येक अभिनेता-अभिनेत्रीच्या पुस्तकात असतेच. पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी एका लहान खेड्यात गणपत पाटलांच्या नाट्यप्रयोगाला त्या खेड्यातल्या भाबड्या, गोजिर्‍या, निरागस प्रेक्षकांनी हाच प्रकार केला होता, त्यावेळी मी तिथे होतो. गणपत पाटलांनी शेवटी मग आपला 'नाच्या' चा आवाज सोडून एकदम कणखर आवाज लावला होता. प्रेक्षक चरकले होते. पंचवीसेक वर्षांपूर्वी 'भरत' मध्ये अभिनेते राजशेखर यांना हाच प्रकार करावा लागला होता आणि विक्रम गोखलेंनी प्रयोगादरम्यान (प्रयोगाआधी आवाहन करुनही) कुणा एका 'रसिका'चा मोबाईल फोन वाजू लागला तेंव्हा स्वतःच्याच थोबाडीत मारुन घेतली होती... असे प्रसंग हा प्रकार वाचताना आठवले. गंधर्वांच्या शालूंचं आणि थिरकवासाहेबांच्या तबल्याचं माहेरकौतुक असलेल्या रसिक, सहृदय मराठी प्रेक्षकाचा हा एक हिडीस, थिल्लर चेहरा प्रत्येक नटाने आणि कलाकृती बघण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक रसिकाने ध्यानात ठेवला पाहिजे, असे माझे मत आहे.
'एक हट्टी मुलगी' मधला इरसाल तात्या, 'घर तीघांचं हवं' मधला व्यसनी डीएन आणि 'कलम ३०२' मधील दुहेरी भूमिका - प्रभावळकरांच्या या भूमिका पहायला हव्या होत्या असे वाटते. पुढे 'संध्याछाया', 'जावई माझा भला' वगैरे नाटकांपर्यंत त्यांच्यातल्या प्रयोगशील अभिनेत्यावर त्यांच्यातल्या व्यावसायिक कलाकाराने मात केलेली असावी असेही वाटते. पण एकंदरीत या पुस्तकातील प्रभावळकर या अभिनेत्याचा नाट्यप्रवास- आणि प्रभावळकरांनी त्याचे केलेले शब्दांकन - हे दोन्हीही आपापल्या गुणामुळे वाचनीय झालेले आहेत.
'हसवाफसवी' आणि 'बटाट्याची चाळ' या दोन प्रयोगांच्या उल्लेखाशिवाय प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासाचे वर्णन पूर्ण होऊच शकणार नाही. 'हसवाफसवी' हा एक वेगळा, प्रसन्न प्रयोग होता. 'बॉबी मॉड' सोडला तर त्यातले काहीही कृत्रीम, चिकटवलेले वाटत नाही. कृष्णराव हेरंबकर अगदी त्यांच्या शेवटच्या 'चिंतना' सकट अस्सल वाटतात. (तेच काहीसे विकसित स्वरुपात गंगाधर टिपरे म्हणून नंतर दूरदर्शनवर आले) दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबाची आपल्या मुलीशी बोलतानाची जी आफ्रिकन म्हणून भाषा आहे तिच्यात स्वाहिली आणि पोर्तुगीज भाषेतले काही शब्द आपण वापरले तर प्रिन्स वांटुंग पिन् पिन् च्या भाषेत काही जपानी शब्द वापरले असे प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. प्रेक्षकांना जे स्टेजवर किंवा पडद्यावर दिसतं त्यामागे विचार करणार्‍या कलाकाराचा किती अभ्यास असतो, किती मेहनत असते, हे यावरुन ध्यानात येतं. पण 'हसवाफसवी' त खरा बाजी मारुन जातो तो अष्टवक्र नाना पुंजे. गेंगाण्या आवाजात वाकडीतिकडी पावले टाकत अत्यंत आगाऊपणे बोलणारा हा नाना कोंबडीवाला अतिशय लोकप्रिय झाला होता. एकूणच 'हसवाफसवी' यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ झाले होते. त्याचे ७५० प्रयोग झाल्यावर प्रभावळकरांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला. कलाकाराकडे फक्त व्यावसायिक दृष्टीकोन असून चालत नाही, त्याला सतत आपल्यातल्या कलाकाराची वाढ चालू ठेवावी लागते - हे सगळं लिहायला-वाचायला ठीक आहे, पण यासाठी खरोखर कठोर निर्णय घेण्याची वेळ आली की बरेच लोक कच खातात. प्रभावळकरांनी तसे केले नाही, हे फार बरे झाले.
'बटाट्याची चाळ' हे अर्थातच प्रभावळकरांना (आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींना) एक वेगळं आव्हान असलं पाहिजे. त्याच्या प्रयोगांत 'पुलं' आणायचे नाहीत, पण मूळ कलाकृतीला विटाही लावायच्या नाहीत असली काहीतरी कोंडी या दोघांची झाली असली पाहिजे. पुलंची 'चाळ' मी पाहिलेली नाही, पण प्रभावळकरांची चाळ बघताना मला हाच नट हे आव्हान पेलू शकतो असं जाणवलं होतं. चाळीमधलं 'चिंतन' सादर करताना त्यात 'गंगाधर टिपरे' डोकावतील की काय या शंकेने आपण 'कॉन्शस' झालो होतो असं प्रभावळकरांनी लिहिलं आहे. कलाकाराला आपल्या भूमिकांचं 'बेअरिंग' सांभाळताना आवश्यक असणार्‍या या एका वेगळ्या कौशल्याची जाणीव या लिखाणातून होते.
'वा गुरु!' या प्रभावळकरांच्या अगदी अलीकडच्या नाटकाविषयी प्रभावळकर मोजके लिहितात. यातील सप्रेसरांच्या भूमिकेचा अजून शोध सुरु आहे असे ते म्हणतात.
दूरदर्शनवरील प्रभावळकरांच्या काही प्रयोगांबाबत मी वर लिहिले आहे. त्यानंतर खाजगी वाहिन्या सुरु झाल्यावर आलेली 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मालिका मराठीतल्या काही सर्वोत्कृष्ट मालिकांपैकी एक ठरावी. 'लोकप्रिय आहे ते ते सगळे थिल्लर असते' या प्रमेयाला छेद देणारी ही मालिका. त्यातले आबा आपल्याला फार लवकर सापडले असे प्रभावळकर लिहितात. या मालिकेतले शिर्‍याचे -म्हणजे आबांच्या नातावाचे आणि आबांचे प्रसंग लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तीन्ही दृष्टीकोनांतून सरस ठरले आहेत. प्रभावळकरांनी त्यांच्या आबा या भूमिकेविषयी फार सुरेख लिहिलं आहे. बर्‍याच लोकांना ठाऊक नसणारी आणि काही लोकांच्या विस्मरणात गेलेली 'साळसूद' या मालिकेतील प्रभावळकरांची 'भार्गव' ही खलभूमिका मला हे पुस्तका वाचताना आठवली आणि फार बरे वाटले. या सगळ्या मालिका, हे नाट्यप्रयोग पुन्हा एकदा पहावेसे वाटले.
शेवटी प्रभावळकरांच्या चित्रपटातील भूमिकांविषयी अगदी थोडे. अगदी अनपेक्षितपणे साकारावा लागलेला ( आणि म्हणून तयारीला अगदी वेळ न मिळालेला) 'चौकट राजा' मधला नंदू, 'एन्काऊंटर-दी किलिंग' मधला पुनाप्पा, 'रात्र आरंभ' मधले ठोंबरे, 'कथा दोन गणपतरावांची' मधले गणपतराव तुरे-पाटील, 'मुन्नाभाई' मधले गांधी आणि 'सरकार राज' मधले रावसाहेब या प्रभावळकरांच्या काही उल्लेखनीय भूमिका. विस्तारभयास्तव या भूमिकांबद्दल फार लिहीत नाही (आणि खुद्द प्रभावळकरांनीही आपल्या चित्रपटांतील भूमिकांबद्दल तसे कमीच लिहिले आहे. डॉ. लागूंनी 'लमाण' मध्ये असेच केले आहे. मुळात नाटकाची आवड असलेल्या कलाकाराला सिनेमा हे माध्यम फारसे आकर्षित करणारे वाटत नसावे!), पण 'रात्र आरंभ' हा चित्रपट ज्यांनी बघीतला नाही त्यांनी तो आवर्जून आणि शक्य तितक्या लवकर बघावा असे बाकी मला आवर्जून लिहावेसे वाटते.
'सरकार राज' रिलीज झाला त्या दिवसाची गोष्ट. रांगेत उभे राहून रात्रीच्या खेळाची तिकिटे काढली होती. सोबत एक असाच अमिताभ बच्चनचा 'डाय हार्ड' फॅन होता. सिनेमा सुरु झाला. बच्चन पितापुत्र रावसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला जातात असा प्रसंग होता. झोपाळ्यावर पाठमोरे बसलेले रावसाहेब आणि त्यांना वाकून नमस्कार करणारे बच्चन पितापुत्र असा तो प्रसंग. रावसाहेबांचा चेहरा आधी दिसत नाही. कॅमेरा हळूहळू वर येतो आणि मग फेटा बांधलेले, वृद्ध रावसाहेब आशीर्वाद देताना दिसतात. प्रभावळकरांचा चेहरा दिसल्यावर माझा बच्चनप्रेमी मित्र उत्स्फूर्तपणे म्हणाला, "हां... हे ठीक.हे ठीक. मला वाटलं साहेबांना कुणा ऐर्‍यागैर्‍यासमोर वाकायला लावतात काय..." या प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याचे आठ रिटेक्स झाले आणि पर्यायाने बच्चनद्वयींना आठ वेळा प्रभावळकरांना वाकून नमस्कार करावा लागला. 'पोएटिक जस्टिस' यालाच म्हणतात की काय, कुणास ठाऊक!
काही असो, हे पुस्तक मला आवडले. आत्मचरित्रांचा सुकाळ झालेला असताना प्रभावळकरांनी ज्या संयमाने आणि खोल विचार करुन हे पुस्तक लिहिले आहे, त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर प्रभावळकरांचा मी अधिकच मोठा प्रशंसक, चाहता झालो आहे असे मला वाटते. आनंद आहे.
एका खेळियाने
दिलीप प्रभावळकर
अक्षर प्रकाशन
सुधारित आवृत्ती, मे २०११, किंमत ३५० रुपये.

