द एज्युकेशन ऑफ यूरी

Yuri

एकटं होणं, एकटं असणं, एकटं वाटणं, एकटं पडणं अशा अनेक प्रकारची रूपं माणसाचा एकटेपणा घेत असतो. आपल्याला एकटेपणातून सुटका हवीही असते आणि नकोही. नेमका हवा तेवढा एकटेपणा किंवा नेमकी हवी तेवढी सोबत मिळवणं हाच आयुष्याचा मूळ संघर्ष असेल का? जेरी पिंटोंची 'द एज्युकेशन ऑफ यूरी' ही कादंबरी वाचताना वारंवार हा प्रश्न पडतो. जेरी स्वतःच या कादंबरीचं वर्णन 'एकटेपणावर लिहिलेली कादंबरी' असं त्यांच्या मुलाखतींतून करून देतात.

यूरी फोनेस्का नुकताच वयात आलेला एक तरुण मुलगा आहे. तो तान्हा असताच त्याच्या आईवडिलांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. यूरीला लहानाचं मोठं त्याचा मामा - टिओ ज्युलिओ - करतो. चर्चमध्ये पाद्री होण्याचं स्वप्न बाळगून असलेला ज्युलिओ, त्याच्या आयुष्यात यूरीच्या अशा अचानक येण्यामुळे बावचळतो आणि नंतर शांतपणे आपल्या स्वप्नांची दिशा बदलतो. त्याच्या ख्रिस्ती धार्मिकतेमुळे आणि समाजवादी विचारसरणीमुळे यूरीला तो अत्यंत काटकसरीत वाढवतो. आजूबाजूच्या गरिबीची, दैन्याची, असहायतेची त्याला सतत आठवण करून देत असतो. कादंबरीची सुरुवात या विचारांविरुद्ध यूरीच्या मनात येणाऱ्या बंडखोरीने होते. शाळेत सगळ्यांकडून 'पाद्री का बच्चा' अशी हेटाळणी सहन करून वैतागलेला यूरी एल्फिन्स्टनमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतो आणि त्याचं, स्वतःचं असं खासगी आणि सार्वजनिक आयुष्य तयार व्हायला लागतं. ही अशी आणि एवढीच या कादंबरीची गोष्ट आहे.

पण जेरी पिंटोंच्या लेखणीतून ती जवळजवळ चारशे पानांची तरीही खिळवून ठेवणारी अशी कादंबरी झाली आहे. 'कमिंग ऑफ एज' हे वर्णन योग्य असलं, तरी प्रत्येक 'कमिंग ऑफ एज' गोष्ट वेगळी असते. 'शिक्षणासाठी गाव/शहर/घर सोडून महाविद्यालयात दाखल झालेला एक पुरुष' या कल्पनेवर आधारित अनेक यशस्वी कादंबऱ्या आहेत. पण प्रत्येक नायकाचे ताण, गोंधळ, स्वप्नं वेगळी असतात. त्यामुळे अशा लेबलांना एका मर्यादेपलीकडे काही अर्थ नाही. या कादंबरीचा नायक हळवा आहे. पण आपण असे कवीमनाचे, काहीसे हळवे आहोत याची त्याला पूर्ण जाणीव आहे आणि तिथपर्यंत कुणाला येऊ द्यावं याचे त्यानं त्याच्या नकळत काही नियम केले आहेत; भिंती बांधल्या आहेत. घरात तो आणि त्याचा मामा असे दोघेच असल्यानं, त्यानं कधीच चारचौघांसारखं आयुष्य अनुभवलेलं नाही. त्यात, आपला मामा गेला, तर या संबंध जगात आपण पूर्ण एकटे पडू हा ताण मनात बाळगूनच तो मोठा झाला आहे.

‘लहानपणी मी देवाला सांगायचो. मी सगळ्या भाज्या खाईन पण प्लिज टीओ ज्युलिओला दीर्घायुष्य दे’ असं कादंबरीत एके ठिकाणी यूरी सांगतो.

आईवडिलांशिवाय मोठं होण्याचे सगळे ताण आणि त्यांतून येणारी विकलता झाकायला यूरीनं स्वतःभोवती विनोदाची एक भिंत बांधली आहे. कॉलेजात गेल्यावर त्याच्या लक्षात येतं, की स्वतःच्या अनाथ असण्यावर, माहीमसारख्या - इतर मुलांच्या दृष्टीनं काहीशा 'डाऊनमार्केट' अशा - भागांत राहत असण्यावर, टिओ ज्युलिओच्या तत्त्वांमुळे सतत खादी घालत असण्यावर विनोद केल्यानं त्याला मित्र मिळतात आणि सहानुभूतीपासून सुटका होते. इंग्रजी साहित्य आवडणारा, थोडासा एकलकोंडा पण तीक्ष्ण विनोदबुद्धी असणारा मुलगा अशी त्याची ओळख होऊ लागते. यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक भावनिक चढ-उतार येतात. ही सगळी उपकथानकं जेरीच्या शैलीत प्रत्यक्ष वाचण्यातच मजा आहे.

यूरीच्या माध्यमातून, माणसाने आपली सोबत शोधण्याचे अनेक पैलू जेरी आपल्याला उलगडून दाखवतात. जिवलग मैत्रीत जे वाटतं त्याला प्रेम म्हणता येईल का? एखाद्यावर प्रेम असणं म्हणजे नक्की काय? शारीरिक आकर्षण आणि प्रेम यांमध्ये काय फरक आहे? आपल्याला नेहमीच भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटायला हवं का? एखाद्या जवळच्या मित्राबद्दल आपल्याला जे वाटतं त्याला फक्त मैत्रीच म्हणायचं का? अशा अनेक प्रश्नांशी यूरी एकीकडे झगडत असतो आणि त्याला जे प्रश्न पडत असतात, ते सगळ्यांचेच प्रश्न असल्याने, ते कथावस्तू ओलांडणारे ठरतात. मानवी भावनांची गुंतागुंत आणि तिच्यातून तयार होणारे अनेक जटिल प्रश्न जेरीची लेखणी सहानुभवाने हाताळते. तरीही अशा प्रश्नांची तात्त्विक बाजू, त्यांचं कालजयी असणं, या भावनिक विश्लेषणातून सुटत नाही. बुद्धी आणि भावना हे मानवी मनाचे दोन ध्रुव आहेत आणि एकावर राहणारे लोक दुसऱ्यावर राहणाऱ्यांना समजू शकत नाहीत या जुनाट समजुतीला छेद देणारं हे लेखन आहे.

जेरीच्या लेखणीबद्दल नोंदवावी अशी अजून एक गोष्ट म्हणजे त्यांच्या लेखनातली इंग्रजी भाषा पूर्णपणे भारतीय आहे. एखाद्या पात्राच्या तोंडी विशिष्ट प्रकारची इंग्रजी भाषा देऊन ते पहिल्या वाक्यातच ती व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभी करू शकतात. भारतीय इंग्रजीतल्या 'भारतीय' गोष्टी ते अचूक पकडू शकतात. त्यामुळे कोलाब्याला राहणाऱ्या पात्राचं इंग्रजी, श्रीमंत माणसाच्या ऑफिसमधल्या सेक्रेटरीचं इंग्रजी, वडिलांचं कापडाचं दुकान असलेल्या गुजराती मुलाचं इंग्रजी, कम्युनिस्ट चळवळीतल्या लोकांचं इंग्रजी, यांतले खास 'भारतीय' फरक वापरून ते त्यांच्या व्यक्तिरेखांची ओळख तयार करतात. इंग्रजीची अशी काही खास भारतीय रूपं त्यांच्या 'एम अँड द बिग हूम' या कादंबरीतही दिसली होती. पण 'द एज्युकेशन ऑफ यूरी'मध्ये इतक्या प्रकारच्या लोकांची इंग्रजी भाषा येते, की कधीकधी आपण हे पुस्तक इंग्रजीतून वाचतो आहोत की एखाद्या भारतीय भाषेतून हेही कळेनासं होतं. विशेष म्हणजे जेरींने केलेल्या इतर पुस्तकांच्या अनुवादातलं इंग्रजी आणि त्यांच्या कादंबऱ्यांमधील इंग्रजी या दोन्हींतला फरक लक्षणीय आहे. आणि दोन्ही प्रकारचं लेखन त्या त्या जागी चपखल बसणारं आहे.

कथेचा गाभा जरी यूरीच्या भावनिक द्वंद्वाचा असला, तरी कथेला काळाचा ठळक असा एक पट आहे. ही कथा साधारण १९८०-१९९०मध्ये घडत असावी हे ती जशी जशी उलगडत जाते तसं तसं वाचकाच्या लक्षात येत जातं. ही काळाची पार्श्वभूमीही अतिशय अलगद कथानकात येते. त्या काळात सुरू असलेल्या कम्युनिस्ट चळवळी, इंदिरा गांधींची हत्या, भारतातल्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर असलेला समाजवादाचा पगडा, मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात अजूनही असलेली रेशनची दुकानं, लँडलाईन फोन डेड होणं (आणि त्यांचं आठवडा आठवडा मरून पडणं) - अशा प्रकारच्या संदर्भांनी तो काळाचा पट आपल्यासमोर उभा राहतो. तसंच, कथानकातलं एक पात्रच असावी अशी मुंबई या कथेत वावरते. माहीमजवळची इराणी हॉटेलं, बेकऱ्या, एल्फिन्स्टनजवळचे अड्डे, जहांगीर गॅलरी, हाजी अली, महालक्ष्मी यांच्या आसपासच्या ठिकाणांची चित्रदर्शी वर्णनं कथेत येतात. या सगळ्या जागांवर जाण्यायेण्यासाठी यूरीनं केलेले अनेक लोकल प्रवासही. पण हे सगळं लेखकानं मुद्दाम ठरवून, सुबक, सर्वगुणसंपन्न अशी एक फॉर्म्युला-कादंबरी लिहिण्यासाठी बेतलं आहे असंही वाटू नये इतकं ते सहज आहे.

यूरीचे दोन छंद आहेत. अव्याहत वाचन आणि कवितालेखन. त्यामुळे कथेत इंग्रजी साहित्यातले आणि भारतीय आणि पाश्चात्त्य कवींचे इतके संदर्भ आहेत, की त्यांची यादी केली तर ती सहज दोनेक वर्षं एखादा बुकक्लब चालवू शकेल.

'एम अँड द बिग हूम' माझी अत्यंत आवडती कादंबरी आहे. 'यूरी' वाचताना उगाच तिच्याशी तुलना होत होती हे लक्षात आलं. तशी करायची काहीच गरज नसली, तरी असं लक्षात आलं, की 'एम' आईबद्दल आहे तशी ही कादंबरी टीओ ज्युलिओबद्दल आहे. 'एम अँड द बिग हूम' मधला 'हूम' एमच्या मागे, तरीही खंबीरपणे सावलीत उभा असतो. तो हूम, म्हणजेच ऑगस्टीन टिओ ज्युलिओच्या रूपात काहीशा प्रमुख आणि दिसणाऱ्या भूमिकेत येतो आहे असं अनेकदा वाटून जातं. एखाद्या फुटबॉल मॅचमध्ये जीव तोडून खेळणाऱ्या खेळाडूला त्याचा कोच जसा मैदानाच्या बाहेरून धीर देत असतो, कधी कानपिचक्याही देत असतो तसा ज्युलिओ यूरीच्या आयुष्यात सतत उभा असतो. अनेकदा, त्याच्या तरुण वयाला अन्याय्य वाटणाऱ्या गोष्टी त्याला शांतपणे समजावून सांगणारा, वेळप्रसंगी त्यानं वैयक्तिक नैराश्य विसरावं म्हणून त्याला समाजसेवा करण्यास प्रेरित करणारा, त्यानं ख्रिस्ती धर्मात बसत नसलेल्या गोष्टी केल्या, तरी त्याच्या निर्णयस्वातंत्र्याचा आदर करणारा असा टिओ ज्युलिओ हा आदर्श पालक कसा असावा याचं उदाहरण आहे.

जेव्हा छोटा यूरी त्याला तू लवकर मरू नकोस अशी विनंती करतो, तेव्हाही तो म्हणतो,
"मी मरणार नाही असं वचन मी तुला देऊ शकत नाही, कारण माझं मरण माझ्या हातात नाही. पण मी तुला वचन देतो, की मी मेलो तरी तुझी काळजी घेणारे लोक तुझ्यासाठी उभे राहतील."

अशा अनेक मरणांना धास्तावून आपणही जगत असतो. आपल्याला आयुष्यात मिळणारे अनेक उत्कट, सुखावणारे, आनंददायी, दुःखदायी असे अनुभव आपण इतरांच्या माध्यमांतून घेत असतो. असं करत असताना आपल्याला भाषेची, स्पर्शाची, विचारांची, भावनिक आधाराची सोबत मिळत असली, तरी ती आपला एकटेपणा पूर्ण भेदू शकत नाही. एखाद्याबरोबर किंवा अनेकांबरोबर असण्यानं सोबत वाटत असली आणि त्या सोबतीत आनंद वाटत असला, तरी आयुष्य नेटानं जगण्याचा आत्मविश्वास मात्र गुण-दोषांसकट स्वतःला पत्करल्यावरच येतो. असं करण्यात नेहमीच आनंद असत नाही. पण चिरकाल टिकणारी शांती मात्र असते. 'यूरी' वाचकाला या सगळ्याबद्दल अंतर्मुख करू शकणारी कादंबरी आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विनोद केल्यानं त्याला मित्र मिळतात आणि सहानुभूतीपासून सुटका होते.

आता वाचायलाच हवी कादंबरी!

जिवलग मैत्रीत जे वाटतं त्याला प्रेम म्हणता येईल का? एखाद्यावर प्रेम असणं म्हणजे नक्की काय? शारीरिक आकर्षण आणि प्रेम यांमध्ये काय फरक आहे? आपल्याला नेहमीच भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटायला हवं का? एखाद्या जवळच्या मित्राबद्दल आपल्याला जे वाटतं त्याला फक्त मैत्रीच म्हणायचं का?

'रिव्हर' नामक मालिका कधी वेळ आणि शांतता मिळाली की पाहाच. मध्यमवयीन, ब्रिटिश पोलिसांच्या अशाच नात्याबद्दलही ही मालिका आहे.

(बिघडवतेस तू मला! ललित वाचायला भाग पाडतेस!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.