नाही म्हणजे नाही.

"मी निघते गं मावशी, रेश्मा आली की तिला तो कॅटलॉग आठवणीने दे.. मग ती तो तिच्या मैत्रिणींना दाखवेल."
सोफ्यावरून उठत वसुधा म्हणाली.
"अगं थांब की जरा, इतकी उन्हाची कुठे जातेस? थोडा चहा घेऊन जा, छान आले घालून करते .. माझी चहाची वेळ झालीच आहे." मावशी स्वयंपाकघराकडे जाताना म्हणाल्या.

वसुधाचा नाईलाज झाला होता. बाहेर ऊन खूप होते, हवेत उष्मा होता, पंखा फिरत होता पण त्याचा वाराही गरम वाटत होता. अशावेळी गरम चहा नकोसा वाटत होता, पण मावशींनी तिचा नकार मानलाच नसता. ती मुकाट्याने हातातील पर्स समोरच्या लहानशा मेजावर ठेवून स्वयंपाकघरात आली. तिथल्या एका खुर्चीवर बसत म्हणाली,
"मावशी तुझा ३.३० चा चहा कधी चुकत नाही हं."
"हो ना .. जन्मभराच्या सवयी या, अशा जायच्या नाहीत." मावशी म्हणाल्या.

चहा घेताना दोघींच्या गप्पा रंगल्या. आता उन्हेही कलू लागली, हवेतील उष्मा जरा सुसह्य झाला होता. वसुधाने दोघींच्या कपबश्या बेसिनमध्ये ठेवल्या. नळाच्या पाण्याने चांगल्या स्वच्छ विसळून ओट्यावर ठेवल्या.
"ताईने चांगले वळण लावले आहे हो तुला, नाहीतर आमची रेश्मा ... मी उचलला नाही तर तिच्या कॉफीचा मग दोन दोन दिवस तिच्या टेबलावर तस्साच असतो. कधी समज यायची या मुलीला? काही कळत नाही."
मावशी मनापासून बोलल्या.
"लहान आहे गं ती अजून .. वेळ आली की सारे काही नीट करेल." वसुधा म्हणाली.
मनगटावरल्या घड्याळाकडे बघत वसुधाने तिची पर्स उचलली आणि म्हणाली,
"आता मात्र खरंच निघते मी, पूर्वा शाळेतून यायची वेळ झालीय. ती यायच्या आधी मला घरी पोहोचायला हवं."

वसुधा एक मध्यमवर्गीय गृहिणी होती. सुरवातीला तिचा संसार चांगला सुरळीत चाललेला होता. पण कशी कुणाची दृष्ट लागली माहीत नाही.. मुकुंदाचे वागणेच बदलले. घरात तो सतत चिडचिड करू लागला होता. वसुधाला कळत नव्हते काय बिनसले आहे? घरातले वातावरण बदलून गेले होते. पूर्वा तर मुकुंदाला घाबरू लागली होती. कधी तो तिच्यावर रागावेल याचा नेम नव्हता. शक्यतो ती त्याच्यासमोर थांबायची नाही. आई बाबांचे भांडण सुरू झाले की एका बाजूला बसून राहायची. तिचा कोमेजलेला चेहरा बघून वसुधाला अपराधी वाटायचे. मग चूक कुणाचीही असो, तीच कमीपणा पत्करायची..
मुकुंदाला या कशाची जाणीव होती की नाही माहिती नाही, पण त्याचे वसुधाशी बोलणे म्हणजे फक्त रागवारागवी आणि आरडाओरडा असे. पूर्वाची शाळा, अभ्यास वगैरे त्याच्या खिसगणतीतही नव्हते.