field_vote: 
3.2
Your rating: None Average: 3.2 (5 votes)

प्रतिक्रिया

प्रभावळकर हे माझेही आवडते कलाकार आहेत. 'रात्र आरंभ' मधील त्यांचा अभिनय एक उत्कृष्ट नमुना आहे. तसेच टिपर्‍यांच्या भूमिकेतही त्यांनी फारच बहार आणली होती. त्यांच्या पुस्तकाची समीक्षा तुमच्यासारख्या लेखकाच्या लेखणीतून वाचायला मिळाल्यामुळे एक खास समाधान मिळाले.
त्यांचा 'चिमणराव' त्याकाळी अमराठी लोकांतही फार प्रसिद्ध होता. पण का कुणास ठाऊक, आमच्या डोक्यात तो दामुअण्णांचा चिमणराव इतका फिट बसला होता की मनांत नकळत तुलना व्हायची आणि मग प्रभावळकरांचा चिमणराव तेवढा नाही आवडायचा.
पुस्तक नक्कीच वाचीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्मचरित्रं वाचावीत की नाही असाच प्रश्न अनेकदा पडतो मला. पण तुम्ही एकंदर जे सांगितले आहे 'एका खेळियाने' बद्दल, त्यामुळे वाचेन मी हे पुस्तक. (प्रभावळकरांची चिंतनशील माणूस अशी प्रतिमा माझ्या मनात आहे त्यामुळे निदान मी तुम्ही करुन दिलेला परिचय तरी वाचला. अन्यथा मी तशीच पुढे गेले असते कदाचित.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्मचरित्रे वाचावीत की नाही हा प्रश्न मलाही पडतो. 'एका खेळियाने' हे तशा रुढ अर्थाने फक्त आत्मचरित्र नाही. एक गुळगुळीत शब्दप्रयोग वापरायचा तर 'एका कलाकाराचा प्रवास' असे या पुस्तकाचे स्वरुप आहे. त्यात आपले कलाकार म्हणून आयुष्य यापलीकडे प्रभावळकरांनी फारसे काही घातलेले नाही. त्यामुळे मला हे पुस्तक वाचावेसे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

<< त्यात आपले कलाकार म्हणून आयुष्य यापलीकडे प्रभावळकरांनी फारसे काही घातलेले नाही. >>
मग तर अवश्य वाचायला हवे हे पुस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकाची ओळख आवडली,
दिलिप प्रभावळकर अभिनेता म्हणून तर आवडतातच पण त्यांचे लेखनही आवडते.
स्वाती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रभावळकरांच्या भुमिका नेहमीच आवडतात. शाळेत असताना त्यांच्या हसवाफसवीचे टीव्हीवर प्रयोग व्हायचे/ नाटक रेकॉर्ड करायचे ते प्रचंड आवडायचं. चिमणराव, झोपी गेलेला तर आवडत्या मालिका.

