बस्स तुझं असणं..........

तु कोण, काय, तुझं गावं कोणतं, तुझं येणं कुठलं हे काहीच माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं... नाहियेय...तुझं माझ्या आयुष्यात असणचं माझ्यासाठी बहारदार होतं वसंतातल्या लालट गुलमोहरासारखं......मला टवटवीत करणार.....तसं म्हटलं तर आपली ओळख दोन वर्षांपूर्वीची आणि म्हटलं तर जन्माजन्माची म्हणूनच तर हा अनुरागी बंध जुळला ना !  जो आजच्या क्षणापर्यंत कायम आहे....मनाच्या कप्प्यात.
               खरतरं एम. ए. च्या पहिल्या वर्षाला असताना विभागातांर्गत एका वादविवाद स्पर्धेत आपली ओळख झाली.  तुझं माहितं नाही पण तुला पाहताक्षणी माझ्या आत काय सुरू झालं ते समजलं नाही पण आतून सांगावा आला की, ही जी कुणी व्यक्ती तिच्याशी ओळख करून घे आता याक्षणी. मी माझ्यावरचं हसले....म्हटलं माझ्या डोक्यावर परिणाम तर होतं नाहीयेय ना....कारण समाजाने मला ज्या व्यक्तींपासनं चार हात लांब राहायला शिकवलं....मन आज त्याचं व्यक्तीकडे खेचलं जातयं; असं का ? मी बरचं दुर्लक्ष केलं पण मन ऐकेनाच शेवटी धीर करून तुझ्यासमोर आले,
"हाय"
समोरून तू....
"हाय."
"मी रिया...."
त्यावर तुझं उत्तर
"मी प्रीतम"
"छान मुद्दे मांडलेस तु....म्ही"
तुला माझा गोंधळ समजला मग पटकन हसून तू उत्तर दिलसं
"ओह.....थँक्यू"
अचानक तुला कुणाचीतरी हाकं आली आणि तुझं निघून जाणं झालं...जाणाऱ्या तुला; माहित नाही का पण काही क्षण मी न्याहाळत राहिले. मन आतून स्वतःला शाब्बासी वर शाब्बासी देत राहिलं. एक दिगंतर समाधी लागली. पण ती काही क्षणांचीच. मागून मैत्रीणी आल्या आणि मी कुणाशी बोलायला आले याची टिंगल उडवू लागल्या. पण नेहमी मैत्रीणींच्या टिंगलटवाळीला प्रतिउत्तर करणारी मी आज शांत होते. काय घडतं होतं नेमकं. मैत्रीणींची टिंगलटवाळी सुरूच होती....मध्येच झटका लागल्यासारखं मी अचानक बोलले,
"शीट यार डिपार्टमेंट कुठलं विचायरायचं राहिलं." प्रश्नाकिंत चेहरे करून त्या माझ्याकडे बघत राहिल्या आणि मी त्यांच्यातून अलगद निसटून तूझ्या मागावर निघाले. पण तु गायब.....
            दुसऱ्या दिवशीपासून जाता-येता विद्यापीठातल्या प्रत्येक विभागापाशी माझी नजर रेंगाळत होती. तू कुठेतरी दिसशील या आशेवर...पण नाहीच ! तुझी साधी सावलीही कुठे दिसतं नव्हती. महिनाभराच्या शोधानंतर आता काही शोधात अर्थ नाही असा विचार करत असतानाच माझ्या डिपार्टमेंटच्या बाजूला असणा-या डिपार्टमेंटमधून तुझी एण्ट्री झाली आणि माझ्या शोधाचा दी एण्ड. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी त-हा झाली होती माझी. वाटलं धावतं धावतं तुझ्यापाशी यावं तुला गच्च बिलगावं कधीही न सुटण्यासाठी. पण मी आहे त्या जागी खिळून राहिले..निरखत राहिले तुला...तू अगदी माझ्या जवळून निघून जात असताना..पण तूला मी दिसलेचं नाही....खरं सांगू खूप वाईट वाटलं यार...सालं आपण ज्याच्यासाठी गेले महिनाभर धडपडं केली......इतकी पायपीट केली त्या व्यक्तीने आपल्याला एवढं नजरंदाज करून जावं ?
मी तिथेचं खट्टू होऊन उभी. "उडत जाऊदे". पण मग लगेच भानावर येतं स्वतःशीच पुटपुटले....
"मी प्रीतमला  दोषं का देतेय ? मला ओळख दाखवायला आम्ही धड ओळखीचे ही नाही एकमेंकाना!"
स्वतःच्या अधीरतेवर मी हसत राहिले काही क्षण..माझा मागोवा घेत काही वेळाने माझ्या सख्या आल्या. त्यांना मी उतावीळपणाने सांगितलं;  प्रीतमला मी आता इथून जाताना बघितलं.....
"प्रीतम...." मीराने शंकेने विचारलं त्यावर सीमा आठवण करून देत म्हणाली "अगं ते वादविवाद स्पर्धेत....." छक्क्यांसारख्या हाताच्या टाळ्या वाजवत तिने बाकीच्यांना आठवण करून दिली.....माझं मस्तकचं फिरलं....पण मी काही बोलायच्या आधीचं दुसरी एक मैत्रीण म्हणाली,
"रिया तुला वेडं बीड तर नाही ना लागलं, अगं काय म्हणून तू त्या छक्क्याच्या पाठी लागेल्येस.....मस्करीपूरता ठीक होतं सगळं; पण जमिनीवर येऊन विचार कर"
"प्रीतम असं नाव आहे ना मग उगीच का छक्का म्हणताय...आणि माणूस आहे प्रीतम...." मी तडकूनच बोलले.
पण एक ना दोन मैत्रीण माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीत.....मला ओढत, बडबडत, घरी सांगू वगैरे धमकी देत मला तिथून घेऊन गेल्या.... पण मनाने मी अजून तिथेच होते प्रीतम येण्याची वाट बघतं..... मला प्रीतमचं डिपार्टमेंट समजलं होतं आता माझा पहारा सुरू झाला तो प्रीतमचं विद्यापीठात कुठे कुठे फिरणं होतं याचा.....आणि या शोध मोहिमेनंतर प्रीतमचा बराचं वेळ लायब्ररी मध्ये जातो हे समजलं. आधी फक्त रेफरन्स बुक घ्यायला जाणारी मी आता लायब्ररीमध्ये रेंगाळू लागले. एव्हाना प्रीतमच्या वेडापाई मैत्रीणीही मला टाळू लागल्या. पण त्यांची मला फिकीरच नव्हती. उलट बरचं झालं होतं माझ्यासाठी. 
            प्रीतमची लारब्ररीतली बसायची जागाही मला आता समजली. मग मी रोज प्रीतम जिथे बसे त्या टेबलच्या समोरच्या टेबलवर बसू लागले. पुस्तकांशी  चाळा नावापुरता असे बाकी सगळा वेळ प्रीतमला न्याहाळण्यात जायचा. मी दिवसागणिक प्रीतमच्या प्रेमात पडू लागले...  हे ठीक होतं पण आता पुढे काय?  प्रीतमला कसं सांगायचं? आणि हे जे काही मला प्रेम बिम वाटतयं ते पलीकडच्याला पटलं नाहीतर. आयला सगळाच घोळ.. मनाशी पक्क केलं...सालं काहीही होऊ दे  आज जाऊन मला जे काही वाटतयं ते सगळं प्रीतमला  जाऊन सांगायचं....ठरलं मग मनाची पक्की तयारी करून लेक्चर संपल्यावर मी लायब्ररीत गेले अगदी प्रीतमच्या टेबलाजवळ. पण आश्चर्य !  प्रीतम तिथे नाही. आजूबाजूला शोधलं पण काहीच फायदा नाही. निराश होऊन मी माझ्या जागेवर आले. प्रीतमच्या रिकामी जागेला बघत राहिले .....मनात खूप गोंगाट सुरू होता....अचानक मागून एक आवाज,
"मला शोधत होता"
मागे वळून बघितलं; प्रीतम !
"तुम्ही"
"हो मीच, मलाच शोधत होता का तुम्ही"
"नाही ते...म्हणजे मी.....I like you" मी झटकन म्हणून टाकलं....
पुढची दोन मिनिटं एखाद्या सिनेमातल्या सीनसारखा पॉझ आणि पुढे continue scene . पण त्या मधल्या पॉझमध्ये अलिकडे आणि पलीकडे नेमकं काय झालं ते आम्हाला दोघांनाही समजलं नाही....मात्र एक झालं; आमचं मैत्रीचं समीकरण पक्क झालं.....
                   आधी फक्त प्रीतमकडे ट्रान्सजेन्डर म्हणून बघणारे, प्रीतमपासून लांब राहणारे विद्यापीठातले बरेच जण प्रीतमसोबत असणा-या मलाही एक खिल्ली म्हणून बघू लागले.....माझ्या डिपार्टमेंटमधल्या इतरांसाठी तर मी चर्चेचा विषय बनले. मला मी जे वागतेय त्यात काही चूक जाणवतं नव्हती आणि बाकींच्याना माझं वागणं  explain करण्यात काही point नव्हता. मग आपसूकच मी वेगळी पडू लागले. प्रीतमसोबत अधिक वेळ घालवू लागले. प्रीतम ट्रान्सजेन्डर असला तरी त्याची कुणी किव करावी असं प्रीतमला कधीच वाटलं नाही आणि ट्रान्सजेन्डर म्हणून होणारी हेटाळनी तर प्रीतमला कधीच मान्य नव्हती.  भिका मागून, दुस-यांना खोट्या दुवा देत, जबरदस्तीच्या वासनेला बळी पडून आयुष्याची माती करून घेण्यापेक्षा शिकून आपल्या अधिकाराने जगावं हेचं प्रीतमचं म्हणणं होतं..लिंगभावापेक्षा माणूस म्हणून जगण्याकडे प्रीतमचा अधिक कल होता....मानवतेच्या याचं धाग्याने आम्हा दोघांना एकत्र आणलं होतं.
                  आम्हा दोघांच्या सहवासाचा बराचसा वेळ हा लायब्ररीत जायचा. प्रीतमला फिरणं जास्त आवडतं नसे. का? असं मी कधी विचारलं नाही. आणि मुद्दामहून जबरदस्ती कधी केली नाही.  लायब्ररी हेच आमचं रमण्याचं ठिकाण झालं. शरीराशी खेळण्याऐवजी विचाराशी खेळणं हा आमचा रोमान्स. कितीतरी लेखक, पुस्तकं, विचार, माणसं, स्वभाव यांच्यात आमच्या गप्पांची,भाडणांची, एकमेंकावरच्या कुरघोडीची मुशाफिरी व्हायची. यातनच आम्ही एकमेकांना कळू लागलो.....एखाद्याचा सहवास आपल्याला समृद्ध करतो याचा साक्षात अनुभव मी प्रीतम सोबत घेत होते. इतरांची सहानुभूती घेत जगण्यापेक्षा आपण आपले म्हणून जेव्हा जगतो तेव्हा जगण्याचा मिळणारा आनंद हा आमच्यातल्या सहवासामुळे मला उमगत होता.
           म्हणता म्हणता आमचं एम.ए. चं पहिलं वर्ष संपलं....दुस-या वर्षाची हाफ टर्म ही झाली. या वर्षभरात आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. माझ्या घरीही प्रीतमविषयी समजलं. आमच्यात जे काही होतं ते त्यांना मान्य नव्हतंच, पण मी ऐकणारी नव्हते...मी परोपरी त्यांना समजावत होते. शेवटी आई म्हणाली,
           "या सगळ्यातून तुला काय साध्य करायचं आहे याचा विचार करं बस्स !"
           आईच्या अशा बोलण्याने मी बुचकळ्यात पडले. आम्हा दोघांमध्ये प्रेम तर होतचं. पण आम्ही ते एकमेकांजवळ व्यक्त करण्याचा अवकाश होता. खूप गोंधळ सुरू होता मनात....प्रीतमशी बोलायला हवं. फोन हातात घेतला, "नको उद्या प्रत्यक्ष समोरचं या सगळ्याचा निचरा करूया" असं ठरवून फोन बाजूला ठेवला.
          दुस-या दिवशी आमच्या नेहमीच्या टेबलावर मी प्रीतमची वाट बघत होते....खूप वेळ झाला प्रीतमचा कुठेच पत्ता नव्हता....
"असं कधी होतं नाही" मी बाहेर येऊन लायब्ररी अटेन्डसंना विचारलं, "नाही बघितलं" त्यांनी सांगितलं. माझा जीव घाबरा होत होता...प्रीतमला फोन वर फोन  करत होते पण प्रीतमचा फोन बंद. मी प्रीतमच्या डिपार्टमेंट मध्ये जाऊन चौकशी केली, तिथे समजलं
        "He has some health issue. he is on live.."
        प्रीतम आजारी ! पण कालच तर आम्ही भेटलो होतो....फोनवर बोलणं ही झालं होतं मग अचानक काय झालं असेल....विचारांनी डोक्याचा भुगा होतं होता.....मी परत एकदा फोन लावला ....फोन बंद.....
         महिना झाला, दोन महिने झाले......प्रीतमचा कुठेच मागमूस नाही की फोन नाही....लास्ट टर्मची परीक्षा जवळ आली तरी प्रीतम कुठेच नाही....
       "काय झालं असेल?"
        "असं काय कारण असेल प्रीतमच्या अचानक निघून जाण्याचं?"
         "प्रीतमचा फोन का बंद आहे ?"
         "प्रत्येक प्रॉब्लेम वर सोल्युशन शोधण्याची वृत्ती प्रीतमकडे होती मग अशी कोणती अडचण आली असेल?"
          माझ्या असण्याने काही ....नाही नाही असं काही नसेल येईल प्रीतम....असं मी समजवत होते स्वतःला.
प्रीतमच्या गुरूंना जाऊन भेटावं का ? नको प्रीतमला ते आवडणारं नाही. वाट बघण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता....रिझल्टचा दिवस उजाडला.... आम्हा दोघांचे रिझल्ट घेऊन मी जड पावलांनी विद्यापीठाबाहेर पडले. प्रीतमच्या डिपार्टमेंटकडून फारसं काही समजलं तर नाहीच पण त्यांनी ते जाणून घेण्याचा प्रयत्न ही केला नव्हता. प्रीतमचा सहवास अनुभवण्याची विद्यापीठ ही एकच जागा होती. एम.ए. संपल्यावर कित्येक दिवस आज ना उद्या प्रीतम दिसेल या अपक्षेने मी विद्यापीठात येत राहिले.....पण काहीच उपयोग झाला नाही.  न सांगता प्रीतमने मला अलविदा केलं होतं.....
      आजही जेव्हा केव्हा निंवात वाचत बसलेली असताना वाटून जातं, आता प्रीतम समोर येईल माझ्या केंसाचा भुगा करेल, माझ्या हातातलं पुस्तक खेचून घेईल आणि कसं वाटलं पुस्तकं विचारेल. पण ही माझी कल्पनाच राहते. प्रीतम नाही येतं......
          "दे माई दुरका, ले भगवान की दुवा" असं साडी फेटलेल्या कुणाचा आवाज कानावर पडला की नजर पटकन वळते त्या आवाजाकडे, वाटतं बदल नको असलेल्या समाजाने तूला पुन्हा त्याचं रितीने वागायला भाग तर पाडलं नसेलं? पण मग तू तो नाहीस हे समजतं आणि दिलासा मिळतो.
           आज प्रीतम माझ्यासोबत नाही.....कुठे असेल माहित नाही, कधी येईल माहित नाही प्रीतम; पण बस्स तुझं असणं मला या समाजातल्या परंपरागत वाटेपेक्षा वेगळ्या वाटेने जाणा-या मला ताकद देत राहतं.......
          -श्रेया पांचाळ....

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एक वेगळा लेख म्हणून छान वाटला. गुड वन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0