आज नेहमीप्रमाणेच मुकुंद घरी उशीरा आला होता. काही न बोलता तो त्याच्या खोलीकडे निघून गेला. उशीर का झाला वगैरे काही सांगण्याची पद्धतच नव्हती त्याची. विचारले, तर सारखी चौकशा करते म्हणून रागवायचा. म्हणून वसुधाने त्याला काही न विचारण्याची सवय लावून घेतली होती. उगीच घरातले वातावरण बिघडणार आणि निष्पन्न काहीच नाही.
ती न बोलता स्वयंपाकघराकडे निघाली. जेवणाच्या मेजावर झाकून ठेवलेले अन्न ओट्यावर ठेवून तिने कपाटातून लहान कढई काढली. एका प्लेटवर पोळ्या ठेवून ती प्लेट ओव्हन मध्ये ठेवली, तितक्यात मुकुंद तिथे आला. फ्रीज उघडून त्यातली पाण्याची बाटली काढून घेत म्हणाला,
"जेवायचं नाहीये मला... "
"अरे पण आधी सांगितले का नाहीस? नेहेमीचेच झालंय आता... . " वसुधा जरा त्रासूनच म्हणाली.
"आता सारे काही तुला सांगून, विचारून करायचे का?" मुकुंद चिडून म्हणाला. "सारखी हिची कटकट.. घरी येणे नकोच वाटते मला."
बोलता बोलता त्याने फ्रीजचे दार जोरात ढकलले, सगळा राग तो त्या दारावर काढत होता. मुकुंद तिथून निघून गेला. वसुधाला कळत नव्हते तिचे नक्की काय चुकते आहे? त्याला इतका राग येण्यासारखे ती काय बोलली?

सगळी आवरासावर करून ती परत दिवाणखान्यात आली. टी.व्ही चा रिमोट हातात घेतला पण ठेवून दिला. आवाजामुळे झोपमोड झाली म्हणून चिडायचा, नकोच ते.
वसुधा दिवाणखान्यातल्याच एका खुर्चीवर बसून राहिली होती. डोळे मिटलेले होते पण मनात विचारांचा कल्लोळ उसळला होता. मिटलेल्या डोळ्यांसमोर वर्षांमागून वर्षे उलगडत होती. अनेक प्रसंग, माणसे, संवाद ... सारे काही जणू पुन्हा एकदा घडत होते. किती आणि काय घडून गेले होते आजवर? पण आता तिची सहनशक्ती तिला दगा देत होती. हा सर्व गुंता उकलायचा कसा? यातून मार्ग कसा काढायचा? तिला काहीच सुचत नव्हते.

किती वेळ गेला माहिती नाही, पण दारावरची बेल वाजली. तिला समजेना रात्रीच्या वेळी कोण आले असेल? तिने समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिले. घड्याळाचे काटे पाच वाजल्याचे दाखवत होते.
"दूधवाला असणार.. " असे म्हणत तिने दार उघडले, दाराच्या कडीला अडकवलेली कापडी पिशवी आणि तिथेच अडकवलेली वर्तमानपत्राची घडी काढून घेतली. दुधाच्या पिशव्या घेऊन ती स्वयंपाकघरात आली. दिवसाचे चक्र सुरू झाले होते.

मशीनजवळ बसून वसुधा स्वेटर विणीत होती. काही दिवसांपासून तिने हे काम करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी मशीनवर विणकाम करण्याचे प्रशिक्षण देखील घेतले होते. अजून फारसे काम नव्हते तिच्याकडे ... पण सुरवात तर केली होती.
पूर्वा शाळेत गेल्यावर ती दुपारच्या वेळात प्रशिक्षण वर्गाला जाऊ लागली होती. वातावरणात बदल झाल्याने काही काळ तरी घरातल्या त्रासाचा तिला विसर पडत असे. काही ठिकाणी तिने नोकरीसाठी अर्ज देखील केले होते. पण तिथून फारसे काही आशादायक मिळाले नव्हते. तसेही जवळपास १०-१२ वर्षे ती घरातच गुंतलेली होती. त्या अवधीत कितीतरी बदल झालेले होते. तिच्या पदवीचा तिला नोकरी मिळण्याच्या दृष्टीने फारसा उपयोग नव्हता. आधुनिक तंत्रज्ञान शिकायला हवे होते, पण आता नवीन काही शिकण्याचा आत्मविश्वास तिच्याकडे नव्हता, म्हणून तिने हा मार्ग स्वीकारला होता.