पुस्तक ओळख आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा ताज्या ताज्या पुस्तकांचा परिचय वाचायला मिळणे आनि तोही रावसाहेबांकडून असा दुहेरी योग आमच्या पत्रिकेत दिसतोय Smile
दिलीप प्रभावळकर नावाचं एक वेगळं वलय आहे. त्यांचं पुस्तक म्हंजे उत्सूकता आहेच. बघुया कधी योग येतोय वाचायचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान रे संजोप्या. एका संवदनाशील ,सर्जनशील अभिनेत्याची माहिती दिल्याबद्दल.
पुस्तक आणण्यासाठी ह्यांना सांगायलाच हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकपरिचय आवडला. सुदैवाने हे पुस्तक (आणि गुलाबी सिर - द पिंक हेडेड डकही) कालच दादरला सापडले. दोन्ही वाचण्याची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकओळख आवडली.
पुलदेशपांडेंचे कोणा एका कोळीयाने हे पुस्तक होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

पुस्तक ओळख आवडली.

'एलिअनेशन थिअरी' मध्ये याच्या बरोबर विरुद्ध विचार मांडलेला आहे. एखाद्या नाट्यपूर्ण, उत्कट प्रसंगानंतर विंगेतून एका लाकडी बॉक्सवर हातोड्याने प्रहार करुन 'टॉक' असा मोठा आवाज काढला जाई, का, तर प्रेक्षकांना हे सगळं नाटक आहे, याचा फक्त भावनिक पातळीवर विचार करु नका, वैचारिक पातळीवरुन करा याची जाणीव करुन देण्यासाठी. 'रसभंग' वगैरे कल्पनांना येथे स्थान नाही, कारण मुळात प्रेक्षकाला नाटकात आस्वादक असे गुंतू द्यायचेच नाही.

हे प्रभावळकरांचे मत आहे, की वाचक म्हणून सन्जोप रावांचे मत आहे. कृत्रिम भाग मुद्दामून दाखवले आहेत अशा नाटकात आस्वादक म्हणून मी खुद्द गुंगलेलो आहे. आणि नटा-दिग्दर्शकाशी झालेल्या प्रेक्षक संवादात असे समजले, की हे माझे एकट्याचेच नाही. नटही गुंततात, आणि बहुतेक प्रेक्षकही गुंततात.

रा. ग. गडकर्‍यांनी सुद्धा म्हटले आहे, की रंगपट आणि प्रेक्षक यांच्या मध्ये "धगधगीत अग्निरेखा" (फुटलाइटांची) हे विसरता येत नाही. त्यामुळे मराठी नाटकांतही ही जाणीव असलीच पाहिजे की "प्रेक्षक कितीही उत्कट रीत्या गुंतला, तरी नाटकातले विशेष नाटकी भाग त्याच्या लक्षात येत राहातात. प्राचीन नाटकांत, आणि कित्येक मराठी नाटकांतही "सूत्रधार" हे पात्र नाटकातील तपशिलांचे वर्णन (नटीला उशीर होणे, पेक्षक वाट बघत असणे, वगैरे उल्लेख) करून प्रेक्षकाला थेट सांगतो - हे नाटक आहे... नांदी, पडद्यामागे नारळ फोडणे, गणपती नाचवणे, नाटकाच्या मध्येच वन्स मोअर घेणे... हे सगळे मराठी आस्वादकांना माहीत आहे. तर मग विंगेत "टॉक" आवाज केल्याने उत्कट आस्वाद घेता येत नाही, असा गैरसमज का बरे होत असेल?

भारतीय पारंपरिक नृत्यनाट्यात रोज-व्यवहारापेक्षा वेगळी वेषभूषा करून रोजव्यवहारापेक्षा वेगळे हावभाव/मुद्रा वापरून नाट्याचा सामान्य आयुष्याशी वेगळेपणा सदैव डोळ्यांसमोर राहातो. तरी उत्कट आस्वाद सहज शक्य असतो. अपेक्षितही असतो.

असे सर्व असून, जर हे प्रभावळकरांचे मत असेल, तर उत्तम कलाकाराचे मत म्हणून जरूर विचार करण्याजोगे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे प्रभावळकरांचे मत आहे, की वाचक म्हणून सन्जोप रावांचे मत आहे
असे सर्व असून, जर हे प्रभावळकरांचे मत असेल, तर उत्तम कलाकाराचे मत म्हणून जरूर विचार करण्याजोगे आहे.

हे मत कुणाचे आहे, त्यावर ते विचार करण्यासारखे आहे की नाही हा 'अजब न्याय वर्तुळाचा' वाटला. हे जर माझे मत असेल तर. सोडून द्या, त्यावर फारसा विचार करु नका, काय? प्रभावळकर असे म्हणतात? मग असेल बरं का त्यात काही तथ्थ्य.... असो.
हे एक मत आहे, एक प्रमेय आहे. त्यावर चर्चा जरुर व्हावी.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

उत्तम रंगकर्मी नाटकाबाबत विशेष जाणकार असेल, हे सामान्य व्यवहारातले तत्त्व आहे. (तसेच उत्तम कुंभार मडकी घडवण्याबाबत, उत्तम शिंपी कपडे शिवण्याबाबत ज्ञानी असेल. सदरा तंग/ढगळ झाला वगैरे कपडे घालणारा कोणीही सांगू शकेल. पण शिवणकामाच्या तंत्राबाबत शिंपी अधिकाराने बोलेल, असे कोणी म्हटल्यास "प्रमेय चर्चा करण्यालायक आहे" असे कोण बरे म्हणते?) इतकेच काय, वरच्या चांगल्या पुस्तकपरिचयात प्रभावळकरांच्या नाटक-अनुभवाबाबत विशेष विस्तार आहे. त्यामुळे प्रभावळकरांना नाटकाबाबत काही म्हणायचे असेल, तर ते वाचकांकरिता विशेष चित्तवेधक आहे, हे बहुधा लेखकाचेही मत असावे. असे मत नाही काय?

