दीराची बायडी हीच माझी तायडी (भाग पहिला)


दीराची बायडी हीच माझी तायडी,

अर्थात जनजागृती नाटक

हे नाटक 'ऐसी अक्षरे'वर तीन भागांत प्रसिद्ध होईल :

  • भाग पहिला: स्थापना
  • भाग दुसरा: प्रवेश १, २ आणि ३ (दुवा)
  • भाग तिसरा: प्रवेश ४ आणि ५ (दुवा).

————

आकाशी रंगाच्या रेशमी सदऱ्यावर तांबडाभडक नेकटाय, पांढराशुभ्र लॅबॉरेटरी कोट, खाली करवतकाठी धोतर आणि अनवाणी पाय अशा वेशात असलेली एक उंच, शेलाटी आणि देखणी तरुणी रंगमंचावर येते.

तरुणी : (प्रेक्षकांना उद्देशून) नमस्कार! मी एक मानसशास्त्रज्ञ आहे. आपण स्त्रीपुरुषसमतेच्या युगात राहतो. आणि नसलोच राहात तर निदान असं युग लवकर येवो अशी तोंडदेखली का होईना पण अपेक्षा व्यक्त करतो. त्यामुळे 'ज्ञा' म्हणत नाही; 'ज्ञ'च म्हणते. तर मी एक मानसशास्त्रज्ञ आहे. परंतु मानसशास्त्रज्ञ ह्या जमातीचा विवक्षित असा पोशाख नसतो. आमच्यांतले काहीजण साड्या नेसतात तर काहीजण शर्टपँट घालतात. काहीजण टापटीप राहतात तर काहीजण गबाळे राहतात. ह्यामुळे पंचाईत अशी होते की आमची काही निश्चित प्रतिमा लोकांच्या मनात ठसत नाही, आणि पडायला हवं तसं समाजात आमचं वजन पडत नाही. यावर उपाय म्हणून प्रयोगशाळेत काम करणाऱ्या जीवशास्त्रज्ञाचा पोषाख मी ढापायचं ठरवलं आहे. हा फिकट निळा सदरा, त्यावरचा हा लालचुटुक नेकटाय आणि हा लॅबॉरेटरी कोट माझ्या अंगावर तुम्हाला दिसतो आहे तो त्याचमुळे. आणि तसं पाहिलं तर जीवशास्त्र आणि मानसशास्त्र ही एक आहेत की दोन आहेत याबद्दल अनिश्चिती आहेच. ती जर एकच निघाली तर प्रश्न मिटला.

अर्थात जीवशास्त्रज्ञाचा पोषाख जर पूर्णच ढापायचा तर कमरेखाली काळी पँट आणि चकचकीत काळे कातडी बूट असायला हवे होते. पण इथे मेख अशी की आजच्या नाटकाची मी सूत्रधारिणी सुद्धा आहे. भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं ते स्त्रीपुरुषसमतेचं युग मुळीच नव्हतं, आणि तसं युग लवकर येणार नाही याची त्यांना अनुच्चारित का होईना पण खात्री होती. त्यामुळे 'धार' म्हणत नाही; 'धारिणी'च म्हणते. आता सूत्रधाराचा असा पारंपरिक पोषाख असतो आणि सूत्रधार कसा दिसायला हवा याची एक निश्चित प्रतिमाही लोकांच्या मनात असते. म्हणूनच माझा कमरेखालचा पोशाख मी परंपरेकडून ढापलेला आहे. सारांश काय तर कमरेच्या वरचा पेहराव जीवशास्त्रज्ञाचा आहे, तर कमरेखालचा सूत्रधाराचा आहे. आता याच्या उलट करायचं तर खाली बूटपाटलोण घालावी लागली असती, आणि वरचं शरीर उघडंबंब ठेवून तिथे फक्त एक जानवं आणि त्यावर झिरझिरीत उपरणं असा थाट करावा लागला असता. अनेक कारणांनी तुम्हाला ते बघवलं नसतं, तेव्हा मी म्हणते की जे आहे तेच ठीक आहे.

(किरमिजी रंगाचे बूट, स्टार्च केलेल्या पांढऱ्या शर्टावर थ्री पीस सूट, दाढी, उजव्या हातात पाईप आणि डाव्या हातात क्लिपबोर्ड अशा वेषातला एक पोरगेलासा नट येऊन पोक काढून घुमेपणाने उभा राहतो.)