तिला मुकुंदापासून वेगळे व्हायचे होते, त्यांच्यातले वैवाहिक नाते संपवायचे होते. वसुधाने नाते टिकविण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.. पण दरवेळी निराशाच मिळाली होती. तिने स्वतःच्या स्वभावाला, आवडी-निवडींना मुरड घातली होती. सगळे काही मुकुंदाच्या तंत्राने करण्याची तिने सवय लावून घेतली होती. तिला जणू तिचे असे अस्तित्वच नव्हते, मुकुंद म्हणेल ती पूर्व ... तरीही त्याच्या वागण्या, बोलण्यातला तिरकसपणा कमी झालेला नव्हता. तिच्या घरातली तिच्या सासरच्यांची मनमानी , त्यांनी केलेले अपमान तिने सोसले होते. पण तरीही तिच्या वाट्याला उपेक्षाच येत होतो. आणि आता तर तिला वेगळाच संशय येत होता. त्याचे घरात असून नसल्या सारखे वागणे तिला जाणवत होते. आणि एक दिवस तिची भीती खरी ठरली.

संध्याकाळची वेळ होती, रविवार .. सुट्टीचा दिवस. त्यामुळे जरा निवांतपणा होता. पूर्वा त्यांच्या सोसायटीमध्ये असलेल्या प्ले ग्राउंडवर गेलेली होती. वसुधा नुकताच आलेला दिवाळी अंक चाळत होती, तितक्यात मुकुंद आला. वसुधाला आश्चर्यच वाटले, कारण आजकाल बहुतेक वेळा तो सुट्टीच्या दिवशी देखील घराबाहेरच असे. पण ती काही बोलली नाही, उगीच भांडणाला निमंत्रण.
तिने परत दिवाळी अंकाची पाने उलटायला सुरुवात केली. पण आज दिवस काही वेगळाच होता. मुकुंद दिवाणखान्यात आला. तिच्या समोरच्या सोफ्यावर बसत म्हणाला,
"वसू , तुला काही सांगायचे आहे."
वसुधाने दिवाळी अंक बाजूला ठेवला आणि तो काय बोलणार आहे याचा अंदाज घेऊ लागली. मुकुंद म्हणाला,
"तुला माहिती आहे ना, सुरवातीला काही वर्षे आम्ही अमरावतीमध्ये रहात होतो?"
वसुधाने होकारार्थी मान डोलवली, पण बोलली काही नाही.
"तिथे आमच्या शेजारी देसाई म्हणून एक जण होते... त्यांना तिघी मुली होत्या त्यातली मोठी भक्ती.. "
मुकुंद सांगत होता. वसुधाला समजत नव्हते तो हे तिला का सांगतो आहे?
"आम्ही अमरावतीमध्ये असतानाच तिने लग्न केले होते.. घरच्यांचा विरोध होता त्यामुळे ती घरातून निघून गेली होती. दोन एक वर्षांपूर्वी ती मुलुंडमध्ये आली आहे. एका कला अकादमी मध्ये भरतनाट्यम शिकविते. एकटीच असते.." मुकुंद बोलत होता. त्याला जे बोलायचे होते ते नेमके बोलणे त्याला जमत नव्हते. वसुधाचे गप्प राहणे त्याला असह्य होत होते. तो चिडून म्हणाला,
"ऐकते आहेस ना मी सांगतोय ते?"
"चिडतोयस का असा? ऐकते तर आहे... सांग" वसुधा म्हणाली. तो काय सांगणार आहे याची तिला अंधुक कल्पना आली होती. बोलत नसली तरी ती काही बहिरी, आंधळी नव्हती.
"मी आणि भक्तीने एकत्र राहायचे ठरवले आहे. म्हणजे मी तुला आणि पूर्वाला अंतर देणार नाही, काळजी करू नकोस ... पण भक्तीला .." अडखळत अडखळत मुकुंदने अखेर सांगितले.