"प्रमेया"बाबत चर्चा करण्यालायक कुठला संदेह आहे, कुठले प्रमाण लागू आहे, हे स्पष्ट केले, तर चर्चा अधिक फलदायी होईल.

"वर्तुळाचा न्याय" म्हणजे काय? इंग्रजीत ज्याला "सर्क्युलर आर्ग्युमेंट" म्हणतात (किंवा मराठीत इतरेतराश्रय म्हणतात) ते आहे काय? रंगकर्मी प्रभावळकरांनी नाटकाच्या तंत्राबाबत व्यक्त केलेले मत आणि आस्वादक सन्जोप राव यांनी नाटकाच्या तंत्राबाबत व्यक्त केलेले मत, ही दोन मते वेगळ्या भूमिकेतून विचार करण्यालायक आहे, यात इतरेतराश्रय असा काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सन्जोपरावांशी सहमत आहे. मला कालच अगदी असेच वाटले होते. कोण म्हणते त्याने एखाद्या विधानास वजन येते अथवा त्या विधानाचे वजन कमी होते काय? कुतूहल आहे.
अवांतर - हां स्तोत्रांच्या बाबतीत मी खूप पर्टीक्युलर आहे. मी फक्त "ऋषीमुनी/ आदि शंकर" यांचीच स्तोत्रे वाचते कारण मला वाटते की त्यांचे तपोबल त्यामागे असते आणि ती स्तोत्रे सिद्ध झालेली असतात. बाकी माझ्या मते ऐरेगैरे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सन्जोपरावांशी सहमत आहे. मला कालच अगदी असेच वाटले होते. कोण म्हणते त्याने एखाद्या विधानास वजन येते अथवा त्या विधानाचे वजन कमी होते काय? कुतूहल आहे.

(कधी नव्हे ते) सहमत!

(सविस्तर सवडीने.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सन्जोप राव वरील लेखात म्हणतात :

'पळा पळा कोण पुढे पळतो तो' या फार्ससंदर्भात प्रभावळकरांनी केलेले लिखाण मुळातून वाचावे असे आहे.

प्रभावळकरांनी या बाबतीत केलेले लिखाण वाचण्यालायक का वाटले? या संदर्भात कोणीही केलेले लिखाण जर समसमान वाचण्यालायक असू शकते, तर वरील वाक्याचा अर्थ लागत नाही. सन्जोप रावांचे सोडा. मूळ लेखातील या वाक्याचा अर्थ तुम्हाला काय लागतो?

सन्जोप राव पुढे म्हणतात :

चाळीमधलं 'चिंतन' सादर करताना त्यात 'गंगाधर टिपरे' डोकावतील की काय या शंकेने आपण 'कॉन्शस' झालो होतो असं प्रभावळकरांनी लिहिलं आहे. कलाकाराला आपल्या भूमिकांचं 'बेअरिंग' सांभाळताना आवश्यक असणार्‍या या एका वेगळ्या कौशल्याची जाणीव या लिखाणातून होते.

बिगरकलाकाराने केलेल्या लिखाणातून ही जाणीव होणार नाही, पण प्रभावळकरांच्या लिखाणातून ही जाणीव होते, असे ध्वनित होते. बिगर-रंगकर्मी "आपण कॉन्शस" झालो असे म्हणणार तरी कुठून? ती साक्ष तर फक्त रंगकर्मीच देऊ शकतो. मूळ लेख वाचताना तुम्ही या परिच्छेदापासून काय अर्थ ओळखला? प्रभावळकर कलाकार असून-नसून काय फरक पडतो? हे कुतूहल तेव्हा तुम्हाला वाटले का ... तुम्हीच विचार करा : त्या ठिकाणी प्रभावळकरांच्या मताला तुम्ही वजन कसे काय दिले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>प्रभावळकरांनी या बाबतीत केलेले लिखाण वाचण्यालायक का वाटले? या संदर्भात कोणीही केलेले लिखाण जर समसमान वाचण्यालायक असू शकते, तर वरील वाक्याचा अर्थ लागत नाही. सन्जोप रावांचे सोडा. मूळ लेखातील या वाक्याचा अर्थ तुम्हाला काय लागतो? <<<

उदाहरण असंदर्भ आहे. इथे 'मुळापासून वाचावे असे आहे' याचा अर्थ ते लेखन प्रभावळकरांनी केले आहे म्हणून वाचण्यासारखे आहे, असा नाही, तर त्या लेखनाच्या गुणवत्तेबद्दल आहे. ते एखाद्या समीक्षकाने किंवा खुद्द सन्जोप रावांनी इतरत्र केलं असतं तरी त्याबद्दल असंच म्हणता आलं असतं.

याउलट,

>>>असे सर्व असून, जर हे प्रभावळकरांचे मत असेल, तर उत्तम कलाकाराचे मत म्हणून जरूर विचार करण्याजोगे आहे.<<<

यात विचारापेक्षा व्यक्तिला महत्व दिल्यासारखे वाटते आहे.

'अजब न्याय वर्तुळाचा' हे काय प्रकरण आहे हे माहित नाही, पण त्याचा 'सर्क्युलर आर्ग्युमेंट' हा अर्थ रावांनाही अपेक्षित नसावा. अचूक अर्थाने न लिहिलेला तो एक अलंकारिक वाक्प्रयोग असावा.