सूत्रधारिणी : पारंपरिक नाटकात सूत्रधारानंतर नटी येते, तसा आजच्या नाटकामध्ये सूत्रधारिणीनंतर आलेला हा नट. हा देखील मानसशास्त्रज्ञ आहे, पण शिकाऊ. गेली कित्येक वर्षं माझ्या हाताखाली डॉक्टरेट करतो आहे. (नट अनिश्चितपणे हात उडवतो.) याचं संशोधन अंमळ रुटूखुटू चाललेलं असून प्रबंध रखडलेला आहे. ह्या साऱ्या संदिग्ध प्रगतीचा वचपा हा माणूस पोषाखाने भरून काढतो. अर्थात पोषाख कुणाकडून ढापलेला आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. (नट खांदे उडवतो.)

सूत्रधारिणी : आता मी किनई पारंपरिक सुरुवात करते. हे नटा, निसर्गाच्या अविरत आणि अव्याहत फिरणाऱ्या चक्राप्रमाणे सद्यकाळी कुठला ऋतू आहे हे तुझ्या म्लान आणि क्लांत अशा मुद्रेवरून लगेचच ओळखू येतं आहे. तरी पण सांगूनच टाक बरं कुठला ऋतू?!

नट : (तोंडातल्या तोंडात) ग्रीष्म.

सूत्रधारिणी : वत्सा, असा शक्तिपात झाल्यासारखा वागू नकोस. आत्मविश्वासाचा आव आणून बोल. निसर्गामध्ये भक्षक प्राण्यांना भक्ष्याचा दुबळेपणा फार पटकन ओळखू येतो. तसं तुझं होऊ देऊ नकोस. पुन्हा सांग बरं कुठला ऋतू?!

(यापुढच्या प्रसंगात नट जास्त जास्त आत्मविश्वासाने बोलू लागतो.)

नट : ग्रीष्माचा उत्तरार्ध!

सूत्रधारिणी : बरोब्बर! ग्रीष्माच्या उत्तरार्धात काय असतं?

नट : मनोविकार आवेर्य मास असतो.

सूत्रधारिणी : बरोब्बर! म्हणजे काय ते फोड करून सांग बघू.

नट : मनोविकार आणि मानसिक आरोग्य याबद्दल समाजामध्ये आवेर्य निर्माण व्हावं म्हणून आपण निरनिराळे कार्यक्रम करतो. यात उदाहरणार्थ व्याख्यानं, परिसंवाद आणि करमणुकीचे कार्यक्रम असतात. अर्थात अलिकडच्या पिढीला कळावा म्हणून 'आवेर्य' हा धेडिंग्रजी शब्द मुद्दाम वापरलेला आहे. जुना शब्द 'जनजागृती' असा आहे.

सूत्रधारिणी : अगदी बरोब्बर! आणि म्हणूनच कुठलातरी एक विशिष्ट मनोविकार निवडून त्याबद्दल समाजामध्ये आवेर्य निर्माण व्हावं यासाठी आपण आज एक नाटक करणार आहोत. तर आता प्रश्न असा की आपण कुठला मनोविकार निवडणार आहोत?

नट : यादी बघून सांगावं लागेल. (क्लिपबोर्डकडे बघत एकेक कलम वाचून खुणा करत जातो.) डिप्रेशन पार झिजून गुळगुळीत झालेलं आहे. 'डिप्रेशनबद्दल अवेअरनेस' हा शब्दप्रयोग नुसता ऐकला तरी लोक मरगळतात. अल्झायमर्स तर किती वर्षांत किती वेळा झाला आहे हे कुणाला आठवतदेखील नाही. स्किझोफ्रेनिया होऊन गेलेला आहे —

सूत्रधारिणी : मग शिल्लक काय आहे?

नट : सायकोपॅथी झालेली नाही —

सूत्रधारिणी : नको! सायकोपॅथांबद्दल सहानुभूती निर्माण करणं हे अवघड काम आहे. त्यासाठी फार ताकदवान नाटककार जन्मावा लागेल. आपली तेवढी प्राज्ञा नाही. दुसरं काहीतरी बघूया —

नट : (कपाळाला आठ्या घालून डोळे बारीक करून क्लिपबोर्डकडे बघत) प्रॉसोपॅ — (सूत्रधारिणी त्याच्याकडे शंकित चेहऱ्याने बघत राहते.) प्रोसोपॅगो —

सूत्रधारिणी : (जोरजोरात मान हलवते) प्रोसोपॅग्नोसिया! नीट म्हण! प्रो-सो-पॅग्नो-सिया.

नट : प्रो-सो-पॅग्नो-सिया. पण म्हणजे काय?!

सूत्रधारिणी : ग्रीकमध्ये प्रोसोपॉन म्हणजे चेहरा. अग्नोसिया म्हणजे काय सांग बघू?! इंडो-युरोपियन शब्द आहे. एवढं तुला यायला पाहिजे.