वसुधाला जरी साधारण कल्पना होती.. तरी ते सत्य प्रत्यक्षात सामोरे आल्यावर मात्र ती हताश झाली होती. आता यावर बोलणार काय? सारे काही संपले होते.
"हे बघ वसुधा.. मी पूर्वाची जबाबदारी टाळणार नाही. तुम्ही दोघी याच घरात राहा. भक्ती काही वाईट नाहीये गं, ती म्हणाली पूर्वा आमच्या दोघाबरोबर राहू शकेल, तिची हरकत नाहीये. काय करायचे ते तू ठरव" मुकुंद सांगत होता.
वसुधाला काय बोलावे कळत नव्हते. खरं म्हणजे असा प्रसंग आला तर काय बोलायचे याची तिने आधीच उजळणी करून ठेवली होती... पण आता तिला काहीच आठवत नव्हते. मुकुंदाला पण जरा अपराधी वाटत असावे, तो म्हणाला --
"मला कल्पना आहे हे सगळं फार विचित्र आहे. हे सगळे भक्तीनेच ठरवले खरे तर. ती म्हणाली नात्यामध्ये लपवाछपवी कशाला? एकत्र राहण्याची कल्पना देखील तिचीच. मी तिला सांगितले की माझ्यावर वसुधा आणि पूर्वाची जबाबदारी आहे, मी त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाहीत, तर ती म्हणाली तिच्या लग्नात तिची फसवणूक झाली.. आणि घरच्यांशी संबंध तोडलेले आहेत .. तिनेच, त्यामुळे तिला आता माझा आधार वाटतो."

मुकुंदाचे बोलणे ऐकताना वसुधाच्या मनात आले, पुरुषांची जातच लबाड, ढोंगी. तो असं सांगतोय जणू काही तो बिचारा किती कर्तव्यनिष्ठ, पण भक्तीमुळे त्याचा नाईलाज होतो आहे. हं...

"वसुधा, काही बोलशील की नाही? " मुकुंद म्हणाला. आता बोलणे भागच होते, काही काळ विचार करून ती म्हणाली,

"पूर्वा तर माझ्याकडेच राहील... सुरुवातीला तरी मला तुझ्याकडूनच आर्थिक मदत घ्यावी लागेल. तुला माहिती आहे, मला माझ्या माहेर कडून काही मिळण्याची शक्यता नाही.. आणि सध्या माझ्याकडे उत्पन्नाचे काही साधन नाही." तिचे बोलणे ऐकताना मुकुंदाला रहावेना, म्हणाला--
"वसू तू काळजी करू नकोस, तुला नोकरी वगैरे शोधायची जरूर नाही."
"ते ठीक आहे .. पण पूर्वाला कस सांगणार आहेस तू सगळं? " वसुधा तुटकपणे म्हणाली. तिच्या नजरेतला परकेपणा त्याला बोचत होता.

वसुधाने जणू नव्याने आयुष्याची सुरुवात केली होती. आजवर तिने कधीच कुठलाही निर्णय स्वतंत्रपणे घेतलेला नव्हता. तिला प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी कुणाचीतरी सोबत, कुणाचा सल्ला हवा असे. परंतु आता परिस्थिती अचानक पालटली होती. आता ती एकटीच नव्हती, तिच्याबरोबर पूर्वा होती.. संपूर्णपणे तिच्यावरच अवलंबून असलेली.

