प्रिंट इज डेड, लाँग लिव्ह स्क्रीन!

वाचनाची सवय झालेल्या आधुनिक मानवाचा मेंदू वाचन करत असताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात असतो याची कल्पनासुद्धा करणे शक्य नाही. हे वाक्य वाचत असताना लिपीबद्ध केलेल्या दृश्य स्वरूपातील शब्द/अक्षरांची प्रतिमा मेंदूच्या एका विशिष्ट भागावर आदळतात; यापूर्वी स्मृतीकोशात संग्रहित झालेल्या शब्दभांडारातून त्या परत मिळवून त्यांच्या उच्चाराना व्याकरणात गुंफून वाक्य तयार करतात; त्याना माहितीच्या स्वरूपात बाहेर काढतात; मज्जातंतूद्वारे बोलीभाषेत परिवर्तन करून दृश्यस्वरूपातील प्रतिमांना वाक्य वा तत्सम स्वरूपात अर्थबोध करून पुन्हा एकदा स्मृतीकोशात ती माहिती साठवून ठेवतात व/वा उच्चाराच्या स्वरूपात परस्परसंवाद साधतात. जर माहित नसलेल्या भाषेतील शब्दप्रतिमा असल्यास त्या प्रतिमा आपल्याला अर्थहीन वाटू लागतात व मेंदू त्याची दखल घेत नाही.

p1

वाचन-लेखन हे मानवी मेंदूच्या उत्क्रांतीच्या प्रदीर्घ कालखंडातील अलीकडील घटना आहेत. वाचनासाठी सुरुवातीच्या काळात लिपींच्या दृश्यप्रतिमामधील अर्थसंबंध ओळखण्यासाठी मेंदूला प्रशिक्षित करावी लागते. व या प्रशिक्षणात तरबेज झाल्यानंतरच वाचन शक्य होऊ शकते. काही वेळा केवळ अक्षरं ओळखता आले तरी भाषाज्ञान नसल्यास त्यातून कुठलीही माहिती मेंदूत संग्रहित होऊ शकत नाही. वाचन कुशलता वाटते तितकी सोपी नसून अगदी प्राथमिक स्तरातील शिक्षण व अतीसामान्य बुद्धीची कुवत असलेल्यांना वाचनातून माहिती संग्रहित करणे जमेलच याची खात्री देता येत नाही.
हा लेख वाचत असताना आपल्या मनात कुठले विचार उमटले आहेत याचा क्षणभर विचार करू या. आपण हा लेख संगणक. स्मार्ट फोन, टॅब्लेट वा ई-रीडर वरून वाचत आहात. गंमत अशी आहे की वाचनाची ही साधनं दहा-पंधरा वर्षापूर्वी माहितसुद्धा नव्हत्या. नियतकालिकं, पारंपरिक पुस्तकं, वृत्तपत्रे यासारख्या कागदावरील मुद्रित साधनापासून आपल्याला परावृत्त करणाऱ्या डिजिटल वाचनासाठीचे हे इंटरनेटवर आधारलेले तंत्रज्ञान मानव जातीच्या समोर माहितीचा खजानाच रिकामा करत आहे. प्रकाशाच्या वेगाने जगभरातील माहिती आपल्याला उपलब्ध करून देत आहे. माहितीचा हा महापूर वाचकाला आणखी एका जबाबदारीची जाणीव करून देत आहे; समोर आलेल्या माहितीचा शहानिशा केल्याशिवाय स्वीकार केल्यास आपण गोत्यात सापडू व त्यासाठी चिकित्सकवृत्तीची वाढ करून घेणे अत्यावश्यक ठरत आहे.

वाचनसाधनातील या आमूलाग्र बदलामुळे वाचनाच्या गुणवत्तेवर काय परिणाम होत आहेत याचाही विचार करावा लागेल. ऑन लाइनवरून वाचत असताना हार्ड कॉपी वाचनापेक्षा आपले लक्ष तितकेसे केंद्रित नसते हे नक्कीच आपल्याला जाणवले असेल. खरे पाहता लॅपटॉपच्या स्क्रीनवरील मजकूर वा एखाद्या कागदावरील मजकूर याच्या वाचनात तसा फरक असण्याचे कारण नाही. परंतु याविषयी केलेल्या अभ्यासात काही धक्कादायक गोष्टी आढळल्या. त्यांची चर्चा करणे सुसंगत ठरेल.

आपण ज्या प्रकारे एखादी स्क्रिप्ट लिहितो व/वा वाचतो तेथून या चर्चेची सुरुवात करता येईल. स्क्रिप्ट तयार करण्यामागील लिपीची यंत्रणा त्या त्या भाषासंस्कृतीवर अवलंबून असते. देवनागरी लिपीच्या स्क्रिप्ट यंत्रणेमागे हिंदी-संस्कृत-मराठी इत्यादी आर्य संस्कृतीतील विविध भाषाप्रकार, तमिळ-तेलुगु-कन्नड लिपींच्या स्क्रिप्ट यंत्रणेमागे द्रविड संस्कृतीतील भाषाप्रकार असू शकतील. तसेच चायनीज, जपानीज वा इंग्रजी स्क्रिप्टमागे त्या त्या प्रदेशातील वेगवेगळे भाषासंस्कृती असू शकतील. स्क्रिप्टमध्ये इतके विविध प्रकार असूनसुद्धा स्क्रिप्टचे मेंदूतील आकलन प्रक्रिया मात्र आश्चर्यकारकरित्या सर्व भाषिकांना समान आहेत. मुद्रित/लिखित स्क्रिप्टमधील शब्दांच्या दृश्यप्रतिमा मेंदूत साठवणे, त्या शब्दांचा अर्थ समजून घेणे, संदर्भानुसार त्यांना अर्थ लावणे व त्यातून आशययुक्त वाक्याची वा परिच्छेदाची रचना करणे यात, भाषासंस्कृती कुठलीही असली तरी, काही फरक पडत नाही.

जर हेच सर्व खरे असल्यास डिजिटल मजकूर व कागदावरील मजकूर यात फार मोठा फरक असण्याचे कारणच नाही. वाचनासंबंधीचा हा अगदीच तुरळक फरक असल्यास कागद वा स्क्रीन यामुळे त्याचा वाचनावरील परिणामात वा वाचलेले समजून घेण्यात काही फरक असू नये असे म्हणता येईल. परंतु यासंबंधीचे प्रयोग मात्र वेगळेच काही तरी सांगत आहेत.

प्रयोगातील एका निरीक्षणानुसार स्क्रीन कनिष्टता परिणाम (screen inferiority effect) यावर प्रकाश टाकू शकेल. नावात सुचविल्याप्रमाणे इतर सर्व गोष्टी सारखे असताना डिजिटल स्क्रीनवरील मजकूराचे आकलन कागदावरील मजकूरापेक्षा कमी असते. हा लेख ऑन लाइन वाचत असल्यास काही प्रमाणात तरी लेखातील आशय समजून घेण्यात आपण कमी पडू शकतो. आपण या लेखाचा ढोबळ सारांश व्यवस्थितपणे सांगू शकतो. परंतु लेखातील बारकावे समजून घेण्यासाठी हार्डकॉपीला पर्याय नाही, असे प्रयोगकर्त्यांना वाटते. वेगवेगळ्या भाषांसाठी हा प्रयोग केल्यावरसुद्धा स्क्रीन कनिष्टता परिणाम ठळकपणे समोर येते.

अजून एका अभ्यासामध्ये या परिणामाची तीव्रता काही बदलत्या घटकामुळे कमी जास्त होऊ शकते. उदाहरणार्थ, मजकूराचे सादरीकरण कशा प्रकारे केले जाते, यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कादंबरीसारख्या कथनात तल्लीन करू शकणाऱ्या मजकूराचे सादरीकरण – स्क्रीनवर किंवा कागदावर कुठेही असली तरी - गौण ठरू शकते. परंतु पाठ्यपुस्तकातील - जेथे स्पष्टीकरणाची गरज भासणार आहे अशा - मजकूरासाठी मात्र सादरीकरण महत्वाचे ठरू शकेल. याचबरोबर मजकूर समजून घेण्यासाठी आपण किती वेळ देणार आहोत यावरसुद्धा स्क्रीन कनिष्टता परिणाम कमी जास्त होऊ शकतो. जेव्हा वाचकाला घाई असते तेव्हा हा परिणाम जास्त असतो. जर वाचणे लवकर संपवायचे असल्यास स्क्रीनपेक्षा मुद्रित कागद वाचणे केव्हाही चांगले. वाचन कौशल्य हा घटकसुद्धा स्क्रीन कनिष्टता परिणाम कमी जास्त करू शकतो. वाचन कुशलता कमी असणाऱ्यांना स्क्रीनवरील मजकुरातून काही अर्थबोध होऊ शकतो याबद्दल खात्री देता येत नाही.

२०२०च्या एका अभ्यासामध्ये स्क्रीन कनिष्टता परिणामाची तीव्रता डिजिटल वाचनातून मिळालेल्या चुकीच्या माहितीला बळी जाणाऱ्या वाचकांवर जास्त जाणवते. केवळ ऑनलाइन वाचन करणाऱ्यांच्या बाबतीत हा धोका जास्त असतो. आजकालच्या ऑनलाइन समाज माध्यमावर चुकीच्या माहितीचा वा गैरसमज करून देणाऱ्या पेरलेल्या माहितीचा मारा जास्त असल्यामुळे वाचकांची दिशाभूल होण्याची शक्यता जास्त असते.

यामुळे स्क्रीन कनिष्टता परिणामाची कारणं समजून घेणे कठिण होत आहे. डोळे कोरडे होणे वा दृष्य थकवा (visual fatigue) येणे हेही या परिणामामुळे घडत असावे, असा कयास केला जातो. परंतु हा परिणाम आपण आपल्या विचारांचे व वर्तणुकीचे ज्या प्रकारे नियंत्रण करतो त्याच्याशीसुद्धा हे निगडित आहे, असे अभ्यासकांना वाटते. समाज माध्यमावरील शंभर-दीडशे शब्दांचे लघुसंदेश, ऑनलाइन बातम्या वा ईमेलवरील छोटे छोटे मजकूर वाचण्याची सवय जडलेल्यांना दीर्घ लांबीचा वा गहन आशयाचा मजकूर वाचणे जमत नाही वा जमले तरी त्यातून त्यांना काही बोध होत नाही,

या सर्व घटकामुळे स्क्रीन कनिष्टता परिणाम आपल्या वाचन प्रक्रियेत फार मोठा बदल करत आहे. छोट्याशा व दीर्घ, गुंतागुंतीच्या मजकुरासाठी कुठले धोरण अनुसरावे याचा पुनर्विचार करण्याची गरज भासत आहे. लहान मजकूर वाचणारे व जलद वाचन करणारे बहुतेक वेळा त्यातील अनावश्यक शब्दांकडे (व, आणि, आहे, a, the, is, are, ...) दुर्लक्ष करतात. कारण असले शब्द व्याकरणाशी निगडित असतात. त्याऐवजी अर्थपूर्ण वाटणाऱ्या लांबलचक शब्दांचे वाचन करून आशय समजून घेण्याचे प्रयत्न करतात. परंतु ही जलद वाचन पद्धत ढोबळ मुद्दे वा सारांश समजून घेण्यासाठी योग्य वाटत असली तरी व्याकरणाशी संबंधित असलेले गाळलेले शब्द दीर्घ व गुंतागुंतीचे मजकूर स्पष्ट करण्यासाठी व माहितीची गुणवत्ता वाढविण्यासाठी असतात, हे आपण लक्षात घेत नाही. मजकुरातील कोण, कुणासाठी, कसे, केव्हा, इत्यादी समजून घेण्यासाठी व्याकरणपदे मदत करतात, याचे भानच जलद वाचनात ठेवले जात नाही.
या नंतरच्या काळात वाचनासाठीच्या पद्धतीत बदल करण्याची गरज भासणार आहे. डिजिटल वाचनासाठीचे महत्त्वाचे उदाहरण द्यायचे ठरविल्यास चित्रपट व टीव्हीवर सतत झळकणाऱ्या सरकत्या सबटायटल्सचे देता येईल. वेगळ्या भाषेतील चित्रपट वा टीव्ही मालिका बघताना सबटायटल्स आवश्यक ठरत आहेत व प्रेक्षकांना त्याची सवय झाली आहे. २०१९च्या कोविडच्या साथीनंतर ऑन लाइन शिक्षणावर बहुतेक देशानी भर दिल्यामुळे टीव्ही-स्मार्ट फोनवर शैक्षणिक कार्यक्रमात सबटायटल्सच्या पट्टीचा समावेश केल्याचे आपल्याला आठवत असेल. ठराविक वेळेसाठी दाखवल्या जात असलेल्या या सबटायटल्सच्या पट्टीचे वाचनसुद्धा सुरुवातीच्या काळात आव्हानात्मक वाटत होती. स्क्रीनवरील दृश्य बघणे, त्यातील संवाद ऐकणे व त्याचबरोबर सबटायटल्स वाचणे, व या सगळ्यातून समज वाढविणे ही कसरत मेंदूला करावे लागत होते.

या विषयी केलेल्या एका प्रयोगात संशोधकानी माहितीपटावरील सबटायटल्स वाचत असताना डोळ्यांच्या हालचालींचे निरीक्षण केले. प्रती सेकंदास बारा शब्दापासून २८ शब्दापर्यंत वेग वाढविल्यावरसुद्धा उपलब्ध असलेल्या मर्यादित वेळेतही डोळे सर्व शब्द वाचण्याचे प्रयत्न करत होते. प्राप्त परिस्थितीनुसार जुळवून घेण्यासाठी काही अनावश्यक शब्दांवर ओझरती नजर टाकत महत्वाचे शब्द पूर्ण वाचत सबटायटल्सचा आशय समजून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. संगणकावर डोळ्यांच्या अनुकरणाच्या प्रारूपातून मेंदूच्या भरपायीच्या धोरणामुळे सबटाइटल्स वाचत असताना काही वेळा नजरेची जास्त वेगाने हालचाल काही वेळा कमी वेगाने हालचाल होत असते, हे लक्षात आले. यावरून डिजिटल वाचनासाठी मेंदूला ( व डोळ्यांना) जे जे करणे शक्य आहे ते सर्व केले जाते, हे लक्षात आले.

p2

जगभरातील डिजिटल साधनात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्यामुळे वाचनाचे भवितव्य काय असू शकेल हा प्रश्न विचारावासा वाटतो. भविष्य काळात वाचनाच्या पद्धतीत काय बदल होतील हे सांगता येत नसले तरी डिजिटल तंत्रज्ञानातील सर्व फायदे (फाँट साइझ-फाँट टाइप, कमी जास्त करण्याची सुलभता, संदर्भांची त्वरित उपलब्घता, टिप्पणी करता येणे, कीवर्ड्सवरून लेख वा संदर्भ मिळविणे इ.इ.) घेत ही वाचन संस्कृती वाढत जाईल, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. या तंत्रज्ञानामुळे वाचनयोग्य गोष्टी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे वाचन संस्कृतीचा प्रसार वाढतच जाणार आहे, हे मात्र नक्की. अगदीच अमूर्त वा गुंतागुतीच्या विषयावरील लेख वाचण्यासाठी कागदावर प्रिट करून घेण्याची सोयसुद्धा या तंत्रज्ञानात आहे. त्यामुळे पर्यावरणास हानिकारक ठरणारी जंगल तोड करत अवाढव्य प्रमाणात कागद निर्मिती करून पुस्तकं, नियकालिकं, वृत्तपत्र छापण्याची गरज भासणार नाही व यानंतर सर्व माहिती कागदावरच हवे या दुराग्रहालाही अर्थ नाही.

कदाचित या नंतरच्या काळात वाचन कुशलतेच्या व्याख्येतच बदल होण्याची शक्यता जास्त आहे. वाचन कौशल्य म्हणजे गुतांगुतीच्या, गहन, अमूर्त संकल्पना जास्त खोलात जाऊन समजून घेण्यासाठी पारंपरिक हार्डकॉपी व मनोरंजन, परस्पर संवाद, संदेशांची देवाण-घेवाण यासारख्या सामान्य व्यवहारासाठी डिजिटल स्क्रीन. डिजिटल स्क्रीनचे अनेक पर्याय यापुढे उपलब्ध होणार आहेत. ई-रीडरसारख्या मुबलक व खिशाला परवडण्यासारखी डिजिटल साधनं बाजारात उपलब्ध होत असल्यास डिजिटल वाचनाचा प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल.

आताच स्क्रीनचा वापर मोठ्या प्रमाणात (जसे तुम्ही आता करत आहात) होत असल्यामुळे आपल्या वाचनाची आवड-निवड लक्षात घेऊन वाचकाला आपल्या वाचनाचे धोरण निश्चित करावे लागेल. जास्त गंभीर विषय वाचण्यासाठी स्क्रीनवरील वाचनवेग कमी करावे लागेल. वाचनात अडथळे आणून लक्ष विचलित करणाऱ्या जाहिरातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी लेखाचा योग्य स्वरूप (format) निवडावा लागेल. संदर्भांची सत्यासत्यता तपासावी लागेल. डोळ्यांना इजा होणार नाही असे फाँट टाइप व फाँट साइज निवडावे लागतील.

डिजिटल युगातील वाचनासाठी आपल्याला नेमके काय वाचायचे आहे याची स्पष्ट कल्पना असल्यास प्रिट की स्क्रीन हा प्रश्नच उपस्थित होणार नाही. त्यामुळे प्रिंट इज डेड, लाँग लिव्ह स्क्रीन हाच घोषवाक्य यापुढील काळात लागू होणार आहे.

संदर्भ Psyche

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून हेच सांगत आहेत.

"प्रिंट इज डेड, लाँग लिव्ह स्क्रीन हाच घोषवाक्य यापुढील काळात लागू होणार आहे." पण रेकॉर्डस ठेवण्यात कागद बाद होणार नाही. झाला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्क्रीन विरुद्ध पुस्तक यांत दोन्हीकडे फक्त छापील अक्षरे वाचणे आणि फार तर आणि चित्रे बघणे यावरच भर जास्त वाटला. स्क्रीनमुळे क्लिष्ट गोष्टी समजून घेण्यास अगदी वेगळेच माध्यम उदा. व्हिडीओ, मल्टीमीडिया , दृकश्राव्य असे बरेच काही ग्राउंड ब्रेकिंग येत आहे, आले आहे.

लेखाचा विषय रोचक. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाठ्यपुस्तकातील - जेथे स्पष्टीकरणाची गरज भासणार आहे अशा - मजकूरासाठी मात्र सादरीकरण महत्वाचे ठरू शकेल. याचबरोबर मजकूर समजून घेण्यासाठी आपण किती वेळ देणार आहोत यावरसुद्धा स्क्रीन कनिष्टता परिणाम कमी जास्त होऊ शकतो

पाठ्यपुस्तकाचा विषय काय आहे, आणि कसा मांडला आहे, यामुळेही फरक पडतो असा माझा अनुभव आहे. उदाहरणार्थ, सध्या cognitive linguistics या विषयात संशोधन करणाऱ्या जॉर्ज लेकॉफ याचं 'मॉरल पॉलिटिक्स' हे पुस्तक वाचत आहे. जवळपास ५५० पानं आहेत. माझ्याकडे हे छापील पुस्तक आहे. एवढं जड पुस्तक हातात वागवण्यापेक्षा किंडल पेपरवाईटवर वाचायला मला जास्त आवडलं असतं.

शिवाय विशेषतः अमेरिकी अललित पुस्तकांमध्ये फापटपसारा फार असतो, असं माझं मत आहे. जो मुद्दा ५० शब्दांत मांडता येईल त्यासाठी कोण, किती जास्त शब्द वापरतील याची स्पर्धा लावल्यासारखं वाटतं. लेकॉफचं पुस्तकही याला अपवाद वाटत नाही. यातले काही मुद्दे मला २-३ वर्षं त्या विषयाचा अभ्यास केल्याशिवाय आकळणार नाहीत - appreciation असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ते येण्यासाठी किमान तेवढा अभ्यास लागेल. ते वाचलेलं मला समजत नाही असा माझा दावा नाही; आकलन होऊन त्याबद्दल मत असणं मला शक्य नाही. मग ते एवढ्या तपशिलात अशा छापाच्या पुस्तकात लिहू नये, पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित ठेवावं असं माझं मत आहे.

याशिवाय गविंनी वर मुद्दा मांडला आहे तो मल्टिमिडिया वापराचा. फोटो, व्हिडिओ, इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले, वगैरे वापरूनही शिकता येतं. हे प्रयोग छापील माध्यमांत करता येत नाहीत. रंगीत प्रतिमा छापायच्या तरी खर्च खूप वाढतो. हे माझ्या किंडलवर जमत नाही; पण ती मर्यादा मीच निवडलेली आहे. #टोनडेफता

किंडलवर कादंबऱ्या वाचताना कधी कठीण शब्द आला तर तिथेच डिक्शनरीतून, किंवा विकिपिडियावरून शब्दाचा अर्थ समजतो. छापील माध्यमात ही शक्यताच नाही.

किचकट समीकरणं समजून घेताना मात्र मला छापील माध्यमच आवडतं. एकेका पानावर जिथे २० मिनिटं अडकायला होतं तिथे इतका काळ स्क्रीनकडे बघणं (आता वयानुसार) झेपत नाही. लहानपणी(!) स्क्रीन वापरायची फार सवय नव्हती म्हणून कागद आवडायचा.

त्यामुळे समजून घेणं म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे, हे समजल्याशिवाय सदर विचाराबद्दल काही मत मांडणं शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऑस्टिन शहराच्या ग्रंथालयात आता इ-बुकं असतात. ती थेट घरच्या किंडलवर उतरवून वाचता येतात. तीन आठवड्यांनी आपसूक पुस्तक किंडलवरून जातं. आधी वाचून झालं तर आधीच परत करता येतं.

मी अत्यंत घरबशी आहे. मला बाहेर जायचा खूप कंटाळा असतो. मला ग्रंथालयातली ही सोय आवडते. रात्री आडवी झाल्यावर पुस्तक मागवायचं, ते लगेच किंडलवर येतं आणि मग तासभर लोळून पुस्तक वाचायचं. एखाद्या पुस्तकासाठी तासभर खर्चल्यावर मग ते पुस्तक आवडलं नाही तरीही सोडवत नाही. त्यामुळे ते वाचलंही जातं.

गेल्या वर्षी ही सोय आहे हे लक्षात आल्यापासून अनेक पुस्तकं अशीही वाचली. सलमान रश्दींची नवीनतम कादंबरी Victory City अशीच वाचली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यूट्यूबवरचे विडिओ पाहण्यासाठी मोठा स्क्रीन असणे गरजेचं आहे. तोसुद्धा tablet चाच. पुस्तकं वाचण्यासाठीही हेच योग्य. कागदी पुस्तकं घेणं परवडत नाही.
यावर शोध घेता घेता किंडलपेक्षा साधा tablet उत्तम. तो मागच्या वर्षी सापडला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0