नट : (अडखळता विचार करत, वेळ घेत) अग्नोसिया — अ ग्नोसिया — ग्नोसिया — ग्नोसिस — ग्नोसिस? (सूत्रधारिणी उत्साहवर्धक हातवारे करते आणि स्वत:च्या डोक्यावर बोटाने टकटक करते.) ग्नोसिस!— ग्यान! — ज्ञान! — अ ज्ञान — अज्ञान! अग्नोसिया म्हणजे अज्ञान!

सूत्रधारिणी : बरोब्बर! तर प्रोसोपॅग्नोसिया म्हणजे चेहऱ्यांबद्दल अज्ञान, किंवा चेहरे ओळखू न येणं. प्रोसोपॅग्नोसिया असलेल्याला चेहरे ओळखू येत नाहीत. नवे चेहरे नीट लक्षात राहात नाहीत.

नट : पण बाकी सगळं व्यवस्थित दिसतं?

सूत्रधारिणी : हो. त्यांचे डोळे पूर्णपणे शाबूत असतात. समोर झाड असेल झाड दिसतं. म्हैस असेल तर म्हैस दिसते. बाकी सगळं व्यवस्थित दिसतं. पण चेहरे ओळखू येत नाहीत.

नट : हं! तर आता प्रोसोपॅग्नोसिया ह्या विकाराबद्दल आपल्याला समाजामध्ये आवेर्य निर्माण करायचं आहे.

सूत्रधारिणी : हो! आणि त्यासाठी आपल्याला आज एक नाटक करायचं आहे.

नट : मग नेहमीच्याच तालात करायचंय का? दरीशिखरदरीशिखर?

सूत्रधारिणी : (गोंधळात पडून) दरीशिखरदरीशिखर?

नट : (उत्साहात येऊन) कळलं नाही ना?! समजावून सांगतो. 'दरीशिखरदरीशिखर' हा गोष्ट सांगण्याचा एक आकृतिबंध आहे —

सूत्रधारिणी : (कंटाळल्याचा आविर्भाव करत) ए—, माझे पाय दुखायला लागलेत. आपण बसून घेऊया का?

नट : (त्रासिक चेहऱ्याने) खरं तर भरतमुनींनी तशी परवानगी दिलेली नाही —

सूत्रधारिणी : तेवढं चालतं रे! मी तुझी पीएचडी गाईड आहे ना? मग ऐक माझं! (विंगेत बघून टाळ्या वाजवते.) कोण आहे रे तिकडे? (मावळ्यांसारखा पोषाख केलेले दोघेजण विंगेतून एक आलिशान शेज लाँग आणि एक कातडी आरामखुर्ची घेऊन येतात. स्टेजवर ह्या वस्तू मांडून कुर्निसात करून परत जातात. शेज लाँगच्या पृष्ठभागावर उत्तम दर्जाचं चिटाचं कापड ताणून बसवलेलं आहे. आरामखुर्ची तिच्या पायाशी ठेवलेली आहे. सूत्रधारिणी खुर्चीकडे बोट करते.) तुझ्या सोंगाचा मान ठेवून तू नोटपॅड घेऊन आरामखुर्चीत बैस. मी तुझ्यासमोर न्यूरॉटिक मनोरुग्णिणीसारखी शेजेवर लोळत पडते. (तो खुर्चीत बसतो तशी ती शेज लाँगवर ऐसपैस पसरते.) आता बोल. 'दरीशिखरदरीशिखर' हा गोष्ट सांगण्याचा एक आकृतिबंध आहे —

नट : हो. आकृतिबंध आहे. उदाहरणार्थ, सिंडरेलाची गोष्ट घे. बिचारी सिंडरेला पहिल्या दोन पानांत ढोरमेहनत करत शेगडीतले कोळसे उपसत बहिणींचे टोमणे खात मुळूमुळू रडत असते. म्हणजे ती दरीत आहे. इथे तिला एक परी भेटते, चमकढमक कपडे चढवते आणि भोपळ्याच्या गाडीत घालून राजवाड्यात पाठवते. तिथला राजपुत्र तिच्या प्रेमात पडतो. ती आता शिखरावर आहे. पण याच वेळी घड्याळात बाराचे टोले पडतात. सगळं गमावून बसून काचेचा एक बूट मागे ठेवून तिला लपूनछपून घरी परत यावं लागतं. म्हणजे ती पुन्हा दरीत पडली. पण शेवटी तो बूट घेऊन राजपुत्र तिच्या घरी येतो, तिला तो फिट्ट बसतो आणि बहिणींच्या नाकावर टिच्चून तिचं राजपुत्राशी लग्न लागतं. म्हणते ती पुन्हा शिखरावर गेली. (हवेत बोटांनी दाते काढून दाखवत) असा हा आकृतिबंध असतो: दरीशिखरदरीशिखर.