वसुधाला वाटले होते तितके मुकुंदाचे घर सोडून जाणे सोपे नव्हते.. पण हळू हळू सारे काही सुरळीत होऊ लागले होते. तिने आता तिच्या कामावर लक्ष केंद्रित केले होते. पूर्वा शाळेत गेल्यावर ती तिच्या मशीनवर काम सुरू करीत असे. अनेक नवीन नवीन डिझाइन्स चे स्वेटर्स, शाली, स्कार्फ, मफलर तिने विणले. एका चांगल्या फोटोग्राफरकडून त्यांचे आकर्षक फोटो काढून सुरेखसा कॅटलॉग तयार केला. तिने काही पत्रके छापून घेतली होती, रोजची वर्तमानपत्रे वाटणाऱ्याकडे ती देऊन घरोघरी पोहोचवली. व्यवसाय वृद्धीसाठी जे शक्य ते सर्व प्रयत्न ती करत होती. हळूहळू तिच्या कामाची चांगली प्रसिद्धी झाली होती. आता लहान प्रमाणात का होईना, तिच्याकडे नियमित कामाचा ओघ सुरू झाला होता. तिने आणखी एक मशीन विकत घेतले. आता तिच्याकडे दोन तीन मदतनीस होते. कधीकधी तिच्या मनात यायचे, जे झाले ते चांगलेच झाले. नाही तर मी मुकुंदाची चिडचिड सहन करत घरकाम करत राहिले असते. कष्टाचे असले, तरी हे आयुष्य कितीतरी पटीने चांगले आहे.

एक मोट्ठी कापडी पिशवी सांभाळत वसुधा रिक्षेतून उतरली. तिथल्या फुटपाथवर उभी राहून तिने समोर पाहिले. लहान मोठ्या दुकानांची रांगच दिसत होती. ती सावकाश दुकानावर झळकणाऱ्या पाट्या वाचत चालली होती. पण तिला हवे असलेले दुकान काही दिसेना. मग तिने तिथेच पेरू विकत असलेल्या एकाला विचारले.."भाग्यश्री स्टोअर्स कुठे आहे हो?"
"ते काय ... समोर, दिसलं का?" त्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडे हात दाखवत सांगितले.
तिने समोर पहिले... भाग्यश्री ची पाटी झळकत होती. आता तिला रस्ता ओलांडून पलीकडे जायचे होते. तिने डाव्या हातातली पिशवी उजव्या हातात घेतली, हातात अडकवलेली पर्स खांद्यावर घेतली... तितक्यात तिला कुणीतरी म्हणत होते..
"वसुधा? कुठे जायचंय तुला?" आवाज ओळखीचा होता... असणारच ना? मुकुंद होता तो.
वसुधा परत फुटपाथवर आली. मुकुंद कडे बघत म्हणाली,
"ते समोर भाग्यश्री आहे ना .. तिथे जायचंय. हे स्वेटर्स वगैरे द्यायचे आहे, बऱ्याचवेळा ते माझ्याकडून घेतात." ती मुकुंद कडे पहात होती. बराच बदल झाला होता त्याच्यात.
"म्हणजे उद्योजिका झालीस की तू.. पूर्वा कशी आहे? ती पण मदत करते का?" मुकुंद ने विचारले. वसुधाला नवल वाटत होते की तो इतक्या सहजपणे तिच्याशी कसा बोलू शकतोय? जणू काही घडलेच नाही असा?
"उद्योजिका वगैरे नाही.. थोडीफार कामे मिळतात इतकेच. पूर्वा आता कॉलेज मध्ये जाते ...ती नाही यात लक्ष घालत. तिला तिचे पुष्कळ उद्योग असतात." वसुधा म्हणाली. थोडावेळ दोघेजण काही न बोलता उभे होते, मग मुकुंद म्हणाला,
"पूर्वाला भेटायची इच्छा आहे ... तुझी हरकत नसली तर."
"हरकत कसली? .. मुलगी आहे ना तुझी? मी सांगेन तिला. तू फोन कर.." वसुधा म्हणाली. मुकुंदाला अजून काही बोलायचे असावे पण ती म्हणाली, "जाते आता.. उशीर होईल नाहीतर."

घाईघाईने रस्ता ओलांडून ती भाग्यश्रीच्या पायऱ्या चढू लागली. मुकुंदाच्या भेटीने जरा अस्वस्थ झाली होती. काही जुन्या आठवणी उगीचच मनात रुंजी घालत होत्या.
"आओ आओ वसुधाबेन " स्टोअरचे मालक गोकुळदासजींनी तिचे स्वागत केले.

त्या दिवशी संध्याकाळी तिने पूर्वाला मुकुंद भेटल्याचे सांगितले. पण पूर्वा मात्र त्याच्या बद्दल काही ऐकायलाच तयार नव्हती. तिच्या मनात त्याच्याबद्दल अतिशय राग होता. अजून तशी ती लहान होती. वसुधा इतका सोशिकपणा तिच्याकडे नव्हता. आणि हा विषय तर तिच्याकरता फारच त्रासदायक होता. एका परक्या बाईसाठी तिच्या वडिलांनी तिचा आणि तिच्या आईचा त्याग केला होत,. हे दुःख तिला अजूनही सलत होते. वडील असूनही एखाद्या अनाथाप्रमाणे तिचे बालपण गेले होते. तिने तिच्या आईचे कष्ट, तिला होणारा त्रास पाहिला होता. नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडून होणारी तिरकस विचारपूस आणि काही वेळा जिव्हारी लागणारी कुजकट बोलणी तिने सहन केली होती. आणि या सर्वाला कारण असलेल्या माणसाबद्दल आई इतकी सहजतेने कशी बोलू शकते, याचे तिला नवल वाटत होते.

"मला नाही त्याला भेटायला जायचे. त्याच्याशी एक शब्दही मला बोलायचा नाही आणि ऐकाचाही नाहीये. तू त्याला तिथेच नाही म्हणून का सांगितले नाहीस? मला नाही जमणार." पूर्वाचा त्रागा चालू होता. ती रागारागाने तिच्या खोलीत निघून गेली.
वसुधाला समजत नव्हते तिची कशी समजूत घालावी? सवयीने तिचे हात मशीनवर चालत होते. लोकरीचे धागे एकमेकात गुंफून सुरेख नक्षी तयार होत होती. काहीवेळाने तिने मशीन बंद केले, डोळ्यावरचा चष्मा ड्रॉवर मध्ये ठेवीत ती म्हणाली,
"पूर्वा जेवायला येतीयस ना? जास्ती उशीर नको करू ... "

वसुधाने पदार्थ गरम करून घेतले.. तोवर पूर्वा आली होती. जेवताना ती गप्पच होती, रडली असावी बहुधा. वसुधाला वाईट वाटले, लहान वयात खूप काही सोसले होते पूर्वाने. पण तरीही ती गप्प राहिली, कारण पूर्वा आत्ता काहीही ऐकण्याच्या मन⁚स्थितीत नव्हती. नंतर दोघी दिवाणखान्यात कुठलीतरी दैनंदिन मालिका बघत होत्या. वसुधाने परत विषय काढला...
"पूर्वा इतका त्रागा करू नकोस गं. जे झाले ते झाले.. पण आयुष्यभर त्याचा त्रास करून घेणार आहेस का?"
पूर्वाने आश्चर्याने वसुधाकडे बघितले, "आई तू असं बोलू कशी शकतेस? बाबाने जे केले ते विसरण्यासारखे आहे का? सगळे आयुष्यच बदलून गेले तुझे आणि माझे. आणि तरीही तू ....? मी तुझ्याइतकी सहजपणे बोलू शकणार नाही."
मग बराच वेळ वसुधा पूर्वाला समजावत होती. हळूहळू पूर्वाचा राग शांत होत होता. शेवटी वसुधा इतकेच म्हणाली,
"तू त्याच्याबद्दलचा राग मनात ठेवून स्वतःलाच शिक्षा करून घेते आहेस. त्याच्या वागण्याने आपल्याला त्रास झाला.. कदाचित त्यानेही बरेच काही सहन केले असेल. पण तो तुझा जन्मदाता पिता आहे, आणि त्याने त्याची जबाबदारी टाळलेली नाही हे लक्षात घे. मला वाटते तू त्याच्याशी एखादेवेळेस बोलायला काहीच हरकत नाही, अर्थात ते तूच ठरव."

पूर्वाने सगळे ऐकून तर घेतले होते, पण त्यावर ती काय करणार आहे? यावर तिने चकार शब्द काढला नाही. मग वसुधाने पण तो विषय सोडून दिला. एक दिवस वसुधा तिला मिळालेले एक नवीन डिझाइन मशीनवर विणून बघत होती.. तेव्हढ्यात पूर्वा आली. आल्यावर सरळ तिच्या खोलीकडे न जाता तिथेच बाजूला एका खुर्चीवर बसली आणि म्हणाली,
"आई, आज मी बाबाकडे गेले होते. म्हणजे त्याच्या घरी. तिथे ती सुद्धा होती."
वसुधाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले, "हो का? आधी बोलली नाहीस काही?"
खरे तर तिला सर्व काही जाणून घ्यायचे होते, पण मग पूर्वाला वाटले असते ती फार प्रश्न विचारते आहे. म्हणून ती पूर्वाने काही सांगण्याची वाट बघत राहिली.
पूर्वाने तिला सारे काही सांगितले, अगदी तिने केलेल्या फोन पासून ... वसुधा लक्षपूर्वक ऐकत होती.

मग काही ना काही निमित्ताने मुकुंद तिच्या बरोबर संपर्क साधत असे, कधी पूर्वाचा वाढदिवस, कधी तिच्या परीक्षेचा निकाल तर कधी काही. पूर्वा देखील पहिल्या इतकी चिडत नसे, त्याने दिलेल्या भेटवस्तू घेई, आणि त्याच्याबरोबर नीट बोलत असे. अजून तिच्या मनातली अढी पूर्णपणे गेली नव्हती पण बरंच काही सुरळीत होऊ लागले होते. वसुधाने स्वतःला मात्र या सर्वातून अलिप्त ठेवले होते.

आजवर मुकुंद कधीच घरी आला नव्हता. पूर्वाने अथवा वसुधाने त्याला कधी बोलावले नव्हते. पण आज मात्र तो घरी आला होता. पूर्वा अजून यायची होती. शैला आणि वर्षा, तिच्या दोघी मदतनीस त्यांच्या कामात मग्न होत्या आणि ती संतोषला सूचना देत होती. संतोष तिला बाहेरची कामे करण्यात मदत करीत असे. विणकामाकरता लागणारी लोकर, बटणे इत्यादी वस्तू विकत आणणे आणि तयार केलेल्या लोकरीच्या वस्तू दिलेल्या पत्त्यावर पोहोचविणे हे त्याचे काम होते. वसुधा, त्याने आणलेली लोकर आणि दिलेले पैसे याचा हिशेब लावीत होती. हिशेब पूर्ण करून, तयार केलेल्या वस्तू घेऊन तो निघून गेला. तोवर वर्षा आणि शैलाची आवराआवर झालेली होती. दोघीजणी गेल्यावर ती मुकुंदला म्हणाली,
"पूर्वाला यायला अजून बराच वेळ आहे. चहा घेशील?"
चहा करताना ती विचार करत होती, आज हा घरी का आला असेल?

चहाचा कप त्याच्या हातात देऊन ती त्याच्या समोर बसली. काय बोलावे ते तिला सुचत नव्हते, आणि तो सुद्धा काहीच बोलत नव्हता. जरा वेळाने तो म्हणाला,
"आज मी तुझ्याशी बोलण्याकरता आलो आहे."
ती काहीच बोलली नाही, तिच्या मनात येत होते, बोलण्यासारखे आता काय शिल्लक राहिले आहे?
मुकुंद म्हणाला, "वसुधा माणूस कधी कसा वागतो सांगता येत नाही. कदाचित काही वेळा क्षणैक प्रेरणा असते, काही वेळा सारे काही आखून ठरवून केलेली कृती असते. दरवेळी निर्णय योग्य असतोच असे नाही, काही वेळा फसतो देखील." मुकुंद क्षणभर थांबला. वसुधाची प्रतिक्रिया आजमावत म्हणाला,
"माझे चुकले वसुधा, मी तुला आणि पूर्वाला सोडून जायला नको होते. मोहाने माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. भक्तीने तिच्या पूर्वायुष्याचे एक करूण चित्र माझ्यासमोर रेखाटले होते, पण ते तितकेसे खरे नव्हते. मला तेव्हा तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती, पण मी आणि भक्ती २४ तास एकत्र राहू लागलो आणि तेव्हा माझ्या लक्षात आले, मी माझीदेखील फसगत करून घेतली आहे."
वसुधा अजूनही काही बोलत नव्हती. मुकुंद जे सांगत होता त्यात आनंद मानावा? की दुःख व्यक्त करावे? याचा ती विचार करीत होती. मुकुंद म्हणाला,
"या आयुष्यात मला सुख वाटत नाही वसुधा. पूर्वा माझ्याकडे आली, काहीश्या दुराव्याने का होईना माझ्याबरोबर बोलू लागली, तेव्हा मला समजले मी काय गमावले आहे? वसुधा आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ शकणार नाही का? "

वसुधा चकित होऊन सारे काही ऐकत होती. असा काही प्रसंग येईल याची तिने कधीच अपेक्षा केलेली नव्हती. मुकुंद घर सोडून गेल्यावर तिने त्याचे नसणे कायमचेच गृहीत धरले होते. तिने त्याच्याकडे पाहिले, तो खोटे बोलतोय किंवा नाटक करतोय असे काही तिला वाटले नाही. तसे करण्याची त्याला आवश्यकता देखील नव्हती. काळाने त्याच्यात बरेच बदल केलेले होते, पण बोलण्याची पद्धत तशीच होती. तो तिच्याकडे अपेक्षेने बघत होता.
काही क्षण तिने डोळे मिटून घेतले. स्मृती पटलावर भूतकाळातली दृश्ये साकारत होती. डोळ्यातून नकळत अश्रू ओघळत होते. आजवर तिची झालेली अवहेलना, वंचना सारे काही तिला स्मरत होते. कुण्या एका स्त्रीच्या मोहाने तिला सोडून गेलेला पती, परत तिच्याकडे यायची इच्छा व्यक्त करीत होता.

"तुला त्रास होणार असेल तर राहू दे, नंतर बोलूया", मुकुंद म्हणत होता.

मिटलेले डोळे तिने उघडले, डोळ्यातले पाणी पुसत ती म्हणाली,
"नाही त्रास नाही होणार मला. परत पूर्वीच्या आयुष्याकडे जाणे मात्र मला जमणार नाही. मध्यंतरीच्या काळात बरेच काही घडले. परिस्थितीने माझ्यात बदल घडवून आणला आहे. आता जर आपण एकत्र आलो तर तुझा पुन्हा एकदा भ्रमनिरास होईल, कारण आता मी ती पूर्वीची वसुधा राहिले नाही. मला आणि पूर्वाला देखील, तुझ्याशिवाय जगण्याची सवय झाली आहे. आता जे चालू आहे तेच पुढे चालू ठेवणे एव्हढेच आपल्या हातात आहे."
वसुधा शांतपणे बोलत होते. तिच्या बोलण्यात राग, द्वेषाचा लवलेश नव्हता. मुकुंदला ही वसुधा अनोळखी वाटत होती, पुरेपूर आत्मविश्वास असलेली आणि दृढनिश्चयी.
मुकुंदने परत बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला थांबवत ती म्हणाली,
"ते आता कधीच शक्य नाही मुकुंद, नाही म्हणजे नाहीच."
निराश झालेला मुकुंद तिथून निघून गेला. आणि आज काय स्वयंपाक करावा याचा विचार करीत वसुधा स्वयंपाकघरामध्ये आली.

***

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet