गोव्याच्या प्रवासात , डायरीत केलेल्या नोंदी

काणकोण - ०७ ऑकटोबर , २०२३
मडगाव ते काणकोण हा प्रवास गोव्याच्या स्टेट ट्रान्सपोर्ट च्या बस ने केला. "म्हजी बस" असं कदंबा (गोव्याच्या सरकारी बस सेवेचं नाव ) प्रत्येक बसवर लिहिलेलं असतंय. कदाचित बस सेवेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून असेल. शनिवारची सकाळ , जास्त गर्दी कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींची. दोन चार स्टॉप मध्ये बस बऱ्यापैकी रिकामी होते. मडगाव मागे पडलं कि मग लागतात ती छोटी छोटी गावं. त्यांचे स्टॉप म्हणजे एखाद्या तिठयावर किंवा चार रस्त्यावर. तसा दीड तासात काणकोण येतं. काणकोणचा स्टॉप तसा मोठा आणि आखीव रेखीव. सकाळच्या वेळी सुद्धा गर्दी तशी कमीच. बस स्टॅन्ड धुवून काढणाऱ्या बायका , त्यांचीच लगबग जास्त. पाळोळे , अगोंद , गाल्जीबाग अशा छोट्या छोट्या गावात जाणाऱ्या बसची वाट बघत थांबलेले पाच दहा लोक. मडगाव आणि कारवार ला जाणाऱ्या गाड्या मात्र दर अर्ध्या तासाने येत असतात. सकाळचीच वेळ असते , त्यातून शनिवार. नऊ वाजेपर्यंत स्टॅन्डवरची चार छोटी छोटी दुकानं उघडायला लागतात. देवापुढं अगरबत्ती ओवाळली जाते. चार दुकानं पण चंदनाची अगरबत्ती सगळ्यांची सारखीच असावी. चंदनाचा प्रसन्न दरवळ सगळीकडे पसरतो. मी बॅग उचलतो , एक पायलट शोधतो (दुचाकी टॅक्सी वाल्याला काणकोणात "पायलट" म्हणतात) आणि होस्टेलच्या रस्त्याला लागतो. लक्षात राहतो तो फक्त चंदनाचा प्रसन्न दरवळ....,,

पाळोळे समुद्र तट , ०७ ऑकटोबर २०२३
योगी आदित्यनाथांनी अलाहाबादचं प्रयागराज केलं , उद्धव ठाकरेंनी उस्मानाबादचं धाराशिव केलं अगदी तसंच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्यातल्या गावांची इंग्रजाळलेली ( कि लॅटिनाळलेली कि पोर्तुगीजाळलेली ??) नावं बदलून मूळ कोंकणी नावं वापरात आणावीत खरंतर. पाळोळे या इतक्या नादमधुर शब्दाला पालोलेम म्हणणं अगदीच चुकीचं वाटतं तुम्हाला सांगतो. किंवा मग अगोंद या इतक्या नादमय आणि गोड शब्दाला अगोंडा म्हटलं कि त्यातला सगळा गोडवाच निघून गेल्यासारखं वाटतं.

नाश्तो , चार रस्ता , चावडी , काणकोण . , ०७,०८,०९ ऑकटोबर

जिथं जावं तिथं तिथल्या स्थानिकांसारखं होऊन राहावं हे मी नेहमी पाळत आलोय. आणि गेल्या ३५ वर्षांत मी फक्त भारतातच फिरलेलो असल्याने ते तसं मला सोपं हि गेलेलं आहे. त्यामुळे केरळात गेल्यावर कडला करी खावी , दिल्लीत छोले कुलचे खावे आणि गोव्यात खावं कडक पाव आणि भाजी. इथे भाजी म्हणजे मुंबईतल्या पाव भाजी सारखी भाजी नाही. तर पातळ भाजी. वाटण्याची किंवा मिक्स व्हेज. नारळाच्या वाटणात केलेली. त्याला टिपिकल गोवन चव. त्या चवदार रश्यात कडक पाव बुडवला कि रस्सा त्यात मुरतो आणि पाव आणि नाश्टा दोन्ही रसरशीत होऊन जातं. रसरशीत हा शब्द एखाद्या खवय्याला रश्यात बुडवलेला पाव बघूनच सुचला असावा. असो.
काणकोण मध्ये चार रस्त्याला कडेला एक उडुप्याचं हॉटेल आहे. म्हणजे तसं हॉटेल कुठ्ल्यातर देसायाचं पण चालवणारा कारवार / मंगलोर कडचा. गोव्यात हे सर्रास दिसतं. जसं कि काजूचं दुकान असणार कुणा स्थानिकाच पण चालवणारा असणार मारवाडी. असो. सांगायचं मुद्दा हा कि चार रस्त्यावरच्या त्या उडुप्याच्या हॉटेलात बन्स आणि भाजी खावी. गरमागरम टम्म फुगलेले बनाना बन्स आणि मिक्स व्हेज पातळ भाजी. भरपेट न्याहारी .
तसाच आणखी एक मला आवडणारा पदार्थ म्हणजे रोस ऑम्लेट. काणकोणला असाल तर चार रस्त्यावरून थोडं पुढे जायचं , चावडी च्या रस्त्याला , बस स्टँडच्या पुढे दोन हॉटेलं आहेत. हॉटेल म्हणजे काय खोपटंच म्हणायचं. मोजून सहा टेबलं , पायाशी घुटमळणारी एखादी मांजर , कासवाच्या गतीने फिरणारे पंखे आणि ऑर्डर दिली कि पाचव्या मिनिटाला समोर येणारं रोस ऑम्लेट. चिकनच्या रश्यात नखशिखांत बुडालेलं ऑम्लेट आणि चिकनचा एखादा पीस. अहाहा . नाश्त्याला रॉस ऑम्लेट खावं , लिंबू सोडा प्यावा , समाधानानं ढेकर द्यावं आणि मग ऍक्टिवा ला किक मारून गाव हिंडायला निघावं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

योगी आदित्यनाथांनी अलाहाबादचं प्रयागराज केलं , उद्धव ठाकरेंनी उस्मानाबादचं धाराशिव केलं अगदी तसंच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्यातल्या गावांची इंग्रजाळलेली ( कि लॅटिनाळलेली कि पोर्तुगीजाळलेली ??) नावं बदलून मूळ कोंकणी नावं वापरात आणावीत खरंतर. पाळोळे या इतक्या नादमधुर शब्दाला पालोलेम म्हणणं अगदीच चुकीचं वाटतं तुम्हाला सांगतो.

मुळात Palolemचा उच्चार 'पालोलेम' नाही! गोव्याबाहेरील घाटीचोट पब्लिक चुकीच्या/अडाणचोट समजुतीमुळे तो तसा उच्चार करते. रोमी कोंकणीच्या स्पेलिंग कन्व्हेन्शनांप्रमाणे Palolem हे 'पाळोळें'चे योग्य स्पेलिंग असून, त्याचा 'पाळोळें' (सानुनासिक) असा(च) उच्चार होतो.

रोमी कोंकणीची स्पेलिंग कन्व्हेन्शने इंग्रजीच्या स्पेलिंग कन्व्हेन्शनांपेक्षा वेगळी आहेत.

Panjim = पणजीं
Quepem = केपें
Palolem = पाळोळें
Pernem = पेडणें

किंवा, (आड)नावांच्या बाबतीत:

Quenim = केणीं
Xenoi = शेणई
Esvonta = यशवंत

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही नवी बाजू आजच कळली . धन्यवाद!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिषेक राऊत