सूत्रधारिणी : हं!

नट : तर मुद्दा असा की हा आकृतिबंध वापरण्याचा मोह लोकांना सतत होतो. उदाहरणार्थ, आपल्याला समज डिप्रेशनबद्दल आवेर्य निर्माण करायचं आहे. तर नेहा नावाची एक मुलगी घ्यायची आणि डिप्रेशनमध्ये पाडायची. आता ती दरीत आहे. पण मग कुणीतरी तिच्याशी समजुतीने बोलतं आणि तिला एका (खुणेने दाखवत) लॅबकोटवालीकडे घेऊन जातं. लॅबकोटवाली तिला सांगते की डिप्रेशन हा आळशीपणा किंवा चारित्र्यदोष नव्हे. मेंदूतल्या रसायनांचं संतुलन बिघडल्यामुळे ते येतं. वास्तविक मेंदूत असा कुठे तराजू वगैरे नसतो, पण संतुलन हा शब्द ह्या संदर्भात वापरण्याचा प्रघात आहे. लॅबकोटवाली तिला गोळ्याबिळ्या देते. ह्या गोळ्या घेऊन नेहाला बरं वाटायला लागतं. म्हणजे ती दरीतून शिखरावर आली. पण एका क्षणी तिची प्रगती खुंटते. डिप्रेशन कमी झालं तरी आयुष्यातले इतर प्रश्न तसेच उरलेले असतात. ह्या सगळ्याला कंटाळून नेहाचा बॉयफ्रेंड तिला सोडून दुसऱ्या मुलीबरोबर निघून जातो. त्यामुळे नेहा पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये जाते, म्हणजेच पुन्हा एकदा दरीत घसरते. पण शेवटी मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची स्त्री आहे आणि कुठल्याही पुरुषाच्या आधाराची मला गरज नाही हे नेहाला उमगतं. उभारी धरून ती पुन्हा शिखरावर येते. इथे कुठेतरी सूर्याचे कोवळे किरण नेहाच्या चेहऱ्यावर चमकू लागतात आणि तिच्या मुक्त केसांतून वारा खेळू लागून गोष्ट संपते. (हवेत बोटांनी दाते काढून दाखवत) असा तो आकृतिबंध असतो: दरीशिखरदरीशिखर. कलाविश्वात हा सगळीकडे कॉँग्रेस गवतासारखा पसरलेला आहे.

सूत्रधारिणी : ह्या विषयात तू बराच खोलवर शिरलेला दिसतो आहेस. प्रबंध का रखडला असावा हे आता कळलं.

नट : हेही एक प्रकारचं मानसशास्त्र आहे. कलेचं मानसशास्त्र.

सूत्रधारिणी : मान्य आहे. पण मला वाटतं आपण वेगळं काहीतरी करूया. दरीशिखरदरीशिखर नको.

नट : ठीक आहे; काय वेगळं करूया?

सूत्रधारिणी : मी काही सुचतं का बघते. तूही विचार कर.

नट : हो. (दोन क्षण तसेच जातात. नट मोठ्ठाल्या काळ्या फाउंटनपेनने कातडी बांधणीच्या वहीत काहीतरी लिहितो आहे. ते मनासारखं न झाल्यामुळे कागद फाडतो.)

सूत्रधारिणी : नाटकीपणा करून बोळे इकडेतिकडे फेकू नकोस. (नट असहायपणे मान हलवतो, आणि फाडलेल्या कागदाचा बोळा जॅकेटच्या खिशात टाकून पुन्हा लिहू लागतो. आणखी दोन क्षण जातात.)

नट : मी काय म्हणतो, आपण एक फार्स केला तर?

सूत्रधारिणी : फार्स?! पण आपल्या दोघांचाही स्वभाव विनोदी नाही.

नट : मान्य आहे. पण म्हणूनच बघूया जमतो का ते. मला एक कल्पना सुचते आहे —

सूत्रधारिणी : बोल.

नट : प्लाउटस नावाचा रोमन नाटककार होता. दोन जुळे भाऊ एकाच गावात येतात आणि त्यामुळे आजूबाजूच्यांचा गोंधळ होतो असा विषय घेऊन त्याने एक फार्स लिहिला. त्याचं नाव 'मेनाएख्मी', म्हणजेच मेनाएख्मस बंधू. लोकांना तो फार आवडला. अठराशे वर्षांनंतर ह्या विषयावर शेक्सपिअरने डल्ला मारला. 'अधिकस्य अधिकम् फलम्' म्हणत त्याने जुळ्यांच्या दोन जोड्या आणल्या आणि 'कॉमेडी अॉफ एरर्स' नावाचा फार्स लिहिला. तोही खूप चालला. त्याचीच उसनवारी करून गुलझारने 'अंगूर' नावाचा सिनेमा काढला. पण मराठीत अशासारखं काही आहे का हे मला ठाऊक नाही. तसा एक प्रयत्न करून बघूया? (वहीत आकृत्या काढून नोंदी करू लागतो.)