>>>(तसेच उत्तम कुंभार मडकी घडवण्याबाबत, उत्तम शिंपी कपडे शिवण्याबाबत ज्ञानी असेल. सदरा तंग/ढगळ झाला वगैरे कपडे घालणारा कोणीही सांगू शकेल. पण शिवणकामाच्या तंत्राबाबत शिंपी अधिकाराने बोलेल, असे कोणी म्हटल्यास "प्रमेय चर्चा करण्यालायक आहे" असे कोण बरे म्हणते?)<<<

मान्य आहे, पण उत्तम शेफने बनवलेले सूप मला आवडले नाही, तर ते केवळ 'उत्तम शेफने' बनवले आहे म्हणून मी भुरके मारत प्यावे का? आस्वादक किंवा समीक्षकाच्या मताचे महत्व कायम कमीच असावे का? 'बॉडीगार्ड' मधल्या आपल्या भूमिकेचे सलमानचे मूल्यमापन तो अभिनेता(!) आहे म्हणून एखाद्या चित्रसमीक्षकाच्या मतापेक्षा जास्त ग्राह्य धरावे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>(तसेच उत्तम कुंभार मडकी घडवण्याबाबत, उत्तम शिंपी कपडे शिवण्याबाबत ज्ञानी असेल. सदरा तंग/ढगळ झाला वगैरे कपडे घालणारा कोणीही सांगू शकेल. पण शिवणकामाच्या तंत्राबाबत शिंपी अधिकाराने बोलेल, असे कोणी म्हटल्यास "प्रमेय चर्चा करण्यालायक आहे" असे कोण बरे म्हणते?)<<<

मान्य आहे, पण उत्तम शेफने बनवलेले सूप मला आवडले नाही, तर ते केवळ 'उत्तम शेफने' बनवले आहे म्हणून मी भुरके मारत प्यावे का? आस्वादक किंवा समीक्षकाच्या मताचे महत्व कायम कमीच असावे का? 'बॉडीगार्ड' मधल्या आपल्या भूमिकेचे सलमानचे मूल्यमापन तो अभिनेता(!) आहे म्हणून एखाद्या चित्रसमीक्षकाच्या मतापेक्षा जास्त ग्राह्य धरावे का?

अगदी! शिवाय, राजाचे नवे कपडे शिवताना वापरलेल्या नवीन वैशिष्ट्यपूर्ण तंत्रावर शिंपी अधिकारवाणीने आणि अगदी तपशीलवार वर्णन करून बोलेल, त्याचे सह(कारी) शिंपीसुद्धा त्याची री ओढत त्याच्या कलाकृतीची प्रशंसा करताना त्यातील खाचाखोचा-बारकाव्यांसहित समीक्षण करतील, बरेचसे प्रेक्षकही शिंप्याच्या स्वगुणवर्णनाने आणि सहशिंप्यांच्या समीक्षेने भारावून जाऊन त्यात हो-ला-हो करतील (किंवा कदाचित 'इतका मोठा म्हणवणारा कलाकार आणि इतके थोरप्रस्थापित समीक्षक म्हणतात, तर आपण त्याहून वेगळे कसे म्हणायचे' म्हणून स्वतःचे वेगळे मत मांडू किंवा कदाचित बनवूही धजणार नाहीत), पण कधीमधी 'राजा नागडा आहे' म्हणून ठणकावून सांगायलासुद्धा प्रेक्षकांतल्या एखाद्या लहान मुलाची निरागस नजरच (आणि निर्भीडपणाच) लागतो, हाही भाग आहेच, नाही का?

(येथे 'निरागस' हे विशेषण लहान मुलाकरिता नसून नजरेकरिता आहे, याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.)

असो. 'दिलीप प्रभावळकर नागडा आहे' असा (लाक्षणिक अथवा वाच्य, कोणत्याही अर्थाने) दावा करण्याचा हेतू नाही. मात्र: (अवांतर)

'दिलीप प्रभावळकरसारखा आर्टिस्ट जर तिकडे (पाश्चिमात्य देशांत ) असता तर त्यानं रान पेटवलं असतं' हे पु.ल. देशपांडेंचं वाक्य...

(मूळ लेखावरून उद्धृत.)

या कलाकाराची प्रशंसा करताना पु.लं.सारख्या वकूबाच्या व्यक्तीलासुद्धा 'पाश्चिमात्य देशांत असता तर' या (बिनबुडाच्या परंतु कदाचित पारंपरिक) मापदंडाचा आधार घ्यावासा वाटावा, याचे आश्चर्य वाटते. ''पोटेन्शियल' असलेला कोणताही होतकरू कलाकार, पाश्चिमात्य देशांत / पाश्चिमात्य देशांतील असल्यास, हमखास भरघोस यशस्वी होतो / रान पेटवतोच पेटवतो' (किंवा, उलटपक्षी किंवा कदाचित ओघाने, 'अमूकअमूक कलाकार, भरपूर ताकदीचा असला, तरी केवळ भारतात खितपत पडल्याने आपल्या कर्तृत्वाची सर्वोच्च पातळी गाठू शकला नाही') या समजुतीला आधार काय? नाही म्हणजे, पु.लं.ची प्रशंसा प्रामाणिक असेलही, आणि दिलीप प्रभावळकर हा कलाकार त्या (किंवा एकंदरीतच) प्रशंसेस पात्र असेलही. परंतु अशा बेगडी आधारावरच्या मांडणीने ती प्रशंसा (कदाचित अनवधानाने, पण तरीही) काहीशी 'वशिला असता, तर मंत्री, किंवा पोपच्या खालोखालच्या दर्जाचा अधिकारीसुद्धा'च्या बाजूस (संदर्भः 'खुर्च्या' - पु.ल.) झुकू लागत नाही काय?

कदाचित यात कोठेतरी मराठी मानसातला एका प्रकारचा अंगभूत (विनाकारण) न्यूनगंड डोकावत असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या उद्धरणात :

कलाकाराला आपल्या भूमिकांचं 'बेअरिंग' सांभाळताना आवश्यक असणार्‍या या एका वेगळ्या कौशल्याची जाणीव या लिखाणातून होते.

येथे प्रभावळकरांच्या लिखाणाबाबत मत नसून कुण्याही कलाकाराच्या कौशल्याबाबत विचार सांगितलेला आहे.

किती उद्धरणे देत बसणार? मूळ लेखात वाक्य आहे :

जवळजवळ वीस वर्षे अभिनय करुनही 'एक झुंज वार्‍याशी' या नाटकातून बरंच शिकायला मिळालं, फक्त आपली शिकायची तयारी हवी असं प्रभावळकर लिहितात तेंव्हा तर ते एका यशस्वी कलाकाराचं सूत्रच सांगून जातात असं वाटतं.

यात अधोरेखिताचे काय काय घ्या? प्रभावळकरांच्या लिखाणाचे सामर्थ्य सांगतात आणि "यशस्वी कलाकार" उल्लेख नि:संदर्भ आहे, असे काहीसे म्हणणे आहे काय? असो. लेखातील एक-एक वाक्य वाक्य घेऊन तुम्ही प्रत्येक वाक्य प्रभावळकरांच्या लेखनकौशल्याबाबत आहे, असे सिद्ध करू शकता, आणि त्या वाक्यात प्रभावळकर खुद्द रंगकर्मी होते, ही बाब गौण-नि:संदर्भ आहे, असे सिद्ध करू शकता. पण जर प्रभावळकर उत्तम कलाकार होते, असा कुठलाही मुद्दा सन्जोप रावांना सुसंदर्भ म्हणून कधीच सांगायचा नव्हता असे म्हणू लागलात, तर तुम्हाला समजलेला आणि मला समजलेला लेखाचा मथितार्थ वेगवेगळा आहे. अर्थात, सन्जोप रावांनी खंडन करावे : "प्रभावळकर उत्तम रंगकर्मी होते ही बाब त्यांच्या पुस्तकाबाबतच्या या लेखाकरिता सुसंदर्भ आहे". त्यांच्या लेखापुरते असे खंडन केले, तर माझे वाचन चुकले होते, हे मान्यच करेन. परंतु त्यांच्या लिखाणाची पद्धत असामान्य आणि गैरसमज उत्पन्न करणारी आहे, असे माझे मत बनेल.

- - -

पण उत्तम शेफने बनवलेले सूप मला आवडले नाही, तर ते केवळ 'उत्तम शेफने' बनवले आहे म्हणून मी भुरके मारत प्यावे का?

असे मी म्हणतो आहे, असे तुम्हाला का वाटावे?
सदरा तंग/ढगळ झाला वगैरे कपडे घालणारा कोणीही सांगू शकेल. पण शिवणकामाच्या तंत्राबाबत शिंपी अधिकाराने बोलेल ... ही माझी वाक्ये त्याच्या बरोबर उलट म्हणतात. माझ्या मताच्या ठीक उलट मत कसे काय लागू करता?

हा अतिशय चीड येण्यासारखा विपर्यास आहे. माझ्या मूळ प्रतिसादात काय होते? आस्वादक म्हणून मला एलियनेशन तंत्राने केलेली नाटके चांगली वठली तर मला भावतात, असे मुद्दे होते. एलियनेशन थियरीच्या विरुद्ध जर प्रभावळकरांचे मत असेल, तर मी कलाकाराच्या साक्षीच्या दृष्टीने विचारात घेईन, असे म्हटले. आस्वादक म्हणून माझे मत उलट आहे, हे आधी किती स्पष्ट करावे, म्हणजे पुरेसे स्पष्ट झाले असते? तोच तर मूळ मुद्दा होता. तर मग उत्तम शेफने केलेले सूप मला आवडले नाही, तरी "आवडले" म्हणायला मी सांगतो आहे, हा विपर्यास अतिशय त्रासदायक आहे.

आणि नाटक नाटक आहे, हे जाणवून देण्याची देशी, मराठी तंत्रेही आहेत, आणि ती भावतात, ही उदाहरणे दिली होती. हा प्रकार म्हणजे फक्त पाश्चिमात्त्यांचे अंधानुकरण आहे, या कल्पनेच्या विरुद्ध ती प्रमाणे होत. आणि इथे (सदस्य 'न'वी बाजू) अंधानुकरणाचा आणि न्यूनगंडाचा मुद्दा जणूकाही माझ्या विरोधात मांडतात. विपर्यासावर विपर्यासाचे लोण चढत असताना, माझ्या मताच्या विरुद्ध जे मत त्याचा आरोप माझ्यावर करून प्रतिवाद केला जात असल्यास, संवाद व्यर्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही गोष्टी स्पष्ट करतो.

१. एलियनेशन थिअरी किंवा इतर नाट्यप्रवाह, वगैरे प्रकारांची मला जाण नाही आणि त्यामध्ये मला काडीचा रसही नाही.
२. प्रभावळकर एक कुशल कलाकार आहेत. पण ते महान कलाकार वगैरे काही आहेत, आणि त्यांच्या भूमिका/अभिनयामागे खोल विचार आहे/असतो असं मला वाटत नाही.

मला न पटलेले केवळ एक वाक्य आहे. आणि त्या वाक्यातून माझ्यासाठी (आणि इतर काहींसाठी) जो काही अर्थ ध्वनित झाला त्यासंदर्भात माझी प्रतिक्रिया आहे.

>>>असे सर्व असून, जर हे प्रभावळकरांचे मत असेल, तर उत्तम कलाकाराचे मत म्हणून जरूर विचार करण्याजोगे आहे.<<<

याचा एक अर्थ धागाकर्त्याचे मत असेल तर तितकेसे विचार करण्यालायक नाही, असा होतो. याला विपर्यास म्हणायचे असेल तर खुशाल म्हणू शकता. तरीही, आपल्याला काय म्हणायचे होते, यापेक्षा समोरच्या व्यक्तिला त्यातून काय अर्थबोध होतो, याला जास्त महत्व आहे, हे संवादकौशल्याचे थोडेही महत्व जाणणारा कोणीही जाणू शकतो. थोडेफार कठोर किंवा बोचू शकेल असे वाक्य लिहिले गेले की कधीकधी स्मायलींचा सडा टाकावा लागतो, किंवा प्रत्यक्ष संभाषणात तोंडभरून हास्य पसरवावे लागते, ते यासाठीच. प्रस्तुत वाक्य माझ्याखेरीज इतरांना, आणि खुद्द धागालेखकाला खटकल्याचे त्यांनी लिहिले आहे. पण 'मला अगदी तसेच म्हणायचे नव्हते' याऐवजी पानभर शब्दच्छल करणेच योग्य वाटत असेल, तर आपली मर्जी.

>>>सदरा तंग/ढगळ झाला वगैरे कपडे घालणारा कोणीही सांगू शकेल. पण शिवणकामाच्या तंत्राबाबत शिंपी अधिकाराने बोलेल ... ही माझी वाक्ये त्याच्या बरोबर उलट म्हणतात. माझ्या मताच्या ठीक उलट मत कसे काय लागू करता?

हा अतिशय चीड येण्यासारखा विपर्यास आहे. <<<

यावर, 'काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही', असे ठरवले आहे. कारण उप-प्रतिसादागणिक आपल्या भूमिकेला घट्ट चिकटून रहाण्याची अहंमन्यताच वाढते आहे, असे वाटते आहे. संवादाच्या मुख्य उद्दिष्टाच्या बरोबर विरुद्ध परिणाम घडत असेल तर संवाद करण्यात काय हशील, नाही का? तेव्हा आता माझ्याकडून सन्जोपरावांची वकिली थांबवत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. धनंजय यांच्याशी काही संबंध असलाच, तर त्यांच्या प्रतिसादातील एका आयसोलेटेड वाक्याच्या एक स्वतंत्र तत्त्व म्हणून (प्रस्तुत लेखाचा अथवा अन्य कशाचाही संदर्भ चित्रात न आणता) वैधावैधतेचा परामर्श घेणार्‍या (आणि त्याचबरोबर इतरही काही अवांतर मुद्दे मांडणार्‍या) माझ्या श्री. खवचट खान यांच्याबरोबरील वैयक्तिक उपचर्चेत, श्री. धनंजय यांच्याशी त्यात कोणत्याही प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न मी केलेला नसताना, माझ्यावर विनाकारण केले गेलेले आरोप अत्यंत घृणास्पद आणि निषेधार्ह आहेत.

झाल्या प्रकारास साजेसे प्रत्युत्तर देण्याची पुरेपूर क्षमता माझ्यात आहे, आणि असे प्रत्युत्तर टंकून तयारही आहे. ते प्रकाशित करायचे ठरवल्यास येथील वातावरणावर होणार्‍या प्रदूषणात्मक परिणामांची कोणतीही शाश्वती मी देऊ शकणार नाही. तूर्तास संयम बाळगावयाचे ठरवले आहे, याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्त़क परिचय आवडला. धनंजयचा प्रतिसादही. जमेल तसं पुस्तक वाचलंच पाहिजे.

'साळसूद' मालिकेत प्रभावळकरांचं खलनायकी काम फारच आवडलं. अन्यथा सात्त्विक चेहेर्‍याच्या माणसाने किंचित मेकप आणि फक्त अभिनयाच्या जोरावर ही भूमिका उत्तमपणे निभावली होती. तशीच एक भूमिका आवडली होती ती 'गुब्बारे' नामक मालिकेतली. सामान्य कारकून असणारा मध्यमवर्गीय माणूस लांब पल्ल्याच्या गाडीच्या एकाच कंपार्टमेंटमधे कॉलगर्लबरोबर असतो. त्याच्या साधेपणाने ही डँबिस मुलगीही एक रात्रभर सामान्य मुलीचं आयुष्य जगते. दिलीप प्रभावळकरांचं त्यातलंही काम फार आवडलं होतं. त्याचा काही उल्लेख पुस्तकात आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भाषाशुचितेचा हा आग्रह 'केल्या गेली आहे.' च्या जमान्यात मला फार निर्मळ वाटतो.

ह्या उल्लेखाबाबत विशेषाने..
'निर्मळ' हा चपखल शब्द..
प्रभावळकरांचा हा आग्रह 'खुपते तिथे गुप्ते'च्या या (http://www.youtube.com/watch?v=xqPNkK2PZQs) भागातही जाणवतो..
शक्य होईल तेवढा इंग्रजी शब्दांचा वापर ते कटाक्षाने टाळतात..(केवळ दिखावा म्हणून नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषयांतर बरेच झाले आहे. काय म्हटले, कुणी म्हटले वगैरे. माझ्याच लिखाणातील मुळातून वाचावे वगैरे वाक्यांबद्दल विचारणा झाली आहे. यावर फारसे लिहिण्यासारखे नाही. आंब्याचे दिवस आहेत. बाजारात एखादा आंबेवाला पायरी, हापूस, केशर मांडून बसलेला असतो. सहज चौकशी करायला तुम्ही गेलात की एका आंब्याची एक लहानशी फोड काढून तो आपल्या हातात देतो. 'देवगड आहे, साहेब. अगदी गोड आहे..' असे म्हणतो. मग त्यावर 'हे काय, आता खाल्ला की, मग पुन्हा विकत घेणे कशाला?' असे म्हणावे काय?
'अजब न्याय वर्तुळाचा' हे एका नाटकाचे वाक्य आहे. एका नाट्यकर्मीबद्दल लिहिताना मी ते 'पोएटिक लायसन्स' म्हणून वापरले. बाकी त्यात काही नाही. मला बाकी 'औदुंबर' ची आठवण झाली झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

'एका खेळियाने' वाचलेले आहेच. आवडलेल्या पुस्तकांपैकीही ते एक आहेच. अशा या पुस्तकाची परत एकदा नव्याने सुंदर ओळख करून दिल्याबद्दल रावसाहेबांचे आभार. प्रदीर्घ पण अजिबात कंटाळवाणा न झालेला लेख.

प्रभावळकरांची ओळख लहानपणी चिमणराव म्हणुनच झाली. त्याच सुमारास त्यांची चेटकिणही बघितली होतीच. अक्षरशः थरकाप उडवून देणारी ती चेटकिण आजही आठवते. मात्र चिमणरावाच्या लोकप्रियतेने कळस गाठला होता. तरीही त्यात न अडकता आपला मार्ग अनुसरत राहिल्याने प्रभावळकर तेव्हाच मनात ठसले होते. सतत प्रयोगशीलता, नवीन काहीतरी करत राहणे पण कुठेही पांडित्याचा अभिनिवेश न आणता माध्यमातून समोर येत राहिलेला हा कलाकार आवडतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

>>या पुस्तकात वर्णन केलेल्या 'एलिअनेशन थिअरी' या जर्मन रंगभूमीवरील कल्पनेची हे पुस्तक वाचताना गंमत वाटते. मराठी रंगभूमीवरची कल्पना काय तर अभिनय इतका खोल, उत्कट असावा की प्रेक्षकाचाही रंगमंच आणि वास्तव यात गोंधळ व्हावा. प्रेक्षकाला लेखकाने आपल्या लिखाणाने आणि अभिनेत्याने आपल्या अभिनयाने आपल्यामागे फरफटत नेले पाहिजे. 'एलिअनेशन थिअरी' मध्ये याच्या बरोबर विरुद्ध विचार मांडलेला आहे. एखाद्या नाट्यपूर्ण, उत्कट प्रसंगानंतर विंगेतून एका लाकडी बॉक्सवर हातोड्याने प्रहार करुन 'टॉक' असा मोठा आवाज काढला जाई, का, तर प्रेक्षकांना हे सगळं नाटक आहे, याचा फक्त भावनिक पातळीवर विचार करु नका, वैचारिक पातळीवरुन करा याची जाणीव करुन देण्यासाठी. 'रसभंग' वगैरे कल्पनांना येथे स्थान नाही, कारण मुळात प्रेक्षकाला नाटकात आस्वादक असे गुंतू द्यायचेच नाही. 'समीक्षक' या भूमिकेत माणूस शिरला की त्याला रसग्रहणापेक्षा चिरफाडीतच अधिक रस कसा वाटू लागतो याचे हे उदाहरण आहे, असे मला वाटते.<<

शेरेबाजी करत करत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून समीक्षकांना झोडपत राहायची सवय टाळ्याखाऊ असली तरीही कधी कधी विषयाच्या गांभीर्याला ती मारक ठरू शकते. धागालेखकाच्या वरच्या वक्तव्यावरचा धनंजयचा प्रश्न मला समजला तो असा : 'हे नाटक आहे; वास्तव नाही' याची आठवण करून देणारे अनेक घटक भारतीय नाटकांत परंपरेनं आहेत. तरीही प्रेक्षक त्यातल्या नाट्याशी तादात्म्य पावतात आणि त्याचा उत्कट आस्वाद घेतात असं दिसतं. असं जर असेल तर मग उत्कट आस्वादापासून प्रेक्षकाला पारखं करण्याच्या ह्या 'एलिअनेशन थिअरी'तल्या तत्त्वात काही अर्थ आहे का?

यावर मी हे म्हणेन की उत्कट आस्वादापासून प्रेक्षकाला पारखं करणं हे मुळात ब्रेश्तच्या 'एलिअनेशन थिअरी'चं ध्येय नव्हतं, तर त्याला त्या उत्कटतेला विशिष्ट दिशेला वळवायचं होतं. रंगमंचावर घडणार्‍या कथेशी आणि पात्रांवर गुदरणार्‍या प्रसंगांशी केवळ 'काही विशिष्ट लोकांच्या आयुष्यात हे घडतं आहे' असं समजून जर प्रेक्षक समरस होता, तर ब्रेश्तला जो व्यापक विचार मांडायचा होता तो बाजूला राहून गेला असता. ते टाळण्यासाठी ब्रेश्तनं काही नाट्यांतर्गत घटक वापरले. गंमत अशी आहे की ब्रेश्तचा हा सिद्धांत भारतीय चौकटीत आणताना वर धनंजय म्हणतो त्या भारतीय नाट्यपरंपरेतल्याच अनेक घटकांचा वापर केला गेला. तो कसा हे पाहिलं तर कदाचित काही उलगडा होऊ शकेल. उदाहरणार्थ, 'घाशीराम कोतवाल'मध्ये पेशवाईतल्या एका कोतवालाची दर्दभरी कहाणी सांगणं एवढाच हेतू नव्हता, तर सत्तालोलुप राजकारणी आपली सत्ता टिकवण्यासाठी घाशीरामसारख्यांचा वापर प्यादी म्हणून कसा करतात हे दाखवत दाखवत कम्युनिस्टांचा परस्पर काटा काढण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेचा असा केलेला समकालीन वापर हा त्याच माळेतला एक मणी कसा आहे, हे सुचवायचं होतं. मराठी लोकनाट्यपरंपरेतले तमाशा, गवळण वगैरे रूपबंध त्यासाठी वापरले गेले; तशीच ब्राह्मणांची भिंत कोरस म्हणून वापरली गेली. जे दाखवलं जातंय ते सनातन आहे; त्यातल्या प्रवृत्ती अद्यापही तुमच्या परिसरात कार्यरत आहेत हे ठळक करण्यासाठी गाणी, सूत्रधाराची टिप्पणी किंवा ब्राह्मणांचा कोरस यांसारख्या माध्यमातून घडलेल्या प्रसंगावर बोचरी टीकाटिप्पणी केली जाई. त्याद्वारे प्रसंगामागच्या मूळ प्रवृत्तींवर बोट ठेवलं जाई. त्यामुळे नाटक कोतवाल आणि नाना फडणीसाच्या गोष्टीपलीकडे जाऊ शके. आणि तरीही नाटक पाहणं हा एक उत्कट, थरारक अनुभव असे.

टीप : याविषयी प्रभावळकरांना किती कळतं आणि जे कळतं ते आपल्या पुस्तकात ते किती प्रभावीपणे मांडतात यांविषयी मी अनभिज्ञ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19668181.cms
हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवरून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सुरू झालेला प्रवास अनेक टप्पे, मैलाचे दगड पार करत राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. बावळट चिमणराव, हसवाफसवीतील सहा पात्रं, गतिमंद चौकट राजा, खलनायक तात्या विंचू, मानसिक द्वंद्वाचा रात्रआरंभ, मुन्नाभाईतील गांधी... प्रत्येक भूमिका वेगळी आणि लक्षात राहणारी. या भूमिकांविषयी, अभिनयाच्या प्रवासाविषयी प्रभावळकर यांनी श्रोत्यांशी मनमुराद गप्पा मारल्या. त्यांचा मृदू स्वभाव, दुसऱ्याला श्रेय देण्याची वृत्ती, तरुणांकडे स्पर्धक म्हणून पाहायची दृष्टी आणि मराठी सिनेमाला प्रेक्षक नसल्याची खंत हे सारेच मनाला स्पर्शून गेले. ' म.टा. संवाद ' चा सहावा कार्यक्रम रुईया कॉलेजमध्ये पार पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0