सूत्रधारिणी : (सुस्कारा सोडत) माझ्या अंतरीची व्यथा तुला सांगते. कुठलाही फार्स बघताना मनातला शास्त्रकाटा मला फार टोचत राहतो. शंकाकुशंका येत राहतात. उदाहरणार्थ, 'अंगूर' मी बघितलेला आहे. त्यात सुरुवातीला उत्पल दत्त आणि त्याची बायको शम्मी ह्या दोघांना जुळे मुलगे असतात —

नट : हो. नंतर मोठेपणी ते दोघे संजीवकुमार होतात.

सूत्रधारिणी : बरोब्बर. संजीवकुमार होतात. इतपत ठीक आहे, कारण जुळे मुलगे अनेकांना असतात. तर आता उत्पल दत्त, शम्मी आणि हे दोघे भावी संजीवकुमार जहाजातून कुठेतरी जायला निघणार असतात, पण नेमका तोच मुहूर्त साधून आणखी दोन जुळे मुलगे कुणीतरी त्यांच्या दारात सांभाळायला आणून टाकतं. असं काही होईल ही शक्यता मला अगदीच त्र्यांयशी लाखांत एक वाटते.

नट : हे पुरतं पटलं नाही, पण असो. नंतर मोठेपणी ते दोघे देवेन वर्मा होतात.

सूत्रधारिणी : बरोब्बर. देवेनवर्मा होतात. तर हे असे बे दुणे दुक्कलजुळे जहाजातून चाललेले असताना जहाज फुटतं. एक भावी सं-कु आणि एक भावी दे-व एकीकडे राहतात, तर दुसरा भावी सं-कु आणि दुसरा भावी दे-व दुसरीकडे जातात. आता पांगापांग व्हायची तर ती कशीही होऊ शकली असती. दोन्ही सं-कु एकीकडे आणि दोन्ही दे-व दुसरीकडे अशी होऊ शकली असती. किंवा दोन्ही दे-वंसकट एक सं-कु एकीकडे, आणि शिल्लक सं-कु दुसरीकडे अशी होऊ शकली असती. किंवा कुणीतरी एक दे-व बुडून मरू शकला असता. पण नाही. सगळे जगतात, इतकंच नव्हे तर संकुदेव-१ एकीकडे आणि संकुदेव-२ दुसरीकडे अशीच विभागणी होते. म्हणजे मुळात फार कमी असलेली शक्यता आणखीनच कमी झाली. आता यापुढे संकुदेव-१ एका गावी मोठे होतात तर संकुदेव-२ दुसऱ्या गावी मोठे होतात. दोन्ही ठिकाणचं हवापाणी वेगळं असणार, शाळा वेगळ्या असणार, मित्र वेगळे असणार, शेजारी वेगळे असणार. पण असं असूनही दोन्ही सं-कुंची बोलण्याची धाटणी तंतोतंत एकमेकांसारखी असते, आणि दोन्ही दे-वंची तंतोतंत एकमेकांसारखी असते. इतकंच नव्हे तर एकाही सं-कुकडे पांढरा कुर्ता आणि धोतर याखेरीज कपडे नसतात, आणि एकाही दे-वकडे राखाडी कुर्ता आणि धोतर याखेरीज कपडे नसतात. इतकं सगळं जुळून येण्याची शक्यता निखर्वात एक सुद्धा नसेल. ही अशी शिळेवर पेललेल्या शिळेवर पेललेली शिळा उचलून धरायची इतकं सस्पेन्शन अॉफ डिसबिलीफ मला जमत नाही. हात दुखून येतात. (क्लान्तपणे मान टाकून डोळे मिटून घेते.)

नट : हं. पण इतकं सगळं जुळून येण्याची शक्यता निखर्वात एक किंवा महापद्मात एक नाही. ती एकात एक आहे.

सूत्रधारिणी : कशी काय?!

नट : तुझ्या डाव्या हाताखाली बघ. (सूत्रधारिणी शेज लॉँगवर विसावलेला डावा हात उचलते.) हरणाची मान सिंहाने जबड्यात धरलेली आहे, पण याचा त्रास करून न घेता ते हरीण झाडाच्या बुंध्याजवळचं गवत खातं आहे. आणि खाली इतकी हिंसा होत असतानाही न डगमगता त्याच झाडावर चढलेला मोर डाळिंबाचा दाणा टिपतो आहे. निसर्गात हे सगळं असंच घडण्याची शक्यता किती आहे?

सूत्रधारिणी : पण हे चिटाच्या कापडावरचं हैदराबादी डिझाईन आहे.

नट : नाटक हेही डिझाईन असतं. डाळिंब, मोर, गवत, हरीण आणि सिंह विशिष्ट परिस्थितीत एकत्र आणायचे असं कलाकाराने ठरवल्यावर ते तसे येण्याची शक्यता एकात एक असते. दोन सं-कु, त्यांचे दोन पांढरे कुर्ते, दोन दे-व आणि त्यांचे दोन राखाडी कुर्ते हे विशिष्ट रचनेत एकत्र आणायचे असं गुलझारने ठरवल्यावर ते तसे येण्याची शक्यताही एकात एक असते.

सूत्रधारिणी : पण वास्तवाशी ह्या सगळ्याचा संबंध असायला हवा ना?

नट : हो ना. जर जुळे मुलगे वास्तवात अस्तित्वात नसते तर फक्त नाटक करण्यासाठी म्हणून ही कल्पना कुणी नव्याने शोधून काढली असती असं मला वाटत नाही. किमान तितपत संबंध असायलाच हवा. पण तिथून पुढे तो नक्की काय असायला हवा हे स्पष्ट नाही. तरीही मला काय वाटतं ते सांगतो. नाटक हा काही प्रमाणात वास्तवाचा आव असतो आणि काही प्रमाणात ते डिझाईन असतं. तो फार्स आहे की इब्सेन आहे याला महत्त्व नाही. दोन्हींत वास्तवाचाव असतो आणि दोन्हींत डिझाईन असतं.

सूत्रधारिणी : (काही क्षण विचार करून) तुझं बरोबर वाटतं. म्हणजे फार्समधले प्रसंग वास्तवात घडण्याची संख्याशास्त्रीय शक्यता किती हा प्रश्न चुकीचा आहे. तसा काही आकडा काढता येणार नाही, आणि काढून उपयोगही नाही.

नट : हो. पण यातली गंमत अशी की प्रसंग अशक्यही वाटता कामा नयेत. आपण म्हणालो की संकुदेव-१ आधीपासून एका गावी राहात असतात. त्या गावाला बरेली म्हणू. एके दिवशी संकुदेव-२ आयुष्यात पहिल्यांदा बरेलीला येतात. पण आल्या आल्या बरेलीतला रेल्वेचा तिकिट कलेक्टर त्यांना ओळखतो, मग पहिल्या सं-कुची मेव्हणी ओळखते, मग पोलीस इन्स्पेक्टर ओळखतो, वगैरे वगैरे. इतके अनोळखी लोक आपल्याला का ओळखताहेत याचं काहीतरी स्पष्टीकरण दुसऱ्या सं-कुला उपलब्ध व्हायला हवं. नाहीतर कथानक कोसळेल. ते स्पष्टीकरण असं की दुसऱ्या सं-कुला डिटेक्टिव्ह कादंबऱ्यांचा भयंकर षौक असतो आणि खूनखराबा, कटकारस्थानं यांत त्याचा मेंदू भिजून गेलेला असतो. त्यामुळे त्याला वाटतं की बरेलीतले हे सगळे अनोळखी लोक एका पाताळयंत्री गॅँगमध्ये सामील आहेत. आपल्याला घोळात घेऊन लुटण्याचं त्यांचं कारस्थान आहे, आणि म्हणून ते खोटी ओळख दाखवताहेत. दुसरा सं-कु हा जरी डिझाईनचा भाग असला तरीदेखील वास्तवातल्या सर्वसामान्य माणसापेक्षा त्याची मानसिकता फार वेगळी ठेवून चालत नाही. अनोळखी माणसं ओळखायला लागली तर कुणीही बावचळेलच. यावर उतारा म्हणून एखाद्या माणसाची जशी अतिरिक्त कफप्रकृती असते तशी गुलझारने दुसऱ्या सं-कुला अतिरिक्त संशयी प्रकृती दिलेली आहे. तोही डिझाईनचाच भाग आहे. चित्रातलं डाळिंबाचं झाड जास्त कमानदार करायचं असेल तर मोराची मानही जास्त लवचीक करावी लागते.

सूत्रधारिणी : (काही क्षण विचार करून) हेही बरोबर वाटतं.

नट : शिष्यादिच्छेत पराजयम् —

सूत्रधारिणी : (पराभूत हास्य करत) पण मग मला यात एक डिझाईन फ्लॉ दिसतो. जहाज फुटल्यानंतर संकुदेव-२ बरोबर शम्मीसुद्धा जिवंत उरते, आणि पुढे ती त्यांच्याच घरी राहते. पण असं जर असेल तर 'बाबांनो, तुम्हाला प्रत्येकी एक जुळा भाऊ आहे' हे तिने संकुदेव-२ ना केव्हातरी सांगितलंच असणार. आणि असं जर असेल तर बरेलीमधले इतकेजण आपल्याला ओळखताना बघून आपले जुळे भाऊ कदाचित इथे राहात असतील असा संशय त्यांना का येत नाही?

नट : अगदी मान्य आहे. 'मेनाएख्मी' मध्ये जवळपास हेच होतं. त्यात एक जुळा भाऊ सिरॅक्यूजला आणि दुसरा एपिडॅम्नसला असतो. सिरॅक्यूजवाला आपल्या भावाला शोधत जगभर हिंडत असतो. शेवटी एकदाचा तो एपिडॅम्नसला येतो आणि तिथले अनोळखी लोक अर्थात त्याला ओळखायला लागतात. पण आपला शोध संपलेला आहे इतकी साधी गोष्ट त्याच्या लक्षात येत नाही. नाटकातलं पात्र संशयी आहे हे स्वीकारायला प्रेक्षक तयार होतील, पण कथानकातला जो कळीचा मुद्दा आहे त्याचबाबतीत ते विसराळू असेल हे स्वीकारायला तयार होणार नाहीत. नेमका हाच दोष 'कॉमेडी अॉफ एरर्स' मध्येदेखील तसाच्या तसा आहे. का कोण जाणे, फार प्राचीन काळापासून तो अश्वत्थाम्यासारखा चिरंजीव राहिलेला आहे. न बोलावता थेटरात हजर होतो.

सूत्रधारिणी : लोक म्हणतात फार्स डोकं बाजूला ठेवून बघायचा असतो. पण तसं नाही. याउलट डोक्याला नेहमीपेक्षा जास्त काम असतं. फीचरला बग समजून चालत नाही आणि बगला फीचर समजून चालत नाही.

नट : हो ना. आणि एखाद्याला जो बग वाटेल तो दुसऱ्याला गोजिरवाणा लेडीबग वाटू शकतो. समजा कुणी म्हणालं की संकुदेव-२ ना वाईट वाटू नये म्हणून शम्मी जुळ्या भावांबद्दल त्यांना काही बोलली नसेल, तर यावर आता काय वाद घालणार?

सूत्रधारिणी : तेही खरं आहे. आणि अशी काहीतरी सबब शोधून काढायला कारणही आहे. 'अंगूर'च्या शेवटी पहिला सं-कु जेव्हा दुसऱ्या सं-कुच्या घरी जातो तेव्हा तो स्वत:च्या आईला ओळखत नाही. चुकून मोलकरणीच्या पाया पडतो. तो प्रसंग फार विनोदी आहे. शम्मीला अडचण समजून सुरुवातीलाच बुडवून टाकली असती तर हा विनोदही तिच्यापाठोपाठ अर्घ्य म्हणून गेला असता.

नट : प्रेक्षकांना आपल्या बाजूला वळवून घेणं महत्त्वाचं. तेवढं एकदा झालं की सोयीची स्पष्टीकरणं तेच शोधून काढतात. (खुर्चीत मागे रेलून बसत) मग काय ठरवूया? जुळ्यांवर फार्स लिहायचा की नाही?

सूत्रधारिणी : लिहूया ना! आपण दोघेही विनोदबुद्धीत मार खाणारे शास्त्रज्ञ आहोत. तेव्हा आव्हान म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे?

नट : चालेल. पण मला वाटतं, काही पत्ते प्रेक्षकांना आधी दाखवलेले बरे. जुळ्यांचं नाटक म्हटलं की एक विशिष्ट डिझाईन फीचर वापरायला परंपरेचीच मान्यता असते. नाटकातले जुळे हे जुळे नसून सर्वकाहीजुळे असतात. गुणसूत्रंच नव्हे तर त्यांचे कपडेलत्तेआवाजहावभावसुद्धा एकसारखे असतात. छातीत धडकी भरावी इतकी सिमेट्री असते. ती परंपरा आपणही चालू ठेवू.

सूत्रधारिणी : हो! अशाच आणखी एका डिझाईन फीचरला परंपरेची मान्यता आहे, पण मला मात्र ते खटकतं. उदाहरणार्थ, 'अंगूर'मध्ये दोन्ही सं-कुंचं नाव अशोक आहे आणि दोन्ही दे-वंचं नाव बहादुर आहे. तसं का आहे याचं थातुरमातुर स्पष्टीकरण सिनेमात दिलेलं आहे, पण ते पटत नाही. वास्तवात दोन जुळ्या भावांना तेच ते नाव कुणी देणार नाही. पण नावं जर वेगवेगळी असतील तर कथानक कोसळेल, कारण ओळखणारे अनोळखी चुकीच्या नावाने हाक मारतील.

नट : खरं आहे. 'मेनाएख्मी'त तेच फीचर आहे आणि 'एरर्स'मध्येही तेच आहे. दोन्हींतलं स्पष्टीकरण तितकंच थातुरमातुर आहे. (क्षणभर विचार करून) यावर एक तोडगा मला सुचतो; चालतो का बघू.

सूत्रधारिणी : (प्रेक्षकांकडे निर्देश करत) तो पत्ता तुला उघड करायचा नाही?

नट : नाही. एक गोष्ट मात्र अपारंपरिक करूया. जुळे जन्माला कसे आले आणि त्यांची ताटातूट कशी झाली ह्या सुरुवातीच्या शिप्तरभर सिनॉप्सिसचा मला वैताग येतो. 'मेनाएख्मी' आणि 'एरर्स' ह्या दोन्हींमध्ये ते चटश्राद्धासारखं उरकून घेतलेलं आहे. नाटक बघताना कुणाच्याही ते लक्षात राहात नाही. तो प्रकार टाळता आला तर मला हायसं वाटेल.

सूत्रधारिणी : मग असं करू: सिनॉप्सिसला टांग मारू आणि जुळ्यांची कूळकथा सांगायला आपणच शेवटी नाटकात जाऊ.

(नट उत्साहात येऊन होकारार्थी मान डोलावत उभा राहतो. सूत्रधारिणी देखील उठून उभी राहून नेकटाय सारखा करते.)

नट : ठरलं तर! कोण आहे रे तिकडे? (मावळ्यांसारखा पोषाख केलेले मघाचेच दोघे विंगेतून येतात.) हे बोजड सामान इथून ताबडतोब हलवा. (ते दोघे शेज लॉँग आणि आरामखुर्ची विंगेत नेऊ लागतात. त्यांच्याकडे पाठीमागून पाहात) इतका आवळाजावळा पोषाख केला नसतात तरी चाललं असतं. असल्या युक्त्या वापरल्यात म्हणून आम्ही नाटकात नाही घेणार आहोत तुम्हाला —

सूत्रधारिणी : कशाला उगीच डिवचतोयस त्यांना? इकडे ये बघू. (प्रेक्षकांना उद्देशून) आमच्या संभाषणावरून एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही शक्य तितका निर्दोष आणि सपक फार्स लिहिणार आहोत.

नट : ज्यांना फार्स आवडत नाहीत अशांसाठीच तो आहे, तेव्हा प्लीज जसा असेल तसा आवडून घ्या.

सूत्रधारिणी आणि नट : (प्रेक्षकांना नमस्कार करीत) मग भेटूया तर! (दोघे आत जातात.)

(क्रमश:)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

फारच मजा आली!
ऐसीवर बदाम देता यायला हवा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर बदाम देता यायला हवा.

❤️

(सांगण्याचा मतलब: माझ्याकडे आयफोन आहे. आणि, मला थोडेबहुत — पोटापाण्यापुरते! — CSSसुद्धा येते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

♥️
असा बदाम काय कुणीही देईल! मी व्हॉट्सॲप फेसबुकसारखा बदाम म्हणते आहे. म्हणजे लेखाखाली बदाम reaction देता यायला हवी.
सांगायचा मतलब: माझ्याकडे पिक्सेल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी सबब वापरून तुझ्यासाठी कायपन म्हणत बदाम आणायचा प्रयत्न केला; पण तेही जमत नाहीये. तर माझा नैष्ठिक बदाम सध्या स्वीकार. बदाम बदाम

पुढच्या जनजागृतीची वाट बघत आहे.

(संपादन : प्रतिसाद प्रकाशित केल्यानंतर बदाम दिसले; पण भावनाओं को समझो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख प्रकाशित करण्याचा दिनांक आणि महिनाही जुळे आहेत! Smile

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढे कसकसे होत जाते बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जम्या. पुढच्या भागांची वाट बघतोय.

(आदूबाळाच्या एका लिखाणात एकसोएक नवनवे शब्द होते. त्याची आठवण झाली हे वाचताना.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

सुरुवात झाली आहे! बदाम
पुढील भागांची वाट पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच जमलंय.

आतुरता पुढच्या भागांची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू